द्वन्द्वयुद्धे वानरै रक्षसां पराजयः -
|
द्वंदयुद्धात वानरांच्या द्वारा राक्षसांचा पराजय -
|
युद्ध्यातां तु ततस्तेषां वानराणां महात्मनाम् । रक्षसां संबभूवाथ बलरोषः सुदारुणः ॥ १ ॥
|
त्यानंतर परस्परात युद्ध करणार्या महामना वानर आणि राक्षस यांना एक दुसर्याची सेना पाहून फार भयंकर क्रोध आला. ॥१॥
|
ते हयैः काञ्चनापीडैः गजैश्चाग्निशिखोपमैः । रथैश्चादित्यसंकाशैः कवचैश्च मनोरमैः ॥ २ ॥
निर्ययू राक्षसा वीरा नादयन्तो दिशो दश । राक्षसा भीमकर्माणो रावणस्य जयैषिणः ॥ ३ ॥
|
सोन्याच्या आभूषणांनी विभूषित घोडे, हत्ती, अग्निच्या ज्वालेसमान देदीप्यमान रथ तसेच सूर्यतुल्य तेजस्वी मनोरम कवचांनी युक्त ते वीर राक्षस आपल्या गर्जनेने दाही दिशांना निनादित करत निघाले. भयानक कर्मे करणारे ते सर्व निशाचर रावणाच्या विजयाची इच्छा करत होते. ॥२-३॥
|
वानराणामपि चमूः बृहती जयमिच्छताम् । अभ्यधावत तां सेनां रक्षसां घोरकर्मणाम् ॥ ४ ॥
|
भगवान् श्रीरामांच्या विजयाची इच्छा करणार्या वानरांच्या त्या विशाल सेनेनेही घोर कर्म करणार्या राक्षसांच्या सेनेवर हल्ला चढवला. ॥४॥
|
एतस्मिन्नन्तरे तेषां अन्योन्यमभिधावताम् । रक्षसां वानराणां च द्वन्द्वयुद्धमवर्तत ॥ ५ ॥
|
यासमयी एक-दुसर्यावर धावून जाणार्या त्या राक्षसात आणि वानरांमध्ये द्वंदयुद्ध सुरू झाले. ॥५॥
|
अङ्गदेनेन्द्रजित् सार्धं वालिपुत्रेण राक्षसः । अयुध्यत महातेजाः त्र्यंबकेण यथान्धकः ॥ ६ ॥
|
वालिपुत्र अंगदाशी महातेजस्वी राक्षस इंद्रजित अशा तर्हेने भिडला की त्रिनेत्रधारी महादेवांबरोबर जणु अंधकासुर लढत असावा. ॥६॥
|
प्रजङ्घेन च संपातिः नित्यं दुर्मर्षणो रणे । जंबुमालिनमारब्धो हनुमानपि वानरः ॥ ७ ॥
|
प्रजंध नामक राक्षसाबरोबर सदाच रणदुर्जय वीर संपातिने आणि जंबुमालीबरोबर वानरवीर हनुमानांनी युद्धास आरंभ केला. ॥७॥
|
सङ्गतस्तु सुमहाक्रोधो राक्षसो रावणानुजः । समरे तीक्ष्णवेगेन मित्रघ्नेन विभीषणः ॥ ८ ॥
|
अत्यंत क्रोधाविष्ट झालेले रावणानुज राक्षस विभीषण समरांगणात प्रचंड वेगवान् शत्रुघ्नाशी जाऊन भिडले. ॥८॥
|
तपनेन गजः सार्धं राक्षसेन महाबलः । निकुम्भेन महातेजा नीलोऽपि समयुद्ध्यत ॥ ९ ॥
|
महाबली गज, तपन नामक राक्षसाबरोबर लढू लागले. महातेजस्वी नीलही निकुंभाशी लढू लागला. ॥९॥
|
वानरेन्द्रस्तु सुग्रीवः प्रघसेन सुसंगतः । संगतः समरे श्रीमान् विरूपाक्षेण लक्ष्मणः ॥ १० ॥
|
वानरराज सुग्रीव, प्रघसाबरोबर आणि श्रीमान् लक्ष्मण समरभूमी मध्ये विरूपाक्षाबरोबर युद्ध करू लागले.॥१०॥
|
आग्निकेतु सुदुर्धर्षो रश्मिकेतुश्च राक्षसः । सुप्तघ्नो यज्ञकोपश्च रामेण सह संगताः ॥ ११ ॥
|
दुर्जय वीर अग्निकेतु, रश्मिकेतु, सुप्तघ्न आणि यज्ञकोप - हे सर्व राक्षस श्रीरामचंद्रांबरोबर लढू लागले. ॥११॥
|
वज्रमुष्टिस्तु मैन्देन द्विविदानशनिप्रभः । राक्षसाभ्यां सुघोराभ्यां कपिमुख्यौ समागतौ ॥ १२ ॥
|
मैंदाशी, वज्रमुष्टि आणि द्विविदा बरोबर अशनिप्रभ युद्ध करू लागले. याप्रकारे या दोन्ही भयानक राक्षसांबरोबर ते दोन्ही कपिशिरोमणी वीर भिडलेले होते. ॥१२॥
|
वीरः प्रतपनो घोरो राक्षसो रणदुर्धरः । समरे तीक्ष्णवेगेन नलेन समयुध्यत ॥ १३ ॥
|
प्रतपन नामक एक प्रसिद्ध घोर राक्षस होता, ज्याला रणभूमीवर परास्त करणे अत्यंत कठीण होते. तो वीर निशाचर समरांगणात प्रचंड वेगवान् नलाबरोबर युद्ध करू लागला. ॥१३॥
|
धर्मस्य पुत्रो बलवान् सुषेण इति विश्रुतः । स विद्युन्मालिना सार्धं अयुध्यत महाकपिः ॥ १४ ॥
|
धर्माचा बलवान् पुत्र महाकपि सुषेण राक्षस विद्युन्माली बरोबर युद्ध करू लागला. ॥१४॥
|
वानराश्चापरे घोरा राक्षसैरपरैः सह । द्वन्द्वं समीयुः सहसा युध्या च बहुभिः सह ॥ १५ ॥
|
याप्रकारे अन्यान्य भयानक वानर बर्याच जणांशी युद्ध केल्यानंतर दुसर्या-दुसर्या राक्षसांशी एकाएकी द्वंदयुद्ध करू लागले. ॥१५॥
|
तत्रासीत् सुमहद् युद्धं तुमुलं रोमहर्षणम् । रक्षसां वानराणां च वीराणां जयमिच्छताम् ॥ १६ ॥
|
तेथे राक्षस आणि वानरवीर आपापल्या विजयाची इच्छा करत होते. त्यांच्यामध्ये फार भयंकर आणि रोमांचकारी युद्ध होऊ लागले. ॥१६॥
|
हरिराक्षसदेहेभ्यः प्रभृताः केशशाद्वलाः । शरीरसङ्घाटवहाः प्रसुस्रुः शोणितापगाः ॥ १७ ॥
|
वानर आणि राक्षस यांच्या शरीरांतून निघून बर्याचशा रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. त्यांच्या डोक्याचे केसही तेथे शेवाळाच्या समान भासू लागले. त्या नद्या सैनिकांची प्रेतेरुपी काष्ठसमूहास वाहून नेत होत्या. ॥१७॥
|
आजघानेन्द्रजित् क्रुद्धो वज्रेणेव शतक्रतुः । अङ्गदं गदया वीरं शत्रुसैन्यविदारणम् ॥ १८ ॥
|
ज्याप्रकारे इंद्र वज्राने प्रहार करतात त्याच तर्हेने इंद्रजित् मेघनादाने शत्रुसेनेला विदीर्ण करणार्या वीर अंगदावर गदेने आघात केला. ॥१८॥
|
तस्य काञ्चनचित्रांगं रथं साश्वं ससारथिम् । जघान समरे श्रीमान् अङ्गदो वेगवान् हरिः ॥ १९ ॥
|
परंतु वेगवान् वानर श्रीमान् अंगदाने त्याची गदा हाताने पकडली आणि त्याच गदेने इंद्रजिताच्या सुवर्णजडित रथाचा सारथि आणि घोड्यांसहित चुराडा करून टाकला. ॥१९॥
|
संपातिस्तु प्रजङ्घेन त्रिभिर्बाणैः समाहतः । निजघानाश्वकर्णेन प्रजङ्घं रणमूर्धनि ॥ २० ॥
|
प्रजंघाने संपातिला तीन बाणांनी घायाळ करून टाकले, तेव्हा संपातिनेही अश्वकर्ण नामक वृक्षाने युद्धाच्या तोंडावरच प्रजंघाला मारून टाकले. ॥२०॥
|
जंबुम्बुमाली रथस्थस्तु रथशक्त्या महाबलः । बिभेद समरे क्रुद्धो हनूमन्तं स्तनान्तरे ॥ २१ ॥
|
महाबली जंबुमाली रथावर बसलेला होता. त्याने कुपित होऊन समरांगणात एका रथ-शक्तिच्या द्वारा हनुमंताच्या छातीवर प्रहार केला व जखम केली. ॥२१॥
|
तस्य तं रथमास्थाय हनूमान् मारुतत्मजः । प्रममाथ तलेनाशु सह तेनैव रक्षसा ॥ २२ ॥
|
परंतु पवननंदन हनुमान् उडी मारून त्याच्या रथावर चढून गेले आणि तात्काळच थप्पड मारून त्यांनी त्या राक्षसासहच त्या रथाला नष्ट करून टाकले. (जंबुमाली मरून गेला.) ॥२२॥
|
नदन् प्रतपनो घोरो नलं सोऽभ्यनुधावत । नलः प्रतपनस्याशु पातयामास चक्षुषी ॥ २३ ॥
भिन्नगात्रः शरैस्तीक्ष्णैः क्षिप्रहस्तेन रक्षसा ।
|
दुसरीकडे भयानक राक्षस प्रतपन भीषण गर्जना करून नलाकडे धावला. शीघ्रतापूर्वक हात चालविणार्या त्या राक्षसाने आपल्या तीक्ष्ण बाणांनी नलाच्या शरीरास क्षत-विक्षत करून टाकले, तेव्हा नलाने तात्काळच त्याचे दोन्ही डोळेच बाहे) काढले. ॥२३ १/२॥
|
ग्रसन्तमिव सैन्यानि प्रघसं वानराधिपः ॥ २४ ॥
सुग्रीवः सप्तपर्णेन निजघान जवेन च ।
|
तिकडे राक्षस प्रघस वानरसेनेला काळाचा ग्रास बनवत होता. हे पाहून वानरराज सुग्रीवाने सप्तपर्ण नामक वृक्षाने त्याला वेगपूर्वक मारून टाकले. ॥२४ १/२॥
|
प्रपीड्य शरवर्षेण राक्षसं भीमदर्शनम् ॥ २५ ॥
निजघान विरूपाक्षं शरेणैकेन लक्ष्मणः ।
|
लक्ष्मणांनी प्रथम बाणांची वृष्टि करून भयंकर दृष्टि असणार्या राक्षस विरूपाक्षाला खूप पीडा दिली. नंतर एका बाणाने मारून त्याला मृत्युच्या स्वाधीन केले. ॥२५ १/२॥
|
अग्निकेतुश्च दुर्धर्षो रश्मिकेतुश्च राक्षसः । सुप्तघ्नो यज्ञकोपश्च रामं निर्बिभिदुः शरैः ॥ २६ ॥
|
अग्निकेतु, दुर्जय रश्मिकेतु, सुप्तघ्न आणि यज्ञकोप नामक राक्षसांनी श्रीरामांना आपल्या बाणांनी घायाळ करून टाकले. ॥२६॥
|
तेषां चतुर्णां रामस्तु शिरांसि समरे शरै । क्रुद्धश्चतुर्भिश्चिच्छेद घोरैरग्निशिखोपमैः ॥ २७ ॥
|
तेव्हा श्रीरामांनी कुपित होऊन अग्निशिखेप्रमाणे भयंकर बाणांच्या द्वारा समरांगणात त्या चौघांची शिरे छाटून टाकली. ॥२७॥
|
वज्रमुष्टिस्तु मैन्देन मुष्टिना निहतो रणे । पपात सरथः साश्वः सुराट्ट इव भूतले ॥ २८ ॥
|
त्या युद्धस्थळावर मैंदाने वज्रमुष्टिवर बुक्क्यांचा प्रहार केला ज्यायोगे तो रथ आणि घोड्यांसहित जणु देवतांचे विमान धराशायी झाले असावे तसा पृथ्वीवर कोसळला. ॥२८॥
|
निकुम्भस्तु रणे नीलं नीलाञ्जनचयप्रभम् । निर्बिभेद शरैस्तीक्ष्णैः करैर्मेघमिवांशुमान् ॥ २९ ॥
|
निकुंभाने काळ्या कोळशांच्या समूहाप्रमाणे नीलवर्णाच्या नीलाला रणक्षेत्रामध्ये आपल्या तीक्ष्ण बाणांच्या द्वारे, सूर्यदेव आपल्या प्रचंड किरणांच्या द्वारा मेघांना जसा विदीर्ण करतो, त्याप्रमाणे छिन्न-भिन्न करून टाकले होते. ॥२९॥
|
पुनः शरशतेनाथ क्षिप्रहस्तो निशाचरः । बिभेद समरे नीलं निकुम्भः प्रजहास च ॥ ३० ॥
|
परंतु शीघ्रतापूर्वक हात चालविणार्या त्या निशाचराने समरांगणात नीलाला पुन्हा शंभर बाणांनी घायाळ केले. असे करून निकुम्भ जोरजोराने हसू लागला. ॥३०॥
|
तस्यैव रथचक्रेण नीलो विष्णुरिवाहवे । शिरश्चिच्छेद समरे निकुम्भस्य च सारथेः ॥ ३१ ॥
|
हे पाहून नीलाने त्याच्याच रथाच्या चाकांनी युद्धस्थळावर निकुम्भ आणि त्याचा सारथि यांचे भगवान् विष्णु जसे संग्रामभूमीमध्ये आपल्या चक्राने दैत्यांचे मस्तक उडवितात तसे त्यांचे शिर उडविले. ॥३१॥
|
वज्राशनिसमस्पर्शो द्विविदोऽप्यशनिप्रभम् । जघान गिरिशृङ्गेण मिषतां सर्वरक्षसाम् ॥ ३२ ॥
|
द्विविदाचा स्पर्श वज्र आणि अशनिप्रमाणे दु:सह होता. त्यांनी सर्व राक्षसांच्या देखत अशनिप्रभ नामक निशाचरावर एका पर्वतशिखरानी प्रहार केला. ॥३२॥
|
द्विविदं वानरेन्द्रं तु द्रुमयोधिनमाहवे । शरैरशनिसंकाशैः स विव्याधाशनिप्रभः ॥ ३३ ॥
|
तेव्हा अशनिप्रभाने युद्धस्थळावर वृक्ष घेऊन युद्ध करणार्या वानरराज द्विविदाला वज्रतुल्य तेजस्वी बाणांच्याद्वारे घायाळ केले. ॥३३॥
|
स शरैरतिविद्धाङ्गो द्विविदः क्रोधमूर्च्छितः । सालेन सरथं साश्वं निजघानाशनिप्रभम् ॥ ३४ ॥
|
द्विविदांचे सारे शरीर बाणांनी क्षत-विक्षत होऊन गेले. त्यामुळे त्यांना फार क्रोध आला आणि त्यांनी एका सालवृक्षाने रथ आणि घोड्यांसहित अशनिप्रभाला मारून टाकले. ॥३४॥
|
विद्युन्माली रथस्थस्तु शरैः काञ्चनभूषणैः । सुषेणं ताडयामास ननाद च मुहुर्मुहुः ॥ ३५ ॥
|
रथावर बसलेल्या विद्युन्माळीने आपल्या सुवर्णभूषित बाणांच्या द्वारे सुषेणाला वारंवार घायाळ केले. नंतर तो जोरजोराने गर्जना करू लागला. ॥३५॥
|
तं रथस्थमथो दृष्ट्वा सुषेणो वानरोत्तमः । गिरिशृङ्गेण महता रथमाशु न्यपातयत् ॥ ३६ ॥
|
त्याला रथावर बसलेला पाहून वानरशिरोमणी सुषेणाने एक विशाल पर्वत शिखर फेकून त्याच्या रथाचा शीघ्रच चुराडा करून टाकला. ॥३६॥
|
लाघवेन तु संयुक्तो विद्युन्माली निशाचरः । अपक्रम्य रथात् तूर्णं गदापाणिः क्षितौ स्थितः ॥ ३७ ॥
|
निशाचर विद्युन्मालीने मोठ्या चपलतेने रथाखाली उडी मारली आणि हातात गदा घेऊन तो पृथ्वीवर उभा राहिला. ॥३७॥
|
ततः क्रोधसमाविष्टः सुषेणो हरिपुंगवः । शिलां सुमहतीं गृह्य निशाचरमभिद्रवत् ॥ ३८ ॥
|
तदनंतर क्रोधाविष्ट झालेल्या वानरशिरोमणी सुषेणाने एक फार मोठी शिळा घेऊन तो त्या निशाचराकडे धावला. ॥३८॥
|
तमापतन्तं गदया विद्युन्माली निशाचरः । वक्षस्यभिजघानाशु सुषेणं हरिपुंगवम् ॥ ३९ ॥
|
कपिश्रेष्ठ सुषेणाला आक्रमण करतांना पाहून निशाचर विद्युन्माळीने तात्काळच गदेने त्याच्या छातीवर प्रहार केला. ॥३९॥
|
गदाप्रहारं तं घोरं अचिन्त्य प्लवगोत्तमः । तां शिलां पातयामास तस्योरसि महामृधे ॥ ४० ॥
|
गदेच्या त्या भीषण प्रहाराची जराही पर्वा न करता वानरप्रवर सुषेणाने ती पहिल्याने उचललेलीच शिळा गुपचुप उचलली आणि त्या महासमरात ती विद्युन्माळीच्या छातीवर मारली. ॥४०॥
|
शिलाप्रहाराभिहतो विद्युन्माली निशाचरः । निष्पिष्टहृदयो भूमौ गतासुर्निपपात ह ॥ ४१ ॥
|
शिळेच्या प्रहाराने घायाळ झालेल्या निशाचर विद्युन्माळीची छाती चूर चूर झाली आणि तो प्राणशून्य होऊन पृथ्वीवर पडला. ॥४१॥
|
एवं तैर्वानरैः शूरैः शूरास्ते रजनीचराः । द्वन्द्वे विमृदितास्तत्र दैत्या इव दिवौकसैः ॥ ४२ ॥
|
याप्रकारे जसे देवतांद्वारे दैत्य मथले गेले होते त्याप्रकारेच ते शूरवीर निशाचर शौर्यसंपन्न वानर वीरांच्या द्वारा तेथे द्वंद युद्धात चिरडले गेले. ॥४२॥
|
भल्लैश्चाग्निर्गदाभिश्च शक्तितोमरसायकैः । अपविद्धैश्चापि रथैः तथा सांग्रामिकैर्हयैः ॥ ४३ ॥
निहतैः कुञ्जरैर्मत्तैः तथा वानरराक्षसैः । चक्राक्षयुगदण्डैश्च भग्नैर्धरणिसंश्रितैः ॥ ४४ ॥
बभूवायोधनं घोरं गोमायुगणसेवितम् । कबंधानि समुत्पेतुः दिक्षु वानररक्षसाम् । विमर्दे तुमुले तस्मिन् देवासुररणोपमे ॥ ४५ ॥
|
त्यासमयी भाले, अन्यान्य बाण, गदा, शक्ती, तोमर, सायक, तुटलेले आणि फेकले गेलेले रथ, फौजी घोडे, मेलेले मत्त हत्ती, वानर, राक्षस, चाके तसेच तुटलेले लगाम, जी सर्व जमिनीवर विखरून पडलेली होती, ती युद्धभूमी फारच भयानक होत होती. कोल्ह्यांचे समुदाय तेथे सर्वत्र विचरत होते. देवासुर संग्रामाप्रमाणे त्या भयानक युद्धामध्ये वानरांची आणि राक्षसांची कबंधे (मस्तकरहित धडे) संपूर्ण दिशातच उसळी मारत होती. ॥४३-४५॥
|
विदार्यमाणा हरिपुंगवैस्तदा निशाचराः शोणितगंधमूर्च्छिताः । पुनः सुयुद्धं तरसा समास्थिता दिवाकरस्यास्तमयाभिकाङ्क्षिणः ॥ ४६ ॥
|
त्यासमयी त्या वानरशिरोमणींच्या द्वारा मारले जाणारे निशाचर रक्ताच्या गंधाने उन्मत्त होत होते. ते सूर्याचा अस्त होण्याची (*१) प्रतीक्षा करत पुन्हा मोठ्या वेगाने घनघोर युद्धासाठी तत्पर झाले. ॥४६॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे त्रिचत्वारिंशः सर्गः ॥ ४३ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा त्रेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४३॥
|