भ्रात्रासह वैरकारणस्य कथनप्रसंगे सुग्रीवेण स्वकर्तृके वालिनः प्रसादने वालिकर्तृके च स्वस्य निष्कासने घटितस्य वृत्तांतस्य वर्णनम् -
|
भावाबरोबरच्या वैराचे कारण सांगण्याच्या प्रसंगी सुग्रीवाने वालीची मनधरणी केली तो, आणि वालीद्वारा आपल्याला हाकलून देण्यात आल्याचा वृत्तांत ऐकविणे -
|
ततः क्रोधसमाविष्टं संरब्धं तमुपागतम् । अहं प्रसादयाञ्चक्रे भ्रातरं प्रियकाम्यया ॥ १ ॥
|
(सुग्रीव सांगतात-) त्यानंतर क्रोधाविष्ट होऊन तसेच विक्षुब्ध होऊन आलेल्या आपल्या मोठ्या भावाला त्याचे हित करण्याच्या इच्छेने मी पुन्हा प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू लागलो. ॥१॥
|
दिष्ट्यासि कुशली प्राप्तो निहतश्च त्वया रिपुः । अनाथस्य हि मे नाथस्त्वमेको नाथनंदनः ॥ २ ॥
|
’मी म्हटले - अनाथनंदन ! सौभाग्याची गोष्ट आहे की आपण सकुशल परत आला आहात आणि तो शत्रु आपल्या हातून मारला गेला आहे. मी आपल्या शिवाय अनाथ झालो होतो. आता एकमात्र आपणच माझे नाथ आहात. ॥२॥
|
इदं बहुशलाकं ते पूर्णचंद्रमिवोदितम् । छत्रं सवालव्यजनं प्रतीच्छस्व मयोद्यतम् ॥ ३ ॥
|
’हे बर्याचशा शलाकांनी युक्त आणि उदित झालेल्या पूर्ण चंद्रम्याप्रमाणे श्वेत छत्र मी आपल्या मस्तकावर धरतो आणि चवरी ढळतो. आपण यांचा स्वीकार करावा. ॥३॥
|
आर्तश्चाथ बिलद्वारि स्थितः संवत्सरं नृप । दृष्ट्वाहं शोणितं द्वारि बिलाच्चापि समुत्थितम् ॥ ४ ॥
शोकसंविग्नहृदये भृशं व्याकुलितेंदियः ।
|
’वानरराज ! मी अत्यंत दुःखी होऊन एक वर्षपर्यंत त्या बिळाच्या द्वारावर उभा होतो. त्यानंतर बिळाच्या आतून रक्ताची धार निघाली. द्वारावर ते रक्त पाहून माझे हृदय शोकाने उद्विग्न झाले आणि माझी इंद्रिये अत्यंत व्याकुळ झाली. ॥४ १/२॥
|
अपिधाय बिलद्वारं शैलशृङ्गेण तत् तदा ॥ ५ ॥
तस्माद्देशादपाक्रम्य किष्किंधां प्राविशं पुनः ।
|
’तेव्हा बिळाच्या द्वारावर एका पर्वताचे शिखर ठेवून ते झाकून मी त्या स्थानापासून दूर झालो आणि पुन्हा किष्किंधापुरीत निघून आलो. ॥५ १/२॥
|
विषादात्त्विह मां दृष्ट्वा पौरैर्मंत्रिभिरेव च ॥ ६ ॥
अभिषिक्तो न कामेन तन्मे त्वं क्षंतुमर्हसि ।
|
’येथे विषादपूर्वक मला एकट्यालाच परत आलेला पाहून पुरवासी लोक आणि मंत्र्यांनीच या राज्यावर माझा अभिषेक केला. मी स्वेच्छेने हे राज्य ग्रहण केलेले नाही. म्हणून अज्ञानवश झालेल्या माझ्या या अपराधाची आपण क्षमा करावी. ॥६ १/२॥
|
त्वमेव राजा मानार्हः सदा चाहं यथापुरम् ॥ ७ ॥
राजभावनियोगो ऽयं मया त्वद्विरहात्कृतः ।
|
’आपणच येथील सन्माननीय राजे आहात. आणि मी सदा आपला पूर्ववत् सेवक आहे. आपल्या वियोगामुळेच राजाच्या पदावर माझी ही नियुक्ती केली गेली आहे. ॥७ १/२॥
|
सामात्यपौरनगरं स्थितं निहतकणऽटकम् ॥ ८ ॥
न्यासभूतमिदं राज्यं तव निर्यातयाम्यहम् ।
|
’मंत्री, पुरवासी तसेच नगरसहित आपले हे सारे अकंटक राज्य माझ्या जवळ ’अमानत’ (ठेवी)च्या रूपात ठेवले गेले होते. आता मी हे आपल्या सेवेत परत करीत आहे. ॥८ १/२॥
|
मा च रोषं कृथाः सौम्य मयि शत्रुनिबर्हण ॥ ९ ॥
याचे त्वां शिरसा राजन् मया बद्धो ऽयमञ्जलिः ।
|
’सौम्य ! शत्रुसूदन ! आपण माझ्यावर क्रोध करू नये. राजन ! मी यासाठी मस्तक नमवून प्रार्थना करीत आहे आणि हात जोडत आहे. ॥९ १/२॥
|
बलादस्मि समागम्य मंत्रिभिः पुरवासिभिः ॥ १० ॥
राजभावे नियुक्तो ऽहं शून्यदेशजिगीषया ।
|
’मंत्री तसेच पुरवासी लोकांनी जबरदस्तीने मला या राज्यावर बसविले आहे. तेही अशासाठी की राजा रहित राज्य पाहून कुणी शत्रु हे जिंकण्याच्या इच्छेने आक्रमण करू नये.’ ॥१० १/२॥
|
स्निग्धमेवं ब्रुवाणं मां स तु निर्भर्त्स्य वानरः ॥ ११ ॥
धिक् त्वामिति च मामुक्त्वा बहु तत्तदुवाच ह ।
|
’मी या सर्व गोष्टी अत्यंत प्रेमाने सांगितल्या होत्या, परंतु त्या वानराने मला दटावून म्हटले - ’तुझा धिक्कार आहे’ असे म्हणून त्याने मला आणखी ही बर्याच कठोर गोष्टी ऐकविल्या. ॥११ १/२॥
|
प्रकृतीश्च समानीय मंत्रिणश्चैव सम्मतान् ॥ १२ ॥
मामाह सुहृदां मध्ये वाक्यं परमगर्हितम् ।
|
’त्यानंतर त्याने प्रजाजनांना आणि मंत्र्यांना बोलाविले आणि सुहृदांमध्ये माझ्या प्रति अत्यंत निंदित वचने बोलला. ॥१२ १/२॥
|
विदितं वो यथा रात्रौ मायावी स महासुरः ॥ १३ ॥
मां समाह्वयत क्रूरो युद्धकाङ्क्षी सुदुर्मतिः ।
|
’तो म्हणाला- ’ आपण लोकांना माहीत असेल की एक दिवशी रात्री माझ्याशी युद्ध करण्याच्या इच्छेने मायावी नामक महान् असुर येथे आला होता. त्याने क्रोधाने खवळून पहिल्याने मला युद्धासाठी ललकारले. ॥१३ १/२॥
|
तस्य तद्वचनं श्रुत्वा निस्सृतो ऽहं नृपालयात् ॥ १४ ॥
अनुयातश्च मां तूर्णमयं भ्राता सुदारुणः ।
|
’त्याचे ते ललकारणे ऐकून मी राजभवनातून बाहेर पडलो. त्या समयी हा क्रूर स्वभावाचा माझा भाऊही ताबडतोबच माझ्या पाठोपाठ आला. ॥१४ १/२॥
|
स तु दृष्टैव मां रात्रौ सद्वितीयं महाबलः ॥ १५ ॥
प्राद्रवद्भयसंत्रस्तो वीक्ष्यावां तमनुद्रुतौ । अनुद्रुतश्च वेगेन प्रविवेश महाबिलम् ॥ १६ ॥
|
’जरी तो असुर फार बलवान् होता तथापि मला एका दुसर्या सहायकासह पाहूनच भयभीत होऊन त्या रात्री पळून गेला. आम्हा दोघा भावांना येताना पाहून तो अत्यंत वेगाने पळाला आणि एका विशाल गुफेत घुसला. ॥१५-१६॥
|
तं प्रविष्टं विदित्वा तु सुघोरं सुमहद्बिलम् । अयमुक्तो ऽथ मे भ्राता मया तु क्रूरदर्शनः ॥ १७ ॥
|
’त्या अत्यंत भयंकर विशाल गुफेत त्या असुराला घुसलेला जाणून मी आपल्या या क्रूरदर्शी भावाला म्हटले - ॥१७॥
|
अहत्वा नास्ति मे शक्तिः प्रतिगंतुमितः पुरीम् । बिलद्वारि प्रतीक्ष त्वं यावदेनं निहन्म्यहम् ॥ १८ ॥
|
’सुग्रीवा ! या शत्रुला मारल्याशिवाय मी येथून किष्किंधापुरीला परत येण्यास असमर्थ आहे; म्हणून जो पर्यंत मी या असुरास मारून परत येणार नाही तोपर्यंत तू या गुफेच्या दरवाजावर राहून माझी प्रतिक्षा कर.’ ॥१८॥
|
स्थितो ऽयमिति मत्वा तु प्रविष्टो ऽहं दुरासदम् । तं च मे मार्गमाणस्य गतः संवत्सरस्तदा ॥ १९ ॥
|
’असे सांगून आणि ’तो तर येथेच उभा आहे’ असा विश्वास ठेवून मी त्या अत्यंत दुर्गम गुफेत प्रविष्ट झालो. आत जाऊन मी त्या दानवाचा शोध करू लागलो आणि यांतच तेथे माझा एका वर्षाचा काळ व्यतीत झाला. ॥१९॥
|
स तु दृष्टो मया शत्रुरनिर्वेदाद्भयावहः । निहतश्च मया तत्र सो ऽसुरो बंधुभिः सह ॥ २० ॥
|
यानंतर मी त्या भयंकर शत्रुला पाहिले. इतके दिवसपर्यत तो सापडला नाही तरी माझ्या मनांत कुठलेही क्लेश अथवा उदासीनता आली नव्हती. मी त्याला त्याच्या समस्त बंधुबान्धवांसहित तात्काळ काळाच्या मुखात रवाना केले. ॥२०॥
|
तस्यास्यात्तु प्रवृत्तेन रुधिरौघेण तद्विलम् । पूर्णमासीद्दुराक्रामं स्तनतस्तस्य भूतले ॥ २१ ॥
|
’त्याच्या मुखातून आणि छातीतून भूतलावर रक्ताचा असा प्रवाह सुरू झाला की त्याने ती सारी गुफा भरून गेली. ॥२१॥
|
सूदयित्वा तु तं शत्रुं विक्रांतं दुंदुभेः सुतम् । निष्क्रामन्नैव पश्यामि बिलस्य पिहितं मुखम् ॥ २२ ॥
|
’याप्रकारे त्या पराक्रमी शत्रुचा सुखपूर्वक वध करून जेव्हा मी परतलो तेव्हा मला बाहेर निघण्यास कुठलाही मार्गच दिसून आला नाही, कारण की बिळाचा दरवाजा बंद केला गेला होता. ॥२२॥
|
विक्रोशमानस्य तु मे सुग्रीवेति पुनःपुनः । यदा प्रतिवचो नास्ति ततो ऽहं भृशदुःखितः ॥ २३ ॥
|
’मी ’सुग्रीव ! सुग्रीव ! असे म्हणून वारंवार हाका मारल्या, परंतु काही उत्तर मिळाले नाही, यामुळे मला फार दुःख झाले. ॥२३॥
|
पादप्रहारैस्तु मया बहुभिस्तद्विदारितम् । ततो ऽहं तेन निष्क्रम्य पथा पुरमुपागतः ॥ २४ ॥
|
’मी वारंवार लाथा मारून कसा तरी एकदा त्या शिळेला मागील बाजूस ढकलले. यानंतर गुफेच्या द्वारातून निघून इकडे येण्याचा मार्ग पकडून मी या नगरात परत आलो आहे. ॥२४॥
|
अत्रानेनास्मि संरुद्धो राज्यं प्रार्थयता ऽ ऽत्मनः । सुग्रीवेण नृशंसेन विस्मृत्य भ्रातृसौहृदम् ॥ २५ ॥
|
’हा सुग्रीव असा क्रूर आणि निर्दय आहे की त्याने भ्रातृप्रेमाचे स्मरण ठेवले नाही आणि सारे राज्य आपल्या हातात घेण्यासाठी मला त्या गुफेच्या आत बंद करून ठेवले होते.’ ॥२५॥
|
एवमुक्त्वा तु मां तत्र वस्त्रेणैकेन वानरः । निर्वासयामास तदा वाली विगतसाध्वसः ॥ २६ ॥
|
’असे म्हणून वानरराज वालीने निर्भयतापूर्वक मला घरांतून घालवून दिले. त्यासमयी माझ्या शरीरावर एकच वस्त्र राहिलेले होते. ॥२६॥
|
तेनाहमपविद्धश्च हृतदारश्च राघव । तद्भायाच्च मही क्रांतेयं सवनार्णवाम् ॥ २७ ॥
ऋश्यमूकं गिरिवरं भार्याहरणदुःखितः । प्रविष्टो ऽस्मि दुराधर्षं वालिनः कारणांतरे ॥ २८ ॥
|
’राघवा ! त्याने मला घरांतून तर घालवून दिलेच, माझ्या स्त्रीलाही हिरावून घेतले. त्याच्या भयाने मी वने आणि समुद्रांसहित सार्या पृथ्वीवर भटकत राहिलो. अंततोगत्वा मी भार्या हरणाच्या दुःखाने दुःखी होऊन या श्रेष्ठ ऋष्यमूक पर्वतावर निघून आलो; कारण एका विशेष कारणामुळे वालीसाठी या स्थानावर आक्रमण करणे फार कठीण आहे. ॥२७-२८॥
|
एतत्ते सर्वमाख्यातं वैरानुकथनं महत् । अनागसा मया प्राप्तं व्यसनं पश्य राघव ॥ २९ ॥
|
’राघवा ! हीच वाली बरोबर माझे वैर झाल्याची विस्तृत कथा आहे. ही सर्व मी आपल्याला ऐकविली आहे. पहा, काही अपराध नसतांनाही मला हे सर्व संकट भोगावे लागत आहे. ॥२९॥
|
वालिनस्तु भयार्तस्य सर्वलोकाभयङ्कर । कर्तुमर्हसि मे वीर प्रसादं तस्य निग्रहात् ॥ ३० ॥
|
’वीरवर ! आपण संपूर्ण जगताचे भय दूर करणारे आहात. माझ्यावर कृपा करावी आणि वालीचे दमन करून त्याच्या भयापासून सोडवावे. ॥३०॥
|
एवमुक्तस्तु तेजस्वी धर्मज्ञो धर्मसंहितम् । वचनं वक्तुमारेभे सुग्रीवं प्रहसंनिव ॥ ३१ ॥
|
सुग्रीवाने असे म्हटल्यावर धर्माचे ज्ञाते परम तेजस्वी श्रीरामांनी त्यास जणु हसत हसत हे धर्मयुक्त वचन सांगण्यास आरंभ केला- ॥३१॥
|
अमोघाः सूर्यसंकाशा ममैते निशिताः शराः । तस्मिन् वालिनि दुर्वृत्ते निपतिष्यंति वेगिताः ॥ ३२ ॥
|
’मित्रा ! हे माझे सूर्यासारखे तेजस्वी तीक्ष्ण बाण अमोघ आहेत, जे दुराचारी वालीवर रोषपूर्वक पडतील. ॥३२॥
|
यावत्तं नाभिपश्यामि तव भार्यापहारिणम् । तावत्स जीवेत् पापात्मा वाली चारित्रदूषकः ॥ ३३ ॥
|
’जोपर्यंत तुमच्या भार्येचे अपहरण करणार्या त्या वानरास मी माझ्या समोर पहात नाही आहे तोपर्यंतच सदाचारास कलंकित करणारा तो पापात्मा वाली जीवन धारण करेल. ॥३३॥
|
आत्मानुमानात् पश्यामि मग्नं त्वां शोकसागरे । त्वामहं तारयिष्यामि कामं प्राप्स्यसि पुष्कलम् ॥ ३४ ॥
|
’मी माझ्याच अनुमानावरून समजत आहे की तुम्ही शोक सागरात बुडलेले आहात. मी तुमचा उद्धार करीन. तुम्ही आपली पत्नी तसेच विशाल राज्यासही अवश्य प्राप्त कराल.’ ॥३४॥
|
तस्य तद्वचनं श्रुत्वा राघवस्यात्मनो हितम् । सुग्रिवः परमप्रीतः सुमहद्वाक्यमब्रवीत् ॥ ३५ ॥
|
श्रीरामांचे हे वचन हर्ष आणि पुरुषार्थ यांची वृद्धि करणारे होते. ते ऐकून सुग्रीवास फारच प्रसन्नता वाटली. नंतर ते फारच महत्वपूर्ण गोष्ट सांगू लागले. ॥३५॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे दशमः सर्गः ॥ १० ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा दहावा सर्ग पूरा झाला. ॥१०॥
|