महापार्श्वेन सीतां प्रति बलात्कारं कर्तुं रावणस्य प्रोत्साहनं; रावणेन शापवशात् तथाकरणे स्वकीयासमर्थतायाः प्रतिपादनं; निजपराक्रमस्य प्रशंसनं च -
|
महापार्श्वाने रावणाला सीतेवर बलात्कार करण्यासाठी भडकाविणे आणि रावणाने शापामुळे असे करण्यास आपण असमर्थ असल्याचे सांगणे तसेच आपल्या पराक्रमाचे गीत गाणे -
|
रावणं क्रुद्धमाज्ञाय महापार्श्वो महाबलः । मुहूर्तं अनुसञ्चिन्त्य प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् ॥ १ ॥
|
तेव्हा रावणाला कुपित झालेला जाणून महाबली महापार्श्वाने मुहूर्तभर विचार करून नंतर हात जोडून म्हटले- ॥१॥
|
यः खल्वपि वनं प्राप्य मृगव्यालनिषेवितम् । न विबेन्मधु संप्राप्य स नरो बालिशो भवेत् ॥ २ ॥
|
जो हिंसक पशु आणि सर्वांनी भरलेल्या दुर्गम वनात जाऊन तेथे पिण्यायोग्य मधु मिळूनही तो पित नाही तो पुरूष मूर्खच आहे. ॥२॥
|
ईश्वरस्येश्वरः कोऽस्ति तव शत्रुनिबर्हण । रमस्व सह वैदेह्या शत्रूनाक्रम्य मूर्धसु ॥ ३ ॥
|
शत्रुसूदन महाराज ! आपण तर स्वत:च ईश्वर आहात. आपला ईश्वर कोण आहे ? आपण शत्रूंच्या मस्तकावर पाय ठेवून वैदेही सीते बरोबर रमण करा. ॥३॥
|
बलात् कुक्कुटवृत्तेन वर्तस्व सुमहाबल । आक्रम्याक्रम्य सीतां वै तथा भुङ्क्ष्व रमस्व च ॥ ४ ॥
|
महाबली वीर ! आपण कुक्कुटाच्या वर्तनास आपलेसे करून सीतेवर बलात्कार करावा. वारंवार आक्रमण करून तिच्याशी रमण करा तसेच तिचा उपभोग घ्या. ॥४॥
|
लब्धकामस्य ते पश्चाद् आगमिष्यति किं भयम् । प्राप्तमप्राप्तकालं वा सर्वं प्रतिविधास्यसे ॥ ५ ॥
|
जेव्हा आपला मनोरथ सफल होईल तेव्हा नंतर आपल्यावर कोणते भय येणार आहे ? जर वर्तमान तसेच भविष्यकाळात काही भय आले, तरी त्या समस्त भयाचा यथोचित प्रतीकार केला जाईल. ॥५॥
|
कुम्भकर्णः सहास्माभिः इंद्रजिच्च महाबलः । प्रतिषेधयितुं शक्तौ सवज्रमपि वज्रिणम् ॥ ६ ॥
|
आम्हां लोकांबरोबर जर महाबली कुंभकर्ण आणि इंद्रजित उभे राहातील तर हे दोघे वज्रधारी इंद्रालाही पुढे येण्यापासून रोखू शकतात. ॥६॥
|
उपप्रदानं सान्त्वं वा भेदं वा कुशलैः कृतम् । समतिक्रम्य दण्डेन सिद्धिमर्थेषु रोचये ॥ ७ ॥
|
मी तर नीतिनिपुण पुरूषांच्या द्वारा प्रयुक्त साम, दान आणि भेद सोडून केवळ दंडाच्या द्वारेच काम साधणे चांगले समजतो. ॥७॥
|
इह प्राप्तान् वयं सर्वान् शत्रूंस्तव महाबल । वशे शस्त्रप्रतापेन करिष्यामो न संशयः ॥ ८ ॥
|
महाबली राक्षसराज ! येथे आपले जे कोणी शत्रु येतील, त्यांना आम्ही आपल्या शस्त्रांच्या प्रतापाने वश करून घेऊ यात संशय नाही. ॥८॥
|
एवमुक्तस्तदा राजा महापार्श्वेन रावणः । तस्य संपूजयन् वाक्यं इदं वचनमब्रवीत् ॥ ९ ॥
|
महापार्श्वाने असे म्हटल्यावर त्या समयी लंकेचा राजा रावण त्याच्या वचनांची प्रशंसा करत या प्रकारे म्हणाला- ॥९॥
|
महापार्श्व निबोध त्वं रहस्यं किञ्चिदात्मनः । चिरवृत्तं तदाख्यास्ये यदवाप्तं पुरा मया ॥ १० ॥
|
महापार्श्व ! बरेच दिवस झाले, पूर्वकाळात एक गुप्त घटना घडली होती- मला शाप प्राप्त झाला होता. आपल्या जीवनांतील हे गुप्त रहस्य आज मी सांगत आहे, ते ऐक. ॥१०॥
|
पितामहस्य भवनं गच्छन्तीं पुञ्जिकस्थलाम् । चञ्चूर्यमाणामद्राक्षं आकाशेऽग्निशिखामिव ॥ ११ ॥
|
एक वेळ मी आकाशात अग्निशिखेप्रमाणे समान प्रकाशित होत असलेल्या पुञ्जिकस्थला नामक अप्सरेला पाहिले जी पितामह ब्रह्मदेवांच्या भवनाकडे जात होती. ती अप्सरा माझ्या भयाने लपत-छपत पुढे जात होती. ॥११॥
|
सा प्रसह्य मया भुक्ता कृता विवसना ततः । स्वयम्भूभवनं प्राप्ता लोलिता नलिनी यथा ॥ १२ ॥
|
मी बळपूर्वक तिचे वस्त्र उतरविले आणि हट्टाने तिचा उपभोग घेतला. त्यानंतर ती ब्रह्मदेवांच्या भवनात गेली. तिची दशा हत्तीद्वारा तुडवून फेकल्या गेलेल्या कमलिनी प्रमाणे झालेली होती. ॥१२॥
|
तस्य तच्च तथा मन्ये ज्ञातमासीन्महात्मनः । अथ सङ्कुपितो वेधा मामिदं वाक्यमब्रवीत् ॥ १३ ॥
|
मी समजतो की माझ्याकडून तिची जी दुर्दशा केली गेली होती ती पितामह ब्रह्मदेवांना ज्ञात झाली. यामुळे ते अत्यंत कुपित झाले आणि मला याप्रकारे बोलले- ॥१३॥
|
अद्यप्रभृति यामन्यां बलान्नारीं गमिष्यसि । तदा ते शतधा मूर्धा फलिष्यति न संशयः ॥ १४ ॥
|
आजपासून जर तू कोणा दुसर्या नारीशी बळपूर्वक समागम करशील तर तुझ्या मस्तकाचे शेकडो तुकडे होतील, यात संशय नाही. ॥१४॥
|
इत्यहं तस्य शापस्य भीतः प्रसभमेव ताम् । नारोहये बलात् सीतां वैदेहीं शयने शुभे ॥ १५ ॥
|
याप्रकारे मी ब्रह्मदेवांच्या शापामुळे भयभीत आहे म्हणून आपल्या शुभ शय्येवर वैदेही सीतेला बलाने चढवत नाही आहे. ॥१५॥
|
सागरस्येव मे वेगो मारुतस्येव मे गतिः । नैतद् दाशरथिर्वेद ह्यासादयति तेन माम् ॥ १६ ॥
|
माझा वेग समुद्राप्रमाणे आहे आणि माझी गति वायुच्या तुल्य आहे, ही गोष्ट दशरथनंदन राम जाणत नाहीत म्हणून ते माझ्यावर चढाई करत आहेत. ॥१६॥
|
यस्तु सिंहमिवासीनं सुप्तं गिरिगुहाशये । क्रुद्धं मृत्युमिवासीनं प्रबोधयितुमिच्छति ॥ १७ ॥
|
अन्यथा पर्वताच्या गुहेमध्ये सुखपूर्वक झोपलेल्या सिंहासमान तसेच कुपित होऊन बसलेल्या मृत्युतुल्य भयंकर मला- रावणाला कोण जागे करण्याची इच्छा करेल ? ॥१७॥
|
न मत्तो निशितान् बाणान् द्विजिह्वान् पन्नगानिव । रामः पश्यति संग्रामे तेन मामभिगच्छति ॥ १८ ॥
|
माझ्या धनुष्यापासून सुटलेल्या दोन जिव्हा असलेल्या सर्पाप्रमाणे भयंकर बाणांना समरांगणात श्रीरामांनी कधी पाहिलेले नाही, म्हणून ते माझ्यावर चढाई करून येत आहेत. ॥१८॥
|
क्षिप्रं वज्रसमैर्बाणैः शतधा कार्मुकच्युतैः । राममादीपयिष्यामि उल्काभिरिव कुञ्जरम् ॥ १९ ॥
|
मी आपल्या धनुष्यांतून शीघ्रतापूर्वक सुटलेल्या शेकडो वज्रसदृश्य बाणांच्या द्वारे रामांना, हत्तीना पळवून लावण्यासाठी लोक त्यांना जसे उल्कांच्या द्वारे जाळतात त्याप्रकारे जाळून टाकीन. ॥१९॥
|
तच्चास्य बलमादास्ये बलेन महता वृतः । उदितः सविता काले नक्षत्राणां प्रभामिव ॥ २० ॥
|
ज्याप्रमाणे प्रात:काळी उदित झालेले सूर्यदेव, नक्षत्रांच्या प्रभेस हिरावून घेतात त्याप्रकारे आपल्या विशाल सेनेने घेरला गेलेला मी ही त्यांच्या त्या वानरसेनेला आत्मसात करून टाकीन. ॥२०॥
|
न वासवेनापि सहस्रचक्षुषा युधास्मि शक्यो वरुणेन वा पुनः । मया त्वियं बाहुबलेन निर्जिता पुरी पुरा वैश्रवणेन पालिता ॥ २१ ॥
|
युद्धात तर हजारो नेत्रांचा इंद्र आणि वरूणही माझा सामना करू शकत नाहीत. पूर्वकाळी कुबेर द्वारा पालन केल्या गेलेल्या या लंकापुरीला मी आपल्या बाहुबलानेंच जिंकले होते. ॥२१॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे त्रयोदशः सर्गः ॥ १३ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा तेरावा सर्ग पूर्ण झाला. ॥१३॥
|