॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अरण्यकाण्ड
॥ अध्याय तिसरा ॥
शरभंगऋषींचा उद्धार
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
हत्वा त तं भीमबलं विराधं राक्षसं वने ।
आश्रमं शरभंगस्य राघवौ तौ प्रजग्मतुः ॥ १ ॥
तस्य् देवप्रभावस्य तपसा भावितात्मनः ।
समीपे शरभंगस्य ददर्श महदद्भुतम् ॥ २ ॥
श्रीरामाचे शरभंगाश्रमात आगमन :
महाभयानक विराधु । त्याचा क्षणार्धे केला वधु ।
प्रतापें शोभती दोघें बंधु । परम आल्हादु सीतेसी ॥ १ ॥
मग तिघें जणें वेगेंसीं । निघालीं शरभंगाआश्रमासी ।
मार्ग क्रमितां दो कोशीं । त्या आश्रमासी देखिलें ॥ २ ॥
तैं शरभंग तपोराशी । तो न्यावया ब्रह्मलोकासी ।
ब्रह्मयाने धाडिलें इंद्रासी । विमानेंसीं हंसयुक्त ॥ ३ ॥
ब्रह्मदेवाचे विमान धाडले :
हंसयुक्त विमानंसी । बैसावया सामर्थ्य नाहीं इंद्रासी ।
पुढें घालोनि विमानासी । इंद्र रथेंसीं आश्रमा आला ॥ ४ ॥
जे विमानीं बैसवेना इंद्रासी । ते विमान धाडिलें शरभंगासी ।
शरभंगाची निष्ठा कैसी । ब्रह्ययादिकांसी निजपूज्य ॥ ५ ॥
इंद्रादिक देव समस्त । येवोनि त्या आश्रमाआंत ।
अवघे लोटांगणें घालित । मग विनीत शरभंगा ॥ ६ ॥
इंद्र प्रार्थीं मधुरवचनीं । आम्ही आलों ब्रह्माज्ञेकरोनी ।
बैसोनि हंसयुक्त विमानीं । ब्रह्मभुवनीं प्रवेशावें ॥ ७ ॥
तवं त्यासी शरभंग सांगत । या वना आला श्रीरघुनाथ ।
विराध वधोनियां निश्चित । आतांच येथ येईल ॥ ८ ॥
रामदर्शनापुढे सत्यलोकाची किंमत नाही :
न घेतां श्रीरामदर्शन । मज न लगे ब्रह्मसदन ।
तुम्हीं घेवोनि जावें विमान । मी येईन निजसत्ता ॥ ९ ॥
श्रीरामाच्या भेटीपुढे । ब्रह्मभुवन तें कायसें बापुडें ।
मज तेथें येणें न घडे । ब्रह्मयापुढें सांगावें ॥ १० ॥
ऐसें शरभंग बोलत । कर जोडोनि इंद्र ऐकत ।
तंव पातला श्रीरघुनाथ । तोही देखत इंद्रातें ॥ ११ ॥
विभ्राजमानं वपुषा सूर्यवैश्वानरप्रभम् ।
असंस्पृशंतं वसुधां ददर्श विबुधाधिपम॥ ३ ॥
सोलींव सूर्याची प्रभा । कीं तो अग्नीचा निजगाभा ।
तैशी इंद्राची अंगप्रभा । निजशोभा शोभत ॥ १२ ॥
धरा नातळोनि अधर । रथ शोभे वारु निचित्र ।
मस्तकीं चंद्रप्रभच्छत्र । युग्मचामर ढळताहे ॥ १३ ॥
देवगण मरुद्गण । इंद्रासवें सिद्ध चारण ।
सवें बृहस्पति गुरु सज्ञान । तिहीं रघुनंदन देखिला ॥ १४ ॥
सीता सौमित्र श्रीरघुनाथ । देखतां अवघे जाले खद्योत ।
श्रीरामप्रभा अत्यद्भुत । देखोनि विस्मित सुरसिद्ध ॥ १५ ॥
देखतांचि श्रीराघवा । सूर्यप्रकाशीं जैसा दिवा ।
तैशी दशा आली देवां । देवस्वभावा लाजिले ॥ १६ ॥
तिहीं देखोनि श्रीरघुनाथ । सुख पावले अत्यद्भुत ।
नभीं जयजयकार करित । निघाले समस्त निजधामा ॥ १७ ॥
शरभंग सांगें देवांप्रती । ब्रह्मसदनीं पुनरावृत्ती ।
श्रीरामदर्शनें अक्षयप्राप्ती । तेंही ब्रह्ययाप्रति पुसा तुम्ही ॥ १८ ॥
श्रीराम देखतांचि दिठी । जन्ममरणा होय तुटी ।
खुंटली पुनरावृत्तीची गोठी । ऐसी सुखभेटी श्रीरामीं ॥ १९ ॥
इंद्रादि देवां उपेक्षून । ओसंडोनि ब्रह्मसदन ।
घ्यावया श्रीरामदर्शन । अति सज्ञान शरभंग ॥ २० ॥
श्रीरामांनी शरभंगांचे दर्शन घेतले :
ऐकोनि ऋषींचे वचन । इंद्रादि देव गेले निघोन ।
आश्रमा आला रघुनंदन । केले नमन शरभंगासी ॥ २१ ॥
तस्य पादौ च संगृह्य रामः सीता च लक्ष्मणः ।
निषेदुस्तदनुज्ञाता लब्धवासा निमंत्रिताः ॥ ४ ॥
श्रीरामें वंदिलें ऋषीचे चरण । सीता आणि लक्ष्मण ।
दोघी घातलें लोटांगण । सस्तकीं चरण वंदिले ॥ २२ ॥
ऋषीने दिधलें अलिंगन । मधुपर्कविधीनें पूजन ।
पूजोनियां श्रीरघुनंदन । सावधान बैसले ॥ २३ ॥
ततः शक्रोपयानं तु पर्यपृच्छत राघवः ।
शरभंगस्तु तत्सर्वं राघवान न्यवेदयत ॥ ५ ॥
अहं ज्ञात्वा नरश्रेष्ठ वर्तमानमदूरतः ।
ब्रह्मलोकं न गच्छमि त्वामदृष्ट्वा प्रियातिथिम् ॥६॥
अक्षया नरशार्दूल जिता लोका मया शुभाः ।
ब्रह्मचाश्च नाकपृष्ठ्याश्च प्रतिगृह्वीष्व मामकान् ॥ ७ ॥
शरभंगाकडून स्ववृत्त कथन :
श्रीराम पुसे ऋषीप्रती । इंद्रादिक देवपंक्तीं ।
आले होतें आश्रमाप्रती । कोणे अर्थी ऋषिवर्या ॥ २४ ॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । शरभंग विस्मयापन्न ।
न करितां जप तप ध्यान । दिव्यदर्शन श्रीराम देखे ॥ २५ ॥
दिव्यचक्षु श्रीरामाचे पोटीं । श्रीराम देखे अखिल सृष्टी ।
श्रीरामें दाटुगी ब्रह्मदृष्टी । देखोनियां पोटीं श्रीराम ॥ २६ ॥
वेदशास्त्रांचे निजवर्म । श्रीराम केवळ परब्रह्म ।
दीन तारावया वनोग्दम । विश्रामधाम श्रीराम ॥ २७ ॥
ऐसी श्रीरामाची कीर्ती । ते मज आली अति प्रतीती ।
ऋषि आपुली धर्मस्थिती । श्रीरामप्रती सांगत ॥ २८ ॥
म्यां साधिली जे जे प्राप्ती । अति दुस्तर ते जनांप्रती ।
त्या त्या धर्माची निजस्थिती । यथानिगुती सांगेन ॥ २९ ॥
साङ्ग अविकाळ कर्मे देख । म्यां आसाधिला पितृलोक ।
त्याचें न मानेच सुख । तो म्यां निःशेख त्यागिला ॥ ३० ॥
करोनि शत सोमयाग । म्यां साधिला स्वर्गभोग ।
तंव तो वाटे क्षयरोग । तोही म्यां साङ्ग उपेक्षिला ॥ ३१ ॥
महर्लोक जनलोक । आदिकरोनि तपोलोक ।
साधिल्या मज नव्हेचि सुख । ते म्यां निःशेख त्यागिले ॥ ३२ ॥
ब्राह्मणभक्ति सत्वव्रत । तेणें सत्यलोक प्राप्त ।
इंद्रादिदेव समस्त । मज न्यावया येथ स्वयें आलें ॥ ३३ ॥
हंसयुक्त निजविमान । स्वयें धाडी चतुरानन ।
परी तुझें देखोनि आगमन । म्यां ब्रह्मसदन त्यागिलें ॥ ३४ ॥
लोकलोकांतर प्राप्त । ऐसें पुण्य केलें अद्भुत ।
परी तें तुज अर्पिलें समस्त । श्रीरघुनाथ प्रीति पावो ॥ ३५ ॥
कर्म न करितां ब्रह्मार्पण । तरी तें वाढवी जन्ममरण ।
तुझे देखतां निजचरण । श्रीरामार्पण सर्व कर्में ॥ ३६ ॥
मज पूर्वी होती भ्रांती । जे पुण्यें होय ब्रह्मप्राप्ती ।
पुण्यपापक्षयाअंतीं । श्रीराममूर्ती तैं भेटे ॥ ३७ ॥
लोकलोकांतरपुण्यें देख । न तुटे दुःख नव्हेचि सुख ।
तुझें देखतांचि श्रीमुख । अलोलिक सुखप्राप्ति ॥ ३८ ॥
साच श्रीराम देखिल्या दृष्टीं । समूळ संसारासी होय तुटी ।
निष्काम पुण्याच्या कोटी । तैं तुझी भेटी श्रीरामा ॥ ३९ ॥
तुझे भेटीलागीं जाण । सांडिलें सत्यलोकगमन ।
जालिया श्रीरामदर्शन । समाधान जीवशिवां ॥ ४० ॥
श्रीरामांना सतीक्ष्णऋषीकडे जाण्याची शरभगांची सूचना :
देखतां श्रीराममूर्ति । सर्वैद्रियांनित्य विश्रांति ।
हे तंव माझी निजप्रतीति । सत्य निश्चितीं श्रीरामा ॥ ४१ ॥
ऐसी ऐकोनि ऋषिवचनोकित । संतोषला श्रीरघुपति ।
ऋषीची देखोनि अद्भुत शक्ति । स्वयें त्याप्रती पूसत ॥ ४२ ॥
दंडकारण्य महावन । ये वनवासीं निवासस्थान ।
कोठें म्यां करावें आपण । आज्ञापन मज देई ॥ ४३ ॥
शरभंग उवाच –
सुतीक्ष्णमभिगच्छ त्वं राम शीघ्रं तपस्विनम् ।
रमणीये वनोद्देशे स ते वासं विधास्यति ॥ ८ ॥
शरभंग म्हणे श्रीरामासी । येचि वनीं वनवासीं ।
सुतीक्ष्ण वसे महाऋषी । शीघ्र त्यापासीं तुम्ही जावें ॥ ४४ ॥
तो तुम्हासीं वनवासीं वस्ती । सांगेल पैं यथास्थिती ।
जेणें वासें श्रीरामकीर्ती । यश त्रिजगतीं वाढेल ॥ ४५ ॥
एष पंथा महाप्राज्ञ मुहूर्त स्थीयतामिह ।
यावज्जहामि गात्राणि जीर्णां त्वचामिवोरगः ॥ ९ ॥
शरभंग ऋषी श्रीरामांसमोर आत्मदहन करुन सत्य्लोकाला जातात :
येणेंचि पंथें महाप्राज्ञा । जावें सुतीक्ष्णऋषिदर्शना ।
परी कांहींएक असे विज्ञापना । ऐकें सर्वज्ञा श्रीरामा ॥ ४६ ॥
तुझें देखतांचि चरण । दृश्य द्रष्टा नाहीं दर्शन ।
खुंटलें भवभयाचें भान । गमनागमन मज नाहीं ॥ ४७ ॥
तरी प्रारब्ध बळी ये सृष्टीं । अनिर्वाच्य त्याची गोष्टी ।
तें मज येथें दाटोवाटी । नेतें उठाउठी सत्यलोकां ॥ ४८ ॥
माझे अदृष्ट देखानें । ब्रह्मयानें धाडिलें विमान ।
तें म्यां निवारिलें जाण । तुझें दर्शन घ्यावया ॥ ४९ ॥
तुजसीं जंव हाय भेटी । तंव प्रारब्धदेहाची गांठी ।
तुज देखतां जगजेठी । उठाउठीं देह पडेल ॥ ५० ॥
तुज देखतां सावधान । करुनि निजदेहाचें दहन ।
करीन सत्यलोका गमन । तंव आपण स्थिर व्हावें ॥ ५१ ॥
क्षणैक राहावें रघुपति । सर्प सांडी जैसी कांति ।
तैसी स्थूल देहाची निवृत्ति । करीन निश्चितीं श्रीरामा ॥ ५२ ॥
स्थूल देह होती जाती । परी पालटेना आत्मस्थिती ।
मग योगाग्नीं दाहोनि देहाकृती । जाईन निश्चितीं सत्यलोका ॥ ५३ ॥
तुझिया कृपें श्रीरघुनाथा । भय नाहीं जन्म धरितां ।
भय नाहीं कर्म करितां । देह मरतां भय नाहीं ॥ ५४ ॥
दोराअंगीं सर्प जन्मला । नांदोनियां स्वयें निमाला ।
त्यासी दोर नाहीं भ्याला । तैसा जाला देहसंग ॥ ५५ ॥
जैसी देहासवें मिथ्या छाया । तैसी मुक्तांसवें मिथ्या काया ।
राहिलीसे श्रीरघुराया । भोगावया अदृष्ट ॥ ५६ ॥
ऐसे बोलोनियां जाण । श्रीरामादेखतां आपण ।
शरभंगानें घालोनि आसन । केलें दहन योगाग्नियोगें ॥ ५७ ॥
स च पावकसंकाशः कुमारः समपद्यत ।
उत्थायाग्निचयात्तस्माच्छरभंगो व्यरोचत ॥ १० ॥
करितां योगाग्नीं देहदहन । सत्यलोक भोगायतन ।
कुमारदेह पावला आपण । देदीप्यमान तेजस्वी ॥ ५८ ॥
सत्यलोकमहिमा :
याज्ञिक साधिती स्वर्गभुवन । त्याहून याचं महत्व गहन ।
अश्वमेध राजसूययज्ञ । त्याहून गहन महिमा याची ॥ ५९ ॥
क्रमोनियां पितृस्थान । क्रमोनि स्वर्ग महर्जन ।
क्रमोनियां देवसदन । विराजमान सत्यलोकी ॥ ६० ॥
सत्यलोकीं शरभंगासी । श्रीरामकृपा फळली कैसी ।
तेथेंही देहबुद्धि नाहीं त्यासी । पूज्य सर्वांसी जरी जाला ॥ ६१ ॥
ब्रह्मयानें सन्मानितां त्यासी । श्लाघ्यता न धरी देहबुद्धीसी ।
श्रीरामकृपा फळली ऐसी । भोगी प्रारब्धासी विदेहत्वें ॥ ६२ ॥
करितां श्रीरामनास्मरण । बाधूं न शके देहबंन ।
ते देखिलिया श्रीरामचरण । देहीं विदेही आपण शरभंग ॥ ६३ ॥
दीन तारावया जाण । श्रीरामाचें वनप्रयाण ।
एकाजनार्दना शरण । जगदुद्धारण श्रीराम ॥ ६४ ॥
विदेहकैवल्याचें ताट । शरभंगासी केलें चोखट ।
सेवितां देशभाषा उच्छिष्ट । जालों अवचट शेषभागी ॥ ६५ ॥
परमामृत रामायण । तेथें भोक्ते वसिष्ठ वाल्मीक पूर्ण ।
त्यांचें उच्छिष्ट सेविता जाण । एकाजनार्दन विदेही ॥ ६६ ॥
इति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां शरभंगोद्धरणं नाम तृतीयोध्यायः ॥ ३ ॥ ॥ ओंव्या ६६ ॥ श्लोक १० ॥ एवं ७६ ॥
GO TOP
|