श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकोनाशीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामेण मकराक्षस्य वधः -
श्रीरामचंद्रांच्या द्वारा मकराक्षाचा वध -
निर्गतं मकाराक्षं ते दृष्ट्‍वा वानरपुंगवाः ।
आप्लुत्य सहसा सर्वे योद्धुकामा व्यवस्थिताः ॥ १ ॥
मुख्य मुख्य वानरांनी जेव्हा पाहिले की मकराक्ष नगरातून बाहेर निघून येत आहे तेव्हा ते सर्वच्या सर्व एकाएकी उड्‍या मारून युद्धासाठी उभे राहिले. ॥१॥
ततः प्रवृत्तं सुमहत् तद् युद्धं लोमहर्षणम् ।
निशाचरैः प्लवङ्‌गानां देवानां दानवैरिव ॥ २ ॥
नंतर तर वानरांचे निशाचरांशी फार मोठे युद्ध जुंपले, जे देव-दानव संग्रामाप्रमाणे अंगावर काटा आणणारे होते. ॥२॥
वृक्षशूलनिपातैश्च शिलापरिघपातनैः ।
अन्योन्यं मर्दयन्ति स्म तदा कपिनिशाचराः ॥ ३ ॥
वानर आणि राक्षस वृक्ष, शूल, गदा आणि परिघांच्या मार्‍याने त्या समयी एक दुसर्‍याचे मर्दन करू लागले. ॥३॥
शक्तिखड्ग गदाकुन्तैः तोमरैश्च निशाचराः ।
पट्टिशैर्भिन्दिपालैश्च बाणपातैः समन्ततः ॥ ४ ॥

पाशमुद्गगरदण्डैश्च निर्घातैश्चापरैः तथा ।
कदनं कपिसिंहानां चक्रुस्ते रजनीचराः ॥ ५ ॥
निशाचरगण शक्ति, खड्ग, गदा, भाले, तोमर, पट्‍टिश, भिंदिपाल, बाणप्रहार, पाश, मुद्‍गर, दण्ड तसेच नाना प्रकारच्या शस्त्रांच्या आघाताने सर्वत्र वानरवीरांचा संहार करू लागले. ॥४-५॥
बाणौघैरर्दिताश्चापि खरपुत्रेण वानराः ।
सम्भ्रान्तमनसः सर्वे दुद्रुवुर्भयपीडिताः ॥ ६ ॥
खरपुत्र मकराक्षाने आपल्या बाणसमूहांनी वानरांना अत्यंत घायाळ करून टाकले. त्यांच्या मनात फार भीती उत्पन्न झाली आणि ते सर्वच्या सर्व भयाने पीडित होऊन इकडे तिकडे पळू लागले. ॥६॥
तान् दृष्ट्‍वा राक्षसाः सर्वे द्रवमाणान् वनौकसः ।
नेदुस्ते सिंहवद् दृप्ता राक्षसा जितकाशिनः ॥ ७ ॥
त्या सर्व वानरांना पळतांना पाहून विजयोल्हासाने सुशोभित ते समस्त राक्षस दर्पाने भरून सिंहाप्रमाणे गर्जना करू लागले. ॥७॥
विद्रवत्सु तदा तेषु वानरेषु समन्ततः ।
रामस्तान् वारयामास शरवर्षेण राक्षसान् ॥ ८ ॥
ते वानर जेव्हा सर्वत्र पळू लागले तेव्हा श्रीरामचंद्रांनी बाणांचा वर्षाव करून राक्षसांना पुढे येण्यापासून रोखून धरले. ॥८॥
वारितान् राक्षसान् दृष्ट्‍वा मकराक्षो निशाचरः ।
क्रोधानलसमाविष्टो वचनं चेदमब्रवीत् ॥ ९ ॥
राक्षसांना रोखून धरलेले पाहून निशाचर मकराक्ष क्रोधाग्निने भडकून गेला आणि याप्रकारे बोलला - ॥९॥
तिष्ठ राम मया सार्धं द्वन्द्वयुद्धं ददामि ते ।
त्याजयिष्यामि ते प्राणान् धनुर्मुक्तैः शितैः शरैः ॥ १० ॥
रामा ! थांब, माझ्याशी तुझे द्वंद युद्ध होईल. आज आपल्या धनुष्यातून सुटलेल्या तीक्ष्ण बाणांच्या द्वारा मी तुझे प्राण हरण करीन. ॥१०॥
यत्तदा दण्डकारण्ये पितरं हतवान् मम ।
मदग्रतः स्वकर्मस्थं दृष्ट्‍वा रोषोऽभिवर्धते ॥ ११ ॥
ज्या दिवसात दण्डकारण्यात तू जो माझ्या पित्याचा वध केला होतास, तेव्हापासून आजपर्यंत तू राक्षस-वधाच्या कर्मातच गुंतला आहेस. या रूपात तुझे स्मरण करून माझा रोष वाढत चालला आहे. ॥११॥
दह्यन्ते भृशमङ्‌गानि दुरात्मन् मम राघव ।
यन्मयाऽसि न दृष्टस्त्वं तस्मिन् काले महावने ॥ १२ ॥
दुरात्मा राघवा ! त्या समयी विशाल दण्डकारण्यात ज्यावेळी तू मला दिसला नाहीस, त्यामुळे माझे अंग अत्यंत रोषाने जळत राहिले होते. ॥१२॥
दिष्ट्यासि दर्शनं राम मम त्वं प्राप्तवानिह ।
काङ्‌क्षितोऽसि क्षुधार्तस्य सिंहस्येवेतरो मृगः ॥ १३ ॥
परंतु रामा ! सौभाग्याची गोष्ट आहे की आज तू माझ्या दृष्टिसमोर आला आहेस. ज्याप्रमाणे भुकेने पीडित झालेल्या सिंहाला दुसर्‍या वन-जंतुंची अभिलाषा होत असते त्याचप्रमाणे मीही तुला प्राप्त करण्याची इच्छा करत होतो. ॥१३॥
अद्य मद् बाणवेगेन प्रेतराड्‌विषयं गतः ।
ये त्वया निहताः शूराः सह तैश्च वसिष्यसि ॥ १४ ॥
आज माझ्या बाणांच्या वेगाने यमराजाच्या राज्यात तुला त्याच वीर निशाचरांबरोबर निवास करावा लागेल, जे तुझ्या हातून मारले गेले आहेत. ॥१४॥
बहुनात्र किमुक्तेन शृणु राम वचो मम ।
पश्यन्तु सकला लोकाः त्वां मां चैव रणाजिरे ॥ १५ ॥
रामा ! येथे जास्त बोलून काय फायदा ? माझे म्हणणे ऐक ! सर्वलोक या समरांगणात उभे राहून केवळ तुला आणि मला पहातील - तुझ्या आणि माझ्या युद्धाचे अवलोकन करतील. ॥१५॥
अस्त्रैर्वा गदया वापि बाहुभ्यां वा रणाजिरे ।
अभ्यस्तं येन वा राम वर्तताम् तेन वा मृधम् ॥ १६ ॥
रामा ! तुला रणभूमीमध्ये अस्त्रांनी, गदेने अथवा दोन्ही भुजांनी - ज्याचा म्हणून तुझा अभ्यास असेल त्याच्या द्वारे आज तुझ्याशी माझे युद्ध होईल. ॥१६॥
मकराक्षवचः शृत्वा रामो दशरथात्मजः ।
अब्रवीत् प्रहसन् वाक्यं उत्तरोत्तरवादिनम् ॥ १७ ॥
मकराक्षाचे बोलणे ऐकून दशरथनंदन भगवान्‌ श्रीराम जोरजोराने हसू लागले आणि उत्तरोत्तर बढाया मारणार्‍या त्या राक्षसास म्हणाले - ॥१७॥
कत्थसे किं वृथा रक्षो बहून्यसदृशानि तु ।
न रणे शक्यते जेतुं विना युद्धेन वाग्बलात् ॥ १८ ॥
निशाचरा ! उगीच व्यर्थ बढाया कशाला मारतो आहेस. तुझ्या मुखातून अशा बर्‍याचशा गोष्टी बोलल्या जात आहेत, ज्या वीर पुरूषांना योग्य नाहीत. संग्रामात युद्ध केल्याशिवाय कोरडी बडबड करून विजय प्राप्त होऊ शकत नाही. ॥१८॥
चतुर्दशसहस्राणि रक्षसां त्वत्पिता च यः ।
त्रिशिरा दूषणश्चापि दण्डके निहता मया ॥ १९ ॥

स्वाशिताश्चापि मांसेन गृध्रगोमायुवायसाः ।
भविष्यन्त्यद्य वै पाप तीक्ष्णतुण्डनखाङ्‌कुशाः ॥ २० ॥
पापी राक्षसा ! हे ठीक आहे की दण्डकारण्यात चौदा हजार राक्षसांसह तुझा पिता खर याचा तसेच त्रिशिरा आणि दूषणाचा मी वध केला होता. त्यासमयी तीक्ष्ण चोच आणि अंकुशासमान पंजे असणार्‍या बर्‍याचशा गिधाडांना, कोल्ह्यांना तसेच कावळ्यांना त्यांच्या मांसाने उत्तमप्रकारे तृप्त केले होते आणि आता आज ते तुझ्या मांसाने पोटभर भोजन मिळवतील. ॥१९-२०॥
राघवेणैवमुक्तस्तु मकराक्षो महाबलः ।
बाणौघानमुचत् तस्मै राघवाय रणाजिरे ॥ २१ ॥
राघवांनी असे म्हटल्यावर महाबली मकराक्षाने रणभूमीमध्ये त्यांच्यावर बाणसमूहांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥२१॥
तान् शरान् शरवर्षेण रामश्चिच्छेद नैकधा ।
निपेतुर्भुवि विच्छिन्ना रुक्मपुङ्‌खाः सहस्रशः ॥ २२ ॥
परंतु श्रीरामांनी स्वतः ही बाणांचा वर्षाव करून त्या राक्षसाच्या बाणांचे तुकडे तुकडे करून टाकले. ते तुटलेले सोनेरी पंख असलेले हजारो बाण पृथ्वीवर पडले. ॥२२॥
तद् युद्धमभवत् तत्र समेत्यान्योन्यमोजसा ।
खरराक्षसपुत्रस्य सूनोर्दशरथस्य च ॥ २३ ॥
दशरथनंदन भगवान्‌ श्रीराम आणि राक्षस खराचा पुत्र मकराक्ष या दोघांमध्ये एक दुसर्‍याचा जवळ येऊन बलपूर्वक युद्ध होऊ लागले. ॥२३॥
जीमूतयोरिवाकाशे शब्दो ज्यातलयोरिव ।
धनुर्मुक्तः स्वनोऽन्योयं श्रूयते च रणाजिरे ॥ २४ ॥
त्या दोघांच्या प्रत्यञ्चा आणि हाताच्या घर्षणामुळे धनुष्यांच्या द्वारा जो टणत्काराचा शब्द प्रकट होत होता तो त्या समरांगणात परस्परांत मिसळून जणु आकाशात दोन मेघांची गर्जना होतांना होणार्‍या आवाजाप्रमाणे ऐकू येत होता. ॥२४॥
देवदानवगन्धर्वाः किन्नराश्च महोरगाः ।
अन्तरिक्षगताः सर्वे द्रष्टुकामास्तदद्‌भुातम् ॥ २५ ॥
देवता, दानव, गंधर्व, किन्नर आणि मोठ मोठे नाग - हे सर्वच्या सर्व त्या अद्‍भुत युद्धास पहाण्यासाठी अंतरिक्षात येऊन उभे राहिले. ॥२५॥
विद्धमन्योन्यगात्रेषु द्विगुणं वर्धते बलम् ।
कृतप्रतिकृतान्योन्यं कुरुतां तौ रणाजिरे ॥ २६ ॥
दोघांची शरीरे बाणांनी विंधली गेली होती, तरीही त्यांचे बळ दुप्पट वाढत जात होते. ते दोघेही समरभूमीमध्ये एकमेकांच्या अस्त्रांना छेदून टाकीत लढत राहिले होते. ॥२६॥
राममुक्तांस्तु बाणौघान् राक्षसस्त्वच्छिनद् रणे ।
रक्षोमुक्तांस्तु रामो वै नैकधा प्राच्छिनच्छरैः ॥ २७ ॥
श्रीरामचंद्रांनी सोडलेल्या बाणसमूहांना तो राक्षस रणभूमीमध्ये छेदून टाकत होता आणि राक्षसाने सोडलेल्या सायकांचे श्रीराम आपल्या बाणांच्या द्वारे तुकडे तुकडे करून टाकत होते. ॥२७॥
बाणौघवितताः सर्वा दिशश्च प्रदिशस्तथा ।
सञ्छन्ना वसुधा चैव समन्तान्न प्रकाशते ॥ २८ ॥
संपूर्ण दिशा आणि विदिशा बाणसमूहांनी आच्छादित झाल्या होत्या तसेच सारी पृथ्वी झाकून गेली होती. चोहोबाजूस काहीही दिसून येत नव्हते. ॥२८॥
ततः क्रुद्धो महाबाहुः धनुश्चिच्छेद रक्षसः ।
अष्टाभिरथ नाराचैः सूतं विव्याध राघवः ॥ २९ ॥
त्यानंतर महाबाहु राघवांनी क्रोधाने त्या राक्षसाचे धनुष्य युद्धभूमीत छेदून टाकले आणि आठ नाराच्यांचे द्वारा त्याच्या सारथ्यालाही मारून टाकले. ॥२९॥
भित्त्वा रथं शरै रामो हत्वा अश्वानपातयत् ।
विरथो वसुधास्थः स मकराक्षो निशाचरः ॥ ३० ॥
नंतर अनेक बाणांनी रथाला छिन्न-भिन्न करून श्रीरामांनी घोड्‍यांनाही ठार मारले. रथहीन झाल्यावर निशाचर मकराक्ष जमिनीवर उभा राहिला. ॥३०॥
तत्तिष्ठद् वसुधां रक्षः शूलं जग्राह पाणिना ।
त्रासनं सर्वभूतानां युगान्ताग्निसमप्रभम् ॥ ३१ ॥
पृथ्वीवर उभा राहून त्या राक्षसाने शूल हातात घेतला, जो प्रलयकाळच्या अग्निप्रमाणे दीप्तिमान तसेच समस्त प्राण्यांना भयभीत करणारा होता. ॥३१॥
विभ्राम्य तु महच्छूलं रुद्रदत्तं भयंकरम् ।
जाज्वल्यमानमाकाशे संहारास्त्रमिवापरम् ॥ ३२ ॥
तो परम दुर्लभ आणि महान्‌ शूल भगवान्‌ शंकरांनी दिलेला होता, जो अत्यंत भयानक होता. तो दुसर्‍या संहास्त्राप्रमाणे आकाशात प्रज्वलित झाला. ॥३२॥
यं दृष्ट्‍वा देवताः सर्वा भयार्ता विद्रुता दिशः ।
विभ्राम्य च महच्छूलं प्रज्वलंतं निशाचरः ॥ ३३ ॥

स क्रोधात् प्राहिणोत् तस्मै राघवाय महाहवे ।
त्याला पाहून संपूर्ण देवता भयाने पीडित होऊन सर्व दिशांमध्ये पळून गेल्या. त्या निशाचराने प्रज्वलित होणार्‍या त्या महान्‌ शूलाला गरगर फिरवून महात्मा राघवावर क्रोधपूर्वक फेकले. ॥३३ १/२॥
तमापतन्तं ज्वलितं खरपुत्रकराच्च्युतम् ॥ २४ ॥

बाणैश्चस्तुर्भिराकाशे शूलं चिच्छेद राघवः ।
खरपुत्र मकराक्षाच्या हातून सुटलेल्या त्या प्रज्वलित शूलाला आपल्याकडे येताना पाहून राघवांनी चार बाण मारून आकाशांतच त्याला छेदून टाकले. ॥३४ १/२॥
स भिन्नो नैकधा शूलो दिव्यहाटकमण्डितः ।
व्यशीर्यत महोल्केव रामबाणार्दितो भुवि ॥ ३५ ॥
दिव्य सुवर्णाने विभूषित तो शूल रामांच्या बाणांनी खण्डित होऊन अनेक तुकड्‍यांत विभागला गेला आणि फार मोठ्‍या उल्केप्रमाणे भूतलावर विखरून पडला. ॥३५॥
तच्छूलं निहतं दृष्ट्‍वा रामेणाक्लिष्टकर्मणा ।
सधुसाध्विति भूतानि व्याहरन्ति नभोगताः ॥ ३६ ॥
अनायास महान्‌ कर्म करणार्‍या श्रीरामांच्या द्वारे तो शूल खण्डित झालेला पाहून आकाशात स्थित असलेले सर्व प्राणी त्यांना साधुवाद देऊ लागले. ॥३६॥
तं दृष्ट्‍वा निहतं शूलं मकराक्षो निशाचरः ।
मुष्टिमुद्यम्य काकुत्स्थं तिष्ठ तिष्ठेति चाब्रवीत् ॥ ३७ ॥
त्या शूलाचे तुकडे तुकडे झालेले पाहून निशाचर मकराक्षाने मूठ उगारून काकुत्स्थ रामांना म्हटले - अरे ! उभा रहा ! उभा रहा. ॥३७॥
स तं दृष्ट्‍वा पतन्तं तु प्रहस्य रघुनन्दनः ।
पावकास्त्रं ततो रामः सन्दधे तु शरासने ॥ ३८ ॥
त्याला आक्रमण करतांना पाहून रघुनंदनांनी हसून आपल्या धनुष्यावर अग्नेयास्त्राचे संधान केले. ॥३८॥
तेनास्त्रेण हतं रक्षः काकुत्स्थेन तदा रणे ।
सञ्छिन्नहृदयं तत्र पपात च ममार च ॥ ३९ ॥
आणि त्या अस्त्राद्वारे त्यांनी रणभूमीमध्ये तात्काळ त्या राक्षसावर प्रहार केला. बाणाच्या आघाताने राक्षसाचे हृदय विदीर्ण झाले आणि म्हणून तो खाली कोसळला आणि मेला. ॥३९॥
दृष्ट्‍वा ते राक्षसाः सर्वे मकराक्षस्य पातनम् ।
लङ्‌कामेव प्रधावन्त रामबाणभयार्दिताः ॥ ४० ॥
मकराक्षाला धराशायी होतांना पाहून ते सर्व राक्षस रामबाणांच्या भयाने व्याकुळ होऊन लंकेत पळून गेले. ॥४०॥
दशरथनृपपुत्रबाणवेगै
रजनिचरं निहतं खरात्मजं तम् ।
प्रददृशुरथ देवताः प्रहृष्टा
गिरिमिव वज्रहतं यथा विकीर्णम् ॥ ४१ ॥
देवतांनी पाहिले की जसे वज्रांनी मारला गेलेला पर्वत विखरून जातो, त्याच प्रकारे खराचा पुत्र निशाचर मकराक्ष, दशरथकुमार श्रीरामांच्या बाणांच्या वेगाने मारला गेला आहे. यामुळे त्यांना अत्यंत प्रसन्नता वाटली. ॥४१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकोनाशीतितमः सर्गः ॥ ७९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकोणऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥७९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP