भरतेन कैकेय्या भर्त्सनम् -
|
भरतांनी कैकेयीला कडक शब्दात धिक्कारणे -
|
तां तथा गर्हयित्वा तु मातरं भरतस्तदा ।
रोषेण महताविष्टः पुनरेवाब्रवीद् वचः ॥ १ ॥
|
याप्रमाणे मातेची निंदा करित भरत त्या समयी महान रोषावेशाने भरून गेले आणि नंतर कठोर वाणीने म्हणू लागले- ॥ १ ॥
|
राज्याद् भ्रंशस्व कैकेयि नृशंसे दुष्टचारिणि ।
परित्यक्ता च धर्मेण मा मृतं रुदती भव ॥ २ ॥
|
’दुष्टतापूर्ण आचरण करणार्या क्रूर हृदयी कैकेयी ! तू राज्यापासून भ्रष्ट होऊन जा. धर्माने तुझा परित्याग केला आहे म्हणून तू आता मरण पावलेल्या महाराजांसाठी रडू नको. (कारण तू पत्नीधर्मापासून पतन पावली आहेस) अथवा मला मेलेला समजून तू जन्मभर पुत्रासाठी रडत बस. ॥ २ ॥
|
किं नु तेऽदूषयद् रामो राजा वा भृशधार्मिकः ।
ययोर्मृत्युर्विवासश्च त्वत्कृते तुल्यमागतौ ॥ ३ ॥
|
’श्रीरामांनी अथवा अत्यंत धर्मात्मा महाराजांनी (पित्याने) तुझे काय बिघडविले होते की ज्यामुळे एकाच वेळी त्यांना तुझ्यामुळे वनवासाचे आणि मृत्युचे कष्ट भोगावे लागले ? ॥ ३ ॥
|
भ्रूणहत्यामसि प्राप्ता कुलस्यास्य विनाशनात् ।
कैकेयि नरकं गच्छ मा च तात
सलोकताम् ॥ ४ ॥
|
’कैकेयी ! तू या कुळाचा विनाश करण्यामुळे भ्रूणहत्येचे पाप आपल्या शिरावर घेतले आहेस, म्हणून तू नरकात जा आणि पित्याचा लोक तुला न मिळो. ॥ ४ ॥
|
यत्त्वया हीदृशं पापं कृतं घोरेण कर्मणा ।
सर्वलोकप्रियं हित्वा ममाप्यापादितं भयम् ॥ ५ ॥
|
’तू या घोर कर्माच्या द्वारा समस्त लोकांना प्रिय असणार्या श्रीरामांना देशातून घालवून देऊन जे मोठे पाप केले आहेस, त्याने माझ्यासाठी ही भय उपस्थित झाले आहे. ॥ ५ ॥
|
त्वत्कृते मे पिता वृत्तो रामश्चारण्यमाश्रितः ।
अयशो जीवलोके च त्वयाहं प्रतिपादितः ॥ ६ ॥
|
’तुझ्यामुळेच माझ्या पित्याचा मृत्यु झाला, रामांना वनाचा आश्रय घ्यावा लागला आणि मलाही तू या जीवलोकात अपयशाचा भागी बनवून टाकले आहेस. ॥ ६ ॥
|
मातृरूपे ममामित्रे नृशंसे राज्यकामुके ।
न तेऽहमभिभाष्योऽस्मि दुर्वृत्ते पतिघातिनि ॥ ७ ॥
|
’राज्याच्या लोभात पडून क्रूरकर्म करणार्या दुराचारिणी पतिघातिनी ! तू मातेच्या रूपाने माझी शत्रू आहेस. तू माझ्याशी बोलता कामा नये. ॥ ७ ॥
|
कौसल्या च सुमित्रा च याश्चान्या मम मातरः ।
दुःखेन महताविष्टास्त्वां प्राप्य कुलदूषिणीम् ॥ ८ ॥
|
’कौसल्या, सुमित्रा आणि ज्या माझ्या अन्य माता आहेत, त्या सर्व तुझ्यामुळे, कुलकलंकिनीमुळे महान दुःखात पडल्या आहेत. ॥ ८ ॥
|
न त्वमश्वपतेः कन्या धर्मराज्यस्य धीमतः ।
राक्षसी तत्र जातासि कुलप्रध्वंसिनी पितुः ॥ ९ ॥
|
’तू बुद्धिमान धर्मराज अश्वपतीची कन्या नाहीस. तू त्यांच्या कुळात कुणी राक्षसी निर्माण झाली आहेस, जी पित्याच्या वंशाचा विध्वंस करणारी आहेस. ॥ ९ ॥
|
यत् त्वया धार्मिको रामो नित्यं सत्यपरायणः ।
वनं प्रस्थापितो वीरः पितापि त्रिदिवं गतः ॥ १० ॥
यत्प्रधानासि तत् पापं मयि पित्रा विना कृते ।
भ्रातृभ्यां च परित्यक्ते सर्वलोकस्य चाप्रिये ॥ ११ ॥
|
’तु सदा सत्यात तत्पर राहाणार्या धर्मात्मा वीर रामांना जो वनात धाडले आहेस आणि तुझ्यामुळे जे माझे पिता स्वर्गवासी झाले आहेत त्या सर्व कुकृत्यांच्या द्वारे तू प्रधान रूपाने जे पाप कमावले आहेस, ते पाप माझ्या ठिकाणी येऊन आपले फळ दाखवीत आहे, म्हणूनच मी सर्व जगातील लोकांना अप्रिय झालो आहे. ॥ १०- ११ ॥
|
कौसल्यां धर्मसंयुक्तां वियुक्तां पापनिश्चये ।
कृत्वा कं प्राप्स्यसे त्वद्य लोकं निरयगामिनि ॥ १२ ॥
|
’पापपूर्ण विचार बाळगणार्या नरकगामिनी कैकेयी ! धर्मपरायण माता कौसल्येला पति आणि पुत्रापासून वंचित करून आता तू कुठल्या लोकात जाशील ? ॥ १२ ॥
|
किं नावबुध्यसे क्रूरे नियतं बन्धुसंश्रयम् ।
ज्येष्ठं पितृसमं रामं कौसल्यायात्मसम्भवम् ॥ १३ ॥
|
’क्रूरहृदये ! कौसल्यापुत्र श्रीराम माझे वडिलबंधु असून वडिलाप्रमाणेच आहेत, ते जितेंद्रिय आणि आश्रयदाते आहेत. तू काय त्यांना या रुपाने जाणत नाहीस ? ॥ १३ ॥
|
अङ्गप्रत्यङ्गजः पुत्रो हृदयाच्चाभिजायते ।
तस्मात् प्रियतरो मातुः प्रिया एव तु बान्धवाः ॥ १४ ॥
|
’पुत्र मातेच्या अंग-प्रत्यंग आणि हृदयापासून उत्पन्न होत असतो, म्हणून तो मातेला अधिक प्रिय असतो. अन्य बंधु-बांधव केवळ प्रियच असतात (परंतु पुत्र प्रियतर असतो.) ॥ १४ ॥
|
अन्यदा किल धर्मज्ञा सुरभिः सुरसम्मता ।
वहमानौ ददर्शोर्व्यां पुत्रौ विगतचेतसौ ॥ १५ ॥
|
’एका वेळेची गोष्ट आहे, की धर्माला जाणणारी देव सन्मानित सुरभि (कामधेनु) हिने पृथ्वीवरील आपल्या दोन पुत्रांना पाहिले जे नांगरता नांगरतांना (थकून) निश्चेष्ट झाले होते. ॥ १५ ॥
|
तावर्धदिवसं श्रान्तौ पुत्रौ दृष्ट्वा महीतले ।
रुरोद पुत्रशोकेन बाष्पपर्याकुलेक्षणम् ॥ १६ ॥
|
’मध्याह्नचा समय होईपर्यत सतत नांगर ओढून ते अत्यंत थकून गेले होते. पृथ्वीवर आपल्या त्या दोन पुत्रांची अशी दुर्दशा झालेली पाहून सुरभि पुत्रशोकाने रडू लागली. तिच्या नेत्रात अश्रु दाटून आले. ॥ १६ ॥
|
अधस्ताद् व्रजतस्तस्याः सुरराज्ञो महात्मनः ।
बिन्दवः पतिता गात्रे सूक्ष्माः सुरभिगन्धिनः ॥ १७ ॥
|
’त्याच समयी महात्मा देवराज इंद्र सुरभि उभी होती तिच्या खालून कोठे जात होते. त्यांच्या शरीरावर कामधेनुचे दोन अश्रु पडले. ॥ १७ ॥
|
निरीक्षमाणस्तां शक्रो ददर्श सुरभिं स्थिताम् ।
आकाशे विष्ठितां दीनां रुदन्तीं भृशदुःखिताम् ॥ १८ ॥
|
’ज्यावेळी इंद्रांनी वर दृष्टी केली तेव्हा पाहिले- आकाशात सुरभि उभी आहे आणि अत्यंत दुःखी होऊन दीनभावाने रडत आहे. ॥ १८ ॥
|
तां दृष्ट्वा शोकसन्तप्तां वज्रपाणिर्यशस्विनीम् ।
इन्द्रः प्राञ्जलिरुद्विग्नः सुरराजोऽब्रवीद् वचः ॥ १९ ॥
|
’यशस्विनी सुरभिला शोकाने संतप्त झालेली पाहून वज्रधारी देवराज इंद्र उद्विग्न होऊन गेले आणि हात जोडून बोलले - ॥ १९ ॥
|
भयं कच्चिन्न चास्मासु कुतश्चिद् विद्यते महत् ।
कुतोनिमित्तः शोकस्ते ब्रूहि सर्वहितैषिणि ॥ २० ॥
|
’सर्वांचे हित इच्छिणार्या देवी ! आमच्यावर कोठून काही महान भय तर उपस्थित झालेले नाही ना ? सांग, बरे ! कुठल्या कारणाने तुला हा शोक प्राप्त झाला आहे ? ॥ २० ॥
|
एवमुक्ता तु सुरभिः सुरराजेन धीमता ।
प्रत्युवाच ततो धीरा वाक्यं वाक्यविशारदा ॥ २१ ॥
|
’बुद्धिमान देवराज इंद्रांनी असे विचारल्यावर वाक्यविशारद आणि धीर स्वभावाच्या सुरभिने त्यांना याप्रकारे उत्तर दिले - ॥ २१ ॥
|
शांतं पापं न वः किञ्चित् कुतश्चिदमराधिप ।
अहं तु मग्नौ शोचामि स्वपुत्रौ विषमे स्थितौ ॥ २२ ॥
|
’देवेश्वर ! पाप शांत होवो. तुमच्यावर कोठूनही कसलेही भय नाही. मी तर आपल्या या दोन्ही पुत्रांना विषम अवस्थेत (घोर संकटात) मग्न झालेले पाहून शोक करीत आहे. ॥ २२ ॥
|
एतौ दृष्ट्वा कृशौ दीनौ सूर्यरश्मिप्रतापितौ ।
वध्यमानौ बलीवर्दौ कर्षकेण दुरात्मना ॥ २३ ॥
|
’हे दोन्ही बैल अत्यंत दुर्बल आणि दुःखी आहेत. सूर्याच्या किरणांनी खूप तापलेले आहेत आणि त्यावर आणखी तो दुष्ट शेतकरीही त्यांना मारत आहे. ॥ २३ ॥
|
मम कायात् प्रसूतौ हि दुःखितौ भारपीडितौ ।
यौ दृष्ट्वा परितप्येऽहं नास्ति पुत्रसमः प्रियः ॥ २४ ॥
|
’माझ्या शरीरापासून यांची उत्पत्ती झाली आहे. हे दोघे भाराने पीडित आणि दुःखी आहेत, म्हणून त्यांना पाहून मी शोकाने संतप्त होत आहे कारण पुत्राप्रमाणे प्रिय दुसरा कोणी नाही. ॥ २४ ॥
|
यस्याः पुत्रसहस्रैस्तु कृत्स्नं व्याप्तमिदं जगत् ।
तां दृष्ट्वा रुदतीं शक्रो न सुतान् मन्यते परम् ॥ २५ ॥
|
’जिच्या हजारो पुत्रांनी हे सारे जग भरलेले आहे, त्या कामधेनुला याप्रमाणे रडतांना पाहून इंद्राला हे मान्य झाले की पुत्राहून अधिक कुणीही प्रिय नाही. । २५ ॥
|
इंद्रो ह्यश्रुनिपातं तं स्वगात्रे पुण्यगन्धिनम् ।
सुरभिं मन्यते दृष्ट्वा भूयसीं तामिहेश्वरः ॥ २६ ॥
|
देवेश्वर इंद्रांनी आपल्या शरीरावरील त्या पवित्र गंध असणार्या अश्रुपातास पाहून देवी सुरभिस जगात सर्वश्रेष्ठ मानले. ॥ २६ ॥
|
समाप्रतिमवृत्ताया लोकधारणकाम्यया ।
श्रीमत्या गुणमुख्यायाः स्वभावपरिचेष्टया ॥ २७ ॥
यस्याः पुत्रसहस्राणि सापि शोचति कामधुक् ।
किं पुनर्या विना रामं कौसल्या वर्तयिष्यति ॥ २८ ॥
|
’जिचे चरित्र समस्त प्राण्यांसाठी समान रूपाने हितकर आणि अनुपम आहे, जी अभीष्ट दानरूप ऐश्वर्यशक्तीने सम्पन्न आहे, सत्यरूप प्रधान गुणानी युक्त आणि लोकरक्षणाच्या कामनेने कार्यात प्रवृत्त होणारी असून जिचे हजारो पुत्र आहेत ती कामधेनु सुद्धा जर आपल्या दोन पुत्रांसाठी त्यांच्या स्वाभाविक प्रयत्नात रत होऊन ही त्यांना कष्ट होत असलेले पाहून शोक करते तर मग जिचा एकच पुत्र आहे, ती माता कौसल्या रामाशिवाय कशी जिवंत राहील. ॥ २७-२८ ॥
|
एकपुत्रा च साध्वी च विवत्सेयं त्वया कृता ।
तस्मात् त्वं सततं दुःखं प्रेत्य चेह च लप्स्यसे ॥ २९ ॥
|
’एकुलत्या एक पुत्राची माता असलेल्या सती-साध्वी कौसल्येचा तू तिच्या पुत्रापासून वियोग केला आहेस म्हणून तू सदाच या लोकात आणि परलोकात दुःखच पावशील. ॥ २९ ॥
|
अहं त्वपचितिं भ्रातुः पितुश्च सकलामिमाम् ।
वर्धनं यशसश्चापि करिष्यामि न संशयः ॥ ३० ॥
|
’मी तर हे राज्य परत करुन भावाची पूजा करीन आणि हे सारे अंत्येष्टिसंस्कार आदि करून पित्याचेही पूर्णरूपाने पूजन करीन तसेच निःसंदेह मी तेच कर्म करीन जे (तू दिलेल्या कलंकास नाहीसे करणारे आणि) माझ्या यशाला वाढविणारे होईल. ॥ ३० ॥
|
आनाय्य च महाबाहुं कौसलेन्द्रं महाबलम् ।
स्वयमेव प्रवेक्ष्यामि वनं मुनिनिषेवितम् ॥ ३१ ॥
|
’महाबलाढ्य, महाबाहु कोसलनरेश श्रीरामांना येथे परत आणून मी स्वतःच मुनिजन सेवित वनात प्रवेश करीन. ॥ ३१ ॥
|
नह्यहं पापसङ्कल्पे पापे पापं त्वया कृतम् ।
शक्तो धारयितुं पौरैरश्रुकण्ठैर्निरीक्षितः ॥ ३२ ॥
|
’पापपूर्ण संकल्प करण्यार्या पापिणी ! पुरवासी लोकांनी अश्रु ढाळत अवरुद्ध कण्ठ होऊन माझ्याकडे पहावे आणि मी तू केलेल्या या पापाचे ओझे वहात राहावे- हे माझ्याकडून होऊ शकणार नाही. ॥ ३२ ॥
|
सा त्वमग्निं प्रविश वा स्वयं वा विश दण्डकान् ।
रज्जुं बध्वाथवा कण्ठे न हि तेऽन्यत् परायणम् ॥ ३३ ॥
|
’आता तू जळत्या आगीत प्रवेश कर अथवा स्वतःच दण्डकारण्यात चालती हो अथवा गळ्यात दोरी बांधून प्राण त्याग कर, याशिवाय तुझ्यासाठी दुसरी कुठलीही गती नाही. ॥ ३३ ॥
|
अहमप्यवनिं प्राप्ते रामे सत्यपराक्रमे ।
कृतकृत्यो भविष्यामि विप्रवासितकल्मषः ॥ ३४ ॥
|
’सत्यपराक्रमी श्रीरामचंद्र जेव्हा अयोध्येच्या भूमीवर पदार्पण करतील तेव्हा माझा कलंक दूर होईल आणि तेव्हाच मी कृतकृत्य होईन. ॥ ३४ ॥
|
इति नाग इवारण्ये तोमराङ्कुशतोदितः ।
पपात भुवि संक्रुद्धो निःश्वसन्निव पन्नगः ॥ ३५ ॥
|
असे म्हणून भरत, वनात तोमर आणि अङ्कुशद्वारा पीडित केल्या गेलेल्या हत्तीप्रमाणे मूर्च्छित होऊन पृथ्वीवर पडले आणि क्रोधाने खवळून फुस्कारणार्या सापाप्रमाणे दीर्घ श्वास घेऊ लागले.॥ ३५ ॥
|
संरक्तनेत्रः शिथिलाम्बरस्तथा
विधूतसर्वाभरणः परंतपः ।
बभूव भूमौ पतितो नृपात्मजः
शचीपतेः केतुरिवोत्सवक्षये ॥ ३६ ॥
|
परंतप राजकुमार भरत, उत्सव समाप्त झाल्यावर खाली पाडले गेलेल्या शचीपती इंद्रांच्या ध्वजाप्रमाणे त्यावेळी पृथ्वीवर पडले होते. त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झाले होते, वस्त्र सैल झाले होते आणि सारी आभूषणे तुटून विखरून पडलेली होती. ॥ ३६ ॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे चतुःसप्ततितमः सर्गः ॥ ७४ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा चौर्याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥ ७४ ॥
|