[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। चतुस्त्रिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सीतालक्ष्मणसहितेन श्रीरामेण सस्त्रीगणस्य राज्ञः पार्श्वं गत्वा वनवासायानुज्ञायाः प्रार्थनं राज्ञः शोको मूर्च्छा च श्रीरामेण तस्य सान्त्वनं श्रीराममुरसाऽऽश्लिष्य राज्ञो भूयो विसंज्ञता च - सीता आणि लक्ष्मणासहित श्रीरामांचे राण्यांसहित दशरथांच्या जवळ जावून वनवासासाठी निरोप मागणे, राजांचा शोक आणि मूर्च्छा, श्रीरामांनी त्यांना समजाविणे तथा राजांचे श्रीरामांना हृदयाशी धरुन पुन्हा मूर्च्छित होणे -
ततः कमलपत्राक्षः श्यामो निरुपमो महान् ।
उवाच रामस्तं सूतं पितुराख्याहि मामिति ॥ १ ॥

स रामप्रेषितः क्षिप्रं संतापकलुषेन्द्रियम् ।
प्रविश्य नृपतिं सूतो निश्वसन्तं ददर्श ह ॥ २ ॥
जेव्हां कमलनयन श्यामसुंदर उपमारहित महापुरुष श्रीरामांनी सूत सुमंत्रला सांगितले - 'आपण पित्याला माझ्या आगमनाची सूचना द्यावी' तेव्हा रामांच्या प्रेरणेने शीघ्रच आत जाऊन सारथि सुमंत्रांनी राजांचे दर्शन केले. महाराजांची सारी इंद्रिये संतापाने कलुषित झालेली होती. ते दीर्घ श्वास घेत होते. ॥१-२॥
उपरक्तमिवादित्यं भस्मच्छन्नमिवानलम् ।
तटाकमिव निस्तोयमपश्यज्जगतीपतिम् ॥ ३ ॥

आबोध्य च महाप्राज्ञः परमाकुलचेतसम् ।
राममेवानुशोचन्तं सूतः प्राञ्जलिरब्रवित् ॥ ४ ॥
सुमंत्रानी पाहिले की पृथ्वीपति महाराज दशरथ, राहुग्रस्त सूर्य, राखेने झाकलेला अग्नि तथा जलशून्य तलावाप्रमाणे श्रीहीन होत आहेत. त्यांचे चित्त अत्यंत व्याकुळ आहे आणि ते रामांचेच चिंतन करीत आहेत. तेव्हा महाप्राज्ञ सूतांनी महाराजांना संबोधित करून हात जोडून म्हटले - ॥३-४॥
तं वर्धयित्वा राजानं पूर्वं सूतो जयाशिषा ।
भयविक्लवया वाचा मन्दया श्लक्ष्णयाब्रवीत् ॥ ५ ॥
प्रथम तर सूत सुमंत्रांनी विजयसूचक आशीर्वाद देत महाराजांच्या अभ्युदयाची कामना केली. नंतर भयाने व्याकुळ मंद-मधुर वाणी द्वारा असे म्हटले - ॥५॥
अयं स पुरुषव्याघ्रो द्वारि तिष्ठति ते सुतः ।
ब्राह्मणेभ्यो धनं दत्त्वा सर्वं चैवोपजीविनाम् ॥ ६ ॥

स त्वां पश्यतु भद्रं ते रामः सत्यपराक्रमः ।
सर्वान् सुहृद आपृच्छ्य त्वां इदानीं दिदृक्षते ॥ ७ ॥

गमिष्यति महारण्यं तं पश्य जगतीपते ।
वृतं राजगुणैः सर्वैरादित्यमिव रश्मिभिः ॥ ८ ॥
'पृथ्वीनाथ ! आपले पुत्र सत्यपराक्रमी पुरुषसिंह श्रीराम ब्रह्मणांना तथा आश्रित सेवकांना आपले सर्व धन देऊन द्वारावर येऊन उभे आहेत. आपले कल्याण होवो, हे आपल्या सर्व सुहृदांना भेटून - त्यांचा निरोप घेऊन या समयी आपले दर्शन करू इच्छित आहेत. आपली आज्ञा असेल तर येथे येऊन आपले दर्शन करतील. राजन् ! आता ते विशाल वनात निघून जातील म्हणून किरणांनी युक्त सूर्याप्रमाणे समस्त राजोचित गुणांनी संपन्न या रामांना आपणही डोळे भरून मनसोक्त पाहून घ्या.' ॥६-८॥
स सत्यवादी धर्मात्मा गाम्भीर्यात् सागरोपमः ।
आकाश इव निष्पङ्‌को नरेंद्रः प्रत्युवाच तम् ॥ ९ ॥
हे ऐकून समुद्राप्रमाणे गंभीर, आकाशाप्रमाणे निर्मल, सत्यवादी, धर्मात्मा महाराज दशरथांनी त्यांना उत्तर दिले. ॥९॥
सुमन्त्रानय मे दारान् ये केचिदिह मामकाः ।
दारैः परिवृतः सर्वैर्द्रष्टुमिच्छामि राघवम् ॥ १० ॥
'सुमंत्र, येथे ज्या कोणी माझ्या स्त्रिया आहेत, त्यांना सर्वांना बोलावून घ्या. त्या सर्वांसह मी राघवाला पाहू इच्छितो.' ॥१०॥
सोऽन्तःपुरमतीत्यैव स्त्रियस्ता वाक्यमब्रवीत् ।
आर्यो ह्वयति वो राजा गम्यतां तत्र मा चिरम् ॥ ११ ॥
तेव्हा सुमंत्रांनी अत्यंत वेगाने अंतःपुरात जाऊन सर्व स्त्रीयांना म्हटले- 'देविनो ! आपणा सर्वांना महाराज बोलावीत आहेत म्हणून शीघ्र तेथे चला.' ॥११॥
एवमुक्ताः स्त्रियः सर्वाः सुमन्त्रेण नृपाज्ञया ।
प्रचक्रमुस्तद् भवनं भर्तुराज्ञाय शासनम् ॥ १२ ॥
राजांच्या आज्ञेवरून सुमंत्रांनी असे सांगितल्यावर सर्व राण्या आपल्या स्वामीचा आदेश समजून त्या भवनाकडे निघाल्या. ॥१२॥
अर्धसप्तशतास्तत्र प्रमदास्ताम्रलोचनाः ।
कौसल्यां परिवार्याथ शनैर्जग्मुर्धृतव्रताः ॥ १३ ॥
किञ्चित लाल नेत्र असलेल्या साडेतीनशे पतिव्रता युवती स्त्रिया महाराणी कौसल्येला सर्व बाजूनी घेरून हळू हळू त्या भवनात गेल्या. ॥१३॥
आगतेषु च दारेषु समवेक्ष्य महीपतिः ।
उवाच राजा तं सूतं सुमन्त्रानय मे सुतम् ॥ १४ ॥
त्या सर्व आल्यावर त्यांना पाहून पृथ्वीपति राजा दशरथांनी सूतास म्हटले- 'सुमंत्र ! आता माझ्या पुत्राला घेऊन या.' ॥१४॥
स सूतो राममादाय लक्ष्मणं मैथिलीं तथा ।
जगामाभिमुखस्तूर्णं सकाशं जगतीपतेः ॥ १५ ॥
आज्ञा मिळताच सुमंत्र गेले आणि श्रीराम, लक्ष्मण आणि मैथिली यांना बरोबर घेऊन तात्काळच महाराजां जवळ परत आले. ॥१५॥
स राजा पुत्रमायान्तं दृष्ट्‍वा चारात् कृताञ्जलिम् ।
उत्पपातासनात् तूर्णमार्तः स्त्रीजनसंवृतः ॥ १६ ॥
दूरूनच आपल्या पुत्राला हात जोडून येताना पाहून महाराज एकाएकी आपल्या आसनावरून उठून उभे राहिले. त्यावेळी स्त्रियांनी घेरलेले ते नरेश शोकाने आर्त होत होते. ॥१६॥
सोभिदुद्राव वेगेन रामं दृष्ट्‍वा विशाम्पतिः ।
तमसम्प्राप्य दुःखार्तः पपात भूवि मूर्च्छितः ॥ १७ ॥
श्रीरामास पहाताच ते प्रजापालक महाराज अत्यंत वेगाने त्यांच्याकडे धावले परंतु त्यांच्या जवळ पोहोचण्यापूर्वीच दुःखाने व्याकुळ होऊन पृथ्वीवर कोसळले आणि मूर्छित झाले. ॥१७॥
तं रामोऽभ्यपतत् क्षिप्रं लक्ष्मणश्च महारथः ।
विसंज्ञमिव दुःखेन सशोकं नृपतिं तथा ॥ १८ ॥
त्या समयी श्रीराम आणि महारथी लक्ष्मण अत्यंत वेगाने चालून दुःखाने निश्चेष्ट पडलेल्या शोकमग्न महाराजांच्या जवळ जाऊन पोहोंचले. ॥१८॥
स्त्रीसहस्रनिनादश्च सञ्जज्ञे राजवेश्मनि ।
हा हा रामेति सहसा भूषणध्वनिमिश्रितः ॥ १९ ॥
इतक्यातच त्या राजभवनात एकाएकी आभूषणांच्या ध्वनी बरोबरच हजारो स्त्रियांचा 'हा राम ! हा राम ! असा आर्तनाद निनादत राहिला. ॥१९॥
तं परिष्वज्य बाहुभ्यां तावुभौ रामलक्ष्मणौ ।
पर्यङ्‌के सीतया सार्धं रुदन्तः समवेशयन् ॥ २० ॥
श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघे भाऊही सीतेसह रडू लागले आणि त्या तिघांनी महाराजांना दोन्ही भुजांनी उचलून पलंगावर बसविले. ॥२०॥
अथ रामो मुहूर्तस्य लब्धसञ्ज्ञं महीपतिम् ।
उवाच प्राञ्जलिर्वाष्पशोकार्णवपरिप्लुतम् ॥ २१ ॥
शोकाश्रूच्या सागरात बुडलेल्या दशरथ महाराजांना एक मुहूर्तानंतर जेव्हा परत शुद्ध आली तेव्हा श्रीरामांनी हात जोडून त्यांना म्हटले - ॥२१॥
आपृच्छे त्वां महाराज सर्वेषामीश्वरोऽसि नः ।
प्रस्थितं दण्डकारण्यं पश्य त्वं कुशलेन माम् ॥ २२ ॥
'महाराज ! आपण आमचे स्वामी आहात. मी दण्डकारण्यात जात आहे आणि आपली आज्ञा घेण्यासाठी आलो आहे. आपण आपल्या कल्याणमय नजरेने माझ्याकडे पहावे. ॥२२॥
लक्ष्मणं चानुजानीहि सीता चान्वेति मां वनम् ।
कारणैर्बहुभिस्तथ्यैर्वार्यमाणौ न चेच्छतः ॥ २३ ॥

अनुजानीहि सर्वान् नः शोकमुत्सृज्य मानद ।
लक्ष्मणं मां च सीतां च प्रजापतिरिवात्मजान् ॥ २४ ॥
माझ्या बरोबरच लक्ष्मणालाही वनात जाण्याची आज्ञा द्यावी. त्या बरोबरच याचाही स्वीकार करावा की सीताही माझ्या बरोबर वनात जावी. मी अनेक खरे कारणे सांगून या दोघांना अडविण्याचा प्रयत्‍न केला, परंतु ही येथे राहू इच्छित नाहीत, म्हणून हे मानद नरेश ! आपण शोक सोडून जशी ब्रह्मदेवांनी आपले पुत्र सनकादि यांना तपासाठी वनात जाण्यासाठी अनुमति दिली होती; त्या प्रमाणे आम्हा सर्वाना, मला लक्ष्मणाला आणि सीतेला वनात जाण्याची आज्ञा द्यावी.' ॥२३-२४॥
प्रतीक्षमाणमव्यग्रमनुज्ञां जगतीपतेः ।
उवाच राजा सम्प्रेक्ष्य वनवासाय राघवम् ॥ २५ ॥
या प्रकारे शांतभावाने वनवासासाठी राजाच्या आज्ञेची प्रतिक्षा करणार्‍या राघवाकडे पाहून महाराजांनी त्यांना म्हटले - ॥२५॥
अहं राघव कैकेय्या वरदानेन मोहितः ।
अयोध्यायां त्वमेवाद्य भव राजा निगृह्य माम् ॥ २६ ॥
'राघवा ! मी कैकेयीला दिलेल्या वरामुळे मोहात पडलो आहे. तू मला कैद करून स्वतःच आता अयोध्येचा राजा बनून जा." ॥२६॥
एवमुक्तो नृपतिना रामो धर्मभृतां वरः ।
प्रत्युवाचाञ्जलिं कृत्वा पितरं वाक्यकोविदः ॥ २७ ॥
महाराजांनी असे म्हटल्यावर वाक्यकोविद (संभाषण करण्यात कुशल), धर्मात्म्यांच्या मघ्ये श्रेष्ठ रामांनी दोन्ही हात जोडून पित्याला या प्रकारे उत्तर दिले. ॥२७॥
भवान् वर्षसहस्राय पृथिव्या नृपते पतिः ।
अहं त्वरण्ये वत्स्यामि न मे राज्यस्य काङ्‌क्षिता ॥ २८ ॥
"महाराज ! आपण हजारो वर्षापर्यत या पृथ्वीचे अधिपति होऊन रहा. मी तर आता वनातच निवास करीन. मला राज्य घेण्याची इच्छा नाही. ॥२८॥
नव पञ्च च वर्षाणि वनवासे विहृत्य ते ।
पुनः पादौ ग्रहीष्यामि प्रतिज्ञान्ते नराधिप ॥ २९ ॥
"नरेश्वर ! चौदा वर्षेपर्यत वनात हिंडून फिरून आपली प्रतिज्ञा पुरी करून त्यानंतर मी पुन्हा आपल्या युगल चरणी मस्तक नमवीन.' ॥२९॥
रुदन्नार्तः प्रियं पुत्रं सत्यपाशेन संयुतः ।
कैकेय्या चोद्यमानस्तु मिथो राजा तमब्रवीत् ॥ ३० ॥
राजा दशरथ एक तर सत्याच्या बंधनाने बांधले गेले होते आणि दुसरे एकांतात कैकेयी त्यांना रामाला तात्काळ वनात धाडण्यासाठी बाध्य करीत होती - या अवस्थेत ते आर्तभावाने रडत रडत आपल्या प्रिय पुत्र श्रीरामांना म्हणाले - ॥३०॥
श्रेयसे वृद्धये तात पुनरागमनाय च ।
गच्छस्वारिष्टमव्यग्रः पन्थानमकुतोभयम् ॥ ३१ ॥
'तात ! तू कल्याणासाठी, वृद्धिसाठी आणि परतून येण्यासाठी शांतभावाने जा. तुझा मार्ग विघ्न- बाधा रहित आणि निर्भय होवो. ॥३१॥
न हि सत्यात्मनस्तात धर्माभिमनसस्तव ।
विनिवर्तयितुं बुद्धिः शक्यते रघुनन्दन ॥ ३२ ॥

अद्य त्विदानीं रजनीं पुत्र मा गच्छ सर्वथा ।
एकाहं दर्शनेनापि साधु तावच्चराम्यहम् ॥ ३३ ॥
'रघुनंदना ! मुला ! तू सत्यस्वरूप आणि धर्मात्मा आहेस. तुझे विचार पालटणे पालटविणे तर असंभव आहे परंतु रात्रभर आणखी राहा. फक्त एका रात्रिसाठी आपली यात्रा रोखून धर. केवळ एक दिवस तरी तर तुला पहाण्याचे सुख दे. ॥ ३२-३३॥
मातरं मां च सम्पश्यन् वसेमामद्य शर्वरीम् ।
तर्पितः सर्वकामैस्त्वं श्वः काले साधयिष्यसि ॥ ३४ ॥
आपल्या मातेची आणि माझीही अवस्था पाहून आजची ही रात्र येथे राहा. माझ्या द्वारा संपूर्ण अभिलषित वस्तुनी तृप्त होऊन उद्या प्रातःकाळी येथून जा. ॥३४॥
दुष्करं क्रियते पुत्र सर्वथा राघव प्रिय ।
त्वया हि मत्प्रियार्थं तु वनमेवमुपाश्रितम् ॥ ३५ ॥
'माझ्या प्रिय पुत्रा, राघवा ! तू सर्वथा दुष्कर कार्य करीत आहेस. माझे प्रिय करण्यासाठीच तू या प्रकारे वनाचा आश्रय घेतला आहेस. ॥३५॥
न चैतन्मे प्रियं पुत्र शपे सत्येन राघव ।
छन्नया चलितस्त्वस्मि स्त्रिया भस्माग्निकल्पया ॥ ३६ ॥

वञ्चना या तु लब्धा मे तां त्वं निस्तर्तुमिच्छसि ।
अनया वृत्तसादिन्या कैकेय्याऽभिप्रचोदितः ॥ ३७ ॥
'परंतु राघवा ! मी सत्याची शपथ घेऊन सांगतो आहे की हे मला प्रिय नाही आहे. मला तुझे वनात जाणे चांगले वाटत नाही. ही माझी स्त्री कैकेयी राखेत लपलेल्या अग्निप्रमाणे भयंकर आहे. हिने आपला क्रूर अभिप्राय लपवून ठेवला होता. हिनेच आज मला माझ्या अभीष्ट संकल्पापासून विचलित केले आहे. कुलोचित सदाचाराचा विनाश करणार्‍या या कैकेयीने मला वरदानासाठी प्रेरित करून मला अत्यंत मोठा धोका दिला आहे. तिच्या द्वारे जी वञ्चना मला प्राप्त झाली आहे, तिलाच तू पार करू इच्छित आहेस. ॥ ३६-३७॥
न चैतदाश्चर्यतमं यत् त्वं ज्येष्ठः सुतो मम ।
अपानृतकथं पुत्र पितरं कर्तुमिच्छसि ॥ ३८ ॥
'पुत्रा ! तू आपल्या पित्याला सत्यवादी बनविण्याची इच्छा करीत आहेस. तुझ्यासाठी ही काही आश्चर्याची गोष्ट नाही आहे कारण तू गुण आणि अवस्था या दोन्ही दृष्टीने माझा ज्येष्ठ पुत्र आहेस.' ॥३८॥
अथ रामस्तदा श्रुत्वा पितुरार्तस्य भाषितम् ।
लक्ष्मणेन सह भ्रात्रा दीनो वचनमब्रवीत् ॥ ३९ ॥
आपल्या शोकाकुल पित्याचे हे वचन ऐकून त्या समयी लहान भाऊ लक्ष्मण याच्यासह श्रीरामाने दुःखी होऊन म्हटले - ॥३९॥
प्राप्स्यामि यानद्य गुणान् को मे श्वस्तान् प्रदास्यति ।
उपक्रमणमेवातः सर्वकामैरहं वृणे ॥ ४० ॥
'महाराज ! आज यात्रा करून ज्या गुणां (लाभां) ना मी मिळवीन, ते उद्या कोण मला देईल ? ('प्राप्स्यामि -' या अर्ध्या श्लोकाचा असाही अर्थ होऊ शकतो की आज येथे राहून ज्या उत्तमोत्तम अभीष्ट पदार्थांना मी प्राप्त करीन, त्यांना उद्यांपासून कोण देईल) म्हणून मी संपूर्ण कामनांच्या बदल्यात आज येथून निघून जाणेच चांगले समजतो आणि त्याचेच वरण करीत आहे. ॥४०॥
इयं सराष्ट्रा सजना धनधान्यसमाकुला ।
मया विसृष्टा वसुधा भरताय प्रदीयताम् ॥ ४१ ॥
'राष्ट्र आणि येथील निवासी मनुष्यांसहित धनधान्याने संपन्न ही सारी पृथ्वी मी सोडून दिली आहे. आपण ही भरताला द्यावी. ॥४१॥
वनवासकृता बुद्धिर्न च मेऽद्य चलिष्यति ।
यस्तु युद्धे वरो दत्तः कैकेय्यै वरद त्वया ॥ ४२ ॥

दीयतां निखिलेनैव सत्यस्त्वं भव पार्थिव ।
'माझा वनवास विषयक निश्चय आता बदलू शकणार नाही. वरदायक नरेश आपण ! देवासुर संग्रामात कैकेयीला जो वर देण्याची प्रतिज्ञा केली होती, तो पूर्णरूपाने द्यावा आणि सत्यवादी बनावे. ॥४२ १/२॥
अहं निदेशं भवतो यथोक्तमनुपालयन् ॥ ४३ ॥

चतुर्दश समा वत्स्ये वने वनचरैः सह ।
मा विमर्शो वसुमती भरताय प्रदीयताम् ॥ ४४ ॥
'मी आपल्या उक्त आज्ञेचे पालन करीत चौदा वर्षे वनात वनचारी प्राण्यांच्या बरोबर निवास करीन. आपल्या मनात कुठलाही अन्यथा विचार येता उपयोगी नाही. आपण ही सारी पृथ्वी भरताला द्यावी. ॥४३-४४॥
न हि मे काङ्‌क्षितं राज्यं सुखमात्मनि वा प्रियम् ।
यथा निदेशं कर्तुं वै तवैव रघुनन्दन ॥ ४५ ॥
'रघुनंदन मी आपल्या (माझ्या स्वतःच्या) मनाला सुख देण्यासाठी अथवा स्वजनांचे प्रिय करण्याच्या उद्देश्याने राज्य घेण्याची इच्छा केली नव्हती. आपल्या आज्ञेचे यथावत रूपाने पालन करण्यासाठी मी ते ग्रहण करण्याची अभिलाषा केली होती. ॥४५॥
अपगच्छतु ते दुःखं मा भूर्बाष्पपरिप्लुतः ।
न हि क्षुभ्यति दुधर्षः समुद्रः सरितां पतिः ॥ ४६ ॥
'आपले दुःख दूर होऊन जावे, आपण या प्रकारे अश्रू ढाळू नये. सरितांचा स्वामी समुद्र क्षुब्ध होत नाही, आपल्या मर्यादेचा त्याग करीत नाही. (त्याप्रमाणे आपणही क्षुब्ध होता कामा नये). ॥४६॥
नैवाहं राज्यमिच्छामि न सुखं न च मेदिनीम् ।
नैव सर्वानिमान् कामान् न स्वर्गं न च जीवितम् ॥ ४७ ॥
'मला ना या राज्याची, ना सुखाची, ना पृथ्वीची, ना या संपूर्ण भोगांची, ना स्वर्गाची आणि ना जीवनाची इच्छा आहे. ॥४७॥
त्वामहं सत्यमिच्छामि नानृतं पुरुषर्षभ ।
प्रत्यक्षं तव सत्येन सुकृतेन च ते शपे ॥ ४८ ॥
'पुरुषश्रेष्ठ ! माझ्या मनात जर कुठली इच्छा असेल तर ती हीच आहे की आपण सत्यवादी बनावे. आपले वचन मिथ्या होऊ नये. ही गोष्ट मी आपल्या समोर सत्य आणि शुभकर्मांची शपथ घेऊन सांगत आहे. ॥४८॥
न च शक्यं मया तात स्थातुं क्षणमपि प्रभो ।
न शोकं धारयस्वेमं न हि मेऽस्ति विपर्ययः ॥ ४९ ॥
'तात ! प्रभो ! आता मी येथे एक क्षणही थांबू शकत नाही म्हणून आपण या शोकाला आपल्या आंतच दाबून ठेवा. मी आपल्या निश्चयाच्या विपरित काहीही करू शकत नाही. ॥४९॥
अर्थितो ह्यस्मि कैकेय्या वनं गच्छेति राघव ।
मया चोक्तं व्रजामीति तत्सत्यमनुपालये ॥ ५० ॥
'राघव ! कैकेयीने माझ्याकडे याचना केली होती की 'राम ! तू वनात निघून जा.' मी वचन दिले होते कि 'अवश्य जाईन' त्या सत्याचे मला पालन करावयाचे आहे. ॥५०॥
मा चोत्कण्ठां कृथा देव वने रंस्यामहे वयम् ।
प्रशान्तहरिणाकीर्णे नानाशकुनिनादिते ॥ ५१ ॥
'देवा ! आम्हांला पहाण्यासाठी अथवा आम्हांला भेटण्यासाठी आपण मध्ये मध्ये उत्कंठित होऊ नये. शांत स्वभावाच्या मृगांनी भरलेल्या आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या कलरवाने गुंजत असणार्‍या त्या वनात आम्ही मोठ्या आनंदात राहू. ॥५१॥
पिता हि दैवतं तात देवतानामपि स्मृतम् ।
तस्माद् दैवतमित्येव करिष्यामि पितुर्वचः ॥ ५२ ॥
'पित्यास देवतांचीही देवता मानले गेले आहे. म्हणून मी देवता समजूनच पित्याचा (आपल्या) आज्ञेचे पालन करीन. ॥५२॥
चतुर्दशसु वर्षेषु गतेषु नृपसत्तम ।
पुनर्द्रक्ष्यसि मां प्राप्तं सन्तापोऽयं विमुच्यताम् ॥ ५३ ॥
'नृपश्रेष्ठ ! आता हा संताप सोडून द्यावा. चौदा वर्षे निघून गेल्यावर आपण परत मला आलेला पहाल. ॥५३॥
येन संस्तम्भनीयोऽयं सर्वो बाष्पकलो जनः ।
स त्वं पुरुषशार्दूल किमर्थं विक्रियां गतः ॥ ५४ ॥
'पुरुषसिंह ! येथे जितके लोक अश्रु ढाळीत आहेत (त्या) या सर्वांना धैर्य, धीर देणे आपले कर्तव्य आहे, मग आपण स्वतःच इतके विकल कसे होत आहात ? ॥५४॥
पुरं च राष्ट्रं च मही च केवला
    मया विसृष्टा भरताय दीयताम् ।
अहं निदेशं भवतोऽनुपालयन्
    वनं गमिष्यामि चिराय सेवितुम् ॥ ५५ ॥
'हे नगर, हे राज्य आणि ही पृथ्वी मी सोडून दिली आहे. आपण हे सर्वकाही भरताला द्यावे. आता मी आपल्या आदेशाचे पालन करीत दीर्घकाळपर्यंत वनात निवास करण्यासाठी येथून यात्रा करीत आहे. ॥५५॥
मया विसृष्टां भरतो महीमिमां
    सशैलखण्डां सपुरोपकाननाम् ।
शिवासु सीमास्वनुशास्तु केवलं
    त्वया यदुक्तं नृपते तथास्तु तत् ॥ ५६ ॥
'मी सोडलेल्या या पर्वतखण्डांचे, नगरे आणि उपवनांसहित या सार्‍या पृथ्वीचे भरत कल्याणकारी मर्यादेत स्थित राहून पालन करो. नरेश्वर ! आपण जे वचन दिले आहे ते पूर्ण होवो. ॥५६॥
न मे तथा पार्थिव धीयते मनो
    महत्सु कामेषु न चात्मनः प्रिये ।
यथा निदेशे तव शिष्टसम्मते
    व्यपैतु दुःखं तव मत्कृतेऽनघ ॥ ५७ ॥
'पृथ्वीनाथ ! निष्पाप महाराज ! सत्पुरुषांच्या द्वारा अनुमोदित आपल्या आज्ञेचे पालन करण्यात माझे मन जसे लागत आहे तसे मोठमोठ्या भोगात, तथा आपल्या कुठल्या प्रिय पदार्थातही लागत नाही. म्हणून आपल्या मनांत माझ्यासाठी जे दुःख आहे ते दूर झाले पाहिजे. ॥५७॥
तदद्य नैवानघ राज्यमव्ययं
    न सर्वकामान् वसुधां न मैथिलीम् ।
न चिन्तितं त्वामनृतेन योजयन्
    वृणीय सत्यं व्रतमस्तु ते तथा ॥ ५८ ॥
'निष्पाप नरेश ! आज आपल्याला मिथ्यावादी बनवून मी अक्षय राज्य, सर्व प्रकरचे भोग, वसुधेचे अधिपत्य, मैथिली (सीता) तथा अन्य कुठल्याही अभिलषित पदार्थाचा स्वीकार करू इच्छित नाही. माझी एकमात्र इच्छाहीच आहे की 'आपली प्रतिज्ञा सत्य व्हावी' ॥५८॥
फलानि मूलानि च भक्षयन् वने
    गिरींश्च पश्यन् सरितः सरांसि च ।
वनं प्रविश्यैव विचित्रपादपं
    सुखी भविष्यामि तवास्तु निर्वृतिः ॥ ५९ ॥
'मी विचित्र वृक्षांनी युक्त वनात प्रवेश करून फलमूलाचे भोजन करीत तेथील पर्वत, नद्या, आणि सरोवरांना बघून बघून सुखी होईन, म्हणून आपण आपले मनाला शांत करावे. ॥५९॥
एवं स राजा व्यसनाभिपन्न-
    स्तापेन दुःखेन च पीड्यमानः ।
आलिङ्‌ग्य पुत्रं सुविनष्टसंज्ञो
    भूमिं गतो नैव चिचेष्ट किञ्चित् ॥ ६० ॥
श्रीरामांनी असे सांगितल्यावर पुत्रवियोगाच्या संकटात पडलेल्या राजा दशरथांनी दुःख आणि संतापाने पीडित होऊन त्यांना हृदयाशी धरले आणि परत अचेत होऊन पृथ्वीवर पडले. त्या समयी त्यांचे शरीर जडाप्रमाणे काहीही हालचाल करु शकत नव्हते. ॥६०॥
देव्यः समस्ता रुरुदुः समेता-
    स्तां वर्जयित्वा नरदेवपत्‍नीम् ।
रुदन् सुमंत्रोऽपि जगाम मूर्च्छां
    हाहाकृतं तत्र बभूव सर्वम् ॥ ६१ ॥
हे पाहून राजराणी कैकेयीला सोडून तेथे एकत्रित झालेल्या अन्य सर्व राण्या रडू लागल्या. सुमंत्रही रडता रडता मूर्च्छित होऊन गेले तथा तेथे सर्वत्र हाहाकार माजला. ॥६१॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे चतुस्त्रिंशः सर्गः ॥ ३४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकीनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा चवतिसावा सर्ग पूरा झाला. ॥३४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP