वालिना श्रीरामस्य भर्त्सनम् -
|
वालीचे श्रीरामचंद्रांना फटकारणे -
|
ततः शरेणाभिहतो रामेण रणकर्कशः । पपात सहसा वाली निकृत्त इव पादपः ॥ १ ॥
|
युद्धात कठोरता दाखविणारा वाली रामांच्या बाणाने घायाळ होऊन तोडून टाकलेल्या वृक्षाप्रमाणे एकाएकी पृथ्वीवर कोसळला. ॥१॥
|
स भूमौ न्यस्तसर्वाङ्गमस्तप्तकाञ्चनभूषणः । अपतद्देवराजस्य मुक्तरश्मिरिव ध्वजः ॥ २ ॥
|
त्याचे शरीर पडले होते. तापविलेल्या सुवर्णाची आभूषणे अद्यापही त्याची शोभा वाढवत होती. तो देवराज इंद्राच्या बंधनरहित ध्वजाप्रमाणे पृथ्वीवर पडलेला होता. ॥२॥
|
तस्मिन्निपतिते भूमौ वानराणां गणेश्वरे । नष्टचंद्रमिव व्योम न व्यराजत भूतलम् ॥ ३ ॥
|
वानरे आणि अस्वले यांचे यूथपति असलेले वाली धराशायी झाल्यावर ही पृथ्वीवर चंद्ररहित आकाशाप्रमाणे शोभाहीन बनून गेली. ॥३॥
|
भूमौ निपतितस्यापि तस्य देहं महात्मनः । न श्रीर्जहाति न प्राणा न तेजो न पराक्रमः ॥ ४ ॥
|
पृथ्वीवर पडलेला असूनही महात्मा वालीच्या शरीरास शोभा, प्राण, तेज आणि पराक्रम सोडू शकले नव्हते. ॥४॥
|
शक्रदत्ता वरा माला काञ्चनी वज्रभूषिता । दधार हरिमुख्यस्य प्राणांस्तेजः श्रियं च सा ॥ ५ ॥
|
इंद्राने दिलेली रत्नजडित श्रेष्ठ सुवर्णमाला त्या वानरराजाच्या प्राण, तेज आणि शोभेला धारण करून राहिली होती. ॥५॥
|
स तया मालया वीरो हैमया हरियूथपः । संध्यानुगतपर्यंतः पयोधर इवाभवत् ॥ ६ ॥
|
त्या सुवर्णमालेने विभूषित झालेले वानरयूथपति वीर वाली संध्येच्या लालीने रंगलेल्या प्रांत भागातील मेघरवण्डाप्रमाणे शोभा प्राप्त करीत होते. ॥६॥
|
तस्य माला च देहश्च मर्मघाती च यः शरः । त्रिधेव रचिता लक्ष्मीः पतितस्यापि शोभते ॥ ७ ॥
|
पृथ्वीवर पडलेले असूनही वालीची सुवर्णमाला, त्याचे शरीर तसेच मर्मस्थळ यास विदीर्ण करणारा तो बाण - हे तीन्ही पृथक् पृथक् तीन भागात विभक्त केल्या गेलेल्या अंगलक्ष्मी प्रमाणे शोभा प्राप्त करीत होते. ॥७॥
|
तदस्त्रं तस्य वीरस्य स्वर्गमार्गप्रभावनम् । रामबाणासनक्षिप्तं आवहत् परमां गतिम् ॥ ८ ॥
|
वीरवर रामांच्या धनुष्यातून सोडल्या गेलेल्या त्या अस्त्राने वालीसाठी स्वर्गाचा मार्ग प्रकाशित करून दिला आणि त्याला परमपदास पोहोचविले. ॥८॥
|
तं तथा पतितं सङ्ख्ये् गतार्चिषमिवानलम् । ययातिमिव पुण्यांते देवलोकात्परिच्युतम् ॥ ९ ॥
आदित्यमिव कालेन युगांते भुवि पातितम् । महेंद्रमिव दुर्धर्षं उपेंद्रमिव दुःसहम् ॥ १० ॥
महेंद्रपुत्रं पतितं वालिनं हेममालिनम् । व्यूढोरस्कं महाबाहुं दीप्तास्यं हरिलोचनम् ॥ ११ ॥
|
या प्रकारे युद्धस्थळी पडलेला इंद्रपुत्र वाली ज्वालारहित अग्निसमान, पुण्याचा क्षय झालेल्या पुण्यलोकातून या पृथ्वीवर पडलेल्या राजा ययाति प्रमाणे, तसेच महाप्रलय समयी काळद्वारा पृथ्वीवर पाडल्या गेलेल्या सूर्याप्रमाणे वाटत होता. त्याच्या गळ्यात सोन्याची माळा शोभून दिसत होती. तो महेंद्राप्रमाणे दुर्जय आणि भगवान् विष्णुसमान दुस्सह होता. त्याची छाती रूंद, भुजा मोठमोठ्या, मुख दीप्तिमान आणि नेत्र कपिल वर्णाचे होते. ॥९-११॥
|
लक्ष्मणानुगतो रामो ददर्शोपससर्प च । तं तथा पतितं वीरं गतार्चिषमिवानलम् ॥ १२ ॥
बहुमान्यं च तं वीरं वीक्षमाणं शनैरिव । उपयातौ महावीर्यौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १३ ॥
|
लक्ष्मणासहित रामांनी वालीला या अवस्थेत पाहिले आणि ते त्यांच्या समीप गेले. याप्रकारे ज्वालारहित अग्निप्रमाणे तेथे पडलेला तो वीर हळू हळू पहात होता. महापराक्रमी दोन्ही भाऊ राम आणि लक्ष्मण त्या वीराचा विशेष सन्मान करीत त्याच्या जवळ गेले. ॥१२-१३॥
|
तं दृष्ट्वा राघवं वाली लक्ष्मणं च महाबलम् । अब्रवीपरुषं वाक्यं प्रश्रितं धर्मसंहितम् ॥ १४ ॥
|
त्या श्रीराम तसेच महाबली लक्ष्मणास पाहून वाली धर्म आणि विनयाने युक्त कठोर वाणी बोलला- ॥१४॥
|
स भूमावल्पतेजोऽसुः निहतो नष्टचेतनः । अर्थसहितया वाचा गर्वितं रणगर्वितम् ॥ १५ ॥
|
आता त्याचा ठिकाणी तेज आणि प्राण अल्पमात्रेतच राहिलेले होते. तो बाणाने घायाळ होऊन पृथ्वीवर पडला होता. त्याची हालचाल हळू हळू लुप्त होत चालली होती आणि युद्धात गर्वयुक्त पराक्रम प्रकट करणार्या गर्वीष्ठ श्रीरामास कठोर वाणीमध्ये वाली या प्रकारे म्हणाला- ॥१५॥
|
त्वं नराधिपतेः पुत्रः प्रथितः प्रियदर्शनः । पराङ्मुाखवधं कृत्वा को नु प्राप्तस्त्वया गुणः । यदहं युद्धसंरब्धः त्वत्कृते निधनं गतः ॥ १६ ॥
|
’रघुनंदना ! आपण राजा दशरथांचे सुविख्यात पुत्र आहात. आपले दर्शन सर्वांना प्रिय आहे. मी आपल्याशी युद्ध करण्यासाठी आलो नव्हतो. मी तर दुसर्याशी युद्ध करण्यात गुंतलो होतो. अशा स्थितीत माझा वध करून येथे कुठला गुण प्राप्त केला आहे, कुठले महान् यश मिळविले आहेत ? कारण मी युद्धासाठी दुसर्यावर रोष प्रकट करीत होतो परंतु आपल्यामुळे मध्येच मृत्युला प्राप्त झालो आहे. ॥१६॥
|
.कुलीनः सत्त्वसंपन्नस्तेजस्वी चरितव्रतः । रामः करुणवेदी च प्रजानां च हिते रतः ॥ १७ ॥
सानुक्रोशो जितोत्साहः समयज्ञो दृढव्रतः । इति ते सर्वभूतानि कथयंति यशो भुवि ॥ १८ ॥
|
’या भूतलावर सर्व प्राणी आपल्या यशाचे वर्णंन करीत म्हणतात की राम कुलीन, सत्वगुणसंपन्न, तेजस्वी, उत्तम व्रताचे आचरण करणारे, प्रजेचे हितैषी, दयाळू, महान्, उत्साही, समयोचित कार्य, तसेच सदाचाराचे ज्ञाता आणि दृढप्रतिज्ञ आहेत. ॥१७-१८॥
|
दमः शमः क्षमा धर्मो धृतिः सत्यं पराक्रमः । पार्थिवानां गुणा राजन् दण्डश्चाप्यपराधिषु ॥ १९ ॥
|
’राजन् ! इंद्रिय निग्रह, मनाचा संयम, क्षमा, धर्म, धैर्य, सत्य, पराक्रम तसेच अपराध्यांना दण्ड देणे- हे राजाचे गुण आहेत. ॥१९॥
|
तान् गुणान् संप्रधार्याहमग्र्यं चाभिजनं तव । तारया प्रतिषिद्धो ऽपि सुग्रीवेण समागतः ॥ २० ॥
|
’मी आपल्या या सर्व सद्गुणांवर विश्वास करून, आपल्या उत्तम कुळाची आठवण ठेवून, तारेने अडविण्याचा प्रयत्न केला असताही सुग्रीवाशी लढण्यासाठी आलो. ॥२०॥
|
न मामन्येन संरब्धं प्रमत्तं योद्धुमर्हति । इति मे बुद्धिरुत्पन्ना बभूवादर्शने तव ॥ २१ ॥
|
जो पर्यंत मी आपल्याला पाहिले नव्हते तोपर्यंत माझ्या मनात हाच विचार उठत होता की, दुसर्याबरोबर रोषपूर्वक झुंजत असलेल्या मला आपण असावधान अवस्थेत आपल्या बाणांनी वेधणे उचित समजणार नाही. ॥२१॥
|
न त्वां विनिहतात्मानं धर्मध्वजमधार्मिकम् । जाने पापसमाचारं तृणैः कूपमिवावृतम् ॥ २२ ॥
|
’परंतु आज मला कळून आले आहे की आपली बुद्धि विपरीत झाली आहे, आपण धर्मध्वजी आहात. देखाव्यासाठी धर्माचा अंगरखा धारण केलेला आहे; वास्तविक अधर्मी आहात. आपला आचार- व्यवहार पापपूर्ण आहे. आपण गवताने झाकलेल्या कूपाप्रमाणे धोका देणारे आहात. ॥२२॥
|
सतां वेषधरं पापं प्रच्छन्नमिव पावकम् । नाहं त्वामभिजानामि धर्मच्छद्माभिसंवृतम् ॥ २३ ॥
|
’आपण साधु पुरुषांसारखा वेष धारण केलेला आहे पण आहात पापी. राखेने झाकलेल्या अग्निप्रमाणे आपले खरे रूप साधु वेषात लपून गेलेले आहे. आपण लोकांना फसविण्यासाठीच धर्माचा आडोसा घेतला आहे हे मी जाणत नव्हतो. ॥२३॥
|
विषये वा पुरे वा ते यदा नापकरोम्यहम् । न च त्वामवजाने च कस्मात्त्वं हंस्यकिल्बिषम् ॥ २४ ॥
|
’जेव्हा मी आपल्या राज्यात अथवा नगरात काहीही उपद्रव करीत नव्हतो तसेच आपला तिरस्कारही करीत नव्हतो, तेव्हा आपण मला निरपराध्यास का मारलेत ? ॥२४॥
|
फलमूलाशनं नित्यं वानरं वनगोचरम् । मामिहाप्रतियुद्ध्यंतमन्येन च समागतम् ॥ २५ ॥
|
’मी सदा फळ-मूळाचे भोजन करणारा आहे आणि वनातच विचरण करणारा वानर आहे. मी येथे आपल्याशी युद्ध करीत नव्हतो; दुसर्याशी माझी लढाई होत होती. मग अपराधाशिवाय आपण मला का मारलेत ? ॥२५॥
|
त्वं नराधिपतेः पुत्रः प्रतीतः प्रियदर्शनः । लिङ्गममप्यस्ति ते राजन् दृश्यते धर्मसंहितम् ॥ २६ ॥
|
’राजन ! आपण एका सन्माननीय नरेशाचे पुत्र आहात. विश्वासयोग्य आहात आणि दिसण्यातही प्रिय आहात. आपल्यात धर्माचे साधनभूत चिन्ह जटा वल्कल धारण इत्यादि प्रत्यक्ष दिसून येत आहे. ॥२६॥
|
कः क्षत्रियकुले जातः श्रुतवान्नष्टसंशयः । धर्मलिङ्गिप्रतिच्छन्नः क्रूरं कर्म समाचरेत् ॥ २७ ॥
|
’क्षत्रियकुळात उत्पन्न शास्त्राचे ज्ञाता, संशयरहित तसेच धार्मिक वेष-भूषेने आच्छन्न होऊनही कोण मनुष्य असे क्रूरतापूर्ण कर्म करू शकेल ? ॥२७॥
|
राम राजकुले जातो धर्मवानिति विश्रुतः । अभव्यो भव्यरूपेण किमर्थं परिधावसि ॥ २८ ॥
|
’महाराज ! रघुच्या कुळात आपला प्रादुर्भाव झाला आहे. आपण धर्मात्म्याच्या रूपाने प्रसिद्ध आहात तरीही इतके क्रूर निघालात ! जर हेच आपले खरे रूप आहे तर मग कशासाठी वरून आपण भव्य, विनीत आणि दयाळू साधु पुरुषासारखे रूप धारण करून चोहो बाजूस धावत- पळत आहात ? ॥२८॥
|
साम दानं क्षमा धर्मः सत्यं धृतिपराक्रमौ । पार्थिवानां गुणा राजन् दणऽडश्चाप्यपराधिषु ॥ २९ ॥
|
’राजन ! साम, दान, क्षमा, धर्म, सत्य, धृति, पराक्रम आणि अपराध्यांना दंड देणे- हे भूपालांचे गुण आहेत. ॥२९॥
|
वयं वनचरा राम मृगा मूलफलाशनाः । एषा प्रकृतिरस्माकं पुरुषस्त्वं नरेश्वरः ॥ ३० ॥
|
’नरेश्वर राम ! आम्ही फळे- मुळे खाणारे वनचारी मृग आहोत. हीच आमची प्रकृती आहे. परंतु आपण तर पुरुष (मनुष्य) आहात. (म्हणून आमच्यात आणि आपल्यात वैराचे काहीही कारण नाही). ॥३०॥
|
भूमिर्हिरण्यं रूप्यं च विग्रहे कारणानि च । अत्र कस्ते वने लोभो मदीयेषु फलेषु वा ॥ ३१ ॥
|
’पृथ्वी, सोने , चांदी - या वस्तूंसाठीच राजांमध्ये परस्परात युद्धे होत असतात. हीच तीन कलहाची मूळ कारणे आहेत. परंतु येथे तर तीही नाहीत. या दिशेला, या वनात अथवा आमच्या फळात आपला काय लोभ असू शकतो ? ॥३१॥
|
नयश्च विनयश्चोभौ निग्रहानुग्रहावपि । राजवृत्तिरसङ्कीयर्णा न नृपाः कामवृत्तयः ॥ ३२ ॥
|
’नीति आणि विनय, दण्ड आणि अनुग्रह - ह राजधर्म आहेत. परंतु त्यांच्या उपयोगासाठी भिन्न भिन्न अवसर आहेत. (त्यांचा अविवेकाने उपयोग करणे उचित नाही.) राजे लोकांनी स्वेच्छाचारी होता कामा नये. ॥३२॥
|
त्वं तु कामप्रधानश्च कोपनश्चानवस्थितः । राजवृत्तैश्च सङ्कीसर्णः शरासनपरायणः ॥ ३३ ॥
|
परंतु आपण तर कामाचे गुलाम, क्रोधी आणि मर्यादेमध्ये स्थित न राहाणारे- चञ्चल आहात. नय- विनय आदि जे राजांचे धर्म आहेत, त्यांच्या अवसराचा विचार न करतांच कशाचाही कुठेही प्रयोग करता आहात; कुठेही बाण चालवत हिंडता फिरता आहात. ॥३३॥
|
न ते ऽस्त्यपचितिर्धर्मे नार्थे बुद्धिरवस्थिता । इंद्रियैः कामवृत्तः सन् कृष्यसे मनुजेश्वर ॥ ३४ ॥
|
’आपल्याला धर्माविषयी आदर नाही अथवा अर्थ साधनातही आपली बुद्धि नाही. नरेश्वर ! आपण स्वेच्छाचारी आहात. म्हणून आपली इंद्रिये आपल्याला कोठेही खेचून घेऊन जात आहेत. ॥३४॥
|
हत्वा बाणेन काकुत्स्थ मामिहानपराधिनम् । किं वक्ष्यसि सतां मध्ये कर्म कृत्वा जुगुप्सितम् ॥ ३५ ॥
|
’काकुत्स्थ ! मी सर्वथा निरपराधी होतो तरीही येथे मला बाणाने मारण्याचे घृणित कर्म करून सत्पुरुषांमध्ये आपण काय सांगाल ? ॥३५॥
|
राजहा ब्रह्महा गोघ्नश्चोरः प्राणिवधे रतः । नास्तिकः परिवेत्ता च सर्वे निरयगामिनः ॥ ३६ ॥
|
’राजाचा वध करणारा, ब्रह्महत्यारा, गोघाती, चोर, प्राण्यांच्या हिंसेमध्ये तत्पर राहाणारा, नास्तिक आणि परिवेक्त (मोठा भाऊ अविवाहित असता आपला विवाह करणारा लहान भाऊ) हे सर्वच्या सर्व नरकगामी होतात. ॥३६॥
|
सूचकश्च कदर्यश्च मित्रघ्नो गुरुतल्पगः । लोकं पापात्मनामेते गच्छंते नात्र संशयः ॥ ३७ ॥
|
’चहाडी करणारा, लोभी, मित्र-हत्यारा, तसेच गुरूपत्नीगामी - हे पापात्म्यांच्या लोकात जातात - यात संशय नाही. ॥३७॥
|
अधार्यं चर्म मे सद्भीर रोमाण्यस्थि च वर्जितम् । अभक्ष्याणि च मांसानि त्वद्विधैर्धर्मचारिभिः ॥ ३८ ॥
|
’आमचे वानरांचे चामडे सुद्धा सत्पुरुषांची धारण करण्यायोग्य असत नाही. आमचे रोम आणि हाडेसुद्धा वर्जित आहेत (स्पर्शकरण्या योग्य नाहीत) आपल्या सारख्या धर्माचारी पुरुषांसाठी मांस तर सदा अभक्ष्य आहे मग कुठल्या लोभाने आपण मला वानराला आपल्या बाणांची शिकार बनविले आहेत ? ॥३८॥
|
पञ्च पञ्चनखा भक्ष्या ब्रह्मक्षत्रेण राघव । शल्यकः श्वाविधो गोधा शशः कूर्मश्च पञ्चमः ॥ ३९ ॥
|
’राघवा ! त्रैवर्णिकात ज्यांची काही कारणाने मांसाहार करण्याची प्रवृत्ती झाली आहे. (निंदनीय कर्म करण्याची प्रवृत्ती झाली आहे) त्यांच्या साठीही पाच नखे असणार्या जीवांपैकी पाचच भक्षणयोग्य सांगितली गेली आहेत. त्याची नावे याप्रकारे आहेत. गेंडा, घोरपड, साळिंदर, ससा आणि कासव. ॥३९॥
|
चर्म चास्थि च मे राजन् न स्पृशंति मनीषिणः । अभक्ष्याणि च मांसानि सो ऽहं पञ्चनखो हतः ॥ ४० ॥
|
’श्रीराम ! मनीषी पुरुष माझ्या (वानराच्या) चामडे आणि हाडे यांना स्पर्श करीत नाहीत. वानराचे मांसही सर्वांसाठी अभक्ष्य आहे. याप्रकारे ज्यांचे सर्व काही निषिद्ध आहे असा पाच नखे असणारा मी आज आपल्या हाताने मारला गेलो आहे. ॥४०॥
|
तारया वाक्यमुक्तो ऽहं सत्यं सर्वज्ञया हितम् । तदतिक्रम्य मोहेन कालस्य वशमागतः ॥ ४१ ॥
|
’माझी स्त्री तारा सर्वज्ञ आहे, तिने मला सत्य आणि हिताची गोष्ट सांगितली होती. परंतु मोहवश तिचे उल्लंघन करून मी काळाच्या अधीन झालो आहे. ॥४१॥
|
त्वया नाथेन काकुत्स्थ न सनाथा वसुंधरा । प्रमदा शीलसंपन्ना धूर्तेन पतिना यथा ॥ ४२ ॥
|
’काकुत्स्थ ! ज्याप्रमाणे सुशील युवती पापात्मा पतीकडून सुरक्षित होऊ शकत नाही, त्याच प्रकारे आपल्या सारख्या स्वामीची प्राप्ती झाली असता ही वसुधा सनाथ होऊ शकत नाही. ॥४२॥
|
शठो नैकृतिकः क्षुद्रो मिथ्याप्रश्रितमानसः । कथं दशरथेन त्वं जातः पापो महात्मना ॥ ४३ ॥
|
’आपण शठ (लपून राहून दुसर्याचे अहित करणारे), अपकारी, क्षुद्र आणि खोटेच शान्तचित्त बनून राहाणारे आहात. महात्मा राजा दशरथांनी आपल्या सारख्या पाप्याला कसे उत्पन्न केले ? ॥४३॥
|
छिन्नचारित्रकक्ष्येण सतां धर्मातिवर्तिना । त्यक्तधर्माङ्कुमशेनाहं निहतो रामहस्तिना ॥ ४४ ॥
|
’हाय ! ज्याने सदाचाराचा दोरखंड तोडून टाकला आहे, सत्पुरुषांचा धर्म आणि मर्यादेचे उल्लंघन केले आहे तसेच ज्यांनी धर्मरूपी अंकुशाची अवहेलना केली आहे, त्या रामरूपी हत्तीच्या द्वारे मी आज मारला गेलो. ॥४४॥
|
अशुभं चाप्ययुक्तं च सतां चैव विगर्हितम् । वक्ष्यसे चेदृशं कृत्वा सद्भिः सह समागतः ॥ ४५ ॥
|
’असे अशुभ, अनुचित आणि सत्पुरुषांच्या द्वारे निंदित कर्म करुन आपण श्रेष्ठ पुरुषांना भेटल्यावर त्यांच्या समोर काय सांगाल ? ॥४५॥
|
उदासीनेषु योऽस्मासु विक्रमस्ते प्रकाशितः । अपकारिषु तं राजन्नहि पश्यामि विक्रमम् ॥ ४६ ॥
|
’श्रीरामा ! आम्हा उदासीन प्राण्यांच्यावर आपण जो हा पराक्रम प्रकट केला आहे, असा बल- पराक्रम आपण आपला अपकार करणारांवर प्रकट करीत आहात असे मला दिसून येत नाही. ॥४६॥
|
दृश्यमानस्तु युध्येथा मया यदि नृपात्मज । अद्य वैवस्वतं देवं पश्येस्त्वं निहतो मया ॥ ४७ ॥
|
’राजकुमार ! जर आपण युद्धस्थळावर माझ्या दृष्टि समोर येऊन माझ्याशी युद्ध केले असते तर आज माझ्या द्वारे मारले जाऊन सूर्यपुत्र यमदेवतेचे दर्शन केले असते. ॥४७॥
|
त्वया ऽदृश्येन तु रणे निहतो ऽहं दुरासदः । प्रसुप्तः पन्नगेनेव नरः पापवशं गतः ॥ ४८ ॥
|
’ज्याप्रमाणे एखाद्या झोपलेल्या पुरुषाला साप अवश्य डसेल आणि तो मरून जावा त्याप्रमाणे रणभूमिमध्ये मला दुर्जय वीराला आपण लपून राहून मारले आहे तसेच असे करून आपण पापाचे भागी झाला आहात. ॥४८॥
|
सुग्रीवप्रियकामेन यदहं निहतस्त्वया । मामेव यदि पूर्वं त्वमेतदर्थमचोदयः । मैथिलीमहमेकाह्ना तव चानीतवान् भवेः ॥ ४९ ॥
|
’ज्या उद्देश्यास घेऊन सुग्रीवाचे प्रिय करण्याच्या कामनेने आपण माझा वध केला आहे, त्याच उद्देश्याच्या सिद्धिसाठी जर आपण प्रथम मला सांगितले असते तर मी मैथिली जानकीला एकाच दिवसात शोधून आपल्याजवळ आणून दिले असते. ॥४९॥
|
राक्षसं च दुरात्मानं तव भार्यापहारिणम् । कण्ठे बद्ध्वा प्रदद्यां ते निहतं रावणं रणे ॥ ५० ॥
|
’आपल्या पत्नीचे अपहरण करणार्या दुरात्मा राक्षस रावणस मी युद्धात न मारताच त्याच्या गळ्यात दोरी बांधून पकडून आणले असते आणि त्याला आपल्या हवाली केले असते. ॥५०॥
|
न्यस्तां सागरतोये वा पाताले वापि मैथिलीम् । आनयेयं तवादेशाच्छ्वेतामश्वतरीमिव ॥ ५१ ॥
|
’ज्याप्रमाणे मधुकैटभ द्वारा अपह्रत झालेल्या श्वेताश्वतरी श्रुतीचा भगवान् हयग्रीवाने उध्दार केला होता, त्याच प्रकारे मी आपल्या आदेशाने मैथिली सीतेला जरी त्याने समुद्राच्या जलात वा पाताळात ठेवले असते तरीही मी तेथून आणून तुम्हास दिली असती. ॥५१॥
|
युक्तं यत् प्राप्नुयाद्राज्यं सुग्रीवः स्वर्गते मयि । अयुक्तं यदधर्मेण त्वयाहं निहतो रणे ॥ ५२ ॥
|
’मी स्वर्गवासी झाल्यावर सुग्रीव जे हे राज्य प्राप्त करील तर ते उचितच आहे. अनुचित इतकेच झाले आहे की आपण मला रणभूमीमध्ये अधर्म पूर्वक मारले आहे. ॥५२॥
|
काममेवंविधो लोकः कालेन विनियुज्यते । क्षमं चेद्भणवता प्राप्तमुत्तरं साधु चिंत्यताम् ॥ ५३ ॥
|
’हे जग कधी न कधी कालाच्या अधीन तर होतेच होते, याचा असा स्वभावच आहे, म्हणून भलेही माझा मृत्यु झाला; तर त्यासाठी मला खेद वाटत नाही , परंतु माझे या प्रकारे मारले जाण्याचे जर उचित उत्तर आपण शोधून काढले असेल तर ते नीट उत्तम प्रकारे विचार करून मला सांगावे.’ ॥५३॥
|
इत्येवमुक्त्वा परिशुष्कवक्रः शराभिघाताद्व्यथितो महात्मा । समीक्ष्य रामं रविसंनिकाशं तूष्णीं बभूवामरराजसूनुः ॥ ५४ ॥
|
असे म्हणून महामनस्वी वानरराजकुमार वाली सूर्यासमान तेजस्वी श्रीरामांकडे पाहात गप्प झाला. त्याचे तोंड कोरडे पडले होते आणि बाणाच्या आघाताने त्याला फार पीडा होत होती. ॥५४॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे सप्तदशः सर्गः ॥ १७ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सतरावा सर्ग पूरा झाला. ॥१७॥
|