श्रीरामस्याज्ञया गुहेन स्वामात्याद्वारा नौकाया आनयनं श्रीरामस्य सुमन्त्रं प्रत्ययोध्यायां निवर्तितुमादेशः, मातुः पितुश्च कृते संदेशश्रावणं स्वयमपि वनमेव गन्तुमाग्रहं कुर्वतः सुमन्त्रस्य श्रीरामेण सप्रबोधं निवर्तनं श्रीरामादीनां नौकायामारोहणं सीताया गंगा प्रति प्रार्थना, नौकया गंगामुत्तीर्य श्रीरामादीनां वत्सदेशे गमनं सायं वृक्षस्य मूले निवासनाय प्रस्थानं च -
|
श्रीरामांच्या आज्ञेने गुहाने नाव मागविणे, श्रीरामांनी सुमंत्रांची समजूत घालून अयोध्यापुरीला परत जाण्यासाठी आज्ञा देणे आणि माता-पिता आदिंना सांगण्यासाठी संदेश ऐकविणे, सुमंत्रांनी वनातच येण्याचा आग्रह धरल्यावर श्रीरामांनी त्यांना युक्तिपूर्वक समजावून परत जाण्यासाठी विवश करणे, नंतर तिघांचे नावेत बसणे, सीतेची गंगेस प्रार्थना, नावेतून पार उतरून श्रीराम आदिंचे वत्सदेशात पोहोचणे आणि सायंकाळी एका वृक्षाखाली विश्राम करणे -
|
प्रभातायां तु शर्वर्यां पृथुवक्षा महायशाः ।
उवाच रामः सौमित्रिं लक्ष्मणं शुभलक्षणम् ॥ १ ॥
|
जेव्हा रात्र संपून प्रभात झाली त्या समयी विशाल वक्षःस्थल असणार्या महायशस्वी श्रीरामांनी शुभलक्षण संपन्न सौमित्र लक्ष्मणास या प्रकारे म्हटले- ॥१॥
|
भास्करोदयकालोऽसौ गता भगवती निशा ।
असौ सुकृष्णो विहगः कोकिलस्तात कूजति ॥ २ ॥
|
’तात ! भगवती निशा व्यतीत झाली आहे. आता सूर्योदयाचा समय येऊन ठेपला आहे. तो अत्यंत काळ्या रंगाचा पक्षी कोकिळ कुहूकुहू बोलत आहे. ॥२॥
|
बर्हिणानां च निर्घोषः श्रूयते नदतां वने ।
तराम जाह्नवीं सौम्य शीघ्रगां सागरङ्गमाम् ॥ ३ ॥
|
’वनात अव्यक्त शब्द करणार्या मयूरांची केका (वाणी) ही ऐकू येत आहे. म्हणून सौम्य ! आता आपल्याला तीव्र गतिने वाहणार्या समुद्रवाहिनी गंगेला पार करून जावयास हवे आहे. ॥३॥
|
विज्ञाय रामस्य वचः सौमित्रिर्मित्रनन्दनः ।
गुहमामन्त्र्य सूतं च सोऽतिष्ठद् भ्रातुरग्रतः ॥ ४ ॥
|
मित्रांना आनंदित करणार्या सौमित्र लक्ष्मणांनी श्रीरामांच्या वचनाचा अभिप्राय समजून गुह आणि सुमंत्र यांना बोलावून पार उतरून जाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आणि स्वतः ते आपल्या भावासमोर येऊन उभे राहिले. ॥४॥
|
स तु रामस्य वचनं निशम्य प्रतिगृह्य च ।
स्थपतिस्तूर्णमाहूय सचिवानिदमब्रवीत् ॥ ५ ॥
|
श्रीरामांचे वचन ऐकून त्यांचा आदेश शिरोधार्य करून निषादराजाने त्वरित आपल्या सचिवांना बोलावले आणि या प्रकारे सांगितले - ॥५॥
|
अस्य वाहनसंयुक्तां कर्णग्राहवतीं शुभाम् ।
सुप्रतारां दृढां तीर्थे शीघ्रं नावमुपाहर ॥ ६ ॥
|
’तुम्ही घाटावर शीघ्रच एक अशी नाव घेऊन या की जी मजबूत असूनही वल्हवायला सुगम असेल, त्यात वल्ही ठेवलेली असतील, कर्णधार उपस्थित असेल आणि ती नाव दिसण्यात ही सुंदर असेल. ॥६॥
|
तं निशम्य गुहादेशं गुहामात्यो गतो महान् ।
उपोह्य रुचिरां नावं गुहाय प्रत्यवेदयत् ॥ ७ ॥
|
निषादराज गुहाचा तो आदेश ऐकून त्याचा महान अमात्य गेला आणि एक सुंदर नाव घाटावर पोहोचवून त्याने गुहास याची सूचना दिली. ॥७॥
|
ततः स प्राञ्जलिर्भूत्वा गुहो राघवमब्रवीत् ।
उपस्थितेयं नौर्देव भूयः किं करवाणि ते ॥ ८ ॥
|
तेव्हा गुहाने हात जोडून राघवास म्हटले- ’देवा ! ही नौका उपस्थित आहे. सांगा बरे मी या समयी आपली आणखी काय सेवा करूं ? ॥८॥
|
तवामरसुतप्रख्य तर्तुं सागरगामिनीम् ।
नौरियं पुरुषव्याघ्र तां त्वमारोह सुव्रत ॥ ९ ॥
|
’देवकुमाराप्रमाणे तेजस्वी तथा उत्तम व्रताचे पालन करणार्या पुरूषसिंह श्रीरामा ! समुद्रगामिनी गंगानदीला पार करण्यासाठी आपल्या सेवेत ही नाव आलेली आहे, आता आपण शीघ्र हिच्यावर आरूढ व्हावे.’ ॥९॥
|
अथोवाच महातेजा रामो गुहमिदं वचः ।
कृतकामोऽस्मि भवता शीघ्रमारोप्यतामिति ॥ १० ॥
|
तेव्हा महातेजस्वी श्रीरामांनी गुहास या प्रकारे सांगितले- ’सख्या ! तू माझे सर्व मनोरथ पूर्ण केले आहेस, आता शीघ्रच हे सर्व सामान नावेवर चढव.’ ॥१०॥
|
ततः कलापान् सन्नह्य खड्गौ बद्ध्वा च धन्विनौ ।
जग्मतुर्येन तौ गङ्गां सीतया सह राघवौ ॥ ११ ॥
|
असे म्हणून श्रीराम आणि लक्ष्मणांनी कवच धारण करून तरकस (भाता) आणि तलवार बांधली आणि धनुष्य घेऊन ते दोघे बंधु ज्या मार्गाने सर्व लोक घाटावर जातात त्या मार्गाने सीतेसह गंगेच्या तटावर गेले. ॥११॥
|
राममेवं तु धर्मज्ञमुपागम्य विनीतवत् ।
किमहं करवाणीति सूतः प्राञ्जलिरब्रवीत् ॥ १२ ॥
|
त्या समयी धर्माचे ज्ञाते भगवान श्रीराम यांच्या जवळ जाऊन सारथी सुमंत्रांनी विनीतभावाने हात जोडून विचारले- ’प्रभो ! आता मी आपली काय सेवा करू ?’ ॥१२॥
|
ततोऽब्रवीद् दाशरथिः सुमन्त्रं
स्पृशन् करेणोत्तमदक्षिणेन ।
सुमन्त्र शीघ्रं पुनरेव याहि
राज्ञः सकाशे भव चाप्रमत्तः ॥ १३ ॥
|
तेव्हां दशरथनंदन श्रीरामानी सुमंत्रांना उत्तम उजव्या हाताने स्पर्श करून म्हटले- ’सुमंत्र ! आता आपण शीघ्रच पुन्हा महाराजांजवळ परत जावे आणि तेथे सावधान होऊन राहावे. ॥१३॥
|
निवर्तस्वेत्युवाचैनमेतावद्धि कृतं मम ।
रथं विहाय पद्भ्यां तु गमिष्यामो महावनम् ॥ १४ ॥
|
त्यांनी परत म्हटले- ’इतक्या दूर अंतरापर्यत महाराजांच्या आज्ञेने मी रथद्वारा यात्रा (प्रवास) केली आहे, आता आम्ही रथ सोडून पायीच महान वनाची यात्रा करू, म्हणून आपण परत जावे.’ ॥१४॥
|
आत्मानं त्वभ्यनुज्ञातमवेक्ष्यार्तः स सारथिः ।
सुमन्त्रः पुरुषव्याघ्रमैक्ष्वाकमिदमब्रवीत् ॥ १५ ॥
|
आपल्याला घरी परत जाण्याची आज्ञा झालेली पाहून सारथी सुमंत्र शोकाने व्याकुळ झाले आणि इक्ष्वाकुनंदन पुरूषसिंह श्रीरामांना या प्रकारे बोलले- ॥१५॥
|
नातिक्रान्तमिदं लोके पुरुषेणेह केनचित् ।
तव सभ्रातृभार्यस्य वासः प्राकृतवद् वने ॥ १६ ॥
|
’रघुनंदन ! ज्याच्या प्रेरणेने आपल्याला भाऊ आणि पत्नी यांच्यासह साधारण (प्राकृत) मनुष्याप्रमाणे वनात राहण्यास विवश व्हावे लागले आहे, त्या दैवाचे या संसारात कोणाही पुरुषाने उल्लंघन केलेले नाही. ॥१६॥
|
न मन्ये ब्रह्मचर्ये वा स्वधीते वा फलोदयः ।
मार्दवार्जवयोर्वापि त्वां चेद् व्यसनमागतम् ॥ १७ ॥
|
’जर आपल्या सारख्या महान पुरुषावर हे संकट आले आहे तर मी समजतो की ब्रह्मचर्य पालन, वेदांचा स्वाध्याय, दयालुता अथवा सरलता या कशालाही कुठल्या फलाची सिद्धि नाही. ॥१७॥
|
सह राघव वैदेह्या भ्रात्रा चैव वने वसन् ।
त्वं गतिं प्राप्स्यसे वीर त्रीँल्लोकांस्तु जयन्निव ॥ १८ ॥
|
’वीर राघव ! या प्रकारे पित्याच्या सत्याचे रक्षण करण्यासाठी वैदेही आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह वनात निवास करीत असता आपण तिन्ही लोकांवर विजय प्राप्त करणार्या महापुरुष नारायणा प्रमाणे उत्कर्ष (महान यश) प्राप्त कराल. ॥१८॥
|
वयं खलु हता राम ये त्वया ह्युपवञ्चिताः ।
कैकेय्या वशमेष्यामः पापाया दुःखभागिनः ॥ १९ ॥
|
’श्रीरामा ! आम्ही लोक निश्चितच प्रत्येक प्रकारे मारले गेलो आहोत, कारण आपण आम्हा पुरवासी लोकांना आपल्या बरोबर न नेल्याने आपल्या दर्शनजनित सुखापासून वञ्चित केले आहे. आता आम्ही पापीण कैकेयीच्या आधीन राहून दुःख भोगत राहू.’ ॥१९॥
|
इति ब्रुवन्नात्मसमं सुमन्त्रः सारथिस्तदा ।
दृष्ट्वा दूरगतं रामं दुःखार्तो रुरुदे चिरम् ॥ २० ॥
|
आत्म्याप्रमाणे प्रिय असलेल्या रामांना असे म्हणून त्यांना दूर जाण्यासाठी उद्यत (तयार) झालेले पाहून सारथी सुमंत्र दुःखाने व्याकुळ होऊन बराच वेळ रडत राहिले. ॥२०॥
|
ततस्तु विगते बाष्पे सूतं स्पृष्टोदकं शुचिम् ।
रामस्तु मधुरं वाक्यं पुनः पुनरुवाच तम् ॥ २१ ॥
|
अश्रूंचा प्रवाह थांबल्यावर आचमन करून पवित्र झालेल्या सारथ्याला श्रीराम वारंवार मधुर वाणीने म्हणाले- ॥२१॥
|
इक्ष्वाकूणां त्वया तुल्यं सुहृदं नोपलक्षये ।
यथा दशरथो राजा मां न शोचेत् तथा कुरु ॥ २२ ॥
|
’सुमंत्रा ! माझ्या दृष्टीने इक्ष्वाकुवंशियांचे हित करणारा सुहृद आपल्या सारखा दुसरा कोणीही नाही. आपण असा प्रयत्न करावा की ज्या योगे महाराज दशरथांना माझ्यासाठी शोक होणार नाही. ॥२२॥
|
शोकोपहतचेताश्च वृद्धश्च जगतीपतिः ।
कामभारावसन्नश्च तस्मादेतद् ब्रवीमि ते ॥ २३ ॥
|
’पृथ्वीपति महाराज दशरथ एक तर वृद्ध आहेत आणि दुसरे त्यांचे सारे मनोरथ चूर-चूर होऊन गेले आहेत, म्हणून त्यांचे हृदय शोकाने पीडित झाले आहे. याच कारणामुळे मी आपल्याला त्यांचा सांभाळ करण्यास (काळजी घेण्यास) सांगत आहे. ॥२३॥
|
यद् यथा ज्ञापयेत् किञ्चित् स महात्मा महीपतिः ।
कैकेय्याः प्रियकामार्थं कार्यं तदविकाङ्क्षया ॥ २४ ॥
|
’ते महामनस्वी महाराज कैकेयीचे प्रिय करण्याच्या इच्छेने आपल्याला जी काही, जशी काही आज्ञा देतील तिचे आपण आदरपूर्वक पालन करावे- हाच माझा अनुरोध आहे. ॥२४॥
|
एतदर्थं हि राज्यानि प्रशासति नराधिपाः ।
यदेषां सर्वकृत्येषु मनो न प्रतिहन्यते ॥ २५ ॥
|
’राजे लोक यासाठीच राज्याचे पालन (शासन) करतात की कुठल्याही कार्यात त्यांच्या मनांतील इच्छा-पूर्ती मध्ये विघ्न आणले जाऊ नये. ॥२५॥
|
यद् यथा स महाराजो नालीकमधिगच्छति ।
न च ताम्यति दुःखेन सुमंत्र कुरु तत् तथा ॥ २६ ॥
|
’सुमंत्र ! कुठल्याही कार्यात ज्या कुठल्याही प्रकारे महाराजांना अप्रिय गोष्टीमुळे खिन्न होण्याचा अवसर येणार नाही आणि ते शोकाने दुर्बल होणार नाहीत, ते आपण त्या प्रकारे केले पाहिजे. ॥२६॥
|
अदृष्टदुःखं राजानं वृद्धमार्यं जितेन्द्रियम् ।
ब्रूयास्त्वमभिवाद्यैव मम हेतोरिदं वचः ॥ २७ ॥
|
’ज्यांनी कधी दुःख पाहिलेले नाही त्या आर्य, जितेन्द्रिय आणि वृद्ध महाराजांना माझ्या वतीने प्रणाम करून ही गोष्ट सांगावी. ॥२७॥
|
न चाहमनुशोचामि लक्ष्मणो न च शोचति ।
अयोध्यायाश्च्युताश्चेति वने वत्स्यामहेति वा ॥ २८ ॥
|
’आम्हांला अयोध्येतून निघून जावे लागले अथवा आम्हांला वनात रहावे लागेल या गोष्टींमुळे मी कधीही शोक करीत नाही आहे आणि लक्ष्मणाला यामुळे शोक होत नाही आहे. ॥२८॥
|
चतुर्दशसु वर्षेषु निवृत्तेषु पुनः पुनः ।
लक्ष्मणं मां च सीतां च द्रक्ष्यसे शीघ्रमागतान् ॥ २९ ॥
|
’चौदा वर्षे समाप्त झाली की आम्ही पुन्हा लवकरच परत येऊ आणि त्यावेळी आपण मला, लक्ष्मणाला आणि सीतेलाही पुन्हा पहाल. ॥२९॥
|
एवमुक्त्वा तु राजानं मातरं च सुमन्त्र मे ।
अन्याश्च देवीः सहिताः कैकेयीं च पुनः पुनः ॥ ३० ॥
|
’सुमंत्रा ! महाराजांना असे सांगून आपण माझ्या मातेला आणि तिच्या बरोबर बसलेल्या अन्य देवींना (मातांना) तसेच कैकेयीलाही वारंवार माझा कुशल समाचार सांगावा. ॥३०॥
|
आरोग्यं ब्रूहि कौसल्यामथ पादाभिवन्दनम् ।
सीताया मम चार्यस्य वचनाल्लक्ष्मणस्य च ॥ ३१ ॥
|
’माता कौसल्येला सांगावे की तुमचा पुत्र स्वस्थ आणि प्रसन्न आहे. त्यानंतर सीतेच्या वतीने, माझ्या, ज्येष्ठ पुत्राच्या वतीने तथा लक्ष्मणाच्या वतीनेही मातेच्या चरणांना वंदन निवेदन करावे. ॥३१॥
|
ब्रूयाश्चापि महाराजं भरतं क्षिप्रमानय ।
आगतश्चापि भरतः स्थाप्यो नृपमते पदे ॥ ३२ ॥
|
त्यानंतर माझ्या वतीने महाराजांना हेही निवेदन करावे की आपण भरतांना शीघ्रच बोलावून घ्या आणि जेव्हा ते येतील तेव्हा आपल्या अभीष्ट युवराज पदावर त्यांचा अभिषेक करवावा. ॥३२॥
|
भरतं च परिष्वज्य यौवराज्येऽभिषिच्य च ।
अस्मत्संतापजं दुःखं न त्वामभिभविष्यति ॥ ३३ ॥
|
’भरताला हृदयाशी धरल्यानंतर आणि युवराज पदावर अभिषिक्त केल्यावर आपल्याला आमच्या वियोगाने होणारे दुःख इतके दडपण आणू शकणार नाही. ॥३३॥
|
भरतश्चापि वक्तव्यो यथा राजनि वर्तसे ।
तथा मातृषु वर्तेथाः सर्वास्वेवाविशेषतः ॥ ३४ ॥
|
’भरतालाही आमचा हा संदेश सांगावा की महाराजांच्या प्रति जसे तुमचे आचरण आहे तसेच समानरूपाने सर्व मातांच्या प्रति असावयास पाहिजे. ॥३४॥
|
यथा च तव कैकेयी सुमित्रा चाविशेषतः ।
तथैव देवी कौसल्या मम माता विशेषतः ॥ ३५ ॥
|
’तुझ्या दृष्टीत कैकेयीचे जे स्थान आहे तसेच समानरूपाने सुमित्रा आणि माझी माता कौसल्या हिचेही होणे उचित आहे, या सर्वांच्यात काही अंतर (भेद) करू नको. ॥३५॥
|
तातस्य प्रियकामेन यौवराज्यमवेक्षता ।
लोकयोरुभयोः शक्यं नित्यदा सुखमेधितुम् ॥ ३६ ॥
|
पित्याचे प्रिय करण्याच्या इच्छेने युवराजपदाचा स्वीकार करून जर तू राज्यकारभाराची देखरेख करीत राहाशील तर इहलोक आणि परलोकात सदाच सुख प्राप्त करशील.’ ॥३६॥
|
निवर्त्यमानो रामेण सुमन्त्रः प्रतिबोधितः ।
तत्सर्वं वचनं श्रुत्वा स्नेहात् काकुत्स्थमब्रवीत् ॥ ३७ ॥
|
श्रीरामांनी सुमंत्रांना परत पाठवतांना ज्यावेळी या प्रकारे समजाविले, त्यावेळी त्यांचे सगळे म्हणणे ऐकून ते काकुत्स्थास (रामास) स्नेहपूर्वक म्हणाले- ॥३७॥
|
यदहं नोपचारेण ब्रूयां स्नेहादविक्लवम् ।
भक्तिमानिति तत् तावद् वाक्यं त्वं क्षन्तुमर्हसि ॥ ३८ ॥
कथं हि त्वद्विहीनोऽहं प्रतियास्यामि तां पुरीम् ।
तव तात वियोगेन पुत्रशोकातुरामिव ॥ ३९ ॥
|
’तात ! सेवकाचे स्वामी प्रति जे सत्कारपूर्ण आचरण व्हावयास पाहिजे, त्याचे जर मी आपल्याशी बोलते समयी पालन करू शकलो नाही, आणि जर माझ्या मुखांतून स्नेहवश काही धृष्टतापूर्ण गोष्ट निघून गेली तर ’हा माझा भक्त आहे’ असे समजून आपण मला क्षमा करावी. जी आपल्या वियोगाने पुत्रशोकाने आतुर झालेल्या माते प्रमाणे संतप्त होत आहे त्या अयोध्यापुरीत मी आपल्याला बरोबर घेतल्या शिवाय कसा परत जाऊ शकेन ? ॥३८-३९॥
|
सराममपि तावन्मे रथं दृष्ट्वा तदा जनः ।
विना रामं रथं दृष्ट्वा विदीर्येतापि सा पुरी ॥ ४० ॥
|
’येते वेळी लोकांनी माझ्या रथात श्रीरामांना विराजमान झालेले पाहिले होते, आता या रथाला रामरहित पाहून त्या लोकांचे आणि त्या अयोध्यापुरीचेही हृदय विदीर्ण होऊन जाईल. ॥४०॥
|
दैन्यं हि नगरी गच्छेद् दृष्ट्वा शून्यमिमं रथम् ।
सूतावशेषं स्वं सैन्यं हतवीरमिवाहवे ॥ ४१ ॥
|
’ज्या प्रमाणे युद्धात आपला स्वामी वीर रथी मारला गेल्यावर ज्यात केवळ सारथी शेष राहिलेला असतो असा रथ पाहून त्याची स्वतःची सेना अत्यंत दयनीय अवस्थेत पडते, त्याचप्रमाणे माझा हा रथ आपल्या शिवाय रिक्त पाहून सारी अयोध्यानगरी दीन दशेला प्राप्त होईल. ॥४१॥
|
दूरेपि निवसन्तं त्वां मानसेनाग्रतः स्थितम् ।
चिन्तयन्त्योऽद्य नूनं त्वां निराहाराः कृताः प्रजाः ॥ ४२ ॥
|
’आपण दूर राहूनही प्रजेच्या हृदयात निवास करीत असल्याने सदा तिच्या समोरच उभे राहता. या समयी प्रजावर्गांतील सर्व लोकांनी निश्चितच आपले चिंतन करीत खाणे-पिणे सोडून दिले असेल. ॥४२॥
|
दृष्टं तद् वै त्वया राम यादृशं त्वत्प्रवासने ।
प्रजानां सङ्कुलं वृत्तं त्वच्छोकक्लान्तचेतसाम् ॥ ४३ ॥
|
’श्रीरामा ! ज्यावेळी आपण वनात येऊ लागलात त्यावेळी आपल्या शोकाने व्याकुळचित्त झालेल्या प्रजेने जसा आर्तनाद आणि क्षोभ प्रकट केला होता, तो तर आपण पाहिलाच आहे. ॥४३॥
|
आर्तनादो हि यः पौरैरुन्मुक्तस्त्वद्प्रवासने ।
सरथं मां निशाम्यैव कुर्युः शतगुणं ततः ॥ ४४ ॥
|
’आपण अयोध्येतून बाहेर पडते समयी पुरवासी लोकांनी जसा आर्तनाद केला होता, त्याच्या शतपट हाहाकार आपल्या शिवाय मला रिक्त रथ घेऊन परत आलेला पाहिल्यावर ते करतील. ॥४४॥
|
अहं किं चापि वक्ष्यामि देवीं तव सुतो मया ।
नीतोऽसौ मातुलकुलं संतापं मा कृथा इति ॥ ४५ ॥
असत्यमपि नैवाहं ब्रूयां वचनमीदृशम् ।
कथमप्रियमेवाहं ब्रूयां सत्यमिदं वचः ॥ ४६ ॥
|
’काय मी महाराणी कौसल्येला जाऊन असे सांगू की मी आपल्या पुत्राला मामाच्या घरी पोहोंचवून दिले आहे, म्हणून आपण संताप करू नये ? ही गोष्ट प्रिय असली तरी असत्य आहे म्हणून असे असत्य वचनही मी कधी बोलू शकत नाही. मग हे अप्रिय सत्य मी कसे ऐकवू शकेन कि मी आपल्या पुत्राला वनात पोहोंचवून आलो आहे. ॥४५-४६॥
|
मम तावन्नियोगस्थास्त्वद्बन्धुजनवाहिनः ।
कथं रथं त्वया हीनं प्रवाह्यन्ति हयोत्तमाः ॥ ४७ ॥
|
’हे उत्तम घोडे माझ्या आज्ञेच्या अधीन राहून आपल्या बंधुजनांचे भार वहातात (आपल्या बंधुजनांविरहित) रथास ते वाहू शकत नाहीत) अशा स्थितित आपल्या शिवाय शून्य रथास हे कसे ओढू शकतील ? ॥४७॥
|
तन्न शक्ष्याम्यहं गन्तुमयोध्यां त्वदृतेऽनघ ।
वनवासानुयानाय मामनुज्ञातुमर्हसि ॥ ४८ ॥
|
’म्हणून निष्पाप रघुनंदना ! आता मी आपल्या शिवाय अयोध्येला परतून जाऊ शकत नाही. मला ही वनात येण्याचीच आज्ञा द्यावी.’ ॥४८॥
|
यदि मे याचमानस्य त्यागमेव करिष्यसि ।
सरथोऽग्निं प्रवेक्ष्यामि त्यक्तमात्र इह त्वया ॥ ४९ ॥
|
’जर अशा प्रकारे याचना करूनही आपण माझा त्याग कराल तर मी आपल्या द्वारा परित्यक्त झाल्यावर रथासहित अग्निमध्ये प्रवेश करीन. ॥४९॥
|
भविष्यन्ति वने यानि तपोविघ्नकराणि ते ।
रथेन प्रतिबाधिष्ये तानि सर्वाणि राघव ॥ ५० ॥
|
’हे राघव ! वनात आपल्या तपस्येत विघ्न आणण्यासाठी जे जे जंतु उपस्थित होतील त्या सर्वांना मी या रथाच्या द्वारा दूर पळवून लावीन. ॥५०॥
|
त्वत्कृतेन मया प्राप्तं रथचर्याकृतं सुखम् ।
आशंसे त्वत्कृतेनाहं वनवासकृतं सुखम् ॥ ५१ ॥
|
’श्रीराम ! आपल्या कृपेने मला आपल्याला रथावर बसवून येथपर्यंत आणण्याचे सुख प्राप्त झाले आहे. आता आपल्याच अनुग्रहाने मी आपल्या बरोबर वनात राहाण्याचे सुखही मिळण्याची आशा करीत आहे. ॥५१॥
|
प्रसीदेच्छामि तेऽरण्ये भवितुं प्रत्यनन्तरः ।
प्रीत्याभिहितमिच्छामि भव मे प्रत्यनन्तरः ॥ ५२ ॥
|
’आपण प्रसन्न होऊन आज्ञा द्यावी. मी वनात आपल्या जवळच राहण्याची इच्छा करीत आहे. माझी इच्छा आहे की आपण प्रसन्नतापूर्वक सांगावे की तुम्हीही माझ्या बरोबर वनात रहा. ॥५२॥
|
इमेऽपि च हया वीर यदि ते वनवासिनः ।
परिचर्यां करिष्यन्ति प्राप्स्यन्ति परमां गतिम् ॥ ५३ ॥
|
’वीर ! हे घोडेही जर वनात राहात असता आपली सेवा करतील तर यांना परमगतीची प्राप्ति होईल.’ ॥५३॥
|
तव शुश्रूषणं मूर्ध्ना करिष्यामि वने वसन् ।
अयोध्यां देवलोकं वा सर्वथा प्रजहाम्यहम् ॥ ५४ ॥
|
’प्रभो ! मी वनात राहून आपल्या (माझ्या) मस्तकाने (सर्व शरीराने) आपली सेवा करीन. आणि या सुखापुढे अयोध्या तथा देवलोकाचाही सर्वथा त्याग करीन. ॥५४॥
|
न हि शक्या प्रवेष्टुं सा मयायोध्या त्वया विना ।
राजधानी महेन्द्रस्य यथा दुष्कृतकर्मणा ॥ ५५ ॥
|
’ज्याप्रमाणे सदाचारहीन प्राणी इंद्राच्या राजधानीत- स्वर्गात प्रवेश करू शकत नाही त्याच प्रकारे आपल्या शिवाय मी अयोध्यापुरीत जाऊ शकत नाही. ॥५५॥
|
वनवासे क्षयं प्राप्ते ममैष हि मनोरथः ।
यदनेन रथेनैव त्वां वहेयं पुरीं पुनः ॥ ५६ ॥
|
’माझी ही अभिलाषा आहे की ज्यावेळी वनवासाचा अवधी समाप्त होईल तेव्हा परत या रथावर आपल्याला बसवून मी अयोध्यापुरीमध्ये घेऊन जावे. ॥५६॥
|
चतुर्दश हि वर्षाणि सहितस्य त्वया वने ।
क्षणभूतानि यास्यन्ति शतसङ्ख्यानि चान्यथा ॥ ५७ ॥
|
’वनात आपल्या बरोबर राहिल्याने ही चौदा वर्षे माझासाठी चौदा क्षणांप्रमाणे निघून जातील, अन्यथा चौदाशे वर्षांप्रमाणे भारी वाटतील. ॥५७॥
|
भृत्यवत्सल तिष्ठन्तं भर्तृपुत्रगते पथि ।
भक्तं भृत्यं स्थितं स्थित्या न मां त्वं हातुमर्हसि ॥ ५८ ॥
|
’म्हणून भक्तवत्सला ! आपण माझ्या स्वामींचे पुत्र आहात. आपण ज्या पथावर जात आहात त्यावरच आपल्या सेवेसाठी बरोबर येण्यासाठी मीही तयार होऊन उभा आहे. मी आपल्या प्रति भक्ति बाळगून आहे. आपला भृत्य आहे, आणि भृत्यजनोचित मर्यादांमध्ये स्थित आहे म्हणून आपण माझा परित्याग करू नये.’ ॥५८॥
|
एवं बहुविधं दीनं याचमानं पुनः पुनः ।
रामो भृत्यानुकम्पी तु सुमन्त्रमिदमब्रवीत् ॥ ५९ ॥
|
या प्रकारे नाना प्रकारांनी दीन वचने बोलून वारंवार याचना करणार्या सुमंत्रास सेवकांवर कृपा करणारे राम या प्रकारे म्हणाले - ॥५९॥
|
जानामि परमां भक्तिमहं ते भर्तृवत्सल ।
शृणु चापि यदर्थं त्वां प्रेषयामि पुरीमितः ॥ ६० ॥
|
’सुमंत्रा ! आपण स्वामींच्या प्रति स्नेह ठेवणारे आहात. माझ्या ठिकाणी जी आपली उत्कृष्ट भक्ति आहे ती मी जाणतो. पण तरीही ज्या कार्यासाठी मी आपल्याला येथून अयोध्यापुरीत धाडत आहे ते आपण ऐकावे. ॥६०॥
|
नगरीं त्वां गतं दृष्ट्वा जननी मे यवीयसी
कैकेयी प्रत्ययं गच्छेदिति रामो वनं गतः ॥ ६१ ॥
|
’जेव्हा आपण नगरास परत जाल तेव्हा आपल्याला पाहून माझी धाकटी माता कैकेयी हिला विश्वास वाटेल की राम वनात निघून गेला आहे. ॥६१॥
|
विपरीते तुष्टिहीना वनवासं गते मयि ।
राजानं नातिशङ्केत मिथ्यावादीति धार्मिकम् ॥ ६२ ॥
|
’याच्या विपरीत जर आपण गेला नाहीत तर तिला संतोष होणार नाही, आणि मी वनवासी होऊनही तिने धर्मपरायण महाराज दशरथांच्या प्रति मिथ्यावादी असल्याचा संदेह करावा असे मी इच्छित नाही. ॥६२॥
|
एष मे प्रथमः कल्पो यदम्बा मे यवीयसी ।
भरतारक्षितं स्फीतं पुत्रराज्यमवाप्स्यते ॥ ६३ ॥
|
’आपल्याला धाडण्यात माझा मुख्य उद्देश्य हाच आहे की माझी धाकटी माता कैकेयी भरत द्वारा सुरक्षित समृद्धशाली राज्याला हस्तगत करणारी व्हावी. ॥६३॥
|
मम प्रियार्थं राज्ञश्च सुमम्त्र त्वं पुरीं व्रज ।
संदिष्टश्चापि यानर्थांस्तांस्तान् ब्रूयास्तथा तथा ॥ ६४ ॥
|
’सुमंत्रा ! माझे तसेच महाराजांचे प्रिय करण्यासाठी जो संदेश दिला गेला आहे ते सर्व तेथे जाऊन त्या लोकांना सांगावे.’ ॥६४॥
|
इत्युक्त्वा वचनं सूतं सान्त्वयित्वा पुनः पुनः ।
गुहं वचनमक्लीबो रामो हेतुमदब्रवीत् ॥ ६५ ॥
|
असे म्हणून श्रीरामांनी सुमंत्रास वारंवार सांत्वना दिली. यानंतर त्यांनी गुहाला उत्साहपूर्वक ही युक्तियुक्त गोष्ट सांगितली- ॥६५॥
|
नेदानीं गुह योग्योऽयं वासो मे सजने वने ।
अवश्यमाश्रमे वासः कर्त्तव्यस्तद्गतो विधिः ॥ ६६ ॥
|
’निषादराज गुह ! या समयी माझ्यासाठी अशा वनात राहणे योग्य नाही की जेथे जनपदातील लोकांचे येणे-जाणे अधिक होत असेल, आता अवश्य मला निर्जन वनातील आश्रमातच वास करावयास हवा. यासाठी जटा धारण आदि आवश्यक विधिचे पालन मला केले पाहिजे. ॥६६॥
|
सोऽहं गृहीत्वा नियमं तपस्विजनभूषणम् ।
हितकामः पितुर्भूयः सीताया लक्ष्मणस्य च ॥ ६७ ॥
जटाः कृत्वा गमिष्यामि न्यग्रोधक्षीरमानय ।
तत्क्षीरं राजपुत्राय गुहः क्षिप्रमुपाहरत् ॥ ६८ ॥
|
’म्हणून फल-मूलाचा आहार आणि पृथ्वीवर शयन आदि नियमांचे ग्रहण करून मी सीता आणि लक्ष्मणाची अनुमति घेऊन पित्याचे हित करण्याचा इच्छेने मस्तकावर तपस्वी जनांना आभूषणरूप जटा धारण करून येथून वनात जाईन. माझ्या केसांना जटांचे रूप देण्यासाठी तू वडाचे दूध(चीक) आणून दे. गुहाने तात्काळच वडाचा चीक (दूध) आणून राजकुमार रामांना दिले. ॥६७-६८॥
|
लक्ष्मणस्यात्मनश्चैव रामस्तेनाकरोज्जटाः ।
दीर्घबाहुर्नरव्याघ्रो जटिलत्वमधारयत् ॥ ६९ ॥
|
श्रीरामांना त्या द्वारे लक्ष्मणाच्या आणि आपल्या जटा बनविल्या. महाबाहु पुरुषसिंह श्रीराम तात्काळ जटाधारी झाले. ॥६९॥
|
तौ तदा चीरसम्पनौ जटामण्डलधारिणौ ।
अशोभेतामृषिसमौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ ७० ॥
|
त्या समयी ते दोन्ही भाऊ रामलक्ष्मण वल्कल वस्त्र आणि जटामण्डल धारण करून ऋषींच्या प्रमाणे शोभू लागले. ॥७०॥
|
ततो वैखानसं मार्गमास्थितः सहलक्ष्मणः ।
व्रतमादिष्टवान् रामः सहायं गुहमब्रवीत् ॥ ७१ ॥
|
त्यानंतर वानप्रस्थमार्गाचा आश्रय घेऊन लक्ष्मणासहित श्रीरामांनी वानप्रस्थोचित व्रत ग्रहण केले. तत्पश्चात ते आपल्या सहाय्यक गुहास म्हणाले- ॥७१॥
|
अप्रमत्तो बले कोशे दुर्गे जनपदे तथा ।
भवेथा गुह राज्यं हि दुरारक्षतमं मतम् ॥ ७२ ॥
|
’निषादराज ! तुम्ही सेना, खजिना, किल्ला आणि राज्य याविषयी सदा सावधान रहावे, कारण की राज्याच्या रक्षणाचे काम फार कठीण मानले गेले आहे. ॥७२॥
|
ततस्तं समनुज्ञाप्य गुहमिक्ष्वाकुनन्दनः ।
जगाम तूर्णमव्यग्रः सभार्यः सहलक्ष्मणः ॥ ७३ ॥
|
गुहाला या प्रकारे आज्ञा देऊन त्याचा निरोप घेऊन इक्ष्वाकु कुलनंदन श्रीराम पत्नी आणि लक्ष्मणासह तात्काळ तेथून निघाले. त्यासमयी त्यांच्या चित्तात थोडीसुद्धा व्यग्रता नव्हती. ॥७३॥
|
स तु दृष्ट्वा नदीतीरे नावमिक्ष्वाकुनन्दनः ।
तितीर्षुः शीघ्रगां गङ्गामिदं वचनमब्रवीत् ॥ ७४ ॥
|
नदीच्या तटावर लागलेली नाव पाहून इक्ष्वाकुनंदन श्रीरामांनी शीघ्रगामी गंगानदीच्या पार जाण्याच्या इच्छेने लक्ष्मणास संबोधित करून म्हटले- ॥७४॥
|
आरोह त्वं नरव्याघ्र स्थितां नावमिमां शनैः ।
सीतां चारोपयान्वक्षं परिगृह्य मनस्विनीम् ॥ ७५ ॥
|
’पुरुषसिंह ! ही समोर नाव उभी आहे. तुम्ही मनस्विनी सीतेला धरून हळूच तिच्यावर बसवा, आणि नंतर स्वतः नावेवर बसून जा.’ ॥७५॥
|
स भ्रातुः शासनं श्रुत्वा सर्वमप्रतिकूलयन् ।
आरोप्य मैथिलीं पूर्वमारुरोहात्मवांस्ततः ॥ ७६ ॥
|
भावाचा हा आदेश ऐकून मनाला ताब्यात ठेवणार्या लक्ष्मणाने पूर्णतः त्यास अनुसरून वागून प्रथम मैथिलाला (सीतेला) नावेवर बसविले आणि नंतर स्वतःही तिच्यावर आरूढ झाले. ॥७६॥
|
अथारुरोह तेजस्वी स्वयं लक्ष्मणपूर्वजः ।
ततो निषादाधिपतिर्गुहो ज्ञातीनचोदयत् ॥ ७७ ॥
|
सर्वांच्या शेवटी लक्ष्मणांचे मोठे भाऊ तेजस्वी श्रीराम स्वयं नौकेवर बसले. त्यानंतर निषादराज गुहाने आपल्या बंधु-बांधवांना नौका वल्हविण्याचा आदेश दिला. ॥७७॥
|
राघवोऽपि महातेजा नावमारुह्य तां ततः ।
ब्रह्मवत्क्षत्रवच्चैव जजाप हितमात्मनः ॥ ७८ ॥
|
महातेजस्वी राघवही त्या नौकेवर आरूढ झाल्यानंतर आपल्या हिताच्या उद्देशाने ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी जपण्यायोग्य ’दैवी नाव" इत्यादि वैदिक मंत्रांचा जप करू लागले. ॥७८॥
|
आचम्य च यथाशास्त्रं नदीं तां सह सीतया ।
प्रणमत्प्रीतिसंतुष्टो लक्ष्मणश्च महारथः ॥ ७९ ॥
|
नंतर शास्त्रविधिच्या अनुसार आचमन करून सीतेसहित त्यांनी प्रसन्नचित्त होऊन गंगेला प्रणाम केला. महारथी लक्ष्मणांनीही गंगेला मस्तक नमविले. ॥७९॥
|
अनुज्ञाय सुमन्त्रं च सबलं चैव तं गुहम् ।
आस्थाय नावं रामस्तु चोदयामास नाविकान् ॥ ८० ॥
|
यानंतर श्रीरामांनी सुमंत्राला तसेच सेनेसहित गुहाला परत जाण्याची आज्ञा दिली आणि नौकेवर उत्तम प्रकारे बसून नाविकांना नाव चालविण्याचा आदेश दिला. ॥८०॥
|
ततस्तैश्चालिता नौका कर्णधारसमाहिता ।
शुभस्फ्यवेगाभिहता शीघ्रं सलिलमत्यगात् ॥ ८१ ॥
|
त्यानंतर नाविकांनी नाव चालविली. कर्णधार सावधान होऊन तिचे संचलन करीत होता. वेगाने उत्तम वल्ही मारल्याने ती नाव अत्यंत वेगाने पाण्यावर पुढे चालू लागली. ॥८१॥
|
मध्यं तु समनुप्राप्य भागीरथ्यास्त्वनिन्दिता ।
वैदेही प्राञ्जलिर्भूत्वा तां नदीमिदमब्रवीत् ॥ ८२ ॥
|
भागीरथीच्या मध्यधारेत पोहोंचल्यावर सती-साध्वी वैदेही सीतेने हात जोडून गंगेची या प्रमाणे प्रार्थना केली - ॥८२॥
|
पुत्रो दशरथस्यायं महाराजस्य धीमतः ।
निदेशं पालयत्वेनं गङ्गे त्वदभिरक्षितः ॥ ८३ ॥
|
’देवी गंगे ! हे परम बुद्धिमान महाराज दशरथांचे पुत्र आहेत आणि पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी वनात जात आहेत. हे आपल्याकडून सुरक्षित होऊन पित्याच्या या आज्ञेने पालन करू शकतील - अशी कृपा आपण करावी. ॥८३॥
|
चतुर्दश हि वर्षाणि समग्राण्युष्य कानने ।
भ्रात्रा सह मया चैव पुनः प्रत्यागमिष्यति ॥ ८४ ॥
|
’वनात पूर्ण चौदा वर्षे निवास करून हे माझ्यासह आणि आपल्या भावासह पुन्हा अयोध्यापुरीला परत येतील. ॥८४॥
|
ततस्त्वां देवि सुभगे क्षेमेण पुनरागता ।
यक्ष्ये प्रमुदिता गङ्गे सर्वकामसमृद्धिनी ॥ ८५ ॥
|
’सौभाग्यशालिनी देवी गंगे ! त्यावेळी वनांतून पुन्हा कुशलतापूर्वक परत आल्यावर संपूर्ण मनोरथांनी संपन्न झालेली मी अत्यंत प्रसन्नेतेने आपली पूजा करीन. ॥८५॥
|
त्वं हि त्रिपथगे देवि ब्रह्मलोकं समक्षसे ।
भार्या चोदधिराजस्य लोकेऽस्मिन् सम्प्रदृश्यसे ॥ ८६ ॥
|
’स्वर्ग, भूतल आणि पाताल - तीन्ही मार्गावर विचरण करणार्या देवी ! तू येथून ब्रह्मलोकापर्यंत पसरलेली आहेस आणि या लोकात समुद्रराजाच्या पत्नीच्या रूपाने दिसून येत आहेस. ॥८६॥
|
सा त्वां देवि नमस्यामि प्रशंसामि च शोभने ।
प्राप्तराज्ये नरव्याघ्रे शिवेन पुनरागते ॥ ८७ ॥
|
’शोभाशालिनी देवी ! पुरूषसिंह श्रीराम जेव्हा वनांतून पुन्हा सकुशल परत येऊन आपले राज्य प्राप्त करतील, तेव्हा मी सीता, पुन्हा आपल्यापुढे मस्तक नमवीन आणि आपली स्तुती करीन. ॥८७॥
|
गवां शतशहस्रं च वस्त्राण्यन्नं च पेशलम् ।
ब्राह्मणेभ्यः प्रदास्यामि तव प्रियचिकीर्षया ॥ ८८ ॥
|
’एवढेच नव्हे तर आपले प्रिय करण्याच्या इच्छेने ब्राह्मणांना एक लाख गाई, बरीचशी वस्त्रे तथा उत्तमोत्तम अन्न प्रदान करीन. ॥८८॥
|
सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च ।
यक्ष्ये त्वां प्रियतां देवि पुरीं पुनरुपागता ॥ ८९ ॥
|
’देवी ! पुन्हा अयोध्यापुरीत परत आल्यावर मी हजारो देवदुर्लभ पदार्थांनी तसेच राजकीय भागरहित पृथ्वी, वस्त्र आणि अन्नाच्या द्वारा आपली पूजा करीन. आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे.** ॥८९॥
|
यानि त्वत्तीरवासीनि दैवतानि च सन्ति हि ।
तानि सर्वाणि यक्ष्यामि तीर्थान्यायतनानि च ॥ ९० ॥
|
’आपल्या किनार्यावर ज्या ज्या देवता, तीर्थ आणि मंदिरे आहेत त्या सर्वांचे मी पूजन करीन. ॥९०॥
|
पुनरेव महाबाहुर्मया भ्रात्रा च सङ्गतः ।
अयोध्यां वनवासात् तु प्रविशत्वनघोऽनघे ॥ ९१ ॥
|
’निष्पाप गंगे ! हे महाबाहु, अनघ असे माझे पतिदेव मी आणि त्यांच्या भावासह वनवासांतून परत येऊन पुन्हा अयोध्येत प्रवेश करोत.’ ॥९१॥
|
तथा सम्भाषमाणा सा सीता गङ्गामनिन्दिता ।
दक्षिणा दक्षिणं तीरं क्षिप्रमेवाभ्युपागमत् ॥ ९२ ॥
|
पतिला अनुकूल राहणार्या सती-साध्वी सीतेने या प्रकारे गंगेची प्रार्थना केली आणि ती नाव शीघ्रच गंगेच्या दक्षिण तटावर जाऊन पोहोंचली. ॥९२॥
|
तीरं तु समनुप्राप्य नावं हित्वा नरर्षभः ।
प्रातिष्ठत सह भ्रात्रा वैदेह्या च परंतपः ॥ ९३ ॥
|
किनार्यावर पोहोंचून परंतप नरश्रेष्ठ श्रीरामांनी नाव सोडून दिली आणि भाऊ लक्ष्मण आणि वैदेही यांच्यासह पुढे प्रस्थान केले. ॥९३॥
|
अथाब्रवीन्महाबाहुः सुमित्रानन्दवर्धनम् ।
भव संरक्षणार्थाय सजने विजनेऽपि वा ॥९४॥
अवश्यं रक्षणं कार्यं मद्विधैर्विजने वने ।
अग्रतो गच्छ सौमित्रे सीता त्वामनुगच्छतु ॥ ९५ ॥
पृष्ठतोऽनुगमिष्यामि सीतां त्वां चानुपालयन् ।
अन्योन्यस्य हि नो रक्षा कर्तव्या पुरुषर्षभ ॥ ९६ ॥
|
त्यानंतर महाबाहु श्रीराम सुमित्रानंदन लक्ष्मणास म्हणाले- सौमित्र ! आता तुम्ही सजन आणि निर्जन वनात सीतेच्या रक्षणासाठी सावधान रहा. आपला सारख्या लोकांनी निर्जन वनात स्त्रीचे रक्षण अवश्य केले पाहिजे. म्हणून तू पुढे पुढे चाल. सीता तुझ्या मागोमाग चालेल आणि मी सीतेचे आणि तुझे रक्षण करीत सर्वांच्या मागे चालेन. पुरुषश्रेष्ठ ! आपण एक दुसर्यांचे रक्षण केले पाहिजे. ॥९४-९६॥
|
न हि तावदतिक्रान्तासुकरा काचन क्रिया ।
अद्य दुःखं तु वैदेही वनवासस्य वेत्स्यति ॥ ९७ ॥
|
’आत्तापर्यत कुठलेही दुष्कर कार्य समाप्त झालेले नाही- या वेळेपासूनच संकटाचा सामना करण्यास आरंभ झाला आहे. आज वैदेही सीतेला वनवासाच्या वास्तविक कष्टांचा अनुभव येईल. ॥९७॥
|
प्रणष्टजनसम्बाधं क्षेत्रारामविवर्जितम् ।
विषमं च प्रपातं च वनमद्य प्रवेक्ष्यति ॥ ९८ ॥
|
’आता ही अशा वनात प्रवेश करील की जेथे मनुष्यांच्या येण्या-जाण्याचे काहीही चिन्ह दिसून येणार नाही, किंवा धान्य आदिची शेते अथवा फिरण्यासाठी बगीचेही असणार नाहीत. जेथे उंच-सखल भूमी असेल आणि ज्यात पडण्याचे भय असते असे खड्डेही दिसतील.’ ॥९८॥
|
श्रुत्वा रामस्य वचनं प्रतस्थे लक्ष्मणोऽग्रतः ।
अनन्तरं च सीताया राघवो रघुनन्दनः ॥ ९९ ॥
|
श्रीरामांचे हे वचन ऐकून लक्ष्मण पुढे झाले, त्यांच्या मागे सीता चालू लागली आणि सीतेच्या पाठीमागे रघुनंदन राघव (राम) होते. ॥९९॥
|
गतं तु गङ्गापरपारमाशु
रामं सुमन्त्रः सततं निरीक्ष्य ।
अध्वप्रकर्षाद् विनिवृत्तदृष्टि-
र्मुमोच बाष्पं व्यथितस्तपस्वी ॥ १०० ॥
|
श्रीराम शीघ्र गंगेच्या दुसर्या तीरावर पोहोचून जो पर्यत दिसून येत होते तो पर्यंत सुमंत्र निरंतर त्यांचेकडे दृष्टि लावून पहात राहिले होते. जेव्हा ते वनातील मार्गाने खूप दूर निघून गेल्याने दृष्टिआड झाले, तेव्हा तपस्वी सुमंत्रांच्या हृदयात अत्यंत व्यथा झाली. ते नेत्रांतून अश्रु ढाळू लागले. ॥१००॥
|
स लोकपालप्रतिमप्रभाव-
स्तीर्त्वा महात्मा वरदो महानदीम् ।
ततः समृद्धाञ्छुभसस्यमालिनः
क्रमेण वत्सान् मुदितानुपागमत् ॥ १०१ ॥
|
लोकपालांच्या प्रमाणे प्रभावशाली वरदायक महात्मा श्रीराम महानदी गंगेला पार करून क्रमशः समृद्धशाली वत्सदेशा(प्रयागा)त जाऊन पोहोंचले, जो सुंदर धन-धान्याने संपन्न होता. तेथील लोक चांगले हृष्ट- पुष्ट होते. ॥१०१॥
|
तौ तत्र हत्वा चतुरो महामृगान्
वराहमृश्यं पृषतं महारुरुम् ।
आदाय मेध्यं त्वरितं बुभुक्षितौ
वासाय काले ययतुर्वनस्पतिम् ॥ १०२ ॥
|
तेथे दोन्ही भावांनी मृगया- विनोदासाठी वराह, ऋष्य, पृषत आणि महारूरू- या चार महामृगांवर बाणांनी प्रहार केले. तत्पश्चात जेव्हा त्यांना भूक लागली तेव्हा पवित्र कंद-मूल आदि घेऊन सायंकाळच्या वेळी राहण्यासाठी (ते सीतेसह) एक वृक्षाच्या खाली गेले. ॥१०२॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे द्विपञ्चाशः सर्गः ॥ ५२ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा बावन्नावा सर्ग पूरा झाला.॥५२॥
|