लक्ष्मणेन श्रीराम वनागमनस्य सीताहरणस्य च वृत्तांतस्य वर्णनं, तत्र सीतान्वेषणे सुग्रीवः सहयोगं करोत्वितीच्छायाः प्रकटनं, हनुमता तयोराश्वासनपूर्वकं आत्मना सह नयनम् -
|
लक्ष्मणांनी हनुमानास श्रीरामांच्या वनात येण्याचा आणि सीतेचे हरण होण्याचा वृत्तांत सांगणे तसेच या कार्यात सुग्रीवांच्या सहयोगाची इच्छा प्रकट करणे, हनुमानांनी त्यांना आश्वासन देऊन त्या दोन्ही भावांना बरोबर घेऊन जाणे -
|
ततः प्रहृष्टो हनुमान् कृत्यवानिति तद्वचः । श्रुत्वा मधुरसंभाषं सुग्रीवं मनसा गतः ॥ १ ॥
|
श्रीरामांचे बोलणे ऐकून तसेच सुग्रीवांच्या विषयी त्यांचा सौम्य भाव जाणून आणि त्याच बरोबर यांनाही सुग्रीवांशी काही आवश्यक काम आहे हे जाणून हनुमानास फार प्रसन्नता वाटली. त्यांनी मनांतल्या मनात सुग्रीवाचे स्मरण केले. ॥१॥
|
भव्यो राज्यागमस्तस्य सुग्रीवस्य महात्मनः । यदयं कृत्यवान् प्राप्तः कृत्यं चैतदुपागतम् ॥ २ ॥
|
’आता निश्चितच महामना सुग्रीवास राज्याची प्राप्ती होईल कारण हे महानुभाव कुठल्या तरी कार्य प्रयोजनामुळे येथे आले आहेत आणि हे कार्य सुग्रीवद्वाराच सिद्ध होणारे आहे. ॥२॥
|
ततः परमसंहृष्टो हमुमान् प्लवगर्षभः । प्रत्युवाच ततो वाक्यं रामं वाक्यविशारदः ॥ ३ ॥
|
त्यानंतर वाक्यविशारद वानरश्रेष्ठ हनुमान् अत्यंत आनंदित होऊन श्रीरामांना म्हणाले - ॥३॥
|
किमर्थं त्वं वनं घोरं पंपाकाननमण्डितम् । आगतः सानुजौ दुर्गं नानाव्यालमृगायुतम् ॥ ४ ॥
|
’पंपा तटवर्ती काननाने सुशोभित हे वन भयंकर आणि दुर्गम आहे. यामधे नाना प्रकारचे हिंस्त्र जंतु निवास करतात. आपण आपल्या लहान भावाबरोबर येथे कशासाठी आला आहात’ ? ॥४॥
|
तस्य तद्वचनं श्रुत्वा लक्ष्मणो रामचोदितः । आचचक्षे महात्मानं रामं दशरथात्मजम् ॥ ५ ॥
|
हनुमानाचे हे वचन ऐकून श्रीरामांच्या आज्ञेने लक्ष्मणांनी दशरथनंदन महात्मा रामांचा या प्रकारे परिचय करून देण्यास आरंभ केला- ॥५॥
|
राजा दशरथो नाम द्युतिमान् दर्मवत्सलः । चातुर्वर्ण्यं स्वधर्मेण नित्यमेवाभ्यपालयत् ॥ ६ ॥
|
’विद्वन् ! या पृथ्वीवर दशरथ नावाने प्रसिद्ध जे धर्मानुरागी तेजस्वी राजे होते, ते सदाच आपल्या धर्मास अनुसरून चारी वर्णाच्या प्रजेचे पालन करीत होते. ॥६॥
|
न द्वेष्टा विद्यते तस्य न च स द्वेष्टि कञ्चन । स च सर्वेषु भूतेषु पितामह इवापरः ॥ ७ ॥
|
’या भूतलावर त्यांचा द्वेष करणारा कुणीही नव्हता आणि तेही कुणाचा द्वेष करीत नव्हते. ते समस्त प्राण्यांच्यावर दुसर्या ब्रह्मदेवांप्रमाणे स्नेह करीत होते. ॥७॥
|
अग्निष्टोमादिभिर्यज्ञैरिष्टवानाप्तदक्षिणैः । तस्यायं पूर्वजः पुत्रो रामो नाम जनैः श्रुतः ॥ ८ ॥
|
’त्यांनी पर्याप्त दक्षिणा देऊन अग्निष्टोम आदि यज्ञांचे अनुष्ठान केले होते. हे त्यांच महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. लोक यांना ’राम’ म्हणतात. ॥८॥
|
शरण्यः सर्वभूतानां पितुर्निर्देषपारगः । वीरो दशरथस्यायं पुत्राणां गुणवत्तमः ॥ ९ ॥
|
’हे सर्व प्राण्यांना शरण देणारे आणि पित्याच्या आज्ञेचे पालन करणारे आहेत. महाराज दशरथांच्या चारी पुत्रांत हे सर्वात अधिक गुणवान् आहेत. ॥९॥
|
राजलक्षणसंपन्नः संयुक्तो राजसंपदा । राज्याद्भ्रोष्टो वने वस्तुं मया सार्धमिहागतः ॥ १० ॥
|
’हे राजाच्या उत्तम लक्षणांनी संपन्न आहेत. जेव्हा यांना राज्यसंपत्तिशी संयुक्त केले जात होते त्या समयी काही असे कारण उपस्थित झाले की ज्यामुळे यांना राज्यापासून वञ्चित व्हावे लागले आणि वनात निवास करण्यासाठी हे माझ्यासह येथे आले. ॥१०॥
|
भार्यया च महातेजाः सीतया ऽनुगतो वशी । दिनक्षये महातेजाः प्रभयेव दिवाकरः ॥ ११ ॥
|
’महाभाग ! जसे दिवसाचा क्षय झाल्यावर सायंकाळी महातेजस्वी सूर्य आपल्या प्रभेसह अस्ताचलास जातो, त्याप्रमाणेच हे जितेन्द्रिय श्रीराम आपली पत्नी सीता हिच्यासह वनात आले होते. ॥११॥
|
अहमस्यावरो भ्राता गुणैर्दास्यमुपागतः । कृतज्ञस्य बहुज्ञस्य लक्ष्मणो नाम नामतः ॥ १२ ॥
|
’मी त्यांचा लहान भाऊ आहे, माझे नाव लक्ष्मण आहे. मी आपल्या कृतज्ञ आणि बहुज्ञ भावाच्या गुणांनी आकृष्ट होऊन त्यांचा दास झालो आहे. ॥१२॥
|
सुखार्हस्य महार्हस्य सर्वभूतहितात्मनः । ऐश्वर्येण च हीनस्य वनवासाश्रितस्य च ॥ १३ ॥
रक्षसा ऽपहृता भार्या रहिते कामरूपिणा । तञ्च न ज्ञायते रक्षः पत्नीं येनास्य वा हृता ॥ १४ ॥
|
’संपूर्ण भूतांच्या हितामध्ये मन लावणारे, सुख भोगण्यास योग्य, महापुरुषांच्याद्वारा पूजनीय, ऐश्वर्यरहित, तसेच वनवासात तत्पर माझ्या भावाच्या पत्नीला, इच्छेप्रमाणे रूप धारण करणार्या एका राक्षसाने शून्य आश्रमातून हरण करून नेले. ज्याने यांच्या पत्नीचे हरण केले आहे, तो राक्षस कोण आहे आणि कोठे राहातो ? इत्यादि गोष्टींचा ठीक ठीक पत्ता लागत नाही आहे. ॥१३-१४॥
|
दनुर्नाम दितेः पुत्रः शापाद्राक्षसतां गतः । आख्यातस्तेन सुग्रीवः समर्थो वानमर्षभः ॥ १५ ॥
स ज्ञास्यति महावीर्यस्तव भार्यापहारिणम् । एवमुक्त्वा दनुः स्वर्गं भ्राजमानो दिवं गतः ॥ १६ ॥
|
’दनु नामक एक दैत्य होता, जो शापाने राक्षसभावास प्राप्त झालेला होता. त्याने सुग्रीवाचे नाम सांगितले आणि म्हणाला - ’वानरराज सुग्रीव सामर्थ्यशाली आणि महान् पराक्रमी आहेत. ते आपल्या पत्नीचे अपहरण करणार्या राक्षसाचा पत्ता लावून देतील.’ असे म्हणून तेजाने प्रकाशित होऊन दनु स्वर्गलोकात पोहोचण्यासाठी आकाशांत उडून गेला. ॥१५-१६॥
|
एतत्ते सर्वमाख्यातं याथातथ्येन पृच्छतः । अहं चैव हि रामश्च सुग्रीवं शरणं गतौ ॥ १७ ॥
|
’आपल्या प्रश्नानुसार मी सर्व गोष्टी ठीक ठीक सांगितल्या आहेत. मी आणि राम दोघे ही सुग्रीवास शरण आलो आहोत. ॥१७॥
|
एष दत्त्वा च वित्तानि प्राप्य चानुत्तमं यशः । लोकनाथः पुरा भूत्वा सुग्रीवं नाथमिच्छति ॥ १८ ॥
|
’हे पूर्वी बरेचसे धन-वैभवाचे दान करून परम उत्तम यश प्राप्त करून चुकले आहेत. जे पूर्वकाळी संपूर्ण जगताचे नाथ (संरक्षक) होते, ते आज सुग्रीवास आपला रक्षक बनवू इच्छित आहेत. ॥१८॥
|
पिता यस्य पुरा ह्यासीच्छरण्यो धर्मवत्सलः । तस्य पुत्रः शरण्यश्च सुग्रीवं शरणं गतः ॥ १९ ॥
|
’सीता ज्यांची पुत्रवधु (सून) आहे, जे शरणागत पालक आणि धर्मवत्सल होते त्याच महाराज दशरथांचे पुत्र शरण्य (शरणदाते) राम आज सुग्रीवास शरण आले आहेत. ॥१९॥
|
सर्वलोकस्य धर्मात्मा शरण्यः शरणं पुरा । गुरुर्मे राघवः सो ऽयं सुग्रीवं शरणं गतः ॥ २० ॥
|
’जे माझे धर्मात्मा मोठे भाऊ राघव पूर्वी संपूर्ण जगतास शरण (आश्रय) देणारे होते तसेच शरणागतवत्सल होते, ते या समयी सुग्रीवास शरण आले आहेत. ॥२०॥
|
यस्य प्रसादे सततं प्रसीदेयुरिमाः प्रजाः । स रामो वानरेंदस्य प्रसादमभिकाङ्क्ष ते ॥ २१ ॥
|
’ज्यांच्या प्रसन्न होण्याने सदा ही सर्व प्रजा प्रसन्नतेने फुलून जात होती तेच श्रीराम आज वानर राजा सुग्रीवांची प्रसन्नता इच्छित आहेत. ॥२१॥
|
येन सर्वगुणोपेताः पृथिव्यां सर्वपार्थिवाः । मानिताः सततं राज्ञा सदा दशरथेन वै ॥ २२ ॥
तस्यायं पूर्वजः पुत्रस्त्रिषु लोकेषु विश्रुतः । सुग्रीवं वानरेंद्रं तु रामः शरणमागतः ॥ २३ ॥
|
’ज्या राजा दशरथांनी सदा आपल्याकडे आलेल्या भूमण्डलांतील सर्व सद्गुणसंपन्न समस्त राजांचा निरंतर सन्मान केला त्यांचेच हे त्रिभुवन विख्यात ज्येष्ठ पुत्र राम आज वानरराज सुग्रीव यांना शरण आले आहेत. ॥२२-२३॥
|
शोकाभिभूते रामे तु शोकार्तं शरणं गते । कर्तुमर्हति सुग्रीवः प्रसादं हरियूथपः ॥ २४ ॥
|
’राम शोकाने अभिभूत आणि आर्त होऊन शरण आले आहेत. यूथपति सहित सुग्रीवांनी यांच्यावर कृपा केली पाहिजे.’ ॥२४॥
|
एवं ब्रुवाणं सौमित्रिं करुणं साश्रुलोचनम् । हनुमान् प्रत्युवाचेदं वाक्यं वाक्यविशारदः ॥ २५ ॥
|
डोळ्यातून अश्रु ढाळीत करूणाजनक स्वरांत असे बोलंत असलेल्या सौमित्रास वाक्यविशारद हनुमानाने या प्रकारे सांगितले- ॥२५॥
|
ईदृशा बुद्धिसंपन्ना जितक्रोधा जितेंद्रियाः । द्रष्टव्या वानरेंद्रेण दिष्ट्या दर्शनमागताः ॥ २६ ॥
|
’राजकुमारांनो ! वानरराज सुग्रीवांना आपल्या सारख्या बुद्धिमान्, क्रोधविजयी आणि जितेन्द्रिय पुरुषांना भेटण्याची आवश्यकता होती. सौभाग्याची गोष्ट ही आहे की आपण स्वयं दर्शन दिले आहे. ॥२६॥
|
स हि राज्यात्परिभ्रष्टः कृतवैरश्च वालिना । हृतदारो वने त्यक्तो भ्रात्रा विनिकृतो भृशम् ॥ २७ ॥
|
’ते राज्यापासून भ्रष्ट आहेत. वालीबरोबर त्यांची शत्रुता झाली आहे. त्यांच्यास्त्रीचे ही वालीने अपहरण केले आहे आणि त्या दुष्ट भावाने त्यांना घरांतून घालवून दिले आहे; म्हणून ते अत्यंत भयभीत होऊन वनात निवास करीत आहेत. ॥२७॥
|
करिष्यति स साहाय्यं युवयोर्भास्करात्मजः । सुग्रीवः सह चास्माभिः सीतायाः परिमार्गणे ॥ २८ ॥
|
’सूर्यनंदन सुग्रीव सीतेचा शोध लावण्यास आमच्या बरोबर स्वतः राहून आपणा दोघांची पूर्ण सहायता करतील.’ ॥२८॥
|
इत्येवमुक्त्वा हनुमान् श्लक्ष्णं मधुरया गिरा । बभाषे सो ऽभिगच्छेम सुग्रीवमिति राघवम् ॥ २९ ॥
|
असे म्हणून हनुमंतानी राघवांस स्निग्ध मधुर वाणीत म्हटले- ’ठीक आता आपण सुग्रीवांजवळ जाऊं या.’ ॥२८॥
|
एवं ब्रुवाणं धर्मात्मा हनुमंतं स लक्ष्मणः । प्रतिपूज्य यथान्यायमिदं प्रोवाच राघवम् ॥ ३० ॥
|
त्या समयी धर्मात्मा लक्ष्मणांनी उपर्युक्त गोष्ट सांगणार्या हनुमानांचा यथोचित सन्मान केला आणि राघवास म्हटले- ॥३०॥
|
कपिः कथयते हृष्टो यथा ऽयं मारुतात्मजः । कृत्यवान् सो ऽपि संप्राप्तः कृतकृत्यो ऽसि राघव ॥ ३१ ॥
|
’राघवा ! हे वानरराज पवनपुत्र हनुमान अत्यंत हर्षयुक्त होऊन ज्या प्रकारे बोलत आहेत त्यावरून असे कळून येत आहे की सुग्रीवांचेही आपणाकडे काही काम आहे. अशा स्थितीत आपण आपले कार्य सिद्ध झाले आहे असेच समजावे.’ ॥३१॥
|
प्रसन्नमुखवर्णश्च व्यक्तं हृष्टश्च भाषते । नानृतं वक्ष्यते वीरो हनुमान् मारुतात्मजः ॥ ३२ ॥
|
’यांच्या मुखाची कांति स्पष्टपणे प्रसन्न दिसून येत आहे. आणि ते हर्षाने उत्फुल्ल होऊन बोलत आहेत. म्हणून मला विश्वास वाटत आहे की पवनपुत्र वीर हनुमान खोटे बोलणार नाहीत.’ ॥३२॥
|
ततः स तु महाप्राज्ञो हनुमान्मारुतात्मजः । जगामादाय तौ वीरौ हरिराजाय राघवौ ॥ ३३ ॥
|
त्यानंतर परम बुद्धिमान् पवनपुत्र हनुमान त्या दोन्ही रघुवंशी वीरांना बरोबर घेऊन सुग्रीवास भेटण्यासाठी निघाले. ॥३३॥
|
भिक्षुरूपं परित्यज्य वानरं रूपमास्थितः । पृष्ठमारोप्य तौ वीरौ जगाम कपिकुञ्जरः ॥ ३४ ॥
|
कपिवर हनुमानांनी भिक्षुरूपाचा त्याग करून वानररूप धारण केले. त्यांनी त्या दोन्ही वीरांना पाठीवर बसवले आणि तेथून निघाले. ॥३४॥
|
स तु विपुलयशाः कपिप्रवीरः पवनसुतः कृतकृत्यवत् प्रहृष्टः । गिरिवरमुरुविक्रमः प्रयातः स शुभमतिः सह रामलक्ष्मणाभ्याम् ॥ ३५ ॥
|
महान् यशस्वी तसेच शुभ विचार असणारे महापराक्रमी - ते कपिवीर पवनपुत्र कृतकृत्य झाल्यासारखे होऊन अत्यंत हर्षित झाले आणि रामलक्ष्मणांसह गिरिवर ऋष्यमूक पर्वतावर जाऊन पोहोंचले. ॥३५॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे चतुर्थः सर्गः ॥ ४ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा चौथा सर्ग पूरा झाला. ॥४॥
|