[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ पञ्चसप्ततितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामलक्ष्मणयोर्वार्तालापस्तयोः पम्पातटे गमनम् -
श्रीराम आणि लक्ष्मण यांचे संभाषण आणि त्या दोघा भावांचे पंपासरोवराच्या तटावर जाणे -
दिवं तु तस्यां यातायां शबर्यां स्वेन तेजसा ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा चिन्तयामास राघवः ॥ १ ॥

स चिन्तयित्वा धर्मात्मा प्रभावं तं महात्मनाम् ।
हितकारिणमेकाग्रं लक्ष्मणं राघवोऽब्रवीत् ॥ २ ॥
आपल्या तेजाने प्राकशित होणारी शबरी दिव्यलोकास निघून गेल्यावर भाऊ लक्ष्मणासहित धर्मात्मा राघवाने त्या महात्मा महर्षिंच्या प्रभावाचे चिंतन केले. चिंतन करून आपल्या हितात संलग्न राहाणार्‍या एकाग्रचित्त लक्ष्मणास राघवांनी याप्रकारे म्हटले- ॥१-२॥
दृष्टो मयाऽऽश्रमः सौम्य बह्वाश्चर्यः कृतात्मनाम् ।
विश्वस्तमृगशार्दूलो नानाविहगसेवितः ॥ ३ ॥
सौम्य ! मी त्या पुण्यात्मा महर्षिंचा हा पवित्र आश्रम पाहिला. येथे बर्‍याचशा आश्चर्यजनक गोष्टी आहेत. हरीण आणि वाघ एक दुसर्‍यावर विश्वास करतात. नाना प्रकारचे पक्षी या आश्रमाचे सेवन करतात. ॥३॥
सप्तानां च समुद्राणां तेषां तीर्थेषु लक्ष्मण ।
उपस्पृष्टं च विधिवत् पितरश्चापि तर्पिताः ॥ ४ ॥

प्रनष्टमशुभं यन्नः कल्याणं समुपस्थितम् ।
तेन त्वेतत् प्रहृष्टं मे मनो लक्ष्मण सम्प्रति ॥ ५ ॥
लक्ष्मणा ! येथे जे सात समुद्रांच्या जलांनी भरलेले तीर्थ आहे, त्यात आपण विधिपूर्वक स्नान तसेच पितरांचे तर्पण केले आहे यायोगे आपले सारे अशुभ नष्ट झाले आहे आणि आता आपल्या कल्याणाचा समय उपस्थित झाला आहे. सौमित्रा ! यामुळे या समयी माझ्या मनास अधिक प्रसन्नता वाटत आहे. ॥४-५॥
हृदये हि नरव्याघ्र शुभमाविर्भविष्यति ।
तदागच्छ गमिष्यावः पम्पां तां प्रियदर्शनाम् ॥ ६ ॥
नरश्रेष्ठ ! आता माझ्या मनात काही शुभ संकल्प उठणार आहे. म्हणून ये, आता आपण दोघे परम सुंदर पंपा सरोवराच्या तटावर जाऊं. ॥६॥
ऋष्यमूको गिरिर्यत्र नातिदूरे प्रकाशते ।
यस्मिन् वसति धर्मात्मा सुग्रीवोंऽशुमतः सुतः ॥ ७ ॥
तेथून थोड्‍याच अंतरावर तो ऋष्यमूक पर्वत शोभा प्राप्त करीत आहे, ज्याच्यावर सूर्यपुत्र धर्मात्मा सुग्रीव निवास करीत आहेत. ॥७॥
नित्यं वालिभयात् त्रस्तस्चतुर्भिः सह वानरैः ।
अभित्वरे च तं द्रष्टुं सुग्रीवं वानरर्षभम् ॥ ८ ॥

तदधीनं हि मे कार्यं सीतायाः परिमार्गणम् ।
वालीच्या भयाने सदा भयभीत राहात असल्याने ते चार वानरांसह त्या पर्वतावर राहातात. मी वानरश्रेष्ठ सुग्रीवास भेटण्यासाठी उतावळा होत आहे; कारण की सीतेच्या अन्वेषणाचे कार्य त्यांच्याच अधीन आहे. ॥८ १/२॥
इति ब्रुवाणं तं वीरं सौमित्रिरिदमब्रवीत् ॥ ९ ॥

गच्छावस्त्वरितं तत्र ममापि त्वरते मनः ।
या प्रकारच्या गोष्टी बोलत असलेल्या श्रीरामास सौमित्राने असे म्हटले- बंधु ! आपण दोघांनी शीघ्रच तेथे गेले पाहिजे. माझे मनही जाण्यासाठी उतावीळ होत आहे. ॥९ १/२॥
आश्रमात्तु ततस्तस्मान्निष्क्रम्य स विशाम्पतिः ॥ १० ॥

आजगाम ततः पम्पां लक्ष्मणेन सह प्रभूः ।
समीक्षमाणः पुष्पाढ्यं सर्वतो विपुलद्रुमम् ॥ ११ ॥
त्यानंतर प्रजापालक भगवान्‌ श्रीराम लक्ष्मणासह त्या आश्रमांतून निघून सर्व बाजूनी फुलांनी लगडलेल्या नाना प्रकारच्या वृक्षांची शोभा न्याहाळत पंपासरोवराच्या तटावर आले. ॥१०-११॥
कोयष्टिभिश्चार्जुनकैः शतपत्रैश्च कीरकैः ।
एतैश्चान्यैश्च बहुभिः नादितं तद् वनं महत् ॥ १२ ॥
ते विशाल वन टिट्टिभ, मोर, सुतार, पक्षी, पोपट तसेच अन्य बर्‍याचशा पक्ष्यांच्या कलरवाने निनादत राहिले होते. ॥१२॥
स रामो विविधान् वृक्षान् सरांसि विविधानि च ।
पश्यन् कामाभिसन्तप्तो जगाम परमं ह्रदम् ॥ १३ ॥
श्रीरामांच्या मनात सीतेला भेटण्याची तीव्र लालसा उत्पन्न झाली होती. त्यामुळे संतप्त होऊन ते नाना प्रकारचे वृक्ष आणि निरनिराळ्या सरोवरांची शोभा पहात त्या उत्तम जलाशयाजवळ गेले. ॥१३॥
स तामासाद्य वै रामौ दूराद् पानीयवाहिनीम् ।
मतङ्‌गसरसं नाम ह्रदं समवगाहत ॥ १४ ॥
पंपा नावाने प्रसिद्ध ते सरोवर पिण्यायोग्य स्वच्छ जल वहावणारे होते. श्रीराम दूर देशांतून चालत त्याच्या तटावर आले. येऊन त्यांनी मतंगसरस नामक कुंडात स्नान केले. ॥१४॥
तत्र जग्मतुरव्यग्रौ राघवौ हि समाहितौ ।
स तु शोकसमाविष्टो रामो दशरथात्मजः ॥ १५ ॥

विवेश नलिनीं रम्यां पङ्‌कजैश्च समावृताम् ।
ते दोघे रघुवंशी वीर तेथे शांत आणि एकाग्रचित्त होऊन पोहोंचले होते. सीतेच्या शोकाने व्याकुळ झालेल्या दशरथनंदन रामांनी त्या रमणीय पुष्करिणी पंपामध्ये प्रवेश केला, जी कमळांनी व्याप्त होती. ॥१५ १/२॥
तिलकाशोकपुंनाग-बकुलोद्‌दालकाशिनीम् ॥ १६ ॥

रम्योपवनसम्बाधाः पद्मसम्पीडितोदकाम् ।
स्फटिकोपमतोयां तां श्लक्ष्णवालुकसंतताम् ॥ १७ ॥

मत्स्यकच्छपसम्बाधां तीरस्थद्रुमशोभिताम् ।
सखीभिरिव संयुक्तां लताभिरनुवेष्टिताम् ॥ १८ ॥

किंनरोगरगगन्धर्व-यक्षराक्षससेविताम् ।
नानाद्रुमलताकीर्णां शीतवारिनिधिं शुभाम् ॥ १९ ॥
तिच्या तटावर तिलक, अशोक, नागकेसर, बकुळ तसेच लिसोड्‍याचे वृक्ष तिची शोभा वाढवीत होते. निरनिराळ्या प्रकारच्या रमणीय उपवनांनी ती घेरलेली होती. तिचे जल कमळ पुष्पांनी आच्छादित होते आणि स्फटिक मण्याप्रमाणे स्वच्छ दिसून येत होते. जलाच्या खाली स्वच्छ वाळुका पसरलेली होती. मत्स्य आणि कच्छप तिच्यात भरलेले होते. तटवर्ती वृक्ष तिची शोभा वाढवीत होते. सर्व बाजूंनी लतांच्या द्वारा आवेष्टित झाल्यामुळे ती सख्यांनी संयुक्त असल्या सारखी दिसत होती. किन्नर, नाग, गंधर्व, यक्ष आणि राक्षस तिचे सेवन करीत होते. निरनिराळे वृक्ष आणि लतांनी व्याप्त झालेली पंपा शीतल जलाचा सुंदर निधि असल्याप्रमाणे प्रतीत होत होती. ॥१६-१९॥
पद्मसौगन्धिकैस्ताम्रां शुक्लां कुमुदमण्डलैः ।
नीलां कुवलयोद्‌घाटैर्बहुवर्णां कुथामिव ॥ २० ॥
अरूण कमलांनी ती ताम्रवर्णाची, कुमुद- कुसुमांच्या समूहांनी शुक्लवर्णाची बहुरंगी गालिच्या प्रमाणे शोभून दिसत होती. ॥२०॥
अरविन्दोत्पलवतीं पद्मसौगन्धिकायुताम् ।
पुष्पिताम्रवणोपेतां बर्हिणोद्‌घुष्टनादिताम् ॥ २१ ॥
त्या पुष्करिणीत अरविंद आणि उत्पले विकसित झाली होती. पद्म आणि सौगंधिक जातिची फुले शोभून दिसत होती. मोहोर लागलेल्या आमरायांनी ती घेरलेली होती तसेच मयूरांची केका तेथे गुंजत राहिली होती. ॥२१॥
स तां दृष्ट्‍वा ततः पम्पां रामः सौमित्रिणा सह ।
विललाप च तेजस्वी रामो दशरथात्मजः ॥ २२ ॥
सौमित्र लक्ष्मणासहित श्रीरामांनी जेव्हा ती मनोहर पंपा पाहिली तेव्हा त्यांच्या हृदयात सीतेच्या वियोगाची व्यथा उद्दीप्त झाली, म्हणून ते तेजस्वी दशरथनंदन श्रीराम तेथे विलाप करू लागले. ॥२२॥
तिलकैर्बीजपूरैश्च वटैः शुक्लद्रुमैस्तथा ।
पुष्पितैः करवीरैश्च पुन्नागैश्च सुपुष्पितैः ॥ २३ ॥

मालतीकुन्दगुल्मैश्च भाण्डीरैर्निचुलैस्तथा ।
अशोकैः सप्तपर्णैश्च केतकैरतिमुक्तकैः ॥ २४ ॥

अन्यैश्च विविधैर्वृक्षैः प्रमदामिव शोभिताम् ।
अस्यास्तीरे तु पूर्वोक्तः पर्वतो धातुमण्डितः ॥ २५ ॥

ऋष्यमूक इति ख्यातश्चित्रपुष्पितपादपः ।
तिलक, बिजौरा, वट, लोध, फुललेले करवीर, पुष्पित नागकेसर, मालती, कुंद, झाडी, भंडीर (वड), वञ्जुल, अशोक, छितवन, कतक, माधवी लता तसेच अन्य नाना प्रकारच्या वृक्षांनी सुशोभित झालेली पंपा, तर्‍हेतर्‍हेच्या वस्त्रा भूषणांनी सजलेल्या युवती प्रमाणे भासत होती. तिच्याच तटावर विविध धातुंनी मंडित पूर्वोक्त ऋष्यमूक नावाने विख्यात पर्वत सुशोभित होत होता. त्याच्यावर फुलांनी भरलेले विचित्र वृक्ष शोभून दिसत होते. ॥२३-२५ १/२॥
हरिर्ऋक्षरजोनाम्नः पुत्रस्तस्य महात्मनः ॥ २६ ॥

अध्यास्ते तं महावीर्यः सुग्रीव इति विश्रुतः ।
ऋक्षराज नामक महात्मा वानराचे पुत्र कपिश्रेष्ठ महापराक्रमी सुग्रीव तेथेच निवास करीत होते. ॥२६ १/२॥
सुग्रीवमभिगच्छ त्वं वानरेन्दं नरर्षभ ॥ २७ ॥

इत्युवाच पुनर्वाक्यं लक्ष्मणं सत्यविक्रमः ।
कथं मया विना सीतां शक्यं लक्ष्मण जीवितुम् ॥ २८ ॥
त्या समयी सत्यपराक्रमी श्रीरामांनी पुन्हा लक्ष्मणास म्हटले- नरश्रेष्ठ लक्ष्मण ! तुम्ही वानरराज सुग्रीवाच्या जवळ चला, मी सीते शिवाय कसा जीवित रहू शकेन ? ॥२७-२८॥
इत्येवमुक्त्वा मदनाभिपिडितः
     स लक्ष्मणं वाक्यमनन्यचेतनः ।
विवेश पम्पां नलीनी मनोरमां
     तमूत्तमः शोकमुदीरयाणः ॥ २९ ॥
असे म्हणून सीतेच्या दर्शनाच्या कामनेने पीडित तसेच तिच्या प्रति अनन्य अनुराग ठेवणारे श्रीराम त्या महान्‌ शोकाला प्रकट करीत त्या मनोरम पुष्करिणी पंपामध्ये उतरले. ॥२९॥
क्रमेण गत्वा प्रविलोकयन् वनं
     ददर्श पम्पां शुभदर्शकाननाम् ।
अनेकनानाविधपक्षिसंकुलां
     विवेश रामः सह लक्ष्मणेन ॥ ३० ॥
वनाची शोभा बघत क्रमशः तेथे जाऊन लक्ष्मणासहित रामांनी पंपेला पाहिले. तिच्या समीपवर्ती कानने फार सुंदर आणि दर्शनीय होती. अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी तेथे सर्व बाजूस भरलेल्या होत्या. भावासहित श्रीरामांनी पंपाच्या जलात प्रवेश केला. ॥३०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे श्रीमद्वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे पञ्चसप्ततितमः सर्गः ॥ ७५ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा पंचाहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७५॥
॥ इत्यरण्यकाण्डः समाप्तः ॥
*** अरण्यकाण्डं संपूर्णम्‌ ***
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP