भाविनः श्रीरामाभिषेकस्य वृत्तमाकर्ण्य खिन्नया मन्थरया कैकेय्या हृदये भेदभावस्योत्पादनं प्रीतया कैकेय्या कुब्जायै पुरस्काररूपेणाभूषणस्य दानं वरं वरयितुं प्रेरणं च -
|
श्रीरामाच्या अभिषेकाचा समाचार मिळून खिन्न झालेल्या मंथरेने कैकेयीला भडकाविणे, परंतु प्रसन्न झालेल्या कैकेयीने तिला पुरस्काररूपात आभूषण देणे, आणि वर मागण्यासाठी प्रेरित करणे -
|
ज्ञातिदासी यतोजाता कैकेय्या तु सहोषिता ।
प्रसादं चन्द्रसंकाशमारुरोह यदृच्छया ॥ १ ॥
|
राणी कैकेयीच्या जवळ एक दासी होती जी तिच्या माहेरहून आलेली होती. ती सदा कैकेयीच्या बरोबर रहात असे. तिच्या जन्म कोठे झाला होता ? तिचा देश आणि माता-पिता कोण होते ? याचा पत्ता कुणालाही नव्हता. अभिषेकाच्या एक दिवस आधी ती स्वेच्छेनेच कैकेयीच्या चंद्रम्यासमान कांतिमान महालाच्या छतावर चढून गेली. ॥१॥
|
सिक्तराजपथां कृत्स्नां प्रकीर्णकमलोत्पलाम् ।
अयोध्यां मन्थरा तस्मात् प्रासादादन्ववैक्षत ॥ २ ॥
|
त्या दासीचे नाम होते मंथरा. तिने त्या महालाच्या छतावरून पाहिले, अयोध्येच्या रस्त्यांवर सडे टाकले गेले आहेत आणि सार्या पुरीत जिकडे तिकडे विकसित कमले आणि उत्पल विखुरली गेलेली आहेत. ॥२॥
|
पताकाभिर्वरार्हाभिर्ध्वजैश्च समलङ्कृताम् ।
सिक्तां चन्दनतोयैश्च शिरःस्नातजनैर्युताम् ॥ ३ ॥
|
सर्व बाजूस बहुमूल्य पताका फडकत आहेत. ध्वजांच्यामुळे त्या पुरीची अपूर्व शोभा होत आहे. राजमार्गावर चंदन मिश्रित जल शिंपडले गेले आहे तथा अयोध्यापुरीतील सर्व लोक उटणी लावून डोक्यावरून स्नान केलेले (दिसून येत) आहेत. ॥३॥
|
माल्यमोदकहस्तैश्च द्विजेन्द्रैरभिनादिताम् ।
शुक्लदेवगृहद्वारां सर्ववादित्रनादिताम् ॥ ४ ॥
सम्प्रहृष्टजनाकीर्णां ब्रह्मघोषनिनादिताम् ।
प्रहृष्टवरहस्त्यश्वां सम्प्रणर्दितगोवृषाम् ॥ ५ ॥
|
श्रीरामांनी दिलेले माल्य आणि मोदक हातात घेऊन श्रेष्ठ ब्राह्मण हर्षनाद करत आहेत. देवमंदिराचे दरवाजे चुन्याने आणि चंदन आंदिनी लिंपून सफेद आणि सुंदर बनविले गेले आहेत. सर्व प्रकारच्या वाद्यांचा मनोहर ध्वनी होत आहे. अत्यंत हर्षाने भरलेल्या मनुष्यांनी सारे नगर परीपूर्ण आहे आणि चारी बाजूस वेदपाठकांचा ध्वनि गुंजत राहिला आहे. श्रेष्ठ हत्ती आणि घोडे हर्षाने उत्फुल्ल दिसून येत आहेत तथा गाय बैल प्रसन्न होऊन हंबरत आहेत. ॥४-५॥
|
प्रहृष्टमुदितैः पौरैरुच्छ्रितध्वजमालिनीम् ।
अयोध्यां मन्थरा दृष्ट्वा परं विस्मयमागता ॥ ६ ॥
|
सारे नगरनिवासी हर्षजनित रोमाञ्चांनी युक्त आणि आनंदमग्न आहेत. तथा नगरात सर्व बाजूला श्रेणी बद्ध उंच उंच ध्वज फडकत आहेत. अयोध्येची अशी शोभा बघून मंथरेला विस्मय वाटला. ॥६॥
|
सा हर्षोत्फुल्लनयनां पाण्डुरक्षौमवासिनीम् ।
अविदूरे स्थितां दृष्ट्वा धात्रीं पप्रच्छ मन्थरा ॥ ७ ॥
|
तिने जवळच्या घराच्या गच्चीवर रामाच्या (धात्रीला) दाईला उभी असलेली पाहिली. तिचे नेत्र प्रसन्नतेने चमकत होते आणि शरीरावर पिवळ्या रंगाची रेशमी साडी शोभत होती. तिला पाहून मंथरेने तिला विचारले - ॥७॥
|
उत्तमेनाभिसंयुक्ता हर्षेणार्थपरा सती ।
राममाता धनं किं नु जनेभ्यः सम्प्रयच्छति ॥ ८ ॥
अतिमात्रं प्रहर्षः किं जनस्यास्य च शंस मे ।
कारयिष्यति किं वापि सम्प्रहृष्टो महीपतिः ॥ ९ ॥
|
'दाई ! आज राममाता आपल्या कुठल्या अभिष्ट मनोरथाच्या साधनात तत्पर होऊन अत्यंत हर्षाने युक्त होऊन लोकांना धन वाटत आहे ? आज येथील सर्व मनुष्यांत इतकी अधिक प्रसन्नता का बरे दिसून येत आहे ? याचे कारण मला सांग. आज महाराज दशरथ अत्यंत प्रसन्न होऊन कोणते कर्म करविणार आहेत ? ॥८-९॥
|
विदीर्यमाणा हर्षेण धात्री तु परया मुदा ।
आचचक्षेऽथ कुब्जायै भूयसीं राघवे श्रियम् ॥ १० ॥
श्वः पुष्येण जितक्रोधं यौवराज्येन चानघम् ।
राजा दशरथो राममभिषेक्ता हि राघवम् ॥ ११ ॥
|
रामाची दाई तर हर्षाने ओतप्रोत झाली होती. कुब्जेने विचारल्यावर तिने मोठ्या आनंदाने तिला सांगितले - 'कुब्जे ! राघवाला फार मोठी संपत्ति प्राप्त होणार आहे. उद्या दशरथ महाराज पुष्य नक्षत्राच्या योगावर क्रोधाला जिंकणार्या, पापरहित रामाला (राघवाला) युवराज पदावर अभिषिक्त करतील ॥१०-११॥
|
धात्र्यास्तु वचनं श्रुत्वा कुब्जा क्षिप्रममर्षिता ।
कैलासशिखराकारात् प्रासादादवरोहत ॥ १२ ॥
|
दाईने हे वचन ऐकून कुब्जा मनातल्या मनात जळफळली आणि त्या कैलास शिखाराप्रमाणे उज्ज्वल आणि गगनचुंबी प्रासादावरून तात्काळ खाली उतरून आली. ॥१२॥
|
सा दह्यमाना क्रोधेन मन्थरा पापदर्शिनी ।
शयानामेव कैकेयीमिदं वचनमब्रवीत् ॥ १३ ॥
|
मंथरेला यात कैकेयीचे अनिष्ट दिसत होते, ती क्रोधाने जळत होती. तिने महालात झोपून राहिलेल्या कैकेयीपाशी जाऊन तिला म्हटले - ॥१३॥
|
उत्तिष्ठ मूढे किं शेषे भयं त्वामभिवर्तते ।
उपप्लुतमघौघेन नात्मानमवबुध्यसे ॥ १४ ॥
|
'मूर्खे ! उठ ! झोपून काय राहिली आहेस ? तुझ्यावर फार मोठे भय येत आहे ग ! तुझ्यावर विपत्तिचा पहाडच कोसळून पडत आहे; आणि तरीही तुला आपल्या या दुरवस्थेचा बोध होत नाही ? ॥१४॥
|
अनिष्टे सुभगाकारे सौभाग्येन विकत्थसे ।
चलं हि तव सौभाग्यं नद्याः स्रोत इवोष्णगे ॥ १५ ॥
|
तुझे प्रियतम तुझ्या समोर असा आकार बनवून येतात की जणु सारे सौभाग्य तुलाच अर्पण करीत आहेत परंतु तुझ्या मागे ते तुझे अनिष्ट करीत आहेत. तू त्यांना आपल्या ठिकाणी अनुरक्त जाणून सौभाग्याचा टेंभा मिरवत असतेस परंतु ग्रीष्म ऋतुत ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह सुकून जाऊ लागतो त्या प्रमाणेच तुझे ते सौभाग्य आता अस्थिर झालेले आहे - तुझ्या हातून निसटू पहात आहे.' ॥१५॥
|
एवमुक्ता तु कैकेयी रुष्टया परुषं वचः ।
कुब्जया पापदर्शिन्या विषादमगमत् परम् ॥ १६ ॥
|
इष्टामध्ये हा अनिष्टाचे दर्शन करविणार्या रोषाने भरलेल्या कुब्जेने या प्रकारे कठोर वचन बोलल्यावर कैकेयीला मनांत मोठे दुःख झाले. ॥१६॥
|
कैकेयी त्वब्रवीत् कुब्जां कच्चित् क्षेमं न मन्थरे ।
विषण्णवदनां हि त्वां लक्षये भृशदुःखिताम् ॥ १७ ॥
|
त्या समयी कैकेयीने कुब्जेला विचारले- 'मंथरे ! काही अमङ्गल गोष्ट तर घडली नाही ना ? कारण की तुझ्या मुखावर विषाद पसरला आहे आणि तू मला फार दुःखी दिसून येत आहेस.' ॥१७॥
|
मन्थरा तु वचः श्रुत्वा कैकेय्या मधुराक्षरम् ।
उवाच क्रोधसंयुक्ता वाक्यं वाक्यविशारदा ॥ १८ ॥
सा विषण्णतरा भूत्वा कुब्जा तस्यां हितैषिणी ।
विषादयन्ती प्रोवाच भेदयन्ती च राघवम् ॥ १९ ॥
|
मंथरा संभाषण करण्यात फार कुशल होती. ती कैकेयीचे गोड वचन ऐकून अधिकच खिन्न झाली. तिच्या प्रती आपली हितैषिता प्रकट करत ती कुपित झाली आणि कैकेयीच्या मनात रामाप्रति भेदभाव आणि विषाद उत्पन्न करीत याप्रमाणे बोलली - ॥१८-१९॥
|
अक्षयं सुमहद् देवि प्रवृत्तं त्वद्विनाशनम् ।
रामं दशरथो राजा यौवराज्येऽभिषेक्ष्यति ॥ २० ॥
|
'देवि ! तुझ्या सौभाग्याच्या महान विनाशाचे कार्याचा आरंभ झालेला आहे. ज्याचा काही प्रतिकार नाही आहे. उद्या दशरथ महाराज रामांना युवराज पदावर अभिषिक्त करतील. ॥२०॥
|
सास्म्यगाधे भये मग्ना दुःखशोकसमन्विता ।
दह्यमानानलेनेव त्वद्धितार्थमिहागता ॥ २१ ॥
|
हा समाचार मिळताच मी दुःख आणि शोकाने व्याकुळ होऊन अगाध भयाच्या समुद्रात बुडून गेले आहे. चिंतेच्या आगीत जणु काही मी जळत आहे आणि तुझ्या हिताची गोष्ट सांगण्यासाठी येथे आले आहे. ॥२१॥
|
तव दुःखेन कैकेयि मम दुःखं महद् भवेत् ।
त्वद्वृद्धौ मम वृद्धिश्च भवेदिह न संशयः ॥ २२ ॥
|
'कैकेयी ! जर तुझ्यावर काही दुःख आले तर त्यायोगे मलाही भारी दुःखात पडावे लागेल तुझ्या उन्नतिमध्येच माझी उन्नति आहे यात संशय नाही. ॥२२॥
|
नराधिपकुले जाता महिषी त्वं महीपतेः ।
उग्रत्वं राजधर्माणां कथं देवि न बुध्यसे ॥ २३ ॥
|
'देवि ! तू राजकुळात उत्पन्न झाली आहेस आणि एका महाराजाची महाराणी आहेस, तरीही राजधर्मांच्या उग्रतेला तू कशी समजत नाहींस ? ॥२३॥
|
धर्मवादी शठो भर्ता श्लक्ष्णवादी च दारुणः ।
शुद्धभावेन जानीषे तेनैवमतिसंधिता ॥ २४ ॥
|
'तुझे स्वामी धर्माच्या गप्पा तर खूप मारतात परंतु आहेत मोठे शठ ! तोडांने गोड गोड बोलतात परंतु हृदयाने फार क्रूर आहेत. तू समजत आहेस की ते सर्व गोष्टी शुद्ध भावानेच सांगतात. म्हणूनच आज त्यांच्या द्वारा तू फार गैरवाजवी तर्हेने ठकविली गेली आहेस. ॥२४॥
|
उपस्थितः प्रयुञ्जानस्त्वयि सान्त्वमनर्थकम् ।
अर्थेनैवाद्य ते भर्त्ता कौसल्यां योजयिष्यति ॥ २५ ॥
|
तुझे पति तुला व्यर्थ सांत्वना देण्यासाठी येथे उपस्थित होत असतात, तेच आता राणी कौसल्येला अर्थाने संपन्न करू पहात आहेत. ॥२५॥
|
अपवाह्य तु दुष्टात्मा भरतं तव बन्धुषु ।
काल्ये स्थापयिता रामं राज्ये निहतकण्टके ॥ २६ ॥
|
त्यांचे हृदय इतके दूषित आहे की भरताला तर त्यांनी तुमच्या माहेरी धाडून दिले आणि उद्या सकाळीच अयोध्येच्या निष्कण्टक राज्यावर ते रामाचा अभिषेक करतील. ॥२६॥
|
शत्रुः पतिप्रवादेन मात्रेव हितकाम्यया ।
आशीविष इवाङ्गेन बाले परिधृतस्त्वया ॥ २७ ॥
|
"बाले ! ज्याप्रमाणे माता हिताच्या कामनेने पुत्राचे पोषण करीत असते त्याच प्रकारे 'पति' म्हणवून घेणार्या ज्या व्यक्तिचे तू पोषण केले आहेस, तो वास्तविक शत्रु निघाला आहे. जसे कोणी अज्ञानवश सर्पाला आपल्या मांडीवर घेऊन लालन करावे त्याप्रकारेच तू ही त्या सर्पा प्रमाणे आचरण करणार्या महाराजांना तू आपल्या अंगावर स्थान दिले आहेस. ॥२७॥
|
यथा हि कुर्याच्छत्रुर्वा सर्पो वा प्रत्युपेक्षितः ।
राज्ञा दशरथेनाद्य सपुत्रा त्वं तथा कृता ॥ २८ ॥
|
उपेक्षित शत्रु अथवा सर्प जसे वर्तन करू शकतात, राजा दशरथांनी आज पुत्रासहित तुझ्या कैकेयीच्या प्रति तसेच वर्तन केले आहे. ॥ २८ ॥
|
पापेनानृतसान्त्वेन बाले नित्यं सुखोचिता ।
रामं स्थापयता राज्ये सानुबन्धा हता ह्यसि ॥ २९ ॥
|
'बाले ! तू सदा सुख भोगण्या योग्यच आहेस, परंतु मनात पाप (दुर्भावना) ठेवून वरून खोटी सांत्वना देणार्या महाराजांनी आपल्या राज्यावर रामाला स्थापित करण्याचा विचार करून आज बंधु-बांधवांसह तुला जणु काही मृत्युच्या मुखात ढकलले आहे. ॥२९॥
|
सा प्राप्तकालं कैकेयि क्षिप्रं कुरु हितं तव ।
त्रायस्व पुत्रमात्मानं मां च विस्मयदर्शने ॥ ३० ॥
|
'कैकेयी ! तू दुःखदायक गोष्ट ऐकूनही माझ्याकडे अशा तर्हेने बघत आहेस की जणु तुला प्रसन्नता वाटत आहे आणि माझ्या बोलण्याने तुला विस्मय वाटत आहे. परंतु हा विस्मय सोडून दे आणि जे करण्याचा समय आलेला आहे, त्या आपल्या हितकारक कार्याला शीघ्र आरंभ कर तथा असे असे करून आपले, आपल्या पुत्राचे आणि माझेही रक्षण कर'. ॥३०॥
|
मन्थराया वचः श्रुत्वा शयानात् सा शुभानना ।
उत्तस्थौ हर्षसम्पूर्णा चन्द्रलेखेव शारदी ॥ ३१ ॥
|
मंथरेचे हे म्हणणे ऐकून शुभामना कैकेयी एकाएकी शय्येवरून उठून बसली. तिचे हृदय भरून आले. ती शरत पौर्णिमेच्या चंद्रमण्डला प्रमाणे उद्दीप्त झाली. ॥३१॥
|
अतीव सा तु संतुष्टा कैकेयी विस्मयान्विता ।
दिव्यमाभरणं तस्यै कुब्जायै प्रददौ शुभम् ॥ ३२ ॥
|
कैकेयी मनातल्या मनात अत्यंत संतुष्ट झाली. विस्मय विमुग्ध होऊन हसत हसत तिने कुब्जेला पुरस्काराच्या रूपात एक अत्यंत सुंदर दिव्य आभूषण प्रदान केले. ॥३२॥
|
दत्त्वा त्वाभरणं तस्यै कुब्जायै प्रमदोत्तमा ।
कैकेयी मन्थरां हृष्टा पुनरेवाब्रवीदिदम् ॥ ३३ ॥
इदं तु मन्थरे मह्यं आख्यातं परमं प्रियम् ।
एतन्मे प्रियमाख्यातं किं वा भूयः करोमि ते ॥ ३४ ॥
|
कुब्जेला ते आभूषण देऊन हर्षाने हरखून गेलेली प्रमदोत्तमा (रमणी मध्ये उत्तम) कैकेयीने पुन्हा मंथरेस याप्रकारे म्हटले - 'मंथरे ! हा तू मला फारच प्रिय समाचार ऐकवलास. तू माझ्या साठी जो हा प्रियसंवाद ऐकविलास त्यासाठी मी तुला आणखी कुठला उपकार करूं. ॥३३-३४॥
|
रामे वा भरते वाहं विशेषं नोपलक्षये ।
तस्मात् तुष्टास्मि यद् राजा रामं राज्येऽभिषेक्ष्यति ॥ ३५ ॥
|
'मीही राम आणि भरतात काही भेद मानत नाही. म्हणून राजे रामाला अभिषेक करणार आहेत हे जाणून मला फार आनंद झाला आहे. ॥३५॥
|
न मे परं किञ्चिदितो वरं पुनः
प्रियं प्रियार्हे सुवचं वचोऽमृतम् ।
तथा ह्यवोचस्त्वमतः प्रियोत्तरं
वरं परं ते प्रददामि तं वृणु ॥ ३६ ॥
|
'मंथरे ! तू माझ्याकडून प्रिय वस्तु प्राप्त करण्यास योग्य आहेस. माझ्या साठी श्रीरामाच्या अभिषेकासंबंधीच्या समाचाराहून अधिक प्रिय आणि अमृतासमान मधुर वचन दुसरे कुठलेही सांगितले जाऊ शकत नाही. अशी परम प्रिय गोष्ट तू सांगितली आहेस म्हणून आता हा प्रिय संवाद ऐकविल्यानंतर तू कुठलाही श्रेष्ठ वर मागून घे, मी अवश्य देईन'. ॥३६॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा सातवा सर्ग पूरा झाला. ॥७॥
|