कौसल्याया विलापः -
|
महाराणी कौसल्येचा विलाप -
|
ततः समीक्ष्य शयने सन्नं शोकेन पार्थिवम् ।
कौसल्या पुत्रशोकार्ता तमुवाच महीपतिम् ॥ १ ॥
|
शय्येवर पडलेल्या राजांना पुत्रशोकाने व्याकुळ झालेले पाहून स्वतःही पुत्रशोकाने पीडित झालेली कौसल्या महाराजांना म्हणाली - ॥१॥
|
राघवे नरशार्दूले चिषं मुक्त्वाहिजिह्मगा ।
विचरिष्यति कैकेयी निर्मुक्तेव हि पन्नगी ॥ २ ॥
|
'नरश्रेष्ठ राघवावर आपले विष ओकून तिरक्या चालीने चालणारी कैकेयी कात टाकून नूतन शरीराने प्रकट झालेल्या सर्पिणी प्रमाणे आता स्वच्छंद विचरण करेल. ॥२॥
|
विवास्य रामं सुभगा लब्धकामा समाहिता ।
त्रासयिष्यति मां भूयो दुष्टाहिरिव वेश्मनि ॥ ३ ॥
|
'ज्याप्रमाणे घरातच राहणारा सर्प वारंवार भय दाखवित असतो, त्या प्रकारे रामाला वनवास देऊन सफल मनोरथ झालेली सुभगा कैकेयी सदा सावधान राहून मला त्रास देत राहील. ॥३॥
|
अथास्मिन् नगरे रामश्चरन् भैक्षं गृहे वसेत् ।
कामकारो वरं दातुमपि दासं ममात्मजम् ॥ ४ ॥
|
जरी राम या नगरात भीक मागतही घरात राहते, अथवा माझ्या पुत्राला कैकेयीचा दास जरी बनविले गेले असते तरी असे वरदान मलाही अभिष्ट ठरले असते. (कारण त्या स्थितिमध्ये मलाही रामाचे दर्शन होत राहिले असते. रामाच्या वनवासाचे वरदान तर कैकेयीने मला दुःख देण्यासाठीच मागितले आहे.) ॥४॥
|
पातयित्वा तु कैकेय्या रामं स्थानाद् यथेष्टतः ।
प्रविद्धो रक्षसां भागः पर्वणीवाहिताग्निना ॥ ५ ॥
|
'कैकेयीने आपल्या इच्छेनुसार रामांना त्यांच्या स्थानापासून भ्रष्ट करून ज्याप्रमाणे एखाद्या अग्निहोत्राने पर्वाच्या दिवशी देवतांना त्यांच्या भागापासून वञ्चित करून राक्षसांना तो भाग अर्पित करावा तशी कृति केली आहे. ॥५॥
|
गजराजगतिर्वीरो महाबाहुर्धनुर्धरः ।
वनमाविशते नूनं सभार्यः सहलक्ष्मणः ॥ ६ ॥
|
'गजराज समान मंद गतीने चालविणारे वीर महाबाहु धनुर्धर राम निश्चितच आपली पत्नी आणि लक्ष्मण यांच्यासह वनात प्रवेश करीत असतील. ॥६॥
|
वने त्वदृष्टदुःखानां कैकेय्यानुमते त्वया ।
त्यक्तानां वनवासाय कान्यावस्था भविष्यति ॥ ७ ॥
|
'महाराज ! ज्यांनी जीवनांत कधी दुःख पाहिले नव्हते, त्या राम, लक्ष्मण आणि सीतेला आपण कैकेयीच्या वचनांत गुंतून (फसून) वनात धाडून दिलेत. आता त्या बिचार्यांना वनवासाचे कष्ट भोगण्याशिवाय काय गत्यंतर आहे ? ॥७॥
|
ते रत्नहीनास्तरुणाः फलकाले विवासिताः ।
कथं वत्स्यन्ति कृपणाः फलमूलैः कृताशनाः ॥ ८ ॥
|
'रत्नतुल्य उत्तम वस्तूपासून वञ्चित होऊन त्या तिन्ही तरूण मुलांना सुखरूप फळ भोगण्याच्या समयी वनात घालवून दिले गेले आहे. आता ती तिघे बिचारी फल मूलाचे भोजन करून कशी राहू शकतील ? ॥८॥
|
अपीदानीं स कालः स्यान्मम शोकक्षयः शिवः ।
सहभार्यं सह भ्रात्रा पश्येयमिह राघवम् ॥ ९ ॥
|
काय आता फिरून माझा शोक नष्ट करणारी ती वेळ कधी येईल, की ज्यावेळी सीता आणि लक्ष्मणासह वनातून परत आलेल्या राघवाला मी पाहीन ? ॥९॥
|
शृत्वैवोपस्थितौ वीरौ कदायोध्या भविष्यति ।
यशस्विनी हृष्टजना सूच्छ्रितध्वजमालिनी ॥ १० ॥
|
'तो शुभ अवसर केव्हा बरे प्राप्त होईल, कि ज्यावेळी "वीर राम आणि लक्ष्मण वनांतून परत आले आहेत" हे ऐकूनच यशस्विनी अयोध्यापुरीचे सर्व लोक हर्षाने उल्हासित होऊन उठतील आणि घरोघरी फडकणारे उंच उंच ध्वजसमूह पुरीची शोभा वाढवू लागतील. ॥१०॥
|
कदा प्रेक्ष्य नरव्याघ्रावरण्यात् पुनरागतौ ।
भविष्यति पुरी हृष्टा समुद्र इव पर्वणि ॥ ११ ॥
|
'नरश्रेष्ठ श्रीराम आणि लक्ष्मणास वनातून परत आलेले पाहून ही अयोध्यापुरी पौर्णिमेस उचंबळून येणार्या समुद्राप्रमाणे केव्हा बरे हर्षोल्हासाने परिपूर्ण होईल ? ॥११॥
|
कदायोध्यां महाबाहुः पुरीं वीरः प्रवेक्ष्यति ।
पुरस्कृत्य रथे सीतां वृषभो गोवधूमिव ॥ १२ ॥
|
ज्याप्रमाणे बैल वृषभ गायीला पुढे घालून चालतो त्याप्रमाणे वीर महाबाहु श्रीराम रथावर सीतेस पुढे करून अयोध्यापुरीत कधी बरे प्रवेश करतील ? ॥१२॥
|
कदा प्राणिसहस्राणि राजमार्गे ममात्मजौ ।
लाजैरवकरिष्यन्ति प्रविशन्तावरिंदमौ ॥ १३ ॥
|
'या पुरीतील हजारो माणसे पुरीत प्रवेश करणार्या आणि राजमार्गावरून चालत येणार्या माझ्या दोन्ही शत्रूदमन पुत्रांवर लाह्यांचा वर्षाव कधी बरे करतील ? ॥१३॥
|
प्रविशन्तौ कदायोध्यां द्रक्ष्यामि शुभकुण्डलौ ।
उदग्रायुधनिस्त्रिंशौ सशृङ्गाविव पर्वतौ ॥ १४ ॥
|
'उत्तम आयुधे एव खड्ग घेतलेले शिखरयुक्त पर्वतासमान प्रतीत होणारे श्रीराम आणि लक्ष्मण सुंदर कुण्डलांनी अलंकृत होऊन या अयोध्यापुरीत प्रवेश करीत असलेले माझ्या नेत्रांच्या समक्ष कधी बरे प्रकट होतील ? ॥१४॥
|
कदा सुमनसः कन्या द्विजातीनां फलानि च ।
प्रदिशन्त्यः पुरीं हृष्टाः करिष्यन्ति प्रदक्षिणम् ॥ १५ ॥
|
'ब्राह्मणांच्या कन्या हर्षपूर्वक फुले आणि फळे अर्पण करीत अयोध्यापुरीची परिक्रमा कधी बरे करतील ? ॥१५॥
|
कदा परिणतो बुद्ध्या वयसा चामरप्रभः ।
अभ्युपैष्यति धर्मात्मा सुवर्ष इव लालयन् ॥ १६ ॥
|
'ज्ञानात चढत्या वाढत्या बुद्धिचे आणि अवस्थांमध्ये देवतांसमान तेजस्वी धर्मात्मा श्रीराम उत्तम वर्षाकाल प्रमाणे जनसमुदायाचे लालन करीत येथे कधी परत येतील बरे ? ॥१६॥
|
निःसंशयं मया मन्ये पुरा वीर कदर्यया ।
पातुकामेषु वत्सेषु मातॄणां शातिताः स्तनाः ॥ १७ ॥
|
'वीर ! यात संदेह नाही की पूर्व जन्मात माझ्या सारख्या नीच विचाराच्या स्त्रीने वासरे दूध पिण्यास उद्यत झालेली असतांनाच त्यांच्या मातांचे स्तन कापून टाकले असावेत !' ॥१७॥
|
साहं गौरिव सिंहेन विवत्सा वत्सला कृता ।
कैकेय्या पुरुषव्याघ्र बालवत्सेव गौर्बलात् ॥ १८ ॥
|
'पुरुषसिंह ! ज्याप्रमाणे एखाद्या सिंहाने लहान वासरू असलेल्या वत्सला गायीला बलपूर्वक वत्सहीन केलेले असावे, त्याप्रकारे कैकेयीने बलपूर्वक माझी माझ्या पुत्रापासून ताटातूट केली आहे. ॥१८॥
|
न हि तावद्गुणैर्जुष्टं सर्वशास्त्रविशारदम् ।
एकपुत्रा विना पुत्रमहं जीवितुमुत्सहे ॥ १९ ॥
|
'जो उत्तम गुणांनी युक्त आणि संपूर्ण शास्त्रात प्रवीण आहे, त्या आपल्या पुत्राशिवाय, श्रीरामाशिवाय मी एकुलता एक पुत्र असलेली त्याची आई जिंवत राहू शकत नाही. ॥१९॥
|
न हि मे जीविते किञ्चित् सामर्थ्यमिह कल्प्यते ।
अपश्यन्त्याः प्रियं पुत्रं लक्ष्मणं च महाबलम् ॥ २० ॥
|
'आता प्रिय पुत्र श्रीराम आणि महाबली लक्ष्मण यांना पाहिल्याशिवाय जिवंत राहण्याची माझ्यात जराही शक्ती नाही. ॥२०॥
|
अयं हि मां दीपयतेऽद्य वह्नि-
स्तनूजशोकप्रभवो महाहितः ।
महीमिमां रश्मिभिरुत्तमप्रभो
यथा निदाघे भगवान् दिवाकरः ॥ २१ ॥
|
'ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूतील उत्कृष्ट प्रभायुक्त भगवान सूर्य आपल्या किरणांच्या द्वारे या पृथ्वीला अधिक ताप देत असतो, त्या प्रकारे हा पुत्रशोकजनित महान अहितकारक अग्नि आज मला जाळून टाकीत आहे.' ॥२१॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे त्रिचत्वारिंशः सर्गः ॥ ४३ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा त्रेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४३॥
|