निषादराजेन गुहेन लक्ष्मणसद्भावविलापयोर्वर्णनम् -
|
निषादराज गुहाच्याद्वारे लक्ष्मणाचा सद्भाव आणि विलाप यांचे वर्णन -
|
आचचक्षेऽथ सद्भावं लक्ष्मणस्य महात्मनः ।
भरतायाप्रमेयाय गुहो गहनगोचरः ॥ १ ॥
|
वनचर गुहाने अप्रमेय शक्तिशाली भरताजवळ महात्मा लक्ष्मणाच्या सद्भावाचे याप्रकारे वर्णन केले - ॥१॥
|
तं जाग्रतं गुणैर्युक्तं शरचापेषुधारिणम् ।
भ्रातृगुप्त्यर्थमत्यन्तमहं लक्ष्मणमब्रुवम् ॥ २ ॥
|
’लक्ष्मण आपल्या भावाच्या रक्षणासाठी श्रेष्ठ धनुष्य आणि बाण धारण करून बराच काळपर्यत जागत राहिले होते. त्यावेळी त्या सद्गुणसंपन्न लक्ष्मणास मी याप्रकारे म्हटले- ॥२॥
|
इयं तात सुखा शय्या त्वदर्थमुपकल्पिता ।
प्रत्याश्वसिहि शेष्वास्यां सुखं राघवनन्दन ॥ ३ ॥
उचितोऽयं जनः सर्वो दुःखानां त्वं सुखोचितः ।
धर्मात्मंस्तस्य गुप्त्यर्थं जागरिष्यामहे वयम् ॥ ४ ॥
|
’तात राघवनंदना ! मी तुमच्यासाठी ही सुखदायिनी शय्या तयार केली आहे. तुम्ही हिच्यावर सुखपूर्वक झोपा आणि उत्तमप्रकारे विश्राम करा. हा सेवक (मी) आणि माझ्या बरोबरचे सर्व लोक वनवासी असल्यामुळे दुःख सहन करण्यास योग्य आहेत. (कारण आम्हांला कष्ट सहन करण्याची सवय आहे; परंतु तुम्ही सुखात वाढलेले असल्याने त्यासच योग्य आहात. धर्मात्मन् ! आम्ही श्रीरामाच्या रक्षणासाठी रात्रभर जागत राहू. ॥३-४॥
|
नहि रामात् प्रियतरो ममास्ति भुवि कश्चन ।
मोत्सुको भूर्ब्रवीम्येतदथ सत्यं तवाग्रतः ॥ ५ ॥
|
’मी तुमच्या समोर सत्य सांगतो आहे की या भूमण्डलात मला रामापेक्षा अधिक प्रिय दुसरे कोणीही नाही, म्हणून तुम्ही त्यांच्या रक्षणाविषयी ऊत्सुक होऊ नये. ॥५॥
|
अस्य प्रसादादाशंसे लोकेऽस्मिन् सुमहद्यशः ।
धर्मावाप्तिं च विपुलामर्थकामौ च केवलौ ॥ ६ ॥
|
’यांच्याच प्रसादाने मी या लोकात महान यश, प्रचुर धर्मलाभ, तसेच विशुद्ध अर्थ आणि भोग्य वस्तु प्राप्त करण्याची आशा करीत आहे. ॥६॥
|
सोऽहं प्रियसखं रामं शयानं सह सीतया ।
रक्षिष्यामि धनुष्पाणिः सर्वैः स्वैर्ज्ञातिभिः सह ॥ ७ ॥
|
’म्हणून मी आपल्या समस्त बंधु-बांधवांसह हातात धनुष्य घेऊन सीतेसह झोपलेल्या प्रिय सखा श्रीरामांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. ॥७॥
|
नहि मेऽविदितं किञ्चिद् वनेऽस्मिंश्चरतः सदा ।
चतुरङ्गं ह्यपि बलं प्रसहेम वयं युधि ॥ ८ ॥
|
या वनात सदा विचरत असल्याने येथील एकही गोष्ट माझ्या पासून लपलेली नाही. आम्ही लोक येथे युद्धात शत्रुच्या चतुरङ्गिणी सेनेचाही उत्तमप्रकारे सामना करु शकतो’. ॥८॥
|
एवमस्माभिरुक्तेन लक्ष्मणेन महात्मना ।
अनुनीता वयं सर्वे धर्ममेवानुपश्यता ॥ ९ ॥
|
’आम्ही असे सांगितल्यावर धर्मावरच दृष्टी ठेवणार्या महात्मा लक्ष्मणांनी आम्हा सर्वांना अनुनयपूर्वक म्हटले- ॥९॥
|
कथं दाशरथौ भूमौ शयाने सह सीतया ।
शक्या निद्रा मया लब्धुं जीवितानि सुखानि वा ॥ १० ॥
|
’निषादराज ! ज्यावेळी दशरथनंदन राम सीतादेवी सह भूमीवर शयन करीत आहेत, त्यावेळी मी उत्तम शय्येवर झोपून निद्रा घेणे, जीवन पोषणासाठी स्वादिष्ट अन्न खाणे अथवा अन्य दुसरी सुखे भोगणे कसे संभव होऊ शकेल. ॥१०॥
|
यो न देवासुरैः सर्वैः शक्यः प्रसहितुं युधि ।
तं पश्य गुह संविष्टं तृणेषु सह सीतया ॥ ११ ॥
|
’गुहा ! पहा, संपूर्ण देवता आणि असुर मिळूनही युद्धात ज्यांच्या वेग सहन करू शकत नाहीत, तेच राम यावेळी सीतेसह गवतावर झोपलेले आहेत. ॥११॥
|
महता तपसा लब्धो विविधैश्च परिश्रमैः ।
एको दशरथस्यैष पुत्रः सदृशलक्षणः ॥ १२ ॥
अस्मिन् प्रव्राजिते राजा न चिरं वर्तयिष्यति ।
विधवा मेदिनी नूनं क्षिप्रमेव भविष्यति ॥ १३ ॥
|
’महान तप आणि नाना प्रकारच्या परिश्रमसाध्य उपायांच्या द्वारा जे हे महाराज दशरथांना आपल्या प्रमाणेच उत्तम लक्षणांनी युक्त ज्येष्ठ पुत्राच्या रूपात प्राप्त झाले आहेत त्याच या श्रीरामांचे वनात आगमन झाल्यावर दशरथ राजे अधिक काळपर्यंत जिवंत राहू शकणार नाहीत. असे जाणून येत आहे की निश्चितच ही पृथ्वी लवकरच विधवा होऊन जाईल. ॥१२-१३॥
|
विनद्य सुमहानादं श्रमेणोपरताः स्त्रियः ।
निर्घोषो विरतो नूनमद्य राजनिवेशने ॥ १४ ॥
|
’आता राणीवशातील स्त्रिया निश्चितच मोठ्या जोराने आर्तनाद करून अधिक श्रमामुळे (थकून) चूप झाल्या असतील आणि राजमहालातील तो हाहाकार या समयी शांत झाला असेल. ॥१४॥
|
कौसल्या चैव राजा च तथैव जननी मम ।
नाशंसे यदि ते सर्वे जीवेयुः शर्वरीमिमाम् ॥ १५ ॥
|
’महाराणी कौसल्या, राजा दशरथ आणि माझी माता सुमित्रा - ही सर्व आजच्या या रात्रीपर्यंत जिवंत राहू शकले असतील की नाही, हे मी सांगू शकत नाही. ॥१५॥
|
जीवेदपि च मे माता शत्रुघ्नस्यान्ववेक्षया ।
दुःखिता या हि कौसल्या वीरसूर्विनशिष्यति ॥ १६ ॥
|
’शत्रुघ्नाची वाट पहाण्यामुळे संभव आहे की माझी माता सुमित्रा जिवंत राहिली असेल, परंतु पुत्राच्या विरहाच्या दुःखात बुडालेली वीर-जननी कौसल्या निश्चितच नष्ट होऊन जाईल. ॥१६॥
|
अतिक्रान्तमतिक्रान्तमनवाप्य मनोरथम् ।
राज्ये राममनिक्षिप्य पिता मे विनशिष्यति ॥ १७ ॥
|
(महाराजांची श्रीरामांना राज्यावर अभिषिक्त करण्याची इच्छा होती परंतु) आपला हा मनोरथ सफल न होऊन श्रीरामांना राज्यावर स्थापित न करतांच ’हाय ! माझे सर्व काही नष्ट झाले आहे ! नष्ट झाले आहे ! असे म्हणत माझे पिता आपल्या प्राणांचा परित्याग करून टाकतील. ॥१७॥
|
सिद्धार्थाः पितरं वृत्तं तस्मिन् काले ह्युपस्थिते ।
प्रेतकार्येषु सर्वेषु संस्करिष्यन्ति भूमिपम् ॥ १८ ॥
|
’त्यांच्या मृत्युचा समय उपस्थित झाल्यावर जे लोक तेथे राहातील आणि माझ्या मेलेल्या पिता दशरथ महाराजांचे सर्व प्रेतकार्यात संस्कार करतील तेच सफल मनोरथ आणि भाग्यशाली आहेत. ॥१८॥
|
रम्यचत्वरसंस्थानां सुविभक्तमहापथाम् ।
हर्म्यप्रासादसम्पन्नां सर्वरत्नविभूषिताम् ॥ १९ ॥
गजाश्वरथसम्बाधां तूर्यनादविनादिताम् ।
सर्वकल्याणसम्पूर्णां हृष्टपुष्टजनाकुलाम् ॥ २० ॥
आरामोद्यानसम्पूर्णां समाजोत्सवशालिनीम् ।
सुखिता विचरिष्यन्ति राजधानीं पितुर्मम ॥ २१ ॥
|
(जर पिता जिवंत असतील तर) रमणीय चबुतरे आणि चौक आदि स्थानांनी युक्त, पृथक पृथक बनविलेल्या राजमार्गांनी अलंकृत, धनिकांच्या अट्टालिकांनी, देवमंदिरांनी आणि राजभवनांनी सम्पन्न, सर्व प्रकारच्या रत्नांनी (सुशोभित) विभूषित, हत्ती, घोडे आणि रथ यांच्या येण्याजाण्याने भरलेली, विविध वाद्यांच्या ध्वनीने निनादित, समस्त कल्याणकारी वस्तुंनी भरपूर, हृष्टपुष्ट मनुष्यांनी व्याप्त, पुष्पवाटिका आणि उद्यानांनी परिपूर्ण तसेच सामाजिक उत्सवांनी सुशोभित झालेल्या माझ्या पित्याची राजधानी अयोध्यापुरीत जे लोक विचरतील, वास्तविक तेच सुखी आहेत. ॥१९-२१॥
|
अपि सत्यप्रतिज्ञेन सार्द्धं कुशलिना वयम् ।
निवृत्ते समये ह्यस्मिन् सुखिताः प्रविशेमहि ॥ २२ ॥
|
’वनवासाचा हा अवधी समाप्त झाल्यावर सकुशल परत आलेल्या सत्यप्रतिज्ञ श्रीरामांच्या बरोबर आम्ही अयोध्यापुरीत प्रवेश करू शकू कां ?’ ॥२२॥
|
परिदेवयमानस्य तस्यैवं हि महात्मनः ।
तिष्ठतो राजपुत्रस्य शर्वरी सात्यवर्तत ॥ २३ ॥
|
’याप्रकारे विलाप करीत महामनस्वी राजकुमार लक्ष्मणाची ती सारी रात्र जागत असताच सरली. ॥२३॥
|
प्रभाते विमले सूर्ये कारयित्वा जटा उभौ ।
अस्मिन् भागीरथीतीरे सुखं सन्तारितौ मया ॥ २४ ॥
|
’प्रातःकाळी निर्मल सूर्योदय झाल्यावर मी भागीरथीच्या तटावर (वडाच्या (दुधाने) चीकाने) त्या दोघांच्या केसांना जटांचे रूप देवविले आणि त्यांना सुखपूर्वक पार उतरविले. ॥२४॥
|
जटाधरौ तौ द्रुमचीरवाससौ
महाबलौ कुञ्जरयूथपोपमौ ।
वरेषुधीचापधरौ परंतपौ
व्यपेक्षमाणौ सह सीतया गतौ ॥ २५ ॥
|
मस्तकावर जटा धारण करून, वत्कल तसेच चीरवस्त्रे धारण करून महाबली, शत्रूंना संताप देणारे श्रीराम आणि लक्ष्मण दोन गजयूथपतींच्या प्रमाणे शोभत होते. ते सुंदर तरकस (भाता) आणि धनुष्यबाण धारण करून इकडे तिकडे पहात सीतेसह निघून गेले. ॥२५॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे षडशीतितमः सर्गः ॥ ८६ ॥
|
याप्रकारे श्रीवल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा शहाऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८६॥
|