॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अयोध्याकाण्ड ॥

॥ चतुर्थः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



रामांनी मातेचा निरोप घेणे आणि सीता व लक्ष्मणासह वनगमनाची तयारी करणे -


श्रीमहादेव उवाच -
ततः सुमित्रा दृष्ट्‍वैनं रामं राज्ञीं ससम्भ्रमा ।
कौसल्यां बोधयामास रामोऽयं समुपस्थितः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, श्रीरामांना पाहून राणी सुमित्रा गोंधळून गेली. आणि महाराणी कौसल्येला म्हणाली- "हा राम आला आहे. " (१)

श्रुत्वैव रामनामैषा बहिर्दृष्टिप्रवाहिता ।
रामं दृष्ट्‍वा विशालाक्षं आलिङ्‌ग्याङ्‌के न्यवेशयत् ॥ २ ॥
श्रीरामांचे नाव ऐकताच, कौसल्येची दृष्टी बाहेर वळली. विशालनयन रामांना पाहून आणि त्यांना आलिंगन देऊन, तिने त्यांना आपल्या मांडीवर बसविले. (२)

मूर्ध्न्यवघ्राय पस्पर्श गात्रं नीलोत्पलच्छवि ।
भुङ्‌क्ष्व पुत्रेति च प्राह मिष्टमन्नं क्षुधार्तितः ॥ ३ ॥
त्यांच्या मस्तकाचे अवघ्राण करून तिने नील कमलाप्रमाणे कांती असणार्‍या प्रभू रामचंद्रांना कुरवाळले आणि म्हटले, "बाळा, तुला भूक लागली असेल. थोडी मिठाई खा." (३)

रामः प्राह न मे मातर्भोजनावसरः कुतः ।
दण्डकागमने शीघ्रं मम कालोऽद्य निश्चितः ॥ ४ ॥
श्रीराम म्हणाले- "आई, ही वेळ भोजनाची नाही. कारण मी आज लगेच दंडकारण्यात जाण्याचे ठरवले आहे. (४)

कैकेयीवरदानेन सत्यसन्धः पिता मम ।
भरताय ददौ राज्यं ममाप्यारण्यमुत्तमम् ॥ ५ ॥
कैकेयी मातेला वर देऊन माझ्या सत्यप्रतिज्ञ पित्यांनी भरताला अयोध्येचे राज्य दिले आहे आणि मलाही वनाचे उत्तम राज्य दिले आहे. (५)

चतुर्दश समास्तत्र ह्युषित्वा मुनिवेषधृक् ।
आगमिष्ये पुनः शीघ्रं न चिन्तां कर्तुमर्हसि ॥ ६ ॥
मुनिवेष धारण करून मी चौदा वर्षे तेथे राहीन आणि मग पुनः लवकर परत येईन. तू कसलीही काळजी मुळीच करू नकोस." (६)

तच्छ्रुत्वा सहसोद्विग्ना मूर्च्छिता पुनरुत्थिता ।
आह रामं सुदुःखार्ता दुःखसागरसंप्लुता ॥ ७ ॥
अचानक ते वचन ऐकल्यावर उद्विग्न होऊन माता कौसल्या मूर्च्छित पडली. मग पुनः शुद्धीवर आल्यावर, दुःखरूपी सागरात बुडून गेलेली ती अतिशय दुःखाने व्याकूळ होऊन श्रीरामांना म्हणू लागली. (७)

यदि राम वनं सत्यं यासि चेन्नय मामपि ।
त्वद्विहीना क्षणार्द्धं वा जीवितं धारये कथम् ॥ ८ ॥
"अरे रामा, जर तू खरोखरच वनात जाणार असशील तर मलाही तुझ्याबरोबर ने. कारण तुझ्याशिवाय मी अर्धा क्षण तरी कशी बरे जिवंत राहू शकेन ? (८)

यथा गौर्बालकं वत्सं त्यक्त्वा तिष्ठेन्न कुत्रचित् ।
तथैव त्वां न शक्नोमि त्यक्तुं प्राणात्प्रियं सुतम् ॥ ९ ॥
ज्या प्रमाणे लहान वासराला सोडून एकादी गाय अन्य कुठेही राहू शकत नाही, त्या प्रमाणेच प्राणापेक्षा अधिक प्रिय असणार्‍या तुझ्यासारख्या पुत्राला मी सोडू शकत नाही. (९)

भरताय प्रसन्नश्चेद्‌राज्यं राजा प्रयच्छतु ।
किमर्थं वनवासाय त्वां आज्ञापयति प्रियम् ॥ १० ॥
महाराज जर भरतावर प्रसन्न झाले असतील, तर ते खुशाल त्याला राज्य देऊ देत. परंतु मला प्रिय असणार्‍या तुला वनवासात जाण्याची आज्ञा त्यांनी का बरे दिली ? (१०)

कैकेय्या वरदो राजा सर्वस्वं वा प्रयच्छतु ।
त्वया किमपराद्धं हि कैकेय्या वा नृपस्य वा ॥ ११ ॥
कैकेयीला वर देणारे महाराज तिला खुशाल आपले सर्वस्व देऊ देत. परंतु तू कैकेयीचा अथवा महाराजांचा काय अपराध केला आहेस ? (११)

पिता गुरुर्यथा राम तवाहमधिका ततः ।
पित्राऽऽज्ञप्तो वनं गन्तुं वारयेयमहं सुतम् ॥ १२ ॥
हे रामा, तुझे पिता जसे तुझे गुरू आहेत तशी मी सुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक प्रमाणात तुझी गुरू आहे. जरी पित्यांनी तुला वनात जाण्याची आज्ञा केली असली, तरीसुद्धा मी माझ्या पुत्राला थांबवीन. (१२)

यदि गच्छसि मद्वाक्यं उल्लङ्‌घ्य नृपवाक्यतः ।
तदा प्राणान्परित्यज्य गच्छामि यमसादनम् ॥ १३ ॥
माझ्या वचनाचे उल्लंघन करून जर तू राजांच्या आज्ञेने वनात जाशील, तर मी प्राणत्याग करून यमसदनाला जाईन." (१३)

लक्ष्मणोऽपि ततः श्रुत्वा कौसल्यावचनं रुषा ।
उवाच राघवं वीक्ष्य दहन्निव जगत्त्रयम् ॥ १४ ॥
त्या वेळी कौसल्येचे वचन लक्ष्मणानेसुद्धा ऐकले आणि श्रीरामांकडे पाहून, जणू तिन्ही लोकांना भस्म करीत तो म्हणाला. (१४)

उन्मत्तं भ्रान्तमनसं कैकेयीवशवर्तिनम् ।
बद्ध्वा निहन्मि भरतं तद्‌बन्धून्मातुलानपि ॥ १५ ॥
"वेड्या, भ्रांतचित्त झालेल्या आणि कैकेयीला वश झालेल्या राजा दशरथांना कैद करून भरताला व त्याला सहाय्य करणार्‍या त्याच्या मामांनासुद्धा मी ठार करून टाकीन. (१५)

अद्य पश्यन्तु मे शौर्यं लोकान्प्रदहतः पुरा ।
राम त्वमभिषेकाय कुरु यत्‍नमरिन्दम ॥ १६ ॥
कालाग्नीप्रमाणे सर्व लोकांना जाळून टाकू शकणार्‍या माझे शौर्य आज सर्व लोकांना प्रथम बघू दे. शत्रूचे दमन करणार्‍या हे रामा, तुम्ही स्वतःवर अभिषेक करवून घेण्याची तयारी करा. (१६)

धनुष्पाणिरहं तत्र निहन्त्य विघ्नकारिणः ।
इति ब्रुवन्तं सौमित्रिमालिङ्‌ग्य रघुनन्दनः ॥ १७ ॥
त्यामध्ये विघ्न आणणार्‍या माणसांना मी हातात धनुष्य घेऊन ठार करीन." असे बोलणार्‍या लक्ष्मणाला आलिंगन देऊन रघुनाथ त्याला म्हणाले. (१७)

शूरोऽसि रघुशार्दूल ममात्यन्तहिते रतः ।
जानामि सर्वं ते सत्यं किन्तु तत्समयो न हि ॥ १८ ॥
"हे रघुश्रेष्ठा लक्ष्मणा, तू फार शूर वीर आहेस आणि माझे हित जपण्यास तू तत्पर आहेस. तू जे काही म्हणालास ते सर्व खरे आहे, हे मी जाणतो. परंतु तसे करण्याची ही योग्य वेळ नव्हे. (१८)

यदिदं दृश्यते सर्वं राज्यं देहादिकं च यत् ।
यदि सत्यं भवेत्तत्र आयासः सफलश्च ते ॥ १९ ॥
हे जे काही सर्व राज्य तसेच देह इत्यादी दिसत आहेत ते जर सत्य असते तर त्या संदर्भातील तुझे परिश्रम सफळ झाले असते. (१९)

भोगा मेघवितानस्थविद्युल्लेखेव चञ्चलाः ।
आयुरप्यग्निसन्तप्तलोहस्यजलबिन्दुवत् ॥ २० ॥
(परंतु तसे नाही) मेघांच्या समूहात असणार्‍या विजेच्या लखलखाटाप्रमाणे भोग हे चंचल, न टिकणारे आहेत. आणि अग्नीने तापलेल्या लोखंडावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आयुष्य हे सुद्धा क्षणिक आहे. (२०)

यथा व्यालगलस्थोऽपि भेको दंशानपेक्षते ।
तथा कालाहिना ग्रस्तो लोको भोगानशाश्वतान् ॥ २१
सापाच्या तोंडात अडकलेल्या बेडकालासुद्धा माशा खाण्याची इच्छा होते; त्याप्रमाणे कालरूपी सापाने ग्रस्त झालेले लोकसुद्धा अनित्य भोगांची इच्छा करीत राहतात. (२१)

करोति दुःखेन हि कर्मतन्त्रं
     शरीरभोगार्थमहर्निशं नरः ।
देहस्तु भिन्नः पुरुषात्समीक्ष्यते
     को वात्र भोगः पुरुषेण भुज्यते ॥ २२ ॥
शरीराला भोग मिळावेत म्हणून माणूस रात्रंदिवस कष्ट करून मोठ्या दुःखाने कर्माच्या खटपटी करतो. परंतु देह हा आत्म्यापेक्षा भिन्न आहे, हे जर विवेकामुळे कळून आले तर या जगात कोणता मनुष्य भोग कसा भोगू शकेल ? (२२)

पितृमातृसुतभ्रातृदारबन्ध्वादिसंगमः ।
प्रपायामिव जन्तूनां नद्यां काष्ठौद्यवच्चलः ॥ २३ ॥
बाप, आई, भाऊ, पुत्र, पत्‍नी व नातेवाईक यांच्याशी होणारी आपली भेट पाणपोईवर जमलेल्या प्राण्यांच्या भेटीप्रमाणे किंवा नदीच्या प्रवाहामध्ये एकत्र आलेल्या काष्ठांच्या समूहाप्रमाणे क्षणिक आहे. (२३)

छायेव लक्ष्मीश्चपला प्रतीता
     तारुण्यमम्बूर्मिवदध्रुवं च ।
स्वप्नोपमं स्त्रीसुखमायुरल्पं
     तथापि जन्तोरभिमान एषः ॥ २४ ॥
लक्ष्मी ही छायेप्रमाणे चंचल असल्याचा अनुभव आहे. पाण्यावरील तरंगाप्रमाणे तारुण्य हे अनित्य आहे. स्त्रीसुख हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि आयुष्य अल्प आहे. तथापि प्राण्यांना केवढा हा अभिमान ! (२४)

संसृतिः स्वप्नसदृशी सदा रोगादिसङ्‌कुला ।
गन्धर्वनगरप्रख्या मूढस्तामनुवर्तते ॥ २५ ॥
रोग इत्यादींनी सदैव भरलेला हा संसार स्वप्नाप्रमाणे आहे किंवा गंधर्वनगराप्रमाणे भासमान होणारा आहे. तो सत्य मानून मूर्ख लोक त्याचे अनुसरण करतात. (२५)

आयुष्यं क्षीयते यस्मादादित्यस्य गतागतैः ।
दृष्ट्‍वान्येषां जरामृत्यू कथञ्चिन्नैव बुध्यते ॥ २६ ॥
सूर्याच्या उदय व अस्ताबरोबर आयुष्य क्षीण होत असते. तसेच इतर लोकांचे वार्धक्य आणि मरण पाहिले जात असूनसुद्धा मूढ माणूस कधीही जागा होत नाही. (२६)

स एव दिवसः सैव रात्रिरित्येव मूढधीः ।
भोगाननुपतत्येव कालवेगं न पश्यति ॥ २७ ॥
दिवस तसाच आहे आणि रात्रही तशीच आहे. (आज त्यात काही फरक नाही, असे वाटून) मतिमूढ झालेला माणूस हा भोगांच्या मागेच धावत सुटतो. त्याला काळाचा वेग कळत नाही. (२७)

प्रतिक्षणं क्षरत्येतदायुरामघटाम्बुवत् ।
सपत्‍ना इव रोगौघाः शरीरं प्रहरन्त्यहो ॥ २८ ॥
कच्च्या घड्यात भरलेल्या पाण्याप्रमाणे प्रत्येक क्षणी आयुष्य क्षीण होत आहे आणि वाईट गोष्ट अशी की शत्रूप्रमाणे रोगांचे समूह शरीर नष्ट करीत असतात. (२८)

जरा व्याघ्रीव पुरतस्तर्जयन्त्यवतिष्ठते ।
मृत्युः सहैव यात्येष समयं सम्प्रतीक्षते ॥ २९ ॥
वृद्धावस्था ही एकाद्या वाघिणीप्रमाणे भिववीत पुढे उभी असते. आणि मृत्यूसुद्धा तिच्याबरोबरच चालत असतो आणि तो अंतकाळाची वाट पाहात असतो. (२९)

देहेऽहंभावमापन्नो राजाहं लोकविश्रुतः ।
इत्यस्मिन्मनुते जन्तुः कृमिविड्भस्मसंज्ञिते ॥ ३० ॥
तथापि कृमी, विष्टा आणि भस्म असे स्वरूप असणार्‍या या शरीराबद्दल अहंभावना धारण करणारा प्राणी हा 'मी लोकप्रसिद्ध राजा आहे,' असे समजत असतो. (३०)

त्वगस्थिमांसविण्मूत्ररेतोरक्तादिसंयुतः ।
विकारी परिणामी च देह आत्मा कथं वद ॥ ३१ ॥
यमास्थाय भवाँल्लोकं दग्धुमिच्छति लक्ष्मण ।
देहाभिमानिनः सर्वे दोषाः प्रादुर्भवन्ति हि ॥ ३२ ॥
हे लक्ष्मणा, ज्याच्या आधाराने तू जगाला दग्ध करू इच्छितोस तो देह त्वचा, अस्थि, मांस, विष्ठा, मूत्र, शुक्र आणि रक्त इत्यादींनी बनलेला असून तो विकार पावणारा आणि परिणाम पावणारा आहे. तो देह आपला आत्मा कसा असेल, ते सांग बरे ? देहाचा अभिमान बाळगणार्‍या पुरुषाच्या ठिकाणीच सर्व दोष प्रकट होतात. (३१-३२)

देहोऽहमिति यो बुद्धिरविद्या सा प्रकीर्तिता ।
नाहं देहश्चिदात्मेति बुद्धिर्विद्येति भण्यते ॥ ३३ ॥
देह म्हणजे मी, अशी जी बुद्धी तिचेच अविद्या हे नाव आहे आणि मी देह नाही, मी चेतन आत्मा आहे, अशा बुद्धीला विद्या असे म्हटले जाते. (३३)

अविद्या संसृतेर्हेतुः विद्या तस्या निवर्तिका ।
तस्माद्यत्‍नः सदा कार्यो विद्याभ्यासे मुमुक्षुभिः ।
कामक्रोधादयस्तत्र शत्रवः शत्रुसूदन ॥ ३४ ॥
जन्ममरणरूपी संसाराचे कारण अविद्या आहे तिला निवृत्त करणारी विद्या आहे. म्हणून मोक्षाची इच्छा करणाऱ्या माणसांनी नेहमी विद्येच्या प्राप्तीसाठी प्रयत्‍न करावयास हवा. त्या प्रयत्नामध्ये, हे शत्रुघातका, काम, क्रोध इत्यादी विकार हे विघ्न आणणारे शत्रू आहेत. ( ३४)

तत्रापि क्रोध एवालं मोक्षविघ्नाय सर्वदा ।
येनाविष्टः पुमान्हन्ति पितृभ्रातृसुहृत्सखीन् ॥ ३५ ॥
त्यांमध्येसुद्धा क्रोध हा एकटाच मोक्षामध्ये विघ्न आणण्यास पुरेसा आहे. क्रोधाने झपाटलेला पुरुष हा माता, पिता, सुहृद व बांधव यांचासुद्धा वध करतो. ( ३५)

क्रोधमूलो मनस्तापः क्रोधः संसारबन्धनम् ।
धर्मक्षयकरः क्रोधस्तस्मात्क्रोधं परित्यज ॥ ३६ ॥
मनाच्या संतापाचे मूळ कारण क्रोधच आहे. क्रोध हाच माणसाला संसारात बद्ध करणारा आहे. क्रोध धर्माचा क्षय करणारा आहे. म्हणून हे लक्ष्मणा, तू क्रोध टाकून दे. ( ३६)

क्रोध एष महान् शत्रुस्तृष्णा वैतरणी नदी ।
सन्त्तोषो नन्दनवनं शान्तिरेव हि कामधुक् ॥ ३७ ॥
क्रोध हा एक महान शत्रू आहे. तृष्णा ही वैतरणी नदी आहे. संतोष हा नंदनवन आहे आणि शांती हीच कामधेनू आहे. ( ३७)

तस्माच्छान्तिं भजस्वाद्य शत्रुरेव भवेन्न ते ।
देहेन्द्रियमनःप्राणबुद्ध्यादिभ्यो विलक्षणः ॥ ३८ ॥
आत्मा शुद्धः स्वयंज्योतिरविकारी निराकृतिः ।
यावद्देहेन्द्रियप्राणैर्भिन्नत्वं नात्मनो विदुः ॥ ३९ ॥
तावत्संसारदुःखौघैः पीड्यन्ते मृत्युसंयुताः ।
तस्मात्त्वं सर्वदा भिन्नमात्मानं हृदि भावय ॥ ४० ॥
बुद्ध्यादिभ्यो बहिः सर्वमनुवर्तस्व मा खिदः ।
भुञ्जन्प्रारब्धमखिलं सुखं वा दुःखमेव वा ॥ ४१ ॥
म्हणून शांती धारण कर. त्यामुळे क्रोधरूपी शत्रूचा प्रभाव तुझ्यावर पडणार नाही. आत्मा हा देह, इंद्रिये, मन, प्राण, बुद्धी इत्यादींपेक्षा संपूर्णपणे वेगळा आहे. तो शुद्ध, स्वयंप्रकाशी, विकाररहित आणि आकाररहित आहे. जोपर्यंत देह, इंद्रिये, प्राण यांच्यापेक्षा आत्म्याचे भिन्नत्व माणसे जाणत नाहीत, तो पर्यंत मृत्युपाशाने बद्ध असणारी ती माणसे संसारातील दुःखसमूहांनी पीदित होतात. म्हणून हे लक्ष्मणा, आत्मा हा देह इत्यादींपेक्षा भिन्न आहे, ही गोष्ट तू नेहमी मनात बाळगून ठेव. आत्मा हा बुद्धी इत्यादींच्या पलीकडचा वेगळा आहे, हे जाणून तू सर्व बाह्य व्यवहार कर. सर्व प्रारब्ध सुखरूप किंवा दुःखरूप असेल तसे भोगत तू मनामध्ये खेद करू नकोस. ( ३८-४१)

प्रवाहपतितं कार्यं कुर्वन्नपि न लिप्यसे ।
बाह्ये सर्वत्र कर्तृत्वमावहन्नपि राघव ॥ ४२ ॥
हे रघुकुलोत्पन्न लक्ष्मणा, बाह्य जगात सर्वत्र इंद्रिये इत्यादींचे द्वारा कर्तृत्व प्रकट करीत, प्रारब्धाच्या प्रवाहात उपस्थित झालेले कार्य करतानासुद्धा तू कर्मबंधनात पडणार नाहीस. ( ४२)

अन्तःशुद्धस्वभावस्त्वं लिप्यसे न च कर्मभिः ।
एतन्मयोदितं कृत्स्नं हृदि भावय सर्वदा ॥ ४३ ॥
आत राग, द्वेषरहित शुद्ध स्वभाव असणारा तू कर्मांनी लिप्त होणार नाहीस. हे जे मी आत्ता तुला सांगितले आहे, त्या सर्वांचा तू मनामध्ये नेहमी विचार कर. ( ४३)

संसारदुःखैरखिलैर्बाध्यसे न कदाचन ।
त्वमप्यम्ब ममाऽऽदिष्टं हृदि भावय नित्यदा ॥ ४४ ॥
हे लक्ष्मणा, मग तू संसारातील सर्व दुःखानी कधीच बाधित होणार नाहीस. हे आई, तूसुद्धा मी सांगितलेल्या गोष्टींवर नेहमी मनात विचार कर. ( ४४)

समागमं प्रतीक्षस्व न दुःखैः पीड्यसे चिरम् ।
न सदैकत्र संवासः कर्ममार्गानुवर्तिनाम् ॥ ४५ ॥
यथा प्रवाहपतितप्लवानां सरितां तथा ।
चतुर्दशसमासङ्‌ख्या क्षणार्धं इव जायते ॥ ४६ ॥
नंतर हे माते, माझ्याशी पुनः होणाऱ्या भेटीची तू वाट पाहा. तुला फार काळ दुःख सोसावे लागणार नाही. ज्या प्रमाणे नद्यांच्या प्रवाहांत पडलेल्या नावांचे नेहमी एकत्र असणे संभवत नाही, त्याप्रमाणे प्रारब्धकर्मगतीमुळे सर्व जीवांचे नेहमी एकत्रच राहणे शक्य नसते. चौदा वर्षांचा अवधी अर्ध्या क्षणाप्रमाणे निघून जाईल. (४५-४६)

अनुमन्यस्व मामम्ब दुःखं सन्त्यज्य दूरतः ।
एवं चेत्सुखसंवासो भविष्यति वने मम ॥ ४७ ॥
म्हणून हे आई, दुःखाला दूर ठेवून तू माझ्या वनगमनाला अनुमती दे. असे जर तू करशील तर मी वनामध्ये सुखाने राहू शकेन." (४७)

इत्युक्त्वा दण्डवन्मातुः पादयोरपतत्चिरम् ।
उत्थाप्याङ्‌के समावेश्य आशीर्भिरभ्यनन्दयत् ॥ ४८
असे बोलून श्रीरामचंद्र पुष्कळ वेळपर्यंत मातेच्या चरणांवर पडून राहिले. त्यानंतर त्यांना उठवून आणि मांडीवर बसवून व आशीर्वाद देऊन, कौसल्येने त्यांचे अभिनंदन केले. (४८)

सर्वे देवाः सगन्धर्वा ब्रह्मविष्णुशिवादयः ।
रक्षन्तु त्वां सदा यान्तं तिष्ठन्तं निद्रयायुतम् ॥ ४९ ॥
कौसल्या म्हणाली "हे रामा, तू हिंडत असताना, बसला असताना किंवा झोपी गेला असताना ब्रह्मदेव, विष्णू, शिव इत्यादी, तसेच गंधर्वासहित सर्व देव तुझे सदा रक्षण करोत." (४९)

इति प्रस्थापयामास समालिङ्‌ग्य पुनः पुनः ।
लक्ष्मणोऽपि तदा रामं नत्वा हर्षाश्रुगद्‍गदः ॥ ५० ॥
आह राम ममान्तःस्थः संशयोऽयं त्वया हृतः ।
यास्यामि पृष्ठतो राम सेवां कर्तुं तदादिश ॥ ५१ ॥
अशा प्रकारे रामांना पुनः पुनः आलिंगन देऊन मातेने त्यांना निरोप दिला. त्या वेळी आनंदाश्रूंनी गदगद झालेल्या लक्ष्मणानेसुद्धा श्रीरामांना वंदन केले आणि म्हटले, '"दादा, माझ्या अंतःकरणातील संशय तुम्ही दूर केला. आता तुमची सेवा करण्यासाठी मी तुमच्या मागोमाग येईन. मला तशी अनुज्ञा द्या. ( ५०-५१)

अनुगृह्णीष्व मां राम नोचेत्प्राणांस्त्यजाम्यहम् ।
तथेतिराघवोऽप्याह लक्ष्मणं याहि माचिरम् ॥ ५२ ॥
दादा, माझ्यावर कृपा करा. तसे न झाल्यास मी प्राणत्याग करीन." तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, "ठीक आहे. चल, उशीर करू नकोस." (५२)

प्रतस्थे तां समाधातुं गतः सीतापतिर्विभुः ।
आगतं पतिमालोक्य सीता सुस्मितभाषिणी ॥ ५३ ॥
स्वर्णपात्रस्थसलिलैः पादौ प्रक्षाल्य भक्तितः ।
पप्रच्छ पतिमालोक्य देव किं सेनया विना ॥ ५४ ॥
आगतोऽसि गतः कुत्र श्वेतच्छत्रं च ते कुतः ।
वादित्राणि न वान्द्यते किरीटादिविवर्जितः ॥ ५५ ॥
सामन्तराजसहितः सम्भ्रमान्नागतोऽसि किम् ।
इति स्म सीतया पृष्टो रामः सस्मितमब्रवीत् ॥ ५६ ॥
त्यानंतर सीतापती भगवान श्रीराम सीतेला समजावण्यासाठी निघाले आणि आपल्या महालात पोचले. तेव्हा सुंदर स्मित करीत बोलणाऱ्या सीतेने आपले पती आलेले पाहून, एका सुवर्ण-पात्रामध्ये पाणी घेऊन रामांचे चरण भक्तिपूर्वक धुतले आणि पतीकडे पाहून तिने विचारले "हे देवा, या वेळी तुम्ही सेनेशिवाय कसे आला आहात ? प्रातःकाळी तुम्ही कुठे गेला होता ? तुमचे श्वेत छत्र कुठे आहे ? वाद्ये का वाजविली जात नाहीत ? आणि किरीट इत्यादी राजोचित भूषणांशिवाय तुम्ही कसे आला आहात ? मंत्री व सामंत राजे यांच्यासह मोढ्या थाटामाटाने का आला नाहीत ?" अशा प्रकारे सीतेने प्रश्न केल्यावर श्रीरामचंद्रांनी स्मित हास्य करून म्हटले. (५३-५६)

राज्ञा मे दण्डकारण्ये राज्यं दत्तं शुभेऽखिलम् ।
अतस्तत्पालनार्थाय शीघ्रं यास्यामि भामिनि ॥ ५७ ॥
"हे प्रिये, महाराजांनी मला दंडकारण्याचे संपूर्ण राज्य दिले आहे. म्हणून हे भामिनी, त्यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी मी त्वरितच तेथे जाणार आहे. ( ५७)

अद्यैव यास्यामि वनं त्वं तु श्वश्रूसमीपगा ।
शुश्रूषां कुरु मे मातुर्न मिथ्यावादिनो वयम् ॥ ५८ ॥
मी आजच वनात जाईन. तू मात्र आपल्या सासूचे जवळ राहून तिची सेवा-शुश्रूषा करीत राहा. मी खोटे बोलत नाही." ( ५८)

इति ब्रुवन्तं श्रीरामं सीता भीताब्रवीद्वचः ।
किमर्थं वनराज्यं ते पित्रा दत्तं महात्मना ॥ ५९ ॥
श्रीरामचंद्रांनी असे म्हटल्यावर भयभीत होऊन सीता त्यांना म्हणाली, "तुमच्या महात्म्या पित्यांनी तुम्हांला वनाचे राज्य का बरे दिले आहे?" ( ५९)

तामाह रामः कैकेय्यै राजा प्रीतो वरं ददौ ।
भरताय ददौ राज्यं वनवासं ममानघे ॥ ६० ॥
तेव्हा रामचंद्रांनी तिला सांगितले, "हे पुण्यशीले, प्रसन्न झालेल्या राजांनी कैकेयीला वर दिला आहे. त्यानुसार त्यांनी भरताला राज्य दिले आणि मला वनवास दिला. ( ६०)

चतुर्दश समास्तत्र वासो मे किल याचितः ।
तया देव्या ददौ राजा सत्यवादी दयापरः ॥ ६१ ॥
त्या कैकेयी मातेने माझ्यासाठी, चौदा वर्षांचा वनवास मागितला. तेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या पण सत्यवादी राजांना तो मान्य करावा लागला. ( ६१)

अतः शीघ्रं गमिष्यामि मा विघ्नं कुरु भामिनि ।
श्रुत्वा तद्‍रामवचनं जानकी प्रीतिसंयुता ॥ ६२ ॥
अहमग्रे गमिष्यामि वनं पश्चात्त्वमेष्यसि ।
इत्याह मां विना गन्तुं तव राघव नोचितम् ॥ ६३ ॥
म्हणून हे भामिनी, मी पित्याची प्रतिज्ञा खरी करण्यासाठी लगेच वनात जाणार आहे. त्या बाबतीत तू विघ्न आणू नकोस." ते श्रीरामांचे वचन ऐकून प्रसन्नतेने सीता त्यांना म्हणाली, "(जर तुम्ही जाणारच असाल तर) आधी मी वनात जाईन, नंतर तुम्ही यावे. हे राघवा, मला इथे सोडून तुम्ही जावे हे योग्य नव्हे." ( ६२-६३)

तामाह राघवः प्रीतः स्वप्रियां प्रियवादिनीम् ।
कथं वनं त्वां नेष्येऽहं बहुव्याघ्रमृगाकुलम् ॥ ६४ ॥
तेव्हा आनंदित झालेले रघुनाथ गोड बोलणाऱ्या आपल्या प्रिय जानकीला सांगू लागले, "पुष्कळ व्याघ्र इत्यादी वन्य पशूंनी भरलेल्या वनात मी तुला करो बरे नेऊ ? ( ६४)

राक्षसा घोररूपाश्च सन्ति मानुषभोजिनः ।
सिंहव्याघ्रवराहाश्च सञ्चरन्ति समन्ततः ॥ ६५ ॥
तेथे माणसाला खाणारे, भयंकर स्वरूप असणारे असे राक्षस राहतात आणि सिंह, वाघ, वराह इत्यादी हिंस्त्र पशू त्या वनात सगळीकडे फिरत असतात. ( ६५)

कट‍्वम्लफलमूलानि भोजनार्थं सुमध्यमे ।
अपूपानपि व्यञ्जनानि विद्यन्ते न कदाचन ॥ ६६ ॥
हे प्रिये, त्या वनात भोजनासाठी कडू व आंबट अशी फळे आणि कंदमुळे मिळतात. घाऱ्या इत्यादी कोणतेही गोड पदार्थ आणि चटणी इत्यादी तोंडी लावणी तेथे कधीही मिळत नाहीत. ( ६६)

काले काले फलं वापि विद्यते कुत्र सुन्दरि ।
मार्गो न दृश्यते क्वापि शर्कराकण्टकान्वितः ॥६७
हे सुंदरी, ती फळेसुद्धा कधीतरी, कुठेतरी मिळतात. तसेच त्या वनात खडे, काटे व गवत यांनी झाकून गेल्यामुळे वाटसुद्धा अनेकदा दिसत नाही. ( ६७)

गुहागह्वरसम्बाधं झिल्लीदंशादिभिर्युतम् ।
एवं बहुविधं दोषं वनं दण्डकसज्ञितम् ॥ ६८ ॥
ते वन अनेक गुहा आणि बिळे यांनी भरलेले तसेच रातकिडे, चावणारे कीटक इत्यादींनी युक्त आहे. असे हे दंडकारण्य अनेक प्रकारच्या अडचणींनी भरलेले आहे. ( ६८)

पादचारेण गन्तव्यं शीतवातातपादिमत् ।
राक्षसादीन्वने दृष्ट्‍वा जीवितं हास्यसेऽचिरात् ॥६९
ते वन थंडी, वारा आणि ऊन यांनी युक्त आहे. तेथे पायी चालावे लागते. त्या वनात भयंकर राक्षस इत्यादींना पाहून तू त्वरित प्राण गमावून बसशील. ( ६९)

तस्माद्‌भद्रे गृहे तिष्ठ शीघ्रं द्रक्ष्यसि मां पुनः ।
रामस्य वचनं श्रुत्वा सीता दुःखसमन्विता ॥ ७० ॥
प्रत्युवाच स्फुरद्वक्त्रा किञ्चित्कोपसमन्विता ।
कथं मामिच्छसे त्यक्तुं धर्मपत्‍नीं पतिव्रताम् ॥ ७१ ॥
त्वदनन्यामदोषां मां धर्मज्ञोऽसि दयापरः ।
त्वत्समीपे स्थितां राम को वा मां धर्षयेद्वने ॥ ७२ ॥
म्हणून हे कल्याणी, तू घरातच राहा. तू मला पुनः लौकरच भेटशील." श्रीरामांचे हे वचन ऐकून दुःखी झालेली सीता थोडीशी रागावली आणि कंप पावणाऱ्या ओठांनी म्हणाली, "तुम्ही धर्मज्ञ आणि दयाळू आहात. मी तुमची पतिव्रता धर्मपत्नी आहे. मला घरी सोडून जाण्याची इच्छा तुम्हांला कशी बरे झाली ? आपल्या अनन्यभक्त व निर्दोष असलेल्या मला कसे सोडता येईल ? हे श्रीरामा, वनामध्ये मी तुमच्याजवळ राहात असताना मला कोण त्रास देईल ? ( ७०-७२)

फलमूलादिकं यद्यत्तव भुक्तावशेषितम् ।
तदेवामृततुल्यं मे तेन तुष्टा रमाम्यहम् ॥ ७३ ॥
वनात जे काही फळ-मूळ इत्यादी तुम्ही खाऊन उरेल तेच मला अमृताप्रमाणे गोड वाटेल. त्यानेच संतुष्ट होऊन मी तुमच्याबरोबर आनंदाने रममाण होईन. ( ७३)

त्वया सह चरन्त्या मे कुशाः काशाश्च कण्टकाः ।
पुष्पास्तरणतुल्या मे भविष्यन्ति न संशयः ॥ ७४ ॥
अहं त्वां क्लेशये नैव भवेयं कार्यसाधिनी ।
बाल्ये मां वीक्ष्य कश्चिद्वै ज्योतिःशास्त्रविशारदः ॥ ७५ ॥
तुमच्याबरोबर हिंडत असताना कुश, काश, काटे इत्यादी सर्व काही मला फुलांनी आच्छदलेल्या गालिच्याप्रमाणे होईल, यात संशय नाही. ( ७४)

प्राह ते विपिने वासः पत्या सह भविष्यति ।
सत्यवादी द्विजो भूयाद्‌गमिष्यामि त्वया सह ॥ ७६ ॥
वनात मी तुम्हांला मुळीच त्रास देणार नाही. उलट तुमच्या कार्यात मी सहायक होईन. लहानपणी मला पाहून एका ज्योतिष शास्त्रज्ञाने मला सांगितले होते की, तू आपल्या पतीसह काही काळ अरण्यात राहशील. त्या ब्राह्मणाचे वाक्य खरे होऊ दे. त्यासाठी मी तुमच्याबरोबर वनात येणार. (७५-७६)

अन्यत्किञ्चित्प्रवक्ष्यामि श्रुत्वा मां नय काननम् ।
रामायणानि बहुशः श्रुतानि बहुभिर्द्विजैः ॥ ७७ ॥
मी आणखी एक गोष्ट तुम्हांला सांगते. ती ऐकून तुम्ही मला वनात घेऊन जा. अनेक ब्राह्मणांच्या मुखांतून तुम्ही पुष्कळशी रामायणे ऐकलेली आहेत. ( ७७)

सीतां विना वनं रामो गतः किं कुत्रचिद्वद ।
अतस्त्वया गमिष्यामि सर्वथा त्वत्सहायिनी ॥ ७८ ॥
त्यामध्ये सीतेशिवाय राम वनात गेला असे कुठेतरी सांगितले आहे का, ते तुम्ही मला सांगा. म्हणून तुम्हांला साहाय्य करणारी मी तुमच्याबरोबर वनात येणारच. ( ७८)

यदिगच्छसि मां त्यक्त्वा प्राणांस्त्यक्ष्यामि तेऽग्रतः ।
इति तं निश्चयं ज्ञात्वा सीताया रघुनन्दनः ॥ ७९ ॥
अब्रवीद्देवि गच्छ त्वं वनं शीघ्रं मया सह ।
अरुन्धत्यै प्रयच्छाशु हारानाभरणानि च ॥ ८० ॥
जर तुम्ही माझा त्याग करून जाल तर मी तुमच्या समोरच माझे प्राण सोडीन." अशा प्रकारे सीतेचा तो दृढ निश्चय पाहिल्यावर, रघुनाथ तिला म्हणाले, "हे देवी, तू माझ्या बरोबर झटपट वनात चल. तू ताबडतोब आपले हार आणि अलंकार अरुंधती या वसिष्ठांच्या पत्नीला दे. ( ७९-८०)

ब्राह्मणेभ्यो धनं सर्वं दत्त्वा गच्छामहे वनम् ।
इत्युक्त्वा लक्ष्मणेनाशु द्विजानाहूय भक्तितः ॥ ८१ ॥
आपले संपूर्ण धन ब्राह्मणांना देऊन आपण वनात जाऊ." असे सांगून भगवान श्रीरामांनी लक्ष्मणाकडून लगेच ब्राह्मणांना भक्तिपूर्वक बोलावून घेतले. ( ८१)

ददौ गवां वृन्दशतं धनानि
     वस्त्राणि दिव्यानि विभूषणानि ।
कुटुम्बवद्‌भ्यः श्रुतशीलवद्‌भ्यो
     मुदा द्विजेभ्यो रघुवंशकेतुः ॥ ८२ ॥
रघुकुलश्रेष्ठ रामांनी विद्वान आणि शीलसंपन्न अशा कुटुंबवत्सल ब्राह्मणांना शेकडो गाईंचे कळप, पुष्कळ द्रव्य, दिव्य वस्त्रे आणि दिव्य अलंकार आनंदाने दिले. (८२)

अरुन्धत्यै ददौ सीता मुख्यान्याभरणानि च ।
रामो मातुः सेवकेभ्यो ददौ धनमनेकधा ॥ ८३ ॥
आपले मुख्य मुख्य अलंकार सीतेने अरुंधतीला दिले. तसेच श्रीरामांनी आपल्या आईच्या सेवकांना नाना प्रकारचे धन दिले. (८३)

स्वकान्तःपुरवासिभ्यः सेवकेभ्यस्तथैव च ।
पौरजानपदेभ्यश्च ब्राह्मणेभ्यः सहस्रशः ॥ ८४ ॥
तसेच स्वतःच्या अंतःपुरातील सेवक, हजारो नगरवासीजन, ग्रामीण भागांतील लोक आणि ब्राह्मण यांना श्रीरामांनी नाना प्रकारचे दान दिले. (८४)

लक्ष्मणोऽपि सुमित्रां तु कौसल्यायै समर्पयत् ।
धनुष्पाणिः समागत्य रामस्याग्रे व्यवस्थितः ॥ ८५ ॥
रामः सीता लक्ष्मणश्च जग्मुः सर्वे नृपालयम् ॥ ८६ ॥
लक्ष्मणानेसुद्धा सुमित्रेला कौसल्येकडे सोपविले आणि हातात धनुष्य घेऊन तो श्रीरामांपुढे येऊन उभा राहिला. त्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण हे सगळे राजा दशरथांच्या महालाकडे जाण्यास निघाले. (८५-८६)

श्रीरामः सह सीतया नृपपथे
     गच्छन् शनैः सानुजः
पौरान् जानपदान्कुतूहलदृशः
     सानन्दमुद्वीक्षयन् ।
श्यामः कामसहस्रसुन्दरवपुः
     कान्त्या दिशो भासयन् ।
पादन्यास पवित्रिताखिलजगत्
     प्रापालयं तत्पितुः ॥ ८७
हजारो कामदेवाप्रमाणे सुंदर शरीर असणारे व श्याम वर्णाचे भगवान श्रीराम सीतेसह आणि लक्ष्मण या धाकट्या भावासह, आपल्या कांतीने दशदिशांना प्रकाशित करीत राजमार्गावरून सावकाश चालू लागले. त्या वेळी वाटेत कुतूहलाने नगरवासी आणि ग्रामवासी श्रीरामप्रभू सीता व लक्ष्मण याचेकडे पाहात होते आणि श्रीराम आपल्या आनंदमय दृष्टीने त्यांच्याकडे पाहात व आपल्या चरणांच्या स्पर्शाने संपूर्ण जगाला पवित्र करीत आपल्या पित्याच्या महालात पोहोचले. (८७)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
अयोध्याकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥
अयोध्याकाण्डातील चवथा सर्गः समाप्त ॥ ४ ॥


GO TOP