॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ उत्तरकाण्ड ॥ ॥ पञ्चमः सर्गः ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीरामगीता श्रीमहादेव उवाच ततो जगन्मङ्गलमङ्गलात्मना विधाय रामायणकीर्तिमुत्तमाम् । चचार पूर्वाचरितं रघुत्तमो राजर्षिवर्यैः अभिसेवितं यथा ॥ १ ॥ श्रीमहादे व म्हणाले-हे पार्वती, सीतेच्या त्यागानंतर जगाच्या कल्याणासाठी धारण केलेल्या आपल्या मंगल देहाने रामायणरूपी उत्तम कीर्ती स्थापन करून, पूर्वीच्या श्रेष्ठ राजर्षींच्याप्रमाणे श्रीराम स्वतःचे आचरण करू लागले. (१) सौमित्रिणा पृष्ट उदारबुद्धिना रामः कथाः प्राह पुरातनीः शुभाः । राज्ञः प्रमत्तस्य नृगस्य शापतो द्विजस्य तिर्यक्त्वमथाह राघवः ॥ २ ॥ उदारबुद्धी लक्ष्मणाने कधी विचारले तर राम त्याला प्राचीन पुण्यकथा सांगत असत. अपराध करणाऱ्या नृग राजाला एका ब्राह्मणाच्या शापाने तिर्यक् योनी प्राप्त झाली, ही कथा एकदा रामांनी सांगितली. (२) कदाचिदेकान्त उपस्थितं प्रभुं रामं रमालालित पादपङ्कजम् । सौमित्रिरासादितशुद्धभावनः प्रणम्य भक्त्या विनयान्वितोऽब्रवीत् ॥ ३ ॥ ज्यांच्या चरण कमळांची सेवा लक्ष्मी करीत असे ते प्रभू राम एकदा एकांत स्थानी बसले होते. त्यावेळी शुद्ध मनाचा लक्ष्मण त्यांच्याजवळ आला, आणि प्रणाम करून, नम्रपणे भक्तिपूर्वक म्हणाला. (३) त्वं शुद्धबोधोऽसि हि सर्वदेहिनां- आत्मास्यधीशोऽसि निराकृतिः स्वयम् । प्रतीयसे ज्ञानदृशां महामते पादाब्जभृङ्गाहित सङ्गसङ्गिनाम् ॥ ४ ॥ "हे महाबुद्धिमंता, तुम्ही ज्ञानस्वरूप आहात. सर्व देहधारी प्राण्यांचे आत्मा तुम्ही आहात. तुम्ही स्वतः निराकार असूनही सर्वांचे नियंते आहात. तुमच्या चरणकमळांच्या ठिकाणी असणाऱ्या व ज्ञानदृष्टी प्राप्त झालेल्या लोकांनाच तुम्ही प्रतीत होता. (४) अहं प्रपन्नोऽस्मि पदाम्बुजं प्रभो भवापवर्गं तव योगिभावितम् । यथाञ्जसाज्ञानमपारवारिधिं सुखं तरिष्यामि तथानुशाधि माम् ॥ ५ ॥ हे प्रभो, तुमचे जे चरण संसाराची निवृत्ती करतात आणि योगी लोक ज्यांचे ध्यान करतात त्या तुमच्या चरणी मी शरण आलो आहे. मी अज्ञानरूपी अपार सागर सुखाने व सहजपणे तरून जाईन, असा उपदेश तुम्ही मला करा. (५) श्रुत्वाथ सौमित्रिवचोऽखिलं तदा प्राह प्रान्नार्तिहरः प्रसन्नधीः । विज्ञानमज्ञानतमःप्रशान्तये श्रुतिप्रपन्नं क्षितिपालभूषणः ॥ ६ ॥ लक्ष्मणाचे म्हणणे ऐकल्यावर, शरणागतांचे दुःख दूर करणारे प्रभू राम हे मनामध्ये प्रसन्न झाले. मग अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी, शृतीने सांगितले आत्मज्ञान त्या राजशिरोमणी श्रीरामांनी लक्ष्मणास सांगण्यास सुरुवात केली. (६) आदौ स्ववर्णाश्रमवर्णिताः क्रियाः कृत्वा समासादितशुद्धमानसः । समाप्य तत्पूर्वमुपात्तसाधनः समाश्रयेत् सद्गुरुमात्मलब्धये ॥ ७ ॥ प्रभू राम म्हणाले की, "सर्वात प्रथम आपापला वर्ण आणि आश्रम यासाठी शास्त्राने वर्णन केलेली कर्मे यथायोग्यपणे केल्यावर चित्ताची शुद्धी होते. चित्त शुद्ध झाल्यावर ती कर्मे सोडून द्यावीत, तत्पूर्वी शम, दम इत्यादी साधनांनी संपन्न होऊन, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी माणसाने सद्गुरूंचा आश्रय घ्यावा. (७) क्रिया शरीरोद्भवहेतुरादृता प्रियाप्रियौ तौ भवतः सुरागिणः । धर्मेतरौ तत्र पुनः शरीरकं पुनः क्रिया चक्रवदीर्यते भवः ॥ ८ ॥ कर्म हेच पुनर्जन्माच्या प्राप्तीचे कारण आहे, असेच महात्म्यांचे मत आहे. कारण कर्मांबद्दल फार आसक्ती बाळगणाऱ्या माणसाच्या बाबतीत इष्ट आणि अनिष्ट अशा क्रिया घडत असतात. त्या कर्मांमुळे धर्म व अधर्म घडतात, त्यामुळे पुनः शरीर प्राप्त होते; मग पुनः कर्म घडतात, आणि अशा प्रकारे कर्मापासून जन्म आणि जन्मामध्ये पुनः कर्म असा चक्राप्रमाणे हा संसार फिरत राहातो. (८) अज्ञानमेवास्य हि मूलकारणं तद्धानमेवात्र विधौ विधीयते । विद्यैव तन्नाशविधौ पटीयसी । न कर्म तज्जं सविरोधमीरितम् ॥ ९ ॥ अज्ञान हेच या संसाराचे मूळ कारण आहे. आणि त्या अज्ञानाचा नाश हाच संसारातून सुटण्याचा उपाय म्हणून शास्त्रात सांगितला आहे. अज्ञानाचा नाश करण्यास ज्ञान हेच समर्थ साधन आहे. त्या अज्ञानातून उत्पन्न होणारे कर्म अज्ञानाचा नाश करण्यास समर्थ नसते. (९) नाज्ञानहानिर्न च रागसंक्षयो भवेत्ततः कर्म सदोषमुद्भवेत् । ततः पुनः संसृतिरप्यवारिता तस्माद्बुधो ज्ञानविचारवान्भवेत् ॥ १० ॥ सकाम कर्मामुळे अज्ञानाचा नाश होत नाही, तसेच आसक्तीचा नाश होत नाही. उलट त्या कर्मांपासून नवीन दोषयुक्त कर्म उत्पन्न होते आणि मग त्या नवीन कर्मांपासून संसाराची प्राप्ती होणे हे अनिवार्य ठरते. म्हणून शहाण्या माणसाने ज्ञान प्राप्त करून घेण्याचा विचार करावयास हवा. (१०) ननु क्रिया वेदमुखेन चोदिता तथैव विद्या पुरुषार्थसाधनम् । कर्तव्यता प्राणभृतः प्रचोदिता विद्यासहायत्वमुपैति सा पुनः ॥ ११ ॥ काही लोक असेही म्हणतात की ज्या प्रमाणे वेदाने ज्ञान हे पुरुषार्थाचे साधन म्हणून सांगितले आहे, त्या प्रमाणेच माणसाला कर्म हे आवश्यक कर्तव्य आहे, असेही सांगितले आहे. म्हणून ते ज्ञानाला सहाय्यभूत ठरते. (११) कर्माकृतौ दोषमपि श्रुतिर्जगौ तस्मात्सदा कार्यमिदं मुमुक्षुणा । ननु स्वतन्त्रा ध्रुवकार्यकारिणी विद्या न किञ्चिन्मनसाप्यपेक्षते ॥ १२ ॥ न सत्यकार्योऽपि हि यद्वदध्वरः प्रकाङ्क्षतेऽन्यानपि कारकादिकान् तथैव विद्या विधितः प्रकशितै- र्विशिष्यते कर्मभिरेव मुक्तये ॥ १३ ॥ तसेच कर्म न केल्यास दोष उत्पन्न होतो, असे सुद्धा श्रुतीने सांगितले आहे. म्हणून मुमुक्षूने सदा कर्म करीत राहावयास हवे. आता जर कुणी असे म्हणेल की ज्ञान कर्मनिरपेक्ष आहे आणि निश्चितपणे आहे आणि म्हणून मनानेसुद्धा मुमुक्षूला कर्माची अपेक्षा असत नाही. परंतु असे म्हणणे योग्य नाही. कारण वेदोक्त यज्ञ हा स्थिर कर्म असला तरीसुद्धा ज्या प्रमाणे त्याला अन्य कारक इत्यादींची अपेक्षा असते, त्या प्रमाणे वेदाने सांगितलेल्या कर्मांनी युक्त ज्ञानच मोक्षाला कारणीभूत होते. (म्हणून कर्मांचा त्याग करणे, हे मुळीच योग्य नव्हे.) (१२-१३) केचिद्वदन्तीति वितर्कवादिनः- तदप्य सद्दृष्टविरोधकारणात् देहाभिमानादभिवर्धते क्रिया विद्या गताहङ्कृतितः प्रसिद्धयति ॥ १४ ॥ तेव्हा ज्ञानासाठी कर्म आवश्यक आहे, असा चुकीचा अर्थ करणारे काही लोक जे म्हणतात, तेसुद्धा खोटे आहे. कारण तेथे प्रत्यक्ष विरोध येतो. म्हणजेच देहाचा अभिमान असेल तर कर्म घडते आणि अहंकाराचा नाश झाला तरच ज्ञान प्राप्त होते. (१४) विशुद्धविज्ञानविरोचनाञ्चिता विद्यात्मवृत्तिश्चरमेति भण्यते । उदेति कर्माखिलकारकादिभिः निहन्ति विद्याखिलकारकादिकम् ॥ १५ ॥ (वेदांत वाक्यांच्या विचारामुळे) विशुद्ध विज्ञानाच्या प्रकाशाने युक्त अशी जी मनाची अंतिम वृत्ती, तीच विद्या. तिलाच आत्मज्ञान असे म्हटले जाते. उलट सर्व कारक इत्यादींच्या द्वारा कर्म होत असते. तर विद्या सर्व कारक इत्यादी अनित्य आहे, असे सांगून त्यांचा नाश करून टाकते. (१५) तस्मात्त्यजेत्कार्यमशेषतः सुधीः- विद्याविरोधान्न समुच्चयो भवेत् । आत्मानुसन्धानपरायणः सदा निवृत्तसर्वेन्द्रियवृत्तिगोचरः ॥ १६ ॥ म्हणून सर्व इंद्रियांच्या वृत्तींचे जे विषय त्या विषयांपासून निवृत्त होऊन आत्म्याच्या निरंतर अनुसंधानास लागलेल्या बुद्धिमान पुरुषाने सर्व कर्मे संपूर्णपणे टाकून द्यावीत. कारण कर्म हे विद्येला विरोधी असल्याने विद्या आणि कर्म यांचा समुच्चय कधीही होऊ शकत नाही. (१६) यावच्छरीरादिषु माययात्मधीः तावद्विधेयो विधिवादकर्मणाम् । नेतीति वाक्यैरखिलं निषिध्य तत्- ज्ञात्वा परात्मानमथ त्यजेत्क्रियाः ॥ १७ ॥ मायेने मोहित झालेला माणूस जोपर्यंत शरीर इत्यादी अनात्म गोष्टींना आत्मा आहेत अशी बुद्धी ठेवतो, तोपर्यंतच त्याला वेदांनी विहित केलेली कर्मे करावी लागतात. उपनिषदांतील 'नेति नेति' इत्यादी वाक्यांनी त्या सर्व अनात्म वस्तूंचा निषेध करून आणि त्यांचेपेक्षा परमात्मा वेगळा आहे, असे त्या परमात्म्याचे स्वरूप जाणून घेतल्यावर, मुमुक्षूने सर्व कर्माचा त्याग करावयास हवा. (१७) यदा परात्मामविभेदभेदकं विज्ञानमात्मन्यवभाति भास्वरम् । तदैव माया प्रविलीयतेऽञ्जसा सकारका कारणमात्मसंसृतेः ॥ १८ ॥ श्रुतिप्रमाणाभिविनाशिता च सा कथं भविष्यत्यपि कार्यकारिणी । विज्ञानमात्रादमलाद्वितीयतः तस्मादविद्या न पुनर्भविष्यति ॥ १९ ॥ परमात्मा आणि जीवात्मा यांमध्ये जो भेद मानला जातो त्याचा नाश करणारे प्रकाशमय विज्ञान जेव्हा अंतः क रणात स्पष्टपणे विलसू लागते, तेव्हाच जीवात्म्याच्या संसाराला कारणरूप असणारी माया (अविद्या) सहजपणे आपल्या कारकांसह लयाला जाते. वेद-प्रमाणाने उत्पन्न झालेल्या ज्ञानाने पूर्णपणे नष्ट झालेली माया पुनः जीवासाठी संसार कसा निर्माण करील ? कारण शुद्ध आणि अद्वितीय अशा परमात्म्याचे विज्ञान झाल्यानंतर पुनः अविद्या उत्पन्न होऊ शकत नाही. (१८-१९) यदि स्म नष्टा न पुनः प्रसूयते कर्ताहमस्येति मतिः कथं भवेत् । तस्मात्स्वतन्त्रा न किमप्यपेक्षते विद्या विमोक्षाय विभाति केवला ॥ २० ॥ आणि जर एकदा नष्ट होऊन गेलेली माया पुनः जन्माला येत नसेल, तर 'मी कर्माचा कर्ता आहे,' अशी बुद्धी त्या माणसाला कशी बरे होईल ? म्हणून विद्या ही स्वतंत्र आहे; तिला कर्म इत्यादी अन्य कशाचीही अपेक्षा असत नाही. ती एकटीच मोक्षासाठी स्वतंत्रपणे तळपत असते. (२०) सा तैत्तिरीयश्रुतिराह सादरं न्यासं प्रशस्ताखिलकर्मणां स्फुटम् । एतावदित्याह च वाजिनां श्रुतिः ज्ञानं विमोक्षाय न कर्म साधनम् ॥ २१ ॥ तसेच तैत्तिरीय शाखेची श्रुती आग्रहपूर्वक स्पष्टपणे १ म्हणते की, सर्व कर्मांचा त्याग करणे हेच प्रशस्त आहे. खेरीज वाजसनेय शाखेची श्रुतीसुद्धा 'एतावत' इत्यादी वाक्याद्वारा सांगते की ज्ञान हेच मोक्षाचे साधन आहे, कर्म हे मोक्षाचे साधन नाही. (२१) विद्यासमत्वेन तु दर्शितस्त्वया क्रतुर्न दृष्टान्त उदाहृतः समः । फलैः पृथक्त्वाद्बहुकारकैः क्रतुः संसाध्यते ज्ञानमतो विपर्ययम् ॥ २२ ॥ सप्रत्यवायो ह्यहमित्यनात्मधीः- अज्ञप्रसिद्धा न तु तत्त्वदर्शिनः । तस्माद्बुधैस्त्याज्यमविक्रियात्मभिः विधानतः कर्म विधिप्रकाशितम् ॥ २३ ॥ श्रद्धान्वितस्तत्त्वमसीति वाक्यतो गुरोः प्रसादादपि शुद्धमानसः । विज्ञाय चैकात्म्यमथात्मजीवयोः सुखी भवेन्मेरुरिवाप्रकम्पनः ॥ २४ ॥ आदौ पदार्थावगतिर्हि कारणं वाक्यार्थविज्ञानविधौ विधानतः । तत्त्वम्पदार्थो परमात्मजीवकौ- असीति चैकात्म्यमथानयोर्भवेत् ॥ २५ ॥ (हे ज्ञान- कर्म- समुच्चयवादी पुरुषा) तू विद्ये समान यज्ञ आहे, असे श्रुतीच्या आधारे दाखविले होतेस; परंतु तो यज्ञाचा दृष्टांत योग्य नाही. कारण त्या दोहोंची फळे वेगवेगळी आहेत. तसेच होता, ऋत्विक, यजमान इत्यादी पुष्कळ कारकांच्या द्वारा यहा सिद्ध होतो; त्या यज्ञापेक्षा ज्ञान वेगळे आहे. (म्हणजे ज्ञान हे कारक इत्यादींनी सिद्ध होणारे नाही). कर्मांचा त्याग केल्याने 'मी दोषी होईन' अशी अनात्मबुद्धी अज्ञानी माणसांच्या ठिकाणी होते; परंतु तशी बुद्धी आत्मतत्त्व जाणणाऱ्या ज्ञानी माणसाच्या बाबतीत होत नाही. म्हणून विकाररहित चित्त असणाऱ्या ज्ञानी माणसांनी वेदांनी विहित केलेल्या कर्मांचासुद्धा विधिपूर्वक त्याग करावयास हवा. तेव्हा श्रद्धेने संपन्न असणाऱ्या व चित्त शुद्ध असणाऱ्या माणसाने गुरूच्या कृपाप्रसादाने 'तत्त्वमसि' वाक्याच्या अर्थाने परमात्मा आणि जीवात्मा यांचे ऐक्य अनुभवून मेरूप्रमाणे निश्चल आणि सुखी व्हावे. कोणत्याही वाक्याचा अर्थ जाणून घेण्याच्या पद्धतीत असा नियम आहे की प्रथम त्या वाक्यातील प्रत्येक पदाचा अर्थ कळणे आवश्यक असते. आता तत्त्वमसि या वाक्यात 'तत्' आणि 'त्वं' ही पदे परमात्मा आणि जीव असा अर्थ सांगतात आणि 'असि' हे पद त्या दोहोंचे एकत्व सांगणारे आहे. (२२-२५) प्रत्यक्परोक्षादिविरोधमात्मनोः विहाय सङ्गृह्य तयोश्चिदात्मताम् । संशोधितां लक्षणया च लक्षितां ज्ञात्वा स्वमात्मानमथाद्वयो भवेत् ॥ २६ ॥ जीवात्मा आणि परमात्मा या दोन आत्म्यांचे बाबतीत जीवात्मा हा प्रत्यक् म्हणजे अंतःकरणाचा साक्षी आणि परमात्मा हा परोक्ष म्हणजे इंद्रियातीत आहे इत्यादी वाच्यार्थ रूप विरोध सोडून देऊन लक्षणेने लक्षित होणारे त्या दोघांचे चैतन्यस्वरूप लक्षात घेऊन, परमात्मा हाच आपला आत्मा आहे हे जाणून मुमुसूने एकीभावाने म्हणजे अद्वयरूपाने स्थिर व्हावे.' (२६) एकात्मकत्वाज्जहती न सम्भवेत्- तथाजहल्लक्षणता विरोधतः । सोऽयं पदार्थाविव भालक्षणा युज्येत तत्त्वं पदयोरदोषतः ॥ २७ ॥ तत् आणि त्वम् या पदांचे म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचे स्वरूप एकच असल्यामुळे (तत्त्वमसि वाक्यात) जहती लक्षणा घेऊन अर्थ करणे शक्य नाही. तसेच त्या दोहोंचा विरोध असल्यामुळे अजलक्षणेने अर्थ करणे शक्य होत नाही. म्हणून 'सः अयम्' (तो हा आहे) या वाक्यात ज्या प्रमाणे 'सः' आणि 'अयम्' या पदार्थांची भागलक्षणा घेतली जाते, त्याप्रमाणे 'तत' आणि 'त्वम्' या पदांच्या बाबतीत निर्दोष भागलक्षणा घेऊन अर्थ करणे योग्य ठरते.' (२७) रसादिपञ्चीकृतभूतसम्भवं भोगालयं दुःखसुखादिकर्मणाम् । शरीरमाद्यन्तवदादिकर्मजं मायामयं स्थूलमुपाधिमात्मनः ॥ २८ ॥ सूक्ष्मं मनोबुद्धिदशेन्द्रियैर्युतं प्राणैरपञ्चीकृतभूतसम्भवम् । भोक्तुः सुखादेरनुसाधनं भवेत्- शरीरमन्यद्विदुरात्मनो बुधाः ॥ २९ ॥ पंचीकरणाने बनलेल्या पृथ्वी इत्यादी पाच भूतांपासून उत्पन्न होणारे, सुख-दुःख इत्यादी कर्माच्या भोगांचा आश्रय असणारे, उत्पत्ती आणि नाश असणारे, पूर्व जन्मातील कर्मांनी निर्माण होणारे व मायेचे कार्य असणारे हे स्थूल शरीर ही आत्म्याची स्थूल उपाधी आहे, असे मानले जाते. तसेच मन, बुद्धी, दहा इंद्रिये आणि पंच प्राण यांनी युक्त, पाच अपंचीकृत भूतांपासून उत्पन्न होणारे, आणि भोकया जीवाच्या सुखदुःख इत्यादी भोगांचे साधन असणारे जे सूक्ष्म शरीर आहे, ते जीवात्म्याचे दुसरे शरीर आहे, असे विद्वान लोक जाणतात. (हे सूक्ष्म शरीर ही आत्म्याची आणखी एक उपाधी आहे.) (२८-२९) अनाद्यनिर्वाच्यमपीह कारणं मायाप्रधानं तु परं शरीरकम् । उपाधिभेदात्तु यतः पृथक् स्थितं स्वात्मानमात्मन्यवधारयेत्क्रमात् ॥ ३० ॥ या दोन शरीरांखेरीज अनादी, अनिर्वचनीय माया ही प्रधान असणारे असे आणखी एक कारण नावाचे तिसरे शरीर आहे. तेही आत्म्याची आणखी एक उपाधी आहे. अशा प्रकारे या तीन शरीरांच्या उपाधींपेक्षा संपूर्णपणे वेगळेपणाने असणारा आपला आत्मा आहे, असा क्रमाने उपाधींचा निरास करीत आपल्या मनात आत्मनिश्चय करावा. (३०) क्रोशेष्वयं तेषु तु तत्तदाकृतिः विभाति सङ्गात्स्फटिकोपलो यथा । असङ्गरूपोऽयमजो यतोऽद्वयो विज्ञायतेऽस्मिन्परितो विचारिते ॥ ३१ ॥ ज्या प्रमाणे स्फटिकाला जवळ असणाऱ्या पदार्थाचा रंग येतो, त्या प्रमाणे त्या अन्नमयादी कोशांच्या संगामुळे हा त्या त्या कोशाच्या आकाराचा भासू लागतो. परंतु आत्मस्वरूपाचा नीट विचार केला असता, हा आत्मा अद्वितीय असल्यामुळे तो असंग आणि अजन्मा आहे, हे निश्चितपणे कळून येते. (३१) बुद्धेस्त्रिधा वृत्तिरपीह दृश्यते स्वप्नादिभेदेन गुणत्रयात्मनः । अन्योन्यतोऽस्मिन् व्यभिचारतो मृषा नित्ये परे ब्रह्मणि केवले शिवे ॥ ३२ ॥ सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण असणाऱ्या त्रिगुणात्मक बुद्धीच्या स्वप्न, जागृती आणि निद्रा या भेदांनी तीन वृत्तीसुद्धा मानवी जीवनात दिसून येतात. परंतु या तीन वृत्तींतील प्रत्येकीचा दुसऱ्या वृत्तीत अभाव होतो. यामुळे या तिन्ही अवस्था एकमात्र, कल्याणस्वरूप नित्य अशा परब्रह्माच्या दृष्टीने मिथ्या ठरतात. (३२) देहेन्द्रियप्राण मनश्चिदात्मनां सङ्घादजस्रं परिवर्तते धियः । वृत्तिस्तमोमूलतयाज्ञलक्षणा यावद्भवेत्तावदसौ भवोद्भवः ॥ ३३ ॥ देह, इंद्रिये, प्राण, मन व चेतन आत्मा हे एकत्र आल्यामुळे बुद्धीची वृत्ती सतत बदलत राहाते. ही वृत्ती तमोगुणापासून उत्पन्न झालेली असल्यामुळे ती अज्ञानरूप असते; आणि जोपर्यंत ही बुद्धी चालू राहाते, तोपर्यत संसार चालूच राहातो. (३३) नेतिप्रमाणेन निराकृताखिलो हृदा समास्वादितचिद्घनामृतः । त्यजेदशेषं जगदात्तसद्रसं पीत्वा यथाम्भः प्रजहाति तत्फलम् ॥ ३४ ॥ 'न इति न इति' या वाक्यातील वेदप्रमाणाने संपूर्ण संसाराचे निराकरण करून आणि हृदयामध्ये चिद्घनामृताचा आस्वाद घेऊन, नंतर, ज्या प्रमाणे एखादा माणूस नारळातील पाणी पिऊन झाल्यावर त्याचे वरील कवच फेकून देतो, त्या प्रमाणे जगाचे सार असणारे सत् असे ब्रह्म प्राप्त करून घेऊन, साधक मुमुक्षूने संपूर्ण जगाचा त्याग करावा. (३४) कदाचिदात्मा न मृतो न जायते न क्षीयते नापि विवर्धतेऽनवः । निरस्तसर्वातिशयः सुखात्मकः स्वयम्प्रभः सर्वगतोऽयमद्वयः ॥ ३५ ॥ आत्मा हा कधीही जन्माला येत नाही आणि तो कधीही मरत नाही. तो कधीही क्षीण होत नाही आणि तो कधीही वाढत नाही. तो पुरातन आत्मा सर्व विशेषणांनी रहित आहे. तो सुख- स्वरूप आहे. तो आत्मा स्वयंप्रकाशी, सर्वव्यापक आणि द्वैतरहित आहे (३५) एवंविधे ज्ञानमये सुखात्मके कथं भवो दुःखमयः प्रतीयते । अज्ञानतोऽध्यासवशात् प्रकाशते ज्ञाने विलीयेत विरोधतः क्षणात् ॥ ३६ ॥ येथे कुणी प्रश्न करील की अशा प्रकारच्या त्या ज्ञानस्वरूप आणि सुखस्वरूप असणाऱ्या आत्म्यावर हा दुःखाने भरलेला संसार कसा बरे प्रचीतीला येतो ? तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की अज्ञानाच्या योगे आत्म्यावर अध्यास होऊन हा संसार अनुभवास येतो. परंतु आत्म्याचे ज्ञान होताच, संसार क्षणात लयाला जातो. कारण ज्ञान आणि अज्ञान हे संपूर्णपणे परस्पर विरोधी आहेत. (३६) यदन्यदन्यत्र विभाव्यते भ्रमाद् अध्यासमित्याहुरमुं विपश्चितः । असर्पभूतेऽहिविभावनं यथा रज्ज्वादिके तद्वदपीश्वरे जगत् ॥ ३७ ॥ (हा अध्यास म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर असे की) भ्रमामुळे एखाद्या ठिकाणी दुसराच पदार्थ भासतो, त्या गोष्टीला अध्यास असे विद्वान म्हणतात. ज्या प्रमाणे सर्प नसणाऱ्या रज्जू इत्यादींवर सर्प भासतो, त्या प्रमाणे ईश्वरावर जग भासते. (३७) विकल्पमायारहिते चिदात्मके- अहङ्कार एष प्रथमः प्रकल्पितः । अध्यास एवात्मनि सर्वकारणे निरामये ब्रह्मणि केवले परे ॥ ३८ ॥ विकल्प आणि माया यांनी रहित, चित्स्वरूप, सर्वांचे कारण, निरामय विकाररहित, अद्वितीय असणाऱ्या अशा परब्रह्मावर सर्वप्रथम अहंकार कल्पिला गेला. हा अध्यासच आहे. (३८) इच्छादिरागादिसुखादिधर्मिकाः सदा धियः संसृतिहेतवः परे । यस्मात् प्रसुप्तौ तदभावतः परः सुखस्वरूपेण विभाव्यते हि नः ॥ ३९ ॥ इच्छा व अनिच्छा, राग आणि द्वेष, सुख व दुःख हे नेहमीचे धर्म असणाऱ्या बुद्धीच्या वृत्ती या संसाराचे कारण आहेत आणि त्या परमात्म्यावर आरोपित केल्या जातात. कारण निद्रा या अवस्थेत त्यांचा अभाव झाला असताना, सुखरूप असा परमात्मा आपल्या अनुभवास येत असतो. (३९) अनाद्यविद्योद्भवबुद्धिबिम्बितो जीवः प्रकाशोऽयमितीर्यते चितः । आत्मा धियः साक्षितया पृथक् स्थितो बुद्ध्यापरिच्छिन्नपरः स एव हि ॥ ४० ॥ अनादी अविद्येपासून उत्पन्न झालेल्या बुद्धीत प्रतिबिंबित झालेला चैतन्याचा प्रकाश हा जीव आहे, असे म्हटले जाते. बुद्धीचा साक्षी या स्वरूपात आत्मा हा वेगळाच राहात असतो. बुद्धीमुळे मर्यादित होत नाही. कारण तो आत्मा हा पर म्हणजे सर्वव्यापक आहे. (४०) चिद्विम्बसाक्ष्यात्मधियां प्रसङ्गतः त्वेकत्र वासादनलाक्तलोहवत् । अन्योन्यमध्यासवशात् प्रतीयते जडाजडत्वं च चिदात्मचेतसोः ॥ ४१ ॥ अग्नीने तप्त झालेल्या लोखंडाप्रमाणे प्रतिबिंब म्हणजे चिदाभास, साक्षी असणारा आत्मा आणि बुद्धी यांच्या एकत्र राहाण्यामुळे, त्यांचा परस्पर अध्यास होतो; त्यामुळे चिदात्म्याचे चेतनत्व हे मनावर आणि मनाचे जडत्व हे चिदात्म्यावर भासू लागते. (४१) गुरोः सकाशादपि वेदवाक्यतः । सञ्जातविद्यानुभवो निरीक्ष्य तम् । स्वात्मानमात्मस्थमुपाधिवर्जितं त्यजेदशेषं जडमात्मगोचरम् ॥ ४२ ॥ गुरूजवळून किंवा वेदवाक्यावरून, आत्मज्ञानाचा अनुभव आल्यावर, आपल्या शरीरात असणाऱ्या उपाधिरहित अशा स्वतःच्या आत्म्याचा साक्षात्कार करून घेऊन, आत्म्यावर प्रतीत होणाऱ्या सर्व अनात्म गोष्टींचा त्याग करावा. (४२) प्रकाशरूपोऽहमजोऽहमद्वयो- असकृद्विभातोऽहमतीव निर्मलः । विशुद्ध विज्ञानघनो निरामयः सम्पूर्ण आनन्दमयोऽहमक्रियः ॥ ४३ ॥ सदैव मुक्तोऽहमचिन्त्यशक्तिमान्- अतीन्द्रियज्ञानमविक्रियात्मकः । अनन्तपारोऽहमहर्निशं बुधैः विभावितोऽहं हृदि वेदवादिभिः ॥ ४४ ॥ 'मी प्रकाशकरूप, अजन्मा, अद्वितीय, नित्य प्रकाशमान, अतिशय निर्मळ, शुद्ध विज्ञानघन, निरामय क्रियारहित आणि पूर्णपणे आनंदस्वरूप आहे. विकाररहित असणे हे माझे स्वरूप आहे. मी नेहमी मुक्तआहे. माझ्याजवळ अचिंत्य शक्ती आहे. मी अतींद्रिय, ज्ञानस्वरूप, अविकृतस्वरूप असणारा आहे. मी अनंत व अपार आहे. वेदांचा अभ्यास करणारे वेदवेत्ते रात्रंदिवस आपल्या हृदयात माझेच चिंतन करीत असतात.' (४३-४४) एवं सदात्मानमखण्डितात्मना विचारमाणस्य विशुद्धभावना । हन्यादविद्यामचिरेण कारकै रसायनं यद्वदुपासितं रुजः ॥ ४५ ॥ अशा प्रकारे अखंड मनोवृत्तीने नेहमी आत्म्याचे चिंतन करणाऱ्याच्या मनात उत्पन्न होणारी विशुद्ध भावनाही त्वरित कारकांसह अविद्येचा नाश करून टाकते. जसे, योग्यप्रकारे सेवन केल्याने रसायन किंवा औषध हे रोगाचा नाश करते. (४५) विविक्त आसीन उपारतेन्द्रियो विनिर्जितात्मा विमलान्तराशयः । विभावयेदेकमनन्यसाधनो विज्ञानदृक् केवल आत्मसंस्थितः ॥ ४६ ॥ इंद्रियांना आपल्या विषयांपासून दूर करून अंतःकरण जिंकून घ्यावे आणि आत्म्यामध्ये स्थित होऊन इतर कोणत्याही साधनाचा आधार न घेता शुद्ध चित्त होऊन विज्ञानदृष्टीने फक्त आत्म्याचे चिंतन करावे. (४६) विश्वं यदेतत्परमात्मदर्शनं विलापयेदात्मनि सर्वकारणे । पूर्णश्चिदानन्दमयोऽवतिष्ठते न वेद बाह्यं न च किञ्चिदान्तरम् ॥ ४७ ॥ हे जे विश्व दिसते ते परमात्म्याचे स्वरूप आहे, असे जाणून, सर्वाचे कारण असणाऱ्या परमात्म्यामध्ये विश्वाचा लय करावा. असे केल्यावर, जो माणूस संपूर्णपणे आनंदस्वरूप होऊन जातो, त्याला बाहेरील अथवा आतील कोणतीच गोष्ट कळून येत नाही. (४७) पूर्वं समाधेरखिलं विचिन्तयेत् ओङ्कारमात्रं सचराचरं जगत् । तदेव वाच्यं प्रणवो हि वाचको विभाव्यतेऽज्ञानवशान्न बोधतः ॥ ४८ ॥ समाधी प्राप्त होण्यापूर्वी, संपूर्ण चराचर जग हे केवळ ॐकारमात्र आहे, असा साधकाने विचार करावा. ते जगच ॐकाराने वाच्य होते आणि ॐकार हा जगाचा वाचक आहे. अज्ञानी अवस्थेतच जग हे ॐकाररूप आहे, अशी वाच्यवाचक भावाची प्रचीती येते. परंतु ज्ञान झाल्यावर फक्त एक ब्रह्मच उरते. (४८) अकारसंज्ञः पुरुषो हि विश्वको ह्युकारकस्तैजस ईर्यते क्रमात् । प्राज्ञो मकारः परिपठ्यतेऽखिलैः समाधिपूर्वं न तु तत्त्वतो भवेत् ॥ ४९ ॥ ठकारात अ, उ, म हे तीन वर्ण आहेत. यांतील अकार, विश्व म्हणजे जागृतीचा अभिमानी, असलेल्याचा वाचक आहे. उकार, तेजस म्हणजे स्वप्नाचा अभिमानी, असलेल्याचा वाचक आहे आणि मकार प्राज्ञ म्हणजे सुषुप्तीचा अभिमानी, असलेल्याचा वाचक आहे. (४९) विश्वं त्वकारं पुरुषं विलापयेत् उकारमध्ये बहुधा व्यवस्थितम् । ततो मकारे प्रविलाप्य तैजसं द्वितीयवर्णं प्रणवस्य चान्तिमे ॥ ५० ॥ नाना प्रकाराने स्थित असणाऱ्या अकाररूपी विश्व पुरुषाचा लय उकाराच्या मध्ये करावा. त्यानंतर ओंकाराच्या उकाररूपी द्वितीय वर्णस्वरूप असणाऱ्या तेजस पुरुषाला शेवटच्या मकाएरूप वर्णात लीन करावे. (५०) मकारमप्यात्मनि चिद्घने परे विलापयेद्प्राज्ञमपीह कारणम् । सोऽहं परं ब्रह्म सदा विमुक्तिमत् विज्ञानदृङ्मुक्त उपधितोऽमलः ॥ ५१ ॥ त्यानंतर येथे कारणरूप तसेच मकाररूप असणाऱ्या प्राज्ञ पुरुषालासुद्धा चिद्घन अशा परमात्म्यात लीन करावे. मग विज्ञानदृष्टी असणाऱ्या, उपाधीपासून मुक्त झालेल्या अशा निर्मळ साधकाने नित्य मुक्त असणारे परब्रह्म म्हणजे मी आहे, अशी भावना करावी. (५१) एवं सदा जातपरात्मभावनः स्वानन्दतुष्टः परिविस्मृताखिलः । आस्ते स नित्यात्मसुखप्रकाशकः साक्षात् विमुक्तोऽचलवारिसिन्धुवत् ॥ ५२ ॥ अशा प्रकारे मी परमात्मा आहे, अशी भावना ज्याच्या ठिकाणी सतत निर्माण झाली आहे, जो स्वतःच्या म्हणजे आत्म्याच्या आनंदात मग्न झाला आहे, जो संपूर्ण संसार पूर्णपणे विसरून गेला आहे आणि नित्य आत्मसुखाचा प्रकाश हेच ज्याचे स्वरूप झाले आहे, असा तो साक्षात मुक्त पुरुष हा निश्चल जळाने भरलेल्या सागरासारखा स्थिर राहातो. (५२) एवं सदाभ्यस्तसमाधियोगिनो निवृत्तसर्वेन्द्रियगोचरस्य हि । विनिर्जिताशेषरिपोरहं सदा दृश्यो भवेयं जितषड्गुणात्मनः ॥ ५३ ॥ अशा प्रकारे जो पुरुष समाधियोगाचा नित्य अभ्यास करतो, सर्व इंद्रियांना गोचर असणारे विषय हे ज्याच्यापासून निवृत्त झाले आहेत, ज्याने काम, क्रोध इत्यादी सर्व शत्रू जिंकलेले आहेत, ज्याने सहा इंद्रियांना जिंकले आहे, अशा महात्म्या पुरुषाला माझा साक्षात्कार नेहमी होतो. (५३) ध्यात्वैवमात्मानमहर्निशं मुनिः तिष्ठेत्सदा मुक्तसमस्तबन्धनः । प्रारब्धमश्नन्नभिमानवर्जितो मय्येव सक्षात् प्रविलीयते ततः ॥ ५४ ॥ अशा प्रकारे रात्रंदिवस आत्म्याचे ध्यान करून, मुनीने नेहमी सर्व बंधनांतून मुक्त होऊन राहावे. मी कर्ता, मी भोक्ता या अभिमानाने रहित होऊन, प्रारब्ध भोगत राहाणारा माणूस नंतर साक्षात माझ्यामध्येच लीन होऊन जातो. (५४) आदौ च मध्ये च तथैव चान्ततो भवं विदित्वा भयशोककारणम् । हित्वा समस्तं विधिवादचोदितं भजेत् स्वमात्मानमथाखिलात्मनाम् ॥ ५५ ॥ हा संसार आदी, मध्य आणि अंत या सर्व ठिकाणी भय व शोक यांचे कारण आहे, हे जाणून, आणि विधि-वाक्यांनी विहित केलेली सर्व कर्मे टाकून देऊन, मग सर्वांचा आत्मा असणारा असा जो आपला स्वतःचाही आत्मा आहे, त्याचा आश्रय घ्यावा. (५५) आत्मन्यभेदेन विभावयन्निदं भवत्यभेदेन मयात्मना तदा । यथा जलं वारिनिधौ यथा पयः क्षीरे वियद्व्योम्न्यनिले यथानिलः ॥ ५६ ॥ ज्या प्रमाणे समुद्रात जल, दुधात दूध, महाकाशात घटाकाश इत्यादी आणि वायूमध्ये वायू मिसळून एक होतात, त्या प्रमाणे हा संपूर्ण संसार आत्म्याशी अभिन्न आहे, असे चिंतन केल्यास जीव हा मज परमात्म्याबरोबर अभिन्न भावनेने स्थित होतो. (५६) इत्थं यदीक्षेत हि लोकसंस्थितो जगन्मृषैवेति विभावयन्मुनिः । निराकृतत्वात् श्रुतियुक्तिमानतो यथेन्दुभेदो दिशि दिग्भ्रमादयः ॥ ५७ ॥ हे जे जग आहे ते श्रुती व युक्ती आणि प्रमाण यांचे द्वारा निराकृत होत असल्याकारणाने, ते एका चंद्राऐवजी अनेक चंद्र, किंवा एका दिशेमध्ये होणारा दुसऱ्या दिशेचा भ्रम, या प्रमाणे मिथ्याच आहे, असा विचार करीत, लोकव्यवहारात राहून, मुनी जर ऐक्यच पाहात राहील तर त्याला जीव, जग आणि परमात्मा यांच्या ऐक्याचे ज्ञान होईल. (५७) यावन्न पश्येदखिलं मदात्मकं तावन्मदाराधनतत्परो भवेत् श्रद्धालुरत्यूर्जितभक्तिलक्षणो यस्तस्य दृश्योऽहमहर्निशं हृदि ॥ ५८ ॥ जोपर्यंत सर्व विश्व हे माझे स्वरूप आहे, हे माणसाला पाहाता येत नाही, तोपर्यंत त्याने माझी आराधना करण्यात तत्पर राहावे. जो पुरुष श्रद्धेने युक्त आणि उत्कट भक्तीने संपन्न आहे, त्यालाच स्वतःच्या हृदयात रात्रंदिवस माझाच साक्षात्कार होतो. (५८) रहस्यमेतत् शृतिसारसङ्ग्रहं मया विनिश्चित्य तवोदितं प्रिय । यस्त्वेतदालोचयतीह बुद्धिमान् स मुच्यते पातकराशिभिः क्षणात् ॥ ५९ ॥ हे प्रिय लक्ष्मणा, सर्व श्रुतींचे सारसंग्रहरूप असे हे रहस्य मी निश्चित करून तुला सांगितले आहे. येथे या जगात जो बुद्धिमान पुरुष याचे मनन करील, तो एका क्षणात सर्व पातकांतून मुक्त होईल. (५९) भ्रातर्यदीदं परिदृश्यते जगत् मायैव सर्वं परिहृत्य चेतसा । मद्भावनाभावितशुद्धमानसः सुखी भवानन्दमयो निरामयः ॥ ६० ॥ हे बंधू लक्ष्मणा, हे जे जग दिसत आहे ते सर्व माया आहे, हे जाणून तू ते आपल्या मनातून काढून टाक. माझ्या चिंतनाने चित्त शुद्ध करून तू सुखी, आनंदमय आणि क्लेशरहित हो. (६०) यः सेवते मामगुणं गुणात्परं हृदा कदा वा यदि वा गुणात्मकम् । सोऽहं स्वपादाञ्चितरेणुभिः स्पृशन् पुनाति लोकत्रितयं यथा रविः ॥ ६१ ॥ जो पुरुष आपल्या मनाने गुणांच्या पलीकडील, गुणरहित अशा माझे चिंतन करतो किंवा कधी माझ्या सगुण रूपाचे सेवन करतो, तो व मी एकरूप आहोत. ज्या प्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी तिन्ही जगांना प्रकाशित करतो, त्या प्रमाणे हा महापुरुष आपल्या पायाच्या रजः कणाच्या स्पर्शाने तिन्ही लोकांना पवित्र करतो. (६१) विज्ञामेतदखिलंश्रुतिसारमेकं वेदान्तवेद्यचरणेन मयैव गीतम् । यः श्रद्धया परिपठेद् गुरुभक्तियुक्तो मद्रूपमेति यदि मद्वचनेषु भक्तिः ॥ ६२ ॥ हे एकमेवद्वितीय व संपूर्ण असे श्रुतींचे सार विज्ञान आहे. वेदांतावरूनच ज्याच्या चरणांचे ज्ञान होते, अशा मीच तुला हे सांगितले आहे. गुरूवरील भक्तीने युक्त होऊन जो कोणी पुरुष श्रद्धापूर्वक हे पठण करील, त्याची जर माझ्या वचनांवर भक्ती असेल, तर तो पुरुष मद्रूप होऊन जातो." (६२) इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥ इति श्रीमद्अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे पंचमः सर्गः ॥ ५ ॥ जेव्हा वाक्यात पदांचा वाच्यार्थ हा सुसंगत ठरत नाही, तेव्हा तेथे लक्षणा वृत्तीने लक्ष्यार्थ घ्यावा लागतो. 'तत्त्वमसि' वाक्यात 'तत्' व 'त्वं' पदांचा वाच्यार्थ विरोधामुळे सुसंगत ठरत नाही. म्हणून लक्षणा घेऊन त्यांचा अर्थ करावा लागतो. आणि भाग लक्षणेने दोन्ही पदांचा लक्ष्यार्थ. चैतन्य' असा आहे, असे कळते. या भाग लक्षणेचा उल्लेख या श्लोकात आहे. जेथे शब्दाचे वाच्यार्थ (म्हणजे त्या शब्दांच्या अभिधा शक्तीने कळणारे अर्थ) सोडून, दुसरा अर्थ घेतला जातो, तेथे तो लक्षणा वृत्तीने घेतला जातो. ती लक्षणा जहती, अजहती आणि जहत्यजहती या नावाची तीन प्रकारची आहे. जहती लक्षणेमध्ये शब्दांचे वाच्यार्थ संपूर्णपणे सोडून देऊन एकदम एक दुसरा अर्थ लक्ष्यार्थ घेतला जातो. जसे ' गंगायां घोषः ' (म्हणजे गंगेवर पशुशाला आहे) या वाक्यात वाच्याथनि ग्णेच्या प्रवाहावर पशुशाला आहे, असा अर्थ होतो. परंतु हा वाच्यार्थ संपूर्णपणे असंभवनीय आहे. म्हणून येथे गा शब्दाचा अर्थ गंगाप्रवाह असा न घेता गगातीर असा घेतला जातो. ' तत्त्वमसि' वाक्यात अशी जहती लक्षणा घेतली तर ' तह आणि ' त्वं ' पदाचे वाच्यार्थ (ईश्वर आणि जीव) हे संपूर्णपणे सोडून द्यावे लागतील; तसे केल्यावर त्या दोघांच्या वाच्यार्थातील चैतन्य हा अर्थसुद्धा सोडून दिला असे होते. परतु या वाक्यात तर चैतन्याचे एकत्व हा अर्थ इष्ट आहे. म्हणून जहती लक्षणेने या दोन पदांच्या अर्थाची एकता सिद्ध होऊ शकत नाही. अजहती (अजब्रक्षणा) या लक्षणेत वाच्यार्थाचा त्याग न करता, त्या वाच्यार्थासह दुसरा एक अर्थलस्थार्थ म्हणून ग्रहण केला जातो. rईं काकेभ्यो दक्षि रध्यताम्ए कावळ्यापासून दह्याचे रक्षण कर या वाक्याचा अभिप्राय केवळ कावळ्यापासून दह्याचे रक्षण करावे असा नाही, तर कावळ्याचे बरोबरच कुत्रा, माजर इत्यादी अन्य प्राण्यांपासून दह्याचे रक्षण करावे, असा आहे. ' तत्त्वमसि' वाक्यात अजहती लक्षणा घेतली तर ' तत्रे इrrए त्वं' पदाच्या वाच्यार्थाच्या जोडीने अन्य अर्थ वाच्यार्थ म्हणून घ्यावा लागेल. तरीसुद्धा एइं तत् व ' त्वं' पदाच्या वाच्यार्थात जो विरोध आहे, तो दूर होतच नाही. म्हणून अजहती लक्षणेने मुद्धा त्यांची एकता ही सिद्ध होत नाही, या दोन लक्षणांखेरीज तिसरी एक जहत्यजहती (भाग लक्षणा) आहे; तिच्यामध्ये काही वाच्यार्थ सोडला जातो आणि काही वाच्यार्थ ठेवला जातो. जसे ' सोऽयमू ' (तो हा आहे) या वाक्यात ' अयमू पदाने कळून येणाऱ्या पदार्थाची अपरोक्षता आणि ' सः ' पदाच्या अथनि कळणाऱ्या पदार्थाची परोक्षता या दोहोचाही त्याग करून, त्या दोन्ही अर्थांनी रहित असा जो निर्विशेष पदार्थ आहे, त्याची एकता सांगितली जाते. याच प्रकाराने ' तत्त्वमसि' वाक्यात ' तत् पदाने वाच्य असणाऱ्या ईश्वराचे सर्वज्ञता, परोक्षता इत्यादी गुण आणि ' त्वं' पदाचा वाच्यार्थ असणाऱ्या जीवाचे अल्पज्ञता, प्रत्यक्ता इत्यादी गुण या दोहोंचा त्याग करून केवळ चेतन अंशाचे एकच घेणे हे योग्य ठरते. म्हणून ' तत्त्वमसि वाक्यातून इष्ट अर्थ प्राप्त होण्यासाठी भाग लक्षणा घेणे आवश्यक ठरते. ] |