श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ द्विषष्टितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

कुंभकर्णस्य रावणगृहे प्रवेश, रामाद् भयं सूचयित्वा रावणेन तस्य शत्रुसेनासंहारणाय प्रेषणम् -
कुंभकर्णाचा रावणाच्या भवनात प्रवेश तसेच रावणाने रामापासून भय असल्याचे सांगून त्याला शत्रूसेनेच्या विनाशासाठी प्रेरित करणे -
स तु राक्षसशार्दूलो निद्रामदसमाकुलः ।
राजमार्गं श्रिया जुष्टं ययौ विपुलविक्रमः ॥ १ ॥
महापराक्रमी राक्षसशिरोमणी कुंभकर्ण निद्रा आणि मदाने व्याकुळ होऊन आळसल्या सारखा शोभाशाली राजमार्गाने जात होता. ॥१॥
राक्षसानां सहस्रैश्च वृतः परमदुर्जयः ।
गृहेभ्यः पुष्पवर्षेण कीर्यमाणस्तदा ययौ ॥ २ ॥
तो परम दुर्जय वीर हजारो राक्षसांनी घेरलेला असा यात्रा करत होता. रस्त्याच्या कडेला जी घरे होती, त्यांतून त्याच्यावर पुष्पवृष्टि होत राहिली होती. ॥२॥
स हेमजालिविततं भानुभास्वरदर्शनम् ।
ददर्श विपुलं रम्यं राक्षसेन्द्रनिवेशनम् ॥ ३ ॥
त्याने राक्षसराज रावणाच्या रमणीय आणि विशाल भवनाचे दर्शन घेतले जे सोन्याच्या जाळीने आच्छादित होण्यामुळे सूर्यदेवासमान दीप्तीमान्‌ दिसून येत होते. ॥३॥
स तत्तदा सूर्य इवाभ्रजालं
प्रविश्य रक्षोधिपतेर्निवेशनम् ।
ददर्श दूरेऽग्रजमासनस्थं
स्वयंभुवं शक्र इवासनस्थम् ॥ ४ ॥
सूर्य जसा मेघांच्या समुदायात झाकून जातो, त्याच प्रकारे कुंभकर्णाने राक्षसराजाच्या महालात प्रवेश केला आणि सिंहासनावर बसलेल्या आपल्या भावाला दूरूनच पाहिले, जणु देवराज इंद्राने दिव्य कमळासनावर विराजमान स्वयंभू ब्रह्मदेवांचेच दर्शन केले असावे. ॥४॥
भ्रातुः स भवनं गच्छन् रक्षोगणसमन्वितः ।
कुंभकर्णः पदन्यासैः अकम्पयत मेदिनीम् ॥ ५ ॥
राक्षसांसहित कुंभकर्ण आपल्या भावाच्या भवनात जाते समयी जसजसा एकेक पाऊल पुढे जात होता तसतशी पृथ्वी कांपत होती. ॥५॥
सोऽभिगम्य गृहं भ्रातुः कक्ष्यामभिविगाह्य च ।
ददर्शोद्विग्नमासीनं विमाने पुष्पके गुरुम् ॥ ६ ॥
भावाच्या भवनात जाऊन जेव्हा तो आतील कक्षेमध्ये प्रविष्ट झाला, तेव्हा त्याने आपल्या मोठ्‍या भावाला उद्विग्न अवस्थेमध्ये पुष्पक विमानावर पाहिले. ॥६॥
अथ दृष्ट्‍वा दशग्रीवः कुंभकर्णमुपस्थितम् ।
तूर्णमुत्थाय संहृष्टः संनिकर्षमुपानयत् ॥ ७ ॥
कुंभकर्णाला उपस्थित पाहून दशमुख रावण तात्काळ उठून उभा राहिला आणि मोठ्‍या हर्षाने त्याला त्याने आपल्या जवळ बोलावून घेतले. ॥७॥
अथासीनस्य पर्यङ्‌के कुंभकर्णो महाबलः ।
भ्रातुर्ववन्दे चरणौ किं कृत्यमिति चाब्रवीत् ॥ ८ ॥
महाबली कुंभकर्णाने सिंहासनावर बसलेल्या आपल्या भावाच्या चरणीं प्रणाम केला आणि विचारले - ’कोठले कार्य उपस्थित झाले आहे ?’ ॥८॥
उत्पत्य चैनं मुदितो रावणः परिषस्वजे ।
स भ्रात्रा संपरिष्वक्तो यथावच्छाभिनन्दितः ॥ ९ ॥
रावणाने उडी मारून मोठ्‍या प्रसन्नतेने कुंभकर्णाला हृदयाशी धरले. भाऊ रावणाने त्याला आलिंगन देऊन यथावत्‌ रूपाने त्याचे अभिनन्दन केले. ॥९॥
कुंभकर्णः शुभं दिव्यं प्रतिपेदे वरासनम् ।
स तदासनमाश्रित्य कुंभकर्णो महाबलः ॥ १० ॥

संरक्तनयनः क्रोधाद् रावणं वाक्यमब्रवीत् ।
यानंतर कुंभकर्ण सुंदर दिव्य सिंहासनावर बसला. त्या आसनावर बसून महाबली कुंभकर्णाने क्रोधाने डोळे लाल करून रावणास विचारले - ॥१० १/२॥
किमर्थमहमादृत्य त्वया राजन् प्रबोधितः ॥ ११ ॥

शंस कस्माद् भयं तेऽत्र को वा प्रेतो भविष्यति ।
राजन्‌ ! कशासाठी तू मोठ्‍या आदराने मला जागे केले आहेस ? सांग, येथे तुलाकुणा पासून भय प्राप्त झाले आहे ? अथवा कोण परलोकाचा पथिक होणार आहे ? ॥११ १/२॥
भ्रातरं रावणः कुद्धं कुंभकर्णमवस्थितम् ॥ १२ ॥

ईषत्तु परिवृत्ताभ्यां नेत्राभ्यां वाक्यमब्रवीत् ।
तेव्हा रावण आपल्या जवळ बसलेल्या कुपित भाऊ कुंभकर्णास रोषाने चंचल डोळे करून म्हणाला- ॥१२ १/२॥
अद्य ते सुमहान् कालः शयानस्य महाबल ॥ १३ ॥

सुषुतस्त्वं न जानीषे मम रामकृतं भयम् ।
महाबली वीरा ! तुम्हाला झोपून दीर्घकाळ व्यतीत झाला आहे. तुम्ही गाढ निद्रेत निमग्न झाल्याने जाणत नाही की मला रामापासून भय प्राप्त झाले आहे. ॥१३ १/२॥
एष दाशरथी रामः सुग्रीवसहितो बली ॥ १४ ॥

समुद्रं लंघयित्वा तु मूलं नः परिकृन्तति ।
हे दाशरथी बलवान्‌ श्रीमान्‌ राम सुग्रीवा सह समुद्र उल्लंघून येथे आले आहेत आणि आपल्या कुळाचा विनाश करीत आहेत. ॥१४ १/२॥
हन्त पश्यस्व लङ्‌कायां वनान्युपवनानि च ॥ १५ ॥

सेतुना सुखमागम्य वानरैकार्णवं कृतम् ।
हाय ! पहा तर खरे, समुद्रात पूल बांधून सुखपूर्वक येथे आलेल्या वानरांनी लंकेच्या समस्त वनांना आणि उपवनांना एकार्णवमय बनवून टाकले आहे- येथे वानररूपी जलाचाच समुद्र जणु लहरत आहे. ॥१५ १/२॥
ये रक्षसां मुख्यतमा हतास्ते वानरैर्युधि ॥ १६ ॥

वानराणां क्षयं युद्धे न पश्यामि कथंचन ।
न चापि वानरा युद्धे जितपूर्वाः कदाचन ॥ १७ ॥
आपले जे मुख्य मुख्य राक्षस वीर होते, त्यांना वानरांनी युद्धात मारले आहे, परंतु रणभूमीमध्ये वानरांचा संहार होत असलेला मला कुठल्याही प्रकारे दिसून येत नाही. युद्धात कधी कोणी वानर पहिल्याने जिंकले गेलेले नाहीत. ॥१६-१७॥
तदेतद् भयमुत्पन्नं त्रायस्वेह महाबल ।
नाशय त्वमिमानद्य तदर्थं बोधितो भवान् ॥ १८ ॥
महाबली वीरा ! यासमयी आपल्यावर हेच भय उपस्थित झालेले आहे. तुम्ही यापासून आमचे रक्षण करा आणि आज या वानरांना नष्ट करून टाका - यासाठी आम्ही तुम्हाला जागे केले आहे. ॥१८॥
सर्वक्षपितकोशं च स त्वमभ्युपपद्य माम् ।
त्रायस्वेमां पुरीं लङ्‌कां बालवृद्धावशेषिताम् ॥ १९ ॥
आमचा सर्व खजिना रिकामा झाला आहे, म्हणून माझ्यावर अनुग्रह करून तुम्ही या लंकापुरीचे रक्षण करा; आता येथे केवळ बालके आणि वृद्धच शेष राहिली आहेत. ॥१९॥
भ्रातुरर्थे महाबाहो कुरु कर्म सुदुष्करम् ।
मयैवं नोक्तपूर्वो हि भ्राता कच्चिद् परंतप ॥ २० ॥
महाबाहो ! तुम्ही आपल्या या भावासाठी अत्यंत दुष्कर पराक्रम करा. परंतप ! आजच्या पूर्वी मी कधी कुणा भावाचा असा अनुनय-विनय केला नव्हता. ॥२०॥
त्वय्यस्ति तु मम स्नेहः परा संभावना च मे ।
दैवासुरेषु युद्धेषु बहुशो राक्षसर्षभ ॥ २१ ॥

त्वया देवाः प्रतिव्यूह्य निर्जिताश्चासुरा युधि ॥ २२ ॥
तुमच्यावर माझा फार स्नेह आहे आणि मला तुमच्याकडून मोठी आशा आहे. राक्षसशिरोमणी ! तुम्ही देवासुर संग्रामाच्या वेळी अनेक वेळा प्रतिद्वंदीचे स्थान घेऊन रणभूमीमध्ये देवता आणि असुरांनाही परास्त केलेले आहे. ॥२१-२२॥
तदेतत् सर्वमातिष्ठ वीर्यं भीमपराक्रम ।
न हि ते सर्वभूतेषु दृश्यते सदृशो बली ॥ २३ ॥
म्हणून भयंकर पराक्रमी वीरा ! तुम्ही हे सारे पराक्रमपूर्ण कार्य संपन्न करा, कारण समस्त प्राण्यांमध्ये तुमच्या सारखा बलवान्‌ मला दुसरा कोणीही दिसून येत नाही. ॥२३॥
कुरुष्व मे प्रियहितमेतदुत्तमं
यथाप्रियं प्रियरण बान्धवप्रिय ।
स्वतेजसा व्यथय सपत्‍नसवाहिनीं
शरद्‌घनं पवन इवोद्यतो महान् ॥ २४ ॥
तुम्ही युद्धप्रेमी तर आहातच, आपल्या बंधु-बान्धवांवरही फार प्रेम करता. यासमयी तुम्ही माझे हेच प्रिय आणि उत्तम हित करा. आपल्या तेजाने शत्रुंच्या सेनेला, जसे वेगाने उठलेला प्रचण्ड झंझावात शरद ऋतुतील मेघांना छिन्न-भिन्न करून टाकतो, त्या प्रमाणे व्यथित करून टाका. ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे द्विषष्टितमः सर्गः ॥ ६२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा बासष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP