श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ त्रयत्रिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पुलस्त्येन रावणस्य अर्जुनबन्धतो मोचनम् -
पुलस्त्यांनी रावणाची अर्जुनाच्या कैदेतून सुटका करणे -
रावणग्रहणं तत् तु वायुग्रहणसंनिभम् ।
ततः पुलस्त्यः शुश्राव कथितं दिवि दैवतैः ॥ १ ॥
रावणाला पकडणे वार्‍याला पकडण्याप्रमाणे होते. हळू हळू ही गोष्ट देवतांच्या मुखांनी स्वर्गात पुलस्त्यांनी ऐकली. ॥१॥
ततः पुत्रकृतस्नेहात् कम्प्यमानो महाधृतिः ।
माहिष्मतीपतिं द्रष्टुं आजगाम महानृषिः ॥ २ ॥
जरी ते महर्षि महान्‌ धैर्यशाली होते तरीही संतानाबद्दल असणार्‍या स्नेहामुळे कृपापरवश झाले आणि महिष्मती नरेशाला भेटण्यासाठी भूतलावर निघून आले. ॥२॥
स वायुमार्गमास्थाय वायुतुल्यगतिर्द्विजः ।
पुरीं माहिष्मतीं प्राप्तो मनःसम्पातविक्रमः ॥ ३ ॥
त्यांचा वेग वायुसमान होता आणि गति मनासमान होती. ते ब्रह्मर्षि वायुमार्गाचा आश्रय घेऊन महिष्मतीपुरीमध्ये येऊन पोहोचले. ॥३॥
सोऽमरावतिसंकाशां हृष्टपुष्टजनावृताम् ।
प्रविवेश पुरीं ब्रह्मा इन्द्रस्येवामरावतीम् ॥ ४ ॥
जसे ब्रह्मदेव इंद्रांच्या अमरावतिमध्ये प्रवेश करतात, त्याप्रकारे पुलस्त्यांनी हृष्ट-पुष्ट मनुष्यांनी भरलेल्या आणि अमरावती समान शोभेने संपन्न महिष्मती नगरीत प्रवेश केला. ॥४॥
पादचारमिवादित्यं निष्पतन्तं सुदुर्दशम् ।
ततस्ते प्रत्यभिज्ञाय अर्जुनाय निवेदयन् ॥ ५ ॥
आकाशातून उतरते समयी ते पायी चालत येणार्‍या सूर्यासमान वाटत होते. अत्यंत तेजामुळे त्यांच्याकडे पहाणे फारच कठीण वाटत होते. अर्जुनांच्या सेवकांनी त्यांना ओळखून राजा अर्जुनाला त्यांच्या शुभागमनाची सूचना दिली. ॥५॥
पुलस्त्य इति विज्ञाय वचनाद्धैहयाधिपः ।
शिरस्यञ्जलिमाधाय प्रत्युद्‌गच्छत् तपस्विनम् ॥ ६ ॥
सेवकांच्या सांगण्यावरून जेव्हा हैहयराजाला पुलस्त्य येत आहेत याचा पत्ता लागला तेव्हा ते मस्तकावर अंजली बांधून त्या तपस्वी मुनिचे स्वागत करण्यासाठी पुढे निघून आले. ॥६॥
पुरोहितोऽस्य गृह्यार्घ्यं मधुपर्कं तथैव च ।
पुरस्तात्प्रययौ राज्ञः शक्रस्येव बृहस्पतिः ॥ ७ ॥
राजा अर्जुनांचे पुरोहित अर्घ्य आणि मधुपर्क आदि घेऊन त्यांच्या पुढे पुढे चालत होते, जणु इंद्रांच्या पुढे बृहस्पति चालले होते. ॥७॥
ततस्तं ऋषिमायान्तं उद्यन्तमिव भास्करम् ।
अर्जुनो दृश्य सम्भ्रान्तो ववन्देन्द्र इवेश्वरम् ॥ ८ ॥
तिकडे येणारे महर्षि उदित होणार्‍या सूर्यासमान तेजस्वी दिसून येत होते, त्यांना पाहून राजा अर्जुन चकित झाला. जसे इंद्र ब्रह्मदेवांच्या पुढे आदरपूर्वक मस्तक नमवितात त्याप्रमाणे अर्जुनाने त्या ब्रह्मर्षिंच्या चरणी आदरपूर्वक प्रणाम केला. ॥८॥
स तस्य मधुपर्कं गां पाद्यमर्घ्यं निवेद्य च ।
पुलस्त्यमाह राजेन्द्रो हर्षगद्‌गदया गिरा ॥ ९ ॥
ब्रह्मर्षिंना पाद्य, अर्ध्य, मधुपर्क आणि गाय समर्पित करून राजाधिराज अर्जुन हर्षगद्‍गद्‍ वाणीमध्ये पुलस्त्यांना म्हणाले - ॥९॥
अद्यैवममरावत्या तुल्या माहिष्मती कृता ।
अद्याहं तु द्विजेन्द्र त्वां यस्मात् पश्यामि दुर्दृशम् ॥ १० ॥
द्विजेंद्र ! आपले दर्शन परम दुर्लभ आहे, तथापि आज मी आपल्या दर्शनाचे सुख प्राप्त करीत आहे. याप्रकारे येथे येऊन आपण या महिष्मतीपुरीला अमरावतीपुरी प्रमाणे गौरवशाली बनविले आहे. ॥१०॥
अद्य मे कुशलं देव अद्य मे कुशलं व्रतम् ।
अद्य मे सफलं जन्म अद्य मे सफलं तपः ॥ ११ ॥

यत् ते देवगणैर्वन्द्यौ वन्देऽहं चरणौ तव ।
इदं राज्यमिमे पुत्रा इमे दारा इमे वयम् ।
ब्रह्मन् किं कुर्मः किं कार्यं आज्ञापयतु नो भवान् ॥ १२ ॥
देवा ! आज मी आपल्या देववंद्य चरणांची वंदना करीत आहे, म्हणून आजच मी वास्तविक सकुशल आहे. आज माझे व्रत निर्विघ्न पूर्ण झाले आहे. आजच माझा जन्म सफल झाला आहे आणि तपस्याही सार्थक झाली आहे. ब्रह्मन्‌ ! हे राज्य, हे स्त्री-पुत्र आणि आम्ही सर्व लोक आपलेच आहोत. आपण आज्ञा द्यावी. आम्ही आपली काय सेवा करू ? ॥११-१२॥
तं धर्मेऽग्निषु पुत्रेषु शिव पृष्ट्‍वा च पार्थिवम् ।
पुलस्त्योवाच राजानं हैहयानां तथाऽर्जुनम् ॥ १३ ॥
तेव्हा पुलस्त्यांनी हैहयराज अर्जुनाला धर्म, अग्नि आणि पुत्रांचा कुशल समाचार विचारून त्याला याप्रकारे म्हटले - ॥१३॥
नरेन्द्राम्बुजपत्राक्ष पूर्णचन्द्रनिभानन ।
अतुलं ते बलं येन दशग्रीवस्त्वया जितः ॥ १४ ॥
पूर्ण चंद्रम्याप्रमाणे मनोहर मुख असलेल्या कमलनयन नरेशा ! तुमच्या बळाची कोठे तुलना नाही आहे कारण की तुम्ही दशग्रीवाला जिंकले आहे. ॥१४॥
भयाद् यस्योपतिष्ठेतां निष्पन्दौ सागरानिलौ ।
सोऽयं मृधे त्वया बद्धः पौत्रो मे रणदुर्जयः ॥ १५ ॥
ज्याच्या भयाने समुद्र आणि वायुही चंचलता सोडून सेवेमध्ये उपस्थित होत असतात, त्या माझ्या रणदुर्जय पौत्राला तू संग्रामात बद्ध केले आहेस. ॥१५॥
पुत्रकस्य यशः पीतं नाम विश्रावितं त्वया ।
मद्वाक्याद् वाच्यमानोऽद्य मुञ्च वत्स दशाननम् ॥ १६ ॥
असे करून तू माझ्या या मुलाचे यश पिऊन टाकले आहेस आणि सर्वत्र आपल्या नावाची दवंडी पिटवली आहेस. वत्सा ! आता माझ्या सांगण्यावरून तू दशाननाला सोडून दे, ही तुझ्यापाशी माझी याचना आहे. ॥१६॥
पुलस्त्याज्ञां प्रगृह्योचे न किञ्चन वचोऽर्जुनः ।
