|
॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ ॥ श्रीरामचरितमानस ॥ (मराठी अनुवाद) ॥ प्रथम सोपान ॥ ॥ बालकाण्ड ॥ अध्याय १ ला ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ Download mp3 अनुवादक-कृत मंगलाचरण आर्या :- श्रीरामनाम-महवित् पूज्याग्र्यो विघ्ननाशको देवः ॥ मूळ मंगलाचरण वर्णानामर्थसङ्घानां रसानां छंदसामपि ॥ श्री रामचरीत् मानस मराठी अनुवाद (केवळ सरलार्थ) चौ० :- वंदे गुरु - पद - पद्म - परागा । सुरुचि-सुवास सरस-अनुरागा ॥ दो० :- नेत्रिं सु-अंजन घालितां साधक सिद्ध सुजाण ॥ १) गुरुच्या चरणरुपी कमलांतील परागांना मी वंदन करतो. त्यात सुरुचिकपी सुवास सुगंध असून ते अनुराग रसाने युक्त आहेत.२) (श्री गुरुमहाराजांच्या पायांची धूळ ही धूळ नसून) अमृत मुळीचे फार सुंदर चूर्ण आहे व ते भवरोग व त्याचा परिवार याचे शमन विनाश करते. ३) (शरीराला लागणारी ही गुरूपद धूली) सुकृती रुपी साक्षात शिवाच्या अंगावरील विमल विभूती आहे व सुंदर मंगलाची व आनंदाची जननी (प्रसवणारी) आहे ४) (गुरुपदधूलि-विमल-विभूति सेवकाच्या मनरुपी सुंदर आरश्यावरील मळ दूर करणारी असून तिचा (कपाळावर) टिळा लावला असता ती गुणसमूहास वश करणारी आहे ५) श्री गुरुमहाराजांच्या चरणनखरुपी मणिसमूहाच्या ज्योतीचे-प्रकाशाचे स्मरण करताच, स्मरण-ध्यान करणार्याचे हृदय दिव्यदृष्टी युक्त होते. म्हणजेच हृदयाला दिव्य दृष्टी प्राप्त होते. ६)तो सुंदर प्रकाश मोहरुपी अंधाराचा संहार करतो. तो ज्याच्या हृदयात पडेल त्याचे भाग्य मोठे ! (तो महाभाग्यवंताच्याच हृदयात प्रकट होतो.) ७) ज्याच्या हृदयाचे निर्मळ डोळे उघडतात व संसृती रुपी (भव) रात्रीतील दु:खे व दोष नष्ट होतात (हे निर्मळ डोळे म्हणजे ज्ञान व वैराग्य) ८) मग त्यास रामचरित्र रुपी मणिमाणके जेथे खाणीत गुप्त वा प्रगट असतील ती दिसूं लागतात. दो.१- डोळ्यांत सिद्धांजन घातले म्हणजे जसा साधक सिद्ध व सुजाण होतो व त्यास सहज लीलेने (कौतुकि) वनात, पर्वतात, किंवा जमिनीत असलेले गुप्त धनाचे ठेवे दिसतात (वन-इतिहास, पर्वत - वेदपुराणे) गुरुपद-रज मृदु मंजुल अंजन । नयनामृत दृग् - दोष - विभंजन ॥ दो० :- परिसुनि समजति मुदित मन मज्जति अति अनुरागिं ॥ श्रीगुरुमहाराजांचे पदरज हे मृदु व मंजुळ नयनामृत अंजन आहे. त्याने सर्व दृष्टी दोषांचे भंजन होते.॥१॥ त्याने मी आपल्या ज्ञान-नयनाला निर्मल केल्यावर आता भव-संसृती पाशातून सोडविणारे श्रीराम चरित्र वर्णन करीन ॥२॥ मोहाने जन्म दिलेल्या सर्व संशयांचा संहार करणार्या महीसुरांच्या-ब्राम्हणांच्या चरणांना मी प्रथम वंदन करतो ॥३॥ सकल गुणांची खाण असणार्या सज्जनांच्या समुहाला मी प्रेमाने व सुंदर (नम्र, गोड ) वाणीने प्रणाम करीत आहे ॥४॥ ज्याचे फळ नीरस, उज्वल व गुणमय असते अशा कापसाच्या चरित्रासारखे साधुंचे चरित्र शुभ असते ॥५॥ ते स्वत: दु:खे सहन करुन् दुसर्यांची छिद्रे झाकतात व तेणेंकरुन जगात वंद्य होतात व वन्दनीय यश पावतात ॥६॥ संतसमाज मुदमंगलमय आहे कारण की तो जगातील जंगम तीर्थराजच आहे. ॥७॥ जिथे (साधुसमाज प्रयागात) रामभक्ती ही भागीरथीची धार-प्रवाह आहे, व ब्रह्मविचाराचा प्रचार (प्रवचन-निरुपण) ही सरस्वती आहे. ॥८॥ विधी-निषेधांनी युक्त व कलिपापांचा संहार करणारी कर्मकांडाची कथा ही सूर्यकन्या यमुना आहे.॥९॥ हरिहरकथा ही त्रिवेणी विराजत असून श्रवण घडताच जी मोदमंगलदायक आहे.॥१०॥निजधर्माच्या ठिकाणी अचल विश्वास हा अक्षय-वट आहे असे मानावे व सत्कर्मास तीर्थराजाचा सारा सरंजाम गणावे ॥११॥ हा (साधुसमाजरुपी) तीर्थराज सर्व देशात, सर्वांनाच सर्वकाळी सुलभ आहे व त्याचे आदराने सेवन केले असता तो सर्व क्लेशांना शमवितो.॥१२॥ हा तीर्थराज अलौकिक व अवर्णनीय आहे व याचा प्रभाव अगदी उघड-प्रगट दिसतो आणि हा सद्य (ताबडतोब, रोख) फलदायी आहे.॥१३॥ साधुसमाजरूपी प्रयागात जे कोणी सेवक (जन) मुदित् मानाने, आनंदाने श्रवण करुन समजतील, व अनुरागात मग्न होतील ते (त्रिवेणीत मज्जन करणारे) याच तनुत अर्थ,धर्म, काम व मोक्ष ही चारी फळे (पुरुषार्थ) प्राप्त करतील. ॥ दो. २ ॥ मज्जन फल तत्काल पहावें । बकें हंस पिक काकें व्हावें ॥ दो० :- वंदे संतसमान मन हित अनहित ना कोणि ॥ सत्संग - महिमा - मज्जन केल्याचे फळ तत्काल अनुभवास येते.(कसे ते) पहा बगळा हंस होतो व कावळा कोकिळ होतो ॥१॥ हे ऐकून कोणी आश्चर्य मानू नका; कारण सत्संगतीचा महिमा गुप्त नसतो (अगदी प्रगट असतो) ॥२॥ वाल्मीकी, देवर्षी नारद,घट्योनी अगस्ती यांनी आपआपल्या मुखाने आपली हकीकत (कसे होतो व सत्संगतीने कसे झालो) सांगीतली आहे.॥३॥जगात नाना प्रकारचे जमिनीवर चालणारे, पाण्यात् संचार करणारे, आकाशात उडणारे जड वा चेतन जीव आहेत. ॥४॥ त्यापैकी ज्यांना जिथे जेव्हा ज्या प्रकाराने (उपायाने) सुमति, शुभगति, ऐश्वर्य चांगुलपणा (मोठेपणा) वा कीर्ती मिळाली ॥५॥ तो (केवळ) संत संगतीचाच प्रभाव आहे असे जाणावे. (या गोष्टी) प्राप्त होण्यास लोकांत किंवा वेदांमध्ये (सुद्धा) दुसरा उपाय नाही ॥६॥ सत्संगाशिवाय विवेक व ज्ञान प्राप्त होत नाही पण अहो ! तो सत्संग रामकृपेशिवाय मिळणे कठीण आहे (सुलभ नाही)॥७॥ आनंद मंगलांचे मूळ सत्संगतिच आहे; कारण सत्संगति-लाभ हेच फळ व हीच सिद्धी व (इतर) सर्व साधने फुले आहेत ॥८॥ परीसाचा स्पर्श झाला म्हणजे लोखंड सोने बनते तसेच संत संगतीचा लाभ झाला म्हणजे शठ-खल सुधारतात ॥९॥ (परंतु) दैववशात सज्जनांना-संताना कुसंगतीत पडावे लागले तरी नागाच्या मण्यासारखे ते आपल्या संत गुणांचेच अनुकरण करतात. (कुसंगतीचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही) ॥१०॥ ब्रह्मा, विष्णु, महेश, कवि, शास्त्रज्ञपंडित (कोविद) यांची वाणी आणि सरस्वती, शारदा, साधूंचा महिमा वर्णन करताना लाजते ॥११॥ (असा जो) तो महिमा मला कसा बरे वर्णन करता येईल? भाजीविक्या जसा रत्नाच्या अनेक गुणांचे वर्णन करु शकत नाही. (तसेच माझे) ॥१२॥ ओंजळीतील (शुभ) सुगंधी फुले (सुमन) जशी दोन्ही हातांस सारखेच सुगंधित करतात तसेच संतांचे मन समान असते व त्यास मित्र वा शत्रू कोणी नसतात; अशा संताना मी वंदन करतो. ॥३रा॥ संत हो, आपण सरळ मनाचे असून जगाचे हित करणारे आहात, म्हणून माझी बालकाची विनवणी ऐकून व आपला स्नेह व शील जाणून माझ्यावर कृपा करुन मला श्रीराम पदकमलांच्या ठिकाणी प्रेम द्या.( मला इतर काही नको). दो.३म ॥ अथ वन्दे सद्भावें खलगण । दक्षिणास जे वाम अकारण ॥ दो० :- उदासीन-अरि-मित्र-हितश्रवणिं जळति खलरीति ॥ खलवंदन - आता मी शुद्ध भावनेने खलगणांना वंदन करतो जे कारण नसताही हितकर्त्याशी विरोध करतात ॥१॥ त्यांना परहित हानि वाटते व परहिताची हानी हा लाभ वाटतो दुसर्यांचा विध्वंस (विनाश) झाला की त्यांना हर्ष वाटतो व दुसरे (सुखाने) नांदु लागले की त्यांस विषाद-खेद होतो॥२॥हरिहर यशरुपी पूर्ण चंद्रास ग्रासणारे हे राहु (सारखे) आहेत व दुसर्यांचे (शत्रुंचे) अहित करण्यात सहस्त्रार्जुना सारखे योद्धे आहेत.॥३॥ हे साक्षीदार बरोबर घेऊन दुसर्यांचे दोष लक्षपूर्वक बघत असतात आणि दुसर्यांच्या हितरुपी तुपात यांचे मन माशी बनुन पडते.॥४॥ हे खलगण तेजाने अग्निच असून रोषाने महिषासुर आहेत पाप व दुर्गुणरुपी धनाने श्रीमंत झालेले हे कुबेरच आहेत.॥५॥यांचा उदय धुमकेतुच्या उदयासारखा सर्वांचेच (अ)हित करणारा असतो! म्हणून हे जर कुंभकर्णासारखे निजून राहीले तर उत्तम ॥६॥ खलगण दुसर्यांचा अपकार करण्यासाठी आपल्या देहाचा सुद्धा त्याग करतात; जशा गारा पिकांचा विनाश करून वितळून नष्ट होतात॥७॥ रोषयुक्त होऊन हजार मुखांनी परदोष वर्णन करणार्या खलाला शेषासारखा मानून मी वंदन करतो.॥८॥पुन्हा त्याला पृथु राजा सारखा मानून वंदन करतो, कारण तो दहा हजार कानांनी पर अघ (निंदा) श्रवण करतो.॥९॥ज्याला सुरानीक सतत हितकर वाटते त्याला (खलाला) शक्रासमान मानून मी पुन्हा वंदन करतो.॥११॥ उदासीन असो, शत्रू असो की मित्र असो कोणाचे हित झालेले ऐकले की जळफळाट होणे ही खलांची रीत आहे हे जाणून हा दास दोन्ही हात जोडून विनंती करीत - विनवित आहे.॥दो. ४॥ मी आपल्यापरिं केली विनंती । घेति चुकुन ते ध्यानिं कधि न ती ॥ दो० := भल्या भलेपण लाभतें नीचत्वही नीचास ॥ मी आपल्यापरीने त्यांना विनंती केली.(पण मला माहित आहे की) ते चुकून सुद्धा तिकडे लक्ष देणार नाहीत.॥१॥ (कारण) वायसांना फार प्रेमाने जरी पाळले तरी त्या कावळ्यांनी मांसभक्षण करण्याचे कधी सोडले आहे काय? (कधीही नाही) ॥२॥ संत असंत साम्य भेद - (आता मी) संत व असंत या दोघांच्याही पायांना (एकदम) नमन करतो; कारण दोघेही दु:खदायक आहेत; पण दोघांत काही भेद आहे. ॥३॥ एक (संत) आपला वियोग होताना (दुसर्यांचे) प्राण हरण करुन नेतात व एक (असंत) मिळताच दारुण दु:ख देतात ॥४॥ (संत व दुर्जन) हे दोघेही या जगात बरोबरच उत्पन्न होत असता त्यात कमळ व जळू याच्या प्रमाणे गुणभेद असतो. ॥५॥ साधु व असाधु हे दोघे अमृत व दारु सारखे आहेत व दोघांचा जनक एकच म्हणजे जगरुपी अगाध सागर ॥६॥ चांगले व वाईट आपआपल्या कृतीने चांगले किंवा वाईट होतात आणि कीर्ती आणि अपकीर्ती रुपी वैभव मिळवितात (हा एक अर्थ). चांगले व वाईट आपआपल्या करणीने कीर्ती व अपकिर्तीरुपी वैभव मिळवितात (हा दुसरा अर्थ). ॥७॥ अमृत, चंद्र गंगा व साधू तसेच विष, अग्नि, कविनाशा-सुखाविनाशा नदी आणि दुर्जन यांना आपआपल्या कर्तृत्वामुळेच चांगले वाईट म्हंटले जाते किंवा- अमृत, चंद्र, गंगा यांच्यासारखे साधु असतात आणि विष, अग्नि, आणि कलिमलसरिता यांच्या सारखे व्याध म्हणजे खल (हा दुसरा अर्थ) ॥८॥ या अमृतादिकांचे व विषादिकांचे गुण व अवगुण सर्वांनाच माहित आहेत यातील चांगले काय व वाईट काय हे जो तो आपापल्या रुचीप्रमाणे ठरवितो.(२ रा अर्थ -) गुण व अवगुण सगळे जाणतातच पण ज्याला जो आवडतो तो त्याला उत्तम वाटतो - म्हणतो.॥९॥ परंतु चांगला-भला असेल त्याला चांगुलपणाच मिळतो व नीचाला नीचत्व मिळते अमृताची प्रशंसा होते ती अमरता (देण्याच्या) गुणामुळे व विषाची वाहवा होते ती मृत्युकारी गुणामुळेच ॥दो. ५॥ खल - अघ - अगुण साधु - गुण वर्णन । दोन अपार पयोधिच ठाव न ॥ दो० :- जडचेतन गुणदोषमय कर्ता निर्मि जगास ॥ खलांच्या पापांचे व अवगुणांचे वर्णन व साधु गुणांचे वर्णन हे दोन अपार अगाध सागर आहेत.॥१॥ म्हणून मी थोड्याश्यांचेच वर्णन केले; हेतु हा की अवगुणांचा - दोषांचा - पापांचा त्याग व सद्गुणांचे ग्रहण जाणल्याशिवाय करता येत नाही. ॥२॥ चांगल्यांना व वाईटांना विधीनेच निर्माण केले व गुणांचा व दोषांचा विचार करुन वेदांनी व शास्त्रांनी चांगले व वाईट अशी विभागणी केली.॥३॥ वेद, इतिहास, पुराणादीकांत सांगितले आहे की विधिनिर्मित (ईशकृत सृष्टी) गुणदोष मिश्रित आहे.॥४॥ सुख - दुख, पाप - पुण्य, दिवस-रात्र, साधु-दुर्जन, उत्तम जाती - वाईट जाती, देव-दानव, लक्ष्मी-अलक्ष्मी, रंक व सम्राट, काशी व मगध, देश, गंगा व कविनाशी नदी, माखाड व माळवा देश, ब्राह्मण व गोमांस खाणारे, स्वर्ग व नरक, आसक्ती व वैराग्य, इत्यादी प्रकारे वेद व शास्त्रे यांनी गुण-दोषांची विभागणी केली आहे. ॥५-९॥ दोहा - कर्त्याने हे जग जड व चैतन्य आणि गुण व दोष यांनी अगदी मिश्रित असे निर्माण केले आहे. संत हंसासारखे असल्याने गुणरुपी दुध घेतात व विकार रुपी जलाचा त्याग करतात ॥दो. ६॥ देइ विधाता विवेक हा जैं । गुणिं हि रमे मन त्यजि दोषा तैं ॥ दो० :- ग्रह भेषज जल् पवन पट मिळुनि कुयोग सुयोग ॥ हा नीरक्षीर विवेक विधाता जेव्हा देतो तेव्हा दोषांस सोडून मन गुणांतच रमते ॥१॥ काल, कर्म व स्वभाव यांच्या दडपणाने प्रकृतीला वश होऊन संत सुद्धा आपल्या भलेपणात चुकतात ॥२॥ ती सेवकाची चूक हरि सुधारून घेतात व दुःखदायक दोषांचा नाश करून सुयश देतात ॥३॥ सुसंग प्राप्त झाला तर खल सुद्धा भले (सत्कर्म) करतात, परंतु त्याचा मलिन स्वभाव जात नाही कारण तो अभंग असतो ॥४॥ जगाला ठकविणारे जे (भोंदू साधुवेषात) असतात त्यांचा साधुवेष दिसल्यानेच वेषाच्या बळावर-प्रतापाने ते सुद्धा पूजले जातात ॥५॥ पण त्यांचे दंभ (बेंड) शेवटी केव्हा तरी बाहेर पडतेच; ते निभावू शकत नाही यास उदाहरणे कालनेमी, रावण आणि राहू यांची आहेत ॥६॥ (याच्या उलट कुवेष केलेल्या संतांना सुद्धा मान मिळतो जसा जांबवान आणि हनुमान यास मिळाला (व मिळत आहे) ॥७॥ कुसंगतीने हानी आणि सुसंगतीने लाभ होतो हे सर्व लोकांत व वेद पुराणात प्रसिद्ध आहे ॥८॥ पवनाच्या संगतीने धूळ आकाशात चढते पण तीच नीचगामी पाण्यात पडली तर चिखल बनते ॥९॥ साधूंच्या घरातील पोपट आणि साळुंक्या तोंडाने राम-नामाचा उच्चार करतात व व दुर्जनांच्या घरातील शेलक्या शिव्या देतात ॥१०॥ कुसंगतीने धुर काळिमा बनतो, परंतु त्याची चांगली शाई झाली म्हणजे त्यानेच पुराणे शास्त्रे इ. लिहीतात. तोच धूर, जल, अग्नि व वायूच्या संगतीत आला की जगाला जीवन देणारा जलद (मेघ) बनतो ॥१२॥ ग्रह, औषध, जल, पवन व पट (वस्त्र) यांना कुयोग वा सुयोग मिळाल्याने कुवस्तु किंवा सुवस्तु वश होतात हे जगात सुलक्षणी लोक जाणतात. दोन्ही पक्ष सारख्याच प्रकाशाचे व अंधाराचे असतात तरी विधीने त्यांच्या नावात (शुद्ध पक्ष व कृष्ण पक्ष असा) भेद केला. एक चंद्राची वृद्धी करणारा व दुसरा क्षय करणारा असल्याने त्यास जगात यश व अपयश दिले. कार्पण्य भावाने वंदन – या जगात असलेले सर्व जड चेतन जीव राममयच आहेत हे जाणून मी त्या सर्वांच्या पदकमलांना सदा हात जोडून वंदन करतो. देव, दानव, मानव, नाग, पक्षी, प्रेत, पितर, गंधर्व, किन्नर व निशाचर या सर्वांनाच मी नमन करतो तरी आता या सर्वांनी (माझ्यावर) कृपा करावी.॥ दो. ७ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु |