॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ अरण्यकाण्ड ॥ ॥ तृतीयः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] मुनिवर अगस्त्यांची भेट - श्रीमहादेव उवाच अथ रामः सुतीक्ष्णेन जानक्या लक्ष्मणेन च । अगस्त्यस्यानुजस्थानं मध्याह्ने समपद्यत ॥ १ ॥ श्रीमहादेव म्हणाले - पार्वती, त्यानंतर सुतीक्ष्ण, जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह राम मध्यान्हाच्या वेळी, अगस्त्याच्या धावा भावाच्या आश्रमस्थानात पोचले. (१) तेन सम्पूजितः सम्यग्भुक्त्वा मूलफलादिकम् । परेद्युः प्रातरुत्थाय जग्मुस्तेऽगस्त्यमण्डलम् ॥ २ ॥ त्याचेकडून चांगल्या प्रकारे पूजा- सत्कार झाल्यावर त्यांनी मुळे, फळे इत्यादी खाल्ली. दुसरे दिवशी प्रातःकाळी उठून ते सर्वजण अगस्त्याच्या आश्रममंडलाकडे गेले. (२) सर्वर्तुफलपुष्पाढ्यं नानामृगगणैर्युतम् । पक्षिसङ्घैश्च विविधैर्नादितं नन्दनोपमम् ॥ ३ ॥ सर्व कऋतूतील फळे व फुले यांनी समृद्ध, नाना प्रकारच्या वन्य पशूंनी युक्त, आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या समूहांच्या कूजनाने निनादित असा तो आश्रम नंदनवनाप्रमाणे होता. (३) ब्रह्मर्षिभिर्देवर्षिभिः सेवितं मुनिमन्दिरैः । सर्वतोऽलंकृतं साक्षाद् ब्रह्मलोकमिवापरम् ॥ ४ ॥ ब्रह्मर्षी आणि देवर्षी यांच्याकडून सेवन केला गेलेला आणि सर्व बाजूंनी अन्य मुनींच्या आश्रमांनी मंडित झालेला तो आश्रम हा साक्षात दुसर्या ब्रह्मलोकाप्रमाणे होता. (४) बहिरेवाश्रमस्याथ स्थित्वा रामोऽब्रवीन्मुनिम् । सुतीक्ष्ण गच्छ त्वं शीघ्रमागतं मां निवेदय ॥ ५ ॥ अगस्त्यमुनिवर्याय सीतया लक्ष्मणेन च । महाप्रसाद इत्युक्त्वा सुतीक्ष्णः प्रययौ गुरोः ॥ ६ ॥ आश्रमं त्वरया तत्र ऋषिसङ्घसमावृतम् । उपविष्टं रामभक्तैर्विशेषेण समायुतम् ॥ ७ ॥ व्याख्यातराममंत्रार्थं शिष्येभ्यश्चातिभक्तितः । दृष्ट्वागस्त्यं मुनिश्रेष्ठं सुतीक्ष्णः प्रययौ मुनेः ॥ ८ ॥ दण्डवत्प्रणिपत्याह विनयावनतः सुधीः । रामो दाशरथिर्ब्रह्मन् सीतया लक्ष्मणेन च । आगतो दर्शनार्थं ते बहिस्तिष्ठति साञ्जलिः ॥ ९ ॥ जवळ पोचल्यानंतर आश्रमाच्या बाहेरच थांबून श्रीराम सुतीक्ष्ण मुनींना म्हणाले, "हे सुतीच्या, तुम्ही लवकर पुढे जा. आणि सीता व लक्ष्मण यांच्यासह मी आलो आहे, असे मुनिश्रेष्ठ अगस्त्यांना निवेदन करा. "मोठी तुमची कृपा" असे म्हणून सुतीक्षा त्वरेने गुरूंच्या आश्रमात गेले. तेथे ऋषि संघांनी युक्त, विशेषत: श्रीरामांच्या भक्तांसमवेत असलेल्या व आसनावर बसलेल्या, आणि अतिशय भक्तीने आपल्या शिष्यांना श्रीराममंत्राचे विवेचन करणार्या, मुनिश्रेष्ठ अगस्तींना पाहिल्यावर, सुतीक्ष्ण त्या मुनींच्या जवळ गेले, आणि त्यांना दंडवत प्रणाम करून, विनयाने नम्र झालेल्या बुद्धिमान सुतीक्ष्णांनी म्हटले "अहो गुरुवर्य, सीता व लक्ष्मण यांच्यासह दशरथकुमार श्रीराम हे तुमच्या दर्शनासाठी आले असून ते हात जोडून आश्रमाबाहेर उभे आहेत." (५-९) अगस्त्य उवाच शीघ्रमानय भद्रं ते रामं मम हृदिस्थितम् । तमेव ध्यायमानोऽहं काङ्क्षमाणोऽत्र संस्थितः ॥ १० ॥ अगस्ती म्हणाले - "वत्सा, तुझे कल्याण असो ! माझ्या हृदयात असणार्या श्रीरामांना तू आता लवकर घेऊन ये. त्यांच्या दर्शनाची इच्छा करीत व त्यांचेच ध्यान करीत मी येथे राहात आहे." १० इत्युक्त्वा स्वयमुत्थाय मुनिभिः सहितो द्रुतम् । अभ्यगात्परया भक्त्या गत्वा राममथाब्रवीत् ॥ ११ ॥ आगच्छ राम भद्रं ते दिष्ट्या तेऽद्य समागमः । प्रियातिथिर्मम प्राप्तोऽस्यद्य मे सफलं दिनम् ॥ १२ ॥ रामोऽपि मुनिमायान्तं दृष्ट्वा हर्षसमाकुलः । सीतया लक्ष्मणेनापि दण्डवत्पतितो भुवि ॥ १३ ॥ द्रुतमुत्थाप्य मुनिराड्राममालिङ्ग्य भक्तितः । तद्गात्रस्पर्शजाह्लादस्रवन्नेत्रजलाकुलः ॥ १४ ॥ गृहीत्वा करमेकेन करेण रघुनन्दनम् । जगाम स्वाश्रमं हृष्टो मनसा मुनिपुङ्गवः ॥ १५ ॥ सुखोपविष्टं सम्पूज्य पूजया बहुविस्तरम् । भोजयित्वा यथान्यायं भोज्यैर्वन्यैरनेकधा ॥ १६ ॥ असे सांगून, मुनींच्यासह ते स्वतःच चटदिशी उठून श्रीरामांकडे गेले, आणि अतिशय भक्तीने त्यांना म्हणाले. "हे श्रीरामा, या, तुमचे कल्याण असो ! आज तुमच्याशी भेट झाली ही फार सुदैवाची गोष्ट आहे. माझे प्रिय अतिथी म्हणून तुम्ही येथे आलात. माझा आजचा दिवस कृतार्थ झाला आहे." मुनी येत आहे, हे पाहिल्यावर श्रीरामसुद्धा हर्षित झाले आणि सीता व लक्ष्मण यांच्यासह त्यांनी जमिनीवर दंडवत घातले. श्रीरामांना चट्दिशी उठवून आणि भक्तिपूर्वक त्यांनी आलिंगन दिले, श्रीरामांच्या देहाचा स्पर्श होताच आनंदामुळे त्या मुनिराजांचे नेत्र भरून आले. त्यानंतर एका हाताने रघुनंदनाचा एक हात धरून, मनांत आनंदित झालेले ते श्रेष्ठ मुनी स्वतःच्या आश्रमाकडे गेले. श्रीरामप्रभूंना सुखपूर्वक आसनावर बसवून त्यांचे विस्तृत साग्रसंगीत पूजन केले व समयानुकूल अशा वनात प्राप्त होणार्या खाद्य पदार्थांनी अगस्त्यांनी श्रीरामांना भोजन घातले. (११-१६) सुखोपविष्टमेकान्ते रामं शशिनिभाननम् । कृताञ्जलिरुवाचेदमगस्त्यो भगवानृषिः ॥ १७ ॥ नंतर एकांत स्थळी सुखाने बसलेल्या व चंद्राप्रमाणे मुख असणार्या श्रीरामचंद्रांना भगवान अगस्त्य ऋषि हात जोडून असे म्हणाले. (१७) त्वदागमनमेवाहं प्रतीक्षन्समवस्थितः । यदा क्षीरसमुद्रान्ते ब्रह्मणा प्रार्थितः पुरा ॥ १८ ॥ भूमेर्भारापनुत्त्यर्थं रावणस्य वधाय च । तदादि दर्शनाकाङ्क्षी तव राम तपश्चरन् । वसामि मुनिभिः सार्धं त्वामेव परिचिन्तयन् ॥ १९ ॥ "हे रामा, पूर्वी ज्या वेळी क्षीरसमुद्राच्या तीरावर, भूमीचा भार हरण करण्यासाठी आणि रावणाचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवांनी तुमची प्रार्थना केली होती, तेव्हापासून तुमच्या दर्शनाच्या इच्छेने, तपश्चर्या करीत तुमचे चिंतन करीत तुमच्याच आगमनाची वाट पाहात मी येथे अन्य मुनींसह राहात आहे. (१८-१९) सृष्टेः प्रागेक एवासीर्निर्विकल्पोऽनुपाधिकः । त्वदाश्रया त्वद्विषया माया ते शक्तिरुच्यते ॥ २० ॥ विश्वोत्पत्तीच्या पूर्वी विकल्परहित आणि उपाधिरहित असे तुम्ही एकटेच होता. तुम्हांला विषय करणारी आणि तुमच्या आश्रयाने राहणारी माया ही तुमची शक्ती आहे, असे म्हटले जाते. (२०) त्वामेव निर्गुणं शक्तिरावृणोति यदा तदा । अव्याकृतमिति प्राहुर्वेदान्तपरिनिष्ठिताः ॥ २१ ॥ जेव्हा ही माया-शक्ती निर्गुण अशा तुम्हांला आवरण घालते, तेव्हा तिला अव्याकृत तत्त्व, असे वेदांत शास्त्रात पारंगत असणारे म्हणतात. (२१) मूलप्रकृतिरित्येके प्राहुर्मायेति केचन । अविद्या संसृतिर्बन्ध इत्यादि बहुधोच्यते ॥ २२ ॥ तिला मूळ प्रवृत्ती असे काही जण म्हणतात. तर इतर काही तिला माया असे म्हणतात. तसेच तिचा निर्देश अविद्या, संसृती, बंध इत्यादी नावांनीही अनेक प्रकारे केला जातो. (२२) त्वया संक्षोभ्यमाणा सा महत्तत्त्वं प्रसूयते । महत्तत्त्वादहङ्कारस्त्वया सञ्चोदितादभूत् ॥ २३ ॥ तुमच्याकडून प्रेरित झालेली ती प्रकृती महत हे तत्त्व उत्पन्न करते. तुमचीच प्रेरणा मिळालेल्या महत्-तत्त्वापासून अहंकार निर्माण झाला. (२३) अहङ्कारो महत्तत्त्वसंवृतस्त्रिविधोऽभवत् । सात्त्विको राजसश्चैव तामसश्चेति भण्यते ॥ २४ ॥ महत्- तत्त्वाने ओतप्रोत भरलेला तो अहंकार तीन प्रकारचा झाला. तो सात्त्विक, राजस आणि तामस असा त्रिविध आहे, असे म्हटले जाते. २४ तामसात्सूक्ष्मतन्मात्राण्यासन्भूतान्यतः परम् । स्थूलानि क्रमशो राम क्रमोत्तरगुणानि ह ॥ २५ ॥ हे रामा, तामस अहंकारापासून शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध अशी नावे असणार्या पाच तन्मात्रा उत्पन्न झाल्या. नंतर त्या सूक्ष्म तन्मात्रांपासून त्यांच्या क्रमाने एकेक वाढत जाणार्या गुणांनुसार आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी अशी पाच स्थूल भूते निर्माण झाली. (२५) राजसानीन्द्रियाण्येव सात्त्विका देवता मनः । तेभ्योऽभवत्सूत्ररूपं लिङ्गं सर्वगतं महत् ॥ २६ ॥ इंद्रिये ही राजस म्हणजे राजस अहंकारापासून उत्पन्न होणारी आहेत. त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्या देवता आणि मन हे सात्त्विक म्हणजे सात्त्विक अहंकारापासून निर्माण होणारे आहे. त्या सूक्ष्म तत्त्वांपासून महान, सर्वव्यापक, सूत्ररूप असे समष्टिरूप लिंग ( =सूक्ष्म) शरीर उत्पन्न झाले (त्यात राहाणारा तो हिरण्यगर्भ होय). यालाच सूत्रात्मा असेही दुसरे नाव आहे. (२६) ततो विराट्समुत्पन्नः स्थूलाद्भूतकदम्बकात् । विराजः पुरुषात्सर्वं जगत्स्थावरजङ्गमम् ॥ २७ ॥ नंतर स्थूल भूतांच्या समूहापासून विराट पुरुष निर्माण झाला, आणि त्या विराट पुरुषापासून स्थावर-जंगमात्मक संपूर्ण जग निर्माण झाले. (२७) देवतिर्यङ्मनुष्याश्च कालकर्मक्रमेण तु । त्वं रजोगुणतो ब्रह्मा जगतः सर्वकारणम् ॥ २८ ॥ सत्त्वाद्विष्णुस्त्वमेवास्य पालकः सद्भिरुच्यते । लये रुद्रस्त्वमेवास्य त्वन्मायागुणभेदतः ॥ २९ ॥ हे जगदीश्वर रामा, काल आणि कर्म यांच्या क्रमानुसार तुम्हीच देव, तिर्यक् प्राणी आणि मानव इत्यादींच्या योनींमध्ये प्रगट झाला. तुमच्याच मायेच्या गुणांच्या भेदानुसार, संपूर्ण जगाचे कारण असणारे ब्रह्मदेव हे रजोगुणाचे द्वारा तुम्हीच झाला आहात. तसेच सत्त्व गुणाचे द्वारा या जगाचा पालक असणारे विष्णू तुम्हीच आहात आणि या जगाचा लय करणारे रुद्र हा तमोगुणाचे द्वारा तुम्हीच झाला, असे विद्वान पुरुषांकडून सांगितले जाते. (२८-२९) जाग्रत्स्वप्नसुषुप्त्याख्या वृत्तयो बुद्धिजैर्गुणैः । तासां विलक्षणो राम त्वं साक्षी चिन्मयोऽव्ययः ॥ ३० ॥ सृष्टिलीलां यदा कर्तुमीहसे रघुनन्दन । अङ्गीकरोषि मायां त्वं तदा वै गुणवानिव ॥ ३१ ॥ राम माया द्विधा भाति विद्याविद्येति ते सदा । प्रवृत्तिमार्गनिरता अविद्यावशवर्तिनः । निवृत्तिमार्गनिरता वेदान्तार्थविचारकाः ॥ ३२ ॥ त्वद्भक्तिनिरता ये च ते वै विद्यामयाः स्मृता । अविद्यावशगा ये तु नित्यं संसारिणाश्च ते । विद्याभ्यासरता ये तु नित्यमुक्तास्त एव हि ॥ ३३ ॥ हे रामा, बुद्धीतील सत्त्व, रज, तम या तीन गुणांनी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ही नावे असणार्या अवस्था उद्भूत होतात. तथापि चिन्मय, अविनाशी आणि साक्षी असणारे तुम्ही मात्र त्या तीन अवस्थांपेक्षा अगदी विलक्षण आहात. हे रघुनंदना, ज्या वेळी सृष्टी निर्माण करण्याची लीला तुम्हांला करावीशी वाटते, त्या वेळी तुम्ही मायेचा अंगीकार करता आणि गुणांनी युक्त असल्याप्रमाणे भासता. हे रामा, तुमची ही माया नेहमी विद्या आणि अविद्या या दोन प्रकारांनी भासते. प्रवृत्ति-मार्गात रत असणारे लोक हे अविद्येला वश असतात आणि वेदांताच्या अर्थाचा विचार करणारे, निवृत्ति-मार्गात रत असणारे आणि तुमची भक्ती करण्यात रममाण होणारे लोक हे विद्यामय -विद्येला वश- आहेत असे मानले जाते. जे लोक अविद्येला वश होऊन राहातात ते नेहमी जन्म-मरण-रूपी संसारात पडलेले असतात. या उलट जे विद्येच्या अभ्यासात रत असतात, ते नित्यमुक्तच असतात. ३०-३३ लोके त्वद्भक्तिनिरतास्त्वन्मंत्रोपासकाश्च ये । विद्या प्रादुर्भवेत्तेषां नेतरेषां कदाचन ॥ ३४ ॥ अतस्त्वद्भक्तिसम्पन्ना मुक्ता एव न संशयः । त्वद्भक्त्यमृतहीनानां मोक्षः स्वप्नेऽपि नो भवेत् ॥ ३५ ॥ किं राम बहुनोक्तेन सारं किञ्चिद्ब्रवीमि ते । साधुसङ्गतिरेवात्र मोक्षहेतुरुदाहृता ॥ ३६ ॥ साधवः समचित्ता ये निःस्पृहा विगतैषिणः । दान्ताः प्रशान्तास्त्वद्भक्ता निवृत्ताखिलकामनाः ॥ ३७ ॥ इष्टप्राप्तिविपत्त्योश्च समाः सङ्गविवर्जिताः । संन्यस्ताखिलकर्माणः सर्वदा ब्रह्मतत्पराः ॥ ३८ ॥ यमादिगुणसम्पन्नाः सन्तुष्टा येन केनचित् । सत्सङ्गमो भवेद्यर्हि त्वत्कथाश्रवणे रतिः ॥ ३९ ॥ या जगात जे पुरुष तुमच्या भक्तीमध्ये रत असतात आणि जे तुमच्या नाम-मंत्राचे उपासक असतात, त्यांच्याच ठिकाणी विद्या प्रादुर्भूत होते; इतरांच्या ठिकाणी मुळीच नाही. म्हणून तुमच्या भक्तीने संपन्न असणारे पुरुष हे मुक्तच असतात यात संशय नाही. या उलट तुमच्या भक्तिरूपी अमृताने रहित असणारे जे पुरुष आहेत त्यांना स्वप्नात सुद्धा मोक्ष मिळणार नाही. हे रामा, फार काय सांगावे ? या बाबतीत जे काही सार आहे ते मी तुम्हाला सांगतो. या जगात साधूंची संगती हीच मोक्षाचे कारण आहे, असे सांगितले आहे. या जगातील सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांमध्ये चित्त सम असणारे, स्पृहा-रहित, कोणत्याही प्रकारची इच्छा नसणारे, इंद्रियांचा संयम करणारे, अत्यंत शांत चित्त असणारे, तुमचे भक्त असणारे, ज्यांच्या सर्व कामना निवृत्त झाल्या आहेत असे, इष्ट गोष्टींची प्राप्ती आणि विपत्ती यांमध्ये चित्त सम असणारे, आसक्तिरहित, सर्व कर्मांचा त्याग करणारे, नेहमी ब्रह्मपरायण, यम-नियम इत्यादी गुणांनी संपन्न, जे काही प्राप्त होईल त्यात संतुष्ट असणारे असे ते साधू असतात. जर त्या साधूंची संगती प्राप्त झाली तर तुमची कथा ऐकण्यात आवड उत्पन्न होते. (३४-३९) समुदेति ततो भक्तिस्त्वयि राम सनातने । त्वद्भक्तावुपपन्नायां विज्ञानं विपुलं स्फुटम् ॥ ४० ॥ त्यानंतर हे रामा, सनातन अशा तुमच्या ठिकाणी भक्ती उत्पन्न होते. तुमची भक्ती उत्पन्न झाली असताना तुमचे स्पष्ट आणि प्रचुर ज्ञान प्राप्त होते. (४०) उदेति मुक्तिमार्गोऽयमाद्यश्चतुरसेवितः । तस्माद्राघव सद्भक्तिस्त्वयि मे प्रेमलक्षणा ॥ ४१ ॥ सदा भूयाद्धरे सङ्गस्त्वद्भक्तेषु विशेषतः । अद्य मे सफलं जन्म भवत्सन्दर्शनादभूत् ॥ ४२ ॥ चतुर पुरुषांनी सेवन केलेला हा मुक्तीचा आद्य मार्ग उदयास येतो. म्हणून हे राघवा, प्रेमस्वरूप असणारी माझी सद्-भक्ती ही तुमच्या ठिकाणी नेहमी असो. तसेच हे हरे, विशेषतः तुमच्या भक्तांची संगती मला सदा प्राप्त होवो. आज तुमच्या दर्शनाने माझा जन्म सफल झाला आहे. (४१-४२) अद्य मे क्रतवः सर्वे बभूवुः सफलाः प्रभो । दीर्घकालं मया तप्तमनन्यमतिना तपः ॥ ४३ ॥ तस्येह तपसो राम फलं तव यदर्चनम् सदा मे सीतया सार्धं हृदये वस राघव । गच्छतस्तिष्ठतो वापि स्मृतिः स्यान्मे सदा त्वयि ॥ ४४ ॥ हे प्रभू मी केलेले सर्व यज्ञ आज सफल झाले आहेत. मी दीर्घ काळपर्यंत अनन्य बुद्धीने तप केलेले आहे. इहलोकी, हे रामा, त्या तपाचे फळ म्हणजेच मी आज जे तुमचे पूजन केले तेच होय. हे राघवा, सीतेसह तुम्ही सदा माझ्या हृदयात वास करा. तसेच मी चालत असलो, किंवा उभा असलो तरीसुद्धा मला सतत तुमचेच रमरण होवो." (४३-४४) इति स्तुत्वा रमानाथमगस्त्यो मुनिसत्तमः । ददौ चापं महेन्द्रेण रामार्थे स्थापितं पुरा ॥ ४५ ॥ अक्षय्यौ बाणतूणीरौ खड्गो रत्नविभूषितः । जहि राघव भूभारभूतं राक्षसमण्डलम् ॥ ४६ ॥ अशा प्रकारे लक्ष्मीपती रामांची स्तुती करून मुनिश्रेष्ठ अगस्त्यांनी श्रीरामांना, पूर्वीच रामांसाठी इंद्राने ठेवलेले धनुष्य, बाणाने भरले आणि अक्षय टिकणारे दोन बाणांचे भाते आणि रत्नविभूषित तलवार या गोष्टी दिल्या आणि म्हटले "हे राघवा, भूमीला भार झालेल्या राक्षस-समूहांचा संहार करा. (४५-४६) यदर्थमवतीर्णोऽसि मायया मनुजाकृतिः । इतो योजनयुग्मे तु पुण्यकाननमण्डितः ॥ ४७ ॥ अस्ति पञ्चवटीनाम्ना आश्रमो गौतमीतटे । नेतव्यस्तत्र ते कालः शेषो रघुकुलोद्वह ॥ ४८ ॥ त्यासाठीच मायेने मानवरूप धारण करून तुम्ही या पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. येथून दोन योजने अंतरावर, गौतमी नदीच्या तीरावर, पवित्र वनाने सुशोभित असा 'पंचवटी' नावाचा एक आश्रम आहे. हे रघुकुलश्रेष्ठा, तुम्ही आता तुमचा उरलेला काळ तेथे व्यतीत करावा. (४७-४८) तत्रैव बहुकार्याणि देवानां कुरु सत्पते ॥ ४९ ॥ हे सज्जनांच्या स्वामी, तेथेच राहून तुम्ही देवांची पुष्कळ कार्ये करा" (४९) श्रुत्वा तदागस्त्यसुभाषितं वचः स्तोत्रं च तत्त्वार्थसमन्वितं विभुः । मुनिं समाभाष्य मुदान्वितो ययौ प्रदर्शितं मार्गमशेषविद्धरिः ॥ ५० ॥ अगस्त्यांनी चांगल्या प्रकारे उच्चारलेले ते वचन तसेच तात्त्विक अर्थाने युक्त असे स्तोत्र ऐकल्यावर, भगवान रामांनी मुनींचा निरोप घेतला. आणि सर्व जाणणारे हरी आनंदाने युक्त होऊन, अगस्त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून जाण्यास निघाले. (५०) इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकाण्डे तृतीयः सर्गः ॥ ३ ॥ अरण्यकाण्डातील तिसरा सर्गः समाप्त ॥ ३ ॥ |