॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय त्रेपनावा ॥
महिरावणाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

हनुमंत स्वतःची चिंता व्यक्त करुन मकरध्वजाचे साहाय्य मागतो :

ऐकतां मगरीचें वचन । झालें हनुमंता समाधान ।
देवोनि पुत्रासीं आलिंगन । निजविवंचन सांगत ॥ १ ॥
आमुचा स्वामी श्रीरघुनाथ । निद्राकांत कटकांत ।
वानर मेळिकारी निद्रिस्थ । राक्षसीं मत्त पैं केले ॥ २ ॥
मोहनास्त्र सावधानता । घालोनियां तत्वतां ।
मोहन केलें समस्तां । सुषुप्ति अवस्था लागली ॥ ३ ॥
कपतयोद्धे राक्षस । संमुख न येतीच संग्रामास ।
चोरोनियां श्रीरामास । पाताळास आणिलें ॥ ४ ॥
पृथ्वी पाहतां समस्ता । न सांपडती सर्वथा ।
पाताळासी आलों आतां । श्रीरघुनाथा पहावया ॥ ५ ॥
तंव येथें शुद्धि लागली । तुम्हांसी भेटी झाली ।
श्रीरामप्राप्तीची वहिली । बुद्धि भली तुम्ही सांगा ॥ ६ ॥
तुमचे सोयरिकीचें सुख । आम्हांसी हेंचि अलोलिक ।
भेटवावा रघुकुळटिळक । आवश्यक तुम्ही आजी ॥ ७ ॥
तुम्हांसारिखे साधुसंत । पुत्रधर्म आचरत ।
ऋणत्रयापासून मुक्त । पितर करित तें ऐका ॥ ८ ॥
देवपितरमनुष्यऋण । तिहीं गुंतले प्राणिगण ।
ऐक याचें लक्षण । विवंचून सांगेन ॥ ९ ॥
देवऋणें यागादिकीं । पितर मुक्त तिळोदकीं ।
मनुष्याचें ब्रह्मस्व कीं । फेडितां सुखीं स्वयें होती ॥ १० ॥
मज भेटविल्या रघुनाथ । ऋणत्रयासी तुम्ही निर्मुक्त ।
विभागरचना यथार्थ । ऐक सुनिश्चित सांगेन ॥ ११ ॥
देवांचा देव रघुनाथ । तो भेटला यथार्थ ।
देवऋणें नित्य निर्मुक्त । वेदशास्त्रार्थसंमत ॥ १२ ॥
मनुष्यनाट्यविडंबनें । रुप धरिलें रघुनंदनें ।
मनुष्य ऋणें मुक्त स्वयें होणें । जाण दर्शन तयाचेनि ॥ १३ ॥
सकळांचा जनक जाण । स्वयें श्रेष्ठ चतुरानन ।
त्याचाही जनक आपण । रघुनंदन साचार ॥ १४ ॥
त्या श्रीरामाची होता भेटी । पूर्वज कोट्यनुकोटी ।
उद्धरती उठाउठीं । श्रीराम दृष्टीं देखिलिया ॥ १५ ॥
ऋणत्रय बापुडें तें किती । ब्रह्मांडकोटी उद्धरती ।
कर्माकर्माची होय शांती । श्रीराममूर्ती देखिल्या ॥ १६ ॥
ऐसें जाणोनि निश्चितीं । राम भेटवावा मजप्रती ।
तेणें आम्हां तुम्हां अति प्रीती । कल्पांतींही खंडेना ॥ १७ ॥

मकरध्वजाला स्वामिद्रोहाची चिंता :

ऐकोनियां कपिवचन । मकरध्वज बोले संकोचून ।
सांगितलें विवंचन । धर्म जाण तो होय ॥ १८ ॥
परी एकी संकोचता । स्वधर्माची हनुमंता ।
तूं माझा निजपिता । म्हणोनि आतां सांगेन ॥ १९ ॥
राक्षसांचें वेतन । खावोनियां जाण ।
देह पोशिला आपण । त्यांचें हनन केंवी सांगू ॥ २० ॥
तूं माझा निजपिता । म्हनोनि पुसतसें ताता ।
जेणें चुके अधःपाता । त्या अर्था सांगावें ॥ २१ ॥
स्वामिद्रोह न लागे अंगीं । पित्रवज्ञा न घडे जगीं ।
ऐसें विचारोनि वेगीं । कार्यालागीं प्रवर्तावे ॥ २२ ॥
ऐकोनि पुत्राचें वचन । संतोषला कपिनंदन ।
पुत्राचें स्वधर्मलक्षण । स्वयें आपण करिता झाला ॥ २३ ॥
श्रीराम आहे येथें । ऐसें कळलें निश्चितें ।
आतां काय पुसों यातें । बापुडें अनाथा कां गोवूं ॥ २४ ॥
ऐसें विचारोनि कपीद्र । वेगें स्मरला श्रीरामचंद्र ।
बुद्धि स्फुरली सत्वर झाला अगोचर हनुमंत ॥ २५ ॥

हनुमंत देवालयांतील शक्तीचे स्तवन करितो :

अदृश्य होवोनि हनुमंत । गेला देवालयाआंत ।
शक्ति देखिली अद्‍भुत । सुपूजित दिव्योपचारें ॥ २६ ॥
कर जोडोनि कपिनंदन । आदरिलें शक्तिस्तवन ।
तुवां कृपा पूर्वी करुन । सुद्धि आपण सांगितली ॥ २७ ॥
यक्षिणीवटातळीं जाण । गीधद्वारा आपण ।
सुरस वाचा बोलोन । कपिनंदन प्रबोधिला ॥ २८ ॥
पावावया रघुनंदन । सांगितलें विवंचन ।
वंदोनियां तें वचन । केलें आगमन तुजपासीं ॥ २९ ॥
प्रसन्न होवोनि तत्वतां । भेटवावें रघुनाथा ।
म्हणोनि चरणांवरी माथा । ठेवित तत्वतां हनुमंत ॥ ३० ॥

अंबिकेने स्वतःच्या जागी हनुमंताला बसवून गमन केले :

ऐकोनियां कपिस्तवना । अंबा संतोषली जाणा ।
सांडोनियां निजासना । कपिनंदना ठाव दिधला ॥ ३१ ॥
त्यासी न देता अभ्युत्थान । क्षणें उठवील दैवतपण ।
सुरासुरां नागवे जाण । यासी कोणें बोलावें ॥ ३२ ॥
श्रीरामाचा निजभक्त । स्वामिकार्या त्वरित ।
आला असे हनुमंत । याचा कार्यार्थ साधावा ॥ ३३ ॥
सकळ वीर राक्षसगण । क्षणें निर्दाळील जाण ।
मारोनियां अहिरावण । रघुनंदन नेईल ॥ ३४ ॥
एवढा होईल गजर । म्हणोनियां तो कपींद्र ।
पूजिती झाली खेचर । अतिसत्वर जगदंबा ॥ ३५ ॥
धर्ममर्यादा हेचि देख । घरा आलिया हरिसेवक ।
पूजावे जी आवश्यक । तेही देख साधलें ॥ ३६ ॥
ऐसें विचारोनि चित्तीं । गेली जगदंबा परती ।
जाणोनियां मनोवृत्ति । बैसे मारुति आसनीं ॥ ३७ ॥

मध्यरात्री पूजाविधी व प्रसाद अर्पण :

मध्यरातीची वेळ । झाला पूर्ण असुराकाळ ।
पूजोपचार सकळ । घेवोनि तत्काळ भीतरीं आले ॥ ३८ ॥
मग बरवी पूजा । समर्पिली अति वोजा ।
नैवेद्य नानापरींच्या खाजा । राक्षसराजा आणित ॥ ३९ ॥
आश्चर्य झालें वाडेंकोडें । हात दावित मुखाकडे ।
तंव पसरलीं जाभाडें । अन्न निवाडें खावया ॥ ४० ॥

अंबिकेचे प्रसादग्रहण पाहून राक्षसांना आश्चर्य :

अहिरावण म्हणे नवल । अंबा पसरिते मुखकमळ ।
ताटें रिचवा सकळ । प्रसन्नकाळ आजींचा ॥ ४१ ॥
पसरोनियां आपलें मुख । बोणें घेत असे देख ।
शीघ्र आणा अन्न चोख । पात्रें असंख्य राहिली ॥ ४२ ॥
पूजा करूं आजिवरी । मुख कधींच न पसरी ।
आजि दिसे नवलपरी । कामेश्वरी प्रसन्न ॥ ४३ ॥
वडे मांडे फुगी पुरी । चोखट मैदाची तेलवरी ।
साखरें घोळलिया घारी । भात खिरी अति गोड ॥ ४४ ॥
साखरमांडे कोरवडे । आंबवडे चिंचवडे ।
दहिंवडे दूधमांडे । वाडेंकोडें क्षीरधारी ॥ ४५ ॥
भात सोज्वळ जिरेसाळिया । जेंवी मोगरियाच्या कळिया ।
वरी दाळी मुगाचिया । घातलिया पद्धती त्यावरी ॥ ४६ ॥
कढी ताकाची चोखट । वेळामिरे समसकत ।
फुरेके घेतां पैं उद्‍भट । ब्रह्मांडकोटी गर्जत ॥ ४७ ॥
क्षीर चोखट वळवटाची । वरी पंचधार साखरेची ।
लोणी तावून अति सुरुची । वाटी तुपाची भरियेली ॥ ४८ ॥
वेळामिरें कापूर । शुंठीआदि सकळोपचार ।
करोनियां अति अरुवार । दहींभात सत्वर आणिला ॥ ४९ ॥
ऐशा ताटांचिया हारी । मुखीं घालितां कोटीवरी ।
तृप्त नव्हे ती खेचरी । विचार करी निजचित्तें ॥ ५० ॥
जितुकें रांधिलेंसे अन्न । तितुकेंही वेंचिलें संपूर्ण ।
मग मांडिले फळभोजन । नाना जातिप्रकार ॥ ५१ ॥
तेंही सरलें पैं देख । मग आणिलें आणिक ।
पुढें ठेवितां एकाएक । गटका देख पैं केला ॥ ५२ ॥
रोटी पोळी गुळवरी । दिवसीं मुटक्लें भारी ।
न लागतां दशनांतरी । गतका करी जगदंबा ॥ ५३ ॥
बहुतां दिवसांची भुकेली । रामागमनें सुखी झाली ।
अन्न स्वीकारुं लागली । तृप्ति वहिली पैं नव्हे ॥ ५४ ॥
हनुमंताचा विचार पूर्ण । राक्षसां वोळला रघुनंदन ।
द्यावयासी मोक्षदान । येथें गमन पैं केलें ॥ ५५ ॥
श्रीरामाचा मी किंकर । मोक्ष देईल निर्धार ।
मागें राहतां अणुमात्र । वासना सत्वर ओढील ॥ ५६ ॥
राक्षसांचे सर्वस्वें देखा । नार्पितां रघुकुळटिळका ।
न पावती मोक्षसुखा । म्हणोनि देखा गटकावी ॥ ५७ ॥
तंव बोलती रक्षोगण । अहिरावणा परिस वचन ।
अंबेसीं तृप्तीलागीं जाण । रघुनंदन आणावा ॥ ५८ ॥

राक्षस श्रीरामांना अभ्यंगस्नान घालून देवीपुढे आणतात :

ऐकोनि राक्षसांच्या बोला । अहिरावण संतोषला ।
मान सकळां दिधला । अतिप्रीतीकरोनियां ॥ ५९ ॥
ज्यालागीं कष्टलों बहुत । तो साधला कार्यार्थ ।
वेगीं आणोनियां रघुनाथ । करुं तृप्त जगदंबा ॥ ६० ॥
म्हणोनि आज्ञापिले सेवक । वेगीं आणा रघुकुळटिळक ।
स्नान घालोनि विधिपुर्वक। सत्वर देख येथे पैं ॥ ६१ ॥
वेगीं लाहोनि शासन । आले कारागृहा ठाकून ।
जेथे होता रघुनंदन । दूत जाण तेथें आले ॥ ६२ ॥
करवून अभ्यंगस्नानें । लाविले हळदीचें उटणें ।
घातलीं करवीरसुमनें । कंठाभरणे शोभती ॥ ६३ ॥
पाशबंधनी बंधु दोघे । बाहेर काढिले वेगें ।
लागलीं वाजंत्री अनेगें । मिरवितां जगें देखिजे ॥ ६४ ॥
हाटवटींचे लोक । नरनारी असंख्य ।
देखोनि रघुकुळटिळक । अलोलिक मानिती ॥ ६५ ॥
वृत्ति जडली रघुवीरीं । प्राशन केला नेत्रद्वारीं ।
नेवोनियां अभ्यंतरी । नरनारी भोगिती ॥ ६६ ॥
बोलती नगरनागरिक । अवलोकितां रघुकुळटिळक ।
फिकें होत समाधिसुख । त्यासीं देख घात करिती ॥ ६७ ॥
मदनमोहन श्रीराम । त्यासी मारुं नेती अधम ।
कृपा करो पुरुषोत्तम । होवो भस्म राक्षसां ॥ ६८ ॥
यांचा करुं जातां घात । पुरला राक्षसांचा अंत ।
सहकुळ मरतील निश्चित । भविष्य वदत वाग्देवी ॥ ६९ ॥
सत्य जनी जनार्दन । वृथा नव्हे त्याचें वचन ।
मांडले राक्षसांचे निधन । कपिनंदन मारील ॥ ७० ॥
बाप कृपाळु रघुनंदन । राक्षसां वोळला संपूर्ण ।
वैरिया द्यावया मोक्षदान । स्वयें अपमान साहतसे ॥ ७१ ॥
करितां वाद्यांचा गजर । देवीसंमुख रघुवीर ।
आणविला वेगवत्तर । देखतां कपींद्र विस्मित ॥ ७२ ॥
कोण कृपेचें विंदान । मूढ अविवेक राक्षसगण ।
त्यांसी द्यावया मोक्षदान । एवढा अपमान साहतसे ॥ ७३ ॥
प्रत्यक्ष करावें जरी नमन । तंव राहिलोसें आच्छादून ।
प्रकट होतां नये जाण । कार्य संपूर्ण जंव साधे ॥ ७४ ॥
करोनि मनोमय नमन । चरित्र पाहतसे आपण ।
तंव बोलिला अहिरावण । रघुनंदन ऐकत ॥ ७५ ॥

रामांना इष्त देवतेचे स्मरण करण्याची राक्षसांची आज्ञा :

खड्गधारा करोनि सतेज । बोलतसे राक्षसराज ।
आतां वध करीन मी तुज । स्मरें निजगुज आपुलें ॥ ७६ ॥
तुझें आराध्यदैवत । त्यातें स्मरें पां त्वरित ।
मग झालिया तुझा घात । विस्मरणांत बुडसील ॥ ७७ ॥
तूं म्हणवितोसि आपणियातें । विश्व स्मरत आहे मातें ।
तो तूं बांधला आहेसी येथें । स्मर निजचित्तें कुवासा ॥ ७८ ॥


आत्मा त्वं भुवनैकनायक रघो सूक्ष्मातिसूक्ष्मं जगु
र्वेदैःसोपनिषत्पुराणगणकैर्बद्धोऽसि देव्यग्रतः ।
तच्छ्त्वा रघुवंशकेसरियुवा रौद्रीं तनुं चिंतयन्
मुक्तःसानुजराघवस्य पुरतो दृष्टो हनूमानकपिः ॥१॥


आपणिया म्हणविसी रामा । जो मी विश्वाचा विश्वात्मा ।
वेदांसी न कळे महिमा । रुपनामा अतीत ॥ ७९ ॥
सूक्ष्माचेंही अति सूक्ष्म । लक्षालक्षातीत परम ।
उपषिदांसी दुर्गम । मनोधर्म थोटावे ॥ ८० ॥
नेत्रीं देखिला न वचे । व्यवहार खुंटले शब्दांचे ।
क्षीणकर्म समरणाचें । श्रवणीं नवचे आकळिला ॥ ८१ ॥
जेथें मनाची मुरकुंडी । कल्पिला न वचे कडोविकडीं ।
वृत्ति झाली पैं वेडी । इंद्रियें बापुडीं काय करिती ॥ ८२ ॥
पुराणें काय करिती तेथ । वेडावला शास्त्रार्थ ।
तो म्या देवींपुढें तेथ । श्रीरघुनाथ बांधिला ॥ ८३ ॥
सर्वथा व्यक्ती न येसी । अव्यक्तामाजी लप्सी ।
तो नांवरुपा आलासी । देवीपाशीं मारावया ॥ ८४ ॥
सर्वातीत रघुनाथ । बंधुसमवेत येथ ।
म्यां बांधिलासी त्वरित । सुटका निश्चित चिंती पां ॥ ८५ ॥
विलंब कायसा येथ । जगदंबा क्षुधाक्रांत ।
स्मर आपुलें कुळदैवत । शिरःपात करुं तुझा ॥ ८६ ॥

श्रीराम विचारपूर्वक हनुमंताचे स्मरण करतात :

ऐकोनियां त्याचें वचन । स्वयें विचारी रघुनंदन ।
करुं कोणाचें स्मरण । विश्व चिंतन करी माझें ॥ ८७ ॥
प्राणिमात्रास संकट पडत । तितुके श्रीरामा स्मरत ।
तेणें पुरती मनोरथ । जग निर्मक्त श्रीरामें ॥ ८८ ॥
मज वर्ण व्यक्ति नाहीं । ऐशियातें पाहीं ।
घाला घालोनियां लवलाहीं । धरिलें कांहि चालेना ॥ ८९ ॥
ऐसें असतां सर्वथा । कोणातें स्मरो मी आतां ।
विचार करितां रघुनाथा । बुद्धि तत्वतां आठविली ॥ ९० ॥
अहंकारें घालोनि घाला । अव्यक्त व्यक्तीं आकळिला ।
जीवदशेंसीं आणिला । वेगीं बांधला कर्मपाशीं ॥ ९१ ॥
लटकेंचि क्रियमाण । करवून संचित जाण ।
वरते ते भोग दारुण । प्रारब्ध जाण तया म्हणती ॥ ९२ ॥
या त्रिविध कर्माच्या संगतीं । पडिजे जन्ममरणावर्तीं ।
भोगिजेती योनिपंक्तीं । उसंत चित्तीं असेना ॥ ९३ ॥
तें छेदावया कर्मबंधन । सबळ विरक्त भक्त जन ।
मी होवोनियां भजन । माझेंचि जाण करिताती ॥ ९४ ॥
अद्वैतभजनाचा संतोष । होती सर्वभावीं उदास ।
करोनि कुर्वंडी सर्वस्व । स्वयें सुखास भोगिती ॥ ९५ ॥
स्वयें स्वसुख भोगिती । उसंत नाहीं अहोरातीं ।
इतर कर्मबंधीं पडती । तेही येती तया शरण ॥ ९६ ॥
बाप कृपाळु दीनदयाळ । न म्हणती वेळ अवेळ ।
दीन देखोनि तत्काळ । करिती सकळ सोडवणें ॥ ९७ ॥
छेदोनि कामक्रोधांचे बंध । आणि कर्माकर्मांचे भेद ।
खाणोनि विषयाचा कंद । स्वरुप शुद्ध प्रबोधिती ॥ ९८ ॥
देहमात्र झाला कृश । त्यासीं उपचारिती सुरस ।
देवोनि अर्धमात्रारस । जन्ममरणास नासिती ॥ ९९ ॥
एवढे असतां दीनोद्धारी । मज दीन केलें इहीं किंकरीं ।
आतां स्मरोनि झडकरी । करीन बोहरी सकळांची ॥ १०० ॥
ऐसा करोनि निर्धार । सरिसावला रामचंद्र ।
स्मरला तो हनुमान वीर । रुद्रावतार प्रत्यक्ष ॥ १ ॥

हनुमंत प्रगट होऊन रामांचे पाश तोडतो :

ऐकतां श्रीरामवचन । पातला सवेग कपिनंदन ।
पाश छेदोनियां जाण । रगुनंदन सोडविला ॥ २ ॥
लक्ष्मणासमवेत । श्रीराम केला नित्यमुक्त ।
अगाध बोध हरिभक्त । नामें निर्मुक्त चराचर ॥ ३ ॥
जगा संकट पडलिया जाण । श्रीराम सोडवी आपण ।
त्या श्रीरामाचें पाशबंधन । निजभक्तें जाण सोडविलें ॥ ४ ॥
यालागीं श्रीरघुनाथ । झाला भक्ताचा अंकित ।
तो ज्याच्या माथां ठेवी हात । त्यासी मुक्त करी श्रीराम ॥ ५ ॥
मुक्तोपकार फेडावया । अवतार धरणें रघुराया ।
धांवतसे लवलाह्यां । राखावया निजभक्तां ॥ ६ ॥
अंबरीषाची जन्मकथा । न साहवेचि भगवंता ।
स्वयें झालाचि अंगीकारिता । उणें भक्ता येऊं नेदी ॥ ७ ॥
गज गांजितां पाणियेथडी । वैकुंठीहोनियां उडी ।
घालोनियां लवडसवडी । गज तांतडी सोडविला ॥ ८ ॥
दैत्यें पीडिलें प्रल्हादासी । न साहवे भगवंतासीं ।
उतटूनियां कोरड्या खांबासी । निजरुपासी दाविलें ॥ ९ ॥
दैत्य धरोनि मांडिवरी । चिरियेला नखाग्रीं ।
भक्ताकाजकैवारी । नरकेसरी पल्हाद ॥ ११० ॥
निजभक्तांसीं अट्क । जरी पडलें अलोलिक ।
तितकेंही रघुकुळटिळक । स्वांगें देख निवारी ॥ ११ ॥
ऐसा भगवंताचा निर्धार । म्हणावोनि हरिभक्त निरंतर ।
न वचकती अणुमात्र । हनुमान वीर अग्रणी ॥ १२ ॥
पुढें देखोनि रघुवीरा । श्यामसुंदर मनोहरा ।
प्रेमें कांपत थरथरां । अश्रुधारा स्रवताती ॥ १३ ॥
अंगीं रोमांच रवरवित । स्वेदबिंदु डळमळित ।
कंठी बाष्प पैं दाटत । सद्‌गदित पैं वाचा ॥ १४ ॥
सत्वभरितें न सांवरत । पडिला चरणावरी मूर्च्छित ।
श्रीराम अति प्रीतीं उचलित । आलिंगित निजहृदयीं ॥ १५ ॥
आंवरुन सत्वावस्था । चरणांवरी ठेऊन माथा ।
झाला काय विनविता । सावधानता परिसावें ॥ १६ ॥


अप्यग्रणीरात्मभुवां कपींद्रो जगाद देवं जयपूर्वशब्दैः ।
निःशेषकर्तुं हि निशाचराणामस्मादृशां वा इह तर्जनात ॥२॥


जो भक्तांमाजी मुकुटमणी । ब्रह्मादिकां अग्रगणी ।
श्रेष्ठ सकळिकांच्या स्रजनीं आत्मभू म्हणोनि त्यासी म्हणती ॥ १७ ॥
भगवंतापासून ज्ञान । प्राप्त झाला चतुरानन ।
त्यासही लागले लांछन । स्वकन्या देखोन भुलला ॥ १८ ॥
त्याहीपरीस विशुद्ध । कपिनाथ सावध ।
अद्वैतज्ञानें अगाधबोध । निजानंद भोगित ॥ १९ ॥
वाती लावोनि पाहतां । दुजें नये दृष्टचे हाता ।
तेथें कैंची विषयवार्ता । पूज्य तत्वतां आत्मभूसि ॥ १२० ॥
भक्तांचा तरी मुकूटमणी । सबाह्य वेंचिलें श्रीरामभजनीं ।
उसंत नाहीं अर्धक्षणीं । मनादिकरणीं सर्वथा ॥ २१ ॥
सर्वप्राण सर्वशक्ती । उसंत नाही श्रीरामभक्ती ।
तो उभा राहोन मारुती । श्रीरामाप्रती विनवित ॥ २२ ॥

हनुमंत रामाचे स्तवन करितो :

करोनि रामनामें भुभुःकार । जयजयकारें गर्जे थोर ।
श्रीरामासी उत्तर । काय कपींद्र बोलिला ॥ २३ ॥
तूं अकळ लाघवी रघुनाथा । सांडोनियां शरणागता ।
दीना वानरां समस्तां । कोणा न पुसतां आलासी ॥ २४ ॥
आम्हां गमतसे चित्तें । वंचोनियां निजभक्तांतें ।
स्वामी येणें केलें तेथें । तें कळलें निश्चितें दातारा ॥ २५ ॥
मारिलिया रावणास । पाताळीहीं राक्षस ।
प्रबळ होतील बहुवस । मागुतें आपणास येणें घडेल ॥ २६ ॥
म्हणोनि श्रीरामा जाण । न मारितां रावण ।
येथें केलें आगमन । यांची बोळवण करावया ॥ २७ ॥
राक्षसांचा मनोगत । रावण मारील रघुनाथ ।
जाईल अयोध्ये त्वरित । आम्हांसी येथे सांडूनी ॥ २८ ॥
मग आम्हीं करावें काय । श्रीरामीं भेटी कैंची होय ।
म्हणोनि रचिले उपाय । तुज पाहें आणावया ॥ २९ ॥
तूं अजेय गा सर्वथा । रणीं नातुडसी झुंजतां ।
आपुले पूर्वजन्म शोधितां । युक्ति तत्वतां आठवली ॥ १३० ॥
जन्मांतरीं निष्कामभजनीं । श्रीरामा तुज केलें ऋणी ।
यास्तव तिहीं पाशेंकरोनी । तुज बांधोनी आणिले ॥ ३१ ॥
नाम स्मरतां श्रीरघुनाथ । महापापी उद्धरत ।
त्या तुज राक्षस बांधित । असंभावित हे वार्ता ॥ ३२ ॥
इहलोकीं परलोकीं । ऋण फेडावें आवश्यकीं ।
हे जाणावया या लोकीं । पास कौतुकीं साहिले ॥ ३३ ॥
हाचि तुझा निजविचार । श्रीरामा आहे साचार ।
कीं विचारिलें प्रकारांतर । वानरभार छळावया ॥ ३४ ॥
तुज राहिलिया गुप्तगतीं । वानरभार काय करिती ।
कोठें कोठें तुज पाहती । साधन करिती ते कोण ॥ ३५ ॥
तरी साधावया रघुनंदन । जें आचरावें तें बंधन ।
साधनीं रिघोन अभिमान । वृथाचि जाण धांवडीत ॥ ३६ ॥
ऐसें जाणोनि मर्कट । सांडिलें साधनकचाट ।
नाम स्मरती यथेष्ट । तेणें वाट दाविली ॥ ३७ ॥
नामीं अनुसरलों तत्वतां । शुद्धि लागली नाम स्मरतां ।
नामें भेटविलें रघुनाथा । उपाय अन्यथा नेणें मी ॥ ३८ ॥
ऐसा विनवोनियां रघुनंदन । पुसता झाला वीर वायुनंदन ।
देई आज्ञा मजलागून । राक्षसनिधन करावया ॥ ३९ ॥
ऐकोनि कपीचें उत्तर । संतोषला रघुवीर ।
आलिंगिला पैं सत्वर । अति चतुर तू होसी ॥ १४० ॥
अद्‍भुतशक्ति हनुमंता । वाचे न बोलवे सर्वथा ।
मज सोडविलें रघुनाथा । बहुत आतां काय बोलूं ॥ ४१ ॥
पुसणें काय विचार । करीं दुर्जनांचा संहार ।
वचन ऐकोनि कपींद्र । करुं संहार आदरिला ॥ ४२ ॥
पूर्वीच अतर्क्य गती । पुच्छाचा वेढा नगराप्रती ।
करोनि राहिला मारुती । होता निश्चितीं चिन्ह पाहत ॥ ४३ ॥

हनुमंत रामांच्या आज्ञेने राक्षसांना मारुन महिरावणाचा वध करितो :

श्रीरामाचें आज्ञापन । लाहोनियां कपिनंदन ।
करितां झाला कंदन । सावधना अवधारा ॥ ४४ ॥
श्रीरामाचे पाश बहुत । स्वयेंचि तुटले समस्त ।
पुढें देखिला कपिनाथ । अति आकांत राक्षसां ॥ ४५ ॥
एकाचे हातपाय गळाले । एकाचे प्राण कंठी राहिले ।
एका अधोवात सुटले । मुतों लागले उभ्यां उभ्यां ॥ ४६ ॥
एक आरडती ओरडती । एक पळाले मागुती ।
एक येती काकुळती । तृणें दांती धरोनि ॥ ४७ ॥
एकें लागलीं दिक्पुटीं । एकांची रुधली घांटी ।
तंव अवचित पुच्छाटी । वाजे पाठीं अनिवार ॥ ४८ ॥
देखोनि सकळांची करुणा । न साहवे महिरावणा ।
येवोनियां समरांगणा । वायुनंदना पाचारी ॥ ४९ ॥
येरु ठायींच सावध । श्रीराम प्रभावें विशद्ध ।
करुं आदरिलें युद्ध । अति सुबद्ध झोतधरणी ॥ १५० ॥
मिसळले द्वंद्वयुद्धा । मागें न सरती कदा ।
येरयेरांचिये वधा । करिती सावध येरयेरां ॥ ५१ ॥
येरयेरां लाविती कळा । परस्परें चेपिती गळा ।
वर्मी हाणिती सबळा । आणिती तळा परस्परें ॥ ५२ ॥
येरयरां हाणिती धके । गुडघे कोंपर तिखट नखें ।
वोरबडे एकमेकें । अति तवकें काढिती ॥ ५३ ॥
हनुमान वज्रदेही वीर । अंगावरी न वचे चीर ।
राक्षसाचें शरीर । नखीं सत्वर विदारिलें ॥ ५४ ॥
हनुमान विचारी निजचितें । विलंब कासया करुं यथें ।
हाणी आवेशें बहुतें । मुष्टिघातें मस्तकीं ॥ ५५ ॥
माथां लागतां आघात । मस्तक गेला कोथळांत ।
भडभडां रुधिर वमित । प्राण निश्चित सांडिला ॥ ५६ ॥
देखतां श्रीरघुनाथा । हनुमंताचेनि हातें मरतां ।
चारी देहां हाणोनि लाता । श्रीरामीं तत्वतां मिळोनि गेला ॥ ५७ ॥
स्थूळ सांडी नश्वर म्हणोन । सूक्ष्म तें मनोजन्य ।
कल्पनामात्र तें कारण । स्वरुपाभिमान तें चौथें ॥ ५८ ॥
होतां श्रीरामदर्शन । अप्राप्तता निमाली पूर्ण ।
नित्यमुक्ततेची निजखूण । बाणली संपूर्ण राक्षसा ॥ ५९ ॥
पृथ्वी सदाचिंतित । माझे माथां श्रीरघुनाथ ।
विचरत आहे अहोरात । कृतकृतार्थ तेणें मी ॥ १६० ॥
तेथें स्वरुपाभिमान । राहोनियां कार्य कोण ।
मग लाजोनियां जाण । झाली लीन श्रीरामीं ॥ ६१ ॥
ऐसें पृथ्वीचें अंतःकरण पूर्ण । तिचे नांवाचा महिरावण ।
दृष्टी देखतां रघुनंदन । झाला जाण नित्यमुक्त ॥ ६२ ॥
कृपाळु श्रीरघुनंदन । फेडावया पूर्वभजनऋण ।
येवोनि पाताळा आपण । राक्षस जाण उद्धरिला ॥ ६३ ॥
एका जनार्दना शरण । मारियला महिरावण ।
पुढें वधूं अहिरावण । सावाधान अवधारा ॥ १६४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थारामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
महिरावणवधो नाम त्रिपंचाशत्तमोऽध्यायः ॥ ५३ ॥
ओंव्या ॥ १६४ ॥ श्लोक ॥ २ ॥ एवं ॥ १६६ ॥


GO TOP