श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ द्विचत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पश्चिमदिग्वर्तिस्थानानि वर्णयता सुग्रीवेण सुषेणप्रभृतिवानराणां तत्र प्रेषणम् - सुग्रीवाने पश्चिम दिशेच्या स्थानांचा परिचय देऊन सुषेण आदि वानरांना तेथे धाडणे -
अथ प्रस्थाप्य स हरीन् सुग्रीवो दक्षिणां दिशम् ।
अब्रवीन्मेघसंकाशं सुषेणं नाम वानरम् ॥ १ ॥

तारायाः पितरं राजा श्वशुरं भीमविक्रमम् ।
अब्रवीत् प्राञ्जलिर्वाक्यं अभिगम्य प्रणम्य च ॥ २ ॥

महर्षिपुत्रं मारीचं अर्चिष्मंतं महाकपिम् ।
वृतं कपिवरैः शूरैः महेंद्रसदृशद्युतिम् ॥ ३ ॥

बुद्धिविक्रमसंपन्नं वैनतेयसमद्युतिम् ।
मरीचिपुत्रान् मारीचान् अर्चिर्मालान् महाबलान् ॥ ४ ॥

ऋषिपुत्रांश्च तान सर्वान् प्रतीचीमादिशद् दिशम् ।
द्वाभ्यां शतसहस्राभ्यां कपीनां कपिसत्तमाः ॥ ५ ॥

सुषेणप्रमुखा यूयं वैदेहीं परिमार्गथ ।
 दक्षिण दिशेकडे वानरांना धाडल्यानंतर सुग्रीवांनी तारेचा पिता आणि आपले श्वसुर ’सुषेण’ नामक वानराजवळ जाऊन त्यांना हात जोडून प्रणाम केला आणि काही सांगण्यास आरंभ केला. सुषेण मेघासमान काळे आणि भयंकर पराक्रमी होते. त्यांच्या शिवाय महर्षि मरींचिचे पुत्र महाकपि आचिष्मान् ही तेथे उपस्थित होते, जे देवराज इंद्रासमान तेजस्वी आणि शूरवीर श्रेष्ठ वानरांनी घेरलेले होते. त्यांची कांति विनतानंदन गरूडासमान होती. ते बुद्धि आणि पराक्रमाने संपन्न होते. त्यांच्या अतिरिक्त मरीचिंचे पुत्र मारीच नामक वानर ही होते, जे महाबली आणि ’अर्चिर्माल्य’ नावाने प्रसिद्ध होते. यांच्या खेरीज आणखीही बरेचसे ऋषिकुमार होते जे वानररूपात तेथे विराजमान होते. सुषेणांबरोबर त्या सर्वांना सुग्रीवांनी पश्चिम दिशेकडे जाण्याची आज्ञा दिली आणि म्हटले- ’कपिवरांनो ! आपण सर्व लोक दोन लाख वानरांना बरोबर घेऊन सुषेणांच्या अधिपत्याखाली पश्चिमेकडे जावे आणि वैदेही सीतेचा शोध करावा. ॥१-५ १/२॥
सौराष्ट्रान् सहबाह्लीकान् चंद्रचित्रांस्तथैव च ॥ ६ ॥

स्फीतान् जनपदान् रम्यान् विपुलानि पुराणि च ।
पुंनागगहनं कुक्षिं वकुलोद्दालकाकुलम् ॥ ७ ॥

तथा केतकखण्डांश्च मार्गध्वं हरिपुंगवाः ।
’श्रेष्ठ वानरांनो ! सैराष्ट्र, बाल्हीक आणि चंद्रमित्र आदि देश, अन्यान्य समृद्धिशाली आणि रमणीय जनपदे, मोठ मोठी नगरे तसेच पुन्नग, बकुळ आणि उद्दालक आदि वृक्षांनी भरलेल्या कुक्षिदेशात तसेच केवड्याच्या वनांमध्ये सीतेचा शोध करा. ॥६-७ १/२॥
प्रत्यक्स्रोतोवहाश्चैव नद्यः शीतजलाः शिवाः ॥ ८ ॥

तापसानामरण्यानि कांतारा गिरयश्च ये ।
’पश्चिमेकडे वहाणार्‍या शीतल जलाने सुशोभित कल्याणमय नद्या, तपस्वी जनांची वने, तसेच दुर्गम पर्वतांमध्येही वैदेहीचा पत्ता लावावा. ॥८ १/२॥
ततः स्थलीं मरुप्राया अत्युच्चशिरसः शिलाः ॥ ९ ॥

गिरिजालावृतां दुर्गां मार्गित्वा पश्चिमां दिशम् ।
ततः पश्चिममागम्य समुद्रं द्रष्टुमर्हथ ॥ १० ॥

तिमिनक्राकुलजलं गत्वा द्रक्ष्यथ वानराः ।
’पश्चिम दिशेकडे प्रायः मरूभूमि आहे. अत्यंत उंच आणि थंड शिला आहेत तसेच पर्वतमालांनी घेरलेले बरेचसे दुर्गम प्रदेश आहेत. त्या सर्व स्थानांमध्ये सीतेचा शोध घेत क्रमशः पुढे जाऊन पश्चिम समुद्रापर्यंत जा आणि तेथील प्रत्येक स्थानाचे निरिक्षण करा. वानरांनो ! समुद्राचे जल तिमि नामक मत्स्यांनी तसेच मोठ मोठ्या ग्राहांनी भरलेले आहे. तेथे सर्व बाजूस शोधून पहा. ॥९-१० १/२॥
ततः केतकखण्डेषु तमालगहनेषु च ॥ ११ ॥

कपयो विहरिष्यंति नारिकेलवनेषु च ।
तत्र सीतां च मार्गध्वं निलयं रावणस्य च ॥ १२ ॥
’समुद्राच्या तटावर केवड्याच्या कुंजात, तमालांच्या काननात तसेच नारळीच्या वनांत तुमचे सौनिक वानर चांगल्या प्रकारे विचरण करतील. तेथे तुम्ही लोक सीतेला शोधा आणि रावणाच्या निवासस्थानाचा पत्ता लावा. ॥११-१२॥
वेलातटनिविष्टेषु पर्वतेषु वनेषु च ।
मुरवीत्तनं चैव रम्यं चैव जटापुरम् ॥ १३ ॥

अवंतीमङ्‌गंलोपां च तथा चालक्षितं वनम् ।
राष्ट्राणि च विशालानि पत्तनानि ततस्ततः ॥ १४ ॥
’समुद्र तटवर्ती पर्वत आणि वने यांतही त्यांना शोधले पाहिजे. मुखीपत्तन (मोरवी) तसेच रमणीय जटापुरामध्ये अवंती(*) तसेच अंगलेपापुरीमध्ये अलक्षित वनात आणि मोठ मोठ्या राष्ट्रांत आणि नगरामध्ये जिकडे तिकडे हिंडून पत्ता लावा. ॥१३-१४॥
(*- ही अवंती पूर्व दिशेच्या मार्गात सांगितल्या गेलेल्या अवंतिपेक्षा भिन्न आहे)
सिंधुसागरयोश्चैव संगमे तत्र पर्वतः ।
महान् हेमगिरिर्नाम शतशृङ्‌गो महाद्रुमः ॥ १५ ॥

तस्य प्रस्थेषु रम्येषु सिंहाः पक्षगमाः स्थिताः ।
तिमिमत्स्यगजांश्चैव नीडान्यारोपयंति ते ॥ १६ ॥
’सिंधु नदी आणि समुद्राच्या संगमावर सोमगिरि नामक एक महान् पर्वत आहे, ज्याचि शंभर शिखरे आहेत. तो पर्वत उंच उंच वृक्षांनी भरलेला आहे. त्याच्या रमणीय शिखरांवर सिंह नामक पक्षी राहातात, जे तिमि नावाच्या विशालकाय मत्स्यांना आणि हत्तींना ही उचलून आपल्या घरट्यांत घेऊन येतात. ॥१५-१६॥
तानि नीडानि सिंहानां गिरिशृङ्‌गकगताश्च ये ।
दृप्तास्तृप्ताश्च मातङ्‌गाः तोयदस्वननिःस्वनाः ॥ १७ ॥

विचरंति विशालेऽस्मिन् तोयपूर्णे समंततः ।
’सिंह नावाच्या त्या पक्ष्यांच्या घरट्यात पोहोचून त्या पर्वत शिखरावर उपस्थित झालेले जे हत्ती आहेत, ते त्या पंखधारी सिंहानी सन्मानित होण्यामुळे गर्वाचा अनुभव करतात आणि मनातल्या मनात संतुष्ट होतात, म्हणून मेघांच्या गर्जनेप्रमाणे शब्द करीत त्या पर्वताच्या जलपूर्ण विशाल शिखरांवर चोहोबाजूस विचरत राहातात. ॥१७ १/२॥
तस्य शृङ्‌गंश दिवस्पर्शं काञ्चनं चित्रपादपम् ॥ १८ ॥

सर्वमाशु विचेतव्यं कपिभिः कामरूपिभिः ।
’सोमगिरिचे गगनचुंबी शिखर सुवर्णमय आहे. त्याच्यावर विचित्र वृक्ष शोभा प्राप्त करतात. इच्छेनुसार रूप धारण करणार्‍या वानरांनी तेथील सर्व स्थानांना शीघ्रतापूर्वक उत्तम तर्‍हेने (शोधून) पाहिले पाहिजे. ॥१८ १/२॥
कोटिं तत्र समुद्रस्य तु काञ्चनीं शतयोजनाम् ॥ १९ ॥

दुर्दर्शां पारियात्रस्य गतां द्रक्ष्यथ वानराः ।
’तेथून पुढे समुद्राच्या मध्यभागी परियात्र पर्वताचे सुवर्णमय शिखर दिसून येईल, जे शंभर योजने विस्तृत आहे. वानरांनो ! त्याचे दर्शन दुसर्‍यांसाठी अत्यंत कठीण आहे. तेथे जाऊन तुम्ही सीतेचा शोध केला पाहिजे. ॥१९ १/२॥
कोट्यस्तत्र चतुर्विंशद् गंधर्वाणां तरस्विनाम् ॥ २० ॥

वसंत्यग्निनिकाशानां घोराणां कामरूपिणाम् ।
पावकार्चिःप्रतीकाशाः समवेताः समंततः ॥ २१ ॥
’परियात्र पर्वताच्या शिखरावर इच्छानुसार रूप धारण करणारे, भयंकर, अग्नितुल्य तेजस्वी तसेच वेगवान् चौविस करोड गंधर्व निवास करतात. ते सर्वच्या सर्व अग्निच्या ज्वालांप्रमाणे प्रकाशमान आहेत आणि सर्वबाजूंनी येऊन त्या पर्वतावर एकत्र झालेले आहेत. ॥२०-२१॥
नात्यासादयितव्याः ते वानरैर्भीमविक्रमैः ।
नादेयं च फलं तस्माद् देशात् किञ्चित् प्लवंगमैः ॥ २२ ॥
’भयंकर पराक्रमी वानरांनी त्या गंधर्वांच्या अधिक निकट जाता कामा नये - त्यांचा कुठलाही अपराध करू नये आणि त्या पर्वताशिखरावरून कुठलेही फळ घेऊ नये. ॥२२॥
दुरासदा हि ते वीराः सत्त्ववंतो महाबलाः ।
फलमूलानि ते तत्र रक्षंते भीमविक्रमाः ॥ २३ ॥
’कारण भयंकर बल-विक्रमांनी संपन्न धैर्यवान् महाबलाढ्य वीर गंधर्व तेथील फल-मूळांचे रक्षण करतात, त्यांच्यावर विजय प्राप्त करणे फारच कठीण आहे. ॥२३॥
तत्र यत्‍नतश्च कर्तव्यो मार्गितव्या च जानकी ।
न हि तेभ्यो भयं किञ्चित् कपित्वमनुवर्तताम् ॥ २४ ॥
तेथेही जानकीचा शोध घेतला पाहिजे आणि तिचा पत्ता लावण्यासाठी पूर्ण प्रयत्‍न केला पाहिजे- प्राकृत वानराच्या स्वभावाने अनुसरण करणार्‍या तुमच्या सेनेतील वीरांना त्या गंधर्वांपासून काहीही भय नाही. ॥२४॥
तत्र वैडूर्यवर्णाभो वज्रसंस्थानसंस्थितः ।
नानाद्रुमलताकीर्णो वज्रो नाम महागिरिः ॥ २५ ॥
’परियात्र पर्वताच्या जवळच समुद्रात वज्र नामाने प्रसिद्ध एक फार उंच पर्वत आहे, जो नाना प्रकारच्या वृक्षांनी आणि लतांनी व्याप्त दिसून येतो. तो वज्रगिरि वैडूर्य मण्याप्रमाणे नील वर्णाचा आहे. तो कठोरते मध्ये वज्र मण्यासमान आहे. ॥२५॥
श्रीमान् समुदितस्तत्र योजनानां शतं समम् ।
गुहास्तत्र विचेतव्याः प्रयत्‍ने न प्लवंगमाः ॥ २६ ॥
’तो सुंदर पर्वत तेथे शंभर योजनांच्या घेरात प्रतिष्ठित आहे. त्याची लांबी आणि रूंदी दोन्ही बरोबर आहे. वानरांनो ! त्या पर्वतावर बर्‍याचशा गुहा आहेत. त्या सर्वामध्ये प्रयत्‍नपूर्वक सीतेचे अनुसंधान करावयास हवे. ॥२६॥
चतुर्भागे समुद्रस्य चक्रवान् नाम पर्वतः ।
तत्र चक्रं सहस्रारं निर्मितं विश्वकर्मणा ॥ २७ ॥
समुद्राच्या चतुर्थ भागात चक्रवान् नामक पर्वत आहे. तेथेच विश्वकर्म्याने सहस्त्रार(*) चक्राची निर्मिती केली होती. ॥२७॥
(*- ज्यात एक हजार अरे असतात त्यास सहस्त्रार चक्र म्हणतात)
तत्र पञ्चजनं हत्वा हयग्रीवं च दानवम् ।
आजहार ततश्चक्रं शङ्‌खंक च पुरुषोत्तमः ॥ २८ ॥
’तेथूनच पुरुषोत्तम भगवान् विष्णु पञ्चजन आणि हयग्रीव नामक दानवांचा वध करून पाञ्चजन्य शंख तसेच ते सहस्त्रार सुदर्शन चक्र आणले होते. ॥२८॥
तस्य सानुषु रम्येषु विशालासु गुहासु च ।
रावणः सह वैदेह्या मार्गितव्यस्ततस्ततः ॥ २९ ॥
’चक्रवान् पर्वताच्या रमणीय शिखरावर आणि विशाल गुहांमध्ये इकडे तिकडे वैदेही सहित रावणाचा पत्ता लावला पाहिजे. ॥२९॥
योजनानां चतुःषष्टिः वराहो नाम पर्वतः ।
सुवर्णशृङ्‌गः सुश्रीमान् अगाधे वरुणालये ॥ ३० ॥
’त्याच्या पुढे समुद्राच्या अगाध जलराशीमध्ये सुवर्णमय शिखरांचा वराह नामक पर्वत आहे, ज्याचा विस्तार चौसष्ट योजनांच्या अंतरावर आहे. ॥३०॥
तत्र प्राग्ज्योतिषं नाम जातरूपमयं पुरम् ।
यस्मिन् वसति दुष्टात्मा नरको नाम दानवः ॥ ३१ ॥
’तेथेच प्राग्ज्योतिष नामक सुवर्णमय नगर आहे, ज्यात दुष्टात्मा नरक नामक दानव निवास करीत आहे. ॥२१॥
तत्र सानुषु रम्येषु विशालासु गुहासु च ।
रावणः सह वैदेह्या मार्गितव्यस्ततस्ततः ॥ ३२ ॥
’त्या पर्वताच्या रमणीय शिखरांवर तसेच तेथील विशाल गुहांमध्ये सीतेसहित रावणाचा तपास केला पाहिजे. ॥३२॥
तमतिक्रम्य शैलेंद्रं काञ्चनांतरदर्शनम् ।
पर्वतः सर्वसौवर्णो धाराप्रस्रवणायुतः ॥ ३३ ॥
’ज्याचा आतला भाग सुवर्णमय दिसत असतो, त्या पर्वतराज वराहाला ओलांडून पुढे गेल्यावर एक असा पर्वत लागेल, ज्याचे सर्वकाही सुवर्णमय आहे तसेच जवळ जवळ दहा हजार निर्झर आहेत. ॥३३॥
तं गजाश्च वराहाश्च सिंहा व्याघ्राश्च सर्वतः ।
अभिगर्जंति सततं तेन शब्देन दर्पिताः ॥ ३४ ॥
’त्याच्या चारी बाजूस हत्ती, वराह, सिंह आणि व्याघ्र सदा गर्जना करीत असतात आणि आपल्याच गर्जनेच्या प्रतिध्वनीच्या शब्दाने दर्पाने भरून पुन्हा डरकाळ्या फोडू लागतात. ॥३४॥
यस्मिन् हरिहयः श्रीमान् महेंद्रः पाकशासनः ।
अभिषिक्तः सुरै राजा मेघवान् नाम पर्वतः ॥ ३५ ॥
’त्या पर्वताचे नाम आहे मेघगिरि; ज्यावर देवतांनी हरित रंगाचे अश्व असणार्‍या श्रीमान् पाकशासन इंद्राला राजाच्या पदावर अभिषिक्त केले होते. ॥३५॥
तमतिक्रम्य शैलेंद्रं महेंद्रपरिपालितम् ।
षष्टिं गिरिसहस्राणि काञ्चनानि गमिष्यथ ॥ ३६ ॥

तरुणादित्यवर्णानि भ्राजमानानि सर्वतः ।
जातरूपमयैवृक्षैः शोभितानि सुपुष्पितैः ॥ ३७ ॥
’देवराज इंद्रद्वारा सुरक्षित गिरिराज मेघाला ओलांडून जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला सोन्याचे आठ हजार पर्वत लागतील, जे सर्व बाजूंनी सूर्यासारख्या कांतिने देदीप्यमान होत आहेत आणि सुंदर फुलांनी भरलेल्या सुवर्णमय वृक्षांनी सुशोभित आहेत. ॥३६-३७॥
तेषां मध्ये स्थितो राजा मेरुरुत्तरपर्वतः ।
आदित्येन प्रसन्नेन शैलो दत्तवरः पुरा ॥ ३८ ॥

तेनैवमुक्तः शैलेंद्रः सर्व एव त्वदाश्रयाः ।
मत् प्रसादाद् भविष्यंति दिवा रात्रौ च काञ्चनाः ॥ ३९ ॥

त्वयि ये चापि वत्स्यंति देवगंधर्वदानवाः ।
ते भविष्यंति भक्ताश्च प्रभया काञ्चनप्रभाः ॥ ४० ॥
’त्यांच्या मध्यभागी पर्वतांचा राजा गिरिश्रेष्ठ मेरू विराजमान आहे, ज्याला पूर्वकाळात सूर्यदेवाने प्रसन्न होऊन वर दिला होता. त्यांनी त्या शैलराजास म्हटले होते की ’जे दिवस रात्र तुमच्या आश्रयाने राहातील ते माझ्या कृपेने सुवर्णमय होऊन जातील तसेच देवता, दानव, गंधर्व जे कोणी तुमच्यावर निवास करतील, ते सुवर्ण समान कांतिमान् आणि माझे भक्त होतील.’ ॥३८-४०॥
विश्वेदेवाश्च वसवो वसवश्च दिवौकसः ।
आगम्य पश्चिमां संध्यां मेरुमुत्तरपर्वतम् ॥ ४१ ॥

