ऋष्यशृङ्गेण राज्ञो दशरथस्य पुत्रेष्टियज्ञस्यारम्भो देवानां प्रार्थनया ब्रह्मणा रावणवधोपायस्यानुसंधानं भगवता विष्णुना देवानामाश्वासनम् -
|
ऋष्यशृंगद्वारा राजा दशरथाच्या पुत्रेष्टि यज्ञाचा आरंभ, देवतांच्या प्रार्थनेमुळे ब्रह्मदेवांनी रावणाच्या वधाचा उपाय शोधून काढणे तथा भगवान् विष्णूंनी देवतांना आश्वासन देणे -
|
मेधावी तु ततो ध्यात्वा स किञ्चिदिदमुत्तरम् ।
लब्धसंज्ञस्ततस्तं तु वेदज्ञो नृपमबव्रीत् ॥ १ ॥
|
महात्मा ऋष्यशृंग मोठे मेधावी आणि वेदांचे ज्ञाते होते. त्यांनी थोडा वेळपर्यंत ध्यान लावून आपल्या भावी कर्तव्याचा विचार केला. नंतर ध्यानातून विरक्त होऊन ते राजाला म्हणाले - ॥ १ ॥
|
इष्टिं तेऽहं करिष्यामि पुत्रीयां पुत्रकारणात् ।
अथर्वशिरसि प्रोक्तैर्मन्त्रैः सिद्धां विधानतः ॥ २ ॥
|
"महाराज ! मी आपल्याला पुत्राची प्राप्ति करून देण्यासाठी अथर्ववेदाच्या मंत्रांनी पुत्रेष्टि नामक यज्ञ करीन. वेदोक्त विधिला अनुसरून अनुष्ठान केल्यावर हा यज्ञ अवश्य सफल होईल." ॥ २ ॥
|
ततः प्राक्रमदिष्टिं तां पुत्रीयां पुत्रकारणात् ।
जुहावाग्नौ च तेजस्वी मंत्रदृष्टेन कर्मणा ॥ ३ ॥
|
असे म्हणून त्या तेजस्वी ऋषिंनी पुत्रप्राप्तिच्या उद्देशाने पुत्रेष्टि नामक यज्ञ प्रारंभ केला आणि श्रौतविधिनुसार अग्निमध्ये आहुति दिली. ॥ ३ ॥
|
ततो देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः ।
भागप्रतिग्रहार्थं वै समवेता यथाविधि ॥ ४ ॥
|
तेव्हां देवता, सिद्ध, गन्धर्व आणि महर्षिगण विधिनुसार आपापला भाग ग्रहण करण्यासाठी त्या यज्ञात एकत्रित झाले. ॥ ४ ॥
|
ताः समेत्य यथान्यायं तस्मिन् सदसि देवताः ।
अब्रुवँल्लोककर्तारं ब्रह्माणं वचनं ततः ॥ ५ ॥
|
त्या यज्ञसभेत क्रमशः एकत्र येऊन (पण इतरांच्या दृष्टिला अदृष्य राहून) सर्वदेवता, लोककर्ता ब्रह्मदेव यांना म्हणाल्या - ॥ ५ ॥
|
भगवंस्त्वत्प्रसादेन रावणो नाम राक्षसः ।
सर्वान् नो बाधते वीर्याच्छासितुं तं न शक्नुमः ॥ ६ ॥
|
'भगवन् ! रावण नामक राक्षस आपला कृपाप्रसाद झाल्यामुळे आपल्या बळाने आम्हा सर्वांना फार कष्ट देत आहे. आपल्या पराक्रमाने त्याचे दमन करू शकू इतकी शक्ति आमच्या ठिकाणी नाही. ॥ ६ ॥
|
त्वया तस्मै वरो दत्तः प्रीतेन भगवंस्तदा ।
मानयन्तश्च तं नित्यं सर्वं तस्य क्षमामहे ॥ ७ ॥
|
'प्रभो ! आपण प्रसन्न होऊन त्याला वर दिले आहेत. तेव्हांपासून आम्ही सर्व त्या वराचा समादर करीत त्याचे सर्व अपराध सहन करीत आलो आहो. ॥ ७ ॥
|
उद्वेजयति लोकांस्त्रीनुच्छ्रितान् द्वेष्टि दुर्मतिः ।
शक्रं त्रिदशराजानं प्रधर्षयितुमिच्छति ॥ ८ ॥
|
त्याने तिन्ही लोकातील प्राण्यांना त्रस्त करून सोडले आहे. तो दुष्टात्मा ज्यांना जरा उच्च स्थितीत पाहतो त्यांचा तो द्वेष करू लागतो. देवराज इंद्रालाही परास्त करण्याची अभिलाषा तो बाळगत आहे. ॥ ८ ॥
|
ऋषीन् यक्षान् सगन्धर्वान् ब्राह्मणानसुरांस्तथा ।
अतिक्रामति दुर्धर्षो वरदानेन मोहितः ॥ ९ ॥
|
आपल्या वरदानाने मोहित होऊन तो इतका उद्दाम झाला आहे की, ऋषि, यक्ष, किन्नर, असुर आणि ब्राह्मण सर्वांना तो पीडा देत असून त्यांचा अपमान करीत हिंडत असतो. ॥ ९ ॥
|
नैनं सूर्यः प्रतपति पार्श्वे वाति न मारुतः ।
चलोर्मिमाली तं दृष्ट्वा समुद्रोऽपि न कम्पते ॥ १० ॥
|
सूर्य त्याला ताप पोहोचवू शकत नाही, वायु त्याच्या जवळून जोराने वाहू शकत नाही आणि ज्याच्या उत्तुंग लाटा सतत वरखाली होत असतात तो समुद्रही रावणास पाहून त्यांच्या भयाने स्तब्धसा होऊन जातो- त्याच्यात कंपन होत नाही. ॥ १० ॥
|
तन्महन्नो भयं तस्माद् राक्षसाद् घोरदर्शनात् ।
वधार्थं तस्य भगवन्नुपायं कर्त्तुमर्हसि ॥ ११ ॥
|
तो राक्षस दिसण्यातही महा भयंकर आहे. त्याच्याकडून आम्हाला महान भय प्राप्त होत आहे. म्हणून भगवन् ! त्याच्या वधासठी आपल्याला काही ना काही उपाय अवश्य केला पाहिजे." ॥ ११ ॥
|
एवमुक्तः सुरैः सर्वैश्चिन्तयित्वा ततोऽब्रवीत् ।
हम्तायं विदितस्तस्य वधोपायो दुरात्मनः ॥ १२ ॥
तेन गन्धर्वयक्षाणां देवतानां च रक्षसाम् ।
अवध्योऽस्मीति वागुक्ता तथेत्युक्तं च तन्मया ॥ १३ ॥
|
समस्त देवतांनी असे सांगितल्यावर ब्रह्मदेवांनी जरा विचार केला आणि ते म्हणाले - "देवतांनो ! घ्या, त्या दुरात्म्याच्या वधाचा उपाय माझ्या लक्षात आला आहे. त्याने वर मागताना असे सांगितले होते की 'मी गन्धर्व, यक्ष, देवता तथा राक्षसांच्या हाती मारला जाऊ नये.' मीही 'तथास्तु' म्हणून त्याची प्रार्थना स्विकारली होती. ॥ १२-१३ ॥
|
नाकीर्तयदवज्ञानात् तद् रक्षो मानुषांस्तदा ।
तस्मात् स मानुषाद् वध्यो मृत्युर्नान्योऽस्य विद्यते ॥ १४ ॥
|
मनुष्यांना तो तुच्छ समजत होता, म्हणून त्याच्याबद्दल अवहेलना असल्याकारणाने त्याच्याकडून अवध्य होण्याचे वरदान त्याने मागितले नाही. म्हणून आता मनुष्याच्या हातूनच त्याचा वध होईल. मनुष्याच्या शिवाय दुसरा कोणी त्याच्या मृत्युस कारण होऊ शकणार नाही. ॥ १४ ॥
|
एतच्छ्रुत्वा प्रियं वाक्यं ब्रह्मणा समुदाहृतम् ।
सर्वे महर्षयः सर्वे प्रहृष्टास्तेऽभवंस्तदा ॥ १५ ॥
|
ब्रह्मदेवांनी सांगितलेली ही प्रिय गोष्ट ऐकून त्या समयी सर्व देवता आणि महर्षि अत्यंत प्रसन्न झाले. ॥ १५ ॥
|
एतस्मिन्नन्तरे विष्णुरुपयातो महाद्युतिः ।
शङ्खचक्रगदापाणिः पीतवासा जगत्पतिः ॥ १६ ॥
वैनतेयं समारुह्य भास्करस्तोयदं यथा ।
तप्तहाटककेयूरो वन्द्यमानः सुरोत्तमैः ॥ १७ ॥
ब्रह्मणा च समागत्य तत्र तस्थौ समाहितः ।
|
त्याचवेळी महान् तेजस्वी जगत्पति भगवान् विष्णूही मेघांच्यावर स्थित असलेल्या सूर्याप्रमाणे गरुडावर बसून तेथे येऊन पोहोंचले. त्यांच्या शरीरावर पिताम्बर आणि हातात शंख, चक्र, एवं गदा आदि आयुधे शोभत होती. त्यांच्या दोन्ही भुजांवर तप्त सुवर्णाचे बनविलेले केयूर प्रकाशित होत होते. त्यांना पाहून सर्व देवतांनी त्यांची वन्दना केली आणि ते ब्रह्मदेवांना भेटून सावधपणे सभेत विराजमान झाले. ॥ १६-१७ १/२ ॥
|
तमब्रुवन् सुराः सर्वे समभिष्टूय संनताः ॥ १८ ॥
|
तेव्हां सर्व देवतांनी विनीत भावाने त्यांची स्तुति करीत म्हटले - "सर्वव्यापी परमेश्वर ! आम्ही तिन्ही लोकांच्या हिताची कामना ठेवून आपल्यावर एका महान कार्याचा भार देत आहोत. ॥ १८ ॥
|
त्वां नियोक्ष्यामहे विष्णो लोकानां हितकाम्यया ।
राज्ञो दशरथस्य त्वमयोध्याधिपतेर्विभोः ॥ १९ ॥
धर्मज्ञस्य वदान्यस्य महर्षिसमतेजसः ।
अस्य भार्यासु तिसृषु ह्रीश्रीकीर्त्युपमासु च ॥ २० ॥
विष्णो पुत्रत्वमागच्छ कृत्वाऽऽत्मानं चतुर्विधम् ।
तत्र त्वं मानुषो भूत्वा प्रवृद्धं लोककण्टकम् ॥ २१ ॥
अवध्यं दैवतैर्विष्णो समरे जहि रावणम् ।
|
'प्रभो ! अयोध्येचे राजे दशरथ धर्मज्ञ, उदार तसेच महर्षिंच्या समान तेजस्वी आहेत. त्यांच्या तीन राण्या आहेत. ज्या ह्रीं, श्री, कीर्ति या तीन देवींप्रमाणे आहेत. विष्णुदेव ! आपण आपली चार स्वरूपे धारण करून राजाच्या त्या तीन राण्यांच्या गर्भातून पुत्ररूपाने अवतार ग्रहण करावा. या प्रकारे मनुष्यरूपात प्रकट होऊन आपण संसारास प्रबल कंटक बनलेल्या रावणास, जो देवतांना अवध्य आहे, समरभूमित मारून टाकावे. ॥ १९-२१ १/२ ॥
|
स हि देवान् सगन्धर्वान् सिद्धांश्च ऋषिसत्तमान् ॥ २२ ॥
राक्षसो रावणो मूर्खो वीर्योद्रेकेण बाधते ।
|
तो मूर्ख राक्षस रावण आपल्या वाढत्या पराक्रमाने देवता, गन्धर्व, सिद्ध तसेच श्रेष्ठ महर्षि यांना फार कष्ट देत आहे. ॥ २२ १/२ ॥
|
ऋषयश्च ततस्तेन गन्धर्वाप्सरसस्तथा ॥ २३ ॥
क्रीडन्तो नन्दनवने रौद्रेण विनिपातिताः ।
|
त्या रौद्र निशाचराने ऋषिंना आणि नन्दनवनांत क्रीडा करण्यार्या गन्धर्वांना आणि अप्सरांनाही स्वर्गातून भूमिवर पाडले आहे. ॥ २३ १/२ ॥
|
वधार्थं वयमायातास्तस्य वै मुनिभिः सह ॥ २४ ॥
सिद्धगन्धर्वयक्षाश्च ततस्त्वां शरणं गताः ।
|
म्हणून मुनिंच्यासहित आम्ही सर्व सिद्ध, गन्धर्व, यक्ष आणि देवता त्याच्या वधासाठी आपल्याला शरण आलो आहोत. ॥ २४ १/२ ॥
|
त्वं गतिः परमा देव सर्वेषां नः परंतप ॥ २५ ॥
वधाय देवशत्रूणां नृणां लोके मनः कुरु ।
|
शत्रूंना संताप देणार्या देवा ! आपणच आम्हा लोकांची परम गति आहात. म्हणून या देवद्रोह्याचा वध करण्यासाठी आपण मनुष्यलोकात अवतार घेण्यासाठी निश्चय करावा." ॥ २५ १/२ ॥
|
एवं स्तुतस्तु देवेशो विष्णुस्त्रिदशपुङ्गवः ॥ २६ ॥
पितामहपुरोगांस्तान् सर्वलोकनमस्कृतः ।
अब्रवीत् त्रिदशान् सर्वान् समेतान् धर्मसंहितान् ॥ २७ ॥
|
त्यांनी या प्रकारे स्तुति केल्यावर सर्वलोक वन्दित देवप्रवर देवाधिदेव भगवान विष्णुंनी तेथे एकत्र झालेल्या समस्त ब्रह्मदेवादि धर्मपरायण देवतांना म्हटले - ॥ २६-२७ ॥
|
भयं त्यजत भद्रं वो हितार्थं युधि रावणम् ।
सपुत्रपौत्रं सामात्यं समन्त्रिज्ञातिबान्धवम् ॥ २८ ॥
हत्वा क्रूरं दुराधर्षं देवर्षीणां भयावहम् ।
दश वर्षसहस्राणि दशवर्षशतानि च ॥ २९ ॥
वत्स्यामि मानुषे लोके पालयन् पृथिवीमिमाम् ।
|
"देवगणांनो ! तुमचे कल्याण असो. तुम्ही भय सोडून द्या. मी तुमचे हित करण्यासाठी रावणास पुत्र, पौत्र, अमात्य, मंत्री आणि बन्धु बान्धवांसह युद्धात मारून टाकीन. देवता आणि ऋषि यांना भयभीत करणार्या त्या क्रूर आणि दुर्धर्ष राक्षसाचा नाश करून मी अकरा हजार वर्षेपर्यंत या पृथ्वीचे पालन करीत मनुष्यलोकात निवास करीन. ॥ २८-२९ १/२ ॥
|
एवं दत्त्वा वरं देवो देवानां विष्णुरात्मवान् ॥ ३० ॥
मानुष्ये चिंतयामास जन्मभूमिमथात्मनः ।
|
देवतांना असा वर देऊन मनस्वी भगवान् विष्णूंनी मनुष्यलोकातील आपल्या जन्मभूमि संबंधी विचार केला. ॥ ३० १/२ ॥
|
ततः पद्मपलाशाक्षः कृत्वाऽऽत्मानं चतुर्विधम् ॥ ३१ ॥
पितरं रोचयामास तदा दशरथं नृपम् ।
|
त्यानंतर कमलनयन श्रीहरिनी स्वतःला चार स्वरूपात प्रकट करून दशरथाला पिता बनविण्याचा निश्चय केला. ॥ ३१ १/२ ॥
|
ततो देवर्षिगन्धर्वाः सरुद्राः साप्सरोगणाः ।
स्तुतिभिर्दिव्यरूपाभिस्तुष्टुवुर्मधुसूदनम् ॥ ३२ ॥
|
तेव्हां देवता, ऋषि, गन्धर्व, रुद्र तथा अप्सरांनी दिव्य स्तुतिंद्वारा भगवान मधुसूदनाचे स्तवन केले. ॥ ३२ ॥
|
तमुद्धतं रावणमुग्रतेजसं
प्रवृद्धदर्पं त्रिदशेश्वरद्विषम् ।
विरावणं साधुतपस्विकण्टकं
तपस्विनामुद्धर तं भयावहम् ॥ ३३ ॥
|
ते म्हणू लागले - "हे प्रभो ! रावण फार उदण्ड आहे. त्याचे तेज अत्यंत उग्र असून त्याची घमेंड उत्तरोत्तर वाढत आहे. तो देवराज इंद्राचा सदा द्वेष करतो. तिन्ही लोकांना तो रडवितो. साधु आणि तपस्वी लोकांसाठी तो फार मोठा कण्टक झाला आहे. म्हणून तापसांना भयभीत करणार्या त्या भयानक राक्षसाचा आपण समूळ नाश करा. ॥ ३३ ॥
|
तमेव हत्वा सबलं सबान्धवं
विरावणं रावणमुग्रपौरुषम् ।
स्वर्लोकमागच्छ गतज्वरश्चिरं
सुरेन्द्रगुप्तं गतदोषकल्मषम् ॥ ३४ ॥
|
'उपेंद्र ! सर्व जगाला रडविणार्या त्या उग्र पराक्रमी रावणाला सेना आणि बंधु बांधवांसह नष्टकरून आपल्या स्वाभाविक निश्चिंततेसह आपल्याच द्वारा सुरक्षित चिरन्तन वैकुण्ठधामास जावे, ज्यास रागद्वेष आणिदोषांचे कलुष कधी स्पर्श करू शकत नाही. ॥ ३४ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे पञ्चदशः सर्गः ॥ १५ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा पंधरावा सर्ग समाप्त झाला. ॥ १५ ॥
|