वसिष्ठेन सहागच्छन्त्याः कौसल्याया मन्दाकिनीतटे सुमित्रादीनां समक्षे दुःखपूर्णोद्गारः , सीतारामलक्ष्मणकर्तृका मातॄणां चरणवन्दना वसिष्ठं प्रणम्य श्रीरामादीनां सर्वैः सहोपवेशनम् -
|
वसिष्ठांच्या बरोबर येणार्या कौसल्येचे मंदाकिनीच्या तटावर सुमित्रा आदिंच्या समक्ष दुःखपूर्ण उद्गार, श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या द्वारा मातांची चरणवंदना. तसेच वसिष्ठांना प्रणाम करून श्रीराम आदिंचे सर्वांसह बसणे -
|
वसिष्ठः पुरतः कृत्वा दारान् दशरथस्य च ।
अभिचक्राम तं देशं रामदर्शनतर्षितः ॥ १ ॥
|
महर्षि वसिष्ठ महाराज दशरथांच्या राण्यांना पुढे करून रामांना पाहण्याची अभिलाषा ठेवून, जिकडे रामांचा आश्रम होता त्या स्थानाकडे निघाले. ॥ १ ॥
|
राजपत्न्यश्च गच्छन्त्यो मन्दं मन्दाकिनीं प्रति ।
ददृशुस्तत्र तत् तीर्थं रामलक्ष्मणसेवितम् ॥ २ ॥
|
राजराण्या मंदगतीने चालत जेव्हां मंदाकिनीच्या तटावर पोहोंचल्या तेव्हां त्यांनी तेथे श्रीराम आणि लक्ष्मणांचा स्नान करण्याचा घाट पाहिला. ॥ २ ॥
|
कौसल्या बाष्पपूर्णेन मुखेन परिशुष्यता ।
सुमित्रामब्रवीद् दीनां याश्चान्या राजयोषितः ॥ ३ ॥
|
त्या समयी कौसल्येच्या मुखावरून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने सुकलेल्या आणि उदास मुखाने दीन सुमित्रा तसेच अन्य राजराण्यांना म्हटले - ॥ ३ ॥
|
इदं तेषामनाथानां क्लिष्टमक्लिष्टकर्मणाम् ।
वने प्राक्कलनं तीर्थं ये ते निर्विषयीकृताः ॥ ४ ॥
|
"ज्यांना राज्यातून घालवूने दिले गेले आहे, जे दुसर्यांना क्लेश न देणारे कार्यच करतात त्या माझ्या अनाथ मुलांचे हे वनांतील दुर्गम तीर्थ आहे, ज्याचा त्यांनी पहिल्या प्रथम स्वीकार केला आहे. ॥ ४ ॥
"
|
इतः सुमित्रे पुत्रस्ते सदा जलमतन्द्रितः ।
स्वयं हरति सौमित्रिर्मम पुत्रस्य कारणात् ॥ ५ ॥
|
’सुमित्रे ! आलस्यरहित असलेला तुमचा पुत्र लक्ष्मण स्वतः येऊन सदा येथूनच माझ्या पुत्रासाठी जल घेऊन जात असतो. ॥ ५ ॥
|
जघन्यमपि ते पुत्रः कृतवान् न तु गर्हितः ।
भ्रातुर्यदर्थरहितं सर्वं तद् गर्हितं गुणैः ॥ ६ ॥
|
’यद्यपि तुमच्या पुत्रांनी लहानात लहान सेवा कार्यही स्वीकार केले आहे, तथापि त्यामुळे ते निंदित झालेले नाहीत. कारण की सद्गुणांनी युक्त ज्येष्ठ भावाची प्रयोजनरहित जी कार्ये होतात, तीच सर्वदा निंदित मानली गेली आहेत. ॥ ६ ॥
|
अद्यायमपि ते पुत्रः क्लेशानामतथोचितः ।
नीचानर्थसमाचारं सज्जं कर्म प्रमुञ्चतु ॥ ७ ॥
|
’तुमचा हा पुत्र जे क्लेश आज सहन करीत आहे त्यास योग्य नाही. आता श्रीराम परत येवोत आणि निम्न श्रेणीच्या पुरुषास योग्य असे जे दुःखजनक कार्य त्याच्यासमोर प्रस्तुत आहे, ते तो सोडून देऊ दे. ते करण्याची वेळच त्याच्यावर न येवो." ॥ ७ ॥
|
दक्षिणाग्रेषु दर्भेषु सा ददर्श महीतले ।
पितुरिङ्गुदिपिण्याकं न्यस्तमायतलोचना ॥ ८ ॥
|
पुढे गेल्यावर विशाल लोचना कौसल्येने पाहिले की श्रीरामांनी पृथ्वीवर पसरलेल्या दक्षिणाग्र कुशांच्यावर आपल्या पित्यासाठी इंगुदीच्या फळाच्या दळलेल्या पिठाचे पिण्ड करून ठेवले आहेत. ॥ ८ ॥
|
तं भूमौ पितुरार्तेन न्यस्तं रामेण वीक्ष्य सा ।
उवाच देवी कौसल्या सर्वा दशरथस्त्रियः ॥ ९ ॥
|
दुःखी रामांच्या द्वारे पित्यासाठी पृथ्वीवर ठेवलेला तो पिण्ड पाहून देवी कौसल्येने दशरथांच्या सर्व राण्यांना म्हटले - ॥ ९ ॥
|
इदमिक्ष्वाकुनाथस्य राघवस्य महात्मनः ।
राघवेण पितुर्दत्तं पश्यतैतद् यथाविधि ॥ १० ॥
|
"भगिनींनो ! पहा श्रीरामांनी इक्ष्वाकु कुळाचे स्वामी राघव (दशरथ) महात्म्या पित्यासाठी हे विधिपूर्वक पिण्डदान केले आहे. ॥ १० ॥
"
|
तस्य देवसमानस्य पार्थिवस्य महात्मनः ।
नैतदौपयिकं मन्ये भुक्तभोगस्य भोजनम् ॥ ११ ॥
|
’देवताप्रमाणे तेजस्वी ते महामना भूपाल नाना प्रकारचे उत्तम भोग भोगून चुकले आहेत. त्यांच्यासाठी हे भोजन मी उचित मानत नाही. ॥ ११ ॥
|
चतुरन्तां महीं भुक्त्वा महेन्द्रसदृशो भुवि ।
कथमिङ्गुदिपिण्याकं स भुङ्क्ते वसुधाधिपः ॥ १२ ॥
|
’जे चारही समुद्रापर्यंतच्या पृथ्वीचे राज्य भोगून भूतलावर देवराज इंद्रासमान प्रतापी होते, तेच भूपाल दशरथ महाराज दळलेल्या इंगुदी फळाचा पिण्ड कसे खात असतील ? ॥ १२ ॥
|
अतो दुःखतरं लोके न किञ्चित् प्रतिभाति मे ।
यत्र रामः पितुर्दद्यादिङ्गुदीक्षोदमृद्धिमान् ॥ १३ ॥
|
’संसारात याहून अधिक महान् दुःख मला दुसरे कुठले प्रतीत होत नाही; ज्याच्या अधीन होऊन श्रीराम समृद्धिशाली असूनही आपल्या पित्यास इंगुदीच्या दळलेल्या फळाचे पिण्ड देत आहेत. ॥ १३ ॥
|
रामेणेङ्गुदिपिण्याकं पितुर्दत्तं समीक्ष्य मे ।
कथं दुःखेन हृदयं न स्फोटति सहस्रधा ॥ १४ ॥
|
’श्रीरामांनी आपल्या पित्याला इंगूदीचे पिण्याक (दळलेले फळ) प्रदान केले आहे, हे पाहून दुःखाने माझ्या हृदयाचे हजारो तुकडे का होऊन जात नाहीत ? ॥ १४ ॥
|
श्रुतिस्तु खल्वियं सत्या लौकिकी प्रतिभाति मे ।
यदन्नः पुरुषो भवति तदन्नास्तस्य देवताः ॥ १५ ॥
|
’ही लौकिक श्रुति (लोकप्रसिद्ध म्हण) निश्चितच मला सत्य प्रतीत होत आहे की मनुष्य स्वतः जे अन्न खातो, त्याच्या देवताही तेच अन्न ग्रहण करतात." ॥ १५ ॥
|
एवमार्तां सपत्न्यस्ता जग्मुराश्वास्य तां तदा ।
ददृशुश्चाश्रमे रामं स्वर्गच्युतमिवामरम् ॥ १६ ॥
|
या प्रकारे शोकाने आर्त झालेल्या कौसल्येला त्या समयी तिच्या सवतींनी समजावून त्या तिला पुढे घेऊन गेल्या. आश्रमात पोहोचल्यावर स्वर्गातून खाली पडलेल्या कुणा देवतेसमान दिसणार्या श्रीरामांना त्या सर्वांनी पाहिले. ॥ १६ ॥
|
तं भोगैः सम्परित्यक्तं रामं सम्प्रेक्ष्य मातरः ।
आर्ता मुमुचुरश्रूणि सस्वरं शोककर्शिताः ॥ १७ ॥
|
भोगांचा परित्याग करून तपस्वी जीवन व्यतीत करणार्या श्रीरामांना पाहून त्यांच्या माता स्नेहाने कातर झाल्या आणि आर्तभावाने स्फुंदून स्फुंदून रडत रडत अश्रु ढाळू लागल्या. ॥ १७ ॥
|
तासां रामः समुत्थाय जग्राह चरणाम्बुजान् ।
मातॄणां मनुजव्याघ्रः सर्वासां सत्यसङ्गरः ॥ १८ ॥
|
सत्यप्रतिज्ञ नरश्रेष्ठ श्रीराम मातांना पाहताच उठून उभे राहिले आणि पाळी पाळीने त्या सर्वांच्या चरणारविंदांना त्यांनी स्पर्श केला. ॥ १८ ॥
|
ताः पाणिभिः सुखस्पर्शैर्मृद्वङ्गुलितलैः शुभैः ।
प्रममार्जू रजः पृष्ठाद् रामस्यायतलोचनाः ॥ १९ ॥
|
विशाल नेत्र असलेल्या माता, ज्यांची बोटे कोमल होती आणि स्पर्श सुखद होता, त्या आपल्या सुंदर हातांनी श्रीरामांच्या पाठीवरील धूळ पुसू लागल्या. ॥ १९ ॥
|
सौमित्रिरपि ताः सर्वाः मातॄः सम्प्रेक्ष्य दुःखितः ।
अभ्यवादयदासक्तं शनै रामादनन्तरम् ॥ २० ॥
|
श्रीरामांच्या नंतर लक्ष्मणही त्या सर्व दुःखी मातांना पाहून दुःखी झाले आणि त्यांनी स्नेहपूर्वक हळूहळू त्यांच्या चरणांना प्रणाम केला. ॥ २० ॥
|
यथा रामे तथा तस्मिन् सर्वा ववृतिरे स्त्रियः ।
वृत्तिं दशरथाज्जाते लक्ष्मणे शुभलक्षणे ॥ २१ ॥
|
त्या सर्व मातांनी श्रीरामांशी जसे वर्तन केले होते तसेच वर्तन उत्तम लक्षणांनी युक्त दशरनंदन लक्ष्मणाशीही केले. ॥ २१ ॥
|
सीतापि चरणांस्तासामुपसंगृह्य दुःखिता ।
श्वश्रूणामश्रुपूर्णाक्षी सम्बभूवाग्रतः स्थिता ॥ २२ ॥
|
त्यानंतर जिचे डोळे अश्रुंनी डबडबलेले होते ती दुःखी सीता देखील सर्व सासवांच्या चरणी प्रणाम करून त्यांच्या समोर उभी राहिली. ॥ २२ ॥
|
तां परिष्वज्य दुःखार्ता माता दुहितरं यथा ।
वनवासकृतां दीनां कौसल्या वाक्यमब्रवीत् ॥ २३ ॥
|
तेव्हां दुःखाने पीडित झालेल्या कौसल्येने, माता जशी आपल्या मुलीस हृदयाशी धरते, त्याप्रमाणे वनवासामुळे दीन दुर्बल झालेल्या सीतेला आपल्या छातीशी कवळून धरले, आणि याप्रकारे म्हटले - ॥ २३ ॥
|
वैदेहराजन्यसुता स्नुषा दशरथस्य च ।
रामपत्नी कथं दुःखं सम्प्राप्ता विजने वने ॥ २४ ॥
|
"विदेहराज जनकाची कन्या, राजा दशरथांची सून आणि श्रीरामांची पत्नी या निर्जन वनात का बरे दुःख भोगीत आहे ? ॥ २४ ॥
"
|
पद्ममातपसंतप्तं परिक्लिष्टमिवोत्पलम् ।
काञ्चनं रजसा ध्वस्तं क्लिष्टं चन्द्रमिवाम्बुदैः ॥ २५ ॥
|
’मुली ! तुझे मुख उन्हाने तप्त झालेल्या कमलाप्रमाणे आणि ढगांनी झाकलेल्या चंद्रम्याप्रमाणे श्रीहीन होत आहे. ॥ २५ ॥
|
मुखं ते प्रेक्ष्य मां शोको दहत्यग्निरिवाश्रयम्
भृशं मनसि वैदेहि व्यसनारणिसम्भवः ॥ २६ ॥
|
’वैदेही ! ज्याप्रमाणे आग आपले उत्पत्तीस्थान काष्ठाला दग्ध करून टाकते त्यप्रमाणे तुझ्या या मुखास पाहून माझ्या मनात संकटरूपी अरणिंनी उत्पन्न झालेला शोकाग्नि मला जाळून टाकीत आहे." ॥ २६ ॥
|
ब्रुवन्त्यामेवमार्तायां जनन्यां भरताग्रजः ।
पादावासाद्य जग्राह वसिष्ठस्य च राघवः ॥ २७ ॥
|
शोकाकुल झालेल्या माता जेव्हां या प्रकारे विलाप करीत होत्या त्या समयी भरताचे ज्येष्ठ बंधु श्रीराम यांनी वसिष्ठांच्या पाया पडून आपल्या दोन्ही हातांनी त्यांचे चरण धरून ठेवले. ॥ २७ ॥
|
पुरोहितस्याग्निसमस्य तस्य वै
बृहस्पतेरिन्द्र इवामराधिपः ।
प्रगृह्य पादौ सुसमृद्धतेजसः
सहैव तेनोपविवेश राघवः ॥ २८ ॥
|
ज्याप्रमाणे देवराज इंद्र बृहस्पतीच्या चरणांना स्पर्श करतात, त्याचप्रकारे अग्निसमान ज्यांचे तेज वाढलेले होते त्या पुरोहित वसिष्ठांचे दोन्ही चरण पकडून श्रीराम त्यांच्या बरोबरच पृथ्वीवर बसले. ॥ २८ ॥
|
ततो जघन्यं सहितैः समन्त्रिभिः
पुरप्रधानैश्च तथैव सैनिकैः ।
जनेन धर्मज्ञतमेन धर्मवा-
नुपोपविष्टो भरतस्तदाग्रजम् ॥ २९ ॥
|
त्यानंतर धर्मात्मा भरत एकदमच आलेले आपल्या सर्व मंत्री, प्रधान प्रधान पुरवासी, सैनिक आणि परमधर्मज्ञ पुरुषांसह आपल्या मोठ्या भावाजवळ त्यांच्या मागे जाऊन बसले. ॥ २९ ॥
|
उपोपविष्टस्तु तथा स वीर्यवां-
स्तपस्विवेषेण समीक्ष्य राघवम् ।
श्रिया ज्वलन्तं भरतः कृताञ्जलि-
र्यथा महेन्द्रः प्रयतः प्रजापतिम् ॥ ३० ॥
|
त्या समयी श्रीरामांच्या आसनाच्या जवळच बसलेल्या अत्यंत पराक्रमी भरतांनी, दिव्य दीप्तिने प्रकाशित होणार्या राघवास तपस्वी वेषात पाहून, त्यांच्या प्रति, देवराज इंद्र जसे प्रजापति ब्रह्मदेवांच्या समक्ष विनीतभावाने हात जोडतात त्याप्रमाणे हात जोडले. ॥ ३० ॥
|
किमेष वाक्यं भरतोऽद्य राघवं
प्रणम्य सत्कृत्य च साधु वक्ष्यति ।
इतीव तस्यार्यजनस्य तत्त्वतो
बभूव कौतूहलमुत्तमं तदा ॥ ३१ ॥
|
त्या समयी तेथे बसलेल्या श्रेष्ठ पुरुषांच्या हृदयात यथार्थ रूपाने उत्तम कुतुहल उत्पन्न झाले होते की, पाहू या तरी हे भरत श्रीरामांना सत्कारपूर्वक प्रणाम करून आज उत्तम रीतीने त्यांच्या समक्ष काय बोलत आहेत ? ॥ ३१ ॥
|
स राघवः सत्यधृतिश्च लक्ष्मणो
महानुभावो भरतश्च धार्मिकः ।
वृताः सुहृद्भिश्च विरेजिरेऽध्वरे
यथा सदस्यैः सहितास्त्रयोऽग्नयः ॥ ३२ ॥
|
ते सत्यप्रतिज्ञ राघव (राम), महानुभाव लक्ष्मण तसेच धर्मात्मा भरत - हे तिन्ही भाऊ आपल्या सुहृदांनी घेरले जाऊन यज्ञशाळेत सदस्यांच्या द्वारे घेरले गेलेल्या त्रिविध अग्निंच्याप्रमाणे शोभून दिसत होते. ॥ ३२ ॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे चतुरधिकशततमः सर्गः ॥ १०४ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मिकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा एकशे चवथा सर्ग पूरा झाला ॥ १०४ ॥
|