॥ अद्‌भुत रामायणम् ॥


रामायणमितिख्यातं शतकोटि प्रविस्तरम् - असे म्हटले जाते की श्रीरामाचे चरित्र अर्थात् ’श्रीरामकथा’ याचा विस्तार शतकोटि श्लोकसंख्या असलेला आहे. त्यातील अधिकांश भाग ब्रह्मलोकात प्रतिष्ठित आहे असे म्हणतात. सध्या उपलब्ध असलेल्या रामायणांची संख्या १०० च्या आसपास असली तरी शतकोटि विस्तारातील पृथ्वीतलावर असलेल्या भागातही सुमारे २५०० विविध रामायणांची रचना आहे असा उल्लेख प्रस्तुत ’अद्‌भुत रामायण’ या गंथात आढळतो.

प्रस्तुत ग्रंथाचे वैशिष्य म्हणजे श्रीराम आणि सीता यांचे तात्त्विकदृष्ट्या ऐक्य आहे असे दाखविले असले तरी भर शक्ति (शाक्त) वर असल्याचे दिसते. दशमुख रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येस परतले. श्रीरामांचा राज्याभिषेक झाल्यावर दशदिशांकडून ऋषि महर्षि भेटायला आले. ते सर्व श्रीरामाची स्तुतिप्रशंसा आणि रावणकृत सीताहरणामुळे तिला रामवियोगाचे दुःख भोगावे लागले याबद्दल सहानुभुति व्यक्त करीत होते. अशा प्रसंगी सीतेने विनम्रभावाने स्वतः एका सहस्रमुखी महारावणाचा वध केल्याचा उल्लेख केला.

पुढील कथाभागानुसार सहस्रमुखी रावणाचे नाव ऐकताच श्रीराम उत्तेजित होऊन त्याचा वध करण्यास निघाले. रावणाच्या शक्तिप्रहाराने श्रीराम मूर्छित झाले. सीतेने महाकालीचे रूप घेऊन सहस्रमुखी रावणाचा वध केला व श्रीरामांना मूर्छा घालवली. सीतेचे महाकाली रौद्र रूप पाहून श्रीराम भयभीत झाले. सर्व देवतांनी श्रीरामांना तिची स्तुति करण्यास सांगितल्यावरून श्रीरामांनी सहस्रनामांनी सीतास्तुत केली तेव्हा महाकालीरूप शांत झाले व तद्‌नंतर सीतेला घेऊन श्रीराम पुनः अयोध्येस आले.

कथाक्रमात अनेक प्रसंगांचे वर्णन आहे. सीताजन्मकथा विशेषेकरून अद्‌भुतच आहे. सीतेला मंदोदरी गर्भोत्पन्न दाखवून ती रावणपुत्री असल्याचे दाखविले आहे. पण विशेष म्हणजे हे रावणास विदित नव्हते असे दाखविले आहे. नारदमुनीस मोह उत्पन्न झाल्याची कथा जरा वेगळ्या स्वरूपाची आढळते. श्रीरामांनी परशुरामाला विश्वरूप दर्शन घडवले या कथेचाही इतरत्र उल्लेख सापडत नाही. या सर्व अद्‌भुत प्रसंगांमुळे या ग्रंथास ’अद्‌भुत रामायण’ हे नाव पडले असावे असे वाटते.

इथे प्रस्तुत केलेल्या अद्‌भुत रामायणातील संस्कृत श्लोकांचा मराठी अनुवाद सांगलीवासी श्रीमती सुधा कुलकर्णी यांनी केलेला आहे.



GO TOP