लंकाया दहनं रक्शसां वानराणां च घोरं युद्धम् -
|
लंकापुरीचे दहन तसेच राक्षसांचे आणि वानरांचे भयंकर युद्ध -
|
ततोऽब्रवीन्महातेजाः सुग्रीवो वानराधिपः । अर्थ्यं विज्ञापयंश्चापि हनुमन्तमिदं वचः ॥ १ ॥
|
त्यानंतर महातेजस्वी वानरराज सुग्रीवाने हनुमानांना पुढील कर्तव्य सूचित करण्यासाठी म्हटले - ॥१॥
|
यतो हतः कुंभकर्णः कुमाराश्च निषूदिताः । न इदानीमुपनिर्हारं रावणो दातुमर्हति ॥ २ ॥
|
कुंभकर्ण मारला गेला. राक्षसराजाच्या पुत्रांचाही संहार झाला म्हणून आता रावण लंकापुरीच्या रक्षणाचा काही प्रबंध करू शकत नाही. ॥२॥
|
ये ये महाबलाः सन्ति लघवश्च प्लवंगमाः । लङ्कामभिपतन्त्वाशु गृह्योल्काः प्लवगर्षभाः ॥ ३ ॥
|
म्हणून आपल्या सेनेमध्ये जे जे महाबली आणि शीघ्रगामी वानर असतील ते सर्व हातात मशाली घेऊन शीघ्रच लंकापुरीवर आक्रमण करोत. ॥३॥
|
ततोऽस्तं गत आदित्ये रौद्रे तस्मिन् निशामुखे । लङ्कां अभिमुखाः सोल्का जग्मुस्ते प्लवगर्षभाः ॥ ४ ॥
|
सुग्रीवाच्या त्या आज्ञेनुसार सूर्यास्त झाल्यावर भयंकर प्रदोषकाळामध्ये ते सर्व श्रेष्ठ वानर हातात मशाली घेऊन लंकेकडे जाऊ लागले. ॥४॥
|
उल्काहस्तैर्हरिगणैः सर्वतः समभिद्रुताः । आरक्षस्था विरूपाक्षाः सहसा विप्रदुद्रुवुः ॥ ५ ॥
|
जेव्हा उल्काधारी वानरांनी सर्व बाजूंनी आक्रमण केले, तेव्हा द्वार-रक्षणासाठी नियुक्त झालेले राक्षस एकाएकी पळून गेले. ॥५॥
|
गोपुराट्टप्रतोलीषु चर्यासु विविधासु च । प्रासादेषु च संहृष्टाः ससृजुस्ते हुताशनम् ॥ ६ ॥
|
ते गोपुरे, अट्टालिका, रस्ते, नाना प्रकारच्या गल्ल्या आणि महालांत मोठ्या हर्षाने आग लावू लागले. ॥६॥
|
तेषां गृहसहस्राणि ददाह हुतभुक् तदा । प्रासादाः पर्वताकाराः पतन्ति धरणीतले ॥ ७ ॥
|
वानरांनी लावलेली ती आग त्या समयी हजारो घरांना जाळू लागली. पर्वताकार प्रासाद धराशायी होऊ लागले. ॥७॥
|
अगरुर्दह्यते तत्र परं चैव सुचंदनम् । मौक्तिका मणयः स्निग्धा वज्रं चापि प्रवालकम् ॥ ८ ॥
|
कोठे अगुरू जळत होते तर कोठे उत्तम चंदन ! मोती, स्निग्ध मणि, हिरे आणि प्रवाळ (पोवळी) ही दग्ध होत होती. ॥८॥
|
क्षौमं च दह्यते तत्र कौशेयं चापि शोभनम् । आविकं विविधं चौर्णं काञ्चनं भाण्डमायुधम् ॥ ९ ॥
|
तेथे क्षौम (यव अथवा अंबाडी अथवा तागाच्या तंतूनी बनविलेली) वस्त्रेही दग्ध होत होती आणि सुंदर रेशमी वस्त्रेही. मेंढीच्या केसापासून बनविलेल्या कांबळी, नाना प्रकारची लोकरीची वस्त्रे, सोन्याची आभूषणे आणि अस्त्र-शस्त्रेही जळत होती. ॥९॥
|
नानाविकृतसंस्थानं वाजिभाण्डपरिच्छदम् । गजग्रैवेयकक्ष्याश्च रथभाण्डाश्च संस्कृतान् ॥ १० ॥
|
घोड्यांचे दागिने, जीन आदि उपकरणी, जी अनेक प्रकारची आणि विचित्र आकाराची होती, दग्ध होत होती. हत्तीच्या गळ्यातील आभूषणे, त्याला कसण्याची दोरी तसेच रथांची उपकरणे जी सुंदर बनविलेली होती, सर्वच्या सर्व आगीत जळून भस्म होत होती. ॥१०॥
|
तनुत्राणि च योधानां हस्त्यश्वानां च वर्म च । खड्गा धनूंषि ज्याबाणाः तोमराङ्कुशशक्तयः ॥ ११ ॥ रोमजं वालजं चर्म व्याघ्रजं चाण्डजं बहु । मुक्तामणिविचित्रांश्च प्रासादांश्च समन्ततः ॥ १२ ॥ विविधानस्त्रसंघातान् अग्निर्दहति तत्र वै ।
|
योद्ध्यांची कवचे, हत्ती आणि घोड्यांची चिलखते, खड्ग, धनुष्य, प्रत्यञ्चा, बाण तोमर, अंकुश, शक्ति, रोमज (कांबळी वगैरे), वालज (चवरी आदि) आसनोपयोगी व्याघ्रचर्म, अण्डज (कस्तुरी आदि), मोती आणि मणि जडविलेले विचित्र महाल आणि नाना प्रकारचे अस्त्रसमूह - या सर्वांना सर्व बाजूला पसरलेली आग जाळून टाकत होती. ॥११-१२ १/२॥
|
नानाविधान् गृहान् चित्रान् ददाह हुतभूक् तदा ॥ १३ ॥ आवासान् राक्षसानां च सर्वेषां गृहगृध्नुनाम् । हेमचित्रतनुत्राणां स्रग्भांडाम्बरधारिणाम् ॥ १४ ॥
|
त्यासमयी अग्निदेवांनी नाना प्रकारच्या विचित्र गृहांना दग्ध करण्यास आरंभ केला. जे घरात आसक्त होते, सोन्याची विचित्र कवचे धारण केलेली होती तसेच हार, आभूषणे आणि वस्त्रांनी विभूषित होते त्या सर्व राक्षसांची आवासस्थाने आगीच्या ज्वालांत सापडली. ॥१३-१४॥
|
सीधुपानचलाक्षाणां मदविह्वलगामिनाम् । कान्तालम्बितवस्त्राणां शत्रुसञ्जातमन्युनाम् ॥ १५ ॥ गदाशूलासिहस्तानां खादतां पिबतामपि । शयनेषु महार्हेषु प्रसुप्तानां प्रियैः सह ॥ १६ ॥ त्रस्तानां गच्छतां तूर्णं पुत्रानादाय सर्वतः । तेषां शतसहस्राणि तदा लङ्कानिवासिनाम् ॥ १७ ॥ अदहत् पावकस्तत्र जज्वाल च पुनः पुनः ।
|
मदिरापानाने ज्यांचे नेत्र चंचल होत होते, जे नशेने विव्हळ होऊन अडखळत चालत होते, ज्यांच्या वस्त्रांना त्यांच्या प्रेयसी स्त्रियांनी पकडून ठेवले होते, जे खाण्या-पिण्यात मग्न होते, जे बहुमूल्य शय्यांवर आपल्या प्राणवल्लभांच्या संगतीत शयन करत होते, तसेच जे आगीने भयभीत होऊन आपल्या पुत्रांना आपल्या हृदयाशी धरून सर्वबाजूस तीव्र गतीने पळून जात होते, अशा लाखो लंकानिवासी लोकांना त्यासमयी अग्निने जाळून भस्म करून टाकले. ती आग तेथे पुन्हा पुन्हा प्रज्वलित होत होती. ॥१५-१७ १/२॥
|
सारवन्ति महार्हाणि गंभीरगुणवन्ति च ॥ १८ ॥ हेमचन्द्रार्धचन्द्राणि चन्द्रशालोन्नतानि च । तत्र चित्रगवाक्षाणि साधिष्ठानानि सर्वशः ॥ १९ ॥ मणिविद्रुमचित्राणि स्पृशन्तीव दिवाकरम् । क्रौञ्चबर्हिणवीणानां भूषणानां च निस्वनैः ॥ २० ॥ नादितान्यचला भानि वेश्मान्यग्निर्ददाह सः ।
|
जी अनेक मजबूत आणि बहुमूल्य बनलेली होती, गांभीर्य गुणांनी युक्त होती, अनेकानेक देवड्या, तटबंदी, आंतरिक गृहे, द्वारे आणि उपद्वारांच्यामुळे दुर्गम प्रतीत होत होती, जी सुवर्णनिर्मित अर्धचंद्र अथवा पूर्णचंद्राच्या आकारात बनलेली होती, अट्टालिकांच्यामुळे फार उंच दिसून येत होती, विचित्र झरोखे ज्यांची शोभा वाढवत होते; ज्यामध्ये सर्वत्र झोपण्या-बसण्यासाठी शय्या-आसने आदि सुसज्जित होती, जी आपल्या उंचीमुळे जणु सूर्यदेवास स्पर्श करत होती; जिच्यामध्ये क्रौञ्च आणि मोरांचा कलरव, वीणेचा मधुर ध्वनि तसेच भूषणांचा झणत्कार गुंजत होता आणि जी पर्वतकार दिसून येत होती त्या सर्व गृहांना प्रज्वलित आगीने जाळून टाकले. ॥१८-२० १/२॥
|
ज्वलनेन परीतानि तोरणानि चकाशिरे ॥ २१ ॥ विद्युद्भिरिव नद्धानि मेघजालानि धर्मगे ।
|
आगीने घेरलेल्या लंकेचे बाहेरील दरवाजे ग्रीष्मऋतु मध्ये विद्युत् मालामण्डित मेघसमूहांच्या समान प्रकाशित होत होते. ॥२१ १/२॥
|
ज्वलनेन परीतानि गृहाणि प्रचकाशिरे ॥ २२ ॥ दावाग्निदीप्तानि यथा शिखराणि महागिरेः ।
|
अग्निच्या ज्वाळांनी वेढलेल्या लंकापुरीतील घरे दावाग्निने दग्ध होत असलेल्या मोठमोठ्या पर्वतांच्या शिखरांप्रमाणे भासत होती. ॥२२ १/२॥
|
विमानेषु प्रसुप्ताश्च दह्यमाना वराङ्गनाः ॥ २३ ॥ त्यक्ताभरणसंयोगा हा हेत्युच्चैर्विचुक्रुशुः ।
|
सातमजली भवनात झोपलेल्या सुंदरी जेव्हा आगीने दग्ध होऊ लागल्या त्यासमयी सर्व आभूषणांना फेकून हाय हाय करीत उच्चस्वरात चीत्कार करू लागल्या. ॥२३ १/२॥
|
तत्र चाग्निपरीतानि निपेतुर्भवनान्यपि ॥ २४ ॥
वज्रिवज्रहतानीव शिखराणि महागिरेः।
|
तेथे आगीच्या ज्वाळात सापडलेली कित्येक भवने इंद्राच्या वज्राच्या माराने धराशायी होणार्या महान पर्वत शिखराप्रमाणे धराशायी होत होती. ॥२४ १/२॥
|
तानि निर्दह्यमानानि दूरतः प्रचकाशिरे ॥ २५ ॥ हिमवत् शिखराणीव दह्यमानानि सर्वशः ।
|
ती जळणारी गगनचुंबी भवने लांबून जणु हिमालयाची शिखरे सर्व बाजूनी दग्ध होत असावी अशी भासत होती. ॥२५ १/२॥
|
हर्म्याग्रैः दह्यमानैश्च ज्वालाप्रज्वलितैरपि ॥ २६ ॥ रात्रौ सा दृश्यते लङ्का पुष्पितैरिव किंशुकैः ।
|
अट्टालिकांची जळत असणारी शिखरे उफाळणार्या ज्वालांनी आवेष्टित होत होती. रात्री त्यांच्यामुळे उपलक्षित होणारी लंकापुरी फुललेल्या पलाश पुष्पांनी युक्त असल्याप्रमाणे दिसत होती. ॥२६ १/२॥
|
हस्त्यध्यक्षैः गजैर्मुक्तैः मुक्तैश्च तुरगैरपि । बभूव लङ्का लोकान्ते भ्रान्तग्राह इवार्णवः ॥ २७ ॥
|
हत्तींच्या अध्यक्षांनी हत्तींना आणि अश्वाध्यक्षांनी अश्वांनाही सोडून दिले होते. ते तेथे इकडे तिकडे पळत होते; त्यामुळे लंकापुरी प्रलयकाळात भ्रांत होऊन फिरणार्या ग्राहांनी युक्त महासागराप्रमाणे प्रतीत होत होती. ॥२७॥
|
अश्वं मुक्तं गजो दृष्ट्वा क्वचिद् भीतोऽपसर्पति । भीतो भीतं गजं दृष्ट्वा क्वचिद् अश्वो निवर्तते ॥ २८ ॥
|
कोठे सोडलेल्या घोड्याला पाहून हत्ती भयभीत होऊन पळून जात होता तर कोठे घाबरलेल्या हत्तीला पाहून घोडाही पळून जात होता. ॥२८॥
|
लङ्कायां दह्यमानायां शुशुभे स महोदधिः । छायासंसक्तसलिलो लोहितोद इवार्णवः ॥ २९ ॥
|
लंकापुरी जळत असता समुद्रात आगीच्या ज्वाळांचे प्रतिबिंब पडत होते, ज्यामुळे तो महासागर लाल पाण्याने युक्त लाल सागरासमान शोभत होता. ॥२९॥
|
सा बभूव मुहूर्तेन हरिभिर्दीपिता पुरी । लोकस्यास्य क्षये घोरे प्रदीप्तेव वसुंधरा ॥ ३० ॥
|
वानरांच्या द्वारा जिच्यामध्ये आग लावली गेली होती ती लंकापुरी एका मुहूर्तामध्येच संसाराच्या घोर संहार समयी जणु दग्ध झालेल्या पृथ्वीप्रमाणे प्रतीत होऊ लागली. ॥३०॥
|
नारीजनस्य धूमेन व्याप्तस्योच्चैर्विनेदुषः । स्वनो ज्वलनतप्तस्य शुश्रुवे दशयोजनम् ॥ ३१ ॥
|
धुराने आच्छादित आणि आगीने संतप्त होऊन उच्चस्वराने आर्तनाद करीत असणार्या लंकेतील स्त्रियांचे करूण क्रंदन शंभर योजने दूरपर्यंत ऐकू येत होते. ॥३१॥
|
प्रदग्धकायानपरान् राक्षसान् निर्गतान् बहिः । सहसा हि उत्पतन्ति स्म हरयोऽथ युयुत्सवः ॥ ३२ ॥
|
ज्यांचे शरीर जळून गेले होते असे जे जे राक्षस नगरांतून बाहेर पडत होते, त्यांच्यावर युद्धाची इच्छा असणारे वानर एकाएकी तुटून पडत होते. ॥३२॥
|
उद्घुष्टं वानराणां च राक्षसानां च निस्वनम् । दिशो दश समुद्रं च पृथिवीं च व्यनादयत् ॥ ३३ ॥
|
वानरांची गर्जना आणि राक्षसांचा आर्तनाद याने दाही दिशा, समुद्र आणि पृथ्वी निनादून जात होती. ॥३३॥
|
विशल्यौ तु महात्मानौ तावुभौ रामलक्ष्मणौ । असंभ्रान्तौ जगृहतुः ते उभे धनुषी वरे ॥ ३४ ॥
|
इकडे बाण निघाल्याने स्वस्थ झालेले दोन्ही भाऊ महात्मा श्रीराम आणि लक्ष्मण यांनी जराही न कचरता आपली श्रेष्ठ धनुष्ये उचलली. ॥३४॥
|
ततो विष्फारयामास रामस्च धनुरुत्तमम् । बभूव तुमुलः शब्दो राक्षसानां भयावहः ॥ ३५ ॥
|
त्यासमयी श्रीरामांनी आपले उत्तम धनुष्य खेचले, त्याच्या पासून भयंकर टणत्कार प्रकट झाला जो राक्षसांना भयभीत करणारा होता. ॥३५॥
|
अशोभत तदा रामो धनुर्विस्फारयन् महत् । भगवानिव संक्रुद्धो भवो वेदमयं धनुः ॥ ३६ ॥
|
श्रीरामचंद्र (त्या समयी) आपल्या विशाल धनुष्यास खेचत असतांना जसे त्रिपुरासुरावर कुपित होऊन भगवान् शंकर आपल्या वेदमय धनुष्याचा टणत्कार करताना शोभत होते, तसे शोभत होते. ॥३६॥
|
उद्घुयष्टं वानराणां च राक्षसानां च निस्वनम् । ज्याशब्दस्तावुभौ शब्दौ अवति रामस्य शुश्रुवे ॥ ३७ ॥
|
वानरांची गर्जना तसेच राक्षसांचा कोलाहल - या दोन्ही प्रकारच्या शब्दांच्या ही वर उठून श्रीरामांच्या धनुष्याचा टणत्कार ऐकू येत होता. ॥३७॥
|
वानरोद्घुयष्टघोषश्च राक्षसानां च निस्वनः । ज्याशब्दश्चापि रामस्य त्रयं व्याप दिशो दश ॥ ३८ ॥
|
वानरांची गर्जना, राक्षसांचा कोलाहल आणि श्रीरामांच्या धनुष्याचा टणत्कार - हे तीन प्रकारचे शब्द दाही दिशांमध्ये व्याप्त होत होते. ॥३८॥
|
तस्य कार्मुकनिर्मुक्तैः शरैस्तत् पुरगोपुरम् । कैलासशृङ्गप्रतिमं विकीर्णं अभवद्भुवि ॥ ३९ ॥
|
भगवान् श्रीरामांच्या धनुष्यातून सुटलेल्या बाणांच्या द्वारा लंकापुरीचे कैलास शिखराप्रमाणे उंच असलेले ते नगरद्वार तुटून फुटून भूतलावर विखरून गेले. ॥३९॥
|
ततो रामशरान् दृष्ट्वा विमानेषु गृहेषु च । सन्नाहो राक्षसेन्द्राणां तुमुलः समपद्यत ॥ ४० ॥
|
सातमजली घरे तसेच अन्य गृहांच्यावर पडणार्या श्रीरामांच्या बाणांना पाहून राक्षसपतिंनी युद्धासाठी फार भयंकर तयारी केली. ॥४०॥
|
तेषां सन्नह्यमानानां सिंहनादं च कुर्वताम् । शर्वरी राक्षसेन्द्राणां रौद्रीव समपद्यत ॥ ४१ ॥
|
कमर कसून आणि कवच आदि बांधून युद्धासाठी तयार होणार्या तसेच सिंहनाद करत असलेल्या त्या राक्षसपतिंसाठी ती रात्र काळरात्रि समान प्राप्त झाली. ॥४१॥
|
आदिष्टा वानरेन्द्रास्ते सुग्रीवेण महात्मना । आसन्नद्वारमासाद्य युध्यध्वं च प्लवंगमाः ॥ ४२ ॥
|
त्यासमयी महात्मा सुग्रीवांनी मुख्य मुख्य वानरांना अशी आज्ञा दिली - वानर वीरांनो ! तुम्ही सर्व लोक आपापल्या निकटवर्ती द्वारावर जाऊन युद्ध करा. ॥४२॥
|
यश्च वो वितथं कुर्यात् तत्र तत्राप्युपस्थितः । स हन्तव्योऽभि संप्लुत्य राजशासनदूषकः ॥ ४३ ॥
|
तुम्हा लोकांपैकी जो जेथे जेथे युद्धभूमीवर उपस्थित होऊनही माझ्या आदेशाचे करणार नाही - युद्धापासून तोंड फिरवून पळून जाईल त्याला तुम्ही सर्व लोक पकडून ठार मारा, कारण तो राजाज्ञेचे उल्लंघन करणारा ठरेल. ॥४३॥
|
तेषु वानरमुख्येषु दीप्तोल्कोज्ज्वलपाणिषु । स्थितेषु द्वारमासाद्य रावणं क्रोध आविशत् ॥ ४४ ॥
|
सुग्रीवांच्या या आज्ञेस अनुसरून जेव्हा मुख्य मुख्य वानर जळत्या मशाली हातात घेऊन नगरद्वारावर जाऊन ठाम उभे राहिले तेव्हा रावणाला फार क्रोध आला. ॥४४॥
|
तस्य जृम्भितविक्षेपाद् व्यामिश्रा वै दिशो दश । रूपवानिव रुद्रस्य मन्युर्गात्रेष्वदृश्यत ॥ ४५ ॥
|
त्याने आळस देऊन जेव्हा अंगांचे संचालन केले त्यामुळे दाही दिशा व्याकुळ होऊन गेल्या. तो कालरूद्राच्या अंगामध्ये प्रकट झालेल्या मूर्तीमान् क्रोधाप्रमाणे दिसून येत होता. ॥४५॥
|
स निकुंभं च कुंभं च कुंभकर्णात्मजावुभौ । प्रेषयामास संक्रुद्धो राक्षसैर्बहुभिः सह ॥ ४६ ॥
|
क्रोधाने भरलेल्या रावणाने कुंभकर्णाचे दोन पुत्र कुम्भ आणि निकुम्भ यांना बर्याचशा राक्षसांबरोबर धाडले. ॥४६॥
|
यूपाक्षः शोणिताक्षश्च प्रजङ्घः कम्पनस्तथा । निर्ययुः कौम्भकर्णिभ्यां सह रावणशासनात् ॥ ४७ ॥
|
रावणाच्या आज्ञेने यूपाक्ष, शोणिताक्ष, प्रजङ्घ आणि अकंपनही कुंभकर्णाच्या दोन्ही पुत्रांच्या बरोबरच युद्धासाठी निघाले. ॥४७॥
|
शशास चैव तान् सर्वान् राक्षसान् सुमहाबलान् । नादयन् गच्छतात्रैव सिंहनादं च नादयन् ॥ ४८ ॥
|
त्यासमयी सिंहाप्रमाणे डरकाळ्या फोडणार्या रावणाने त्या समस्त महाबली राक्षसांना आदेश दिला - वीर निशाचरांनो ! याच रात्री तुम्ही लोक युद्धासाठी जा. ॥४८॥
|
ततस्तु चोदितास्तेन राक्षसा ज्वलितायुधाः । लङ्काया निर्ययुर्वीराः प्रणदन्तः पुनः पुनः ॥ ४९ ॥
|
राक्षसराजाची आज्ञा मिळताच ते वीर राक्षस हातात चमकणारी अस्त्रे-शस्त्रे घेऊन वारंवार गर्जना करीत लंकापुरीतून बाहेर निघाले. ॥४९॥
|
रक्षसां भूषणस्थाभिः भाभिः स्वाभिश्च सर्वशः । चक्रुस्ते सप्रभं व्योम हरयश्चाग्निभिः सह ॥ ५० ॥
|
राक्षसांनी आपल्या आभूषणांनी आणि आपल्या प्रभेने आणि वानरांनी मशालीच्या आगीने तेथील आकाशास प्रकाशाने परिपूर्ण केले होते. ॥५०॥
|
तत्र ताराधिपस्याभा ताराणां च तथैव च । तयोराभरणाभा च ज्वलिता द्यामभासयन् ॥ ५१ ॥
|
चंद्रम्याची, नक्षत्रांची आणि त्या दोन्ही सेनांच्या आभूषणांच्या प्रज्वलित प्रभेने आकाशाला प्रकाशित केले होते. ॥५१॥
|
चन्द्राभा भूषणाभा च गृहाणां ज्वलतां च भा । हरिराक्षससैन्यानि भ्राजयामास सर्वतः ॥ ५२ ॥
|
चंद्रम्याचे चांदणे, आभूषणांची प्रभा तसेच प्रकाशमान ग्रहांच्या दीप्तीने सर्व बाजूनी राक्षस आणि वानरांच्या सेनांना उद्भासित करून ठेवले होते. ॥५२॥
|
तत्र चार्ध प्रदीप्तानां गृहाणां सागरः पुनः । भाभिः संसक्तपातालः चलोर्मिः शुशुभेऽधिकम् ॥ ५३ ॥
|
लंकेतील अर्धवट जळलेल्या घरांच्या प्रभेने जलात प्रतिबिंब पडल्याने चंचल लहरीयुक्त समुद्र अधिक शोभून दिसत होता. ॥५३॥
|
पताकाध्वजसंयुक्तं उत्तमासिपरश्वधम् । भीमाश्वरथमातङ्गं नानापत्तिसमाकुलम् ॥ ५४ ॥
दीप्तशूलगदाखड्ग प्रासतोमरकार्मुकम् । तद् राक्षसबलं घोरं भीमविक्रमपौरुषम् ॥ ५५ ॥
|
राक्षसांची ती भयंकर सेना ध्वजा-पताकांनी सुशोभित होती. सैनिकांच्या हातात उत्तम खड्गे आणि परशु चमकत होते. भयानक घोडे, रथ आणि हत्तीनी आणि नाना प्रकारच्या पायदळ सैनिकांनी ती खच्चून भरलेली होती. चमकणारे शूल, गदा, तलवारी, भाले, तोमर आणि धनुष्य आदिंनी युक्त झालेली ती सेना भयानक विक्रम आणि पुरुषार्थ प्रकट करणारी होती. ॥५४-५५॥
|
ददृशो ज्वलितप्रासं किङ्किणीशतनादितम् । हेमजालाचितभुजं व्यावेष्टितपरश्वधम् ॥ ५६ ॥
व्याघूर्णितमहाशस्त्रं बाणसंसक्तकार्मुकम् । गन्धमाल्यमधूत्सेक संमोदितमहानिलम् ॥ ५७ ॥
घोरं शूरजनाकीर्णं महाम्बुधरनिस्वनम् ।
|
त्या सेनेमध्ये भाले चमकत होते. शेकडो घुंघुरांचे झणत्कार ऐकू येत होते. सैनिकांच्या भुजांवर सोन्याची आभूषणे बांधलेली होती. त्या भुजांच्या द्वाराच ते परशु चाळवत होते, मोठमोठी शस्त्रे फिरवत होते. धनुष्यावर बाणांचे संधान केले जात होते. चंदन, पुष्पमाला आणि मधुची विपुलता असण्यामुळे तेथील महान् वातावरणात अनुपम गंध पसरून राहिला होता. ती सेना शूरवीरांनी व्याप्त तसेच महान् मेघांच्या गर्जनेसमान सिंहनादांनी निनादित होण्यामुळे भयंकर भासत होती. ॥५६-५७ १/२॥
|
तद् दृष्ट्वा बलमायान्तं राक्षसानां दुरासदम् ॥ ५८ ॥ सञ्चचाल प्लवंगानां बलमुच्चैर्ननाद च ।
|
राक्षसांच्या त्या दुर्जय सेनेला येतांना पाहून वानर सेना पुढे निघाली आणि उच्च स्वराने गर्जना करू लागली. ॥५८ १/२॥
|
जवेनाप्लुत्य च पुनः तद् बलं रक्षसां महत् ॥ ५९ ॥ अभ्ययात् प्रत्यरिबलं पतङ्गा इव पावकम् ।
|
राक्षसांची विशाल सेनाही मोठ्या वेगाने उसळून शत्रू सेनेवर अशा प्रकारे अग्रेसर झाली, जसे पतंग आगीवर तुटून पडतात. ॥५९ १/२॥
|
तेषां भुजपरामर्श व्यामृष्टपरिघाशनि ॥ ६० ॥ राक्षसानां बलं श्रेष्ठं भूयः परमशोभत ।
|
सैनिकांच्या भुजांच्या हालचालींनी जेथे परिघ आणि अशनि झोके खात होती, राक्षसांची ती उत्तम सेना फारच शोभा प्राप्त करीत होती. ॥६० १/२॥
|
तत्रोन्मत्ता इवोत्पेतुः हरयोऽथ युयुत्सवः ॥ ६१ ॥ तरुशैलैरभिघ्नन्तो मुष्टिभिश्च निशाचरान् ।
|
तेथे युद्धाची इच्छा असणारे वानर उन्मत्तसे होऊन वृक्ष, शिला आणि मुष्टिनी निशाचरांना मारत त्यांच्यावर तुटून पडले. ॥६१ १/२॥
|
तथैवापततां तेषां हरीणां निशितैः शरैः ॥ ६२ ॥ शिरांसि सहसा जह्रू राक्षसा भीमविक्रमाः ।
|
याच प्रकारे भयानक पराक्रमी निशाचरही आपल्या तीक्ष्ण बाणांनी समोर आलेल्या वानरांची मस्तके छाटून छाटून खाली पाडू लागले. ॥६२ १/२॥
|
दशनै र्हतकर्णाश्च मुष्टिभिर्भिन्नमस्तकाः । शिलाप्रहारभग्नाङ्गा विचेरुस्तत्र राक्षसाः ॥ ६३ ॥
|
वानरांनीही दातांनी निशाचरांचे कान तोडले, बुक्के मार मारून त्यांची मस्तके विदीर्ण करून टाकली. या अवस्थेत ते राक्षस तेथे विचरत होते. ॥६३॥
|
तथैवाप्यपरे तेषां कपीनामसिभिः शितैः । प्रवीरानभितो जघ्नू घोररूपा निशाचराः ॥ ६४ ॥
|
याच प्रकारे घोर रूपधारी निशाचरांनीही मुख्य मुख्य वानरांना आपल्या तीक्ष्ण तलवारींनी एकाएकी घायाळ करून टाकले. ॥६४॥
|
घ्नन्तमन्यं जघानान्यः पातयन्तमपातयत् । गर्हमाणं जगर्हान्यो दशन्तमपरोऽदशत् ॥ ६५ ॥
|
एक वीर जेव्हा दुसर्या विपक्षी योद्ध्याला मारू लागे तेव्हा दुसरा येऊन त्याला मारू लागे. याच प्रकारे एकाला पाडणार्या योद्धाला दुसरा येऊन धराशायी करत होता. एकाची निंदा करणाराची दुसरा निंदा करत होता आणि एकाला दातांनी चावणाराला दुसरा येऊन चावत होता. ॥६५॥
|
देहीत्यन्यो ददात्यन्यो ददामीत्यपरः पुनः । किं क्लेशयसि तिष्ठेति तत्रान्योन्यं बभाषिरे ॥ ६६ ॥
|
एक येऊन म्हणे की मला युद्ध प्रदान कर तर दुसराच त्याला युद्धाचा अवसर देत होता; नंतर तिसरा म्हणत असे की तुम्ही का क्लेश सोसता ? मी याच्याबरोबर युद्ध करतो. याप्रकारे ते एक दुसर्याशी बोलत होते. ॥६६॥
|
विप्रलम्भितशस्त्रं च विमुक्तकवचायुधम् । समुद्यतमहाप्रासं मुष्टिशूलासिसङ्कुलम् ॥ ६७ ॥
प्रावर्तत महारौद्रं युद्धं वानररक्षसाम् । वानरान् दश सप्तेति राक्षसा जघ्नुराहवे ॥ ६८ ॥ राक्षसान् दश सप्तेति वानराश्चाभ्यपातयन् ।
|
त्यासमयी वानर आणि राक्षसात फार भयंकर युद्ध होऊ लागले. हत्यारे गळून जात होती, कवचे आणि अस्त्रे शस्त्रे तुटून जात होती, मोठ मोठे भाले उचललेले दिसून येत होते, तसेच बुक्क्यांचा, तलवारींचा, शूलांचा आणि भाल्यांचा मारा होत होता. त्या युद्धस्थळी राक्षस दहा-दहा अथवा सात-सात वानरांना एकाच वेळी मारून टाकत होते. आणि वानर ही दहा-दहा अथवा सात-सात राक्षसांना एकदमच धराशायी करून टाकत होते. ॥६७-६८ १/२॥
|
विप्रलम्भितवस्त्रं च विमुक्तकवचध्वजम् । बलं राक्षसमालम्ब्य वानराः पर्यवारयन् ॥ ६९ ॥
|
राक्षसांची वस्त्रे सुटून गेली, कवचे आणि ध्वज तुटून गेले तसेच त्या राक्षसी सेनेला रोखून धरून वानरांनी सर्व बाजूनी घेरून टाकले. ॥६९॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे पञ्चसप्ततितमः सर्गः ॥ ७५ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा पंचाहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७५॥
|