[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ पञ्चषष्टितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
हनुमता श्रीरामं प्रति सीतावृत्तान्तस्य निवेदनम् -
हनुमनांनी श्रीरामास सीतेचा समाचार ऐकविणे -
ततः प्रस्रवणं शैलं ते गत्वा चित्रकाननम् ।
प्रणम्य शिरसा रामं लक्ष्मणं च महाबलम् ॥ १ ॥

युवराजं पुरस्कृत्य सुग्रीवमभिवाद्य च ।
प्रवृत्तिमथ सीतायाः प्रवक्तुमुपचक्रमुः ॥ २ ॥
त्यानन्तर विचित्र काननांनी सुशोभित प्रस्त्रवण पर्वतावर जाऊन युवराज अंगदास पुढे करून श्रीराम, महाबली लक्ष्मण आणि सुग्रीवास मस्तक नमवून प्रणाम केल्यानन्तर सर्व वानरांनी सीतेच्या समाचार ऐकविण्यास आरंभ केला.॥ १-२॥
रावणान्तःपुरे रोधं राक्षसीभिश्च तर्जनम् ।
रामे समनुरागं च यश्चायं नियमः कृतः ॥ ३ ॥

एतदाख्याय ते सर्वे हरयो रामसंनिधौ ।
वैदेहीमक्षतां श्रुत्वा रामस्तूत्तरमब्रवीत् ॥ ४ ॥
'सीता देवीला रावणाच्या अन्त:पुरात अडवून ठेवलेली असून राक्षसी तिला धमकावीत असतात. श्रीरामाच्या ठिकाणी तिचे अनन्य प्रेम आहे. रावणाने सीतेला जिवन्त राहण्यासाठी केवळ दोन महिन्याचा अवधि दिला आहे. यावेळेपर्यन्त वैदेहीला कुठलीही इजा पोहोचलेली नाही. ती सकुशल आहे. श्रीरामचन्द्रांच्या जवळ या सर्वगोष्टी सांगून ते वानर गप्प बसले. वैदेही सकुशल आहे हा समाचार ऐकून श्रीरामांनी पुढील गोष्टी विचारण्यासाठी म्हटले—॥३-४॥
क्व सीता वर्तते देवी कथं च मयि वर्तते ।
एतन्मे सर्वमाख्यात वैदेहीं प्रति वानराः ॥ ५ ॥
'वानरांनो, देवी सीता कोठे आहे ? माझ्या प्रति तिचा कसा भाव आहे ? वैदेही संबन्धी या सर्व गोष्टी मला सांगा.' ॥५॥
रामस्य गदितं श्रुत्वा हरयो रामसंनिधौ ।
चोदयन्ति हनूमन्तं सीतावृत्तान्तकोविदम् ॥ ६ ॥
श्रीरामचन्द्रांचे हे बोलणे ऐकून ते वानर श्रीरामाजवळ सीतेचा वृत्तान्त उत्तम प्रकारे जाणणार्‍या हनुमानाला उत्तर देण्यासाठी प्रेरित करू लागले.॥६॥
श्रुत्वा तु वचनं तेषां हनुमान् मारुतात्मजः ।
प्रणम्य शिरसा देव्यै सीतायै तां दिशं प्रति ॥ ७ ॥
त्या वानरांचे म्हणजे ऐकून पवनपुत्र हनुमानांनी प्रथम देवी सीतेच्या उद्देश्याने दक्षिण दिशेकडे मस्तक नमवून प्रणाम केला.॥७॥
उवाच वाक्यं वाक्यज्ञः सीताया दर्शनं यथा ।
तं मणिं काञ्चनं दिव्यं दीप्यमानं स्वतेजसा ॥ ८ ॥

दत्त्वा रामाय हनुमांस्ततः प्राञ्जलिरब्रवीत्
नन्तर संभाषण करण्याची कला जाणणार्‍या त्या वानरवीराने सीतेचे दर्शन ज्याप्रकारे झाले तो सर्व वृत्तान्त श्रीरामास ऐकविला त्यानन्तर आपल्या स्वत:च्या तेजाने प्रकाशित होणार्‍या दिव्य कांचनमणि श्रीरामांच्या हातात देऊन हनुमान हात जोडून म्हणाले—॥८ १/२॥
समुद्रं लङ्‌घयित्वाऽहं शतयोजनमायतम् ॥ ९ ॥

अगच्छं जानकीं सीतां मार्गमाणो दिदृक्षया ।
'प्रभो ! मी जनकनन्दिनी सीतेचे दर्शन घेण्याच्या इच्छेने तिचा शोध घेण्यासाठी शंभर योजने विस्तृत समुद्र उल्लंघन करून त्याच्या दक्षिण किनार्‍यावर जाऊन पोहोंचलो.॥९ १/२॥
तत्र लङ्‌केति नगरी रावणस्य दुरात्मनः ॥ १० ॥

दक्षिणस्य समुद्रस्य तीरे वसति दक्षिणे ।
'तेथे दुरात्मा रावणाची नगरी लङ्‌का आहे. ती समुद्राच्या दक्षिण तटावर वसलेली आहे. ॥१० १/२॥
तत्र दृष्टा मया सीता रावणान्तःपुरे सती ॥ ११ ॥

संन्यस्य त्वयि जीवन्ती रामा राम मनोरथम् ।
दृष्टा मे राक्षसीमध्ये तर्ज्यमाना मुहुर्मुहुः ॥ १२ ॥

राक्षसीभिर्विरूपाभी रक्षिता प्रमदावने ।
'श्रीरामा ! लंकेत पोहोचल्यावर मी रावणाच्या अन्तः:पुरान्तील प्रमदावनात राक्षसींच्या मध्ये बसलेल्या सती साध्वी सुन्दरी देवी सीतेचे दर्शन केले. ती तिच्या सर्व अभिलाषा आपल्या ठिकाणी केन्द्रित करून कशी तरी जीवन धारण करीत आहे. विक्राल रूपाच्या राक्षसी तिच्यावर पहारा देत तिची रखवाली करीत आहेत आणि वारंवार तिला दटावीत व धमकावीत (आहेत) असतात.॥११-१२ १/२॥
दुःखमापद्यते देवी त्वया वीर सुखोचिता ॥ १३ ॥

रावणान्तःपुरे रुद्धा राक्षसीभिः सुरक्षिता ।
एकवेणीधरा दीना त्वयि चिन्तापरायणा ॥ १४ ॥
'वीरवर ! देवीसीता आपल्या बरोबर सुख भोगण्यास योग्य असूनही यावेळी अत्यन्त दु:खात दिवस घालवीत आहे. तिला रावणाच्या अन्त:पुरात रोखून ठेवलेले आहे आणि ती राक्षसींच्या पहार्‍यात राहात आहे. मस्तकावर एक वेणी धारण करून दु:खी होऊन ती सदा आपल्या चिन्तेमध्ये मग्न झालेली असते.॥१३-१४॥
अधःशय्या विवर्णाङ्‌गी पद्मिनीव हिमागमे ।
रावणाद्विनिवृत्तार्था मर्तव्यकृतनिश्चया ॥ १५ ॥
'ती खाली जमिनीवर झोपत असते. जसे थंडीच्या दिवसात बर्फ अथवा धुके पडण्यामुळे कमलिनी सुकून जाते त्याप्रकारे तिच्या शरीराची कान्ति फिकी पडली आहे. ती निस्तेज दिसत आहे. रावणाशी तिला काही प्रयोजन नाही आहे. तिने प्राणत्याग करण्याचा निश्चय केला आहे. ॥१५॥
देवी कथंचित् काकुत्स्थ त्वन्मना मार्गिता मया ।
इक्ष्वकुवंशविख्यातिं शनैः कीर्तयतानघ ॥ १६ ॥

सा मया नरशार्दूल शनैर्विश्वासिता तदा ।
ततः सम्भाषिता देवी सर्वमर्थं च दर्शिता ॥ १७ ॥
'हे ककुत्स्थकुलभूषणा ! तिचे मन निरन्तर आपल्या ठिकाणीच लागून राहिले आहे. निष्पाप नरश्रेष्ठा ! मी अत्यन्त प्रयत्‍न करून कसा तरी महाराणी सीतेचा पत्ता लावला. आणि हळूहळू इक्ष्वाकुवंशाच्या कीर्तिचे वर्णन करीत कसा तरी तिच्या हृदयात स्वत:बद्दल विश्वास उत्पन्न केला. त्यानन्तर देवीशी वार्तालाप करीत तिला येथील सर्व गोष्टींची माहिती दिली. ॥१६-१७॥
रामसुग्रीवसख्यं च श्रुत्वा प्रीतिमुपागता ।
नियतः समुदाचारो भक्तिश्चास्याः सदा त्वयि ॥ १८ ॥
'आपली सुग्रीवाशी मैत्री झाल्याचे वृत्त ऐकून तिला अत्यन्त हर्ष झाला. तिचा उच्च कोटीचा आचार विचार (पातिव्रत्य) सुदृढ़ आहे. ती सदा आपल्या ठिकाणीच भक्ती ठेवून आहे.॥१८॥
एवं मया महाभागा दृष्टा जनकनन्दिनी ।
उग्रेण तपसा युक्ता त्वद्‌भक्त्या पुरुषर्षभ ॥ १९ ॥
'हे महाभागा ! हे पुरुषोत्तमा ! याप्रमाणे जनकनन्दिनीला मी आपल्या भक्तीने प्रेरित होऊन कठोर तपस्या करीत असलेली पाहिली आहे.॥१९॥
अभिज्ञानं च मे दत्तं यथा वृत्तं तवान्तिके ।
चित्रकूटे महाप्राज्ञ वायसं प्रति राघव ॥ २० ॥

विज्ञाप्यः पुनरप्येष रामो वायुसुत त्वया ।
'हे महामते ! रघुनन्दन ! चित्रकूटामध्ये आपल्या बरोबर राहात असतां देवीच्या बाबवीत एका कावळ्यामुळे जी घटना घडली होती, तो वृत्तान्त ओळख पटण्यासाठी खूण म्हणून तिने मला सांगितला होता.॥२०॥
अखिलेन यथा दृष्टमिति मामाह जानकी ॥ २१ ॥


अयं चास्मै प्रदातव्यो यत्‍नात् सुपरिरक्षितः ।
'इकडे येण्यास निघालो असता जानकीने मला सांगितले—'हे वायु नन्दना ! तू येथे माझी जी अवस्था पाहिली आहेस ती सर्व भगवान श्रीरामांना जशीच्या तशी सांग आणि हा मणि मोठया यत्‍नाने सुरक्षितपणे घेऊन जाऊन त्यांच्या हाती दे.॥२१ १/२॥
ब्रुवता वचनान्येवं सुग्रीवस्योपशृण्वतः ॥ २२ ॥

एष चूडामणिः श्रीमान् मया सुपरिरक्षितः ।
मनःशिलायास्तिलकं तत् स्मरस्वेति चाब्रवीत् ॥ २३ ॥

एष निर्यातितः श्रीमान् मया ते वारिसम्भवः
एनं दृष्ट्‍वा प्रमोदिष्ये व्यसने त्वामिवानघ ॥ २४ ॥
अशा वेळी दे की ज्यावेळी सुग्रीवही जवळ बसून तू सांगत असलेला वृत्तान्त ऐकत असेल. त्याच बरोबर माझा हा निरोपही त्यांना निवेदन कर की—'प्रभो ! आपण दिलेला हा कान्तिमान चूडामणि मी मोठया प्रयत्‍नाने सुरक्षित ठेवला होता. जलातून प्रकट झालेल्या या दीप्तिमान रत्‍नाला मी आपल्या सेवेत परत धाडला आहे. निष्पाप रघुनन्दना ! संकटाच्या वेळी त्याला पाहून मी अशा प्रकारे आनन्दमग्न होत असे जशी आपल्या दर्शनाने आनन्दित होत असते. आपण माझ्या ललाटावर जो मन:शिलेचा तिलक लावला होतात त्याचे स्मरण करावे'. या सर्व गोष्टी जानकीने सांगितल्या होत्या. ॥२२—२४॥
जीवितं धारयिष्यामि मासं दशरथात्मज ।
ऊर्ध्वं मासान्न जीवयं रक्षसां वशमागता ॥ २५॥
'तिने असेही सांगितले आहे की—'हे दशरथनन्दना ! मी अजून एक महिना जीवन धारण करीन. त्यानन्तर राक्षसांच्या ताब्यात सांपडलेली मी प्राणत्याग, करीन कशाही प्रकारे जिंवत राहू शकणार नाही.॥२५॥
इति मामब्रवीत् सीता कृशाङ्‌गी धर्मचारिणी ।
रावणान्तःपुरे रुद्धा मृगीवोत्फुल्ललोचना ॥ २६ ॥
'याप्रमाणे त्या शरीराने कृश झालेल्या, धर्मपरायण सीतेने मला आपणाला सांगण्यासाठी हा सन्देश दिलेला आहे. ती रावणाच्या अन्त:पुरात कैदेत आहे. आणि भयाने डोळे फाडफाडून इकडे तिकडे पहाणार्‍या हरिणी प्रमाणे ती सशंक दृष्टीने सर्वत्र पाहात राहिली आहे.॥२६॥
एतदेव मयाऽऽख्यातं सर्वं राघव यद् यथा ।
सर्वथा सागरजले सन्तारः प्रविधीयताम् ॥ २७ ॥
'हे राघवा ! हाच तेथील वृत्तान्त आहे. जो सर्वच्या सर्व, जशाच्या तसा, मी आपल्या सेवेत निवेदन केला आहे. आता सर्व प्रकारे समुद्र पार करण्याचा प्रयत्‍न करावा.॥२७॥
तौ जाताश्वासौ राजपुत्रौ विदित्वा
तच्चाभिज्ञानं राघवाय प्रदाय ।
देव्या चाख्यातं सर्वमेवानुपूर्व्याद्
वाचा सम्पूर्णं वायुपुत्रः शशंस ॥ २८ ॥
राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मणास काही आश्वासन मिळाले आहे असे जाणून तसेच ती खूण राघवाच्या हाती देऊन वायुपुत्र हनुमानाने सीता देवीने सांगितलेल्या सर्व गोष्टी क्रमश: आपल्या वाणीद्वारे पूर्णरूपाने रामांना ऐकविल्या.॥२८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे पञ्चषष्टितमः सर्गः ॥ ६५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा पासष्टावा सर्ग पूरा झाला.॥६५॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP