॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय बारावा ॥
सीतेला श्रीरामांचे दर्शन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रामलक्ष्मणांना शरबंदी पडलेले पाहून इंद्रजिताची वल्गना :
शरबंधनीं बांधोनि रघुनाथ । इंद्रजित अतिशयें श्लाघत ।
तेचि अर्थींचा श्लोकार्थ । स्वयें वदत तें ऐका ॥ १ ॥
इन्द्रजित्वात्मनः कर्म तौ शयानौ निरिक्ष्य च ।
उवाच परमप्रीतो हर्षयन्सर्वनैर्ऋतान् ॥१॥
दूषणस्य च हन्तारौ खारस्य च महाबलौ ।
सादितौ मामकैर्बाणैर्भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥२॥
नैतौ मोक्षयितुं शक्यो चैतस्मादिषुबन्धानात् ।
सर्वैरपि समागम्य सर्पसंघैः सुरासुरैः ॥३॥
यत्कृते चिन्तयानस्य शोकार्तस्य पितुर्मम ।
अयं मूलमनर्थस्य सर्वेषां निहतो मया ॥४॥
शरबंधीं राम लक्ष्मण । दिर्घशयन अचेतन ।
पडिले देखोनि दोघे जण । इंद्रजितें आपण वाल्गिजे ॥ २ ॥
जिहीं मारिले खर दुषण । त्रिशिर्याचा घेतला प्राण ।
चौदा सहस्र राक्षसगण । विंधोनि बाण निवटिले ॥ ३ ॥
एकला श्रीराम पदाती । तेणें एवढी केली ख्याती ।
हें ऐकोनि लंकापती । अहोरातीं चळीं कांपे ॥ ४ ॥
श्रीरामाच्या प्रतापाभेण । सदा वोसणावे रावण ।
ते दोघे राम लक्ष्मण । शरबंधीं पूर्ण म्यां पाडिले ॥ ५ ॥
अठ्ठ्यांशीं सहस्र ऋषिगण । शिव शक्र चतुरानन ।
मिळाल्या सुरासुर पूर्ण । शरबंधन सोडवेना ॥ ६ ॥
माझ्या शरबंधापासून । सोडवूं शके येथें कोण ।
शरबधीं राम लक्ष्मण । दोघे जण संपूर्ण मारिले ॥ ७ ॥
इंद्रजित वीर जगजेठी । शरबंधाचे परिपाटीं ।
वानरवीर कोट्यनुकोटी । रणपरिपाटीं पाडिले ॥ ८ ॥
ज्यासी धाके लंकानाथ । ज्याचेनि लंकेसीं आकांत ।
तो म्यां मारिला रघुनाथ । वानरेंसहित सौमित्र ॥ ९ ॥
राक्षसवैराचें दृढ मूळ । राम लक्ष्मण वीर प्रबळ ।
प्राणांत भेदोनि शरजाळ । केलें निर्मूळ वैराचें ॥ १० ॥
राहिली रणाची आटाआटी । सरल्या युद्धाचिया गोष्टी ।
राम लक्ष्मण वीर जगजेठी । शरसंकटीं पाडिलें ॥ ११ ॥
विजयघोषयुक्त इंद्रजिताचा लंकेत प्रवेश :
वानरस्मुदायसमवेत । रणीं जिकिला रघुनाथ ।
रणीं विजयी इंद्रजित । निघे नगरांत आल्हादें ॥ १२ ॥
निजविजयाच्या भेरी । निशाणें त्राहटिल्या मोहरी ।
वीर गर्जती जयजयकारीं । प्रवेश नगरीं आल्हादें ॥ १३ ॥
निजविजयाच्या गजरीं । शृंगारिली लंकापुरी ।
गुढिया मखरें घरोघरीं । डोलती अंबरीं पताका ॥ १४ ॥
सडे चौक रंगमाळा । अति आल्हाद राक्षसकळा ।
इंद्रजित जेत्याचा सोहळा । पहावया डोळां आल्हाद ॥ १५ ॥
स इन्द्रजिन्महामायः सर्वसैन्यसमन्वितः ।
प्रविवेश पुरीं लंकां जीमूतमिव भास्करः ॥५॥
तत्र रावणमासीनमभिवाद्य कृतांजलिः ।
आचचक्षे प्रियं पित्रे निहतौ रामलक्ष्मणौ ॥६॥
उत्पपात ततो हृष्टः पुत्रं च परिषस्वजे ।
रावणो रक्षसां मध्ये श्रुत्वा शत्रू निपातितौ ॥७॥
मूर्घ्नि चैनमुपाजिघ्रन्पप्रच्छ प्रीतमानसः ।
प्रहसंस्तु ततस्तस्मै पित्रे वृत्तं न्यवेदयत् ॥८॥
सहर्षवेगानुगतांतरात्मा श्रुत्वा गिरस्तस्य महारथस्य ।
जहौ ज्वरं दाशरथेः समुत्थं प्रहष्टवाचाभिननंद पुत्रम् ॥९॥
महाकपटी इंद्रजित । सकळसैन्यासमवेत ।
स्वयें प्रवेशे लंकेआंत । जेंवी भास्वत महाअभ्रीं ॥ १६ ॥
विजयवाद्यांच्या गजरीं । छत्रें पल्लवछत्रें शिरीं ।
विजयमान युग्मचामरीं । लंकापुरीं प्रवेशे ॥ १७ ॥
सिंहासनीं दशानन । त्यासी करोनि अभिवंदन ।
सखे बंधु सुहृज्ञन । प्रिय प्रधान आलिंगी ॥ १८ ॥
इंद्रजिताचे हर्षयुक्त स्वागत :
सभे समस्तांदेखतां । बैसवोनि लंकानाथा ।
विजयसंग्रामाची कथा । होय सांगता इंद्रजित ॥ १९ ॥
करोनि शरबंधविंदान । प्रथम पाडिला रघुनंदन ।
सवेंचि पाडिला लक्ष्मण । वानरगण एक एक ॥ २० ॥
अंगद सुग्रीव जांबवंत । रणीं पाडिला हनुमंत ।
वानरवीर अति समर्थ । मारिले समस्त शरबंधें ॥ २१ ॥
ऐकोनि इंद्रजिताचें वचन । गर्जे रावण आल्हादोन ।
हरिखें करोनि उत्प्लवन । दे आलिंगन पुत्रातें ॥ २२ ॥
वीस भुजीं आलिंगितां । धणी न पुरे लंकानाथा ।
पुनःपुन्हां मुख चुंबितां ।अवग्राही माथां आल्हादें ॥ २३ ॥
अनर्घ्य रत्नांचा अभिषेक । निजपुत्रासीं करी दशमुख ।
रणीं विजयाचा हरिख । परम सुख लंकेशा ॥ २४ ॥
श्रीरामयुद्धाच्या आधीं । रावणा होती क्षयव्याधी ।
इंद्रजितानें ती त्रिशुद्धी । आधिव्याधी छेदिली ॥ २५ ॥
रणीं मारिलें राम लक्ष्मण । ऐकोनि इंद्रजिताचे वचन ।
निसूर जाला रावण । शत्रू संपूर्ण निमाले ॥ २६ ॥
राम लक्ष्मण सहवानरीं । रणीं मारलियावरी ।
वैरी मज नाहीं संसारी । निश्चय करी रावण ॥ २७ ॥
शरबंधी राम सौमित्र । पडिले देखोनि वानरवीर ।
रक्षावया श्रीरामचंद्र । कपिकुंजर पावले ॥ २८ ॥
तस्मिन्प्रविष्टे लंकायां कृतार्थे रावणात्मजे ।
ररक्षुःपरिवार्याथ राघवौ प्लवगर्षभाः ॥१०॥
हनुमानंगदो नीलः सुषेण; कुमुदो नलः ।
गजो गवाक्षः पनसः सानुप्रस्थो महाहरिः ॥११॥
जांबवान्ऋषभः सुंदो रंभः शतबलिः पृथुः ।
व्यूढानीकाश्च यत्ताश्च दुमानादाय सर्वतः ॥१२॥
इंद्रजित विजयगजरा । प्रवेशला लंकापुरा ।
शरबंधीं श्रीरामचंद्रा । रक्षण वानरां अति यत्नें ॥ २९ ॥
शरबंधीं राम सौमित्र । संरक्षणीं वानरवीर ।
पावले पैं थोर थोर । परम शूर वाढिवा ॥ ३० ॥
हनुमंत अंगद आणि नीळ । सुषेण कुमुद आणि नळ ।
सानुप्रस्थ वीर प्रबळ । रणकल्लोळ शतबळी ॥ ३१ ॥
गज गवाक्ष पनस रंभ । जांबवंत ऋषभ शरभ ।
पृथु वानर स्वयें सप्रुभ । सैन्यसमारंभ सज्ज केला ॥ ३२ ॥
राम पाडिला शरपंजरीं । भोंवत्या वानरांच्या हारी ।
द्रुमपाणी महवीरीं । सैन्यसंभारीं रक्षण रामा ॥ ३३ ॥
राम सौमित्र शरपंजरीं । विकळ देखिले वानरीं ।
यालागीं मिळोनि महावीरीं । शिळशिखरीं सन्नद्ध ॥ ३४ ॥
वानरवीर श्रेष्ठ श्रेष्ठ । रामरक्षणीं अति सन्निष्ठ ।
वारया वाहों न शके वाट । व्यूह दुर्घट तिहीं केला ॥ ३५ ॥
रामलक्ष्मणयोर्द्दष्ट्वा शरीरे सायकैश्चिते ।
वानरेंद्रस्य संजातं सुग्रीवस्य महद्भयम् ॥१३॥
तमुवाच परित्रस्तं वानरेंद्रं बिभीषणः ।
सबाष्पवदनं दीनं क्रोधव्याकुललोचनम् ॥१४॥
अलं त्रासेन सुग्रीव बाष्पवेगो निगृह्यताम् ।
एवं प्रायाणि युद्धानि विजयो नास्ति नैष्ठिकः॥ १५॥
सभाग्यशेषतास्माकं यदि वीर भविष्यति ।
मोहादेतौ विमुच्येते भ्रातरौ रामलक्ष्मणौ॥१६॥
रामलक्ष्मण निश्चेष्ट पडल्याने सुग्रीवावर परिणाम :
शरबंधी राम सौमित्र । बाणें भेदिलीं गात्रेंगात्र ।
तिता ठाव नाहीं तिळमात्र । पडिले वीर निचेष्टित ॥ ३६ ॥
ऐसें देखोनि दोघांसी । भय त्रास सुग्रीवासीं ।
अश्रू स्रवतीं लोचनांसी । उकसांबुकसीं स्फुंदत ॥ ३७ ॥
शरबंधाच्या बंधनीं । मुख्य धुरा निमाल्या दोनी ।
गुह्य बिभीषणा सांगोनी । तळमळोनी विलपत ॥ ३८ ॥
सिद्धि न पवेचि कार्यार्थ । व्यर्थ गेला माझा पुरुषार्थ ।
रणीं निमाला श्रीरघुनाथ । विलपत अति दुःखे ॥ ३९ ॥
भाक दिधली श्रीरामचरणीं । सीता आणीन बंदीपासोनी ।
राम निमाला शरबंधनीं । श्रीरामऋणीं मी उरलों ॥ ४० ॥
श्रीराम गेला परलोकासी । सवें नेलें लक्ष्मणासी ।
ऋण फेडावें कोणापासीं । अति दुःखेंसीं विलपत ॥ ४१ ॥
रणीं मारोनि लंकेशासी । सोडवून आणिल्या सीतेसी ।
ते पुसेल श्रीरामासी । मुख तीपासीं काय दावूं ॥ ४२ ॥
रडत पडत अति निर्दैव । म्हणाल नपुंसक सुग्रीव ।
राम अंतरला जीवींचा जीव । प्रताप दावूं कोणासी ॥ ४३ ॥
माझ्या अंगीं अति पुरुषार्थ । क्षणें निर्दाळीन लंकानाथ ।
रणीं उपटीन इंद्रजित । तरी रघुनाथ न भेटे ॥ ४४ ॥
रणीं निमाला श्रीरघुनाथ । ऐसा मानोनि इत्यर्थ ।
श्रीरामदुःखें दुःखाभिभूत । सुग्रीव प्राणांत करुं पाहे ॥ ४५ ॥
श्रीरामामागें राहणें । तें तंव मज निंद्य जिणें ।
रामविरहें प्राण देणें । या कारणें उद्यत ॥ ४६ ॥
त्यासी बिभीषण संबोखित । नाहीं निमाला रघुनाथ ।
समूळ न घेतां वृत्तांत । व्यर्थ प्राणांत कां करिसी ॥ ४७ ॥
चाल पाहों शरबंधांत । श्रीराम निमाला कीं जित ।
समूळ घेवोनि इत्यर्थ । मग कार्यार्थ विचारुं ॥ ४८ ॥
एवमुक्त्वा ततस्तस्य जलक्लिन्नेन पाणिना ।
सुग्रीवस्य शुभे नेत्रे प्रममार्ज बिभीषणः ॥१७॥
विमृज्य वदनं तस्य कपिराजस्य धीमतः ।
अब्रवीत्कालसंप्राप्तमसंभ्रांतमिदं वचः ॥१८॥
तत्मादुत्सृज्य वैक्लव्यं सर्वकार्यविनाशनम् ।
हितं रामपुरोगाणां सैन्यानामुचिंतय ॥१९॥
अथवा रक्ष्यतां रामौ यावत्संज्ञाविपर्ययः ।
लब्धसंज्ञौ हि काकुत्स्थौ भयं नौ व्यपनेष्यतः ॥२०॥
बिभीषणाचे सुग्रीवास आश्वासन :
सुग्रीवासी संबोखून । जलहस्तें बिभीषण ।
त्याचे नेत्र परिमार्जून । हितवचन अनुवादे ॥ ४९ ॥
तूं तंव राजा वानरनाथ । तुज देखोनियां रडत पडत ।
इंद्रजित येवोनि त्वरीत । करील घात सर्वांचा ॥ ५० ॥
श्रीरामाच्या हितकार्यार्था । प्रवर्तावें गा तत्वतां ।
येवों न द्यावी विकळता । संरक्षितां श्रीरामा ॥ ५१ ॥
श्रीराम होईल सावधान । त्रिसत्य सत्य माझें वचन ।
विकल्प न धरावा आपण । ऋषिभाषण वाल्मीकी ॥ ५२ ॥
सेना सैनिक प्रधान । मेळवोनि वानरगण ।
श्रीराम रक्षावा आपण । सावधान जंव होय ॥ ५३ ॥
श्रीराम-महिमा वर्णन :
सावध जाल्या रघुनाथ । करील रावणाचा घात ।
इंद्रजित-कुंभकर्णासमवेत । रणीं प्राणांत राक्षसां ॥ ५४ ॥
राक्षसांची जाती व्यक्तीं । उरों नेदी रघुपती ।
सकळ भयाची समाप्ती । जाण निश्चितीं श्रीरामें ॥ ५५ ॥
सुग्रीव आणि बिभीषण । ऐकोनि दोहींचें अनुवादन ।
अंगद झाला हास्यवदन । श्रीराममहिमान अलक्ष्य ॥ ५६ ॥
श्रीरामनामाच्या स्मरणीं । जन्ममरणां संमूळ पळणी ।
तो राम पडला शरबंधनीं । सत्य मानी तो मूर्ख ॥ ५७ ॥
शस्त्रघात लागल्या स्वप्नीं । तेणें जागृतीं न मरे कोणी ।
तेंवी राक्षसशरबंधनीं । श्रीराम रणीं केवीं पडे ॥ ५८ ॥
राम काळाचा कृतांत । राम जन्ममरणातीत ।
राम परब्रह्म सदोदित । त्यासीं रणघात केंवी घडे ॥ ५९ ॥
श्रीराम जगाचें जीवन । राम सर्वांगे चैतन्यघन ।
राम शस्त्राचें तिखटपण । त्यासी लागली बाण हे कदा न घडे ॥ ६० ॥
राम अवतारी ब्रह्म पूर्ण । त्यासीं नाहीं जन्ममरण ।
त्याचें अंगीं लागोनि बाण । पावला निधन तें मिथ्या ॥ ६१ ॥
राम चैतन्यविग्रही । राम देहींच विदेही ।
श्रीरामासीं द्वंद्वबाधा नाहीं । पडिला घायीं तें मिथ्या ॥ ६२ ॥
करितां रामनाम स्मरण । मरणासीं ये अलोट मरण ।
त्या श्रीरामा लागोनि बाण । निमाला पूर्ण ते मिथ्या ॥ ६३ ॥
शरबंधनीं रघुनंदन । चित्स्वरुपें सावधान ।
राम बंधनीं निर्बंधन । हें मुख्य लक्ष्मण रामाचें ॥ ६४ ॥
राम शरबंधनीं बंधातीत । तरी कां पडोन राहिला येथ ।
त्याही अर्थीचा वृत्तांत । सावचित्त अवधारा ॥ ६५ ॥
हनुमंत आणि अंगदाचा संवाद :
शिववरदाचे वरद बाण । मिथ्या न करी रघुनंदन ।
स्वयें साहोनि शरबंधन । शिववरदान प्रतिपाळी ॥ ६६ ॥
ऐसी श्रीरामाची मूळकथा । अंगदी सांगे आल्हादता ।
तेणें उल्हास हनुमंता । सप्रेमता आलिंगी ॥ ६७ ॥
परम प्रीतीं पाठी थापटी । श्रीरामस्वरुपकसवटी ।
अंगदाची गोड गोष्टी । सकळां पोटीं आल्हाद ॥ ६८ ॥
श्रीरामासीं नाहीं मरणावस्था । श्रीरामीं नाहीं विकळता ।
कोण पाड इंद्रजिता । मज हनुमंता असतांही ॥ ६९ ॥
ऐकोनि हनुमंतउत्तर । उल्लासले स्वयें वानर ।
अवघे करिती जयजयकार । हर्षें निर्भर सुग्रीव ॥ ७० ॥
येरीकडे स्वयें रावण । सीता वश करावया आपण ।
रणीं निमाले राम लक्ष्मण । साक्षेपें श्रवण स्वयें करवीं ॥ ७१ ॥
राक्षस्यस्त्रिजटा चापि शासनात्तमुपस्थिताः ।
ता उवाच ततो हृष्टो राक्षसी राक्षसेश्वरः ॥२१॥
हताविंद्रजिताख्यातौ वैदेह्या रामलक्ष्मणौ ।
पुष्पकं तां समारोप्य दर्शयध्वं रणे हतौ ॥२२॥
यस्याश्रयादवष्टब्धा सीता मां नोपतिष्ठते ।
सोऽस्या भर्ता सह भ्रात्रा निहतो रणमूर्धनि ॥२३॥
रावण सीतेला विमानातून रामलक्ष्मणांची स्थिती दाखवितो :
त्रिजटा वृद्ध राक्षसी । साक्षेपें पाचारोनि तिसी ।
रावण सांगे तियेसी । अति उल्लासीं गर्जोनी ॥ ७२ ॥
इंद्रजितानें करोनि रण । रणीं मारिले राम लक्ष्मण ।
ऐसे सीतेसी सांगोनि आपण । करवीं दर्शन दोहींचे ॥ ७३ ॥
सीता पुष्पकीं वाहोनि जाण । तिसी दाखवीं रणांगण ।
जेथें पडले राम लक्ष्मण । विंधोन बाण शरबंधीं ॥ ७४ ॥
श्रीरामबळें तत्वतां । मज दृष्टी नाणी सीता ।
त्या मारिलें रघुनाथा । सहित भ्राता सौमित्र ॥ ७५ ॥
रणीं मारिलें रघुकुळटिळका । सीते सांडोनि संमूळ शंका ।
उल्लासें वरी लंकानाथा । सकळ सुखा पावसी ॥ ७६ ॥
विमानं पुष्पकं शनैरारोपयन्शुभम् ।
रावणः कारयन्लंकां पताकाध्वजमालिनीम् ॥२४॥
घोषयामास च तदा स्वपुर्यां राक्षसेश्वरः ।
हताविंद्रजितां संख्ये तावुभौ रामलक्ष्मणौ ॥२५॥
विमानेन तु सा सीता तदा त्रिजटया सह ।
ददर्श वानराणां तु सर्वसैन्यं निपतितम् ॥२६॥
ततः सीता ददर्शोभौ शयनौ शरतल्पगौ ।
लक्ष्मणं चैव रामं च विसंज्ञौ शरपीडितौ ॥२७॥
तौ दृष्ट्वा भ्रातरौ तत्र शोकबाष्प समाकुला ।
वेपंती दुःखिता सीता करुणं विललाप ह ॥२८॥
सीता वाहोनि विमानीं । त्रिजटा निघाली घेवोनी ।
तंव रावण लंकाभुवनी । गुढिया उभवोनि हरिखेजे ॥ ७७ ॥
इंद्रजितानें विंधोनि बाण । रणीं पाडिले राम लक्ष्मण ।
भेरी त्राहाटिल्या निशाण । गडगर्जन लंकेसीं ॥ ७८ ॥
राम मारिला निशाचरीं । अनुवादती नरनारी ।
वानरांच्या मारिल्या हारी । बहु बाणाग्रीं विंधोनी ॥ ७९ ॥
वानरांचें निवासस्थान । देखिलें चालतां विमान ।
रणीं पडिले राम लक्ष्मण । रणांगण देखिलें ॥ ८० ॥
श्रीराम सुरक्षित असल्याची सीतेची खात्री :
श्रीराम आणि सौमित्र । पाडिले क्षितितळी महावीर ।
बाणीं भेदलें गात्रेंगात्र । प्रवाहे रुधिर सर्वांगीं ॥ ८१ ॥
देखोनि श्रीरामदर्शन । सीता हरिखली संपूर्ण ।
धन्य धन्य रावणच्छळण । श्रीरामनिधान देखिलें ॥ ८२ ॥
रावणाचा कृतोपकार । हा मज आजि घडला थोर ।
स्वयें भेटविला श्रीरामचंद्र । दशशिर कृपाळु ॥ ८३ ॥
विमानींहून आपण । हरिखें घाली लोटांगण ।
देखतां श्रीराम लक्ष्मण । सुख संपूर्ण सीतेसीं ॥ ८४ ॥
देखोनि श्रीरामावस्था । अवघें मिथ्या मानी सीता ।
राक्षसमाव हे तत्वतां । मृत्यु रघुनाथा असेना ॥ ८५ ॥
ऐकतां रामनामगजर । मृत्यु पळे अति सत्वर ।
न येववे रामनामासमोर । श्रीरामचंद्र न मारवे ॥ ८६ ॥
राम काळाचा आकळिता । त्यासीं नाहीं मरणावस्था ।
रणीं मारिलें रघुनाथा । मिथ्या वार्ता मायिक ॥ ८७ ॥
श्रीराम शस्त्राची निजशक्ती । श्रीराम गतीची निजगती ।
श्रीराम जगदात्मा त्रिजगतीं । शस्त्रसंपातासीं अलिप्त ॥ ८८ ॥
शस्त्रें छेदितां आकाशासी । शस्त्रें वृथा जाती आपैसीं ।
तैसीच गति श्रीरामासी । शस्त्रघातासीं अलिप्त ॥ ८९ ॥
श्रीराम निजांगें आपण । सकळ शस्त्रांचें तिखटपण ।
त्याच्या अंगीं रुपले बाण । वृथा विंदान मायिक ॥ ९० ॥
श्रीरामाच्या स्वस्वरुपासीं । ठाव नाहीं जन्ममृत्यूंसी ।
त्या मारिलें श्रीरामासीं । वृथा राक्षसी अनुवाद ॥ ९१ ॥
निजनिश्चयें तत्वतां । मरण नाहीं श्रीरघुनाथा ।
येणें निश्चयें असतां सीता । न बाधे व्यथा अणुमात्र ॥ ९२ ॥
बाह्यदर्शनी सीतेचा विलाप :
श्रीराम शिव सीता शक्ती । येरयेरांच्या जाणती गती ।
तेही लोकरक्षणार्थीं । असे विलापती तें ऐका ॥ ९३ ॥
माझ्या सर्वांगीं शुभलक्षण । मज न यावें वैधव्यपण ।
रणीं मारिल्या रघुनंदन । अवलक्षण लक्षणें ॥ ९४ ॥
हातीं पद्म पायीं पद्म । टाळुमस्तकीं सौभाग्यपद्म ।
रणीं मारिल्या श्रीराम । पद्में अपद्म मज माझीं ॥ ९५ ॥
निजलक्षणें सीता सती । स्वयें असे अनुवादती ।
अति दुःखें विलपती । श्रीरघुपतिवियोगें ॥ ९६ ॥
सौभाग्यवती तूं संपूर्ण । वसिष्ठाचें आशीर्वचन ।
मिथ्या जालें त्याचें ज्ञान । रघुनंदन निमाल्या ॥ ९७ ॥
मजसीं श्रीरामा अभिषिंचन । ऐसें अगस्तीचें वचन ।
त्याचेंही मिथ्या झालें ज्ञान । रघुनंदन निमाल्या ॥ ९८ ॥
अनसूया पतिव्रता पूर्ण । निजसौभाग्य अर्पीं आपण ।
तिचेंही उडालें सतीपण । रघुनंदन निमाल्या ॥ ९९ ॥
अरुधती श्रेष्ठ नारी । तिणें मज दिधली गळसरी ।
श्रीराम निमालियावरी । तिचीही थोरी अति मिथ्या ॥ १०० ॥
विश्वामित्र वरद परम । नित्य सीतासौभाग्यसंभ्रम ।
त्याचाही मिथ्या वचनधर्म । रणीं श्रीराम निमाल्या ॥ १ ॥
हा राम हा लक्ष्मण । दीर्घ स्वरें करीं रुदन ।
दिव्यास्त्र असतां पूर्ण । सर्वांगीं बाण वेधले कैसे ॥ २ ॥
सर्वांगीं खडतरोनि बाण । क्षितीं लोळती राम लक्ष्मण ।
सीता आक्रंदें करोनि रुदन । काय आपण अनुवादे ॥ ३ ॥
रणीं निमाल्या राम लक्ष्मण । निःशंक मज गांजील रावण ।
मीही आतांच सांडीन प्राण । कांस संपूर्ण घातली ॥ ४ ॥
घालोनियां वज्रासन । अर्धोन्मीलित करोनि नयन ।
सबाह्य श्रीराम चिंतून । त्यजावया प्राण उदित ॥ ५ ॥
सीतेचे त्रिजटेकडून सांत्वन :
तंव त्रिजटा म्हणे सीतेसी । तूं काय जालीस परम पिसीं ।
स्वस्थ असतां श्रीरामासीं । तूं कां त्याजिसी निजप्राण ॥ ६ ॥
परिदेवयतीं सीतां राक्षसी त्रिजटाब्रवीत् ।
मा विषादं कृथा देवि भर्तायं तव जीवति ॥२९॥
कारणानि तु वक्ष्यामि महांति सदृशानिच ।
नैतौ शक्यौ रणे जेतूमपि सर्वैः सुरासुरै ॥३०॥
इदं विमानं वैदेहि पुष्पकं नाम नामतः ।
दिव्यं न धारयेत्वां हि यदि रामो हतो भवेत् ॥३१॥
त्यज शोकं च दैन्यं च दुःखं च जनकात्मजे ।
रामलक्ष्मणयोरर्थे नैतौ शूरौ विजवितौ ॥३२॥
ऐकोनि सीतेचें रुदन । देखोनि प्राणांत निर्वाण ।
त्रिजटा बोले आपण । सीते सावधान अवधारीं ॥ ७ ॥
नाहीं निमाले राम लक्ष्मण । हें माझें सत्य भाषण ।
शरबंधीं सावधान । दोघे जण निजबोधें ॥ ८ ॥
दिव्यास्त्रे असतीं त्यांपाशीं । केंवी सांपडती शरबंधासीं ।
त्याही समूळ कारणांसी । ऐक तुजपासीं सांगेन ॥ ९ ॥
इंद्रजितें करोनि अभिचार । प्रसन्न करोनि श्रीशंकर ।
शिववरदाचे सर्पशर । अति अनिवार मागीतले ॥ ११० ॥
शिववरद सम्यक । जातां श्रीरामासंमुख ।
तो तुझें छेदील मस्तक । अंधारीं लागे अतर्क्य शरबंध ॥ ११ ॥
माझ्या वरदबाणांस्तव आपण । शरबंधी पडती दोघे जण ।
तुज संमुख गेलिया जाण । घेतील प्राण निमेषार्धें ॥१२ ॥
शरबंधीम् राम सौमित्र । सावधानत्वें निधडे शर ।
संमुख आल्या निशाचर । छेदिती शिर निमेषार्धें ॥ १३ ॥
ऐसिया शिववरदाभेण । कदा संमुख न ये रावण ।
इंद्रजित स्वयें नये आपण । राक्षसगण न येती ॥ १४ ॥
सत्प प्रहर जाल्यापाठीं । सुटती शरबंधाच्या गांठी ।
दोघे उठती कडकडाटीं । राम जगजेठी अनिवार्य ॥ १५ ॥
आणीक आहे गुह्य गोष्टी । गरुड येईल श्रीरामभेटी ।
शरसर्प पळती उठाउठीं । दोघे जगजेठी निर्मुक्त ॥ १६ ॥
असत्य न वदे माझें वदन । पूर्वी विटाळलें नाहीं जाण ।
पुढें न बोलें असत्य वचन । सत्य भाषण हें माझें ॥ १७ ॥
त्रिजटेने सांगितलेली विशिष्ट खूण :
सीतासतीचे संगतीं । त्रिजटेसीं ज्ञानस्फुर्ती ।
दृष्टीं देखिल्या रघुपती । विज्ञानस्थिति ठसावे ॥ १८ ॥
आणिक प्रत्यक्ष दृष्टांत । विधवास्पर्शें विमान पतित ।
हें तंव घडलें नाहीं येथ । तूं सौभाग्यवती श्रीरामें ॥ १९ ॥
निमाला असता रघुनाथ । तरी हें विमान होतें पतित ।
तूं सौभाग्यभाग्यवंत । स्वस्थ रघुनाथ शरबंधीं ॥ १२० ॥
ज्यासीं स्वभावें विमान प्राप्त । तो त्रैलोक्यीं होय समर्थ ।
तें विमान देत लंकानाथ । तूं सौभाग्यवंत भाग्याची ॥ २१ ॥
दाटून प्राप्त होय विमान । या भाग्याचें निजमहिमान ।
येथें गणूं शके कोण । तूं भाग्यपूर्ण श्रीरामें ॥ २२ ॥
शरपंजरीं श्रीराम स्वस्थ । सत्य मानून वचनार्थ ।
शोक दैन्य दुःखार्थ । सांडीं समस्त जानकीये ॥ २३ ॥
संरक्षणाचे अनुवृत्ती । त्रिजटेसीं सीतासंगती ।
तेणें पावली ज्ञानस्फूर्ती । धन्य संगती संतांची ॥ २४ ॥
त्रिजटा केवळ सत्वमूर्ती । नाहीं असत्याची अनुवृत्ती ।
तेणें फळली संतसंगती । ज्ञानस्थितीं अनुवदे ॥ २५ ॥
श्रुत्वा च वचनं तस्याः सीता सुरसुतोपमा ।
कृतांजलिरुवाचेमामेवमस्त्विति मैथिली ॥३३॥
विमानं पुष्पकं तच्च सन्निवर्त्य मनोजवम् ।
दीना त्रिजटया सीता लंका भूयः प्रवेशिता ॥३४॥
ततस्त्रिजटया सार्द्धं पुष्पकादवतीर्य सा ।
अशोकवनिकामेव राक्षसीभिः प्रवेशिता ॥३५॥
स्वस्थ श्रीराम लक्ष्मण । ऐकोनि त्रिजटेचें वचन ।
सीता जाहली सुप्रसन्न । स्वानंदे पूर्ण अनुवादे ॥ २६ ॥
विशिष्ट खूण ऐकून सीतेची प्रतिक्रिया :
जें अनुवादलीसी साजणी । तथास्तु हो तुझी वाणी ।
ऐसें सीता अनुवदोनी । श्रीरामदर्शनीं सादर ॥ २७ ॥
परतवितां विमान । श्रीरामाचें दूर दर्शन ।
सीता पाहे सावधान । प्रत्यंगी मन न्यासूनी ॥ २८ ॥
ठाणमाणगुणलक्षण । सबाह्य श्रीरामलक्ष्मण ।
सीता निरखी आपण । सावधान पतिरुपीं ॥ २९ ॥
सबाह्य श्रीराम मूर्च्छापन्नं अंतरीं स्वयें सावधान ।
बाह्य अर्धोन्मीलित नयन । देखणा पूर्ण सर्वांगें ॥ १३० ॥
बाह्य श्रीरामा शरबंधन । अंतरीं बंधमोक्षविहीन ।
बाह्य रुधिरोक्षित मलक्लिन्न । अंतरीं निर्मळ निर्गुणत्वें ॥ ३१ ॥
बाह्य विकळता रघुपती । अंतरी सावध सर्वां भूतीं ।
बाह्य पडता दिसतो क्षितीं । गुणतीतीं विश्रांत ॥ ३२ ॥
लक्षितां श्रीरामठाणमाण । वेदशास्त्रां पडे मौन ।
माजीं हरपे गगन गहन । त्याचेंही महिमान कोण वर्णी ॥ ३३ ॥
सीतेची प्रसन्नताः
ऐसें देखोनि रघुनाथा । आपअपणा विसरे सीता ।
सबाह्य कोंदली स्वरुपता । पतिपरमार्था देखोनी ॥ ३४ ॥
छळूं जातां स्वयें रावण । छळणीं श्रीराम सुप्रसन्न ।
देखोनि जिजात्मदर्शन । सुखसंपन्न मज केलें ॥ ३५ ॥
रावण म्हणों नये कपटी । जेणें श्रीरामेसी करोनि भेटी ।
निवविलें सुख सीतुष्टीं । उपकार कोटी मज त्याचा ॥ ३६ ॥
स्वप्नीं नायकें श्रीरामगोष्टी । तो प्रत्यक्ष दाविला दृष्टी ।
रावण म्हणों नये कपटी । सुखसंतुष्टीं निवविलें ॥ ३७ ॥
यापरी दावोनि रणांगण । भेटवोनि श्रीराम लक्ष्मण ।
त्रिजटा परतली आपण । घेवोनि विमान सीतेसीं ॥ ३८ ॥
शोक नाहीम् सीतेच्या मनीं । यालागीं पावली अशोकस्थानीं ।
सुखसंपन्न निजबंधनीं । श्रीरामपत्नी सुखरुप ॥ ३९ ॥
उल्लंघोनि लंकाभुवन । ठाकोनि आली अशोकवन ।
तेथें खेचोनि विमान । ठेवी आपण सीतेसीं ॥ १४० ॥
छळण करितां रावण । छळणीं सीता सुप्रसन्न ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥ ४१ ॥
श्रीरामा करितां शरबंधन । राम शरबंधीं सुप्रसन्न ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥ ४२ ॥
रावणें करितां अति बंधन । श्रीराम सीता सुप्रसन्न ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥ ४३ ॥
श्रीरामसीतादर्शन । देखतां दोघे सुप्रसन्न ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥ १४४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां जानकीश्रीरामदर्शनं नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
ओंव्या १४४ ॥ श्लोक ॥ ३५ ॥ एवं ॥ १७९ ॥
GO TOP
|