आदित्यमुपतिष्ठंति तैश्च सुर्योऽभिपूजितः ।
अदृश्यः सर्वभूतानां अस्तं गच्छति पर्वतम् ॥ ४२ ॥
’विश्वदेव वसु, मरुद्‌गण तसेच अन्य देवता सायंकाळी उत्तम पर्वत मेरूवर येऊन सूर्यदेवाचे उपस्थान करतात. त्यांच्याद्वारा उत्तमप्रकारे पूजित होऊन भगवान् सूर्य सर्व प्राण्यांच्या नेत्राआड होऊन अस्ताचलास जातात. ॥४१-४२॥
योजनानां सहस्राणि दश तानि दिवाकरः ।
मुहूर्तार्धेन तं शीघ्रं अभियाति शिलोच्चयम् ॥ ४३ ॥
’मेरू पासून अस्ताचल दहा हजार योजनांच्या अंतरावर आहे, परंतु सूर्यदेव अर्ध्या मुहूर्तातच तेथे पोहोचतात. ॥४३॥
शृङ्‌गेत तस्य महद्दिव्यं भवनं सूर्यसंनिभम् ।
प्रासादगणसंबाधं विहितं विश्वकर्मणा ॥ ४४ ॥
’त्याच्या शिखरावर विश्वकर्मानी बनविलेले एक फारच मोठे दिव्य भवन आहे. जे सूर्यासमान दीप्तिमान् दिसून येत आहे. ते अनेक प्रासादांनी भरलेले आहे.॥४४॥
शोभितं तरुभिश्चित्रैः नानापक्षिसमाकुलैः ।
निकेतं पाशहस्तस्य वरुणस्य महात्मनः ॥ ४५ ॥
’नाना प्रकारच्या पक्ष्यांनी व्याप्त विचित्र-विचित्र वृक्ष त्याची शोभा वाढवीत आहेत. ते पाशधारी महात्मा वरुणाचे निवासस्थान आहे. ॥४५॥
अंतरा मेरुमस्तं च तालो दशशिरा महान् ।
जातरूपमयः श्रीमान् भ्राजते चित्रवेदिकः ॥ ४६ ॥
’मेरू आणि अस्ताचल यांच्यामध्ये एक स्वर्णमय ताडाचा वृक्ष आहे. जो फारच सुंदर आणि खूपच उंच आहे. त्याच्या दहा मोठ्या शाखा आहेत. त्याच्या खालची वेदी फार विचित्र आहे. या प्रकारे तो वृक्ष फारच शोभून दिसतो. ॥४६॥
तेषु सर्वेषु दुर्गेषु सरस्सु च सरित्सु च ।
रावणः सह वैदेह्या मार्गितव्यस्ततस्ततः ॥ ४७ ॥
’तेथील सर्व दुर्गम स्थाने, सरोवरे आणि सरितामध्ये इकडे-तिकडे सीतेसहित रावणाचे अनुसंधान केले पाहिजे. ॥४७॥
यत्र तिष्ठति धर्मज्ञः तपसा स्वेन भावितः ।
मेरुसावर्णिरित्येष ख्यातो वै ब्रह्मणा समः ॥ ४८ ॥
’मेरूगिरिवर धर्माचे ज्ञाते महर्षि मेरुसावर्णि राहातात, जे आपल्या तपस्येने उच्च स्थितिला प्राप्त झालेले आहेत. ते प्रजापति समान शक्तिशाली आणि विख्यात् ऋषि आहेत. ॥४८॥
प्रष्टव्यो मेरुसावर्णिः महर्षिः सूर्यसंनिभः ।
प्रणम्य शिरसा भूमौ प्रवृत्तिं मैथिलीं प्रति ॥ ४९ ॥
’सूर्यतुल्य तेजस्वी महर्षि मेरुसावर्णिंच्या चरणी पृथ्वीवर मस्तक टेकवून प्रणाम केल्यानंतर तुम्ही लोक त्यांना मैथिली सीतेचा समाचार विचारा. ॥४९॥
एतावज्जीवलोकस्य भास्करो रजनीक्षये ।
कृत्वा वितिमिरं सर्वं अस्तं गच्छति पर्वतम् ॥ ५० ॥
’रात्रिच्या अंती (प्रातःकाळी) उदित झालेले भगवान् सूर्य जीव-जगताच्या सर्व या सर्व स्थानांना अंधकाररहित (एवं प्रकाशपूर्ण) करून शेवटी अस्ताचलास निघून जातात. ॥५०॥
एतावद् वानरैः शक्यं गंतुं वानरपुंगवाः ।
अभास्करममर्यादं न जानीमस्ततः परम् ॥ ५१ ॥
’वानरपुंगवांनो ! पश्चिम दिशेला इतकेच दूरपर्यंत वानर जाऊ शकतात. त्याच्यापुढे सूर्याचा प्रकाशही नाही आणि कुठल्या देशाची सीमाही नाही आहे. म्हणून तेथून पुढील भूमिच्या विषयी मला काहीही माहिती नाही. ॥५१॥
अवगम्य तु वैदेहीं निलयं रावणस्य च ।
अस्तपर्वतमासाद्य पूर्णे मासे निवर्तत ॥ ५२ ॥
’अस्ताचलापर्यंत जाऊन रावणाचे स्थान आणि सीतेचा पत्ता लावा तसेच एक मास पूर्ण होताच येथे परत या. ॥५२॥
ऊर्ध्वं मासान्न वस्तव्यं वसन् वध्यो भवेन्मम ।
सहैव शूरो युष्माभिः श्वशुरो मे गमिष्यति ॥ ५३ ॥
’एका महिन्याहून अधिक काळ थांबू नका. जो थांबेल त्याला माझ्या हातून प्राणदण्ड मिळेल. तुम्हा लोकांबरोबर माझे पूजनीय श्वसुरही जातील. ॥५३॥
श्रोतव्यं सर्वमेतस्य भवद्‌भिर्दिष्टकारिभिः ।
गुरुरेष महाबाहुः श्वशुरो मे महाबलः ॥ ५४ ॥
’तुम्ही सर्व लोक त्यांच्या आज्ञेच्या अधीन राहून त्यांच्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक ऐका; कारण हे महाबाहु महाबली सुषेण माझे श्वसुर एवं गुरूजन आहेत. (म्हणून तुम्हांला ही गुरू प्रमाणेच आदरणीय आहेत) ॥५४॥
भवंतश्चापि विक्रांताः प्रमाणं सर्व एव हि ।
प्रमाणमेनं संस्थाप्य पश्यध्वं पश्चिमां दिशम् ॥ ५५ ॥
’तुम्ही सर्व लोक फार पराक्रमी तसेच कर्तव्य-अकर्तव्याच्या निर्णयात प्रमाणभूत (विश्वसनीय) आहात, तथापि यांना आपले प्रधान बनवून तुम्ही पश्चिम दिशेचा शोध घेण्यास आरंभ करा. ॥५५॥
दृष्टायां तु नरेंद्रस्य पत्‍न्यां अमिततेजसः ।
कृतकृत्या भविष्यामः कृतस्य प्रतिकर्मणा ॥ ५६ ॥
’अमित तेजस्वी महाराज श्रीरामांच्या पत्‍नीचा पत्ता लागल्यावर आपण कृतकृत्य होऊं, कारण त्यांनी जो उपकार केला आहे त्याची अंशतः परतफेड याच प्रकारे होऊ शकेल. ॥५६॥
अतोऽन्यदपि यत्कार्यं कार्यस्यास्य हितं भवेत् ।
संप्रधार्यं भवद्‌भिश्च देशकालार्थसंहितम् ॥ ५७ ॥
’म्हणून या कार्याच्या अनुकूल आणखी जे कर्तव्य देश, काळ आणि प्रयोजनाशी संबंधित असेल त्याचा विचार करून आपण तेही करा.’ ॥५७॥
ततः सुषेणप्रमुखाः प्लवंगाः
सुग्रीववाक्यं निपुणं निशम्य ।
आमंत्र्य सर्वे प्लवगाधिपं ते
जग्मुर्दिशं तां वरुणाभिगुप्ताम् ॥ ५८ ॥
सुग्रीवांचे म्हणणे चांगल्या प्रकारे ऐकून सुषेण आदि सर्व वानर त्या वानरराजाची अनुमति घेऊन वरुणद्वारा सुरक्षित पश्चिम दिशेकडे निघून गेले. ॥५८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे द्विचत्वारिंशः सर्गः ॥ ४२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा बेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP