॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

सुंदरकांड

॥ अध्याय चाळीसावा ॥
सेतुबंधनाची पूर्णता

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

समुद्र निघून गेल्यावर सेतू बांधण्याची तयारी; वानरांना तसा आदेश :

नळहस्तें सेतुबंधन । समुद्रें श्रीरामासी सांगोन ।
वंदोनियां श्रीरामचरण । आज्ञा पुसोन स्वयें गेला ॥ १ ॥
ऐकोनि समुद्राचें वचन । संतोषला श्रीरघुनंदन ।
नळासी संमुख आपण । प्रीतिवचन बोलत ॥ २ ॥
प्रीतिप्रेमाचें वचन । नळासी बोले रघुनंदन ।
सखा माझा तूं जीवप्राण । सेतु निर्माण करी आतां ॥ ३ ॥
समुद्रें सांगितलें आपण । तुझेनि हातें सेतुबंधन ।
घेवोनियां वानरगण । सेतु निर्माण करी आतां ॥ ४ ॥
स्वयेंची श्रीरघुनाथ । स्वमुखें सुग्रीवासी सांगत ।
प्रधान जुत्पती समस्त । मुख्य हनुमंत आदिकरोनी ॥ ५ ॥
नळहस्तें सेतुबंधन । समुद्रें सांगितले आपण ।
राजा सुग्रीव ससैन्य । सेतुविधान करावें ॥ ६ ॥
सेतु बंधाची सामग्री । सवेग आणावी वानरीं ।
देवोनि नळाच्या करीं । सेतु सागरीं बांधावा ॥ ७ ॥
परम आल्हादें हर्षयुक्त । परमानंदें सांगे श्रीरघुनाथ ।
तेणें सुग्रीवा सुख अद्‍भुत । जुत्पतियुक्त उठियेला ॥ ८ ॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । सुखावले वानरगण ।
आणावया पर्वत पूर्ण । केलें उड्डाण शतसहस्त्रीं ॥ ९ ॥
वानर सेतुबंधनार्थ । जातां देखोनि समस्त ।
स्वयें सुग्रीवाविचारित । विलंब येथें नये करूं ॥ १० ॥
विलंबे सेतुबांधितां । जरी कळेल लंकानाथा ।
तरी तो करील सेतुघाता । अतर्क्यता साटोपें ॥ ११ ॥
ते खेचर आम्ही भूचर । मध्यें भरलासें सागर ।
युद्धीं प्राप्त वानर । सेतु सत्वर बांधावा ॥ १२ ॥
ऐसें बोलोनियां जाण । सुग्रीव राजा अंगें आपण ।
उठिला बाहु आफळोन । सेतुबंधनशीघ्रता ॥ १३ ॥
अंगें न उठतां स्वयें धूर । सेवकासेवकीं वानर ।
सेतुबंधन नव्हे शीघ्र । उठिला सत्वर स्वयें राजा ॥ १४ ॥
धुरेवांचोनि वृथा कर्षण । धुरेंवांचुनीं वृथा रण ।
धुरेंवांचुनि सेतुबंधन । अति शीघ्र जाण साधेना ॥ १५ ॥
हेंचि आवडे श्रीरघुनाथा । सेतु बांधोनि शीघ्रता ।
वधोनियां लंकानाथा । स्वानंदें सीता आणावी ॥ १६ ॥
ऐसी आवडी श्रीरामापोटीं । यालागीं स्वयें सुग्रीव उठीं ।
सेतु बांधावया जगजेठी । वानरकोटीसमवेत ॥ १७ ॥
सुग्रीव उठतांचि जाण । सवेग उठिले वानरगण ।
मुख्य मुख्य धुरा दारूण । ते कोण कोण अवधारा ॥ १८ ॥
नळ नीळ जांबवंत । गज गवय गवाक्षयुक्त ।
शरभ गंधमादन समस्त । निघाले त्वरित सेतुबंधा ॥ १९ ॥
अंगद युवराजा आपण । अंगें उठतांचि जाण ।
उठावले वानरगण । संख्या कोण करी तेथें ॥ २० ॥
तर तरळ मैंद व्दिविद । कोट्यनुकोटी अर्बुद अर्बुद ।
वानर झेंपावती निर्बुद । सेतुबंध बांधावया ॥ २१ ॥
नळ बैसला सेतुबंधासीं । वृद्ध देखोनि जांबवंतासीं ।
सुग्रीवें ठेविलें नळापासीं । समविषमासी सांगावया ॥ २२ ॥
सेतुबंधासीं सत्वर । असंख्य निघाले वानर ।
वानरीं व्यापिलें अंबर । दिगंतर कोंदलें ॥ २३ ॥
बाहु आफळोनि वानर । करोनि श्रीरामनामगजर ।
सवेग निघाले सत्वर । करिती भुभुःकार नामाचा ॥ २४ ॥

’किलकिल’ या शब्दाची व्युत्पत्ती :

किलकिल शब्द वानरजाती । किलकिल म्हणजे निर्धार स्थिती ।
श्रीरामनामें नित्य गर्जती । शब्दव्युत्पत्ति इत्यर्थ ॥ २५ ॥
यालागीं किलकिल शब्द । रामनामें अति शुद्ध ।
वानरां परम आल्हाद । सेतुबंध बांधावया ॥ २६ ॥
पांच कोटींचिया हारी । दक्षिणबाहूंसीं वानरीं ।
पर्वत देती नळाच्या करीं । त्वरेंकरीं अति शीघ्र ॥ २७ ॥
वामबाहूच्या सेतुप्रकारीं । पांच कोटी वानरहारी ।
पर्वत वृक्ष देती गजरीं । त्वरेंकरी अति शीघ्र ॥ २८ ॥
नळें मांडिले शुद्ध शीळ । साठी जण अति कुशळ ।
नळाजवळी सर्व काळ । सामग्री प्रबळ देतीत ते ॥ २९ ॥
नळाची परम ख्याती । सेतुबांधी दोहीं हातीं ।
तेथें जाली विपरीत गती । पर्वत बुडती समुद्रीं ॥ ३० ॥
नळें लाविलिया हात । पर्वत स्वयें समुद्रीं बुडत ।
तोही राहिला तटस्थ । सेतुबंधनार्थ चालेना ॥ ३१ ॥
समुद्रें सांगितलें येथ । नळाचें हातें पर्वत तरत ।
शेखीं त्याचेचि हातें बुडत । दुःखाभिभूत सुग्रीव ॥ ३२ ॥
नळहस्तें पर्वत बुडत । हिंवसला कपिनाथ ।
वृत्तांत श्रीरामासी सांगत । सेतुबंधनार्थ चालेना ॥ ३३ ॥
ऐकोनि वानरांचि मात । हासिन्नला श्रीरघुनाथ ।
सेतुबंधनाचा गुह्यार्थ । सांगेल हनुमंत तें करा ॥ ३४ ॥

हनुमंताचे निदान व त्याचा अनुभव :

हनुमान सांगे नळ वरदोक्ती । श्रीरामापुढें त्या न चालती ।
जेंवी खद्द्योत हरपती । सूर्यदीप्तिप्रकाशें ॥ ३५ ॥
श्रीरामप्रतापापुढें । समुद्रा कायसें बापुडें ।
नळ केवळ तें किडें । वरदोक्तिवेडें अभिमानग्रस्त ॥ ३६ ॥
माझेनि हातें तरती पाषाण । ऐसा नळासी वरदाभिमान ।
अभिमानें ते पर्वत निमग्न । सेतुबंधन चालेना ॥ ३७ ॥
अभिमान वसला ज्यांचे माथां । ते तंव बुडाले तत्वतां ।
युक्ति सांगेन मी आतां । सेतुबंधनार्थ अति शुद्ध ॥ ३८ ॥
पर्वत अथवा वृक्षपाषाण । ज्यासी लागे श्रीरामचरण ।
तयासी समुद्रीं घडे तरण । सत्य जाण सुग्रीवा ॥ ३९ ॥
श्रीरामचरणींचे पर्वत । तेचि समुद्रीं तरत ।
तेचि सेतुसिद्ध्यर्थ । गुह्य हनुमंत बोलिला ॥ ४० ॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । वानरां पावली जीवींची खूण ।
पुढती करावया सेतुबंधन । हनुम्याचें चरण वंदिले ॥ ४१ ॥
लागतांचि चरणकमळा । अहल्या उद्धरली दुःशीळा ।
श्रीरामपदीं पर्वतशिळां । समुद्रजळा सुखें तरती ॥ ४२ ॥

श्रीरामचरणांचा महिमा :

श्रीरामचरणांचे महिमान । अवघे ऐकोनि सावधान ।
उल्लासें सांगे वायुनंदन । प्रतापपूर्ण हरिचरणीं ॥ ४३ ॥
श्रीराम चरणींचे शिळापर्वत । समुद्रीं घालितां हनुमंत ।
त्यातें वानरदळ बुडवित । तरी ते तरत न बुडोनी ॥ ४४ ॥
एकएका पर्वतावरी । बैसले वानर लक्षांतरी ।
तरी न बुडती समुद्रीं । तारिती सागरीं वानरां ॥ ४५ ॥
स्वयें बुडोनि आणिकां बुडविती । ऐसी पाषाणांची जाती ।
तेही सागरीं तरती । आणि तारितीं वानरां ॥ ४६ ॥
नव्हे पाषाणाचा गुण । नव्हे समुद्राचें लक्षण ।
नव्हे ऋषीचें वरदान । श्रीरामचरणप्रताप ॥ ४७ ॥
श्रीरामचरणींचें पर्वत । पुष्पप्राय उचलित ।
येर जडत्वें जे डोलत । ते बुडत सागरीं ॥ ४८ ॥
श्रीरामचरणाचें महिमान । सिद्धी पावे सेतुबंधन ।
स्वयें हनुमंत सांगतां जाण । पावली खूण वानरां ॥ ४९ ॥

हनुमंताचे अभिनंदन :

ऐकोनि हनुमंताचें वचन । सुग्रीवें दिधलें आलिंगन ।
अंगद घाली लोटांगण । वंदिले चरण वानरीं ॥ ५० ॥
हनुमंतें विघ्नाचें निर्विघ्न । हनुमंतें सेतुबंधन ।
हनुमंतें भवाब्धितरण । अवघे जाण वानिती ॥ ५१ ॥
सुग्रीव बोले संतोषोन । अगाध श्रीराममहिमान ।
अति गुह्य गुप्त ज्ञान । जाणें संपूर्ण हनुमंत ॥ ५२ ॥
करोनि हनुमंताची स्तुती । सेतु बांधावया पुढती ।
वानर चालिले शीघ्रगतीं । भुभुःकार करिती श्रीराम नामें ॥ ५३ ॥

सेतुबंधनाचे कार्य चालू. सर्व भूतसृष्टीला तो अपूर्व चमत्कार :

सुग्रीव सांगे स्वयें गर्जोन । पूर्व पश्चिम दिशा दक्षिण ।
तेथील बुडती पाषाण । ते आपण नाणावे ॥ ५४ ॥
उत्तरेचे जे पर्वत । तेचि आणावे सेतुबंधार्थ ।
ऐसा ऐकोनि इत्यर्थ । वानर समस्त चालिले ॥ ५५ ॥
उत्तरेचे जे पर्वत । वृक्षपाषाण शिळा समस्त ।
श्रीरामपायीं अति पुनीत । सेतुबंधातें शीघ्र आणा ॥ ५६ ॥
जैसें आकाशीं विखुरती टोळ । तैसें चालिलें वानरदळ ।
सेतु बंधनार्थ सकळ । प्रतापी प्रबळ चालिले ॥ ५७ ॥
गगनीं नक्षत्रें पैं थोडीं । तैशा वानरांच्या कोडी ।
सेतुबंधनाची तातडी । कपि कडाडीं चालिले ॥ ५८ ॥
सेतु बांधावया सत्वर । हावे अहंपूर्व अहंपूर्व ।
वानरीं घेवोनियां धांव । आणिती सर्व गिरिवर ॥ ५९ ॥
वानर अति बळें समर्थ । समूळ उपडोनियां पर्वत ।
घेवोंनी येती सेतुबंधार्थ । कैसे शोभत तें ऐका ॥ ६० ॥
पर्वतमाथां खर्जूरीवृक्ष । अर्जुनवृक्ष ते असंख्य ।
शाल ताल तमाल तिलक । घटकवृक्ष वृथ तेथ ॥ ६१ ॥
आणिक पर्वत असंख्यात । आणिती शिखरांसमवेत ।
नाना जातींचे वृथ तेथ । फल पुष्पित आणिले ॥ ६२ ॥
माथां घेवोनि पर्वत । शतसहस्त्र असंख्यात ।
आणिती शिखरांसमवेत । गात नाचत स्वानंदे ॥ ६३ ॥
श्रीराम जय राम या गजरीं । आणिती पर्वतांच्या हारी ।
सवेंचि घालिती सागरीं । आल्हाद भारी सेतुबंधा ॥ ६४ ॥
लांबी संख्या शतयोजन । रूंदी दशयोजन जाण ।
ऐसें सेतूचें निर्माण । करी नंदन विश्वकर्म्याचा ॥ ६५ ॥
पडती पर्वतांच्या कोडी । दोरी धरोनि अति निवाडीं ।
नळ पर्वतें पर्वत जोडी । रिती सवडीं उरों नेदी ॥ ६६ ॥
पर्वत घ्यावया उठाउठीं । नळाजवळी दहा कोटी ।
वानर ठेविले जगजेठी । अधिक साठी अति कुशळ ॥ ६७ ॥
पर्वतांच्या कोट्यनुकोटी । वानर आणिती जगजेठी ।
सवेंचि धांवती उठाउठी । गिरिकोटी आणावया ॥ ६८ ॥
पर्वत पडतां उपराउपरीं । गाहाळू न करावा सागरीं ।
नांवें लिहिती पर्वतावरी । कपि नखाग्रीं कोरोनी ॥ ६९ ॥
नवल वानरांची कथा । संख्या सांगावया रघुनाथा ।
नावें लिहिती पर्वतमाथां । सेतुबंधार्था अभिनव ॥ ७० ॥
सेतुबंधन समुद्रजळीं । श्रीरामा बांधी आतुर्बळी ।
स्वर्गमृत्युसप्तपाताळीं । पिटिळी टाळी अति गजरें ॥ ७१ ॥

सेतुबंधनाचा क्रम पहिले दिवशी चौदा योजने :

प्रथम दिवशीं समुद्रांतु । बुडाला पर्वतपर्वतु ।
तेणें खोळंबला सेतु । अल्प कार्यार्थु चालिला ॥ ७२ ॥

दुसरे दिवशी सव्वीस :

चवदा योजनें नेमस्तु । प्रथम दिवशीं बांधिला सेतु ।
सुग्रीव श्रीरामा सांगतु । हर्षयुक्त स्वानंदें ॥ ७३ ॥
अति सज्ञान हनुमंतु । तेणें चालतां केला सेतु ।
आमचा पाहें पां पुरूषार्थु । बांधू सेतु अति शीघ्र ॥ ७४ ॥
आजि माझें कौतुक पाहें । सेतु बांधीन लवलाहें ।
म्हणोनि आफळोनि बाहे । उडाला स्वयें शीघ्रत्वें ॥ ७५ ॥
श्रीरामासी सुखार्थ । पंचयोजन पर्वत ।
सुग्रीवें उपटोनि त्वरित । समुद्रांत निक्षेपी ॥ ७६ ॥
अर्धयोजन महाथोर । विंध्याद्रीचे दीर्घ शिखर ।
सुषेणें उपटोनि थोर । समुद्रीं गिरिवर निक्षेपी ॥ ७७ ॥
नीळें मलयाद्रिशिखर । बळें उपटिलें महाथोर ।
त्यावरी वृक्ष शरसहस्त्र । टाकिले सत्वर सागरीं ॥ ७८ ॥
चंदनवृक्षेंसीं गिरिवर । सुगंधपुष्प तरूवर ।
मैंद व्दिविद दोघे वीर । समुद्रीं शीघ्र टाकिती ॥ ७९ ॥
गज गवाक्ष गवययुक्त । शरभ गंधमादन अद्‍भुत ।
पांच जण पांच पर्वत । समुद्रांत निक्षेपिती ॥ ८० ॥
आणिकही वानरवीर । पर्वत आणिती थोर थोर ।
सेतु बांधावया सत्वर । गिरी वानर वर्षता ॥ ८१ ॥
वानरें अति उल्लासीं । सेतुबंधन दुसरे दिवसीं ।
सव्वीस योजनें नेमेसीं । श्रीरामापासीं सांगती ॥ ८२ ॥
तंव जाला अस्तमान । परतले ते वानरगण ।
रामापासीं येवोनि जाण । आंगवण सांगती ॥ ८३ ॥

हनुमंताचा विक्रम :

साटोपें बोलती वानर । आम्हीं आणिले पर्वत थोर ।
एक म्हणती थोर थोर । आम्हीं गिरिवर आणिले ॥ ८४ ॥
एक म्हणती न बोला वृथा । नामें लिहिलीं पर्वतमाथां ।
तें तें पाहोनि श्रीरघुनाथा । कपिपुरूषार्था वानावें ॥ ८५ ॥
एक साटोपें सांगती गोष्टी । आणिल्या पर्वतांच्या कोटी ।
स्वामीनीं येवोनि उठाउठीं । सेतु निजदृष्टीं पहावा ॥ ८६ ॥
व्यर्थ कां बोला पुरूषार्थ । जाणतो सर्वज्ञ श्रीरघुनाथ ।
सुग्रीवें सांगोनि वृत्तांत । कपिउक्त स्वयें परिसे ॥ ८७ ॥
सवेग आणितां पर्वत । वानर कष्टले समस्त ।
कोणासी जाणवेना तो अर्थ । निद्राभिभूत कपिकुळें ॥ ८८ ॥
कोणा नुघडवे दृष्टी । कायशा जागरणाच्या गोष्टी ।
वानर निजले कोट्यनुकोटी । शिळांसंपुष्टीं सुषुप्त ॥ ८९ ॥
चाळीस योजनें संख्यागोष्टी । वानरीं बांधिला सेतु संकटीं ।
पुढें उरला योजनें साठी । सहसा कांठी पावेना ॥ ९० ॥
श्रीरामांचें मनोगत । जाणोनियां हनुमंत ।
दडोनि राहिलासे तेथ । व्हावया प्रभात पहातसे ॥ ९१ ॥
कायसी सेतुबंधसांकडी । बांधीन न लागतां अर्ध घडी ।
परी सूर्योदयाचें सांकडी । देवोनि दडी राहिलासे ॥ ९२ ॥
अरूणोदय होतां प्राप्त । सवेग उठोनि हनुमंत ।
पूर्वाण्हिक क्रिया करोनि तेथ । सेतुबंधनार्थ उडाला ॥ ९३ ॥
न पुसता श्रीरामासी । कळों न देतां वानरांसी ।
न पुसतां सुग्रींवासी । अति वेगेंसी उडाला ॥ ९४ ॥
पुढे गेला रे हनुमंत । एकोनि वानर समस्त ।
पूर्वाण्हिकें करोनि तेथ । शीघ्र धांवत दशदिशा ॥ ९५ ॥
महावीर हनुमंत । उपटोनि पर्वत समस्त ।
एकैक योजन संख्या सप्त । घेऊनि येत उल्लासें ॥ ९६ ॥
दोन पर्वत दोहीं हातीं । दोन दोहीं काखेंप्रतीं ।
एक मस्तकीं स्वामीकार्यार्थीं । पुच्छावर्ती पैं एक ॥ ९७ ॥
एक पर्वत हनुवटीतळीं । आकळोनि महाबळी ।
गात नाचत नाममेळी । सेतुजवळीं स्वयें आला ॥ ९८ ॥
घेवोनियां सप्त पर्वत । येता देखोनि हनुमंत ।
श्रीरामा जाला अति विस्मित । बळें अद्‍भुत मारूती ॥ ९९ ॥
प्रभातीं नळें आवेश धरोन । सेतु बांधिला एक योजन ।
सप्तपर्वतेंसीं संपूर्ण । आलें उड्डाण हनुमंताचें ॥ १०० ॥

सात योजनांचे सात पर्वत आणून एकूणपन्नास योजने
एकट्याने काम केले ते पाहून सर्वांना परमाश्चर्य :

पर्वत टाकितां उद्भट । ध्वनि उठला कडकडाट ।
सागर गर्जे घडघडाट । नांदे वैकुंठ कोंदलें ॥ १०१ ॥
पर्वत सांडितां सागरी । नादें कोंदला कैलासगिरी ।
ध्यान सांडोनि ते अवसरीं । पाहे बाहेरी नीलकंठ ॥ १०२ ॥
समुद्रीं पाषाण तारित । देखोनि श्रीरामचंद्राचा सेत ।
हरिखें सदाशिवा डुल्लत । श्रीरघुनाथ परब्रह्म ॥ १०३ ॥
सप्त पर्वतीं समस्त । हनुमंतें सिद्धि नेला सेत ।
आला रावणासी अंत । शिव सांगत शिवेसी ॥ १०४ ॥
पर्वत सांडितां सिंधूसीं । जळ उसळलें आकाशीं ।
भिजवोनियां ध्रुवमंडळासी । सत्यलोकासी आदळलें ॥ १०५ ॥
बाप बळिया हनुमंत । स्वर्ग केला सचैल स्नात ।
देवां देतसे प्रायश्चित । आलें हास्य सुरवरा ॥ १०६ ॥
रावणबंदी देव निर्मुक्त । सोडविले पैं समस्त ।
अवश्य पाहिजे प्रायश्चित । सचैल स्नान हनुमंत करवी ॥ १०७ ॥
घालितां सप्त पर्वत पूर्ण । एकुणपन्नास योजन ।
हनुमंते केलें सेतुबंधन । विस्मित मनें विरींचि ॥ १०८ ॥

राहिलेले दहा योजन सेतू बांधून पूर्ण केला :

विस्मय करिती सुरवर । विस्मय करिती ऋषीश्वर ।
विस्मय करिती नरवानर । श्रीराम सौमित्र विस्मित ॥ १०९ ॥
आतुर्बळी हनुमंत । देवदुंदुभि स्वर्गीं गाजत ।
सुर सुमनें वर्षत । नृत्यान्वित अप्सरा ॥ ११० ॥
तंतीवीणास्वरयुक्त । स्वर्गांगना नृत्य करित ।
हर्षें वानर नाचत । सेतु समास श्रीरामें ॥ १११ ॥
तृतीय दिवसाचा वृत्तांत । सुग्रीव श्रीरामा सांगत ।
तुझा निजभक्त हनुमंते । सेतु समाप्त त्याचेनि ॥ ११२ ॥
आमचा वाढवावया सन्मान । राखिला दशयोजनें न्यून ।
एर्‍हवीं करिता संपूर्ण । अर्ध क्षण न लागतां ॥ ११३ ॥
वानरीं आणोनियां पर्वत । दशयोजनें उर्वरित ।
नळ स्वानंदे सेतु बांधित । हर्षयुक्त वानर ॥ ११४ ॥
एकोणपन्नास योजनें सेतु । भरोनि गेला हनुमंतु ।
दश योजनें उर्वरीतु । नळ बांधितु पुढारां ॥ ११५ ॥
तंव नळासी सांगिजे वानरीं । हनुम्यानें बांधिला जैशा परी ।
त्यासमान अवघा करीं । धरोनि दोरी कपि पाहती ॥ ११६ ॥
हनुमंताचे क्रियेसम । तुझी क्रिया दिसे विषम ।
बराबर करीं समान सम । त्यांसीं सम करविती ॥ ११७ ॥
बांधिला बांधिला सेतु समग्र । सिंहानुवादें गर्जे अंबर ।
स्वर्गीं गर्जती सुरवर । सेतु समग्र बांधिला ॥ ११८ ॥
समुद्रीं सेतु अति दुर्धर । वानरीं बांधिलो समग्र ।
स्वयें बोलती ऋषीश्वर । थोर थोर देवऋषी ॥ ११९ ॥
वानरवीर कोट्यनुकोटी । पर्वत आणिती उठाउठीं ।
त्यांतें वारिती कपि जेठी । सेतु परतटीं पावला ॥ १२० ॥

सेतुबंधन पूर्ण झाले म्हणून भेरींचा निनाद व निशाणे फडकाविली :

सेतु सिद्ध जाला संपूर्ण । कटकीं त्राहाटिलें निशाण ।
तें ऐकोनि वानरगण । टाकिती पाषाण पर्वत ॥ १२१ ॥
पर्वत पाषाणांच्या हारी । वानरीं टाकिल्या धरेवरी ।
सेतुबंधन यात्रेकरी । अद्द्यापवरी देखिजेती ॥ १२२ ॥
रूंदी संख्या दशयोजन । लांबी समग्र शतयोजन ।
नळें केलें सेतुबंधन । श्रीरघुनंदनप्रतापें ॥ १२३ ॥
सेतुबंधना मूळ मलयाद्री । तेथोनि लंकामूळवरी ।
नळें बांधिला बरव्यापरीं । मंदारगिरिसमप्रभ ॥ १२४ ॥
सेतु पावले परतटीं । रामनामें वानरकोटी ।
गजगर्जोनि नाचती सृष्टीं । न समाती पोटीं नभाच्या ॥ १२५ ॥
येरयेरांवरी किराण । हर्षे नाचती वानरगण ।
श्रीरामापुढें येवोनि जाण । लोटांगण घालिती ॥ १२६ ॥
येरयेरांते गुदगुली । येरयेरांतें वांकुली ।
श्रीराम आमची माउली । संतोषली सेतुबंधें ॥ १२७ ॥
सेतु जाला समाप्त । वानरवीर हरिखें गर्जत ।
श्रीरामापासीं आले समस्त । हर्षोन्मत्त स्वानंदें ॥ १२८ ॥
समुद्रीं सेतुबंधनस्थिती । देखोनि सुरवर बोलती ।
श्रीरामाची अगाध कीर्ति । त्रिजगतीं विस्तारली ॥ १२९ ॥
सेतु पावतां समाप्ती । नळें येवोनि शीघ्रगतीं ।
नमस्कारिला श्रीरघुपती । श्रीरामें अति प्रीतीं आलिंगिला ॥ १३० ॥
आलिंगोनि सुखसमेळीं । पाठी थापटी वेळोवेळीं ।
तंव वानरीं पिटिली टाळी । दिधली आरोळी अंगदें ॥ १३१ ॥

अंगदाचा हर्ष व प्रतिज्ञा :

सिद्धि पावलें सेतुबंधन । कायसें बापुडें रावण ।
इंद्रजित आणि कुंभकर्ण । निर्दळण राक्षसां ॥ १३२ ॥
नरांतक सुरांतक । अतिकायादि कुमर अनेक ।
रणीं मारीन एक एक । युद्धीं सन्मुख दशमुखा ॥ १३३ ॥
महोदर प्रहस्त जाण । महापार्श्व शुक सारण ।
रणीं देखतां दशानन । करीन कंदन प्रधानां ॥ १३४ ॥
निर्दाळोनि लंकानाथा । अर्धक्षणें श्रीरघुनाथा ।
तुझी आणीन मी सीता । उल्लांसतां गर्जत ॥ १३५ ॥
मज म्हणों नको लेंकरू । मी तंव वाळीचा कुमरू ।
करीन सीतेचा उद्धारू । दशकंधरू वधोनि ॥ १३६ ॥
आडवा होता जंव सागर । तंव विरालें होते वानर वीर ।
आतां घ्यावया लंकापुर । अति सत्वरा उपरमती ॥ १३७ ॥
अवघे मिळोनि मर्कट । छेदावया दशकंठ ।
तुझीच पाहती वाट । भट उद्भट वानरं ॥ १३८ ॥

सर्व वानरसैन्यांचा आवेश :

सेतु पावला लंकामूळीं । वानरीं पिटिली टाळी ।
नामें गर्जतीं आतुर्बळीं । सुखसमेळीं नाचती ॥ १३९ ॥
रामनामाचा गजर । वानरीं केला भुभुःकार ।
देवीं करोनी जयजयकार । सुमनसंभार वर्षती ॥ १४० ॥
एकाजनार्दना शरण । सिद्धि पावलें सेतुबंधन ।
पुढें गोड निरूपण । श्रीरामगमन लंकेसीं ॥ १४१ ॥
नाबदेचा पडिवाड । जों जों चाखिजे तों तों गोड ।
तैसे रामायणी कथागोड । सुखसुरवाड स्वानंदें ॥ १४२ ॥

स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडें एकाकारटीकायां
सेतुबंधन समाप्तिर्नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥ ४० ॥
॥ ओव्यां १४२ ॥ श्लोक ३७ ॥ एवं संख्या १७९ ॥



GO TOP