॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ उत्तरकाण्ड ॥

॥ अष्टमः सर्गः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



कालाचे आगमन, लक्ष्मणाचा त्याग आणि त्याचे स्वर्गगमन


श्रीमहादेव उवाच
अथ काले गते कस्मिन् भरतो भीमविक्रमः ।
युधाजिता मातुलेन ह्याहूतोऽगात्ससैनिकः ॥ १ ॥
रामाज्ञया गतस्तत्र हत्वा गन्धर्वनायकान् ।
तिस्रः कोटीः पुरे द्वे तु निवेश्य रघुनन्दनः ॥ २ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, नंतर काही काळ गेला असता प्रचंड पराक्रम असणाऱ्या भरताला त्याच्या युधाजित मामाकडून बोलावणे आले. श्रीरामांच्या आज्ञेने सैनिकांसह भरत तिकडे गेला. तेथे गेल्यावर रघुनंदन भरताने तीन कोटी गंधर्वनायकांचा वध केला आणि तेथेच त्याने दोन नगरे बसविली. (१-२)

पुष्करं पुष्करावत्यां तक्षं तक्षशिलाह्वये ।
अभिषिच्य सुतौ तत्र धनधान्यसुहृद्‍वृतौ ॥ ३ ॥
पुनरागत्य भरतो रामसेवापरोऽभवत् ।
ततः प्रीतो रघुश्रेष्ठो लक्ष्मणं प्राह सादरम् ॥ ४ ॥
त्या दोन नगरींपैकी पुष्करावती नगरीत पुष्कर आणि तक्षशिला नावाच्या नगरात तक्ष अशा आपल्या दोन पुत्रांना भरताने राज्याभिषेक केला. तेथे ते धनधान्यसंपन्न होऊन मित्रांसह राहू लागले. भरत परत आला आणि श्रीरामांच्या सेवेत तत्पर झाला. नंतर आनंदित झालेले रघुश्रेष्ठ श्रीराम आदरपूर्वक लक्ष्मणाला म्हणाले. (३-४)

उभौ कुमारौ सौमित्रे गृहीत्वा पश्चिमां दिशम् ।
तत्र भिल्लान्विनिर्जित्य दुष्टान् सर्वापकारिणः ॥ ५ ॥
अङ्‍गदश्चित्रकेतुश्च महासत्त्वपराक्रमौ ।
द्वयोर्द्वे नगरे कृत्वा गजाश्वधनरत्‍नकैः ॥ ६ ॥
अभिषिच्य सुतौ तत्र शीघ्रमागच्छ मां पुनः ।
रामस्याज्ञां पुरस्कृत्य गजाश्वबलवाहनः ॥ ७ ॥
गत्वा हत्वा रिपुन् सर्वान् स्थापयित्वा कुमारकौ ।
सौमित्रिः पुनरागत्य रामसेवापरोऽभवत् ॥ ८ ॥
" हे लक्ष्मणा, तू तुझ्या दोन कुमारांना घेऊन पश्चिम दिशेला जा. तेथे सर्वांवर अपकार करणाऱ्या दुष्ट भिल्लांचा पराभव कर. नंतर तुझे महाबलवान आणि महापराक्रमी अंगद आणि चित्रकेतू हे पुत्र आहेत, त्या दोघांसाठी दोन नगरे वसव. मग हत्ती, घोडे, द्रव्य, रत्ने या साधनांनी त्या दोन पुत्रांचा तेथे राज्याभिषेक करून, तू सत्वर परत ये." श्रीरामांची आज्ञा शिरोधार्थ मागून हत्ती, घोडे, सैन्य व वाहने यांच्यासह लक्ष्मण गेला आणि सर्व शत्रूंचा वध करून, त्याने दोन्ही कुमारांना राज्यावर बसविले आणि मग परत येऊन लक्ष्मण श्रीरामांची सेवा करण्यात तत्पर झाला. (५-८)

ततस्तु काले महति प्रयाते
    रामं सदा धर्मपथे स्थितं हरिम् ।
द्रष्टुं समागाद् ऋषिवेषधारी
    कालस्ततो लक्ष्मणमित्युवाच ॥ ९ ॥
त्यानंतर पुष्कळ काळ निघून गेला. धर्माच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या हरिरूपी रामांना भेटण्यासाठी, ऋषीचा वेष धारण केलेला काळ आला. तो काळ लक्ष्मणाला म्हणाला. (९)

निवेदयस्वातिबलस्य दूतं
    मां द्रष्टुकामं पुरुषोत्तमाय ।
रामाय विज्ञापनमस्ति तस्य
    महर्षिमुख्यस्य चिराय धीमन् ॥ १० ॥
"हे बुद्धिमान लक्ष्मणा, अतिबल ऋषींचा दूत म्हणून मी श्रीरामांना भेटण्यास आलो आहे. त्या श्रेष्ठ महर्षींचा निरोप प्रभू रामचंद्रांना सांगण्यास मला बराच वेळ लागणार आहे. ही गोष्ट तू पुरुषोत्तम रामांना जाऊन निवेदन कर." (१०)

तस्य तद्वचनं श्रुत्वा सौमित्रिस्त्वरयान्वितः ।
आचचक्षेऽथ रामाय स सम्प्राप्तं तपोधनम् ॥ ११ ॥
त्याचे ते वचन ऐकल्यावर, लक्ष्ममण त्वरेने श्रीरामांकडे गेला आणि तपस्वी ऋषी आले आहेत, असे त्याने सांगितले. (११)

एवं ब्रुवन्तं प्रोवाच लक्ष्मणं राघवो वचः ।
शीघ्रं प्रवेश्यतां तात मुनिः सत्कारपूर्वकम् ॥ १२ ॥
लक्ष्मणस्तु तथेत्युक्‍त्वा प्रावेशयत तापसम् ।
स्वतेजसा ज्वलन्तं तं घृतसिक्तं यथानलम् ॥ १३ ॥
सोऽभिगम्य रघुश्रेष्ठं दीप्यमानः स्वतेजसा ।
मुनिर्मधुरवाक्येन वर्धस्वेत्याह राघवम् ॥ १४ ॥
असे कथन करणाऱ्या लक्ष्मणाला राघव म्हणाले की, बंधो, सत्कारपूर्वक त्या मुनीना लवकर आत घेऊन ये. "ठीक आहे" असे म्हणून लक्ष्मणाने त्या तापसाला आत नेले. तुपाचा शिडकाव केलेला अग्नी ज्या प्रमाणे प्रज्वलित झालेला असतो, त्या प्रमाणे तो तापस स्वतःच्या तेजाने देदीप्यमान होता. स्वतःच्या तेजाने दीप्तिमान असणारे ते मुनी रघुश्रेष्ठांजवळ गेले आणि मधुर शब्दांनी म्हणाले, "तुमचा उत्कर्ष होवो." (१२-१४)

तस्मै स मुनये रामः पूजां कृत्वा यथाविधि ।
पृष्ट्वानामयमव्यग्रो रामः पृष्टोऽथ तेन सः ॥ १५ ॥
त्या मुनींची विधिवत पूजा करून श्रीरामांनी शांतपणे त्या मुनींना त्यांचे क्षेमकुशल विचारले. मग मुनींनीही त्यांचे कुशल विचारले. (१५)

दिव्यासाने समासीनो रामः प्रोवाच तापसम् ।
यदर्थमागतोऽसि त्वं इह तत् प्रापयस्व मे ॥ १६ ॥
दिव्य आसनावर बसलेल्या श्रीरामांनी त्या तपस्व्यांना म्हटले, "ज्यासाठी तुम्ही येथे आला आहात तो निरोप सांगा." (१६)

वाक्येन चोदितस्तेन रामेणाह मुनिर्वचः ।
द्वन्द्वमेव प्रयोक्तव्यं अनालक्ष्यं तु तद्वचः ॥ १७ ॥
रामांकडून अनुज्ञा मिळाल्यावर मुनी रामांना म्हणाले, "मी सांगतो ते अन्य कुणालाही कळू नये, ते आपणा दोघांमध्येच राहावयास हवे. (१७)

नान्येन चैतच्छ्रोतव्यं नाख्यातव्यं च कस्यचित् ।
शृणुयाद्वा निरीक्षेद्वा यः स वध्यस्त्वया प्रभो ॥ १८ ॥
हे वचन दुसऱ्या कोणी ऐकावयाचे नाही, तसेच ते दुसऱ्या कुणालाही सांगावयाचे नाही. हे प्रभो, जर कुणी ऐकले किंवा बोलताना आपणास पाहिले, तर प्रभू तुम्ही त्याचा वध करावयास हवा." (१८)

तथेति च प्रतिज्ञाय रामो लक्ष्मणमब्रवीत् ।
तिष्ठ त्वं द्वारि सौमित्रे नायात्वत्र जनो रहः ॥ १९ ॥
यथा गच्छति को वापि स वध्यो मे न संशयः ।
ततः प्राह मुनिं रामो येन वा त्वं विसर्जितः ॥ २० ॥
यत्ते मनीषितं वाक्यं तद्वदस्व ममाग्रतः ।
ततः प्राह मुनिर्वाक्यं शृणु राम यथातथम् ॥ २१ ॥
"ठीक आहे" असे प्रतिज्ञापूर्वक सांगून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, " अरे लक्ष्मणा, तू येथे दाराशी उभा राहा. येथे एकांत स्थानी कुणाही माणसाला येऊ देऊ नकोस. जर कोणी येथे आला तर मी त्याला ठार मारीन, यात संशय नाही." नंतर राम त्या ऋषींना म्हणाले, "ज्या कोणी तुम्हांला येथे पाठविले आहे, तसेच तुमच्या मनात जे काही सांगावयाचे आहे, ते आता मला सांगा." तेव्हा मुनी म्हणाले, हे रामा, मी तुम्हांला खरी गोष्ट आता सांगतो. (१९-२१)

ब्रह्मणा प्रेषितोऽस्मीश कार्यार्थे तेऽन्तिकं प्रभो ।
अहं हि पूर्वजो देव तव पुत्रः परन्तप ॥ २२ ॥
हे प्रभू ईश्वरा, विशिष्ट कार्यासाठी ब्रह्मदेवाने मला तुमच्याकडे पाठवले आहे. हे शमत्रुदमना देवा, खरोखर मी तुमचा ज्येष्ठ पुत्र आहे. (२२)

मायासङ्‍गमजो वीर कालः सर्वहरः स्मृतः ।
ब्रह्मा त्वामाह भगवान् सर्वदेवर्षिपूजितः ॥ २३ ॥
हे वीरा, मायेशी झालेल्या तुमच्या संयोगातून मी उत्पन्न झालो आहे. मी तुमचा पुत्र काल या नावाने प्रसिद्ध आहे. सर्वांचा नाश करणारा म्हणून मी प्रख्यात आहे. सर्व देवर्षीकडून पूजिले गेलेले भगवान ब्रह्मदेव, त्यांनी तुम्हाला सांगितले आहे, (२३)

रक्षितुं स्वर्गलोकस्य समयस्ते महामते ।
पुरा त्वमेक एवासीः लोकान् संहृत्य मायया ॥ २४ ॥
भार्यया सहितस्त्वं मां आदौ पुत्रमजीजनः ।
तथा भोगवतं नागं अनन्तमुदकेशयम् ॥ २५ ॥
"हे महाबुद्धिमंता, स्वर्गलोकाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही परत येण्याची वेळ आली आहे. पूर्वी सर्व लोकांचा संहार करून तुम्ही एकटेच राहिला होता. नंतर आपली पत्नी माया हिच्याशी संयोग पावून तुम्ही प्रथम मला ब्रह्मदेवास पुत्र म्हणून जन्माला घातले. तसेच पाण्यात शयन करणाऱ्या फणाधारी अनंत नावाच्या शेष नागाला तुम्ही निर्माण केले. (२४-२५)

मायया जनयित्वा त्वं द्वौ ससत्त्वौ महाबलौ ।
मधुकैटभकौ दैत्यौ हत्वा मेदोऽस्थिसञ्चयम् ॥ २६ ॥
इमां पर्वतसंबद्धां मेदिनीं पुरुषर्षभ ।
पद्मे दिव्यार्कसङ्‍काशे नाभ्यामुत्पाद्य मामपि ॥ २७ ॥
मां विधाय प्रजाध्यक्षं मयि सर्वं न्यवेदयत् ।
सोऽहं संयुक्तसंभारः त्वां अवोचं जगत्पते ॥ २८ ॥
अशा प्रकारे मायेच्याद्वारा आम्हाला उत्पन्न करून तुम्ही पराक्रमी आणि अतिशय बलवान अशा मधू व कैटभ नावाच्या दोन दैत्यांचा वध करून, त्या दोघांच्या मेद व अस्थिसमूह यांच्यापासून पर्वतांनी युक्त अशी पृथ्वी निर्माण देली. हे पुरुषश्रेष्ठा, नंतर तुमच्या नाभीतील दिव्य सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या अशा कमलात तुम्ही मलासुद्धा उत्पन्न केले आणि मला प्रजापती बनवून तुम्ही विश्वोत्पत्ती करण्याचा सर्व भार माझ्यावर सोपवलात. तेव्हा जगत्पते, तो सर्व भार स्वीकारून मी तुम्हाला म्हणालो. (२६-२८)

रक्षां विधत्स्व भूतेभ्यो ये मे वीर्यापहारिणः ।
ततस्वं कस्यपाज्जातो विष्णुर्वामनरूपधृक् ॥ २९ ॥
माझ्या वीर्याचा म्हणजे प्रजेचा नाश करणारे जे कोणी असतील त्या प्राण्यांपासून तुम्ही माझ्या प्रजेचे रक्षण करा. तेव्हा तुम्ही विष्णू- वामनाचे रूप धारण करून कश्यपापासून जन्माला आलात. (२९)

हृतवानसि भूभारं वधाद् रक्षोगणस्य च ।
सर्वासूत्सार्यमाणासु प्रजासु धरणीधर ॥ ३० ॥
रावणस्य वधाकाङ्‍क्षी मर्त्यलोकं उपागतः ।
दशवर्षसहस्राणि दशवर्षशतानि च ॥ ३१ ॥
कृत्वा वासस्य समयं त्रिदशेष्वात्मनः पुरा ।
स ते मनोरथः पूर्णः पूर्णे चायुषि ते नृषु ॥ ३२ ॥
आणि राक्षस समुदायाचा नाश करून तुम्ही पृथ्वीचा भार हरण केला. हे धरणी धारण करणाऱ्या विष्णो, या काळी सर्व प्रजांचा नाश होत असताना, रावणाचा वध करण्याच्या इच्छेने तुम्ही मर्त्य लोकात गेला होता. पूर्वी देवांजवळ अकरा हजार वर्षे पृथ्वीवर राहाण्याचा स्वतःचा कालावधी तुम्ही निश्चित केला होता. आता तुमचे मनोरथ पूर्ण झाले आहेत आणि मृत्युलोकातील माणसांमध्ये राहाण्याचा तुमचा समयही आता संपला आहे. (३०-३२)

कालस्तापसरूपेण त्वत्समीपं उपागमत् ।
ततो भूयश्च ते बुद्धिः यदि राज्यमुपासितुम् ॥ ३३ ॥
तत्तथा भव भद्रं ते एवमाह पितामहः ।
यदि ते गमने बुद्धिः देवलोकं जितेन्द्रिय ॥ ३४ ॥
सनाथा विष्णुना देवा भजन्तु विगतज्वराः ।
चतुर्मुखस्य तद्वाक्यं श्रुत्वा कालेन भाषितम् ॥ ३५ ॥
हसन् रामस्तदा वाक्यं कृत्स्नस्यान्तकमब्रवीत् ।
श्रुतं तव वचो मेऽद्य ममापीष्टतरं तु तत् ॥ ३६ ॥
आता तापसरूपाने काल हा तुमच्याजवळ आलेला आहे. जर आणखी काही काळ राज्याचा उपभोग घेण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही तसे ठरवा. तुमचे कल्याण असो.' असे ब्रह्मदेवांनी तुम्हांला सांगितले आहे. या उलट हे जितेंद्रिया, जर देवलोकी परत जाण्याचा तुमचा विचार असेल, तर विष्णूकडून सनाथ होऊन देव निश्चिंत होऊ देत." कालाने सांगितले ते ब्रह्मदेवाचे वचन ऐकल्यावर, त्या वेळी सर्वांचा अंत करणाऱ्या त्या कालाला हसत हसत राम म्हणाले, "आता मी तुझे वचन ऐकले आहे. मलासुद्धा हेच अधिक इष्ट वाटत आहे. (३३-३६)

सन्तोषः परमो ज्ञेयः त्वद् आगमनकारणात् ।
त्रयाणामपि लोकानां कार्यार्थं मम संभवः ॥ ३७ ॥
तुझे आगमन येथे झाले यामुळे मला संतोष झाला आहे. कारण तिन्ही लोकांचे कार्य करण्यासाठी माझा अवतार असतो. (३७)

भद्रं तेऽस्त्वागमिष्यामि यत एवाहमागतः ।
मनोरथस्तु संप्राप्तो न मेऽत्रास्ति विचारणा ॥ ३८ ॥
तुझे कल्याण होवो. आता परत येईन. माझे मनोरथ पूर्ण झाले आहेत. आता या बाबतीत मला आणखी विचार करण्याचे काहीच कारण नाही. (३८)

मत्सेवकानां देवानां सर्वकार्येषु वै मया ।
स्थातव्यं मायया पुत्र यथा चाह प्रजापतिः ॥ ३९ ॥
हे पुत्रा, प्रजापती ब्रह्मदेवाने म्हटले आहे, त्या प्रमाणे माझे सेवक असणाऱ्या देवांच्या सर्व कार्यांत सहाय्य करण्यास मी मायेच्या द्वारे उपस्थित राहाणे, हे योग्यच आहे." (३९)

एवं तयोः कथयतोः दुर्वासा मुनिरभ्यगात् ।
राजद्वारं राघवस्य दर्शनापेक्षया द्रुतम् ॥ ४० ॥
अशा प्रकारे ते श्रीराम व काल दोघे बोलत असताना, राघवांचे दर्शन घेण्याच्या इच्छेने दुर्वास मुनी लगबगीने राजद्वारी आले. (४०)

मुनिर्लक्ष्मणमासाद्य दुर्वासा वाक्यमब्रवीत् ।
शीघ्रं दर्शय रामं मे कार्यं मेऽत्यन्तमाहितम् ॥ ४१ ॥
तच्छ्रुत्वा प्राह सौमित्रिः मुनिं ज्वलनतेजसम् ।
रामेण कार्यं किं तेऽद्य किं तेऽभीष्टं करोम्यहम् ॥ ४२ ॥
राजा कार्यान्तरे व्यग्रो मुहूर्तं संप्रतीक्ष्यताम् ।
तच्छ्रुत्वा क्रोधसन्तप्तो मुनिः सौमित्रिमब्रवीत् ॥ ४३ ॥
अस्मिन् क्षणे तु सौमित्रे न दर्शयसि चेद्विभुम् ।
रामं सविषयं वंशं भस्मीकुर्यां न संशयः ॥ ४४ ॥
लक्ष्मणाजवळ येऊन दुर्वास मुनी म्हणाले, "माझी रामाशी त्वरित भेट करवून दे. त्यांच्याकडे माझे एक अतिशय महत्त्वाचे काम आहे." ते ऐकल्यावर अग्नीप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या मुनीना लक्ष्मण म्हणाला, " श्रीरामांबरोबर आत्ताच तुमचे काय काम आहे ? तुमचे काय अभीष्ट आहे ? मी ते पूर्ण करतो. राजाराम हे दुसऱ्या एका कार्यात व्यग्र आहेत. तेव्हा थोडा वेळ तुम्ही वाट पाहावी." ते ऐकताच क्रोधाने संतप्त झालेले मुनी लक्ष्मणाला म्हणाले. "अरे लक्ष्मणा, जर तू याच क्षणी माझी प्रभू रामचंद्रांशी भेट घडवून आणली नाहीस, तर संपूर्ण देशासह तुमचा वंश मी भस्म करून टाकीन, हे नक्की समज." (४१-४४)

श्रुत्वा तद्वचनं घोरं ऋषेर्दुर्वाससो भृशम् ।
स्वरूपं तस्य वाक्यस्य चिन्तयित्वा स लक्ष्मणः ॥ ४५ ॥
सर्वनाशाद्वरं मेऽद्य नाशो ह्येकस्य कारणात् ।
निश्चित्यैवं ततो गत्वा रामाय प्राह लक्ष्मणः ॥ ४६ ॥
दुर्वास ऋषींचे ते भयंकर वाक्य ऐकल्यावर, त्याच्या परिणामाचा लक्ष्मणाने विचार केला. आणि मग एकामुळे सर्वांचा नाश होण्यापेक्षा, आत्ता माझ्या एकट्याचाच नाश होणे हे अधिक श्रेयस्कर आहे, असा असा निश्चय करून लक्ष्मण श्रीरामां श्रीरामांना त्याने सर्वजवळ गेला आणि श्रीरामांना त्याने सर्व वृत्तांत सांगितला. (४५-४६)

सौमित्रेर्वचनं श्रुत्वा रामः कालं व्यसर्जयत् ।
शीघ्रं निर्गम्य रामोऽपि ददर्शात्रेः सुतं मुनिम् ॥ ४७ ॥
रामोऽभिवाद्य संप्रीतो मुनिं पप्रच्छ सादरम् ।
किं कार्यं ते करोमीति मुनिमाह रघुत्तमः ॥ ४८ ॥
तच्छ्रुत्वा रामवचनं दुर्वासा राममब्रवीत् ।
अद्य वर्ष सहस्राणां उपवास समापनम् ॥ ४९ ॥
अतो भोजनमिच्छामि सिद्धं यत्ते रघुत्तम ।
रामो मुनिवचः श्रुत्वा सन्तोषेण समन्वितः ॥ ५० ॥
स सिद्धमन्नं मुनये यथावत् समुपाहरत् ।
मुनिर्भुक्‍त्वान्नं अमृतं सन्तुष्टः पुरभ्यगात् ॥ ५१ ॥
लक्ष्मणाचे वचन ऐकल्यावर, रामांनी कालाला निरोप दिला आणि चट्‌दिशी बाहेर येऊन रामांनीसुद्धा त्या अत्रि-पुत्र दुर्वास मुनींची भेट घेतली. संतुष्ट मनाने मुनींना अभिवादन करून रामांनी आदरपूर्वक मुनींना प्रश्न केला, "मी तुमचे कोणते कार्य करू ?" ते रामांचे वचन ऐकून दुर्वास मुनी रामांना म्हणाले, " हजारो वर्षे केलेल्या माझ्या उपवासाची आज समाप्ती आहे. म्हणून हे रघूतमा, तुमच्याकडे जे काही तयार असेल ते भोजन करण्याची माझी इच्छा आहे." मुनींचे वचन ऐकल्यावर रामांना संतोष वाटला. तयार असलेले अन्न श्रीरामांनी मुनींना यथायोग्यपणे खाऊ घातले. ते अमृततुल्य अन्न खाऊन संतुष्ट झालेले मुनी तेधून परत निघून गेले. (४७-५१)

स्वं आश्रमं गते तस्मिन् रामः सस्मार भाषितम् ।
कालेन शोकदुःखार्तो विमनाश्चाति विह्वलः ॥ ५२ ॥
मुनी गेल्यावर, कालाशी झालेले भाषण रामांना आठवले. ते शोक व दुःख यांमुळे खिन्न, विमनस्क, उदास आणि अतिशय व्याकूळ झाले. (५२)

अवाङ्‍मुखो दीनमना न शशाकाभिभाषितुम् ।
मनसा लक्ष्मणं ज्ञात्वा हतप्रायं रघूद्वहः ॥ ५३ ॥
आता लक्ष्मण मेल्यातच जमा आहे, हे मनाने कळल्यावर, रघुश्रेष्ठ श्रीराम लक्ष्मणाला काही बोलू शकले नाहीत. (५३)

अवाङ्‍मुखो बभूवाथ तूष्णीमेवाखिलेश्वरः ।
ततो रामं विलोक्याह सौमित्रिर्दुःखसंप्लुतम् ॥ ५४ ॥
तूष्णीम्भूतं चिन्तयन्तं गर्हन्तं स्नेहबन्धनम् ।
मत्कृते त्यज सन्तापं जहि मां रघुनन्दन ॥ ५५ ॥
त्यानंतर सर्वांचे ईश्वर राम खाली मान घालून गप्प बसून राहिले. दुःखाने मौन, चिंतित आणि स्नेहबंधनाची निंदा करणाऱ्या श्रीरामांना पाहून लक्ष्मण म्हणाला, "हे रघुनंदना, माझ्यासाठी तुम्ही त्रास करून घेऊ नका. माझा खुशाल वध करा. (५४-५५)

गतिः कालस्य कलिता पूर्वमेवेदृशी प्रभो ।
त्वयि हीनप्रतिज्ञे तु नरको मे ध्रुवं भवेत् ॥ ५६ ॥
हे प्रभो, मला पूर्वीच असे वाटले होते की कालाची गती अशीच आहे. तुमच्या प्रतिज्ञेचा भंग झाला तर मला निश्चितपणे नरक मिळेल. (५६)

मयि प्रीतिर्यदि भवेद् यदि अनुग्राह्यता तव ।
त्यक्‍त्वा शङ्‍कां जहि प्राज्ञ मा मा धर्मं त्यज प्रभो ॥ ५७ ॥
हे प्रभो, जर तुमचे माझ्यावर प्रेम असेल, जर मी तुमच्या अनुग्रहास पात्र असेन, तर तुम्ही शंका सोडून माझा वध करा. हे प्रभो, तुम्ही धर्माचा त्याग करू नका." (५७)

सौमित्रिणोक्तं तच्छ्रुत्वा रामश्चलितमानसः ।
आहूय मंत्रिणः सर्वान् वसिष्ठं चेदमब्रवीत् ॥ ५८ ॥
लक्ष्मणाने उच्चारले वचन ऐकल्यावर रामांचे मन चंचल झाले आणि त्यांनी सर्व मंत्र्यांना आणि वसिष्ठांना बोलावून घेतले आणि (५८)

मुनेरागमनं यत्तु कालस्यापि हि भाषितम् ।
प्रतिज्ञामात्मनश्चैव सर्वं आवेदयत्प्रभुः ॥ ५९ ॥
दुर्वास मुनींचे आगमन, कालाचे भाषण आणि स्वतः केलेली प्रतिज्ञा हे सर्व प्रभू रामांनी त्यांना सांगितले. (५९)

श्रुत्वा रामस्य वचनं मन्‍त्रिणः सपुरोहिताः ।
ऊचुः प्राञ्जलयः सर्वे रामं अक्लिष्टकारिणम् ॥ ६० ॥
श्रीरामांचे वचन ऐकल्यावर वसिष्ठांच्यासह सर्व मंत्र्यांनी हात जोडले आणि अनायास कोणतेही कार्य करणाऱ्या श्रीरामांना ते म्हणाले. (६०)

पूर्वमेव हि निर्दिष्टं तव भूभारहारिणः ।
लक्ष्मणेन वियोगस्ते ज्ञातो विज्ञानचक्षुषा ॥ ६१ ॥
"पृथ्वीचा भार हरण करणारे तुम्ही. तुमचा लक्ष्मणाशी वियोग होणार हे पूर्वीच ठरले होते. ही गोष्ट अंतर्ज्ञानाने आम्हांला कळलेली आहे. (६१)

त्यजाशु लक्ष्मणं राम मा प्रतिज्ञां त्यज प्रभो ।
प्रतिज्ञाते परित्यक्ते धर्मो भवति निष्फलः ॥ ६२ ॥
तेव्हा हे रामा, आता तुम्ही त्वरित लक्ष्मणाचा त्याग करा. हे प्रभो, तुम्ही आपल्या प्रतिज्ञेचा भंग करू नका. प्रतिज्ञेचा भंग केला असता, धर्म निष्फळ होऊन जातो. (६२)

धर्मे नष्टेऽखिले राम त्रैलोक्यं नश्यति ध्रुवम् ।
त्वं तु सर्वस्य लोकस्य पालकोऽसि रघुत्तम ॥ ६३ ॥
आणि हे रामा, संपूर्ण धर्म नष्ट झाला तर, त्रैलोक्याचा नाश नक्कीच होईल. हे रघूत्तमा, तुम्ही तर सर्व लोकांचे रक्षक आहात. (६३)

त्यक्‍त्वा लक्ष्मणमेवैकं त्रैलोक्यं त्रातुमर्हसि ।
रामो धर्मार्थसहितं वाक्यं तेषामनिन्दितम् ॥ ६४ ॥
सभामध्ये समाश्रुत्य प्राह सौमित्रिमञ्जसा ।
यथेष्टं गच्छ सौमित्रे मा भूत् धर्मस्य संशयः ॥ ६५ ॥
तेव्हा एकट्या लक्ष्मणाचा त्याग करून तुम्ही त्रैलोक्याचे रक्षण करावे." सभे मध्ये त्या लोकांनी उच्चारलेले, धर्म व अर्थ यांनी युक्त असणारे आणि निर्विवाद असे ते शब्द ऐकून श्रीराम लगेच लक्ष्मणाला म्हणाले, "हे लक्ष्मणा, जिकडे जायची इच्छा असेल, तिकडे तू जा. म्हणजे धर्माचा लोप होण्याची शंका येणार नाही. (६४-६५ )

परित्यागो वधो वापि सतामेवोभयं समम् ।
एवमुक्ते रघुश्रेष्ठे दुःखव्याकुलितेक्षणः ॥ ६६ ॥
त्याग आणि वध हे दोन्हीही सत्पुरुषाचे बाबतीत समान असतात." रघुश्रेष्ठांनी असे म्हटल्यावर लक्ष्मणाचे डोळे दु खाश्रूंनी डबडबून गेले. (६६)

रामं प्रणम्य सौमित्रिः शीघ्रं गृहमगात्स्वकम् ।
ततोऽगात्सरयूतीरं आचम्य स कृताञ्जलिः ॥ ६७ ॥
नव द्वाराणि संयम्य मूर्ध्नि प्राणमधारयत् ।
यदक्षरं परं ब्रह्म वासुदेवाख्यमव्ययम् ॥ ६८ ॥
पदं तत्परमं धाम चेतसा सोऽभ्यचिन्तयत् ।
वायुरोधेन संयुक्तं सर्वे देवाः सहर्षयः ॥ ६९ ॥
साग्नयो लक्ष्मणं पुष्पैः तुष्टुवुश्च समाकिरन् ।
अदृश्यं विबुधैः कैश्चित् सशरीरं च वासवः ॥ ७० ॥
गृहीत्वा लक्ष्मणं शक्रः स्वर्गलोकमथागमत् ।
ततो विष्णोश्चतुर्भागं तं देवं सुरसत्तमाः ।
सर्वे देवर्षयो दृष्ट्वा लक्ष्मणं समपूजयन् ॥ ७१ ॥
मग श्रीरामांना प्रणाम करून लक्ष्मण त्वरित आपल्या घरी गेला. तेथून तो सरयूच्या तीरावर गेला. मग आचमन करून, त्याने दोन्ही हात जोडले आणि आपल्या शरीरातील नवद्वारांचा संयम करून, आपला प्राण मस्तकात धारण केला. नंतर वासुदेव हे नाव असणारे जे अव्यय आणि अविनाशी असे परब्रह्म पद आहे, त्या परमधामाचे त्याने मनाने ध्यान सुरू केले. अशा प्रकारे प्राणनिरोध करणाऱ्या लक्ष्मणावर ऋषी व अग्नी यांच्यासह सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली आणि त्याची स्तुती केली. त्या वेळी कोणत्याही देवाला दिसणार नाही, अशा पद्धतीने इंद्राने लक्ष्मणाला स्वर्गात सदेह घेतले आणि इंद्र स्वर्गलोकी निघून गेला. नंतर विष्णूचा चतुर्थ भागरूप असणाऱ्या लक्ष्मणाला पाहून सर्व देवश्रेष्ठ आणि सर्व देवर्षी यांनी लक्ष्मणाचे पूजन केले. (६७-७१)

लक्ष्मणे हि दिवमागते हरौ
    सिद्धलोकगतयोगिनस्तदा ।
ब्रह्मणा सह समागमन्मुदा
    द्रष्टुमाहितमहाहिरूपकम् ॥ ७२ ॥
लक्ष्मणरूपी हरी स्वर्गाला गेल्यावर, सिद्धलोकात राहाणारे योगीजन ब्रह्मदेवांसह महासर्प (शेष) रूपधारी लक्ष्मणाला पाहाण्यास आनंदाने आले. (७२)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
उत्तरकाण्डे अष्टमः सर्गः ॥ ८ ॥
इतिश्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डेऽष्टमः सर्गः ॥ ८ ॥


GO TOP