॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय चौसष्टावा ॥
रावणस्त्रियांचा विलाप

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणवधानंतर सैन्याची दाणादाण व पळापळ :

करोनिया रणकंदन । ससैन्य रणीं रावण ।
स्वयें पाडिला आपण । उरलें सैन्य देशोधडी ॥ १ ॥
एकीं दिगंतर लंघिलें । एकां कंठीं प्राण उरले ।
एकां गात्रां कंप सुटले । एक निमाले आपधाकें ॥ २ ॥
एकें झालीं भ्रमित । एकां सुटला अधोवात ।
एकां मूत्रवृष्टि होत । प्राण सांडित उभ्यांउभ्यां ॥ ३ ॥
एक होवोनि कासाविसी । रडत रडत रणभूमीसीं ।
बोंब घेवोनि वेगेंसीं । आलीं लंकेसीं सांगत ॥ ४ ॥
एक सांडिती लेणीं लुगडीं । एक तृण धरिती तोंडीं ।
एकांचि वळली बोबडी । पडली मुरकुंडी एकांची ॥ ५ ॥

अनेकांची दीनवाणीने श्रीरामांनी ठार करु नये म्हणून प्रार्थना :

एक येती काकुळती । मारु नको रघुपती ।
शरण आलों तुजप्रती । करिसी किती संहार ॥ ६ ॥
एक म्हणती माजी रणा । झुंजों आलों नाहीं जाणा ।
पहावया युद्धरचना । रामरावणरणामाजी ॥ ७ ॥
एक योवोनि काकुळती । श्रीरामातें विनविती ।
धरोनि आणिलें बहुतीं । रणख्याती नाहीं आलों ॥ ८ ॥
एक विनविती रामासी । व्यर्थ न मारीं आम्हासी ।
सणा आलों दिवाळीसीं । जामातें परियेसी सासुरियां ॥ ९ ॥
कोणी आला पाहुणा । कोणी आला दिवाळसणा ।
मारुं नको रघुनंदना । जीवदाना आम्हां देई ॥ १० ॥
ऐसें येती काकुळती । भूमीं गडबडां लोळती ।
बाण गेला रामाप्रती । तरी बरळती आपधाकें ॥ ११ ॥
रामें वधिला रावण । देखोनियां राक्षसगण ।
सैरां पळती रानोरान । देहलोभेंकरुन निजभयें ॥ १२ ॥


तंदृष्ट्वा निहता भूमौ हतशेषा निशाचराः ।
हतनाथा भयत्रस्ताः सर्वतो विप्रदुद्रुवुः ॥१॥
सर्वतश्चाभिपेतुस्तान्वानरा दुमयोधिनः ।
दशग्रीववधं दृष्ट्वा विजयं राघवस्य च ॥२॥

शत्रुसैन्याची दाणादाण पाहून वानरसैन्याचा आनंदोत्सव :

भूमीं पडतां रावण । दशदिशा रक्षोगण ।
रडत रडत पळती जाण । निशाचरण अति दुःखी ॥ १३ ॥
तें देखोनि वानर । अवघे झाले आल्हादपर ।
नाचों लागले समग्र । करिती गजर नामाचा ॥ १४ ॥
एक झेलीत पर्वतशिखरें । एक झेलीत वृक्षाग्रें ।
हरिखें नाचती वानरें । रावण रघुवीरें निवटिला ॥ १५ ॥
नमन करिती येरयेरें । क्षेम देती परस्परें ।
किराणें देती अति आदरें । रावण रघुवीरें निवटिला ॥ १६ ॥
एक गर्जती भुभुःकारें । एक गर्जती नामोच्चारें ।
झालीं आनंदें निर्भरें । रावण रघुवीरें निवटिला ॥ १७ ॥
जो नागवे त्रैलोक्यासी । यम काळ कांपती ज्यासी ।
त्या निवटिलें रावणासी । निजबाणेंसी श्रीरामें ॥ १८ ॥
जो न भिये शंकरासी । आंदोळिले कैलासासी ।
त्या निवटिलें रावणासी । निजबाणेंसीं श्रीरामें ॥ १९ ॥
दंडोनियां लोकपाळांसी । बंदीं घातलें देवांसी ।
त्या निवटिलें रावणासी । निजबाणेंसीं श्रीरामें ॥ २० ॥

हर्षातिशयाने त्या वानरांचे श्रीरामांना वंदन :

सकळ होवोनि उल्लासी । लागले श्रीरामचरणासी ।
रामें आलिंगिलें प्रीतीसीं । निजमानसीं स्वानंदें ॥ २१ ॥
निजमदें शिवापासीं । भोगूं मागें पार्वतीसी ।
त्या निवटिलें रावणासी । निजबाणेंसीं श्रीरामें ॥ २२ ॥
बिभीषण शरणागत । पुरले त्याचे मनोरथ ।
होवोनियां आनंदभरित । जीवें ओंवाळित श्रीरामा ॥ २३ ॥
सुग्रीवराजा वानरनाथ । तेणें धरिलें होतें व्रत ।
न वधितां लंकानाथ । किष्किंधें निश्चित नाहीं जाणें ॥ २४ ॥
सिद्धि पावलें निजव्रत । रामें वधिला लंकानाथ ।
तेणें आनंदे उपरमत । येवोनि रघुनाथ नमियेला ॥ २५ ॥
वनें वन हिंडतां । अति श्रम शुद्धि करितां ।
झाला होता हनुमंता । जो लंकानाथा निजघाती ॥ २६ ॥
ते निरसिली सकळ व्यथा । वध झालिया लंकानाथा ।
श्रीरामा भेटेल सती सीता । सार्थकता कष्टांची ॥ २७ ॥
म्हणोनियां आल्हादपर । प्रेमें नाचे हनुमान वीर ।
करीत नामाचा गजर । श्रीरामचंद्र नमियेला ॥ २८ ॥
हनुमंताचा परम आप्त । अंगद युवराजा विख्यात ।
त्याचे पुरले मनोरथ । लंकानाथ निवटिला ॥ २९ ॥
तेणें हरिखें नाचत । श्रीरामप्रेमें डुल्लत ।
त्याचे पुरले मनोरथ । सावचित्त आनंदें ॥ ३० ॥
नळ नीळ जांबवंत । सुषेण वैद्यराज तेथ ।
तारतरळादि समस्त । हरिखें नाचत अति प्रेमें ॥ ३१ ॥
रामनामाच्या निजगजरीं । केला भुभुःकार दीर्घस्वरीं ।
श्रीरामचरण प्रीतीकरीं । वानरवीरी वंदिलें ॥ ३२ ॥
अवघे आनंदें नाचती । श्रीरामप्रेमें डुल्लती ।
श्रीरामगुणकीर्ति वर्णिती । गीतीं गाती श्रीरामा ॥ ३३ ॥
एक झाले नृत्यकारी । एक गर्जती कैवारीं ।
वेगें होवोनि नागारी । कीर्तिगजरीं । वाखाणिती ॥ ३४ ॥
एक होवोनि वैष्णव । पदीं वर्णितां राघव ।
उथळले अष्ट प्रेमभाव । देहभाव विसरले ॥ ३५ ॥
एक तीं भावार्थें साबडीं । तोंडें करोनि वांकुडीं ।
धरिते झाले बागडी । निजनिर्वडीं निजप्रेंएं ॥ ३६ ॥
निजप्रेमाचेनि समाजें । हरिखें नाचती निजभोजें ।
विसोनियां माझें तुझें । श्रीरघुराजें संतुष्ट ॥ ३७ ॥
तें देखोनियां स्वस्फूर्ती । विसरोनियां रघुप्ती ।
खांदीं घेवोनियां प्रीतीं । हरिखें नाचती श्रीरामनामें ॥ ३८ ॥

स्वर्गस्थ देवांना परमानंद व श्रीरामांवर पुष्पवृष्टी :

तें देखोनि सुरवर । स्वर्गी झाले आल्हादपर ।
विजयी झाला श्रीरामचंद्र । दशवक्त्र निवटिला ॥ ३९ ॥
दिव्यसुमनीं निजगजरीं । वर्षले श्रीरामाचे शिरीं ।
अवघें कटक जयजयकारीं । पुष्पेंकरी मंडित ॥ ४० ॥


अथांतरिक्षे व्यनदन्सौ‍म्यस्त्रिदशदुंदुभिः ।
दिव्यगंधवहास्तत्र मारुताः सुमुखं ववुः ॥३॥
निपपातांतरिक्षाच्य पुष्पवृष्टिस्तथा भुवि ॥४॥

देवांकडून स्तवन, गंधर्वांचे गायन :

मंद सुगंध सुशीतळ । वेगें पातला मलयानिळ ।
समस्तां श्रमस्वेदकल्लोळ । तेणें तत्काळ निरसिला ॥ ४१ ॥
अंतरिक्षगगनींहूनी । प्रकट झाली आकाशवाणी ।
राम विजयी रणांगणीं । दसानन निवटिला ॥ ४२ ॥
चिरंजीवी रघुनाथा । निवटोनियां लंकानाथा ।
सुरां सोडविलें समस्तां । बंदिमोचनता पैं केली ॥ ४३ ॥
तेणें सकळ सुरगण । आनंदमय होऊनि पूर्ण ।
वर्णिती श्रीरामाचे गुण । दुष्ट दशानन निवटिला ॥ ४४ ॥
जो अजेय त्रैलोक्यासी । बंदी घातलें सुरवरांसी ।
दासकाम घे आवेशीं ॥ ४५ ॥
ते दुष्ट सेवेपासूनि जाण । श्रीरामें सोडविलें आपण ।
मिळोनियां गधर्वगण । करिती गायन आनंदें ॥ ४६ ॥
नारद तुंबर दोघे जण । वसुधामा सुलोचन ।
चित्रांगदेंसहित जाण । सुस्वर गायन मांडिले ॥ ४७ ॥


एते गंधर्वरजानो ह्यंतरिक्षस्थिता जगुः ।
उर्वशी मेनका रंभा घृताची च तिलोत्तमा ॥५॥
अंतरिक्षे सुसंहृष्टा ननृतुश्चाप्सरोगणाः ॥६॥

अप्सरांचे नृत्य :

गंधर्वराजे पांचही जाण । वीणा घेवोनि आपण ।
रागोद्धार करिती पूर्ण । सुस्वर गायन मांडिलें ॥ ४८ ॥
तंव पावल्या स्वर्गनायिका । रंभा ऊर्वशी मेनका ।
घृताची तिलोत्तमा देखा । हर्षात्मका नाचीत ॥ ४९ ॥
निजानंदें स्वर्गसुंदरीं । नृत्य करितां चांचरी ।
देहभाव सांडिला दूरी । राम अंतरीं धरोनियां ॥ ५० ॥
देव गंधर्व सकळिक । देवांगना मिळोनि देख ।
अवघीं नाचती समसुख । रामें दशमुख निवटिला ॥ ५१ ॥

रावणवधामुळे सगळीकडे आनंदोत्सव :

रावणतेजें दुर्धर । झांकोनियां दिवाकर ।
पडिला होता अंधकार । तो रामें समग्र निवटिला ॥ ५२ ॥
श्रीरामतेजें भास्कर । उजळोनियां अति शीघ्र ।
झाला सकळप्रकाशकर । दिशा समग्र उजळल्या ॥ ५३ ॥
चंद्र झाला होता प्रभाहीन । तो श्रीरामतेजेंकरुन ।
उजळला न लागतां क्षण । विज्वर पूर्ण तो झाला ॥ ५४ ॥
इंद्र वरुण आणि कुबेर । नैर्ऋत्य ईशान आणि महारुद्र ।
अग्नियमादि समग्र । हरिखें थोर दाटले ॥ ५५ ॥
नष्ट दुरात्मा रावण । करोनि सकळांचें रोधन ।
सेवा घेतसे दारुण । रामें निर्दळण केलें त्याचें ॥ ५६ ॥
म्हणोनियां आल्हादपर । नृत्य करिती समग्र ।
मांडिलासे अति गजर । जयजयकार आनंदें ॥ ५७ ॥
दिवि भुवि अंतरिक्ष । नभोमंडळीं सावकाश ।
अवघे झाले स्वप्रकाश । दुष्ट राक्षस निर्दळिला ॥ ५८ ॥
तेणें उजळलें जगतीतळ । सुर आनंदले सकळ ।
करिती नामाचा कल्लोळ । सुखसुकाळ माजविला ॥ ५९ ॥
फिटला द्वंद्वदुःखदुकाळ । पाहिला स्वसुखसकाळ ।
श्रीराम ओळला प्रबळ । स्वपदीं सकळ स्थापिले ॥ ६० ॥

वानरसैन्याकडून श्रीरामांची पूजा :

ऐसा आनंद सुरवरीं । येरीकडें श्रीरामभारीं ।
सौमित्रादिक महावीरीं । पूजा प्रीतिकरीं मांडली ॥ ६१ ॥
सौ‍मित्र आणि हनुमंत । बिभीषण शरणागत ।
सुग्रीव अंगद जांबवंत । जुत्पति समग्र आनंदले ॥ ६२ ॥


ततस्तु सुग्रीवबिभीषणादयः सुहद्विशिष्टाः स च लक्ष्मणस्तदा ।
समीक्ष्य ह्वष्टा विजयेन राघवम् रणेऽभ्यनंदन्विधिवच्च पूजयन् ॥७॥
स तु निहतरिपुः स्थिरप्रतिज्ञः स्वजनबलाभिवृतो रणे रराज ।
रघुकुलनृपनंदनो महात्मा त्रिदशगणैरिव संवृतो महेंद्रः ॥८॥

श्रीरामांची त्यांच्या भक्तांनी केलेली रुपकात्मक पूजाः


मिळोनियां सकळ वीरीं । पूजोपचारसामग्री ।
तिहीं मांडिली अति गजरीं । संक्षेपकरीं सांगेन ॥ ६३ ॥
हनुमान होवोनि सिंहासन । वरी बैसला रघुनंदन ।
अति अंतरंग सुमित्रानंदन । पूजाविधान तो करी ॥ ६४ ॥
आनंदाश्रु जे स्रवत । तेंचि उदक जाण तेथ ।
आपाद क्षाळण पुरवित । शरणागत बिभीषण ॥ ६५ ॥
सुग्रीव भावार्थाचें वास । पीतांबर राघवास ।
अर्पिता झाला सावकाश । अति उल्लास पूजेचा ॥ ६६ ॥
निजप्रेम शुद्ध चंदन । घेवोनि आला सुषेण ।
सौ‍मित्रें घेवोन आपण । केलें समर्पण रामभाळीं ॥ ६७ ॥
उरलें जें प्रेमचंदन । तेणें सर्वांगीं रघुनंदन ।
चर्चियेला संपूर्ण । अति विचक्षण सौ‍मित्र ॥ ६८ ॥
अष्टही भाव सात्विक । तेंचि देखा जडित पदक ।
घेवोनियां एकाएक । जांबवंत देख पैं आला ॥ ६९ ॥
देतां सौ‍मित्राचे हातीं । येरें घेवोनि अति प्रीतीं ।
कंठी बांधलें रघुपती । सकळदीप्तिद्योतक ॥ ७० ॥
विविध प्रीतीचे अलंकार । जडित भावार्थे नागर ।
भक्तिमेखळा अति परिकर । जेथें रघुवीर सांपडला ॥ ७१ ॥
हनुमंताचा शिष्य अंगद । श्रीरामीं प्रेमा अगाध ।
त्या प्रेमभावाचा मुकुट शुद्ध । बाणला विशद रामासीं ॥ ७२ ॥
सकळ मिळोनि वानरगणें । राम पूजितीं जीवें प्राणें ।
चैतन्यदीपें ओंवाळणें । निंबलोण सर्वस्वें ॥ ७३ ॥
एकी धरिलें तन्मयछत्र । एक झाले चामरधर ।
एक झाले विंझणेकर । भद्रीं रघुवीर शोभत ॥ ७४ ॥
करोनियां प्रदक्षिणा । सकळही श्रीरामचरणां ।
लागतां तया बिभीषणा । रावण मना आठवला ॥ ७५ ॥

रावणवधाने बिभीषणाचा भयंकर शोकावेग :

वधिलें देखता रावणासी । मोह उपजला बंधूसीं ।
अश्रु आलें जी नेत्रासीं । करीं रुद्रनासी अति दुःखें ॥ ७६ ॥


भ्रातरं निहतं दृष्ट्वा शयानं निर्जिवं रणे ।
शोकवेगपरीतांगो विललाप बिभीषणः ॥९॥


बंधु धरोनि पोटेंसीं । विलाप करी दुःखावेशीं ।
बहु शिकविलें नायकसी । व्यर्थ रामासी विरोधिलें ॥ ७७ ॥
दैवानुसार बुद्धि होये । तेथें तुज बोल काये ।
जैसें प्राक्तन ओढिताहे । प्राणी वर्तताहे तेणें कर्मे ॥ ७८ ॥


अथ खलु विषमः पुराकृतानां फलति हि जंतुषु कर्मणां विपाकः ।
हरशिरसि शिरांसि यानि रेजुर्हरहर तानि लुंठति गृध्रपादे ॥१०॥

देवादिकांना अजिंक्य असलेला रावण बुद्धिभ्रष्ट
झाल्यामुळे रणांगणांत पशुपक्ष्यांचे खाद्य झाला :

निजहस्तेकरोनि जाण । निजशिरें छेदोनि पूर्ण ।
शिवासी अर्पी रावण । तिहीं शिरीं रण वसविलें ॥ ७९ ॥
जीं शोभती शिवमस्तकीं । कुकुटमंडित जडित माणिकीं ।
त्यांसी झडपिती पांखी । निजकौतुकीं गीधघारी ॥ ८० ॥
जीं न खालावती ब्रह्मादिकां । जीं अजेय तिहीं लोकां ।
तीं रणीं लोळती देखा । गोमायुकापायांतळीं॥ ८१ ॥
निजप्रीतीच्या कल्लोळी । शिवें धरियेलीं मौळीं ।
तीं लोळती पायांतळीं । गीधमंडळीमाझारी ॥ ८२ ॥
प्रारब्धभोग बलवत्तर । त्यासी कांही न चले सुत्र ।
रसीं लोळतो दशवक्त्र । कर्मतंत्र सोडीना ॥ ८३ ॥
शंकरवरदेंकरुन । लंकेचा राजा रावण ।
त्यांची शिरें धुळीमाजी जाण । रणांगणीं पूर्ण लोळती ॥ ८४ ॥
निजहस्तें छेदोनि वाहिलीं । जीं शिवमस्तकीं अर्पिलीं ।
तीं दुष्टकर्में व्यापिलीं । गिधीं विदारिलीं घडे केंवीं ॥ ८५ ॥

दैवगती ज्ञानी लोकांनाही अतर्क्य, शिवभक्त असूनही विष्णूचा रावणाने आजन्म द्वेष केला :

तेचिविषयीं उत्तर । श्रोते परिसोत सादर ।
अति सूक्ष्म कर्मसूत्र । नव्हे गोचर सज्ञाना ॥ ८६ ॥
शिव सर्वस्वें सेविला । विष्णु सर्वस्वें द्वेषिला ।
तेणें भेदें नागवला । डोल पडिला भजनासीं ॥ ८७ ॥
विष्णु शिवाचें निजध्येय । शंकर विष्णुचें हृदय ।
उभयांसी जो भेद पाहे । दुर्दशा लाहे नवल कोण ॥ ८८॥


शिवस्य हृदयं विष्णुर्विष्णोश्च हृदयं शिवः ।
यथा शिवमयो विष्णुस्तथा विष्णुमयःशिवः ॥११॥
यथांतरं न पश्यामि तथा मे स्वति चायुषि ॥१२॥


ब्रह्मा धरोनि मुगीवरी । शिव व्यापक चराचरीं ।
विष्णुशंकरां बाह्यांतरीं । दोघांमाझारीं भेद नाहीं ॥ ८९ ॥
विष्णु शिवाचें हृदय । शिव विष्णूचें अंतर्बाह्य ।
निजदेहासीं निश्चय पाहें । भेदाची सोय सांडूनी ॥ ९० ॥
अनवच्छिन्न ऐसें पाहतां । त्यासीं भय नाहीं सर्वथा ।
निरसोनियां भयाची वार्ता । अक्षयता सुखरुप ॥ ९१ ॥
तैसें न करीच रावणू । भेद वाढविला शिवविष्णू ।
वाढविला भजनाभिमानू । द्वेषिला विष्णु भेदबुद्धीं ॥ ९२ ॥
विष्णूची निजशक्ति तत्वतां । पतिव्रता माउली सीता ।
ते अभिलाषिली लंकानाथा । दुष्कर्मता आन कोण ॥ ९३ ॥

गुरुपत्‍नी सीतेची अभिलाषा सर्व नाशाला कारण :

श्रीराम जगद्‌गुरु तत्वतां । त्याची निजशक्ति सीता ।
अभिलाषितां लंकानाथा । गुरुतल्पगता सहजचि ॥ ९४ ॥
गुरुतल्पगतेपुढें आन । पाप कोण आहे दारुण ।
तेणें घोरकर्मे रावण । गीधचरणीं पूर्ण लोळत ॥ ९५ ॥
भल्याचें शिकविलें नायकें । तो सुखाचें मुख केंवि देखे ।
अभिलाषितां रामनायिके । हारविलीं सुखे महाभोग ॥ ९६ ॥
मंचक कनकाचा संपूर्ण । जडितरत्‍नीं सुलक्षण ।
नवग्रहांची पाउटी जाण । तेथें दशानन शयनस्थ ॥ ९७ ॥
तें शरीर आजि येथ । सैरां रणभूमीसीं लोळत ।
स्रक्चंदनें जें मंडित । तें विदारिती घारी गीध ॥ ९८ ॥
जडित अंगदीं प्रचंड । जे मडित बाहुदंड ।
त्याचें झालें खंडविखंड । रणीं वितंड विखुरले ॥ ९९ ॥
जिहीं भुजीं त्रिभुवन । बळें आकळिलें संपूर्ण ।
ते हे रणांगणीं आपण । इतस्ततां जाण विखुरले ॥ १०० ॥
सूर्यप्रभेसमान मुकुट । मस्तकीं घाली दशकंठ ।
त्याचें होवोनियां पीठ । रत्‍नें उद्‌भट विखुरलीं ॥ १ ॥
महाराजे मंडलवर्ती । ज्या चरणां नित्य नमिती ।
ते तोडरेंसहित लोळती । रणाप्रती बंधुराया ॥ २ ॥

कोणाचाही सल्ला रावणाने मानला नाही :

तुज सांगती शुकसारण । त्यांवरी कोपसी दारुण ।
तेंचि सांगे प्रहस्त प्रधान । कोप दारुण तयावरी ॥ ३ ॥
तुझा पुत्र इंद्रजित । सांगतां त्यासी मारुं धावत ।
तैसेंच कुंभकर्ण विनवित । त्यासी निर्भर्त्सित अति रागें ॥ ४ ॥
मंदोदरी निजकांता । न मानिसी तिच्या वचनार्था ।
तेथें माझी कायसी कथा । हाणितल्या लाता अति रागें ॥ ५ ॥
तितुकाही मानिला विषाद । परी न कळे तुझा बोध ।
रावण अद्वैतभक्त शुद्ध । निजानंद पावला ॥ ६ ॥

सर्व कुळाचा संहार व रामांचा द्वेष करुन मुक्ती मिळविण्याची अजब युक्ती :

सकळ कुळा देवोनि मुक्ती । तुवां विरोधला रघुपती ।
बंधो तुझी अतर्क्य युक्ती । कळली निश्चितीं आजि मज ॥ ७ ॥
तत्काळ साधावया निजमुक्ती । सायुज्य साधिला रघुपती ।
तें साधिलें अति निगुती । सकळ संपत्ती अर्पूनी ॥ ८ ॥
होऊनि सर्वस्वा विरक्त । समरांगणीं लंकानाथ ।
देखोनियां रघुनाथ । आनंदभरित झालासी ॥ ९ ॥
त्या आनंदाचे अति प्रीतीं । राम जाणसी सर्वांभूतीं ।
देह अर्पिला रघुपती । भूतसंतृप्तीलागूनी ॥ ११० ॥
समो नागेन समो मशकेन । रावणा बाणलें संपूर्ण ।
देह केला रामार्पण । विश्वमुखें पूर्ण तृप्तीसीं ॥ ११ ॥
करोनि देहाचें हविर्द्रव्य । विश्वमुखीं दशग्रीव ।
अर्पितांचि रघुराव । तृप्ति स्वयमेव पैं झाला ॥ १२ ॥
म्हणोनियां रावण । घारगीधमुखीं जाण ।
आपणा विदारवी आपण । श्रीरघुनंदनसुखार्थ ॥ १३ ॥
कुळ उद्धरिलें सकळिक । तेणें बिभीषणा हरिख ।
हर्षयुक्त करितां शोक । बोलों आणिक आदरिलें ॥ १४ ॥
पुष्पवाटिकेचें उद्यान । क्षणें विध्वंसी पवन ।
तेंवी क्षणमात्रें रामें जाण । ससैन्य रावण निवटिला ॥ १५ ॥
महामत्तमातंग जैसा । कोणाही नागवे सहसा ।
रावण मत्त महागज तैसा । राघवेशा आतुडला ॥ १६ ॥
महामत्त वडवानळू । कोणी न शके आकळूं ।
त्यासी वर्षोनि घन सबळू । अग्निकल्लोळ करी शांत ॥ १७ ॥
तेंवी श्रीराममेघेंकरुन । रावणाग्नि विझविला पूर्ण ।
अष्टांगाचे कोळसे जाण । शोभती संपूर्ण रणांगणीं ॥ १८ ॥
ऐसें नानापरी बहुत । बंधु पुढें घेवोनि तेथ ।
बिभीषण विलाप करित । हृदय पिटित निजकरें ॥ १९ ॥

श्रीरामांकडून बिभीषणाचे सांत्वन :

तें देखोनि रघुनंदन । संबोखीतसे आपण ।
शास्त्ररीतीं लौकिकवचन । शांतवन अति प्रीतीं ॥ १२० ॥
व्यर्थ न करीं शोकतें । न व्हावें झालें निरुतें ।
सावध होवोनि निजचित्तें । सांडी परतें मोहासी ॥ २१ ॥
घटामाजी भरलें जळ । त्यांत बिंबलें चंद्रमंडळ ।
काळें वेंचल्या घटजळ । बिंब तत्काळ हरपलें ॥ २२ ॥
त्या बिंबालागीं आपण । शोक करितां दारुण ।
तेथें श्रमचि उरे जाण । बिंब पूर्ण न ये हाता ॥ २३ ॥
घटामाजी बिंब असते । शोक करितां ते भेटतें ।
तेंवी धरिलिया प्रेतातें । रावण तेथें भेटेना ॥ २४ ॥
बिभीषणा ऐक विनंती । शोक करितां तुजप्रती ।
न भेटे गा लंकापती । सांडीं निश्चितीं भ्रमातें ॥ २५ ॥
तूं विवेकसंपन्न राजा । इतरां उपदेश व्हावा तुझा ।
तो तूं तेथें मोहसमाजा । निमग्र काजा पैं कवण ॥ २६ ॥
ज्यासीं होय अवगती । अवश्य त्याची करावी क्षती ।
उसण्याघायीं जे निमती । ते वंद्य होती सुरनरां ॥ २७ ॥
रावणें करोनि ख्याती । समरांगणीं सर्वशक्ती ।
तुच्छ करोनि देहस्थिती । ब्रह्मस्थिती साधिली ॥ २८ ॥
महायोगी कामक्रोध । जिणोनि साधी परमानंद ।
तेंवी रावणें निजपद । करोनि युद्ध साधिलें ॥ २९ ॥
वाणीचा होता दशमुख । तो झाला विश्वमुख ।
त्याचा करुं नये शोक । निजविवेक विचारीं ॥ १३० ॥
म्हणोनि शोका योग्य रावण । सर्वथा नव्हे जाण ।
तूं बिभीषण सर्वज्ञ । व्यर्थ रुदन सांडी परतें ॥ ३१ ॥
गेलियाचा शोक करितां । लागों पाहे मूर्खता ।
ते सांडोनियां सर्वथा । बंधुस्वधर्मता साधावी ॥ ३२ ॥

बिभीषणाला रावणांची उत्तरक्रिया करण्यास श्रीराम सांगतात :

रावणाचें और्ध्वदेहिक । तुवां करावें आवश्यक ।
गोत्रज पुत्र निमाले देख । कर्ता आणिक दिसेना ॥ ३३ ॥
जो देवद्रोही वेदद्रोही । मुख्य ब्रह्मयाचा ब्रह्मद्रोही ।
त्याचा शोक सर्वथा पाहीं । शास्त्रें नाहीं बोलिला ॥ ३४ ॥
तूं बिभीषण सविवेक । सांडोनियां दुःखशोक ।
करीं बंधूचें और्ध्वदेहिक । व्यर्थ दुःख करोनि काय ॥ ३५ ॥


स तस्य वाक्यैः करुणैर्महात्मा संबोधितः साधुबिभीषणश्च ।
आज्ञापयामास नरेंद्रसूनुः स्वर्गार्थमाधानमदीनसत्वम् ॥१३॥

रामांच्या उपदेशाने बिभीषण मोहापासून परावृत्त :

ऐसें सांवळोनि सुंदरें । बुद्धिबोधप्रबोधचंद्रें ।
सूयवंशप्रभाकरें । दशरथकुमरें बोलिलें ॥ ३६ ॥
जो ईश्वरा ईश्वर । जो योगियांचा योगेश्वर ।
जो नरेंद्राचा नरेंद्र । तो रघुवीर बोलिला ॥ ३७ ॥
ज्याचें ऐकतां वचन । उपनिषदां पडे मौन ।
सद्य चित्त चमत्कारे पूर्ण । समाधान जीवशिवां ॥ ३८ ॥
तेणें श्रीरामें आज्ञापितां । मोह गेला न दिसे केउता ।
सावध होऊनि तत्वतां । झाला करिता उत्तरविधी ॥ ३९ ॥
सत्वाथिला अति सात्विक । बिभीषण परम धार्मिक ।
श्रीरामवचनें देख । मोह निःशेख सांडिला ॥ १४० ॥
जेंवी उगवतां दिनमणी । सचंद्र तारा हरपती रजनीं ।
तेंवी श्रीरामवचनेंकरुनी । मोह तत्क्षणीं पळाला ॥ ४१ ॥
सावध हो‍उनि मानसीं । अनुसरोनि रामवचनासी ।
आनंदमय रणभूमीसीं । प्रेतदहनासी होय करिता ॥ ४२ ॥
स्वर्गादि क्रियेची संस्था । बिभीषण झाला करिता ।
तंव अंतःपुरीं कळतां वार्ता । आल्या वनिता रावणाच्या ॥ ४३ ॥


अंतःपुरद्विनिष्पेतू राक्षस्यः शोककर्षिताः ।
बहुशश्चेष्टमानास्ताः प्रदिग्धः क्षितिपांसुभिः ॥१४॥

रावणस्त्रियांचा आक्रोश :

एकी आरडती ओरडती । एकी वक्षःस्थळें पिटिती ।
एकी गडबडां लोळती । एकी करिती महाशब्द ॥ ४४ ॥
एकी केश तोडिती । एकी कान ओरबडती ।
आंग भूमीवरी टाकिती । मस्तक हाणिती भूमीसीं ॥ ४५ ॥
बहुसाल करिती दुःख । हंबरडे हाणिती देख ।
जेंवी गाय वधितां श्वपाक । अलौकिक आक्रंदे ॥ ४६ ॥

स्त्रीजीवनांत पतीचे महत्व :

पति स्त्रियांचे जीवन । पति स्त्रियांचें सौभाग्य जाण ।
जीवें जातां पतीवीण । प्रेतरुप जाण सर्वथा ॥ ४७ ॥
पति कांतेचे निजवित्त । पति कांतेचे भोग समस्त ।
पतीवीण ते उपहत । वृथा जीवित तियेचें ॥ ४८ ॥
पतीवीण वृथा आचार । पतीवीण वृथा विचार ।
पतीवीण वृथा शरीर । भोगोपचार ते वृथा ॥ ४९ ॥
पतीवीण वृथा योग । पतीवीण वृथा भोग ।
पतीवीण कैंचा संग । पतिदाघ अनिवार ॥ १५० ॥
पतीवीण कैंचे सुख । पतीवीण कैंचा हरिख ।
अल्पविषय स्फुरतां देख । आकल्प नरक भोगावे ॥ ५१ ॥
पतीवीण कवणेंसीं रती । पतीवीण कवणेंसीं प्रीती ।
पतीवीण नरकप्राप्ती । विषय चित्तीं आठवत ॥ ५२ ॥
ऐशापरी दुःखे दुःखिता । मृतप्राय समस्ता ।
मिळालिया रावणवनिता । तळमळित विलापें ॥ ५३ ॥
पुच्छ तुटलिया सापसुरळी । काटा रुतल्या सर्पकपाळीं ।
जळावेगली मासोळी । तेंवी सकळी तळमळती ॥ ५४ ॥


बहुमानं परिष्वज्य काचिदेनं रुरोद ह ।
चरणौ काचिदालिंग्य काचित्कंठेऽवलंब्य च ॥१५॥
उद्‍धृत्य च भुजं काचिद्‍भूमौ संपरिवर्तते ।
हतस्य वदनं दृष्ट्‍वा काचिन्मोहमुपागता ॥१६॥

रावणाचा मृतदेह पाहून स्त्रियांचा विलाप :

पुष्पवाटिकेमाजी मातंग । रिघोनि वन विध्वंसी सांग ।
तेंवी श्रीरामबाणें चांग । रावण‍अंग विध्वंसिलें ॥ ५५ ॥
रणीं धुळीमाजी लंकापती । पडिला देखोनि निश्चितीं ।
रावणांगना आक्रंदती । शोक करिती महादुःखें ॥ ५६ ॥
जें चुंबिती नित्य वदन । त्यातें देखोनि प्रेतवर्ण ।
निढळीं निढळ मेळवून । करीन चुंबन मुखाचें ॥ ५७ ॥
एकी देती आलिंगन । एकी कर उचलिती जाण ।
हृदयीं धरिती आलिंगून । करिती मर्दन निजकुचा ॥ ५८ ॥
एकी शेजारीं निजती । उशीं बाहु घालिती ।
मागुतेनि लंकापती । शयनस्थिती केंवी भेटे ॥ ५९ ॥
चरण चुरावया धांवती एक । पादसंवाहन करिती एक ।
युद्ध करितां दशमुख । रणरंगी देख कष्टला ॥ १६० ॥
रणीं भिडतां श्रीरामासीं । बहुत श्रम रावणासीं ।
म्हणोनि रडती कांतासीं । नाहीं शोकासी मर्यादा ॥ ६१ ॥
पडिला देखोनि दशवदन । म्हणती चुड्यांसी पडिलें खान ।
ओढवलें मस्तकवपन । मोकळे कान दुर्दशा ॥ ६२ ॥
देहलोभें आक्रंदती । कानकेशांलागीं रडती ।
जेणें श्लाघ्य त्रिजगती । देह न वेंचिती त्यासवें ॥ ६३ ॥
दीर्घस्वरें आक्रंदोन । अट्टहास्यें करिती रुदन ।
कानकेशां पडिलें खान । वैधव्य पूर्ण ओढवलें ॥ ६४ ॥
रणीं करोनि रणख्याती । सायुज्य लाधला रघुपती ।
आम्हां सांडोनि लंकापती । साधिली मुक्ती निजांगें ॥ ६५ ॥
मोकलोनियां सकळांसी । गमन केलें निजपदासी ।
आम्हां निरविलें वैधव्यासीं । नापितापासीं बैसविलें ॥ ६६ ॥
पति निघोनि गेला पुढें । मागें कान केशां रडे ।
देहलोभाचें बळ गाढें । नाहीं धडपुढें वैराग्य ॥ ६७ ॥
जेणें सकळ भोग भोगिती । त्यासीं देह देता रडती ।
देहलोभाची ऐसी जाती । रांडवा होती देशभरी ॥ ६८ ॥
आपण स्वयें अमंगळ । प्रेतरुपी पैं केवळ ।
त्या मानिती ब्राह्मणविटाळ । दोष अमंगळ करिती पैं ॥ ६९ ॥
त्यांचेनि हातें पाचन । तें केवळ अमेध्य जाण ।
करिती जें सेवन । पवित्रपण तें व्यर्थ ॥ १७० ॥
ब्राह्मणहस्तीं जें झालें । तें तंव जनीं निद्य केलें ।
प्रेतरुपें जें झालें । पवित्र मानिलें सर्वत्रीं ॥ ७१ ॥
ऐसी जनाची विपरीत गती । निद्य तेंचि वंद्य करिती ।
सुवासिनीतें उपेक्षिती । शुचिर्भूती विधवांची ॥ ७२ ॥
आधींच अमंगळवृत्ती । आणि काशी द्वारका करिती ।
दुणा अभिमान वाढला चित्तीं । ते वंद्य होती कैसेनि ॥ ७३ ॥
हें मी बोलिलों प्रसंगता । क्षोभ न मानावा श्रोतां ।
धर्मशास्त्रीं हे कथा । सत्य सर्वथा ऐसी आहे ॥ ७४ ॥
ऐसीया रावणवनिता । पतिदुःखें अति दुःखिता ।
देहलोभें तळमळितां । नव्हे विरक्ततां देहासीं ॥ ७५ ॥
तंव पातली मंदोदरी । आक्रंदती दीर्घ स्वरीं ।
पति धरोनि अंतरीं । आली सुंदरी जवळिकें ॥ ७६ ॥
एका जनार्दना शरण । श्रोतीं व्हावें सावाधान ।
मंदोदरीचें सहगमन । कृपा करोनि परिसावें ॥ ७७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणवनिताविलपनं नाम चतुःषष्टितमोऽध्यायः ॥ ६४ ॥
ओंव्या ॥ १७७ ॥ श्लोक ॥ १६ ॥ एवं ॥ १९३ ॥


GO TOP