मुमोच वै पार्थिवेन्द्रो राक्षसेन्द्रं प्रहृष्टवत् ॥ १७ ॥
पुलस्त्यांची ही आज्ञा शिरोधार्य करून अर्जुनाने याविरूद्ध काहीही सांगितले नाही. त्या राजाधिराजाने अत्यंत प्रसन्नतापूर्वक राक्षसराज रावणाला बंधनातून मुक्त केले. ॥१७॥
स तं प्रमुच्य त्रिदशारिमर्जुनः
प्रपूज्य दिव्याभरणस्रगम्बरैः ।
अहिंसकं सख्यमुपेत्य साग्निकं
प्रणम्य तं ब्रह्मसुतं गृहं ययौ ॥ १८ ॥
त्या देवद्रोही राक्षसाला बंधनमुक्त करून अर्जुनाने दिव्य आभूषणे माला आणि वस्त्रांनी त्याचे पूजन केले आणि अग्निला साक्षी करून त्याच्याशी असा मित्रतेचा संबंध स्थापित केला ज्यायोगे कुणाचीही हिंसा होणार नाही. (अर्थात त्या दोघांनी ही प्रतिज्ञा केली की आपण आपल्या मैत्रीचा उपयोग दुसर्‍या प्राण्यांच्या हिंसेमध्ये करणार नाही.) या नंतर ब्रह्मपुत्र पुलस्त्यांना प्रणाम करून राजा अर्जुन आपल्या घरी परत गेला. ॥१८॥
पुलस्त्येनापि सन्त्यक्तो राक्षसेन्द्रः प्रतापवान् ।
परिष्वक्तः कृतातिथ्यो लज्जमानो विनिर्जितः ॥ १९ ॥
याप्रकारे अर्जुनद्वारा अतिथिसत्कार करून सोडला गेलेला प्रतापी राक्षसराज रावणाला पुलस्त्यांनी आपल्या हृदयाशी धरले, परंतु तो पराजयामुळे लज्जित होत होता. ॥१९॥
पितामहसुतश्चापि पुलस्त्यो मुनिपुङ्‌गवः ।
मोचयित्वा दशग्रीवं ब्रह्मलोकं जगाम ह ॥ २० ॥
दशग्रीवाला सोडवून ब्रह्मदेवांचे पुत्र मुनिवर पुलस्त्य पुन्हा ब्रह्मलोकात निघून गेले. ॥२०॥
एवं स रावणः प्राप्तः कार्तवीर्यात् प्रधर्षणम् ।
पुलस्त्यवचनाच्चापि पुनर्मुक्तो महाबलः ॥ २१ ॥
याप्रकारे रावणाला कार्तवीर्य अर्जुनाच्या हातून पराजित व्हावे लागले होते आणि नंतर पुलस्त्यांच्या सांगण्यावरून त्या महाबली राक्षसाची सुटका झाली. ॥२१॥
एवं बलिभ्यो बलिनः सन्ति राघवनन्दन ।
नावज्ञा हि परे कार्या य इच्छेत् श्रेयः आत्मनः ॥ २२ ॥
रघुकुलनंदन ! याप्रकारे संसारात बलवानाहून बलवान वीर पडलेले आहेत; म्हणून जो आपले कल्याण इच्छितो त्याने दुसर्‍याची अवहेलना करता कामा नये. ॥२२॥
ततः स राजा पिशिताशनानां
सहस्रबाहोरुपलभ्य मैत्रीम् ।
पुनर्नृपाणां कदनं चकार
चचार सर्वां पृथिवीं च दर्पात् ॥ २३ ॥
सहस्त्रबाहुची मैत्री प्राप्त करून राक्षसांचा राजा रावण पुन्हा घमेंडीने भरून सार्‍या पृथ्वीवर विचरण करू लागला आणि नरेशांचा संहार करू लागला. ॥२३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे त्रयस्त्रिंशः सर्गः ॥ ३३ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा तेहतिसावा सर्ग पूरा झाला. ॥३३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP