श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकोनधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमहादेवस्याज्ञया श्रीरामलक्ष्मणाभ्यां विमानेनागतस्य राज्ञो दशरथस्याभिवादनं पुत्राभ्यां सीतायै चावश्यकं संदिश्य तस्येन्द्रलोके गमनं च -
महादेवांच्या आज्ञेने श्रीराम आणि लक्ष्मण यांनी विमानाद्वारा आलेल्या राजा दशरथांना प्रणाम करणे आणि दशरथांनी दोन्ही पुत्र तसेच सीतेला आवश्यक संदेश देऊन इंद्रलोकास जाणे -
एतच्छ्रुत्वा शुभं वाक्यं राघवेण सुभाषितम् ।
इदं शुभतरं वाक्यं व्याजहार महेश्वरः ।। १ ।।
राघवांनी सांगितलेली ही शुभ वचने ऐकून श्रीमहादेव आणखीही शुभतर वचन बोलले - ॥१॥
पुष्कराक्ष महाबाहो महावक्षः परन्तप ।
दिष्ट्या कृतमिदं कर्म त्वया शस्त्रभृतां वर ।। २ ।।
परंतप, विशाल वक्षःस्थलाने सुशोभित, महाबाहु कमलनयना ! आपण धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ आहात. आपण रावण-वधरूप कार्य संपन्न केले आहे ही फार सौभाग्याची गोष्ट आहे. ॥२॥
दिष्ट्या सर्वस्य लोकस्य प्रवृद्धं दारुणं तमः ।
अपावृत्तं त्वया सङ्‌ख्ये राम रावणजं भयम् ।। ३ ।।
श्रीरामा ! रावणजनित भय आणि दुःख सर्व लोकांसाठी वाढलेल्या घोर अंधकारासमान होते, जे आपण युद्धात नष्ट केलेत. ॥३॥
आश्वास्य भरतं दीनं कौसल्यां च यशस्विनीम् ।
कैकेयीं च सुमित्रां च दृष्ट्‍वा लक्ष्मणमातरम् ।। ४ ।।

प्राप्य राज्यमयोध्यायां नन्दयित्वा सुहृज्जनम् ।
इक्ष्वाकूणां कुले वंशं स्थापयित्वा महाबल ।। ५ ।।

इष्ट्‍वा तुरगमेधेन प्राप्य चानुत्तमं यशः ।
ब्राह्मणेभ्यो धनं दत्त्वा त्रिदिवं गन्तुमर्हसि ।। ६ ।।
महाबली वीरा ! आता दुःखी भरताला धीर देऊन, यशस्विनी कौसल्या, कैकेयी तसेच लक्ष्मणाची माता सुमित्रा हिला भेटून अयोध्येचे राज्य मिळून सुहृदांना आनंद देऊन, इक्ष्वाकुकुळात आपला वंश स्थापित करून, अश्वमेघ यज्ञाचे अनुष्ठान करून, सर्वोत्तम यशाचे उपार्जन करून तसेच ब्राह्मणांना धन देऊन आपल्याला आपल्या परम धामास गेले पाहिजे. ॥४-६॥
एष राजा दशरथो विमानस्थः पिता तव ।
काकुत्स्थ मानुषे लोके गुरुस्तव महायशाः ।। ७ ।।
काकुत्स्था ! पहा, हे आपले पिता राजा दशरथ विमानावर बसलेले आहेत. मनुष्यलोकात हेच आपले महायशस्वी गुरू होते. ॥७॥
इन्द्रलोकं गतः श्रीमान् त्वया पुत्रेण तारितः ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा त्वमेनमभिवादय ।। ८ ।।
हे श्रीमान्‌ नरेश इंद्रलोकाला प्राप्त झाले आहेत. आपल्या सारख्या सुपुत्राने यांना तारले आहे. आपण भाऊ लक्ष्मणासह यांना नमस्कार करावा. ॥८॥
महादेववचः श्रुत्वा राघवः सहलक्ष्मणः ।
विमानशिखरस्थस्य प्रणामं अकरोत् पितुः ।। ९ ।।
महादेवांचे वचन ऐकून लक्ष्मणासहित राघवांनी विमानात उच्च स्थानावर बसलेल्या आपल्या पित्याला प्रणाम केला. ॥९॥
दीप्यमानं स्वया लक्ष्म्या विरजोम्बरधारिणम् ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा ददर्श पितरं प्रभुः ।। १० ।।
भाऊ लक्ष्मण यांच्यासह भगवान्‌ श्रीरामांनी पित्याला चांगल्या प्रकारे पाहिले. ते निर्मल वस्त्र धारण करून आपल्या दिव्य शोभेने देदीप्यमान दिसत होते. ॥१०॥
हर्षेण महताऽऽविष्टो विमानस्थो महीपतिः ।
प्राणैः प्रियतरं दृष्ट्‍वा पुत्रं दशरथस्तदा ।। ११ ।।
विमानावर बसलेले महाराज दशरथ आपल्या प्राणांहूनही प्रिय पुत्र श्रीरामांना पाहून खूप प्रसन्न झाले. ॥११॥
आरोप्याङ्‌के महाबाहुः वरासनगतः प्रभुः ।
बाहुभ्यां सम्परिष्वज्य ततो वाक्यं समाददे ।। १२ ।।
श्रेष्ठ आसनावर बसलेल्या त्या महाबाहु नरेशांनी त्यांना (आपल्या) मांडीवर बसवून दोन्ही हातांनी आलिंगन दिले आणि याप्रकारे म्हटले - ॥१२॥
न मे स्वर्गो बहु मतः सम्मानश्च सुरर्षिभिः ।
त्वया राम विहीनस्य सत्यं प्रतिशृणोमि ते ।। १३ ।।
रामा ! मी तुला खरेच सांगतो आहे, तुझ्यापासून विलग होऊन मला स्वर्गातील सुख तसेच देवतांच्या द्वारा प्राप्त झालेला सन्मानही चांगला वाटत नाही. ॥१३॥
अद्य त्वां निहतामित्रं दृष्ट्‍वा सम्पूर्णमानसम् ।
निस्तीर्णवनवासं च प्रीतिरासीत् परा मम ।। १४ ।।
आज, तू शत्रूंचा वध करून पूर्णमनोरथ झाला आहेस आणि तू वनवासाचा अवधिही पूरा केला आहेस. हे सर्व पाहून मला फार प्रसन्नता झाली आहे. ॥१४॥
कैकेय्या यानि चोक्तानि वाक्यानि वदतां वर ।
तव प्रव्राजनार्थानि स्थितानि हृदये मम ।। १५ ।।
वक्त्यांच्या मध्ये श्रेष्ठ रघुनंदना ! तुला वनात धाडण्यासाठी कैकेयीने जी जी वाक्ये बोलली होती ती सर्व आज ही माझ्या हृदयात बसली आहेत. ॥१५॥
त्वां तु दृष्ट्‍वा कुशलिनं परिष्वज्य सलक्ष्मणम् ।
अद्य दुःखाद् विमुक्तोऽस्मि नीहारादिव भास्करः ।। १६ ।।
आज लक्ष्मणासहित तुला सकुशल पाहून आणि हृदयाशी धरून माझी समस्त दुःखातून सुटका झाली आहे. जणु चंद्रमाच धुक्यांतून बाहेर आला असावा. (त्याप्रमाणे माझी स्थिति झाली आहे.) ॥१६॥
तारितोऽहं त्वया पुत्र सुपुत्रेण महात्मना ।
अष्टावक्रेण धर्मात्मा कहोलो ब्राह्मणो यथा ।। १७ ।।
मुला ! जसे अष्टावक्राने आपला धर्मात्मा पिता कहोल नामक ब्राह्मणाला तारले होते तसेच तुझ्या सारख्या महात्मा पुत्राने माझा उद्धार केला आहे. ॥१७॥
इदानीं तु विजानामि यथा सौम्य सुरेश्वरैः ।
वधार्थं रावणस्येह विहितं पुरुषोत्तमम् ।। १८ ।।
सौम्या ! आज या देवतांच्या द्वारा मला माहीत झाले की रावणाचा वध करण्यासाठी स्वयं पुरुषोत्तम भगवान्‌च तुझ्या रूपात अवतीर्ण झाले आहेत. ॥१८॥
सिद्धार्था खलु कौसल्या या त्वां राम गृहं गतम् ।
वनान्निवृत्तं संहृष्टा द्रक्ष्यते शत्रुसूदनम् ।। १९ ।।
श्रीरामा ! कौसल्येचे जीवन सार्थक आहे, जी वनातून परतल्यावर तुमच्या सारख्या शत्रुसूदन वीर पुत्राला आपल्या घरात हर्ष आणि उल्हासासह पाहील. ॥१९॥
सिद्धार्थाः खलु ते राम नरा ये त्वां पुरीं गतम् ।
राज्ये चैवाभिषिक्तं च द्रक्ष्यन्ते वसुधाधिपम् ।। २० ।।
रामा ! ते प्रजाजनही कृतार्थ आहेत जे अयोध्येस पोहोचल्यावर तुम्हाला राज्यसिंहासनावर भूमीपालाच्या रूपात अभिषिक्त होतांना पाहातील. ॥२०॥
अनुरक्तेन बलिना शुचिना धर्मचारिणा ।
इच्छामि त्वामहं द्रष्टुं भरतेन समागतम् ।। २१ ।।
भरत फारच धर्मात्मा, पवित्र आणि बलवान्‌ आहे. तो तुमच्या ठिकाणी सदा अनुराग ठेवत असतो. मी त्याच्याशी तुमचे लवकरच मिलन झालेले पाहू इच्छितो. ॥२१॥
चतुर्दश समाः सौम्य वने निर्यापितास्त्वया ।
वसता सीतया सार्धं मत्प्रीत्या लक्ष्मणेन च ।। २२ ।।
सौम्य ! तू माझ्या प्रसन्नतेसाठी लक्ष्मण आणि सीतेसह राहून वनात चौदा वर्षे व्यतीत केली आहेस. ॥२२॥
निवृत्तवनवासोऽसि प्रतिज्ञा पूरिता त्वया ।
रावणं च रणे हत्वा देवताः परितोषिताः ।। २३ ।।
आता तुमच्या वनवासाचा अवधि पूरा झाला आहे. माझी प्रतिज्ञा तू पूर्ण केलीस, तसेच संग्रामात रावणाला मारून देवतांनाही संतुष्ट केले आहेस. ॥२३॥
कृतं कर्म यशः श्लाघ्यं प्राप्तं ते शत्रुसूदन ।
भ्रातृभिः सह राज्यस्थो दीर्घमायुरवाप्नुहि ।। २४ ।।
शत्रूसूदना ! ही सर्व कामे तू करून चुकला आहेस. यामुळे तुला स्पृहणीय यश प्राप्त झाले आहे. आता तू भावांसह राज्यावर प्रतिष्ठित होऊन दीर्घ आयु प्राप्त कर. ॥२४॥
इति ब्रुवाणं राजानं रामः प्राञ्जलिरब्रवीत् ।
कुरु प्रसादं धर्मज्ञ कैकेय्या भरतस्य च ।। २५ ।।
ज्यावेळी राजा दशरथ असे सांगून चुकले तेव्हा श्रीराम हात जोडून त्यांना म्हणाले - धर्मज्ञ महाराज ! आपण कैकेयी आणि भरतावर प्रसन्न व्हावे - त्या दोघांवर कृपा करावी. ॥२५॥
सपुत्रां त्वां त्यजामीति यदुक्ता केकयी त्वया ।
स शापः केकयीं घोरः सपुत्रां न स्पृशेत् प्रभो ।। २६ ।।
प्रभो ! आपण जे कैकेयीस म्हटले होते की मी पुत्रासहित तुझा त्याग करतो आहे, आपला हा घोर शाप पुत्रासहित कैकेयीला स्पर्श न करो. ॥२६॥
स तथेति महाराजो राममुक्त्वा कृताञ्जलिम् ।
लक्ष्मणं च परिष्वज्य पुनर्वाक्यमुवाच ह ।। २७ ।।
तेव्हा श्रीरामांना फार चांगले असे म्हणून महाराज दशरथांनी त्यांची प्रार्थना स्वीकार केली आणि हात जोडून उभा असलेल्या लक्ष्मणास हृदयाशी धरून नंतर हे वचन बोलले - ॥२७॥
रामं शुश्रूषता भक्त्या वैदेह्या सह सीतया ।
कृता मम महाप्रीतिः प्राप्तं धर्मफलं च ते ।। २८ ।।
वत्त्स ! तू वैदेही सीतेसहित श्रीरामांची भक्तिपूर्वक सेवा करून मला फार प्रसन्न केले आहेस. तुला धर्माचे फल प्राप्त झाले आहे. ॥२८॥
धर्मं प्राप्स्यसि धर्मज्ञ यशश्च विपुलं भुवि ।
रामे प्रसन्ने स्वर्गं च महिमानं तथोत्तमम् ।। २९ ।।
धर्मज्ञा ! भविष्यातही तुला धर्माचे फल प्राप्त होईल आणि भूमण्डलात महान्‌ यश उपलब्ध होईल. श्रीरामाच्या प्रसन्नतेने तुला उत्तम स्वर्ग आणि महत्व प्राप्त होईल. ॥२९॥
रामं शुश्रूष भद्रं ते सुमित्रानन्दवर्धन ।
रामः सर्वस्य लोकस्य हितेष्वभिरतः सदा ।। ३० ।।
हे सुमित्रानंदवर्धन लक्ष्मणा ! तुझे कल्याण होवो. तू निरंतर श्रीरामांची सेवा करत रहा. हे श्रीराम सदा संपूर्ण लोकांच्या हितात तत्पर राहातात. ॥३०॥
एते सेन्द्रास्त्रयो लोकाः सिद्धाश्च परमर्षयः ।
अभिगम्य महात्मानं अर्चन्ति पुरुषोत्तमम् ।। ३१ ।।
पहा ! इंद्रासहित हे तीन लोक, सिद्ध आणि महर्षिही परमात्मस्वरूप पुरुषोत्तम रामाला प्रणाम करून त्यांचे पूजन करत आहेत. ॥३१॥
एतत् तदुक्तमव्यक्तं अक्षरं ब्रह्मसम्मितम् ।
देवानां हृदयं सौम्य गुह्यं रामः परंतपः ।। ३२ ।।
सौम्य ! हे परंतप श्रीराम देवतांचे हृदय आणि परम गुह्य तत्व आहेत. हेच वेदांच्या द्वारा प्रतिपादित अव्यक्त आणि अविनाशी ब्रह्म आहेत. ॥३२॥
अवाप्त धर्माचरणं यशश्च विपुलं त्वया ।
रामं शुश्रूषताव्यग्रं वैदेह्या सह सीतया ।। ३३ ।।
वैदेही सीतेच्या बरोबर शान्तभावाने यांची सेवा करीत राहून तू संपूर्ण धर्माचरणाचे फळ आणि महान्‌ यश प्राप्त केले आहेस. ॥३३॥
इत्युक्त्वा लक्ष्मणं राजा स्नुषां बधाञ्जलिं स्थिताम् ।
पुत्रीत्याभाष्य मधुरं शनैरेनामुवाच ह ।। ३४ ।।
लक्ष्मणास असे म्हणून राजा दशरथांनी हात जोडून उभी असलेल्या पुत्रवधू सीतेला पुत्री असे संबोधून हळू हळू मधुर वाणीने म्हटले - ॥३४॥
कर्तव्यो न तु वैदेहि मन्युस्त्यागमिमं प्रति ।
रामेणेदं विशुद्ध्यर्थं कृतं वै त्वद्धितैषिणा ।। ३५ ।।
वैदेही ! तू या त्यागाला लक्षात घेऊन रामावर कुपित होता कामा नये. कारण की हे तुझे हितैषी आहेत आणि संसारात तुमची पवित्रता प्रकट करण्यासाठीच यांनी असा व्यवहार केला आहे. ॥३५॥
सुदुष्करमिदं पुत्रि तव चारित्रलक्षणम् ।
कृतं यत् तेऽन्यनारीणां यशो ह्यभिभविष्यति ॥ ३६ ॥
पुत्री ! तू आपल्या विशुद्ध चारित्र्याला परिलक्षित करण्यासाठी जे अग्निप्रवेश कार्य केले आहेस, ते दुसर्‍या स्त्रियांसाठी अत्यंत दुष्कर आहे. तुझे हे कार्य अन्य नारींच्या यशाला झांकून टाकील. ॥३६॥
न त्वं कामं समाधेया भर्तृशुश्रूषणं प्रति ।
अवश्यं तु मया वाच्यं एष ते दैवतं परम् ।। ३७ ।।
पति-सेवेच्या संबंधी भलेही तुला काही उपदेश देण्याची आवश्यकता नसेल, परंतु मी इतके तरी अवश्य सांगणे जरूर आहे की हे श्रीरामच तुमची सर्वश्रेष्ठ देवता आहेत. ॥३७॥
इति प्रतिसमादिश्य पुत्रौ सीतां तथा राघवः ।
इन्द्रलोकं विमानेन ययौ दशरथो नृपः ।। ३८ ।।
याप्रकारे दोन्ही पुत्र आणि सीतेला आदेश आणि उपदेश देऊन रघुवंशी राजा दशरथ विमानद्वारा इंद्रलोकाला निघून गेले. ॥३८॥
विमानास्थाय महानुभावः
श्रिया च संहृष्टतनुर्नृपोत्तमः ।
आमन्त्र्य पुत्रौ सह सीतया च
जगाम देवप्रवरस्य लोकम् ॥ ३९ ॥
नृपश्रेष्ठ महानुभाव दशरथ अद्‍भुत शोभेने संपन्न होते. त्यांचे शरीर हर्षाने पुलकित होत होते. ते विमानात बसून सीतेसहित दोघां पुत्रांचा निरोप घेऊन देवराज इंद्रांच्या लोकात निघून गेले. ॥३९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकोनविंशत्यधिकशततमः सर्गः ।। ११९ ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेंएकोणविसावा सर्ग पूरा झाला. ॥११९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP