[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। एकत्रिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामलक्ष्मणसंवादः श्रीरामस्यादेशेन लक्ष्मणस्य सुहृज्जनानामंत्र्य दिव्यमायुधमानीय च वनं गन्तुमुद्यमः श्रीरामेण तं प्रति ब्राह्मणेभ्यो धनं वितरितुं स्वकीयविचारस्य प्रकटनम् - श्रीराम आणि लक्ष्मणाचा संवाद, श्रीरामाच्या आज्ञेचे लक्ष्मणांचे सुहृदांना विचारून आणि दिव्य आयुधे आणून वनगमनासाठी तैयार होणे, श्रीरामांनी त्यांच्या जवळ ब्राह्मणांना धन वाटण्याचा विचार व्यक्त करणे -
एवं श्रुत्वा तु संवादं लक्ष्मणः पूर्वमागतः ।
बाष्पपर्याकुलमुखः शोकं सोढुमशक्नुवन् ॥ १ ॥
ज्यावेळी श्रीराम आणि सीता यांच्यामध्ये संवाद चालू होता, त्यावेळी लक्ष्मण पूर्वीच तेथे आलेले होते. त्या दोघांचा असा संवाद ऐकून त्यांचे मुखमण्डल अश्रूंनी भिजून गेले. भावाच्या विरहाचा शोक आता त्यांच्यासाठी असह्य झाला. ॥१॥
स भ्रातुश्चरणौ गाढं निपीड्य रघुनन्दनः ।
सीतामुवाचातियशां राघवं च महाव्रतम् ॥ २ ॥
रघुनंदन लक्ष्मणाने आपल्या ज्येष्ठ भ्राताचे घट्ट धरले आणि अत्यंत यशस्विनी सीता तसेच महान व्रतधारी राघवास ते म्हणाले- ॥२॥
यदि गन्तुं कृता बुद्धिर्वनं मृगगजायुतम् ।
अहं त्वाऽनुगमिष्यामि वनमग्रे धनुर्धरः ॥ ३ ॥
'आर्य ! जर आपण हजारो वन्य पशुंनी तथा हत्तीनी भरलेल्या वनांस जाण्याचा निश्चय केला आहे तर मीही आपले अनुसरण करीन. धनुष्य हातात घेऊन मी आपल्या पुढे पुढे चालेन. ॥३॥
मया समेतोऽरण्यानि बहूनि विचरिष्यसि ।
पक्षिभिर्मृगयूथैश्च सङ्‌घुष्टानि समन्ततः ॥ ४ ॥
'आपण माझ्यासह पक्ष्यांच्या कलरवाने आणि भ्रमरसमूहाच्या गुंजारवाने गुंजणार्‍या रमणीय वनात सर्वत्र विचरण करावे. ॥४॥
न देवलोकाक्रमणं नामरत्वमहं वृणे ।
ऐश्वर्यं चापि लोकानां कामये न त्वया विना ॥ ५ ॥
'मी आपल्या विना स्वर्गात जाणे, अमर होणे तथा संपूर्ण लोकांचे ऐश्वर्य भोगणे, या पैकी कशाचीही इच्छा करत नाही.' ॥५॥
एवं ब्रुवाणः सौमित्रिर्वनवासाय निश्चितः ।
रामेण बहुभिः सांत्वैर्निषिद्धः पुनरब्रवीत् ॥ ६ ॥
वनवासासाठी असा निश्चित विचार करून असे बोलणार्‍या सौमित्राला रामांनी बर्‍याचशा सांत्वनापूर्वक वचनांच्या द्वारे समजावून जेव्हां वनांत चलण्यास मनाई केली तेव्हां ते परत बोलले - ॥६॥
अनुज्ञातस्तु भवता पूर्वमेव यदस्म्यहम् ।
किमिदानीं पुनरपि क्रियते मे निवारणम् ॥ ७ ॥
''हे बंधो ! आपण तर प्रथमपासूनच मला आपल्या बरोबर राहण्याची आज्ञा देऊन ठेवली आहे. मग यासमयी आपण मला कामडवीत आहांत ? ॥७॥
यदर्थं प्रतिषेधो मे क्रियते गन्तुमिच्छतः ।
एतदिच्छामि विज्ञातुं संशयो हि ममानघ ॥ ८ ॥
'निष्पाप रामा ! ज्या कारणाने आपल्या बरोबर येण्याची इच्छा करणार्‍या मला आपण मनाई करीत आहात ते कारण मी जाणू इच्छितो. माझ्या हृदयात यासाठी मोठा संशय येत आहे.' ॥८॥
ततोऽब्रवीन्महातेजा रामो लक्ष्मणमग्रतः ।
स्थितं प्राग्गामिनं धीरं याचमानं कृताञ्जलिम् ॥ ९ ॥
असे म्हणून धीर-वीर लक्ष्मण पुढे जाण्यास तयार होऊन भगवान श्रीरामांच्या समोर उभे राहिले आणि हात जोडून याचना करू लागले. तेव्हा महातेजस्वी रामांनी त्यांना म्हटले- ॥९॥
स्निग्धो धर्मरतो धीरः सततं सत्पथे स्थितः ।
प्रियः प्राणसमो वश्यो विजयेश्च सखा च मे ॥ १० ॥
'लक्ष्मण ! तू माझा स्नेही, धर्म परायण, धीर-वीर तथा सदा सन्मार्गात स्थित राहाणारा आहेस. मला प्राणांसारखा प्रिय आहेस तथा माझ्या वश राहणारा आज्ञाधारक आणि माझा सखाही आहेस. ॥१०॥
मयाद्य सह सौमित्रे त्वयि गच्छति तद्वनम् ।
को भजिष्यति कौसल्यां सुमित्रां वा यशस्विनीम् ॥ ११ ॥
'सौमित्रा ! जर आज माझ्या बरोबर तूही वनात निघून अलास तर परम-यशस्विनी माता कौसल्या आणि सुमित्रा यांची सेवा कोण करील ? ॥११॥
अभिवर्षति कामैर्यः पर्जन्यः पृथिवीमिव ।
स कामपाशपर्यस्तो महातेजा महीपतिः ॥ १२ ॥
'ज्याप्रमाणे मेघ पृथ्वीवर जळाची वर्षा करतो त्याप्रमाणे जे सर्वांच्या कामना पूर्ण करीत असत ते महातेजस्वी महाराज दशरथ आता कैकेयीच्या प्रेमपाशात बांधले गेले आहेत. ॥१२॥
सा हि राज्यमिदं प्राप्य नृपस्याश्वपतेः सुता ।
दुःखितानां सपत्‍नीनां न करिष्यति शोभनम् ॥ १३ ॥
'केकयराज अश्वपतिची कन्या कैकेयी महाराजांचे हे राज्य मिळाल्यावर माझ्या वियोगाच्या दुःखात बुडालेल्या आपल्या सवतीबरोबर चांगले वर्तन करणार नाही. ॥१३॥
न भरिष्यति कौसल्यां सुमित्रां च सुदुःखिताम् ।
भरतो राज्यमासाद्य कैकेय्यां पर्यवस्थितः ॥ १४ ॥
भरतदेखील राज्यप्राप्ती झल्यावर कैकेयी मातेच्या अधीन राहून दुःखी कौसल्या आणि सुमित्रा मातांचे व्यवस्थित भरण पोषण करू शकणार नाही. ॥ १४ ॥
तामार्यां स्वयमेवेह राजानुग्रहणेन वा ।
सौमित्रे भर कौसल्यामुक्तमर्थममुं चर ॥ १५ ॥
'म्हणून सौमित्र ! तू येथेच राहून आपल्या प्रयत्‍नाने अथवा राजाची कृपा प्राप्त करून माता कौसल्येचे पालन कर. मी सांगितलेले प्रयोजनच सिद्ध कर. ॥१५॥
एवं मम च ते भक्तिर्भविष्यति सुदर्शिता ।
धर्मज्ञ गुरुपूजायां धर्मश्चाप्यतुलो महान् ॥ १६ ॥
'असे करण्याने माझ्या प्रति तुझी जी भक्ती आहे, तीही उत्तम प्रकारे प्रकट होईल तथा धर्मज्ञ गुरूजनांची पूजा करण्याने जो अनुपम एवं महान धर्म होतो, तोही तुला प्राप्त होऊन जाईल. ॥१६॥
एवं कुरुष्व सौमित्रे मत्कृते रघुनन्दन ।
अस्माभिर्विप्रहीणाया मातुर्नो न भवेत् सुखम् ॥ १७ ॥
'रघुनंदन सौमित्रा ! तू माझ्यासाठी असेच कर; कारण आमचा वियोग झालेल्या आमच्या मातेला कधी सुख होणार नाही. (ती सदा आमच्याच चिंतेत बुडून राहील.) ॥१७॥
एवमुक्तस्तु रामेण लक्ष्मणः श्लक्ष्णया गिरा ।
प्रत्युवाच तदा रामं वाक्यज्ञो वाक्यकोविदम् ॥ १८ ॥
श्रीरामांनी असे म्हटलावर संभाषणाचे मर्म समजणारे लक्ष्मण त्यावेळी त्यांचा बोलण्याचे मत्म जाणणार्‍या श्रीरामांना मधुर वाणीने याप्रमाणे उत्तर देते झाले - ॥१८॥
तवैव तेजसा वीर भरतः पूजयिष्यति ।
कौसल्यां च सुमित्रां च प्रयतो नास्ति संशयः ॥ १९ ॥
'वीर ! आपल्याच तेजाने (प्रभावाने) भरत माता कौसल्या आणि सुमित्रा दोघींचे पवित्र भावाने पूजन करेल यात संशय नाही आहे. ॥१९॥
यदि दुःस्थो न रक्षेत भरतो राज्यमुत्तमम् ।
प्राप्य दुर्मनसा वीर गर्वेण च विशेषतः ॥ २० ॥

तमहं दुर्मतिं क्रूरं वधिष्यामि न संशयः ।
तत्पक्षानपि तान् सर्वांस्त्रैलोक्यमपि किं तु सा ॥ २१ ॥

कौसल्या बिभृयादार्या सहस्रं मद्विधानपि ।
यस्याः सहस्रं ग्रामाणां सम्प्राप्तमुपजीविनाम् ॥ २२ ॥
'वीरवर ! या उत्तम राज्याची प्राप्ति झाल्यावर जर भरत वाईट मार्गावर चालू लागला आणि हृदय एवं विशेषतः घमेडींमुळे मातांचे रक्षण जर त्याने केले नाही तर मी त्या दुर्बुद्धि आणि क्रूर भरताचा आणि त्याच्या पक्षाचे समर्थन करणार्‍या त्या सर्व लोकांचा वध करून टाकीन; यात संशय नाही. जर सारे त्रैलोक्य त्याचा पक्ष घेऊन लागले तर त्यालाही आपले प्राण गमवावे लागतील. परंतु ज्येष्ठ माता कौसल्या तर स्वयंही माझ्या सारख्या हजारो मनुष्यांचेही भरण करू शकते कारण की तिला आपल्या आश्रितांचे पालन करण्यासाठी एक हजार गावे मिळालेली आहेत. ॥२०- २२॥
तदात्मभरणे चैव मम मातुस्तथैव च ।
पर्याप्ता मद्विधानां च भरणाय मनस्विनी ॥ २३ ॥
'म्हणून ती मनस्विनी कौसल्या स्वतचः आपले, माझ्या मातेचे तथा माझ्या सारख्या आणखीही बर्‍याच मनुष्यांचे भरण-पोषण करण्यास समर्थ आहे. ॥२३॥
कुरुष्व मामनुचरं वैधर्म्यं नेह विद्यते ।
कृतार्थोऽहं भविष्यामि तव चार्थः प्रकल्प्यते ॥ २४ ॥
म्हणून आपण मला आपला अनुगामी बनवून घ्या; यात काहीही धर्माची हानी होणार नाही. मी कृतार्थ होऊन जाईन तथा आपले प्रयोजन माझ्या द्वारे सिद्ध होऊन जाईल. ॥२४॥
धनुरादाय सगुणं खनित्रपिटकाधरः ।
अग्रतस्ते गमिष्यामि पन्थानं तव दर्शयन् ॥ २५ ॥
'प्रत्यञ्चे सहित धनुष्य घेऊन कुदाळ आणि पेटारा घेऊन आपल्याला रस्ता दाखवीत मी आपल्या पुढे पुढे चालेन. ॥२५॥
आहरिष्यामि ते नित्यं मूलानि च फलानि च ।
वन्यानि च तथान्यानि स्वाहार्हाणि तपस्विनाम् ॥ २६ ॥
प्रतिदिन आपल्यासाठी फळ-मूळे आणीन, तथा तपस्वी जनांसाठी वनांत मिळणारी तथा अन्यान्य हवन-सामग्री एकत्रित करीन. ॥२६॥
भवांस्तु सह वैदेह्या गिरिसानुषु रंस्यसे ।
अहं सर्वं करिष्यामि जाग्रतः स्वपतश्च ते ॥ २७ ॥
आपण वैदेही बरोबर पर्वत शिखरावर भ्रमण कराल, तेथे आपण जागत राहा अथवा झोपा, मी हर समयी आपली सर्व आवश्यक कामे पूर्ण करीन. ॥२७॥
रामस्त्वनेन वाक्येन सुप्रीतः प्रत्युवाच तम् ।
व्रजापृच्छस्व सौमित्रे सर्वमेव सुहृज्जनम् ॥ २८ ॥
लक्ष्मणाचे हे भाषण ऐकून रामचंद्रांना फार प्रसन्नता वाटली आणि त्यांनी (लक्ष्मणास) म्हटले - सौमित्र ! जा माता आणि सर्व सुहृदांना भेटून आपल्या वनयात्रे विषयी विचारून ये- त्यांची आज्ञा एवमनुमति घे. ॥२८॥
ये च राज्ञो ददौ दिव्ये महात्मा वरुणः स्वयम् ।
जनकस्य महायज्ञे धनुषी रौद्रदर्शने ॥ २९ ॥

अभेद्ये कवचे दिव्ये तूणी चाक्षय्यसायकौ ।
आदित्यविमलाभौ द्वौ खड्गौ हेमपरिष्कृतौ ॥ ३० ॥

सत्कृत्य निहितं सर्वमेतदाचार्यसद्मनि ।
सर्वमायुधमादाय क्षिप्रमाव्रज लक्ष्मण ॥ ३१ ॥
'लक्ष्मणा ! राजा जनकांच्या महान यज्ञात स्वयं महात्मा वरूणाने त्यांना जी दिसण्यात भयंकर दोन दिव्य धनुष्ये दिली होती, व त्याच बरोबर दोन दिव्य अभेद्य कवच, अक्षय बाणांनी भरलेले दोन तरकस, तथा सूर्याप्रमाणे निर्मल दीप्तीने चमकणारी जी दोन सुवर्णभूषित खड्‍गे प्रदान केली होती, ती सर्व दिव्यास्त्रे (जी मिथिला नरेशांनी मला हुंड्यात दिली होती); आचार्य देवांच्या घरात सन्मानपूर्वक ठेवली गेली आहेत. तू त्या सार्‍या आयुधांना घेऊन शीघ्र परत ये.' ॥२९-३१॥
स सुहृज्जनमामन्त्र्य वनवासाय निश्चितः ।
इक्ष्वाकुगुरुमागम्य जग्राहायुधमुत्तमम् ॥ ३२ ॥
आज्ञा मिळताच लक्षमण गेले आणि सुहृद्‍जनांची अनुमति घेऊन वनवासासाठी निश्चित रूपाने तयार होऊन इक्ष्वाकुकुलाचे गुरू वसिष्ठ यांचे घरी गेले. तेथून त्यांनी त्या उत्तम आयुधांना घेतले. ॥३२॥
तद् दिव्यं राजशार्दूल सत्कृतं माल्यभूषितम् ।
रामाय दर्शयामास सौमित्रिः सर्वमायुधम् ॥ ३३ ॥
राजशार्दूल सौमित्राने सत्कारपूर्वक ठेवल्या गेलेल्या आणि माल्यविभूषित त्या समस्त दिव्य आयुधांना आणून ती रामांना दाखविली. ॥३३॥
तमुवाचात्मवान् रामः प्रीत्या लक्ष्मणमागतम् ।
काले त्वमागतः सौम्य काङ्‌क्षिते मम लक्ष्मण ॥ ३४ ॥
तेव्हा मनस्वी रामांनी तेथे आलेल्या लक्ष्मणास प्रसन्न होऊन म्हटले- 'सौम्य ! लक्ष्मणा ! तू अगदी योग्य समयी आला आहेस. यावेळी तुझे येणे मला अभिष्ट होते. ॥३४॥
अहं प्रदातुमिच्छामि यदिदं मामकं धनम् ।
ब्राह्मणेभ्यस्तपस्विभ्यस्त्वया सह परंतप ॥ ३५ ॥
'हे परंतप ! माझे जे हे धन आहे, हे मी तुझ्या बरोबर राहून तपस्वी ब्राह्मणांना वाटू इच्छितो.' ॥३५॥
वसन्तीह दृढं भक्त्या गुरुषु द्विजसत्तमाः ।
तेषामपि च मे भूयः सर्वेषां चोपजीविनाम् ॥ ३६ ॥
'गुरूजनांच्या प्रति सुदृढ भक्तिभावाने युक्त जे श्रेष्ठ ब्राह्मण मज जवळ राहातात, त्यांना तसेच समस्त आश्रितजनांनाही मला आपले हे धन वाटावयाचे आहे. ॥३६॥
वसिष्ठपुत्रं तु सुयज्ञमार्यं
     त्वमानयाशु प्रवरं द्विजानाम् ।
अपि प्रयास्यामि वनं समस्ता-
     नभ्यर्च्य शिष्टानपरान् द्विजातीन् ॥ ३७ ॥
'वसिष्ठांचे पुत्र जे ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ आर्य सुयज्ञ आहेत, त्यांना तू येथे शीघ्र बोलावून आण. मी या सर्वांचा तसेच आणखी जे ब्राह्मण शेष राहिले असतील, त्यांचाही सत्कार करून वनात जाईन. ॥३७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे एकत्रिंशः सर्गः ॥ ३१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा एकतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP