॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ किष्किन्धाकाण्ड ॥ ॥ द्वितीयः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] वालीचा वध आणि भगवंतांबरोबर त्याचे संभाषण - इत्थं स्वात्मपरिष्वङ्ग निर्धूताशेषकल्मषम् । रामः सुग्रीवमालोक्य सस्मितं वाक्यमब्रवीत् ॥ १ ॥ मायां मोहकरीं तस्मिन् वितन्वन् कार्यसिद्धये । सखे त्वदुक्तं यत्तन्मां सत्यमेव न संशयः ॥ २ ॥ श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, अशा प्रकारे आपल्या शरीराच्या आलिंगनामुळे ज्याची सर्व पातके धुवून गेली होती, अशा सुग्रीवाकडे रामांनी पाहिले. मग रचत चे कार्य सिद्ध करण्यासाठी, मोह निर्माण करणारी आपली माया त्या सुग्रीवावर पसरवून, राम त्याला हसत हसत बोलले, "हे मित्रा, जे काही तू म्हणालास, ते खरे आहे यात शंका नाही." (१-२) किन्तु लोका वदिष्यन्ति मामेवं रघुनन्दनः । कृतवान्किं कपीन्द्राय सख्यं कृत्वाग्निसाक्षिकम् ॥ ३ ॥ इति लोकापवादो मे भविष्यति न संशयः । तस्मादाह्वय भद्रं ते गत्वा युद्धाय वालिनम् ॥ ४ ॥ "तथापि लोक माझ्याविषयी असे म्हणतील की, अग्नीला साक्षी ठेवून रघुनंदनांनी वानरराज सुग्रीवाशी सख्य केले, पण त्याच्यासाठी त्यांनी काय केले ? असा लोकापवाद माझ्यावर येईल, यात संशय नाही. म्हणून तू जा आणि युद्धासाठी वालीला आव्हान दे. तुझे कल्याण असो." (३-४) बाणेनैकेन् तं हत्वा राज्ये त्वामभिषेचये । तथेति गत्वा सुग्रीवः किष्किन्धोपवनं द्रुतम् ॥ ५ ॥ कृत्वा शब्दं महानादं तं आह्वयत वालिनम् । तच्छ्रुत्वा भ्रातृनिनदं रोषताम्रविलोचनः ॥ ६ ॥ निर्जगाम गृहाच्छीघ्रं सुग्रीवो यत्र वानरः । तमापतन्तं सुग्रीवः शीघ्रं वक्षस्यताडयत् ॥ ७ ॥ "एकाच बाणाने त्या वालीला ठार मारून मी तुला राज्यपदावर अभिषेक करीन." 'ठीक आहे' असे म्हणून सुग्रीव सत्वर किष्किंधा नगरीच्या उपवनात गेला आणि प्रचंड ध्वनियुक्त शब्द उचारून त्याने त्या वालीला आव्हान दिले. भावाचा तो आवाज ऐकून रागाने डोळे लाल झालेला वाली घरातून लगेच बाहेर पडला. आपल्यावर चालून येणार्या वालीला पाहून, सुग्रीवाने एका झटक्यात त्याच्या वक्षःस्थळावर प्रहार केला. (५-७) सुग्रीवमपि मुष्टिभ्यां जघान क्रोधमूर्छितः । वाली तमपि सुग्रीव एवं क्रुद्धौ परस्परम् ॥ ८ ॥ अयुद्ध्येतामेकरूपौ दृष्ट्वा रामोऽतिविस्मितः । न मुमोच तदा बाणं सुग्रीववधशङ्कया ॥ ९ ॥ क्रोधाने बेभान झालेल्या वालीने सुग्रीवावर आपल्या दोन मुठींनी प्रहार केले. सुग्रीवानेही त्याच प्रमाणे वालीवर प्रहार केले. अशा प्रकारे ते दोघे रागावून परस्परांशी लढू लागले. ते दोघेही समान रूपांचे आहेत, हे पाहून राम हा अतिशय गोंधळून गेले. (त्या दोघांतील वाली कोण आणि सुग्रीव कोण हे त्यांना कळले नाही). त्यामुळे सुग्रीवाचा वध होईल, या भीतीने त्या वेळी रामांनी आपला बाण सोडला नाही. (८-९) ततो दुद्राव सुग्रीवो वमन् रक्तं भयाकुलः । वाली स्वभवनं यातः सुग्रीवो राममब्रवीत् ॥ १० ॥ युद्धात सुग्रीव हरला. भीतीने व्याकूळ झालेला सुग्रीव रक्त ओकीत पळत सुटला. वाली आपल्या घरी परत गेला. तेव्हा सुग्रीव रामांना म्हणाला. (१०) किं मां घातयसे राम शत्रुणा भ्रातृरूपिणा । यदि मद्धनने वाञ्छा त्वमेव जहि मां विभो ॥ ११ ॥ "हे रामा, भ्रातृरूपी शत्रूकडून तुम्ही माझा घात करवीत आहात ? माझा वध व्हावा, अशी जर तुमची इच्छा असेल, तर हे विभो, तुम्ही मला मारून टाका. (११) एवं मे प्रत्ययं कृत्वा सत्यवादिन् रघूत्तम । उपेक्षसे किमर्थं मां शरणागतवत्सल ॥ १२ ॥ हे सत्यवादी, शरणागत वत्सल रघूत्तमा, मला अशा प्रकारे खात्री देऊन आता तुम्ही माझी का बरे उपेक्षा करीत आहात ?" (१२) श्रुत्वा सुग्रीववचनं रामः साश्रुविलोचनः । आलिङ्ग्य मा स्म भैषीस्त्वं दृष्ट्वा वामेकरूपिणौ ॥ १३ ॥ मित्रघातित्वमाशङ्क्य मुक्तवान्सायकं न हि । इदानीमेव ते चिह्नं करिष्ये भ्रमशान्तये ॥ १४ ॥ सुग्रीवाचे वचन ऐकल्यावर, डोळ्यांत अध्श्रू आणून आणि सुग्रीवाला आलिंगन देऊन श्रीराम त्याला म्हणाले, 'मित्रा, तू अजिबात भिऊ नकोस. तुम्ही दोघे एकाच रूपाचे आहात, हे पाहून तुझा म्हणजे माझ्या मित्राचा वध होईल, या भीतीने मी बाण सोडला नाही. माझा गोंधळ दूर करण्यासाठी मी तुझ्या शरीरावर काही तरी खूण करतो.' (१३-१४) गत्वाह्वय पुनः शत्रुं हतं द्रक्ष्यसि वालिनम् । रामोऽहं त्वां शपे भ्रातः हनिष्यामि रिपुं क्षणात् ॥ १५ ॥ "आता जाऊन तू पुन्हा शत्रूला आव्हान दे. मग वाली मेलेलाच तुला दिसेल. हे बंधू मी राम तुला शपथ घेऊन सांगतो की, मी एका क्षणात तुझ्या शत्रूला ठार करीन." (१५) इत्याश्वस्य स सुग्रीवं रामो लक्ष्मणमब्रवीत् । सुग्रीवस्य गले पुष्प मालामामुच्य पुष्पिताम् ॥ १६ ॥ प्रेषयस्व महाभाग सुग्रीवं वालिनं प्रति । लक्ष्मणस्तु तदा बद्ध्वा गच्छ गच्छेति सादरम् ॥ १७ ॥ प्रेषयामास सुग्रीवं सोऽपि गत्वा तथाकरोत् । पुनरप्यद्भुतं शब्दं कृत्वा वालीनमाह्वयत् ॥ १८ ॥ अशा प्रकारे सुग्रीवाला आश्वासन देऊन श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, "हे महाभागा, सुग्रीवाच्या गळ्यात एक फुललेल्या फुलांची माळ घालून, त्याला वालीकडे पाठव." तेव्हा लक्ष्मणाने सुग्रीवाच्या गळ्यात माळ घातली आणि आदरपूर्वक ' जा, जा ' असे म्हणून त्याने सुग्रीवाला पाठविले. सुग्रीवानेसुद्धा वालीकडे जाऊन पूर्वीप्रमाणेच विलक्षण आवाज काढून वालीला आव्हान दिले. (१६-१८) तच्छ्रुत्वा विस्मितो वाली क्रोधेन महतावृतः । बद्ध्वा परिकरं सम्यक् गमनायोपचक्रमे ॥ १९ ॥ सुग्रीवाचे ते शब्द ऐकून वाली विस्मयचकित झाला. तो अतिशय कुद्ध झाला. मग योग्य प्रकारे कंबर कसून तो जाण्यास तयार झाला. (१९) गच्छन्तं वालिनं तारा गृहीत्वा निषिषेध तम् । न गन्तव्यं त्वयेदानीं शङ्का मेऽतीव जायते ॥ २० ॥ वाली निघालेला पाहून तारा नावाच्या त्याच्या पत्नीने त्याचा हात धरून त्याला थांबवले आणि ती त्याला म्हणाली, स्वामी, आत्ताच आपण जाऊ नये. मला फार शंका वाटते. (२०) इदानीमेव ते भग्नः पुनरायाति सत्वरः । सहायो बलवांस्तस्य कश्चिन्नूनं समागतः ॥ २१ ॥ कारण सुग्रीव पराभूत होऊन पळून गेला होता. आणि तोच पुनः लगेच परत आला आहे. मला वाटते की खरोखरच त्याला सहाय्य करणारा कोणी तरी बलवान पुरुष भेटला आहे. (२१) वाली तामाह हे सुभ्रु शङ्का ते व्येतु तद्गता । प्रिये करं परित्यज्य गच्छ गच्छामि तं रिपुम् ॥ २२ ॥ हत्वा शीघ्रं समायास्ये सहायस्तस्य को भवेत् । सहायो यदि सुग्रीवः ततो हत्वोभयं क्षणात् ॥ २३ ॥ आयास्ये मा शुचः शूरः कथं तिष्ठेद् गृहेरिपुम् । ज्ञात्वाप्याह्वयमानं हि हत्वायास्यामि सुन्दरि ॥ २४ ॥ वाली तिला म्हणाला, "हे सुंदरी, त्या सुग्रीवाविषयीची तुझी शंका सोडून दे. लाडके, माझा हात सोड आणि तू परत जा. आता मी त्या शत्रूकडे जातो आणि त्याला ठार करून लगेच परत येतो. त्या सुग्रीवाला सहाय्य करणारा कोण बरे असेल ? कुणी सुग्रीवाचा सहायक असेल तर त्या दोघांनाही क्षणात ठार करून मी परत येईन. हे सुंदरी, तू मुळीच चिंता करू नकोस. आव्हान देणारा शत्रू आला आहे हे कळल्यावर कोणी शूर घरात कसा बरे थांबेल ? लक्षात ठेव, शत्रूला नक्कीच ठार करून मी परत येईन." (२२-२४) तारोवाच मत्तोऽन्यच्छृणु राजेन्द्र श्रुत्वा कुरु यथोचितम् । आह मामङ्गदः पुत्रो मृगयायां श्रुतं वचः ॥ २५ ॥ तारा म्हणाली-"हे राजेंद्रा, मी आणखी जे काही सांगते ते तुम्ही ऐका. मग तुम्हांला उचित वाटेल ते तुम्ही करा. मृगयेसाठी वनात गेलेल्या आपल्या अंगद नावाच्या पुत्राने जे ऐकले ते त्याने मला सांगितले आहे. (२५) अयोध्याधिपतिः श्रीमान् रामो दाशरथिः किल । लक्ष्मणेन सह भ्राता सीतया भार्यया सह ॥ २६ ॥ आगतो दण्डकारण्यं तत्र सीता हृता किल । रावणेन सह भ्राता मार्गमाणोऽथ जानकीम् ॥ २७ ॥ आगतो ऋष्यमूकाद्रिं सुग्रीवेण समागतः । चकार तेन सुग्रीवः सख्यं चानलसाक्षिकम् ॥ २८ ॥ असे म्हणतात की अयोध्येचे अधिपती, दशरथांचे पुत्र, श्रीमान् राम लक्ष्मण या आपल्या भावासह आणि सीता या पत्नीसह दंडकारण्यात आले आहेत. तेथे रावणाने सीतेचे अपहरण केले. तेव्हा जानकीचा शोध करीत राम भावासह ऋष्यमूक, पर्वतावर आले असून त्यांची सुग्रीवाशी भेट झाली आहे आणि अग्नीला साक्षी ठेवून सुग्रीवाने त्यांच्याशी सख्य केले. (२६-२८) प्रतिज्ञां कृतवान् रामः सुग्रीवाय सलक्ष्मणः । वालिनं समरे हत्वा राजानं त्वां करोम्यहम् ॥ २९ ॥ लक्ष्मणासह असणार्या रामांनी सुग्रीवापुढे अशी प्रतिज्ञा केली आहे की, 'युद्धात वालीला मारून हे सुग्रीवा, मी तुला राजा करीन.' (२९) इति निश्चित्य तौ यातौ निश्चितं शृणु मद्वचः । इदानीमेव ते भग्नः कथं पुनरुपागतः ॥ ३० ॥ असा निश्चय करून ते दोघेही सुग्रीवाबरोबर आले आहेत, असे मला निश्चितपणे वाटते. तेव्हा माझे म्हणणे ऐका. नाही तर आत्ताच तुमच्याकडून पराभूत होऊन गेलेला तो सुग्रीव कसा बरे पुनः परत आला असता ? (३०) अतस्त्वं सर्वथा वैरं त्यक्त्वा सुग्रीवमानय । यौवराज्येऽभिषिञ्चाशु रामं त्वं शरणं व्रज ॥ ३१ ॥ म्हणून सुग्रीवाबरोबरचे वैर संपूर्णपणे टाकून देऊन, तुम्ही सुग्रीवाला इकडे आणा. त्वरित त्याच्यावर यौवराज्य अभिषेक करा आणि तुम्ही रामांना शरण जा. (३१) पाहि मामङ्गदं राज्यं कुलं च हरिपुङ्गव । इत्युक्त्वाश्रुमुखी तारा पादयोः प्रणिपत्य तम् ॥ ३२ ॥ हस्ताभ्यां चरणौ धृत्या रुरोद भयविह्वला । तामालिङ्ग्य तदा वाली सस्नेहमिदमब्रवीत् ॥ ३३ ॥ हे वानरश्रेष्ठा, माझे, अंगदाचे, राज्याचे आणि कुळाचे रक्षण करा." असे बोलून, अश्रू ढाळत तारा त्याच्या पाया पडली आणि आपल्या दोन्ही हातांनी त्याचे पाय धरून, भयाने विव्हल होऊन ती रडू लागली. तेव्हा प्रेमाने आलिंगन देऊन वाली तिला म्हणाला. (३२-३३) स्त्रीस्वभावाद्बिभेषि त्वं प्रिये नास्ति भयं मम । रामो यदि समायातो लक्ष्मणेन समं प्रभुः ॥ ३४ ॥ तदा रामेण मे स्नेहो भविष्यति न संशयः । रामो नारायणः साक्षात् अवतीर्णोऽखिलप्रभुः ॥ ३५ ॥ भूभारहरणार्थाय श्रुतं पूर्वं मयानघे । स्वपक्षः परपक्षो वा नास्ति तस्य परात्मनः ॥ ३६ ॥ "लाडके, आपल्या स्त्रीस्वभावामुळे तू उगीचच भीत आहेस. मला कोणत्याही प्रकारे भय दिसत नाही. जर लक्ष्मणासह प्रभू राम येथे आले असतील तर श्रीरामांबरोबर माझा स्नेह होईल, यात शंका नाही. हे कल्याणी, राम हे सर्वांचे स्वामी साक्षात नारायण असून ते भूमीचा भार हरण करण्यासाठी अवतरले आहेत, असे मी पूर्वीच ऐकले आहे. त्या परमात्म्यांना स्वतःचा पक्ष आणि दुसर्याचा पक्ष असा भेद असणार नाही. (३४-३६) आनेष्यामि गृहं साध्वि नत्वा तच्चरणाम्बुजम् । भजतोऽनुभजत्येष भक्तिगम्यः सुरेश्वरः ॥ ३७ ॥ हे साध्वी, त्यांच्या पदकमलांना वंदन करून मी त्यांना घरी आणीन. देवांचा ईश्वर असलेले श्रीराम भक्तीने प्राप्त होणारे आहेत. आणि जो त्यांचा आश्रय घेतो त्याला ते आपलेसे करतात. (३७) यदि स्वयं समायाति सुग्रीवो हन्मि तं क्षणात् । यदुक्तं यौवराज्याय सुगीवस्याभिषेचनम् ॥ ३८ ॥ कथमाहूयमानोऽहं युद्धाय रिपुणा प्रिये । शूरोऽहं सर्वलोकानां सम्मतः शुभलक्षणे ॥ ३९ ॥ भीतभीतमिदं वाक्यं कथं वाली वदेत्प्रिये । तस्माच्छोकं परित्यज्य तिष्ठ सुन्दरि वेश्मनि ॥ ४० ॥ या उलट जर सुग्रीव स्वतःच म्हणजे एकटाच आला असेल तर मी त्याला एका क्षणात मारून टाकीन. आता तू सुग्रीवाच्या यौवराज्याभिषेकाच्या बाबतीत जे काही म्हणालीस, त्या बाबतीत माझे म्हणणे असे आहे की, हे प्रिये, शत्रूने युद्धासाठी आव्हान दिले असताना, मी तसे कसे बरे करू ? हे शुभलक्षणी, सर्व लोकांमध्ये मान्यता असणारा, शूर असणारा मी वाली घाबरून असे शब्द कसे बरे बोलणार ? म्हणून हे सुंदरी, भीती टाकून देऊन घरात स्वस्थ बैस. " (३८-४०) एवमाश्वास्य तारां तां शोचन्तीमश्रुलोचनाम् । गतो वाली समुद्युक्तः सुग्रीवस्य वधाय सः ॥ ४१ ॥ अशा प्रकारे शोक करणार्या आणि डोळ्यांत अश्रू आलेल्या त्या तारेला आश्वासन देऊन, सुग्रीवाचा वध करण्यास उद्युक्त झालेला वाली युद्धासाठी निघाला. (४१) दृष्ट्वा वालीनमायान्तं सुग्रीवो भीमविक्रमः । उत्पपात गले बद्ध पुष्पमालो मतङ्गवत् ॥ ४२ ॥ वालीला येताना पाहून प्रचंड पराक्रम असणारा आणि गळ्यात पुष्पमाला बांधलेला सुग्रीव एखाद्या माजलेल्या हत्तीप्रमाणे चवताळला. (४२) मुष्टिभ्यां ताडयामास वालिनं सोऽपि तं तथा । अहन्वाली च सुग्रीवं सुग्रीवो वालिनं तथा ॥ ४३ ॥ सुग्रीवाने दोन्ही मुठींनी वालीला मारले. वालीनेसुद्धा सुग्रीवाला तसेच तडाखे दिले. सुग्रीवाने वालीला बडविले तसेच वालीनेही सुग्रीवाला तडाखे दिले. (४३) रामं विलोकयन्नेव सुग्रीवो युयुधे युधि । इत्येवं युद्ध्यमानौ तौ दृष्ट्वा रामः प्रतापवान् ॥ ४४ ॥ बाणमादाय तूणीरात् ऐन्द्रे धनुषि सन्दधे । आकृष्य कर्णपर्यन्तं अदृश्यो वृक्षखण्डगः ॥ ४५ ॥ निरीक्ष्य वालिनं सम्यक् लक्ष्यं तद्धृदयं हरिः । उत्ससर्जाशनिसमं महावेगं महाबलः ॥ ४६ ॥ त्या युद्धात सुग्रीव श्रीरामांकडे पाहात युद्ध करीत होता. अशा प्रकारे लढणार्या त्या दोघांना पाहिल्यावर, पराक्रमी श्रीरामांनी भात्यातून एक बाण घेतला आणि आपल्या ऐंद्र धनुष्यावर चढविला. ते एका वृक्षाच्या आड वालीला न दिसेल अशा पद्धतीने उभे राहिले. त्यानंतर वालीकडे नीट पाहून, धनुष्याची दोरी कानापर्यंत खेचून, आणि त्याच्या हृदयाला अचूक लक्ष्य करून, महाबलवान श्रीरामांनी वज्राप्रमाणे कठोर आणि प्रचंड वेगवान असलेला बाण सोडला. (४४-४६) बिभेद स शरो वक्षो वालिनः कम्पयन्महीम् । उत्पपात महाशब्दं मुञ्चन्स निपपात ह ॥ ४७ ॥ त्या बाणाने वालीच्या हृदयाचा वेध घेतला. भयंकर आवाज करीत आणि पृथ्वीला कापवीत वाली वर उडाला आणि नंतर खाली जमिनीवर पडला. (४७) तदा मुहूर्तं निःसंज्ञो भूत्वा चेतनमाप सः । ततो वाली ददर्शाग्रे रामं राजीवलोचनम् । धनुरालम्ब्य वामेन हस्तेनान्येन सायकम् ॥ ४८ ॥ बिभ्राणं चीरवसनं जटामुकुटधारिणम् । विशालवक्षसं भ्राजत् वनमालाविभूषितम् ॥ ४९ ॥ पीनचार्वायतभूजं नवदूर्वादलच्छविम् । सुग्रीवलक्ष्मणाभ्यां च पार्श्वयोः परिसेवितम् ॥ ५० ॥ एक मुहूर्तभर बेशुद्ध पडलेला वाली भानावर आला तेव्हा त्याला कमलनयन राम समोर दिसले. रामांनी डाव्या हातात धनुष्य पकडले होते आणि दुसर्या उजव्या हाताने बाण धरलेला होता; त्यांनी वल्कल-वस्त्र परिधान केले होते; जटारूपी मुकुट त्यांनी धारण केला होता; त्यांचे वक्षःरथळ विशाल होते: मनोहर वनमालेने ते विभूषित होते; त्यांचे बाहू पुष्ट, सुंदर आणि दीर्घ होते; नवीन दूर्वादलाप्रमाणे त्यांच्या शरीराची कांती होती; त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहून लक्ष्मण आणि सुग्रीव त्यांची सेवा करीत होते. (४८-५०) विलोक्य शनकैः प्राह वाली रामं विगर्हयन् । किं मयापकृतं राम तव येन हतोऽस्म्यहम् ॥ ५१ ॥ श्रीरामांना पाहिल्यावर त्याची निंदा करीत वाली क्षीण स्वरात बोलू लागला, 'अहो रामा, मी तुमचा काय अपराध केला होता म्हणून तुम्ही मला मारले ? (५१) राजधर्ममविज्ञाय गर्हितं कर्म ते कृतम् । वृक्षखण्डे तिरोभूत्वा त्यजता मयि सायकम् ॥ ५२ ॥ झाडाच्या मागे दडून माझ्यावर बाण सोडलात. हे निंद्य कर्म तुम्ही राजधर्म न जाणल्यामुळे केले आहे. (५२) यशः किं लप्स्यसे राम चोरवत् कृतसङ्गरः । यदि क्षत्रियदायादो मनोर्वंशसमुद्भवः ॥ ५३ ॥ युद्धं कृत्वा समक्षं मे प्राप्यसे तत्फलं तदा । सुग्रीवेण कृतं किं ते मयावा न कृतं किमु ॥ ५४ ॥ अहो रामा, चोराप्रमाणे युद्ध करून तुम्हाला काय कीर्ती मिळणार आहे ? तुम्ही जर क्षत्रियकुळातील असाल आणि जर मनूच्या वंशात जन्माला आला असाल तर माझ्याशी समोरासमोर युद्ध करायला हवे होते. मग तुम्हाला त्याचे फळ (कीर्ती किंवा स्वर्ग प्राप्ती) मिळाले असते. सुग्रीवाने तुमचे कोणते कार्य केले आहे ? आणि मी कोणते कार्य केले नाही ? (५३-५४) रावणेन हृता भार्या तव राम महावने । सुग्रीवं शरणं यातः तदर्थमिति शुश्रुम ॥ ५५ ॥ अहो रामा, घोर अरण्यात तुमची पत्नी रावणाने हरण करून नेली आणि तिच्या शोधासाठी तुम्ही सुग्रीवाला शरण गेला, असे मी ऐकले आहे. (५५) बत राम न जानीषे मद्बलं लोकविश्रुतम् । रावण सकुलं बद्ध्वा ससीतं लङ्कया सह ॥ ५६ ॥ आनयामि मुहूर्त्तार्द्धात् यदि चेच्छामि राघव । धर्मिष्ठ इति लोकेऽस्मिन् कथ्यसे रघुनन्दन ॥ ५७ ॥ परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की, हे रामा, विश्वामध्ये प्रसिद्ध असलेले माझे सामर्थ्य तुम्ही जाणत नाही. हे राघवा, मला वाटले तर मी अर्ध्या मुहूर्तात लंका, सीता आणि त्या रावणाचे कुळ या सर्वांसह रावणाला बांधून आणीन. शिवाय हे रघुनंदना, या लोकात असे म्हटले जाते की तुम्ही मोठे धर्मात्मा आहात. (५६-५७) वानरं व्याधवद्धत्वा धर्मं कं लप्स्यसे वद । अभक्ष्यं वानरं मांसं हत्वा मां किं करिष्यसि ॥ ५८ ॥ मग मला सांगा की एखाद्या व्याधाप्रमाणे वानराला मारून कोणते पुण्य तुम्हांला मिळाले ? वानराचे मांस हे खाण्यास योग्य नाही. तेव्हा मला ठार मारून तुम्ही काय मिळविलेत ?" (५८) इत्येवं बहु भाषन्तं वालिनं राघवोऽब्रवीत् । धर्मस्य गोप्ता लोकेऽस्मिन् चरामि सशरासनः ॥ ५९ ॥ अशा प्रकारे बरेच बोलणार्या वालीला राघव म्हणाले, "धर्माचा रक्षक या नात्याने धनुष्य धारण करून मी या जगात हिंडत आहे. (५९) अधर्मकारिणं हत्वा सद्धर्मं पालयाम्यहम् । दुहिता भगिनी भ्रातुः भार्या चैव तथा स्नुषा ॥ ६० ॥ समा यो रमते तासां एकामपि विमूढधीः । पातकी स तु विज्ञेयः स वधो राजभिः सदा ॥ ६१ ॥ अधर्म करणार्यांना ठार करून मी चांगल्या धर्माचे पालन करतो. हे बघ, स्वतःची कन्या, बहीण, भावाची बायको तसेच सून या चारही स्त्रिया समान आहेत. बुद्धी भ्रष्ट झालेला जो मनुष्य या चौघींपैकी एकीशीही रमतो, तो पातकी आहे असे मानतात आणि म्हणून राजांनी त्याचा वध करणे योग्य आहे. (६०-६१) त्वं तु भ्रातुः कनिष्ठस्य भार्यायां रमसे बलात् । अतो मया धर्मविदा हतोऽसि वनगोचर ॥ ६२ ॥ तू बळजबरीने धाकट्या भावाच्या बायकोबरोबर रमत आहेस. म्हणून हे वानरा, धर्म जाणणार्या मी तुला मारले आहे. (६२) त्वं कपित्वान्न जानीषे महान्तो विचरन्ति यत् । लोकं पुनानाः सञ्चारैः अतस्तान् नातिभाषयेत् ॥ ६३ ॥ तू वानर असल्यामुळे तुला हे माहीत नाही की आपल्या आचरणांनी जगाला पवित्र करीत महापुरुष या जगात फिरत असतात. त्यांच्याशी मर्यादा सोडून बोलू नये." (६३) तच्छ्रुत्वा भयसन्त्रस्तो ज्ञात्वा रामं रमापतिम् । वाली प्रणम्य रभसाद् रामं वचनमब्रवीत् ॥ ६४ ॥ हे रामाचे वचन ऐकल्यावर, भीतीने संत्रस्त झालेल्या वालीने जाणले की राम हे लक्ष्मीचे पती नारायण आहेत आणि लगेच त्यांना प्रणाम करून तो म्हणाला. (६४) राम राम महाभाग जाने त्वां परमेश्वरम् । अजानता मया किञ्चित् उक्तं तत्क्षन्तुमर्हसि ॥ ६५ ॥ "हे रामा, हे महाभाग रामा, तुम्ही परमेश्वर आहात, हे मला आता कळले. ते न समजता मी जे काही म्हटले, त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा. (६५) साक्षात्त्वच्छरघातेन विशेषेण तवाग्रतः । त्यजाम्यसून्महायोगि दुर्लभं तव दर्शनम् ॥ ६६ ॥ तुमच्या बाणाच्या प्रत्यक्ष आघाताने आणि विशेष म्हणजे तुमच्यासमोर मी प्राण सोडीत आहे. महायोगी लोकांनासुद्धा तुमचे दर्शन दुर्लभ आहे. (६६) यन्नाम विवशो गृह्णन् म्रियमाणः परं पदम् । याति साक्षात्स एवाद्य मुमूर्षोर्मे पुरः स्थितः ॥ ६७ ॥ मरणार्या माणसाने कसे का होईना; ज्यांचे नाव घेतले तर तो परमपदी जातो, ते तुम्ही आता मरत असलेल्या माझ्यापुढे साक्षात उभे आहात. (६७) देव जानामि पुरुषं त्वां श्रियं जानकीं शुभम् । रावणस्य वधार्थाय जातं त्वां ब्रह्मणार्थितम् ॥ ६८ ॥ हे देवा, मला आता कळले आहे की तुम्ही साक्षात् परम पुरुष नारायण आहात व शुभलक्षणी जानकी ही लक्ष्मी आहे. तसेच रावणाचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे तुम्ही अवतार घेतला आहे. (६८) अनुजानीहि मां राम यान्तं तत्पदमुत्तमम् । मम तुल्यबले बाले अङ्गदे त्वं दयां कुरु ॥ ६९ ॥ हे रामा, आता मी तुमच्या त्या परमपदी जात आहे. तुम्ही मला अनुज्ञा द्या. माझ्याप्रमाणेच सामर्थ्य असणारा माझा पुत्र जो अंगद त्याचेवर तुम्ही दया करा. (६९) विशल्यं कुरु मे राम हृदयं पाणिना स्पृशन् । तथेति बाणमुद्धृत्य रामः पस्पर्श पाणिना । हे रामा, तुमच्या हाताने माझ्या हृदयाला स्पर्श करून तुम्ही बाण काढून घ्या." "ठीक आहे" असे म्हणून बाण उपसून काढून श्रीरामांनी आपल्या हाताने वालीला स्पर्श केला. त्याच क्षणी तो वानरदेह टाकून देवश्रेष्ठ झाला. (७०) त्यक्त्वा तद्वानरं देहं अमरेन्द्रोऽभवत्क्षणात् ॥ ७० ॥ वाली रघूत्तमशराभिहतो विमृष्टो रामेण शीतलकरेण सुखाकरेण । सद्यो विमुच्य कपिदेहमनन्यलभ्यं प्राप्तं पदं परमहंसगणैर्दुरापम् ॥ ७१ ॥ आपल्या सुखकारक शीतल हाताने श्रीरामांनी वालीला स्पर्श केला आणि रघूत्तमांच्या बाणाने वाली मारला गेला म्हणून तत्काळ वानरदेह टाकून तो परमपदाला गेला. ते पद परमहंस संन्याशी लोकांनासुद्धा मिळणे कठीण आहे. मग इतरांची काय कथा ? (७१) इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किन्धाकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥ इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किंधाकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥ |