श्रीमद् वाल्मिकीय रामायण माहात्म्यम् । चतुर्थोऽध्यायः । | |||||||||
चैत्रमासे रामायण पठनश्रवण माहात्म्यं कलिकाख्यव्याधस्य उत्तङ्कमुनेश्च कथा -
|
चैत्र मासात रामायणाच्या पठण आणि श्रवणाचे माहात्म्य, कलिक नामक व्याध आणि उत्तंक मुनिची कथा -
| ||||||||
अन्यमासं प्रवक्ष्यामि श्रृणुध्वं सुसमाहिताः । सर्वपापहरं पुण्यं सर्वदुःख निबर्हणम् ॥ १ ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां चैव योषिताम् । समस्तकामफलदं सर्वव्रत फलप्रदम् ॥ २ दुःस्वप्ननाशनं धन्यं भुक्तिमुक्ति फलप्रदम् । रामायणस्य माहात्म्यं श्रोतव्यं च प्रयत्नतः ॥ ३ |
नारद म्हणतात -
"महर्षि हो ! आता मी रामायणाचा पाठ आणि श्रवणासाठी उपयोगी दुसर्या मासाचे वर्णन करतो. एकाग्र चित्त करून ऐका. रामायणाचे माहात्म्य समस्त पापांचे हरण करणारे, पुण्यजनक आणि संपूर्ण दुःखांचे निवारण करणारे आहे. ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि स्त्री या सर्वांना समस्त मनोवाञ्छित फल देणारे आहे. त्याने सर्व प्रकरच्या व्रतांचेही फल प्राप्त होते. ते दुःस्वप्नाचा नाश करणारे, धनाची प्राप्ती करून देणारे आणि भोग व मोक्षरूप फल देणारे आहे. म्हणून ते प्रयत्नपूर्वक ऐकले पाहिजे. ॥ १-३ ॥
| ||||||||
अत्रैवोदाहरन्ति इमं इतिहासं पुरातनम् । पठतां श्रृण्वतां चैव सर्वपाप प्रणाशनम् ॥ ४ |
या विषयी विज्ञ पुरुष एका प्राचीन इतिहासाचे उदाहरण देतात. तो इतिहास त्याच्या वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या समस्त पापांचा नाश करणारा आहे ॥ ४ ॥
| ||||||||
आसीत् पुता कलियुगे कलिको नाम लुब्धकः । परदार परद्रव्य हरणे सततं रतः ॥ ५ |
प्राचीन कलियुगात एक कलिक नावाचा व्याध राहात होता. तो सदा परस्त्री आणि परधन यांच्या अपहरणातच लागलेला असे. ॥ ५ ॥
| ||||||||
परनिन्दापरो नित्यं जन्तुपीडाकरस्तथा । हतवान् ब्राह्मणान् गावः शतशोऽथ सहस्रशः ॥ ६ |
दुसर्यांची निंदा करणे त्याचे नित्याचे काम होते. तो सदा सर्व जंतुंना पीडा देत असे. त्याने कित्येक ब्राह्मणांची आणि शेकडो, हजारो गायींची हत्या केली होती. ॥ ६ ॥
| ||||||||
देवस्वहरणे नित्यं परस्वहरणे तथा । तेन पापान्यनेकानि कृतानि सुमहान्ति च ॥ ७ |
परक्याच्या धनाचे तर तो नित्य अपहरण करीतच असे, देवतांचे धनही तो हडप करत असे. त्याने आपल्या जीवनात अनेक मोठमोठी पापे केली होती. ॥ ७ ॥
| ||||||||
न तेषां शक्यते वक्तुं संख्या वत्सरकोटिभिः । स कदाचिन्महापापो जन्तूनामन्तकोपमः ॥ ८ सौवीरनगरं प्राप्तः सर्वैश्वर्यसमन्वितम् । योषिद्भिर्भूषिताभिश्च सरोभिर्विमलोदकैः ॥ ९ अलंकृतं विपणिभिः ययौ देवपुरोपमम् । |
त्याच्या पापांची गणना कोटी वर्षातही केली जाणे शक्य नव्हते. एका समयी तो महापापी व्याध, जो जीवजंतुंसाठी यमराजाप्रमाणे भयंकर होता, सौवीर नगरात गेला. ते नगर सर्व प्रकारच्या वैभवाने संपन्न, वस्त्र-भूषणांनी विभूषित युवतींच्या द्वारा सुशोभित, स्वच्छ जल असणार्या सरोवरांनी अलंकृत आणि निरनिराळ्या प्रकारच्या दुकानांनी सुसज्जित होते. देवनगराप्रमाणे त्याची शोभा दिसत होती. व्याध त्या नगरात गेला. ॥ ८-९ १/२ ॥
| ||||||||
तस्योपवनमध्यस्थं रम्यं केशवमन्दिरम् ॥ १० छादितं हेमकलशैः दृष्ट्वा व्याधो मुदं ययौ । हराम्यत्र सुवर्णानि बहूनीति विनिश्चितः ॥ ११ |
सौवीर नगराच्या उपवनात भगवान केशवाचे अत्यंत सुंदर मंदिर होते. ते सोन्याच्या अनेकानेक कलशांच्यामुळे झाकले गेले होते. ते पाहून व्याध्याला प्रसन्नता वाटली. त्याने निश्चय केला की मी येथून खूपसे सुवर्ण चोरून घेऊन जाईन. ॥ १०-११ ॥
| ||||||||
जगाम रामभवनं कीनाशश्चौर्यलोलुपः । तत्रापश्यद् द्विजवरं शान्तं तत्त्वार्थकोविदम् ॥ १२ परिचर्यापरं विष्णोः उत्तङ्कं तपसां निधिम् । एकाकिनं दयालुं च निःस्पृहं ध्यानलोलुपम् ॥ १३ |
असा निश्चय करून तो चोरीवर लुब्ध असलेला व्याध श्रीरामाच्या मंदिरात गेला. तेथे त्याला शांत, तत्त्वार्थवेत्ता आणि भगवंताचा आराधनेत तत्पर उत्तंक मुनिंचे दर्शन झाले, जे साक्षात तपस्येचे निधि होते. ते एकटेच राहात होते. त्यांच्या हृदयात सर्वांविषयी दया भरलेली होती. ते सर्वार्थाने निस्पृह होते. त्यांच्या मनात केवळ भगवंताच्या ध्यानाचीच आवड उरलेली होती. ॥ १२-१३ ॥
| ||||||||
दृष्ट्वासौ लुब्धको मेने तं चौर्यस्यान्तरायिणम् । देवस्य द्रव्यजातं तु समादाय महानिशि ॥ १४ |
त्यांना तेथे उपस्थित पाहून व्याधाने त्यांना आपल्या चोरीच्या कामात विघ्न आणणारे आहेत हे जाणले. त्यानंतर जेव्हां अर्धी रात्र उलटली तेव्हां तो देवतासंबंधी द्रव्यसमूह घेऊन निघाला. ॥ १४ ॥
| ||||||||
उत्तङ्कं हन्तुमारेभे उद्यतासिर्मदोद्धतः । पादेनाक्रम्य तद्वक्षो गलं संगृह्य पाणिना ॥ १५ |
त्या मदोन्मत्त व्याधाने उत्तंग मुनिंची छाती आपल्या एका पायाने दाबून धरून हातांनी त्यांचा गळा पकडला आणि तलवार उपसून त्यांना मारून टाकण्याचा उपक्रम सुरू केला. ॥ १५ ॥
| ||||||||
हन्तुं कृतमतिं व्याधं उत्तङ्कं प्रेक्ष्य चाब्रवीत् । उत्तङ्क उवाच भो भोः साधो वृथा मां त्वं हनिष्यसि निरागसम् ॥ १६ |
उत्तंकांनी पाहिले की व्याध आपल्याला मारू इच्छित आहे तेव्हां ते त्याला म्हणाले - "अरे भल्या माणसा. तू व्यर्थच मला मारू पहात आहेस. मी तर सर्वथा निरपराध आहे. ॥ १६ ॥
| ||||||||
मया किमपराधं ते तद् वद त्वं च लुब्धक । कृतापराधिनो लोके हिंसां कुर्वन्ति यत्नतः ॥ १७ ह हिंसन्ति वृथा सौम्य सज्जना अप्यपापिनम् । |
'लुब्धका, सांग तर खरे की मी तुझा काय अपराध केला आहे ? संसारात लोक अपराध्याचीच प्रयत्नपूर्वक हिंसा करतात. हे सौम्या ! सज्जन निरपराध्याची व्यर्थ हिंसा करीत नाहीत. ॥ १७ १/२ ॥
| ||||||||
विरोधिष्वपि मूर्खेषु निरीक्ष्यावस्थितान् गुणान् ॥ १८ विरोधं नाधिगच्छन्ति सज्जनाः शान्तचेतसः । |
'शांतचित्त साधु पुरुष अपल्या विरोधी आणि मूर्ख मनुष्यामध्येही सद्गुणांची स्थिती पाहून त्याच्याशीही विरोध करीत नाहीत. ॥ १८ १/२ ॥
| ||||||||
बहुधा वाच्यमानोपि यो नरः क्षमयान्वितः ॥ १९ तमुत्तमं नरं प्राहुः विष्णोः प्रियतरं तथा ॥ २० |
जो मनुष्य वारंवार दुसर्याने दिलेल्या शिव्या ऐकूनही क्षमाशील बनून राहतो त्याला उत्तम म्हटले जाते. त्याला भगवान् विष्णुंचा अत्यंत प्रियजन म्हटले गेले आहे. ॥ १९-२० ॥
| ||||||||
सुजनो न याति वैरं परहितनिरतो विनाशकालेऽपि । छेदेऽपि चंदनतरु सुरभीकरोति मुखं कुठारस्य ॥ २१ |
'दुसर्यांच्या हित साधनात रत असणारे साधुजन कुणाच्या द्वारा आपल्या विनाशाची वेळ उपस्थित झाली तरी त्याच्याशी वैर करीत नाहीत. चंदनाचा वृक्ष आपल्याला तोडणार्या कुर्हाडीच्या धारेला सुवसितच करीत असतो. ॥ २१ ॥
| ||||||||
अहो विधिर्वै बलवान् बाधते बहुधा जनान् । सर्वसङ्गविहीनोऽपि बाध्यते तु दुरात्मना ॥ २२ |
'अहो ! विधाता फार बलवान आहे. तो लोकांना नाना प्रकारांनी कष्ट देत राहतो. जो सर्व प्रकारच्या संगापासून अलिप्त आहे त्यालाही दुरात्मा मनुष्य सतावीत असतो. ॥ २२ ॥
| ||||||||
अहो निष्कारणं लोके बाधन्ते दुर्जना जनान् । धीवराः पिशुना व्याधा लोकेऽकारणवैरिणः ॥ २३ |
अहो ! दुष्टजन या संसारामध्ये बर्याचशा जीवांना काही अपराध नसताही पीडा देतात. कोळी (मच्छिमार) माशांना, चुगलखोर सज्जनांना आणि व्याध मृगांना या जगात अकारण वैरी होतात. ॥ २३ ॥
| ||||||||
अहो बलवती माया मोहत्यखिलं जगत् । पुत्रमित्रकलत्राद्यैः सर्वदुःखेन योज्यते ॥ २४ |
'अहो ! माया फार प्रबल आहे. ही सर्व जगाला मोहात पाडीत असते. आणि स्त्री, पुत्र व मित्र यांच्या द्वारा सर्वांना सर्व प्रकारच्या दुःखांनी संयुक्त करीत असते. ॥ २४ ॥
| ||||||||
परद्रव्यापहारेण कलत्रं पोषितं च यत् । अन्ते तत् सर्वमुत्सृज्य एक एव प्रयाति वै ॥ २५ |
'मनुष्य परक्याच्या धनाचे अपहरण करून जे आपल्या स्त्री आदिंचे पोषण करतो, ते काय कामाचे ? कारण की, अंती त्या सर्वांना सोडून तो एकटाच परलोकाचा रस्ता धरीत असतो.॥ २५ ॥
| ||||||||
मम माता मम पिता मम भार्या ममात्मजाः । ममेदं इति जन्तूनां ममता बाधते वृथा ॥ २६ |
'माझी माता, माझा पिता, माझी पत्नी, माझा पुत्र तसेच माझे हे घरदार या प्रकारे ममता व्यर्थच प्राण्यांना कष्ट देत राहते. ॥ २६ ॥
| ||||||||
यावद् अर्पयति द्रव्यं तावद् भवति बान्धवः । अर्जितं तु धनं सर्वे भुञ्जन्ते बान्धवाः सदा ॥ २७ दुःखमेकतमो मूढः तत्पाप फलमश्नुते । |
मनुष्य जो पर्यंत धन कमावून आणून देतो, तो पर्यंत लोक त्याचे बंधु-बांधव बनून राहतात आणि त्याने कमावून आणलेल्या धनाचा सर्व बंधु-बांधव सदा उपभोग घेत राहतात. परंतु मूर्ख मनुष्य आपण केलेल्या पापाचे फलरूप दुःख एकटाच भोगतो." ॥ २७ १/२ ॥
| ||||||||
इति ब्रुवाणं तं ऋषिं विमृश्य भयविह्वलः ॥ २८ कलिकः प्राञ्जलिः प्राह क्षमस्वेति पुनः पुनः । |
उत्तंक मुनि ज्यावेळी याप्रकारे सांगत होते त्यावेळी त्यांच्या बोलण्यावर विचार करून कलिक भयाने व्याकुळ झाला आणि हात जोडून वारंवार म्हणू लागला - "प्रभो ! माझ्या अपराधाची क्षमा करावी." ॥ २८ १/२ ॥
| ||||||||
तत्सङ्गस्य प्रभावेण हरिसंनिधिमात्रतः ॥ २९ गतपापो लुब्धकश्च सानुतापोऽभवद् ध्रुवम् । |
त्या महात्म्याच्या संगतिच्या प्रभावाने आणि भगवंताचे सान्निध्य मिळाल्याने त्या लुब्धकाचे सारे पाप नष्ट झाले आणि त्याच्या मनांत निश्चितच अत्यंत पश्चात्ताप होऊ लागला. ॥ २९ १/२ ॥
| ||||||||
मया कृतानि पापानि महान्ति सुबहूनि च ॥ ३० तानि सर्वाणि नष्टानि विप्रेन्द्र तव दर्शनात् । |
तो म्हणाला = "हे विप्रवर ! जी जीवनात फार मोठमोठी पापे केली आहेत. परंतु ती सर्व आपल्या केवळ दर्शनाने नष्ट झाली आहेत. ॥ ३० १/२ ॥
| ||||||||
अहं वै पापधीर्नित्यं पहापापं समाचरम् ॥ ३१ कथं मे निष्कृतिभूयात् कं यामि शरणं विभो । |
'प्रभो ! माझी बुद्धि सदा पापातच बुडून राहात होती. मी निरंतर मोठमोठ्या पापांचेच आचरण केले आहे. त्यातून माझा उद्धार कशा प्रकारे होईल ? मी कुणाला शरण जाऊ ? ॥ ३१ १/२ ॥
| ||||||||
पूर्वजन्मार्जितैः पापैः लुब्धकत्वं अवाप्तवान् ॥ ३२ अत्रापि पापजालानि कृत्वा कां गतिमाप्नुयाम् । |
पूर्वजन्मात केलेल्या पापांचे फळ म्हणून मला व्याध व्हावे लागले आहे. येथेही मी पापांचे जाळे निर्माण केले आहे. ही पापे करून मी कुठल्या गतिला प्राप्त होईन ?" ॥ ३२ १/२ ॥
| ||||||||
इति वाक्यं समाकर्ण्य कलिकस्य महात्मनः ॥ ३३ उत्तङ्को नाम विप्रर्षिः इदं वाक्यं अथाब्रवीत् । |
महात्मा कलिकाचे हे बोलणे ऐकून ब्रह्मर्षि उत्तंक म्हणाले - ॥ ३३ १/२ ॥
| ||||||||
उत्तङ्क उवाच साधु साधु महाप्राज्ञ मतिस्ते विमलोज्ज्वला ॥ ३४ यस्मात् संसारदुःखानां नाशोपायं अभीप्ससि । |
'महामते व्याधा ! तू धन्य आहेस. तुझी बुद्धि फार निर्मल आणि उज्ज्वल आहे. कारण तू संसारसंबंधी दुःखांच्या नाशाचा उपाय जाणण्याची इच्छा करीत आहेस. ॥ ३४ १/२ ॥
| ||||||||
चैत्रे मासि सिते पक्षे कथा रामायणस्य च ॥ ३५ नवाह्ना किल श्रोतव्या भक्तिभावेन सादरम् । यस्य श्रवणमात्रेण सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३६ |
चैत्र मासाच्या शुक्लपक्षात तुला भक्तिभावाने आदरपूरक रामायणाची नवाह्न कथा ऐकावी लागेल. तिच्या केवळ श्रवणाने मनुष्य समस्त पापांतून मुक्त होतो. ॥ ३५-३६ ॥
| ||||||||
तस्मिन् क्षणेऽसौ कलिको लुब्धको वीतकल्मषः । रामायणकथां श्रुत्वा सद्यः पञ्चत्वमागतः ॥ ३७ |
त्यावेळी कलिक व्याधाची सर्व पापे नष्ट झाली. तो रामायणकथा ऐकून तात्काळ मृत्युला प्राप्त झाला. ॥ ३७ ॥
| ||||||||
उत्तङ्कः पतितः वीक्ष्य लुब्धकं तं दयापरः । एतद् दृष्ट्वा विस्मितश्च अस्तौषीत् कमलापतिम् ॥ ३८ |
व्याधाला जमिनीवर पडलेला पाहून दयालु उत्तंक मुनि अत्यंत विस्मित झाले. नंतर त्यांनी भगवान् कमलापतिचे स्तवन केले. ॥ ३८ ॥
| ||||||||
कथां रामायणस्यापि श्रुत्वा च वीतकल्मषः । दिव्यं विमानमारुह्य मुनिमेतदथाब्रवीत् ॥ ३९ |
रामायणाची कथा ऐकून निष्पाप झालेला व्याध दिव्य विमानावर आरूढ होऊन उत्तंक मुनिंना या प्रकारे बोलला - ॥ ३९ ॥
| ||||||||
विमुक्तस्त्वत् प्रसादेन महापातक संकटात् । तस्मान्नतोऽस्मि ते विद्वन् यत् कृतं तत् क्षमस्व मे ॥ ४० |
"विद्वन् ! आपल्या प्रसादाने मी महापातकांच्या संकटातून मुक्त झालो आहे. म्हणून मी आपल्या चरणांना प्रणाम करीत आहे. मी जे काही केले आहे, माझ्या त्या अपराधाची आपण क्षमा करावी." ॥ ४० ॥
| ||||||||
सूत उवाच इत्युक्त्वा देवकुसुमैः मुनिश्रेष्ठमवाकिरत् । प्रदक्षिणात्रयं कृत्वा नमस्कारं चकार ह ॥ ४१ |
सूत म्हणतात - असे म्हणून कलिकाने मुनिष्रेष्ठ उत्तंकांवर देवकुसुमांची वृष्टी केली, आणि तीन वेळा त्यांची परिक्रमा करून त्यांना वारंवार नमस्कार केला. ॥ ४१ ॥
| ||||||||
ततो विमानमारुह्य सर्वकामसमन्वितम् । अप्सरोगणसंकीर्णं प्रपेदे हरिमन्दिरम् ॥ ४२ |
त्यानंतर अप्सरांनी भरलेल्या मनोवाञ्छित भोगांनी संपन्न विमानावर आरूढ होऊन तो श्रीहरिच्या परम धामात पोहोचला. ॥ ४२ ॥
| ||||||||
तस्मात् श्रृणुध्वं विप्रेन्द्राः कथां रामायणस्य च । चैत्रे मासि सिते पक्षे श्रोतव्यं च प्रयत्नतः ॥ ४३ नवाह्ना किल रामस्य रामायण कथामृताम् । |
म्हणून विप्रवरांनो ! आपण सर्व लोक रामायणाची कथा ऐका. चैत्र मासाच्या शुक्ल पक्षात प्रयत्नपूर्वक रामायणाच्या अमृतमयी कथेचे नवाह्न पारायण अवश्य ऐकले पाहिजे. ॥ ४३ १/२ ॥
| ||||||||
तस्माद् ऋतुषु सर्वेषु हितकृत् हरिपूजकः ॥ ४४ ईप्सितं मनसा यद्यत् तदाप्नोति न संशयः । |
म्हणून रामायण सर्व ऋतूत हितकारक आहे. त्याच्या द्वारा भगवंताची पूजा करणारा पुरुष मनात जी जी इच्छा करतो तिची निःसंदेह प्राप्ति तो करतो. ॥ ४४ १/२ ॥
| ||||||||
सनत्कुमार यत् पृष्टं तत् सर्वं गदितं मया ॥ ४५ रामायणस्य माहात्म्यं किमन्यत् श्रोतुमिच्छसि ॥ ४६ |
'सनत्कुमार ! तुम्ही जे रामायणाचे माहात्म्य विचारले होते, ते सर्व मी सांगितले आहे. आता आणखी काय ऐकू इच्छिता ?" ॥ ४५-४६ ॥
| ||||||||
इति श्रीस्कंदपुराणे उत्तरखण्डे नारद-सनत्कुमार संवादे रामायणमाहात्म्ये चैत्रमसफलानुकीर्तनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
|
या प्रकारे श्रीस्कंदपुराणाच्या उत्तरखण्डातील नारद-सनत्कुमार संवादाच्या अंतर्गत रामायण माहात्म्याच्या प्रसंगातील चैत्र मासातील रामायण श्रवणाचे फलाचे वर्णन नामक चौथा अध्याय समाप्त झाला. ॥ ४ ॥
| ||||||||
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ |