वानरैः श्रीरामलक्ष्मणयो रक्षणं, रावणाज्ञया राक्षसीभिः पुष्पकेण सीताया रणभूमौ नयनं, तत्र तया श्रीरामस्य सलक्ष्मणस्य दर्शनं, सीताया विलापश्च -
|
वानरांच्या द्वारे श्रीराम आणि लक्ष्मणांचे रक्षण, रावणाच्या आज्ञेने राक्षसींचे सीतेला पुष्पकविमान द्वारा रणभूमीमध्ये घेऊन जाऊन श्रीरामांचे आणि लक्ष्मणांचे दर्शन करविणे आणि सीतेचे दु:खी होऊन रडणे -
|
तस्मिन् प्रविष्टे लङ्कायां कृतार्थे रावणात्मजे । राघवं परिवार्यार्ता ररक्षुर्वानरर्षभाः ॥ १ ॥
|
रावणकुमार इंद्रजित जेव्हा आपले काम साधून लंकेत निघून गेला, तेव्हा सर्व श्रेष्ठ वानर राघवांना चोहो बाजूनी घेरून त्यांचे रक्षण करू लागले. ॥१॥
|
हनुमानङ्गदो नीलः सुषेणः कुमुदो नलः । गजो गवाक्षो गवयः शरभो गंधमादनः ॥ २ ॥
जाम्बवानृषभः स्कन्धो रम्भः शतवलिः पृथुः । व्यूढानीकाश्च यत्ताश्च द्रुमानादाय सर्वतः ॥ ३ ॥
|
हनुमान्, अंगद, नील, सुषेण, कुमुद, नल, गज, गवाक्ष, गवय, शरभ, गंधमादन, जांबवान्, ऋषभ, स्कंध, रंभ, शतबली आणि पृथु - हे सर्व सावधान होऊन आपल्या सेनेची व्यूहरचना करून हातात वृक्ष घेऊन सर्व बाजूनी पहारा देऊ लागले. ॥२-३॥
|
वीक्षमाणा दिशः सर्वाः तिर्यगूर्ध्वं च वानराः । तृणेष्वपि च चेष्टत्सु राक्षसा इति मेनिरे ॥ ४ ॥
|
ते सर्व वानर संपूर्ण दिशामध्ये वर-खाली आणि आजुबाजुलाही पहात राहिले होते तसेच गवताचे पाते जरी हलले तरी असेच समजत होते की राक्षस आले आहेत. ॥४॥
|
रावणश्चापि संहृष्टो विसृज्येन्द्रजितं सुतम् । आजुहाव ततः सीता रक्षिणी राक्षसीस्तदा ॥ ५ ॥
|
तिकडे हर्षाने भरलेल्या रावणानेही आपला पुत्र इंद्रजित याला निरोप देऊन त्यासमयी सीतेचे रक्षण करणार्या राक्षसींना बोलावून घेतले. ॥५॥
|
राक्षस्यस्त्रिजटा चापि शासनात् समुपस्थिताः । ता उवाच ततो हृष्टो राक्षसी राक्षसाधिपः ॥ ६ ॥
|
आज्ञा मिळताच त्रिजटा तसेच अन्य राक्षसीणी त्याच्या जवळ आल्या. तेव्हा हर्षाने भरलेल्या राक्षसराजाने त्या राक्षसींना म्हटले- ॥६॥
|
हताविन्द्रजिताऽऽख्यात वैदेह्या रामलक्ष्मणौ । पुष्पकं च समारोप्य दर्शयध्वं रणे हतौ ॥ ७ ॥
|
तुम्ही लोक वैदेही सीतेला जाऊन सांगा की इंद्रजिताने राम आणि लक्ष्मणाला ठार मारले आहे. नंतर पुष्पक विमानावर सीतेला चढवून रणभूमीमध्ये घेऊन जा आणि त्या मारले गेलेल्या दोन्ही बंधूना तिला दाखवा. ॥७॥
|
यदाश्रयादवष्टब्धा नेयं मामुपतिष्ठते । सोऽस्या भर्ता सह भ्रात्रा निहतो रणमूर्धनि ॥ ८ ॥
|
ज्यांच्या आश्रयाने गर्वाने भरून ती माझ्याजवळ येत नव्हती तो तिचा पति आपल्या भावासह युद्धाच्या तोंडावरच मारला गेला आहे. ॥८॥
|
निर्विशङ्का निरुद्विग्ना निरपेक्षा च मैथिली । मामुपस्थास्यते सीता सर्वाभरणभूषिता ॥ ९ ॥
|
आता मैथिली सीतेला त्याची अपेक्षा राहाणार नाही. ती समस्त आभूषणांनी विभूषित होऊन भय आणि शंकेचा त्याग करून माझ्या सेवेत उपस्थित होईल. ॥९॥
|
अद्य कालवशं प्राप्तं रणे रामं सलक्ष्मणम् । अवेक्ष्य विनिवृत्ता सा चान्यां गतिमपश्यती ॥ १० ॥
अनपेक्षा विशालाक्षी मामुपस्थास्यते स्वयम् ।
|
आज रणभूमीमध्ये काळाच्या अधीन झालेल्या रामलक्ष्मणांना पाहून ती त्यांच्या वरून आपले मन काढून घेईल तसेच आपल्यासाठी दुसरा कोठलाही आश्रय नाही असे पाहून त्याबाबतीत निराश होऊन विशाललोचना सीता स्वत:च माझ्याजवळ चालत येईल. ॥१० १/२॥
|
तस्य तद्वचनं च श्रुत्वा रावणस्य दुरात्मनः ॥ ११ ॥
राक्षस्यस्तास्तथेत्युक्त्वा जग्मुर्वै यत्र पुष्पकम् ।
|
दुरात्मा रावणाचे हे बोलणे ऐकून त्या सर्व राक्षसी ’फार छान’ असे म्हणून जेथे पुष्पकविमान होते त्या स्थानी गेल्या. ॥११ १/२॥
|
ततः पुष्पकमादाय राक्षस्यो रावणाज्ञया ॥ १२ ॥
अशोकवनिकास्थां तां मैथिलीं समुपानयन् ।
|
रावणाच्या आज्ञेने त्या पुष्पकविमानास त्या राक्षसी अशोक वाटिकेत बसलेल्या मैथिलीजवळ घेऊन आल्या. ॥१२ १/२॥
|
तामादाय तु राक्षस्यो भर्तृशोकपराजिताम् ॥ १३ ॥
सीतामारोपयामासुः विमानं पुष्पकं तदा ।
|
त्या राक्षसीणींनी पतिच्या शोकाने व्याकुळ झालेल्या सीतेला तात्काळ पुष्पक विमानात चढविले. ॥१३ १/२॥
|
ततः पुष्पकमारोप्य सीतां त्रिजटया सह ॥ १४ ॥
जग्मुर्दर्शयितुं तस्यै राक्षस्यो रामलक्ष्मणौ । रावणश्चारयामास पताकाध्वजमालिनीम् ॥ १५ ॥
|
सीतेला पुष्पक विमानात बसवून त्रिजटेसहित त्या राक्षसी तिला रामलक्ष्मणांचे दर्शन करविण्यासाठी निघाल्या. याप्रकारे रावणाने तिला ध्वजापताकांनी अलंकृत लंकापुरीच्या वर विचरण करविले. ॥१४-१५॥
|
प्राघोषयत हृष्टश्च लङ्कायां राक्षसेश्वरः । राघवो लक्ष्मणश्चैव हताविन्द्रजिता रणे ॥ १६ ॥
|
इकडे हर्षाने भरलेल्या राक्षसराज रावणाने लंकेमध्ये सर्वत्र ही घोषणा करविली की राम आणि लक्ष्मण रणभूमीमध्ये इंद्रजिताच्या हाताने मारले गेले आहेत. ॥१६॥
|
विमानेनापि गत्वा तु सीता त्रिजटया सह । ददर्श वानराणां तु सर्वं सैन्यं निपातितम् ॥ १७ ॥
|
त्रिजटे बरोबर त्या विमानद्वारा तेथे जाऊन सीतेने रणभूमीमध्ये ज्या वानरांच्या सेना मारल्या गेल्या होत्या, त्या सर्वांना पाहिले. ॥१७॥
|
प्रहृष्टमनसश्चापि ददर्श पिशिताशनान् । वानरांश्चाति दुःखार्तान् रामलक्ष्मणपार्श्वतः ॥ १८ ॥
|
तिने मांसभक्षी राक्षसांना तर आंतून प्रसन्न पाहिले आणि रामलक्ष्मणांच्या जवळ उभे असलेल्या वानरांना दु:खाने अत्यंत पीडित असलेले पाहिले. ॥१८॥
|
ततः सीता ददर्शोभौ शयानौ शरतल्पगौ । लक्ष्मणं चैव रामं च विसंज्ञौ शरपीडितौ ॥ १९ ॥
|
तदनंतर सीतेने बाणशय्येवर झोपलेल्या दोघा भावांना, राम आणि लक्ष्मणासही पाहिले; जे बाणांनी पीडित होऊन संज्ञाशून्य होऊन पडलेले होते. ॥१९॥
|
विध्वस्तकवचौ वीरौ विप्रविद्धशरासनौ । सायकैश्छिन्नसर्वाङ्गौ शरस्तम्बमयौ क्षितौ ॥ २० ॥
|
त्या दोन्ही वीरांची कवचे तुटून गेली होती; धनुष्यबाण वेगळे पडलेले होते, सायकांनी सारे अंग विंधले गेले होते आणि ते बाणसमूहांनी बनलेल्या पुतळ्यांप्रमाणे पृथ्वीवर पडलेले होते. ॥२०॥
|
तौ दृष्ट्वा भ्रातरौ तत्र वीरौ सा पुरुषर्षभौ । शयानौ पुण्डरीकाक्षौ कुमाराविव पावकी ॥ २१ ॥
शरतल्पगतौ वीरौ तथाभूतौ नरर्षभौ । दुःखार्ता करुणं सीता सुभृशं विललाप ह ॥ २२ ॥
|
जे प्रमुख वीर आणि समस्त पुरूषांमध्ये उत्तम होते, ते दोघे भाऊ कमलनयन श्रीराम आणि लक्ष्मण अग्निपुत्र कुमार शाख आणि विशाख यांच्याप्रमाणे शरसमूहामध्ये झोपले होते. त्या दोन्ही नरश्रेष्ठ वीरांना त्या अवस्थेत बाणशय्येवर पडलेले पाहून दु:खाने पीडित झालेली सीता करूणाजनक स्वरात मोठमोठ्याने विलाप करू लागली. ॥२१-२२॥
|
भर्तारमनवद्याङ्गी लक्ष्मणं चासितेक्षणा । प्रेक्ष्य पांसुषु चेष्टन्तौ रुरोद जनकात्मजा ॥ २३ ॥
|
निर्दोष अंगे असलेली श्यामलोचना जनकनंदिनी सीता आपला पति श्रीराम आणि दीर लक्ष्मण यांना धुळीत पडलेले पाहून स्फुंदून स्फुंदून रडू लागली. ॥२३॥
|
सा बाष्पशोकाभिहता समीक्ष्य तौ भ्रातरौ देवसुतप्रभावौ । वितर्कयन्ती निधनं तयोः सा दुःखान्विता वाक्यमिदं जगाद ॥ २४ ॥
|
तिच्या नेत्रांतून अश्रु वहात होते आणि हृदय शोकाच्या आघाताने पीडित झाले होते. देवतांच्या समान प्रभावशाली त्या दोघा भावांना त्या अवस्थेमध्ये पाहून त्यांच्या मरणाची शंका करीत ती दु:ख आणि चिंतेमध्ये बुडून गेली आणि याप्रकारे बोलली- ॥२४॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे सप्तचत्वारिंशः सर्गः ॥ ४७ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा सत्तेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४७॥
|