॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ उत्तरकाण्ड ॥ ॥ सप्तमः सर्गः ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] भगवान रामांच्या यज्ञात कुश-लवाचे आगमन, सीतेचा पृथ्वीमध्ये प्रवेश, रामचंद्रांचा मातेला उपदेश श्रीमहादेव उवाच वाल्मीकिना बोधितोऽसौ कुशः सद्योगतभ्रमः । अन्तर्मुक्तो बहिः सर्वं अनुकुर्वंश्चकार सः ॥ १ ॥ श्रीमहादेव म्हणाले-हे पार्वती, वाल्मीकींनी असा उपदेश करताच, कुशाची भ्रांती तत्काळ दूर झाली आणि अंतःकरणातील संकल्पांपासून मुक्त होऊन, तो बाहेरील सर्व व्यवहार करीत वावरू लागला. (१) वाल्मीकिरपि तौ प्राह सीतापुत्रौ महाधियौ । तत्र तत्र च गायन्तौ पुरे वीथिषु सर्वतः ॥ २ ॥ रामस्याग्रे प्रगायेतं शुश्रूषुर्यदि राघवः । न ग्राह्य वै युवाभ्यां तद् यदि किञ्चित् प्रदास्यति ॥ ३ ॥ एकदा त्या दोघा महाबुद्धिमान सीतापुत्रांना वाल्मीकींनी असे सांगितले की, "या नगरीत जेथे तेथे रस्त्यांवर, सर्वत्र रामकथेचे गायन करीत तुम्ही फिरा. जर राघवांना ते ऐकावयाची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याही पुढे गायन करा. पण ते जर तुम्हाला काही देऊ लागले, तर तुम्ही घेऊ नका." (२-३) इति तौ चोदितौ तत्र गायमानौ विचेरतुः । यथोक्तं ऋषिणा पूर्वं तत्र तत्राभ्यगायताम् ॥ ४ ॥ अशा प्रकारे मुनींची आज्ञा मिळाल्यावर ते दोघे गायन करीत करीत फिरू लागले. ज्या प्रमाणे ऋषींनी पूर्वी शिकविले होते त्या प्रमाणे ते दोघे जागोजागी गायन करू लागले. (४) तां स सुश्राव काकुत्स्थः पूर्वचर्यां ततस्ततः । अपूर्वपाठजातिं च गेयेन समभिप्लुताम् ॥ ५ ॥ बालयोः राघवः श्रुत्वा कौतूहलमुपेयिवान् । अथ कर्मान्तरे राजा समाहूय महामुनीम् ॥ ६ ॥ राज्ञश्चैव नरव्याघ्रः पण्डितांश्चैव नैगमान् । पौराणिकान् शब्दविदो ये च वृद्धा द्विजातयः ॥ ७ ॥ एतान्सर्वान्समाहूय गायकौ समवेशयत् । ते सर्वे हृष्टमनसो राजानो ब्रह्मणादयः ॥ ८ ॥ रामं तौ दारकौ दृष्ट्वा विस्मिताः ह्यनिमेषणाः । अवोचन् सर्व एवैते परस्परमथागताः ॥ ९ ॥ इमौ रामस्य सदृशौ बिम्बाद्बिम्बमिवोदितौ । जटिलौ यदि न स्यातां न च वल्कलधरिणौ ॥ १० ॥ विशेषं नाधिगच्छामो राघवस्यानयोस्तदा । एवं संवदतां तेषां विस्मितानां परस्परम् ॥ ११ ॥ उपचक्रमतुर्गातुं तावुभौ मुनिरादकौ । ततः प्रवृत्तं मधुरं गान्धर्वमतिमानुषम् ॥ १२ ॥ आपले पूर्व चरित्र गाईले जात आहे, असे प्रभू रामांनी ऐकले. तसेच ते गाणाऱ्या दोन मुलांची गायन करण्याची पद्धत अपूर्व आहे आणि ती स्वर-तालाने युक्त आहे, हे कानी येताच, राघवांना कुतूहल वाटले. तेव्हा यज्ञकर्माच्या मधल्या विश्रांतीच्या वेळी, नरशार्दूल राजा रामांनी महामुनी, राजे लोक, पंडित, वेदशास्त्र जाणणारे, पौराणिक, शब्दवेत्ते आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य जातीतील वृद्ध लोक या सर्वांना एकत्र बोलावले व त्या दोन गायक बालकांनाही बोलावून घेतले. ब्राह्मण इत्यादी सर्व लोक मनात आनंदित झाले. राम आणि ते दोन बालक यांना पाहिल्यावर सर्वजण विस्मित झाले. त्यांची पापणीही हलेनाशी झाली. ते सर्व जण परस्परांत बोलू लागले की, 'बिंबापासून प्रतिबिंब निर्माण व्हावे, त्या प्रमाणे हे दोन बालक अगदी श्रीरामांसारखेच आहेत. जर या दोघा बालकांना जटा नसत्या आणि जर त्या दोघांनी वल्कले धारण केली नसती तर ते दोघे आणि राघव यातील काहीच फरक आपणास कळला नसता.' आश्चर्यचकित झालेले लोक अशा प्रकारे परस्परांशी बोलत असतानाच, त्या दोन मुनिकुमारांनी गाण्यास प्रारंभ केला आणि तेथे एक अलौकिक मधुर गीत सुरू झाले. (५-१२) श्रुत्वा तन्मधुरं गीतं अपराह्णे रघूत्तमः । उवाच भरतं चाभ्यां दीयतामयुतं वसु ॥ १३ ॥ ते मधूर गीत ऐकल्यावर अपरान्ह काळी रघूत्तम भरताला म्हणाले, " या दोघांना दहा हजार सुवर्ण मुद्रा दे." (१३) दीयमानं सुवर्णं तु न तज्जगृहतुस्तदा । किमनेन सुवर्णेन राजन्नो वन्यभोजनौ ॥ १४ ॥ त्या दोघांनी त्या घेतल्या नाहीत. ते म्हणाले, "हे राजा, आम्ही दोघे वनातील फळे-मुळे खाणारे आहोत. आम्हांला या सुवर्णाचा काय उपयोग ?" (१४) इति सन्त्यज्य सन्दत्तं जग्मतुर्मुनिसन्निधिम् । एवं श्रुत्वा तु चरितं रामः स्वस्यैव विस्मितः ॥ १५ ॥ असे म्हणून दिलेले धन न घेता ते दोघे वाल्मीकी मुनींच्याजवळ गेले. स्वतःचेच चरित्र गाईले गेलेले ऐकून श्रीराम विस्मयचकित झाले. (१५) ज्ञात्वा सीताकुमारौ तौ शत्रुघ्नं चेदमब्रवीत् । हनूमन्तं सुषेणं च विभीषणमथाङ्गदम् ॥ १६ ॥ भगवन्तं महात्मानं वाल्मीकिं मुनिसत्तमम् । आनयध्वं मुनिवरं ससीतं देवसम्मितम् ॥ १७ ॥ ते दोघे बालक सीतेचे पुत्र आहेत हे हे कळल्यावर राम हे शत्रुघ्न, हनुमंत, सुषेण, बिभीषण आणि अंगद यांना म्हणाले. "देवासमान असणाऱ्या महात्मा, भगवान मुनिश्रेश्ठ वाल्मीकी मुनींना सीतेसह इकडे घेऊन या. (१६-१७) अस्यास्तु पर्षदो मध्ये प्रत्ययं जनकात्मजा । करोतु शपथं सर्वे जानन्तु गतकल्मषाम् ॥ १८ ॥ सीतां तद्वचनं श्रुत्वा गताः सर्वेऽतिविस्मिताः । ऊचुर्यथोक्तं रामेण वाल्मीकिं रामपार्षदाः ॥ १९ ॥ या सभेमध्ये सर्व सभासदांचा विश्वास बसावा म्हणून जनककन्या सीतेने शपथ घ्यावी. त्यामुळे सीता ही निष्कलंक आहे, हे सर्व लोकांना कळून येईल." ते वचन ऐकून सर्वजण अतिशय विस्मित झाले. रामांचे दूत मग वाल्मीकींकडे गेले आणि श्रीरामांनी जसे सांगितले होते तसे त्यांनी वालीकींना सांगितले. (१८-१९) रामस्य हृद्गतं सर्वं ज्ञात्वा वाल्मीकिरब्रवीत् । श्वः करिष्यति वै सीता शपथं जनसंसदि ॥ २० ॥ योषितां परमं दैवं पतिरेव न संशयः । तच्छ्रुत्वा सहसा गत्वा सर्वे प्रोचुर्मुनेर्वचः ॥ २१ ॥ राघवस्यापि रामोऽपि श्रुत्वा मुनिवचस्तथा । राजानो मुनयः सर्वे श्रुणुध्वमिति चाब्रवीत् ॥ २२ ॥ सीतायां शपथं लोका विजानन्तु सुभाशुभम् । इत्युक्ता राघवेणाथ लोकाः सर्वे दिदृक्षवः ॥ २३ ॥ ब्रह्मणाः क्षत्रिया वैश्याः शूद्राश्चैव महर्षयः । वानराश्च समाजग्मुः कौतूहलसमन्विताः ॥ २४ ॥ श्रीरामांचे सर्व हृद्गत जाणून वाल्मीकी म्हणाले, "उद्या लोकांच्या सभेत सीता शपथ घेईल. स्त्रियांच्या बाबतीत पती हाच श्रेष्ठ देव असतो, यात संशय नाही." ते ऐकून सेवक परत आले आणि त्यांनी मुनींचे वचन राघवाला सांगितले. ते ऐकल्यावर श्रीरामसुद्धा म्हणाले, "हे राजे लोकहो आणि मुनिहो, तुम्ही सर्व लोकांनी सीतेची शपथ ऐका आणि त्यावरून ती शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे, हे जाणून घ्या." असे राघवांनी म्हटल्यावर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तसेच शूद्र, महर्षी आणि वानर हे सर्व जण कुतूहलाने पाहाण्यासाठी सभेला आले. (२०-२४) ततो मुनिवरस्तूर्णं ससीतः समुपागमत् । अग्रतस्तमृषिं कृत्वा यान्ती किञ्चिदवाङ्मुखी ॥ २५ ॥ कृताञ्जलिर्बाष्पकण्ठा सीता यज्ञं विवेश तम् । दृष्ट्वा लक्ष्मीमिवायान्तीं ब्रह्माणमनुयायिनीम् ॥ २६ ॥ वाल्मीकेः पृष्ठतः सीतां साधुवादो महानभूत् । तदा मध्ये जनौघस्य प्रविश्य मुनिपुङ्गवः ॥ २७ ॥ सीतासहायो वाल्मीकिः इति प्राह च राघवम् । इयं दाशरथे सीता सुव्रता धर्मचारिणी ॥ २८ ॥ अपापा ते पुरा त्यक्ता ममाश्रमसमीपतः । लोकापवादभीतेन त्वया राम महावने ॥ २९ ॥ त्यानंतर मुनिश्रेष्ठ वाल्मीकी सीतेला घेऊन त्वरित तेथे आले. त्या ऋषींच्या मागोमाग येणाऱ्या किचिंत खाली पाहात असलेल्या, हात जोडलेल्या, गद्गद कंठ झालेल्या सीतेने यज्ञमंडपात प्रवेश केला. ब्रह्मदेवांच्या मागोमाग येणाऱ्या लक्ष्मीप्रमाणे, वाल्मीकीच्या मागोमाग येणाऱ्या सीतेला पाहून लोक ' धन्य, धन्य ', असे म्हणू लागले. तेव्हा सीतेला बरोबर घेऊन मुनिश्रेष्ठ वाल्मीकी लोकांच्या समुदायात शिरले आणि राघवांना म्हणाले, "हे दशरथपुत्र रामा, ही सीता पतिव्रता, धर्माचे आचरण करणारी, निष्पाप अशी असूनसुद्धा, हे रामा, लोकापवादाला भिऊन तुम्ही तिला भयंकर अरण्यात माझ्या आश्रमाच्याजवळ सोडून दिले होते. (२५-२९) प्रत्ययं दास्यते सीता तदनुज्ञातुमर्हसि । इमौ तु सीतातनयौ इमौ यमलजातकौ ॥ ३० ॥ आता ही आपल्या शुद्धतेची खात्री देईल. त्यास तुम्ही अनुज्ञा द्या. हे दोन सीतेचे पुत्र असून दोघे जुळे जन्मलेले होते. (३०) सुतौ तु तव दुर्धर्षौ तथ्यमेतद्ब्रवीमि ते । प्रचेतसोऽहं दशमः पुत्रो रघुकुलोद्वह ॥ ३१ ॥ हे दोघे दुर्जय वीर तुमचे पुत्र आहेत, हे सत्य आहे, तेच मी सांगतो. हे रघुकुलश्रेष्ठा, मी प्रजापतीचा दहावा पुत्र आहे. (३१) अनृतं न स्मराम्युक्तं तथेमौ तव पुत्रकौ । बहून्वर्षगणान् सम्यक् तपश्चर्या मया कृता ॥ ३२ ॥ मी कधी खोटे बोललो आहे, असे मला आठवत नाही. हे दोघे तुमचेच दोन पुत्र आहेत, हे सत्यच मी तुम्हाला सांगितले आहे. मी अने क वर्षे खूप तपश्चर्या केलेली आहे. (३२) नोपाश्नीयां फलं तस्या दुष्टेयं यदि मैथिली । वाल्मीकिनैवमुक्तस्तु राघवः प्रत्यभाषत ॥ ३३ ॥ ही मैथिली जर अपवित्र आचरणाची असेल तर मला माझ्या त्या तपश्चर्येचे कोणतेही फळ मिळणार नाही." वाल्मीकींनी अशा प्रकारे सांगितल्यावर राघवांनी प्रत्युत्तर दिले. (३३) एवमेतन्महाप्राज्ञ यथा वदसि सुव्रत । प्रत्ययौ जनितो मह्यं तव वाक्यैरकिल्बिषैः ॥ ३४ ॥ "हे महाज्ञानी सुव्रता, तुम्ही सांगितले ते तसेच आहे. तुमच्या सत्य वाक्यांनी मला सीतेविषयी विश्वास निर्माण झाला आहे.. (३४) लङ्कायामपि दत्तो मे वैदेह्या प्रत्ययो महान् । देवानां पुरतस्तेन मन्दिरे सम्प्रवेशिता ॥ ३५ ॥ लंकेमध्येसुद्धा सर्व देवांच्यासमोर वैदेहीने अग्निप्रवेश करून शुद्धतेची खात्री दिली होती. म्हणूनच मी तिला माझ्या घरात प्रवेश दिला होता. (३५) सेयं लोकभयाद्ब्रह्मन् अपापापि सती पुरा । सीता मया परित्यक्ता भवांस्तत्क्षन्तुमर्हति ॥ ३६ ॥ तथापि, हे ब्रह्मन्, लोकापवादामुळे सती सीता निर्दोष असूनसुद्धा मी पूर्वी तिचा त्याग केला होता. तुम्ही माझ्या या अपराधाची मला क्षमा करा. (३६) ममैव जातौ जानामि पुत्रावेतौ कुशीलवौ । शुद्धायां जगतीमध्ये सीतायां प्रीतिरस्तु मे ॥ ३७ ॥ हे कुश आणि लव हे दोन पुत्र सीतेला माझ्यापासून झाले आहेत, हेही मला माहीत आहे. येथे सभेमध्ये शुद्धी सिद्ध झाल्यावर या सीतेवर माझी प्रीती राहीलच." (३७) देवाः सर्वे परिज्ञाय रामाभिप्रायमुत्सुकाः । ब्रह्माणमग्रतः कृत्वा समाजग्मुः सहस्रशः ॥ ३८ ॥ प्रजाः समागमन् हृष्टाः सीता कौशेयवासिनी । उदङ्मुखी ह्यधोदृष्टिः प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् ॥ ३९ ॥ त्या वेळी श्रीरामांचा अभिप्राय जाणून सर्व देव अतिशय उत्सुक होऊन, ब्रह्मदेवांना पुढे करून, हजारोंच्या संख्येने तेथे एकत्र आले. तसेच हजारो प्रजाननसुद्धा आनंदित मनाने तेथे एकत्र जमले. त्या वेळी रेशमी वस्त्र धारण केलेल्या, उत्तरेकडे तोंड करून परंतु दृष्टी खाली केलेल्या सीतेने हात जोडले आणि ती म्हणाली. (३८-३९) रामदन्यं यथाहं वै मनसापि न चिन्तये । तथा मे धरणी देवी विवरं दातुमर्हति ॥ ४० ॥ "जर मी मनानेसुद्धा रामाखेरीज अन्य पुरुषाचा विचार केलेला नसेल तर, पृथ्वी देवी आपल्या पोटात मला आश्रय देवो." (४०) तथा शपन्त्याः सीतायाः प्रादुरासीन् महाद्भुतम् । भूतलाद्दिव्यमत्यर्थं सिंहासनमनुत्तमम् ॥ ४१ ॥ सीतेने अशी शपथ घेताच, तेथे भूमीच्या आतून एक अतिशय अदभुत, दिव्य आणि उत्तम असे सिंहासन प्रकट झाले. (४१) नागेन्द्रैर्ध्रियमाणं च दिव्यदेहै रविप्रभम् । भूदेवी जानकीं दोर्भ्यां गृहीत्वा स्नेहसंयुता ॥ ४२ ॥ स्वागतं तामुवाचैनां आसने संन्यवेशयत् । सिंहासनस्थां वैदेहीं प्रविशन्तीं रसातलम् ॥ ४३ ॥ निरन्तरा पुष्पवृष्टिः दिव्या सीतामवाकिरत् । साधुवादश्च सुमहान् देवानां परमद्भुतः ॥ ४४ ॥ सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारे ते सिंहासन दिव्य शरीर धारण करणाऱ्या नागराजांनी उचलून धरले होते. (त्या सिंहासनावर बसलेल्या) भूदेवीने आपल्या दोन्ही हातांनी जानकीला मोठ्या प्रेमाने धरले, तिचे स्वागत केले आणि शेजारी आसनावर बसविले. नंतर सिंहासनावर बसलेली सीता जेव्हा रसातळात प्रवेश करू लागली, तेव्हा तिच्यावर सतत दिव्य फुलांची वृष्टी होऊ लागली आणि देवांच्या मुखांतून अतिशय अद्भुत आणि फार मोठे 'धन्य, धन्य' असा शब्द बाहेर पडू लागला. (४२-४४) ऊचुश्च बहुधा वाचो ह्यन्तरिक्षगताः सुराः । अन्तरिक्षे च भूमौ च सर्वे स्थावरजङ्गमाः ॥ ४५ ॥ वानराश्च महकायाः सीताशपथकारणात् । केचिच्चिन्तापरास्तस्य केचिद्ध्यानपरायणाः ॥ ४६ ॥ केचिद्रामं निरीक्षन्तः केचित्सीतामचेतसः । मुहूर्तमात्रं तत्सर्वं तूष्णीभूतमचेतनम् ॥ ४७ ॥ सीतेने शपथ घेतल्यामुळे प्रचंड देह असणारे काही वानर चिंताग्रस्त झाले. आकाशात असलेले देव, अंतरिक्ष आणि पृथ्वी यांवरील सर्व स्थावर-जंगम प्राणी, नाना प्रकारचे शब्द उच्चारू लागले. त्या शपथेमुळे काही जण चिंताग्रस्त झाले, तर काही जण ध्यान-परायण झाले. काही जण श्रीरामांकडे पाहात राहिले, तर काही जण सीतेकडे पाहून गोंधळून गेले. काही काळपर्यंत सर्व लोक स्तब्ध आणि निश्चेष्ट होऊन गेले. (४५-४७) सीताप्रवेशनं दृष्ट्वा सर्वं सम्मोहितं जगत् । रामस्तु सर्वं ज्ञात्वैव भविष्यत्कार्यगौरवम् ॥ ४८ ॥ अजानन्निव दुःखेन शुशोच जनकात्मजाम् । ब्रह्मणा ऋषिभिः सार्धं बोधितो रघुनन्दनः ॥ ४९ ॥ सीतेने भूमीमध्ये प्रवेश केलेला पाहून सर्व जग संभ्रमित झाले. भविष्यात घडणाऱ्या घटनांचे सर्व महत्त्व जरी श्रीरामांना माहीत होते, तरी ते माहीत नसल्याप्रमाणे दुःखाने सीतेविषयी शोक करू लागले. त्या वेळी ऋषींसहित ब्रह्मदेवांनी रघुनंदनांना बोध केला. (४८-४९) प्रतिबुद्ध इव स्वप्नात् चकारानन्तराः क्रियाः । विससर्ज ऋषीन् सर्वान् ऋत्विजो ये समागताः ॥ ५० ॥ स्वप्नातून जागे झालेल्या माणसाप्रमाणे, भानावर आलेल्या श्रीरामांनी यज्ञाच्या उरलेल्या क्रिया समाप्त केल्या. नंतर एकत्र आलेल्या सर्व ऋषींना आणि ऋत्विजांना त्यांनी निरोप दिला. (५०) तान् सर्वान् धनरत्नाद्यैः तोषयामास भूरिशः । उपादाय कुमारौ तौ अयोध्यामगमत्प्रभुः ॥ ५१ ॥ त्या सर्वांना पुष्कळ धन, रत्ने इत्यादी देऊन श्रीरामांनी संतुष्ट केले. नंतर लव आणि कुश या दोघा कुमारांना बरोबर घेऊन, प्रभू राम अयोध्येत आले. (५१) ददादि निःस्पृहो रामः सर्वभोगेषु सर्वदा । आत्मचिन्तापरो नित्यं एकान्ते समुपस्थितः ॥ ५२ ॥ तेव्हापासून श्रीराम सर्व भोगांपासून विरक्त होऊन, सतत आत्मचिंतन करीत एकांतात राहू लागले. (५२) एकान्ते ध्याननिरते एकदा राघवे सति । ज्ञात्वा नारायणं साक्षात् कौसल्या प्रियवादिनी ॥ ५३ ॥ भक्त्यागत्य प्रसन्नं तं प्रणता प्राह हृष्टधीः । राम त्वं जगतामादिः आदिमध्यान्तवर्जितः ॥ ५४ ॥ एकदा एकांतात प्रभू राम ध्यानामध्ये निमग्र असताना, राम हे साक्षात नारायण आहेत हे जाणून, मधुर भाषिणी कौसल्या भक्तीने रामांजवळ आली आणि आनंदित मनाने नमस्कार करून, प्रसन्न असणाऱ्या रामांना ती म्हणाली, "हे रामा, तू सर्व जगाचे आदिकारण आहेस. तू आदि, मध्य आणि अंत यांनी रहित आहेस. (५३-५४) परमात्मा परानन्दः पूर्णः पुरुष ईश्वरः । जातोऽसि मे गर्भगृहे मम पुण्यातिरेकतः ॥ ५५ ॥ तू परमात्मा, परमानंद, पूर्ण व जीव रूपाने शरीररूपी नगरीत शयन करणारा आणि सर्वांचा ईश्वर आहेस. तरीसुद्धा माझ्या प्रबल पुण्यामुळे तू माझ्या गर्भात जन्माला आला आहेस. (५५) अवसाने ममाप्यद्य समयोऽभूद् रघुत्तम । नाद्याप्यबोधजः कृस्नो भवबन्धो निवर्तते ॥ ५६ ॥ हे रघूत्तमा, आता माझ्या वृद्धापकाळी तुला काही विचारण्यास संधी मिळाली आहे. अजूनसुद्धा माझा अज्ञानजन्य संसारबंध संपूर्णपणे तुटलेला नाही. (५६) इदानीमपि मे ज्ञानं भवबन्धनिवर्तकम् । यथा सङ्क्षेपतो भूयात् तथा बोधय मां विभो ॥ ५७ ॥ तेव्हा हे विभो, ज्यामुळे या स्थितींत माझ्या संसार बंधनाचा नाश करणारे ज्ञान मला प्राप्त होईल त्याचा तू मला संक्षेपाने बोध कर." (५७) निर्वेदवादिनीमेवं मातरं मातृवत्सलः । दयालु प्राह धर्मात्मा जराजर्जरितां शुभाम् ॥ ५८ ॥ मार्गास्त्रयो ममा प्रोक्ताः पुरा मोक्षाप्तिसाधकाः । कर्मयोगो ज्ञानयोगो भक्तियोगश्च शाश्वतः ॥ ५९ ॥ भक्तिर्विभिद्यते मातः त्रिविधा गुणभेदतः । स्वभावो यस्य यस्तेन तस्य भक्तिर्विभिद्यते ॥ ६० ॥ यस्तु हिंसां समुद्दिश्य दम्भं मात्सर्यमेव वा । भेददृष्टिश्च संरम्भी भक्तो मे तामसः स्मृतः ॥ ६१ ॥ अ शा प्रकारे वैराग्यपूर्ण वचन बोलणाऱ्या शुभलक्षणसंपन्न वृद्ध मातेला मातृभक्त, दयाळू आणि धर्मात्मा श्रीराम म्हणाले. "मोक्षाच्या प्राप्तीला साधनभूत होणारे तीन सनातन मार्ग मी पूर्वी सांगितले होते, ते म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. हे माते, सत्त्व इत्यादी गुणांच्या भेदामुळे भक्तीचे तीन प्रकार होतात. ज्याचा जसा स्वभाव असेल, त्या प्रमाणे त्या प्रकाराची त्याची भक्ती वेगळी असते. जो माणूस हिंसा, दंभ आणि मत्सर यांचा उद्देश मनात धरून भक्ती करतो, तसेच ज्याची भेद-दृष्टी असते आणि जो क्रोधी किंवा आग्रही असतो, अशा माझ्या भक्ताला तामस भक्त म्हणतात. (५८-६१) फलाभिसन्धिर्भोगार्थी धनकामो यशस्तथा । अर्चादौ भेदबुद्ध्या मां पूजयेत्स तु रजसः ॥ ६२ ॥ जो पुरुष फळाची इच्छा बाळगतो, जो भोगांची इच्छा करतो, तसेच जो द्रव्य आणि कीर्ती यांची इच्छा धरतो, आणि भेद-बुद्धीने स्वतःला व मला वेगळा समजून माझी पूजा करतो, तो राजस भक्त होय. (६२) परस्मिन्नर्पितं यस्तु कर्म निर्हरणाय वा । कर्तव्यमिति वा कुर्याद् भेदबुद्ध्या स सात्त्विकः ॥ ६३ ॥ जो पुरुष परमात्म्याला समर्पण करण्याच्या भावनेने कर्म करतो, अथवा कर्माचा क्षय करण्यासाठी निष्काम भावनेने किंवा हे माझे कर्तव्य आहे, या भावनेने सगुण भगवंताची उपासना मागून भेदबुद्धीने कर्म करतो, तो सात्त्विक भक्त होय. (६३) मद्गुणाश्रयणादेव मय्यनन्तगुणालये । अविच्छिन्न मनोवृत्तिः यथा गङ्गाम्बुनोऽम्बुधौ ॥ ६४ ॥ तदेव भक्तियोगस्य लक्षणां निर्गुणस्य हि । अहैतुक्यव्यवहिता या भक्तिर्मयि जायते ॥ ६५ ॥ सा मे सालोक्यसामीप्य सार्ष्टिसायुज्यमेव वा । ददात्यपि न गृह्णन्ति भक्ता मत्सेवनं विना ॥ ६६ ॥ स एवात्यन्तिको योगो भक्तिमार्गस्य भामिनि । मद्भावं प्राप्नुयात्तेन अतिक्रम्य गुणत्रयम् ॥ ६७ ॥ ज्या प्रमाणे गंगेचे पाणी हे अखंडपणे समुद्रात लीन होत असते, त्याप्रमाणे माणसाची मनोवृत्ती माझ्या गुणांच्या आश्रयानेच अनंत गुणांचे घर असणाऱ्या माझ्या ठिकाणी अविच्छिन्नपणे लागून राहाते, तेच माझ्या निर्गुण भक्तियोगाचे लक्षण आहे. तेव्हा माझ्या ठिकाणी निष्कामपणाने आणि सातत्याने जी भक्ती उत्पन्न होते, ती भक्ती भक्ताला माझी सालोक्य, सामिप्य, सार्ष्टि, आणि सायुज्य अशी चार प्रकारची मुक्ती मिळवून देते. तथापि माझे भक्त माझ्या सेवेऐवजी अन्य काहीही ग्रहण करीत नाहीत. हे माते, भक्तिमार्गाचा हाच आत्यंतिक योग आहे. भक्तियोगाने माझा भक्त तीन गुणांचे पलीकडे जाऊन, माझे स्वरूप प्राप्त करून घेतो. (६४-६७) महता कामहीनेन स्वधर्माचरणेन च । कर्मयोगेन शस्तेन वर्जितेन विहिंसनात् ॥ ६८ ॥ मद्दर्शनस्तुति महा-पूजाभिः स्मृतिवन्दनैः । भूतेषु मद्भावनया सङ्गेनासत्यवर्जनैः ॥ ६९ ॥ बहुमानेन महतां दुःखिनामनुकम्पया । स्व-समानेषु मैत्र्या च यमादीनां निषेवया ॥ ७० ॥ वेदान्तवाक्यश्रवणान् मम नामानुकिर्तनात् । सत्सङ्गेनार्जवेनैव ह्यहमः परिवर्जनात् ॥ ७१ ॥ काङ्क्षया मम धर्मस्य परिशुद्धान्तरो जनः । मद्गुणश्रवणादेव याति मामञ्जसा जनः ॥ ७२ ॥ ज्याला कोणतीही इच्छा नसते, जो हिंसेने रहित आहे, जो स्वधर्माचे आचरण करतो, अशा प्रशस्त कर्मयोगाच्याद्वारा माझे दर्शन, माझी स्तुती, माझी महापूजा करून, माझे स्मरण आणि मला वंदन करून, भूतांचे ठिकाणी मी म्हणजे ईश्वर आहे अशी भावना धरतो. आसक्ती सोडून, असत्याचा त्याग करतो, महापुरुषांना अथवा वडीलधाऱ्या माणसांना बहुमान देतो, दुःखी लोकांवर दया दाखवितो, स्वतःशी समान असणाऱ्या माणसाशी मैत्री करून, यम-नियम इत्यादींचे पालन करतो, वेदांत वाक्यांचे श्रवण करतो, माझ्या नावाचे गुणगान करतो, सत्संग करतो, सर्वांशी सरळपणाने वागतो, अहंकाराचा त्याग करतो, माझ्या भागवत धर्माची इच्छा धरतो आणि ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे, असा माणूस माझ्या गुणांचे श्रवण करूनच अनायासे माझ्याप्रत येतो. (६८-७२) यथा वायुवशाद्गन्धः स्वाश्रयाद् घ्राणमाविशेत् । योगाभ्यास रतं चित्तं एवामात्मानमाविशेत् ॥ ७३ ॥ ज्या प्रमाणे वायूच्या मार्फत गंध आपला आश्रय सोडून घाणेंद्रियात प्रवेश करतो, त्याप्रमाणे योगाच्या अभ्यासात निमग्न झालेले चित्त आत्म्यामध्येच लीन होऊन जाते. ७३ सर्वेषु प्राणिजातेषु ह्यहमात्मा व्यवस्थितः । तमज्ञात्वा विमूढात्मा कुरुते केवलं बहिः ॥ ७४ ॥ सर्व प्राणिजातामध्ये आत्म्याच्या रूपाने मीच आहे, हे त्या आत्म्याला न जाणता मूढ मनाचा माणूस केवळ बाह्य गोष्टींत रमून जातो. (७४) क्रियोत्पन्नैर्नैकभेदैः द्रव्यैर्मे नाम्ब तोषणम् । भूतावमानिनार्चायां अर्चितोऽहं न पूजितः ॥ ७५ ॥ हे माते, कर्मांनी उत्पन्न होणाऱ्या अनेक प्रकारच्या पदार्थांनी मला संतोष होत नाही. प्राण्यांचा अपमान करणाऱ्या माणसाने जरी माझी पूजा केली, तरी त्याने मी पूजिला जातो, असे मात्र होत नाही. (७५) तावन्मामर्चयेद्देवं प्रतिमादौ स्वकर्मभिः । यावत्सर्वेषु भूतेषु स्थितं चात्मनि न स्मरेत् ॥ ७६ ॥ जोपर्यंत सर्व भूतांमध्ये तसेच स्वतःच्या देहात मी ईश्वर आहे, ही गोष्ट लक्षात येत नाही, तोपर्यंत माणसाने स्वतःच्या कर्मांनी प्रतिमा इत्यादींमध्ये देव म्हणून माझी पूजा करावी. (७६) यस्तु भेदं प्रकुरुते स्वात्मनश्च परस्य च । भिन्नदृष्टेर्भयं मृत्युः तस्य कुर्यान्न संशयः ॥ ७७ ॥ जे कोणी स्वतःचा जीवात्मा आणि परमात्मा यांमध्ये भेद करतात, त्या भेदबुद्धीच्या सर्व माणसांना मृत्यू हा भय दाखवितो, यांत संशय नाही. (७७) मामतः सर्वभूतेषु परिच्छिन्नेषु संस्थितम् । एकं ज्ञानेन मानेन मैत्र्या चार्चेदभिन्नधिः ॥ ७८ ॥ म्हणून देहधारी सर्व भूतांमध्ये मी एकटाच वास करीत असतो, असे जाणून अभेद-बुद्धी बाळगून माणसाने ज्ञान, मान आणि मैत्री या रूपांनी माझी पूजा करावी. (७८) चेतसैवानिशं सर्व-भूतानि प्रणमेत्सुधीः । ज्ञात्वा मां चेतनं शुद्धं जीवरूपेण संस्थितम् ॥ ७९ ॥ तस्मात् कदाचित् नेक्षेत भेदमीश्वरजीवयोः । भक्तियोगो ज्ञानयोगो मया मातरुदीरितः ॥ ८० ॥ आलम्ब्यैकतरं वापि पुरुषः शुभमृच्छति । ततो मां भक्तियोगेन मातः सर्वहृदि स्थितम् ॥ ८१ ॥ पुत्ररूपेण वा नित्यं स्मृत्वा शान्तिमवाप्स्यसि । श्रुत्वा रामस्य वचनं कौसल्यानन्दसंयुता ॥ ८२ ॥ रामं सदा हृदि ध्यात्वा छित्त्वा संसारबन्धनम् । अतिक्रम्य गतीस्तिस्रोऽपि अवाप परमां गतिम् ॥ ८३ ॥ कैकेयी चापि योगं रघुपतिगदितं पूर्वमेवाधिगम्य श्रद्धाभक्तिप्रशान्ता हृदि रघुतिलकं भावयन्ती गतासुः । गत्वा स्वर्गं स्फुरन्ती दशरथसहिता मोदमानावतस्थे माता श्रीलक्ष्मणस्याप्यतिविमलमतिः प्राप भर्तुः समीपम् ॥ ८४ ॥ अशा प्रकारे चेतन, शुद्ध असा मीच सर्व प्राण्यांचे ठायी जीवरूपाने राहात असतो, हे जाणून बुद्धिमान पुरुषाने अंतःकरणपूर्वक सर्व भूतांना सतत प्रणाम करावा. म्हणून जीव आणि ईश्वर यांत भेद आहे, असे कधीही मानू नये. हे माते, भक्तियोग आणि ज्ञानयोग मी तुला सांगितला. यांपैकी कोणत्याही एकाचा अवलंब करून, माणूस आत्यंतिक कल्याण प्राप्त करून घेतो. म्हणून हे माते सर्वांच्या हृदयात मीच राहातो किंवा मी तुझा पुत्र आहे, हे लक्षात घेऊन, भक्तियोगाचेद्वारा जर तू सतत माझे स्मरण करशील, तर तुला शांती प्राप्त होईल." श्रीरामांचे हे असे वचन ऐकल्यावर कौसल्या आनंदित झाली. हृदयात श्रीरामांचे सदा ध्यान केल्याने, संसाराचे बंधन तोडून आणि तिन्ही प्रकारच्या गतीचे उल्लंघन करून, ती परम गतीला गेली. रघुपतीनी सांगितलेला योग कैकेयीला अगोदरच चित्रकूट पर्वतावर प्राप्त झालेला होता. श्रद्धा आणि भक्ती यांनी अत्यंत शांत झालेली कैकेयी रघुतिलक श्रीरामांचे चिंतन करीत असे. पुढे मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर तिला दिव्य कांती प्राप्त झाली व तेथे ती दशरथासह आनंदाने राहू लागली. याच प्रमाणे अतिशय निर्मळ मन असणारी, लक्ष्मणाची माता सुमित्रासुद्धा आपल्या पतीच्याजवळ पोचली. (७९-८४) इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥ इति श्रीमद्अध्याल्परामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥ |