सीतया पृष्टेन हनुमता श्रीरामस्य शारीरिकलक्षणानां गुणानां च वर्णनं नरवानरमैत्री प्रसंग श्रावयित्वा सीताया
मनसि स्वकीयविश्वासस्योत्पदनं च -
|
सीतेने विचारल्यावर हनुमन्ताने श्रीरामांच्या शारीरिक चिन्हांचे आणि गुणांचे वर्णन करणे तसेच नर-वानरांच्या मैत्रीचा प्रसंग ऐकवून सीतेच्या मनात स्वतः संबन्धी विश्वास उत्पन्न करणे -
|
तां तु रामकथां श्रुत्वा वैदेही वानरर्षभात् ।
उवाच वचनं सान्त्वं इदं मधुरया गिरा ॥ १ ॥
|
वानरश्रेष्ठ हनुमन्ताच्या मुखातून श्रीरामकथा ऐकल्यावर वैदेही सीता सौम्य आणि मधुर वाणीने त्याला म्हणाली - ॥१॥
|
क्व ते रामेण संसर्गः कथं जानासि लक्ष्मणम् ।
वानराणां नराणां च कथमासीत् समागमः ॥ २ ॥
|
हे कपिश्रेष्ठ ! तुझा श्रीरामचन्द्रांशी संबन्ध कसा आला ? तू लक्ष्मणास कसे काय ओळखतोस ? वानर आणि मनुष्य यांची मैत्री कशा प्रकारे संभव झाली ? ॥२॥
|
यानि रामस्य चिन्हानि लक्ष्मणस्य च वानर ।
तानि भूयः समाचक्ष्व न मां शोकः समाविशेत् ॥ ३ ॥
|
हे कपि ! श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या चिन्हांचे तू परत एकदा वर्णन कर म्हणजे माझ्या मनात कुठल्याही प्रकारे शोकाचा समावेश होणार नाही. ॥३॥
|
कीदृशं तस्य संस्थानं रूपं रामस्य कीदृशम् ।
कथमूरू कथं बाहू लक्ष्मणस्य च शंस मे ॥ ४ ॥
|
मला सांग बरे की भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या शरीरांची ठेवण कशी आहे ? त्यांचे रूप कसे आहे ? त्यांच्या मांड्या आणि भुजा कशा आहेत ? ॥४॥
|
एवमुक्तस्तु वैदेह्या हनुमान् मारुतात्मजः ।
ततो रामं यथातत्त्वमाख्यातुमुपचक्रमे ॥ ५ ॥
|
वैदेहीने असे विचारल्यावर पवनपुत्र हनुमन्तानी श्रीरामचन्द्रांच्या स्वरूपाचे यथावत वर्णन करण्यास आरंभ केला- ॥५॥
|
जानन्ती बत दिष्ट्या मां वैदेहि परिपृच्छसि ।
भर्तुः कमलपत्राक्षि संस्थानं लक्ष्मणस्य च ॥ ६ ॥
|
हे कमलपत्राक्षी ! हे वैदेही ! तू आपल्या पतिदेवा विषयी श्रीराम विषयी आणि दीर लक्ष्मणाविषयी, त्यांच्या शरीराविषयी सर्व काही जाणत असूनही ज्या अर्थी मला विचारत आहेस, त्याअर्थी ती माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. ॥६॥
|
यानि रामस्य चिह्नानि लक्ष्मणस्य च यानि वै ।
लक्षितानि विशालाक्षि वदतः शृणु तानि मे ॥ ७ ॥
|
हे विशाललोचने ! मी, श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या ज्या ज्या चिन्हांना जाणले आहे ती मी सांगतो. माझ्याकडून तू ती श्रवण कर. ॥७॥
|
रामः कमलपत्राक्षः पूर्णचन्द्रनिभाननः ।
रूपदाक्षिण्यसम्पन्नः प्रसूतो जनकात्मजे ॥ ८ ॥
|
हे जनकात्मजे ! श्रीरामाचे नेत्र प्रफुल्ल कमलदलाप्रमाणे विशाल आणि सुन्दर आहेत आणि मुख पौर्णिमेच्या चन्द्राप्रमाणे मनोहर आहे. ते जन्मापासूनच रूप आणि उदारता आदि गुणांनी संपन्न आहेत. ॥८॥
|
तेजसाऽऽदित्यसङ्काशः क्षमया पृथिवीसमः ।
बृहस्पतिसमो बुद्ध्या यशसा वासवोपमः ॥ ९ ॥
रक्षिता जीवलोकस्य स्वजनस्य च रक्षिता ।
रक्षिता स्वस्य वृत्तस्य धर्मस्य च परन्तपः ॥ १० ॥
|
ते तेजात सूर्याप्रमाणे, क्षमेत पृथ्वीसारखे, बुद्धित बृहस्पतीसदृश्य आणि यशात इन्द्राप्रमाणे आहेत. ते संपूर्ण जगताचे आणि स्वजनांचे रक्षक आहेत. शत्रूंना सन्ताप देणारे श्रीराम आपल्या सदाचाराचे आणि धर्माचे रक्षण करणारे आहेत. ॥९-१०॥
|
रामो भामिनि लोकस्य चातुर्वर्ण्यस्य रक्षिता ।
मर्यादानां च लोकस्य कर्ता कारयिता च सः ॥ ११ ॥
|
हे भामिनी ! श्रीराम जगान्तील चारी वर्णांचे रक्षण करतात. लोकांमध्ये धर्माच्या मर्यादांना नियन्त्रित करून त्यांचे पालन करणारे आणि करविणारेही तेच आहेत. ॥११॥
|
अर्चिष्मानर्चितोऽत्यर्थं ब्रह्मचर्यव्रते स्थितः ।
साधूनामुपकारज्ञः प्रचारज्ञश्च कर्मणाम् ॥ १२ ॥
|
सर्वत्र अत्यन्त भक्तिभावाने त्यांची पूजा होत असते. ते कान्तिमान आणि परम प्रकाशस्वरूप असून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत असतात. साधु पुरुषांचे उपकार जाणणारे असून ते आचरणद्वारा सत्कर्माचा प्रचार कसा करावा, हे जाणतात. ॥१२॥
|
राजनीत्यां विनीतश्च ब्राह्मणानामुपासकः ।
ज्ञानवाञ्शीलसम्पन्नो विनीतश्च परन्तपः ॥ १३ ॥
|
ते राजविद्येचे ज्ञाते असून अत्यन्त नम्र आहेत. ते ब्राह्मणांचे उपासक, ज्ञानवान, शीलसंपन्न तथा नम्र असून शत्रूंना सन्ताप देण्यास समर्थ आहेत. ॥१३॥
|
यजुर्वेदविनीतश्च वेदविद्भिः सुपूजितः ।
धनुर्वेदे च वेदे च वेदाङ्गेषु च निष्ठितः ॥ १४ ॥
|
त्यांना यजुर्वेदाचे उत्तम शिक्षण मिळालेले असून वेदवेत्त्या विद्वानांनी त्यांचा उत्तम सन्मान केला आहे. ते चारी वेद, धनुर्वेद आणि सहा वेदांग यांचे ही परिनिष्ठित विद्वान आहेत. ॥१४॥
|
विपुलांसो महाबाहुः कम्बुग्रीवः शुभाननः ।
गूढजत्रुः सुताम्राक्षो रामो देवि जनैः श्रुतः ॥ १५ ॥
|
त्यांचे खान्दे रून्द, भुजा मोठ मोठ्या, गळा शंखाप्रमाणे आणि मुख सुन्दर आहे. गळ्याची हाडे मांसाने झाकलेली असून, नेत्रामध्ये किंचित लालिमा आहे. ते लोकांमध्ये राम या नावाने प्रसिद्ध आहेत. ॥१५॥
|
दुन्दुभिस्वननिर्घोषः स्निग्धवर्णः प्रतापवान् ।
समश्च सुविभक्ताङ्गो वर्णं श्यामं समाश्रितः ॥ १६ ॥
|
त्यांचा स्वर दुन्दुभिप्रमाणे गंभीर असून शरीराचा रंग सुन्दर आणि मनोरम (स्निग्ध) आहे. त्यांचा प्रताप खूपच वरचढ आहे. त्यांचे सर्व अंगच सुडौल आणि सम असून कान्ति श्याम आहे. ॥१६॥
|
त्रिस्थिरस्त्रिप्रलम्बश्च त्रिसमस्त्रिषु चोन्नतः ।
त्रिताम्रस्त्रिषु च स्निग्धो गम्भीरस्त्रिषु नित्यशः ॥ १७ ॥
|
त्यांची तीन्ही अंगे (वक्षःस्थळ, मनगट आणि मूठ) स्थिर (सुदृढ) आहेत. भुवया, भुजा आणि मेढ ही तीन अंगे लंब आहेत, केसांचा अग्रभाग अण्डकोष आणि गुडघे- हे तीन्ही समान आहेत. वक्षःस्थळ, नाभिच्या किनार्याचा भाग आणि उदर हे तीन उन्नत आहेत. नेत्रांच्या कडा, नखे आणि हातापायाचे तळवे हे तीन उन्नत आहेत. शिश्नाचा अग्रभाग (लिंगमणी) दोन्ही पायावरील रेखा आणि मस्तकावरील केस हे तीन्ही स्निग्ध आहेत आणि स्वर, चाल (गती) आणि नाभी ही तीन्ही गंभीर आहेत. ॥१७॥
|
त्रिवलीमांस्त्र्यवनतश्चतुर्व्यङ्गस्त्रिशीर्षवान् ।
चतुष्कलश्चतुर्लेखश्चतुष्किष्कुश्चतुः समः ॥ १८ ॥
|
त्यांच्या उदरावर आणि गळ्यावर तीन रेखा आहेत. तळव्याचे मध्यभाग, पायावरील रेखा आणि स्तनांचे अग्रभाग हे तीन्ही खोलगट आहेत. गळा, पाठ तथा दोन्ही पोटर्या हे चारी अवयव लहान (आखुड) आहेत. त्यांच्या मस्तकावर तीन भोंवरे आहेत. त्यांच्या अंगुष्ठमूळाचे ठिकाणी आणि ललाटावर चार रेषा आहेत. त्यांची उंची चार हात आहे. त्यांचे गाल, भुजा, मांड्या आणि गुडघे हे चारी युग्म एकसारखे (सम) आहेत. ॥१८॥
|
चतुर्दशसमद्वन्द्वश्चश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्गतिः ।
महोष्ठहनुनासश्च पञ्चस्निग्धोऽष्टवंशवान् ॥ १९ ॥
|
शरीरात जे दोन दोन संख्येमध्ये चौदा अवयव असतात तेही त्यांचे परस्पराशी सम आहेत (भुवया, नाकपुड्या, नेत्र, कान, ओठ, स्तन, कोपरे, मनगट, मांड्या, गुडघे, वृषण, कमरेच्या दोन्ही बाजू, हात आणि पाय) हे सर्व सम आहेत. त्यांच्या प्रत्येक बाजूला चार चार दाढा आहेत. त्या शास्त्रीय लक्षणांनी युक्त आहेत, सिंह, व्याघ्र, हत्ती आणि वृषभ या चारांप्रमाणे चार प्रकारच्या गतीने ते चालतात. त्यांचे ओठ, हनुवटी आणि नासिकाही प्रशस्त आहेत. केस, नेत्र, दान्त, त्वचा आणि पायांचे तळवे हे पाच अवयव स्निग्ध आहेत. (अथवा जीभ, मुख, नखे, केस आणि त्वचा ही पाच अंगे स्निग्ध आहेत) दोन्ही भुजा, दोन्ही मांड्या, दोन्ही पोटर्या आणि हात, पायाची बोटे ही आठ अंगे - आठ अवयव उत्तम लक्षणांनी युक्त आहेत (अथवा कळका प्रमाणे सरळ आहेत.) ॥१९॥
|
दशपद्मो दशबृहत्त्रिभिर्व्याप्तो द्विशुक्लवान् ।
षडुन्नतो नवतनुस्त्रिभिर्व्याप्नोति राघवः ॥ २० ॥
|
त्यांचे नेत्र, मुख, चेहरा, जीभ, ओठ, ताळ, स्तन, नखे, हात आणि पाय हे दहा अवयव कमलाप्रमाणे आहेत. (या दहाच्या ठिकाणी कमलासारख्या आकृती आहेत) वक्षःस्थळ, मस्तक, ललाट, मान, हात, खान्दे, नाभी, पाय, पाठ आणि कान हे दहा अवयव विशाल आहेत. श्री, यश आणि प्रताप (तेज) या तीन्हीनी ते व्याप्त आहेत. त्यांचे मातृकुळ आणि पितृकुळ ही दोन्ही अत्यन्त शुद्ध आहेत. पार्श्वभाग, उदर, वक्षःस्थळ, नासिका, खान्दे आणि ललाट ही सहा अंगे उन्नत आहेत. त्यांच्या बोटांची पेरे, केस, रोम, नखे, त्वचा, जननेद्रिंये, शम, दृष्टी आणि बुद्धि ही नऊ सूक्ष्म आहेत. तसेच ते रघुनाथ पूर्वान्ह, मध्यान्ह आणि अपरान्ह तीन काळांच्या द्वारा क्रमशः धर्म, अर्थ आणि काम यांचे अनुष्ठान करणारे आहेत. ॥२०॥
|
सत्यधर्मरतः श्रीमान् संग्रहानुग्रहे रतः ।
देशकालविभागज्ञः सर्वलोकप्रियंवदः ॥ २१ ॥
|
श्रीरामचन्द्र सत्यधर्माविषयी तत्पर, श्रीसंपन्न, न्यायसंगत, धनाचा संग्रह आणि प्रजेवर अनुग्रह करण्याविषयी दक्ष असून ते देशकाल वर्तमान जाणणारे आणि सर्व लोकांशी प्रिय भाषण करणारे आहेत. ॥२१॥
|
भ्राता चास्य च वैमात्रः सौमित्रिरमितप्रभः ।
अनुरागेण रूपेण गुणैश्चापि तथाविधः ॥ २२ ॥
|
त्यांचा अतुल तेजस्वी सावत्र भाऊ सुमित्रापुत्र लक्ष्मण ही अनुराग रूप आणि सद्गुणांच्या दृष्टीनेही श्रीरामासारखाच आहे. ( व कौसल्या आणि सुमित्रा या दोघींनाही आपल्या माता समजणारा आहे.) ॥२२॥
|
स सुवर्णच्छविः श्रीमान् रामः श्यामो महायशाः ।
तावुभौ नरशार्दूलौ त्वद्दर्शनकृतोत्सवौ ॥ २३ ॥
विचिन्वन्तौ महीं कृत्स्नां अस्माभिः सह सङ्गतौ ।
|
त्या दोन्ही भावांमध्ये अन्तर एवढेच आहे की लक्ष्मणाच्या शरीराची कान्ति सुवर्णासमान गौर आहे आणि महायशस्वी श्रीरामचन्द्रांचा विग्रह श्यामसुन्दर आहे. ते दोन्ही नरश्रेष्ठ रामलक्ष्मण तुझ्या दर्शनाकरिता उत्सुक झालेले आहेत आणि तुझ्या शोधासाठी सारी पृथ्वी पालथी घालीत असता त्यांची आमच्याशी भेट झाली. ॥२३ १/२॥
|
त्वामेव मार्गमाणौ तौ विचरन्तौ वसुन्धराम् ॥ २४ ॥
ददर्शतुर्मृगपतिं पूर्वजेनावरोपितम् ।
|
तुझ्या शोधासाठी पृथ्वीवर संचार करीत असता त्या दोघा भावांची वानराधिपती सुग्रीवाशी गांठ पडली. सुग्रीवाच्या ज्येष्ठ भ्रात्याने त्याला राज्यान्तून हाकलून दिलेले होते. ॥२४ १/२॥
|
ऋष्यमूकस्य मूले तु बहुपादपसंकुले ॥ २५ ॥
भ्रातुर्भयार्तमासीनं सुग्रीवं प्रियदर्शनम् ।
|
त्यावेळी अनेक तर्हेच्या (प्रकारच्या) वृक्षांनी घेरलेल्या ऋष्यमूक पर्वताच्या पायथ्याशी त्यांची, भावाच्या भयाने पीडित झालेल्या प्रियदर्शन सुग्रीवांशी गांठ पडली. ॥२५ १/२॥
|
वयं तु हरिराजं तं सुग्रीवं सत्यसङ्गरम् ॥ २६ ॥
परिचर्यामहे राज्यात् पूर्वजेनावरोपितम् ।
|
त्या काळी ज्येष्ठ भ्रात्याने राज्यातून हुसकून लावलेल्या सत्यप्रतिज्ञ वानरराज सुग्रीवाची सेवा आम्ही करीत होतो. ॥२६ १/२॥
|
ततस्तौ चीरवसनौ धनुःप्रवरपाणिनौ ॥ २७ ॥
ऋष्यमूकस्य शैलस्य रम्यं देशमुपागतौ ।
स तौ दृष्ट्वा नरव्याघ्रौ धन्विनौ वानरर्षभः ॥ २८ ॥
अवप्लुतो गिरेस्तस्य शिखरं भयमोहितः ।
|
शरीरावर वल्कल वस्त्रे आणि हातात धनुष्यबाण धारण करणारे ते दोन्ही बन्धु जेव्हा ऋष्यमूक पर्वताच्या रमणीय प्रदेशात आले - तेव्हा धनुष्य धारण करणार्या त्या दोन्ही नरश्रेष्ठ वीरांना तेथे उपस्थित झालेले पाहून वानरशिरोमणी सुग्रीव भयाने व्याकुल झाला आणि उडी मारून त्या पर्वताच्या सर्वात उंच शिखरावर जाऊन पोहोंचला. ॥२७-२८ १/२॥
|
ततः स शिखरे तस्मिन् वानरेन्द्रो व्यवस्थितः ॥ २९ ॥
तयोः समीपं मामेव प्रेषयामास सत्वरम् ।
|
त्या शिखरावर जाऊन बसल्यावर वानरराज सुग्रीवाने मलाच शीघ्रतापूर्वक त्या दोन्ही बन्धूंच्याजवळ धाडले. ॥२९ १/२॥
|
तावहं पुरुषव्याघ्रौ सुग्रीववचनात् प्रभू ॥ ३० ॥
रूपलक्षणसम्पन्नौ कृताञ्जलिरुपस्थितः ।
|
सुग्रीवाच्या आज्ञेने त्या प्रभावशाली, रूपवान आणि शुभलक्षण संपन्न दोन्ही पुरुषसिंह वीरांच्या सेवेत मी हात जोडून उपस्थित झालो. ॥३० १/२॥
|
तौ परिज्ञाततत्त्वार्थौ मया प्रीतिसमन्वितौ ॥ ३१ ॥
पृष्ठमारोप्य तं देशं प्रापितौ पुरुषर्षभौः ।
|
माझ्याकडून यथार्थ गोष्टी जाणून ते दोघे अत्यन्त प्रसन्न झाले. नन्तर त्या दोन्ही पुरुषोत्तम बन्धुंना आपल्या पाठीवर बसवून त्यांना जेथे वानरराज सुग्रीव बसला होता, त्या स्थानी घेऊन आलो. ॥३१ १/२॥
|
निवेदितौ च तत्त्वेन सुग्रीवाय महात्मने ॥ ३२ ॥
तयोरन्योन्यसंभाषाद् भृशं प्रीतिरजायत ।
|
त्या ठिकाणी महात्मा सुग्रीवाला मी त्या दोन्ही बन्धूचा यथार्थ परिचय करून दिला. नन्तर श्रीराम आणि सुग्रीव यांच्यात संभाषण होऊन त्यायोगे त्या दोघात परस्पराबद्दल खूपच प्रेम उत्पन्न झाले. ॥३२ १/२॥
|
ततस्तौ कीर्तिसम्पन्नौ हरीश्वरनरेश्वरौ ॥ ३३ ॥
परस्परकृताश्वासौ कथया पूर्ववृत्तया ।
|
तेथे त्या दोन्ही प्रेमळ वानरेश्वर आणि नरेश्वर यांनी स्वतः संबन्धी पूर्वी घडलेल्या घटनांची माहिती एकमेकास ऐकविली आणि दोघांनी एकमेकास आश्वासन दिले. ॥३३ १/२॥
|
ततः स सान्त्वयामास सुग्रीवं लक्ष्मणाग्रजः ॥ ३४ ॥
स्त्रीहेतोर्वालिना भ्रात्रा निरस्तं पुरुतेजसा ।
|
त्यावेळी लक्ष्मणाच्या ज्येष्ठ भ्रात्याने - श्रीरामांनी, स्त्रीसाठी आपल्या महातेजस्वी बन्धु वालीद्वारा घरातून हुसकून लावला गेलेल्या सुग्रीवाचे सान्त्वन केले. ॥३४ १/२॥
|
ततस्त्वन्नाशजं शोकं रामस्याक्लिष्टकर्मणः ॥ ३५ ॥
लक्ष्मणो वानरेन्द्राय सुग्रीवाय न्यवेदयत् ।
|
त्यानन्तर अनायास महान कर्म करणार्या भगवान श्रीरामांना तुमच्या वियोगाने जो शोक होत होता, त्या संबन्धी लक्ष्मणांनी वानरराज सुग्रीवास सांगितले. ॥३५ १/२॥
|
स श्रुत्वा वानरेन्द्रस्तु लक्ष्मणेनेरितं वचः ॥ ३६ ॥
तदासीन्निष्प्रभोऽत्यर्थं ग्रहग्रस्त इवांशुमान् ।
|
लक्ष्मणाने सांगितलेली हकिकत ऐकून वानरराज सुग्रीव तात्काळ ग्रह ग्रस्त सूर्याप्रमाणे निस्तेज झाले. ॥३६ १/२॥
|
ततस्त्वद्गात्रशोभीनि रक्षसा ह्रियमाणया । ३७ ॥
यान्याभरणजालानि पातितानि महीतले ।
तानि सर्वाणि रामाय आनीय हरियूथपाः ॥ ३८ ॥
संहृष्टा दर्शयामासुर्गतिं तु न विदुस्तव ।
|
नन्तर ज्यावेळी राक्षस रावण तुझे अपहरण करून तुला घेऊन जात होता, तेव्हा तुझ्या शरीरावर शोभून दिसणारी जी आभूषणे तू पृथ्वीवर टाकून दिली होतीस, ती वानरयूथपति सुग्रीवांनी अत्यन्त प्रसन्नतेने श्रीरामास दाखविली, पण त्यांनाही तुझा पत्ता माहीत नव्हता. ॥३७-३८ १/२॥
|
तानि रामाय दत्तानि मयैवोपहृतानि च ॥ ३९ ॥
स्वनवन्त्यवकीर्णानि तस्मिन् विहतचेतसि ।
तान्यङ्के दर्शनीयानि कृत्वा बहुविधं तदा ॥ ४० ॥
तेन देवप्रकाशेन देवेन परिदेवितम् ।
|
तू फेकून दिल्यावर ती सर्व आभूषणे झन-झन आवाज करीत जमिनीवर पडून सर्वत्र विखुरली गेली होती. मीच ती सर्व एकत्र गोळा करून आणली होती. ज्या दिवशी ते अलङ्कार श्रीरामचन्द्रांस दिले गेले तेव्हा त्यांनी ते अलङ्कार मांडीवर घेतले आणि तत्क्षणी शोकाने ते मूर्च्छित झाले. नन्तर त्या दर्शनीय अलङ्कारांना हृदयाशी धरून त्या दैवतुल्य प्रभा असलेल्या भगवान श्रीरामांनी नाना प्रकारे शोक केला. ॥३९-४० १/२॥
|
पश्यतस्तानि रुदतस्ताम्यतश्च पुनः पुनः ॥ ४१ ॥
प्रादीपयद् दाशरथेस्तदा शोकहुताशनम् ॥ ४२ ॥
शायितं च चिरं तेन दुःखार्तेन महात्मना ।
मयापि विविधैर्वाक्यैः कृच्छ्रादुत्थापितः पुनः ॥ ४३ ॥
|
श्रीराम त्या आभूषणांना वारंवार पहात होते, रूदन करीत होते आणि क्षुब्ध होत होते. त्यावेळी दाशरथी रामांचा शोकाग्नी फारच भडकला होता, त्या दुःखाने व्याकुळ होऊन ते बराच वेळपर्यन्त मूर्च्छित होऊन पडले होते. तेव्हा मी नाना प्रकारच्या समजुतीच्या गोष्टी सांगून मोठ्या प्रयत्नाने त्यांना परत उठविले. ॥४१-४३॥
|
तानि दृष्ट्वा महार्हाणि दर्शयित्वा मुहुर्मुहुः ।
राघवः सहसौमित्रिः सुग्रीवे संन्यवेशयत् ॥ ४४ ॥
|
लक्ष्मणसहित श्रीरघुनाथांनी त्या बहूमूल्य आभूषणांना वारंवार पाहिले व इतरांसही दाखविले आणि परत ती सर्व सुग्रीवाजवळ दिली. ॥४४॥
|
स तवादर्शनादार्ये राघवः परितप्यते ।
महता ज्वलता नित्यमग्निनेवाग्निपर्वतः ॥ ४५ ॥
|
हे आर्ये ! तुझे दर्शन होत नसल्याने श्रीराघवास अत्यन्त दुःख आणि सन्ताप होत आहे. ज्याप्रमाणे ज्वालामुखी पर्वत जळत असलेल्या फार मोठ्या आगीमुळे सदा तापत असतो, त्याप्रमाणे श्रीराम तुझ्या विरहाग्नीत सारखे जळत आहेत. ॥४५॥
|
त्वत्कृते तमनिद्रा च शोकश्चिन्ता च राघवम् ।
तापयन्ति महात्मानमग्न्यागारमिवाग्नयः ॥ ४६ ॥
|
ज्याप्रमाणे आहवनीय आदि तीन प्रकारचे अग्नि अग्निशाळेला सदा तापवीत असतात, त्याप्रमाणे तुझ्या विरहामुळे श्रीरघुनाथांस अनिद्रा, शोक आणि चिन्ता ही तिन्ही सन्तप्त करीत आहेत. ॥४६॥
|
तवादर्शनशोकेन राघवः प्रविचाल्यते ।
महता भूमिकम्पेन महानिव शिलोच्चयः ॥ ४७ ॥
|
हे देवी ! जसे जोरदार भूकंपाने महान पर्वतही हादरतो, त्याप्रमाणे तुझे दर्शन होत नसल्याने उत्पन्न होणारा शोक श्रीरघुनाथास विचलित करीत आहे. ॥४७॥
|
काननानि सुरम्याणि नदी प्रस्रवणानि च ।
चरन् न रतिमाप्नोति त्वामपश्यन् नृपात्मजे ॥ ४८ ॥
|
हे राजकुमारी ! तुझे दर्शन होत नसल्याने रमणीय वने, नद्या आणि निर्झर यांच्याजवळ विहार करीत असताही श्रीरामास सुख होत नाही. ॥४८॥
|
स त्वां मनुजशार्दूलः क्षिप्रं प्राप्स्यति राघवः ।
समित्रबान्धवं हत्वा रावणं जनकात्मजे ॥ ४९ ॥
|
हे जनकात्मजे ! पुरुषसिंह भगवान श्रीराम, रावणाला त्याचे मित्र आणि बन्धुबान्धवांसह ठार मारून तुला लवकरच भेटतील. ॥४९॥
|
सहितौ रामसुग्रीवावुभावकुरुतां तदा ।
समयं वालिनं हन्तुं तव चान्वेषणं प्रति ॥ ५० ॥
|
ज्या दिवशी श्रीराम आणि सुग्रीव मित्रभावाने एकमेकास भेटले, तेव्हा दोघांनी एकमेकास मदत करण्याची प्रतिज्ञा केली. श्रीरामांनी वालीला मारण्याचे आणि सुग्रीवाने तुझा शोध करण्याचे वचन दिले. ॥५०॥
|
ततस्ताभ्यां कुमाराभ्यां वीराभ्यां स हरीश्वरः ।
किष्किन्धां समुपागम्य वाली युद्धे निपातितः ॥ ५१ ॥
|
त्यानन्तर ते दोन्ही राजकुमार किष्किन्धेला गेले आणि वानरराज वालीला त्यांनी युद्धात ठार मारले. ॥५१॥
|
ततो निहत्य तरसा रामो वालिनमाहवे ।
सर्वर्क्षहरिसङ्घानां सुग्रीवमकरोत् पतिम् ॥ ५२ ॥
|
सारांश, युद्धामध्ये वालीचा स्वपराक्रमाने वध करून, रामाने सुग्रीवाला सर्व ऋक्ष आणि वानर यांच्या जमातींचे अधिपत्य दिले. ॥ ५२ ॥
|
रामसुग्रीवयोरैक्यं देव्येवं समजायत ।
हनुमन्तं च मां विद्धि तयोर्दूतमुपागतम् ॥ ५३ ॥
|
देवी ! श्रीराम आणि सुग्रीव यांच्यामध्ये याप्रमाणे मैत्री झाली असून मी त्या दोघांचा दूत बनून येथे आलो आहे. तू मला हनुमान म्हणून जाण. ॥५३॥
|
स्व राज्यं प्राप्य सुग्रीवः स्वानानीय महाकपीन् ।
त्वदर्थं प्रेषयामास दिशो दश महाबलान् ॥ ५४ ॥
|
स्वतःस राज्य मिळाल्यानन्तर सुग्रीवाने आपल्या आश्रयाने राहण्यार्या मोठमोठ्या बलवान कपींना एकत्र बोलावले आणि तुझ्या शोधासाठी त्यांना दशदिशामध्ये धाडले. ॥५४॥
|
आदिष्टा वानरेन्द्रेण सुग्रीवेण महौजसः ।
अद्रिराजप्रतीकाशाः सर्वतः प्रस्थिता महीम् ॥ ५५ ॥
|
वानरराज सुग्रीवाची आज्ञा घेऊन गिरिराजाप्रमाणे विशालकाय महाबली वानर पृथ्वीवर सर्व बाजूस निघून गेले. ॥५५॥
|
ततस्ते मार्गमाणा वै सुग्रीववचनातुराः ।
चरन्ति वसुधां कृत्स्नां वयमन्ये च वानराः ॥ ५६ ॥
|
सुग्रीवाच्या आज्ञेने भयभीत होऊन आम्ही आणि इतर वानर तुझा शोध करीत समस्त भूमंडलावर विचरण करीत आहोत. ॥५६॥
|
अङ्गदो नाम लक्ष्मीवान् वालिसूनुर्महाबलः ।
प्रस्थितः कापिशार्दूलस्त्रिभागबलसंवृतः ॥ ५७ ॥
|
वैभवशाली आणि महाबलाढ्य वानरश्रेष्ठ वालीपुत्र अंगद वानरांची एक तृतीयांश सेना घेऊन आपल्या शोधासाठी निघाला. त्यांच्याच दलात मी ही होतो. ॥५७॥
|
तेषां नो विप्रणष्टानां विन्ध्ये पर्वतसत्तमे ।
भृशं शोकपरीतानामहोरात्रगणा गताः ॥ ५८ ॥
|
पर्वतश्रेष्ठ विन्ध्य पर्वतावर आम्ही वाट चुकलो आणि आम्हांला खूप कष्ट सोसावे लागले आणि तेथे आमचे बरेच दिवस खर्ची पडले. ॥५८॥
|
ते वयं कार्यनैराश्यात् कालस्यातिक्रमेण च ।
भयाच्च कपिराजस्य प्राणांस्त्यक्तुमुपस्थिताः ॥ ५९ ॥
|
आता आम्हाला कार्य सिद्धिची काही आशा राहिली नव्हती आणि निश्चित केलेल्या अवधिपेक्षा अधिक काळ उलटून गेला असल्याने वानरराज सुग्रीवाचेही भय होते म्हणून आम्ही सर्व जण आपला प्राणत्याग करण्यास उद्यत झालो होतो. ॥५९॥
|
विचित्य गिरिदुर्गाणि नदीप्रस्रवणानि च ।
अनासाद्य पदं देव्याः प्राणांस्त्यक्तुं व्यवस्थिताः ॥ ६० ॥
|
पर्वतातील दुर्गम प्रदेश, नद्यांचे तट आणि निर्झरांच्या आसपासचा सर्व भूभाग शोधूनही जेव्हां देवी सीतेच्या स्थानाचा पत्ता आम्हांला लागला नाही तेव्हां आम्ही प्राणत्याग करण्यास तयार झालो. ॥६०॥
|
ततस्तस्य गिरेर्मूर्ध्नि वयं प्रायमुपास्महे ।
दृष्ट्वा प्रायोपविष्टांश्च सर्वान् वानरपुङ्गवान् ॥ ६१ ॥
भृशं शोकार्णवे मग्नः पर्यदेवयदङ्गदः ।
|
त्यावेळी सर्व वानरशिरोमणींना प्राणत्याग करण्याच्या निश्चयाने बसलेले पाहून कुमार अंगद अत्यन्त शोकाच्या समुद्रात बुडून गेला आणि विलाप करू लागला. ॥६१ १/२॥
|
तव नाशं च वैदेहि वालिनश्च तथा वधम् ॥ ६२ ॥
प्रायोपवेशमस्माकं मरणं च जटायुषः ।
|
हे वैदेही ! तुझा पत्ता न लागणे, वालीचा मृत्यु आणि आमचा सर्वांचा मरणान्त उपवासाचा निश्चय तथा जटायूचे मरण इत्यादि सर्व गोष्टींच्या विचाराने कुमार अंगदास अत्यन्त दुःख झाले. ॥६२ १/२॥
|
तेषां नः स्वामिसन्देशात् निराशानां मुमूर्षताम् ॥ ६३ ॥
कार्यहेतोरिहायातः शकुनिर्वीर्यवान् महान् ।
गृध्रराजस्य सोदर्यः सम्पातिर्नाम गृध्रराट् ॥ ६४ ॥
|
स्वामींच्या आज्ञापालनासंबन्धी निराश होऊन आम्ही सर्वजण मरण्याचीच इच्छा करीत होतो, इतक्यात दैववशात कार्यसिद्धिसाठीच जणु काय एक अत्यन्त वीर्यवान बलवान पक्षी तेथे आला. तो गृध्रराज जटायुचा मोठा बन्धु संपाती नावाचा असून स्वतःही गृध्रांचा (गिधाडांचा) राजा होता. ॥६३-६४॥
|
श्रुत्वा भ्रातृवधं कोपादिदं वचनमब्रवीत् ।
यवीयान् केन मे भ्राता हतः क्व च निपातितः ॥ ६५ ॥
एतदाख्यातुमिच्छामि भवद्भिर्वानरोत्तमाः ।
|
आमच्या मुखाने आपल्या बन्धुच्या वधाची चर्चा ऐकून तो क्रोधाविष्ट होऊन म्हणाला- हे वानरश्रेष्ठा ! सांग बरे माझा लहान बन्धु जटायु याचा वध कोणी केला ? तो कुठल्या स्थानी मारला गेला ? हा वृत्तान्त मी तुमच्या कडून ऐकू इच्छितो. ॥६५ १/२॥
|
अङ्गदोऽकथयत् तस्य जनस्थाने महद्वधम् ॥ ६६ ॥
रक्षसा भीमरूपेण त्वामुद्दिश्य यथार्थतः ।
|
तेव्हा अंगदाने जनस्थानात तुझ्या रक्षणाच्या उद्देशाने झुञ्जत असता त्या भयानक रूपधारी राक्षसाद्वारा त्याचा जो महान वध झाला, तो सर्व प्रसंग जसाच्या तसा वर्णन करून सांगितला. ॥६६ १/२॥
|
जटायोस्तु वधं श्रुत्वा दुःखितः सोऽरुणात्मजः ॥ ६७ ॥
त्वामाह स वरारोहे वसन्तीं रावणालये ।
|
जटायुच्या वधाचा वृत्तान्त ऐकून अरुणपुत्र संपातीला अत्यन्त दुःख झाले. हे वरारोहे ! त्यानेच आम्हांला तू रावणाच्या घरात निवास करीत असल्याचे सांगितले. ॥६७ १/२॥
|
तस्य तद्वचनं श्रुत्वा सम्पातेः प्रीतिवर्धनम् ॥ ६८ ॥
अङ्गदप्रमुखाः सर्वे ततः प्रस्थापिता वयम् ।
विन्ध्यादुत्थाय संप्राप्ताः सागरस्यान्तमुत्तमम् ॥ ६९ ॥
त्वद्दर्शने कृतोत्साहा हृष्टास्तुष्टाः प्लवङ्गमाः ।
अङ्गदप्रमुखाः सर्वे वेलोपान्तमुपागताः ॥ ७० ॥
|
संपातीचे ते वचन ऐकून वानरांच्या मनात त्याच्याबद्दलचे प्रेम वाढले. ते ऐकून त्याने धाडल्यामुळेच अंगद आदि आम्ही सर्व वानर तुझ्या दर्शनाच्या आशेने उत्साहित झालो, आणि विन्ध्यपर्वतावरून उठून आम्ही समुद्राच्या उत्तम तटावर आलो. याप्रकारे अंगदादि सर्व हृष्टपुष्ट वानर समुद्रकिनार्यावर येऊन पोहोंचले. ॥६८-७०॥
|
चिन्तां जग्मुः पुनर्भीमां त्वद्दर्शनसमुत्सुकाः ।
अथाहं हरिसैन्यस्य सागरं दृश्य सीदतः ॥ ७१ ॥
व्यवधूय भयं तीव्रं योजनानां शतं प्लुतः ।
|
पण तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असूनही समोर अपार समुद्र आहे हे पाहून सर्व वानर परत अत्यन्त चिन्तातुर झाले. समुद्र पाहून वानरसेना कष्टी झाली आहे हे जाणून मी त्या सर्वांचे तीव्र भय दूर करीत शत योजन समुद्रास उल्लंघून येथे आलो आहे. ॥७१ १/२॥
|
लङ्का चापि मया रात्रौ प्रविष्टा राक्षसाकुला ॥ ७२ ॥
रावणश्च मया दृष्टस्त्वं च शोकनिपीडिता ।
|
राक्षसांनी भरलेल्या लंकेत मी रात्रीच प्रवेश केला. येथे आल्यावर मी रावणासही पाहिले आणि शोकाने पीडित झालेल्या तुझेही दर्शन घेतले आहे. ॥७२ १/२॥
|
एतत् ते सर्वमाख्यातं यथावृत्तमनिन्दिते ॥ ७३ ॥
अभिभाषस्व मां देवि दूतो दाशरथेरहम् ।
|
हे सती शिरोमणी ! हा सर्व वृत्तान्त जसाच्या तसा मी तुला निवेदन केला आहे. हे देवी ! मी दशरथनन्दन श्रीरामाचा दूत आहे, म्हणून तू माझ्याशी संभाषण कर. ॥७३ १/२॥
|
तन्मां रामकृतोद्योगं त्वन्निमित्तमिहागतम् ॥ ७४ ॥
सुग्रीवसचिवं देवि बुध्यस्व पवनात्मजम् ।
|
मी श्रीरामचन्द्रांच्या कार्यसिद्धिसाठीच हा सर्व उद्योग केला आहे आणि तुझ्या दर्शनाच्या निमित्तानेच मी येथे आलो आहे. हे देवी ! तू मला सुग्रीवाचा सचिव आणि वायुदेवतेचा पुत्र हनुमान समज. ॥७४ १/२॥
|
कुशली तव काकुत्स्थः सर्वशस्त्रभृतां वरः ॥ ७५ ॥
गुरोराराधने युक्तो लक्ष्मणः शुभलक्षणः ।
तस्य वीर्यवतो देवि भर्तुस्तव हिते रतः ॥ ७६ ॥
|
हे देवी ! तुझा पति सर्व शस्त्रधारी लोकात श्रेष्ठ काकुत्स्थकुळभूषण श्रीराम सकुशल आहेत आणि मोठ्या भावाच्या सेवेत संलग्न राहाणारा शुभलक्षण संपन्न लक्ष्मणही प्रसन्न आहे. तो लक्ष्मण तुझ्या त्या पराक्रमी पतिदेवाच्या हित साधण्यात तत्पर राहात असतो. ॥७५-७६॥
|
अहमेकस्तु सम्प्राप्तः सुग्रीव वचनादिह ।
मयेयमसहायेन चरता कामरूपिणा ॥ ७७ ॥
दक्षिणा दिगनुक्रान्ता त्वन्मार्गविचयैषिणा ।
|
मी सुग्रीवाच्या आज्ञेने एकटाच येथे आलो आहे. इच्छानुसार रूप धारण करण्याचे सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे. तुझा पत्ता लावण्याच्या इच्छेने मी कुणाचे ही साह्य न घेता एकट्यानेच हिंडून फिरून या दक्षिण दिशेचे अनुसन्धान केले आहे. ॥७७ १/२॥
|
दिष्ट्याहं हरिसैन्यानां त्वन्नाशमनुशोचताम् ॥ ७८ ॥
अपनेष्यामि सन्तापं तवाधिगमशासनात् ।
|
तुझ्या विनाशाच्या संभावनेमुळे जे निरन्तर शोकात निमग्न झाले त्या वानर सैनिकांना तुझे दर्शन झाल्याचे (तुझी भेट झाल्याचे) सांगून त्यांचा शोकसन्ताप मी दूर करीन, ही माझ्यासाठी मोठी आनन्दाची गोष्ट आहे. ॥७८ १/२॥
|
दिष्ट्या हि मम न व्यर्थं सागरस्येह लङ्घनम् ॥ ७९ ॥
प्राप्स्याम्यहमिदं देवि त्वद्दर्शनकृतं यशः ।
|
देवी ! माझे समुद्र उल्लंघून येथपर्यत येणे व्यर्थ गेले नाही. सर्वप्रथम तुझे दर्शन झाल्याचे हे यश मलाच मिळणार आहे, हे ही माझ्यासाठी फार मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. ॥७९ १/२॥
|
राघवश्च महावीर्यः क्षिप्रं त्वामभिपत्स्यते ॥ ८० ॥
सपुत्रबान्धवं हत्वा रावणं राक्षसाधिपम् ।
|
महापराक्रमी राघव, राक्षसराज रावणाला त्याचे पुत्र आणि बन्धुबान्धवांसहित मारून लवकरच तुझी भेट घेतील. ॥८० १/२॥
|
माल्यवान् नाम वैदेहि गिरीणामुत्तमो गिरिः ॥ ८१ ॥
ततो गच्छति गोकर्णं पर्वतं केसरी हरिः ।
स च देवर्षिभिर्दिष्टः पिता मम महाकपिः ।
तीर्थे नदीपतेः पुण्ये शम्बसादनमुद्धरन् ॥ ८२ ॥
यस्याहं हरिणः क्षेत्रे जातो वातेन मैथिलि ।
हनुमानिति विख्यातो लोके स्वेनैव कर्मणा ॥ ८३ ॥
|
हे वैदेही ! पर्वतात माल्यवान नावाने प्रसिद्ध एक उत्तम पर्वत आहे. तेथे केसरी नामक वानर निवास करीत होता. एके दिवशी तो तेथून गोकर्ण पर्वतावर गेला. महाकपि केसरी माझा पिता आहे. त्याने समुद्राच्या तटावर त्या पवित्र तीर्थात देवर्षी यांचा आज्ञेने शंबसादन नावाच्या दैत्याचा संहार केला होता. हे मैथिली ! त्याच कपिराज केसरीच्या स्त्रीच्या गर्भापासून वायुदेवतेच्या द्वारा माझा जन्म झाला आहे. मी जगात माझ्याच कर्माच्या योगाने हनुमान नावाने विख्यात आहे. ॥८१-८३॥
|
विश्वासार्थं तु वैदेहि भर्तुरुक्ता मया गुणाः ।
अचिराद् त्वामितो देवि राघवो नयिता ध्रुवम् ॥ ८४ ॥
|
हे वैदेही ! तुला विश्वास वाटावा म्हणून मी तुझ्या स्वामींच्या गुणांचे वर्णन केले आहे. देवी ! राघव शीघ्रच तुला येथून घेऊन जातील, ही गोष्ट निश्चित आहे. ॥८४॥
|
एवं विश्वासिता सीता हेतुभिः शोककर्शिता ।
उपपन्नैरभिज्ञानैर्दूतं तमधिगच्छति ॥ ८५ ॥
|
याप्रकारे युक्तियुक्त आणि विश्वसनीय कारणे आणि ओळख पटावी म्हणून वर्णन केलेल्या श्रीराम आणि लक्ष्मणाच्या शारीरिक चिन्हांच्या द्वारा हनुमन्ताने शोकाने दुर्बळ झालेल्या सीतेस आपला विश्वास वाटावा असा प्रयत्न केला तेव्हा तिने हनुमान हा श्रीरामांचाच दूत आहे, हे जाणले. ॥८५॥
|
अतुलं च गता हर्षं प्रहर्षेण च जानकी ।
नेत्राभ्यां वक्रपक्ष्माभ्यां मुमोचानन्दजं जलम् ॥ ८६ ॥
|
त्यावेळी जनकनन्दिनी सीतेला अनुपम हर्ष झाला. त्या महान हर्षामुळे तिच्या वक्र पापण्या असलेल्या दोन्ही नेत्रान्तून आनन्दाश्रू वाहू लागले. ॥८६॥
|
चारु तद् वदनं तस्याः ताम्रशुक्लायतेक्षणम् ।
अशोभत विशालाक्ष्या राहुमुक्त इवोडुराट् ॥ ८७ ॥
|
त्यावेळी त्या विशालाक्षी सीतेचे मनोहर मुख जे लाल, पांढर्या आणि मोठमोठ्या नेत्रांनी युक्त होते, राहूच्या ग्रहणान्तून मुक्त झालेल्या चन्द्रम्यासारखे शोभू लागले. ॥८७॥
|
हनुमन्तं कपिं व्यक्तं मन्यते नान्यथेति सा ।
अथोवाच हनूमांस्तामुत्तरं प्रियदर्शनाम् ॥ ८८ ॥
|
आतां ती हनुमन्तास वास्तविक वानर मानू लागली, पूर्वीप्रमाणे त्याच्या उलट मायामय रूपधारी राक्षस नव्हे. त्यानन्तर हनुमान प्रियदर्शनी सीतेला परत म्हणाले- ॥८८॥
|
एतत् ते सर्वमाख्यातं समाश्वसिहि मैथिलि ।
किं करोमि कथं वा ते रोचते प्रतियाम्यहम् ॥ ८९ ॥
|
हे मैथिली ! याप्रकारे तू जे जे काही विचारले होतेस, ते सर्व मी तुला सांगितले आहे. आता तू धैर्य धारण कर. मी तुझी काय आणि कशी सेवा करू ते आता तू मला सांग, यावेळी तुझी रूचि काय आहे ? तुझी आज्ञा असेल तर मी आता परत जाईन. ॥८९॥
|
हतेऽसुरे संयति शम्बसादने
कपिप्रवीरेण महर्षिचोदनात् ।
ततोऽस्मि वायुप्रभवो हि मैथिलि
प्रभावतस्तत्प्रतिमश्च वानरः ॥ ९० ॥
|
महर्षिंच्या प्रेरणेने कपिवर केसरी द्वारा युद्धात शंबसादन नामक असुर मारला गेल्यावर पवनदेवतेच्या द्वारा मी जन्म ग्रहण केला. म्हणून हे मैथिली ! मी त्या वायुदेवतेप्रमाणेच प्रभावशाली वानर आहे. ॥९०॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे पञ्चत्रिंशः सर्गः ॥ ३५ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा पसतीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥३५॥
|