॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ उत्तरकाण्ड ॥ ॥ द्वितीयः सर्गः ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] राक्षसांच्या राज्यस्थापनेचे विवरण श्रीमहादेव उवाच श्रीरामवचनं श्रुत्वा परमानन्दनिर्भरः । मुनिः प्रोवाच सदसि सर्वेषां तत्र शृण्वताम् ॥ १ ॥ श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, श्रीरामांचे वचन ऐकल्यावर, अगस्त्य मुनी अतिशय आनंदित झाले आणि तेथे त्या राजसभेमध्ये सर्व सभासदांसमोर ते सांगू लागले. (१) अथ वित्तेश्वरो देवः तत्र कालेन केनचित् । आययौ पुष्पकारूढः पितरं द्रष्टमञ्जसा ॥ २ ॥ ' पुढे काही काळ गेल्यावर, वित्तेश्वर कुबेर हा पुष्पक विमानात बसून अकस्मात पित्याला भेटण्यास आला. (२) दृष्ट्वा तं कैकसी तत्र भ्राजमानं महौजसम् । राक्षसी पुत्रसामीप्यं गत्वा रावणमब्रवीत् ॥ ३ ॥ महातेजस्वी आणि महासामर्थ्यसंपन्न अ शा कुबेराला पाहून कैकसी राक्षसी आपल्या रावण या पुत्राजवळ जाऊन म्हणाली. (३) पुत्र पश्य धनाध्यक्षं ज्वलन्तं स्वेन तेजसा । त्वमप्येवं यथा भूयाः तथा यत्नं कुरु प्रभो ॥ ४ ॥ "बाळा, आपल्या तेजाने तळपणाऱ्या या धनपती कुबेराला पाहा. अरे समर्थ पुत्रा, ज्या योगे तूसुद्धा असा होशील, असा काहीतरी प्रयत्न कर." (४) तत् श्रुत्वा रावणो रोषात् प्रतिज्ञामकरोद्द्रुतम् । धनदेन समो वापि ह्याधिको वाचिरेण तु ॥ ५ ॥ भविष्याम्यम्ब मां पश्य सन्तापं त्यज सुव्रते । इत्युक्त्वा दुष्करं कर्तुं तपः स दशकन्धरः ॥ ६ ॥ अगमत्फलसिद्ध्यर्थं गोकर्णं तु सहानुजः । स्वं स्वं नियममास्थाय भ्रातरस्ते तपो महत् ॥ ७ ॥ आस्थिता दुष्करं घोरं सर्वलोकैकतापनम् । दशवर्षसहस्राणि कुम्भ्कर्णोऽकरोत्तपः ॥ ८ ॥ ते ऐकून, रावणाने रागाने तत्काळ प्रतिज्ञा केली की, "माते, तू खेद सोड. मी लौकरच धनद कुबेरासारखा किंवा त्याहूनही अधिक मोठा ऐश्वर्यसंपन्न होईन. तू माझ्यावर कृपा-दृष्टी ठेव." असे सांगून तो इष्टफळ प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या लहान भावांसह दुष्कर तप करण्यास गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे आपापली व्रते पाळून, सर्व लोकांना केवळ ताप देणारे असे भयंकर व दुष्कर तप ते भाऊ करू लागले. दहा हजार वर्षेपर्यंत कुंभकर्णाने तप केले. (५-८) विभीषणोऽपि धर्मात्मा सत्यधर्मपरायणः । पञ्चवर्षसहस्राणि पादेनैकेन तस्थिवान् ॥ ९ ॥ सत्य धर्मात परायण असणारा, धर्मात्मा, बिभीषणसुद्धा पाच हजार वर्षे एका पायावर उभा राहून तप करू लागला. (९) दिव्यवर्षसहस्राणि तु निराहारो दशाननः । पूर्णे वर्षसहस्रे तु शीर्षमग्नौ जुहाव सः । एवं वर्षसहस्राणि नव तस्यातिचक्रमुः ॥ १० ॥ एक हजार दिव्य वर्षे दशानन रावण निराहार राहिला. एक हजार वर्षे पूर्ण झाल्यावर त्याने आपले एक मस्तक तोडून त्याचे अग्नीत हवन केले. अशा प्रकारे एकेक मस्तकाचे अग्नीत हवन करताना त्याची नऊ हजार वर्षे निघून गेली. (१०) अथ वर्षसहस्रं तु दशमे दशमं शिरः । छेत्तुकामस्य धर्मात्मा प्राप्तश्चाथ प्रजापतिः । वत्स वत्स दशग्रीव प्रीतोऽस्मीत्यभ्यभाषत ॥ ११ ॥ वरं वरय दास्यामि यत्ते मनसि काङ्क्षितम् । दशग्रीवोऽपि तच्छ्रुत्वा प्रहृष्टेनान्तरात्मना ॥ १२ ॥ नंतर दहावे सहस्र वर्ष संपल्यावर जेव्हा रावण आपले दहावे मस्तक तोडू लागला तेव्हा धर्मात्मा ब्रह्मदेव तेथे उपस्थित झाले आणि त्याला म्हणाले, "बाळा रावणा, मी तुझ्या तपामुळे प्रसन्न झालो आहे. तू वर माग. तुझ्या मनात जी इच्छा असेल ती मी पूर्ण करीन." ते ऐकल्यावर रावणसुद्धा मनात अतिशय संतुष्ट झाला व म्हणाला. (११-१२) अमरत्वं वृणोमीश वरदो यदि मे भवान् । सुपर्णनागयक्षाणां देवतानां तथासुरैः । अवध्यत्वं तु मे देहि तृणभूता हि मानुषाः ॥ १३ ॥ "हे ईश्वरा, जर तू मला वर देणार असशील तर मी अमर होण्याचा वर मागत आहे. गरूड, साप, यक्ष, देव यापैकी कोणाकडूनही मला मरण येऊ नये, असा मला वर द्या. मानव हे तर माझ्या दृष्टीने तृणवत आहेत." (१३) तथास्त्विति प्रजाध्यक्षः पुनराह दशाननम् । अग्नौ हुतानि शीर्षाणि यानि तेऽसुरपुङ्गव ॥ १४ ॥ भविष्यति यथापूर्वं अक्षयाणि च सत्तम ॥ १५ ॥ 'तथास्तु ' असे म्हणून प्रजाध्यक्ष ब्रह्मदेव पुनः रावणाला म्हणाले, ' हे असुरश्रेष्ठा, जी मस्तके तू अग्नीमध्ये हवन केली होतीस, ती हे साधुश्रेष्ठा, तुला पूर्वीप्रमाणे प्राप्त होतील आणि ती अक्षय होतील." (१४-१५) एवमुक्त्वा ततो राम दशग्रीवं प्रजापतिः । विभीषणमुवाचेदं प्रणतं भक्तवत्सलः ॥ १६ ॥ हे श्रीरामा, रावणाला असे सांगून, नंतर ते भक्तवत्सल प्रजापती नम्र झालेल्या बिभीषणाला म्हणाले. (१६) विभीषण त्वया वत्स कृतं धर्मार्थमुत्तमम् । तपस्ततो वरं वत्स वृणीष्वाभिमतं हितम् ॥ १७ ॥ "हे वत्सा, बिभीषणा, धर्म संपादन करण्यासाठी तू उत्तम तप केले आहेस. म्हणून हे वत्सा, तुला जो हितकर आणि इष्ट वाटत असेल असा वर माग." (१७) विभीषणोऽपि तं नत्वा प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् । देव मे सर्वदा बुद्धिः धर्मे तिष्ठतु शाश्वती । मा रोचयतु अधर्मं मे बुद्धिः सर्वत्र सर्वदा ॥ १८ ॥ तेव्हा ब्रह्मदेवांना नमस्कार करून, हात जोडून बिभीषण म्हणाला, " हे देवा, माझी बुद्धी सर्वदा धर्माचे ठिकाणीच अढळ असो. माझ्या बुद्धीला सर्वदा सर्वत्र कोणत्याही अवस्थेत अधर्माचे ठिकाणी आवड उत्पन्न होऊ नये." (१८) ततः प्रजापतिः प्रीतो विभीषणमथाब्रवीत् । वत्स त्वं धर्मशिलोऽसि तथैव च भविष्यसि ॥ १९ ॥ तेव्हा प्रसन्न झालेले प्रजापती बिभीषणाला म्हणाले, "बाळा, तू धर्मशील आहेस. तू यापुढेही तसाच राहशील. (१९) अयाचितोऽपि ते दास्ये ह्यमरत्वं विभीषण । कुम्भकर्णमथोवाच वरं वरय सुव्रत ॥ २० ॥ आणि अरे बिभीषणा, जरी तू मागितलेले नाहीस तरी मी तुला अमरत्व देत आहे." त्यानंतर प्रजापती कुंभकर्णाला म्हणाले, "अरे सुव्रता, तू वर माग" (२०) वाण्या व्याप्तोऽथ तं प्राह कुम्भकर्णः पितामहम् । स्वप्स्यामि देव षण्मासान् दिनमेकं तु भोजनम् ॥ २१ ॥ तेव्हा (देवांनी प्रेरणा केल्यामुळे) सरस्वती देवीने त्याच्या वाणीवर अधिष्ठान ठेवून कुंभकर्णाला मोहित केले, तो पितामहांना म्हणाला- "हे देवा, मला सहा महिने झोपायला मिळावे आणि एक दिवस भोजनासाठी जागे व्हायला मिळावे." (२१) एवमस्त्विति तं प्राह ब्रह्मा दृष्ट्वा दिवौकसः । सरसवती च तद्वक्त्रात् निर्गता प्रययौ दिवम् ॥ २२ ॥ तेव्हा देवांकडे पाहात 'असे होईल' असे ब्रह्मदेव त्याला म्हणाले. त्यानंतर कुंभकर्णाच्या मुखातून सरस्वती बाहेर पडली व स्वर्गलोकी गेली. (२२) कुम्भकर्णस्तु दुष्टात्मा चिन्तयामास दुःखितः । अनभिप्रेतमेवास्यात् किं निर्गतमहो विधिः ॥ २३ ॥ दुष्ट मन असणाऱ्या कुंभकर्णाने मग दुःखित होऊन विचार केला, "अरेरे, जे मला अभिप्रेत नव्हते, तेच माझ्या मुखातून का बरे बाहेर पडले ? अरेरे- ! नशीब माझे- !" (२३) सुमाली वरलब्धान् स्तान् ज्ञात्वा पौत्रान् निशाचरान् । पातालान्निर्भयः प्रायात् प्रहस्तादिभिरन्वितः ॥ २४ ॥ आपल्या तीन राक्षस नातवंडांना वर मिळालेले आहेत, हे कळल्यावर प्रहस्तादी राक्षसांना बरोबर घेऊन, सुमाली निर्भयपणे पातळातून पृथ्वीवर आला. (२४) दशग्रीवं परिष्वज्य वचनं चेदमब्रवीत् । दिष्ट्या ते पुत्र संवृतो वाञ्छितो मे मनोरथः ॥ २५ ॥ रावणाला आलिंगन देऊन तो म्हणाला, "मी ज्यांची इच्छा करीत होतो, तुझे तेच मनोरथ पूर्ण झाले, ही आनंदाची गोष्ट आहे. (२५) यद्भयाच्च वयं लङ्कां त्यक्त्वा याता रसातलम् । तद्गतं नो महाबाहो महद् विष्णुकृतं भयम् ॥ २६ ॥ हे महाबाहो, ज्याच्या भयामुळे लंका सोडून आम्ही रसातळाला गेलो होतो, ते आमचे विष्णूपासूनचे भय आता दूर झाले आहे. (२६) अस्माभिः पूर्वमुषिता लङ्केयं धनदेन ते । भ्रात्राक्रान्तामिदानीं त्वं प्रत्यानेतुमिहार्हसि ॥ २७ ॥ साम्ना वाथ बलेनापि राज्ञां बन्धुः कुतः सुहृत् । इत्युक्तो रावणं प्राह नार्हस्येवं प्रभाषितुम् ॥ २८ ॥ ज्या लंकेत आम्ही पूर्वी राहात होतो, ती आता तुझ्या कुबेर या भावाने बळकावली आहे, आता ती लंका तू साम- नीतीने किंवा बलपूर्वक परत प्राप्त करून घ्यावयास हवीस. कुबेर हा भाऊ आहे याचा विचार तू करू नकोस. कारण राजे लोकांना बंधू किंवा हितचिंतक कुढून असणार ?" सुमालीने असे म्हटल्यावर रावण त्याला म्हणाला, "आजोबा, असे बोलणे तुम्हांला शोभत नाही. (२७-२८) वित्तेशो गुरुरस्माकं एवं श्रुत्वा तमब्रवीत् । प्रहस्तः प्रश्रितं वाक्यं रावणं दशकन्धरम् ॥ २९ ॥ वित्तेश कुबेर हा आमचा वडीलबंधू आहे." हे ऐकल्यावर प्रहस्त रावणाला म्हणाला. (२९) शृणु रावण यत्नेन नैवं त्वं वक्तुमर्हसि । नाधीता राजधर्मास्ते नीतिशास्त्रं तथैव च ॥ ३० ॥ "रावणा, माझे बोलणे नीट ऐक. असे बोलणे तुला शोभत नाही. राजधर्म तुला माहीत नाहीत. तसेच तू नीतिशास्त्राचे अध्ययनही केलेले नाहीस. (३०) शूराणां नहि सौभ्रात्रं शृणु मे वदतः प्रभो । कश्यपस्य सुता देवा राक्षसाश्च महाबलाः ॥ ३१ ॥ परस्परमयुध्यन्त त्यक्त्वा सौहृदमायुधैः । नैवेदानीन्तनं राजन् वैरं देवैरनुष्ठितम् ॥ ३२ ॥ वीरांचे ठायी बंधुप्रेम असत नाही. हे समर्था, मी आता जे सांगेन ते तू ऐक. कश्यपाचे पुत्र असणारे देव आणि राक्षस हे महाबलवान शूर होते. पण बंधुप्रेम सोडून देऊन त्यांनी एकमेकांबरोबर शस्त्रांनी युद्ध केले. राजा, देवांबरोबरचे हे आपले वैर काही आजच सुरू झालेले नाही." (३१-३२) प्रहस्तस्य वचः श्रुत्वा दशग्रीवो दुरात्मनः । तथेति क्रोधताम्राक्षः त्रिकूटाचलमन्वगात् ॥ ३३ ॥ दुरात्म्या प्रहस्ताचे हे वचन ऐकल्यावर 'ठीक आहे' असे रावण म्हणाला. त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले आणि तो लगेच त्रिकूट पर्वतावर गेला. (३३) दूतं प्रहस्तं सम्प्रेष्य निष्काय धनदेश्वरम् । लङ्कामाक्रम्य सचिवै राक्षसैः सुखमास्थितः ॥ ३४ ॥ प्रथम त्याने प्रहस्ताला दूत म्हणून पाठविले. नंतर लंकेवर आक्रमण करून, कुबेराला बाहेर हाकलून तो आपल्या राक्षस मंत्र्यांसह तेथे सुखाने राहू लागला. (३४) धनदः पितृवाक्येन त्यक्त्वा लङ्कां महायशाः । गत्वा कैलासशिखरं तपसा तोषयत् शिवम् ॥ ३५ ॥ लंका सोडून दिल्यावर पित्याच्या सांगण्यावरून महायशस्वी कुबेर कैलास पर्वताच्या शिखरावर गेला आणि तेथे त्याने तपश्चर्येने शंकराला प्रसन्न करून घेतले. (३५) तेन सख्यमनुप्राप्य तेनैव परिपालितः । अलकां नगरीं तत्र निर्ममे विश्वकर्मणा ॥ ३६ ॥ दिक्पालत्वं चकारात्र शिवेन परिपालितः । रावणो राक्षसैः सार्धं अभिषिक्तः सहानुजैः ॥ ३७ ॥ राज्यं चकारासुराणां त्रिलोकीं बाधयन् खलः । भगिनीं कालखञ्जाय ददौ विकटरूपिणीम् ॥ ३८ ॥ विद्युज्जिह्वाय नाम्नासौ महामयी निशाचरः । ततो मया विश्वकर्मा राक्षसानां दितेः सुतः ॥ ३९ ॥ सुतां मन्दोदरीं नाम्ना ददौ लोकैकसुन्दरीम् । रावणाय पुनः शक्तिं अमोघां प्रीतमानसः ॥ ४० ॥ शंकरांशी सख्य केल्यामुळे त्याला सुरक्षितता मिळाली. त्याने विश्वकर्म्याकडून कैलासावर अलका नावाची नगरी निर्माण करून घेतली. नंतर शिवांच्या संरक्षणाखाली तो दिक्पालाचे, कार्य करू लागला. इकडे राक्षसांकडून अभिषिक्त झालेला दुष्ट रावण तिन्ही लोकांना पीडा देत, आपल्या धाकट्या भावांसह राक्षसांचे राज्य करू लागला. (योग्यवेळी) त्या महामायावी रावणाने आपली विक्राळ स्वरूप असणारी बहीण कालखंज वंशातील विद्युज्जिव्ह नावाच्या राक्षसाला दिली. त्यानंतर राक्षसांचा विश्वकर्मा व दितीचा पुत्र जो मय त्याने सर्व लोकांत एकमेव सुंदर असणारी मंदोदरी नावाची आपली कन्या रावणाला दिली. तसेच प्रसन्न मनाने मयाने रावणाला एक अमोघ शक्ती दिली. (३६-४०) वैरोचनस्य दौहित्रीं वृत्रज्वालेति विश्रुताम् । स्वयंदत्तामुदवहत् कुम्भकर्णाय रावणः ॥ ४१ ॥ वैरोचनाच्या मुलीची मुलगी ही वृत्रज्वाला या नावाने विख्यात होती. नंतर रावणाने तिला आणून तिच्याशी कुंभकर्णाचे लग्न लावून दिले. (४१) गन्धर्वराजस्य सुतां शैलूषस्य महात्मनः । विभीषणस्य भार्यार्थे धर्मज्ञां समुदावहत् ॥ ४२ ॥ सरमां नाम सुभगां सर्वलक्षणसंयुताम् । ततो मन्दोदरी पुत्रं मेघनादं अजीजनत् ॥ ४३ ॥ महात्मा गंधर्वराज शैलूष याची सरमा नावाची कन्या ही धर्मज्ञ, सौभाग्यसंपन्न आणि सर्व शुभ लक्षणांनी युक्त होती. रावणाने तिचा बिभीषणाशी विवाह करून दिला. त्यानंतर मंदोदरीने मेघनाद नावाच्या पुत्राला जन्म दिला. (४२-४३) जातमात्रस्तु यो नादं मेघवत् प्रमुमोच ह । ततः सर्वेऽब्रुवन्मेघनादोऽयमिति चासकृत् ॥ ४४ ॥ जन्माला येताक्षणीच याने मेघाप्रमाणे गर्जना केली. म्हणून हा मेघनाद आहे असे सर्वजण वारंवार म्हणू लागले. म्हणून त्या मुलाचे नाव मेघनाद असेच पडले. (४४) कुम्भकर्णस्ततः प्राह निद्रा मां बाधते प्रभो । ततश्च कारयामास गुहां दीर्घां सुविस्तराम् ॥ ४५ ॥ त्यानंतर कुंभकर्ण एकदा रावणाला म्हणाला, "हे प्रभो, मला झोप सतावत आहे." तेव्हा रावणाने त्याच्यासाठी एक लांब-रूंद विस्तृत अशी गुहा तयार करवून घेतली. (४५) तत्र सुष्वाप मूढात्मा कुम्भकर्णो विघूर्णितः । निद्रिते कुम्भकर्णे तु रावणो लोकरावणः ॥ ४६ ॥ ब्राह्मणान् ऋषिमुख्यांश्च देवदानवकिन्नरान् । देवश्रियो मनुष्यांश्च निजघ्ने समहोरगान् ॥ ४७ ॥ तेथे मूढ बुद्धीचा कुंभकर्ण घोरत झोपून गेला. कुंभकर्ण झोपी गेल्यावर, सर्व लोकांना त्रास देणाऱ्या रावणाने ब्राह्मण, प्रमुख ऋषी, देव, दानव, किन्नर, आणि प्रचंड सर्पांसह मानवगण यांना सतावण्यास सुरूवात केली व त्याने देवांची संपत्ती नष्ट केली. (४६-४७) धनदोऽपि ततः श्रुत्वा रावणस्याक्रमं प्रभुः । अधर्मं मा कुरुष्वेति दूतवाक्यैर्न्यवारयत् ॥ ४८ ॥ रावणाची कृत्ये ऐकल्यानंतर, प्रभू कुबेराने दूतांकडून 'अधर्म करू नकोस' असे सांगून रावणाला थोपविण्याचा प्रयत्न केला. (४८) ततः क्रुद्धो दशग्रीवो जगाम धनदालयम् । विनिर्जित्य धनाध्यक्षं जहारोत्तमपुष्पकम् ॥ ४९ ॥ तेव्हा रावण रागावला आणि त्याने कुबेराच्या नगरावर चाल केली आणि त्याला जिंकून, त्याने त्याचे पुष्पक हे उत्तम विमान हरण करून नेले. (४९) ततो यमं च वरुणं निर्जित्य समरेऽसुरः । स्वर्गलोकमगात्तुर्णं देवराजजिघांसया ॥ ५० ॥ त्यानंतर रावणाने यम आणि वरूण यांना युद्धात जिंकून घेतले, देवराज इंद्राचा वध करण्यासाठी तो त्वरेने स्वर्गलोकावर चालून गेला. (५०) ततोऽभवन्महद्युद्धं इन्द्रेण सह दैवतैः । ततो रावणमभ्येत्य बबन्ध त्रिदशेश्वरः ॥ ५१ ॥ तेव्हा देवांसह इंद्राबरोबर रावणाचे प्रचंड युद्ध झाले. रावणाजवळ येऊन देवराज इंद्राने त्याला बंदिवान केले. (५१) तच्छ्रुत्वा सहसागत्य मेघनादः प्रतापवन् । कृत्वा घोरं महद्युद्धं जित्वा त्रिदशपुङ्गवान् ॥ ५२ ॥ इन्द्रं गृहीत्वा बध्वासौ मेघनादो महाबलः । मोचयित्वा तु पितरं गृहीत्वेन्द्रं ययौ पुरम् ॥ ५३ ॥ ती वार्ता ऐकल्यावर प्रतापी मेघनाद हा झटकन तेथे आला. त्याने देवांबरोबर भयंकर युद्ध केले; देवश्रेष्ठांना जिंकल्यावर त्याने इंद्राला पकडले व त्याला बांधून टाकले. नंतर महाबलवान मेघनादाने आपल्या पित्याला सोडविले आणि इंद्राला घेऊन तो लंका नगरीकडे निघून गेला. (५२-५३) ब्रह्मा तु मोचयामास देवेन्द्रं मेघनादतः । दत्त्वा वरान् बहून् तस्मै ब्रह्मा स्वभवनं ययौ ॥ ५४ ॥ तेव्हा ब्रह्मदेवांनी इंद्राला मेघनादाच्या ताब्यातून सोडवून घेतले. मेघनादाला पुष्कळ वर देऊन, ब्रह्मदेव परत गेले. (५४) रावणो विजयी लोकान् सर्वान् जित्वाक्रमेण तु । कैलासं तोलयामास बाहुभिः परिघोपमैः ॥ ५५ ॥ क्रमाक्रमाने सर्व लोकांना जिंकून रावण विजयी झाला. नंतर परिघाप्रमाणे असलेल्या बाहूंनी त्याने कैलास पर्वत उचलला. (५५) तत्र नन्दीश्वरेणैवं शप्तोऽयं राक्षसेश्वरः । वानरैर्मानुषैश्चैव नाशं गच्छेति कोपिना ॥ ५६ ॥ तेव्हा तेथे असणाऱ्या नंदीश्वरानेच राक्षसराज रावणाला क्रोधाने असा शाप दिला, "अरे रावणा, वानर आणि मानव यांच्या हातून तुझा वध होईल. " (५६) शप्तोऽप्यगणयन् वाक्यं ययौ हैहयपत्तनम् । तेन बद्धो दशग्रीवः पुलस्त्येन विमोचितः ॥ ५७ ॥ असा शाप मिळाला तरी त्या शापाकडे लक्ष न देता, तो रावण हैहय राजाच्या (सहस्रार्जुनाच्या) नगरावर चालून गेला. त्या सहस्त्रार्जुनाने दशानन रावणाला बंदिवान केले. त्यावेळी पुलस्त्याने येऊन त्याला सोडविले. (५७) ततोऽतिबलमासाद्य जिघांसुर्हरिपुङ्गवम् । धृतस्तेनैव कक्षेण वालिना दशकन्धरः ॥ ५८ ॥ त्यानंतर रावण अतिबलवान वानरराज वालीला ठार करण्याच्या इच्छेने त्याच्यावर चालून गेला. त्या वेळी वालीनेच त्या रावणाला आपल्या कवेत दाबून धरले. (५८) भ्रामयित्वा तु चतुरः समुद्रान् रावणं हरिः । विसर्जयामास ततः तेन सख्यं चकार सः ॥ ५९ ॥ वालीने चारी समुद्रांवर त्याला गरागरा फिरवून सोडून दिले. तेव्हा रावणाने वालीशी सख्य केले. (५९) रावणः परमप्रीत एवं लोकान्महाबलः । चकार स्ववशे राम बुभुजे स्वयमेव तान् ॥ ६० ॥ हे रामा, अशा प्रकारे अतिशय आनंदित झालेल्या महाबलवान रावणाने सर्व लोक आपल्या अधीन करून घेतले व तो स्वतःच त्यांचा उपभोग घेऊ लागला. (६०) एवं प्रभावो राजेन्द्र दशग्रीवः सहेन्द्रजित् । त्वया विनिहितं सङ्ख्ये रावणो लोकरावणः ॥ ६१ ॥ मेघनादश्च निहतो लक्ष्मणेन महात्मना । कुम्भकर्णश्च निहतः त्वया पर्वतसन्निभः ॥ ६२ ॥ हे राजेंद्रा, इंद्रजितासह रावण अशा प्रकारे प्रभावशाली झाला होता. तो लोकांना रडवणारा रावण तुमच्याकडून युद्धात मारला गेला आणि महात्म्या लक्ष्मणाने मेघनादाचा वध केला. तसेच पर्वताप्रमाणे प्रचंड असणारा कुंभकर्ण हाही तुमच्याकडून मारला गेला. (६१-६२) भवान् नारायणः साक्षात् जगतां आदिकृद्विभुः । त्वत्स्वरूपमिदं सर्वं जगत्स्थावरजँगमम् ॥ ६३ ॥ हे रामा, सर्व जगाचा आदिकर्ता असे साक्षात सर्व व्यापक नारायण तुम्हीच आहात. हे स्थावर जगमात्मक सर्व विश्व हे तुमचेच स्वरूप आहे. (६३) त्वन्नाभिकमलोत्पन्नो ब्रह्मा लोकपितामहः । अग्निस्ते मुखतो जातो वाचा सह रघुत्तम ॥ ६४ ॥ लोकांचा पितामह ब्रह्मदेव हा नााभिकमळातून उत्पन्न झाला आहे. हे रघूत्तमा, वाग्देवीसह अग्निदेव तुमच्या मुखातून निर्माण झाला आहे. (६४) बाहुभ्यां लोकपालौघाः चक्षुर्भ्यां चन्द्रभास्करौ । दिशश्च विदिशश्चैव कर्णाभ्यां ते समुत्थिताः ॥ ६५ ॥ तुमच्या दोन बाहूपासून लोकपालांचे समूह, डोळ्यांपासून सूर्य आणि चंद्र व कानांपासून सर्व दिशा आणि विदिशा उत्पन्न झालेल्या आहेत. (६५) घ्राणात्प्राणः समुत्पन्नश्च अश्विनौ देवसत्तमौ । जङ्घाजानूरुजघनाद् भुवर्लोकादयोऽभवन् ॥ ६६ ॥ तुमच्या घ्राणेद्रियांपासून प्राण आणि देवश्रेष्ठ अधिनीकुमार उद्भूत झाले आहेत. तसेच तुमच्या जंघा, जानू ,उरू आणि जघन यांचेपासून भुवर्लोक इत्यादी निर्माण झालेले आहेत. (६६) कुक्षिदेशात् समुत्पन्नाः चत्वारः सागरा हरे । स्तनाभ्यामिन्द्रवरुणौ वालखिल्याश्च रेतसः ॥ ६७ ॥ हे रामा, तुमच्या कुक्षिप्रदेशापासून चार समुद्र, दोन स्तनांपासून इंद्र आणि वरुण, तसेच तुमच्या वीर्यापासून बालखिल्य ऋषी उत्पन्न झालेले आहेत. (६७) मेढ्राद्यमो गुदान्मृत्युः मन्यो रुद्रस्त्रिलोचनः । अस्थिभ्यः पर्वता जाताः केशेभ्यो मेघसंहतिः ॥ ६८ ॥ तुमच्या उपरापासून यम, गुदापासून मृत्यू क्रोधापासून त्रिलोचन रुद्र हे निर्माण झाले. तुमच्या अस्थींपासून पर्वत जन्माला आले आणि केसांपासून मेघांचे समुदाय निर्माण झाले. (६८) ओषध्यस्तव रोमेभ्यो नखेभ्यश्च खरादयः । त्वं विश्वरूपः पुरुषो मायशक्तिसमन्वितः ॥ ६९ ॥ तुमच्या रोमांपासून औषधी, नखांपासून गर्दभ इत्यादी प्राणी झाले आहेत. अशा प्रकारे आपल्या मायाशक्ती- युक्त असे तुम्ही विश्वरूप असणारे परम पुरुष आहात. (६९) नानारूप इवाभासि गुणव्यतिकरे सति । त्वामाश्रित्यैव विबुधाः पिबन्त्यमृतमध्वरे ॥ ७० ॥ प्रकृतीच्या गुणांशी संयोग झाला असता, तुम्ही नाना रूपे असल्याप्रमाणे भासू लागता. तुमचाच आश्रय घेऊन, देवांचे समूह यज्ञांमध्ये अमृताचे पान करतात. (७०) त्वया सृष्टमिदं सर्वं विश्वं स्थावरजङ्गमम् । त्वामाश्रित्यैव जीवन्ति सर्वे स्थावरजङ्गमाः ॥ ७१ ॥ हे स्थावर- जंगमात्मक सर्व विश्व तुम्ही निर्माण केले आहे. तुमचाच आश्रय घेऊन सर्व स्थावर व जंगम जिवंत राहातात. (७१) त्वद्युक्तमखिलं वस्तु व्यवहारेऽपि राघव । क्षीरमध्यगतं सर्पिः यथा व्याप्याखिलं पयः ॥ ७२ ॥ हे राघवा, ज्या प्रमाणे दुधामध्ये असणारे तूप हे सर्व दूध व्यापून असते, त्या प्रमाणे व्यवहारातसुद्धा सर्व वस्तु तुमच्याकडून व्यापल्या गेल्या आहेत. (७२) त्वद्भासा भासतेऽर्कादि न त्वं तेनावभाससे । सर्वगं नित्यमेकं त्वां ज्ञानचक्षुर्विलोकयेत् ॥ ७३ ॥ सूर्य इत्यादी तुमच्या प्रकाशाने प्रकाशित होतातः परंतु तुम्ही मात्र त्यांच्या योगाने प्रकाशित होत नाही. सर्व व्यापक, नित्य आणि एकमेव अद्वितीय असलेल्या तुम्हांला ज्ञानदृष्टी असणारा माणूस पाहू शकतो. (७३) नाज्ञानचक्षुस्त्वां पश्येत् अन्धदृग् भास्करं यथा । योगिनस्त्वां विचिन्वन्ति स्वदेहे परमेश्वरम् ॥ ७४ ॥ अतन्निरसनमुखैः वेदशीर्षैरहर्निशम् । त्वत्पादभक्तिलेशेन गृहीता यदि योगिनः ॥ ७५ ॥ विचिन्वतो हि पश्यन्ति चिन्मात्रं त्वां न चान्यथा । मया प्रलपितं किञ्चित् सर्वज्ञस्य तवाग्रतः । क्षन्तुमर्हसि देवेश तवानुग्रहभागहम् ॥ ७६ ॥ अंध माणूस ज्या प्रमाणे सूर्याला पाहू शकत नाही, त्या प्रमाणे ज्ञानदृष्टी नसणारा माणूस तुम्हाला पाहू शकत नाही. (नेति, नेति, असे म्हणून) अनात्म पदार्थांचे निरसन करणाऱ्या वेदांच्या शिरोभागी असणाऱ्या उपनिषदांच्या उपदेशाद्वारा, योगी लोक स्वतःच्या देहात तुम्हांला शोधीत असतात. परंतु जर त्या योगी लोकांवर तुमच्या चरणांठायी भक्तीचा लेशमात्रही प्रभाव झाला, तर शोध घेत घेत त्या योगी लोकांना चिन्मात्र असणाऱ्या तुमचे दर्शन होते, नाही तर नाही. हे देवेशा, सर्वज्ञ अशा तुमच्यापुढे मी काही तरी बडबड केली आहे, तुम्ही मला क्षमा करा. कारण मी तुमच्या कृपानुग्रहाला पात्र आहे. (७४-७६) दिग्देशकालपरिहीनमनन्यमेकं चिन्मात्रमक्षरमजं चलनादिहीनम् । सर्वज्ञमीश्वरमनन्तगुणं व्युदस्त- मायं भजे रघुपतिं भजतामभिन्नम् ॥ ७७ ॥ जे दिशा, देश आणि काल यांनी रहित आहेत, तसेच अनन्य, एक, चिन्मात्र, अविनाशी, अजन्मा आहेत, चलनादी क्रियांनी रहित आहेत, अशा सर्वज्ञ, सर्वेश्वर, अनंतगुणसंपन्न, मायाहीन व आपल्या भक्तांशी नित्य अभिन्न असणार्या श्रीरामांना मी भजतो. " (७७) इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥ इति श्रीमद्अध्यात्मसमायणेउमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥ |