श्रीरामस्य राजसभायां यमुनातीरवासिनां ऋषीणां शुभागमनं, श्रीरामेण तान् सत्कृत्य तेषामभीष्टं पूरयितुं प्रतिज्ञापनं, ऋषिभिस्तस्य प्रशंसनं च -
|
श्रीरामांच्या दरबारात च्यवन आदि ऋषिंचे शुभागमन, श्रीरामांच्या द्वारा त्यांचा सत्कार होऊन त्यांचे अभीष्ट कार्य पूर्ण करण्याची प्रतिज्ञा तसेच ऋषिंच्या द्वारा त्यांची प्रशंसा -
|
तयोः संवदतोरेवं रामलक्ष्मणयोस्तदा । वासन्तिकी निशा प्राप्ता न शीता न च घर्मदा ॥ १ ॥
|
श्रीराम आणि लक्ष्मण याप्रकारे परस्परात संवाद करीत प्रतिदिन प्रजापालनाच्या कार्यात मग्न राहात असत. एका समयी ज्यावेळी अधिक थंडी नव्हती किंवा अधिक उष्णताही नव्हती अशी वसंतऋतुतील रात्र आली. ॥१॥
|
ततः प्रभाते विमले कृतपौर्वाह्णिकक्रियः । अभिचक्राम काकुत्स्थो दर्शनं पौरकार्यवित् ॥ २ ॥
|
ती रात्र गेल्यावर जेव्हा निर्मल प्रभातकाल आला तेव्हा पुरवासींच्या कार्यास जाणणार्या काकुत्स्थ श्रीरामांनी पूर्वाह्नकालातील नित्यकर्मे - संध्या-वंदन आदिपासून निवृत्त होऊन बाहेर पडून ते प्रजाजनांच्या दृष्टिपथास आले. ॥२॥
|
ततः सुमन्त्रस्त्वागम्य राघवं वाक्यमब्रवीत् । एते प्रतिहता राजन् द्वारि तिष्ठन्ति तापसाः ॥ ३ ॥
भार्गवं च्यवनं चैव पुरस्कृत्य महर्षयः । दर्शनं ते महाराज चोश्चोदयन्ति कृतत्वराः ॥ ४ ॥
|
त्याच समयी सुमंत्रांनी येऊन राघवास म्हटले - राजन् ! हे तपस्वी महर्षि भृगुपुत्र च्यवन मुनिना पुढे करून द्वारावर उभे आहेत. द्वारपालांनी त्यांना आंत येण्यापासून रोखून धरले आहेत. महाराज ! त्यांना आपल्या दर्शनाची घाई झालेली आहे आणि ते आपल्या आगमनाची सूचना देण्यासाठी आम्हांला वारंवार प्रेरित करीत आहेत. ॥३-४॥
|
प्रीयमाणा नरव्याघ्र यमुनातीरवासिनः । तस्य तद् वचनं श्रुत्वा रामः प्रोवाच धर्मवित् ॥ ५ ॥ प्रवेश्यन्तां महाभागा भार्गवप्रमुखा द्विजाः ।
|
पुरुषसिंह ! हे सर्व महर्षि यमुनातटावर निवास करतात आणि आपल्यावर विशेष प्रेम ठेवतात. सुमंत्राचे हे वचन ऐकून धर्मज्ञ श्रीरामांनी म्हटले - सूत ! भार्गव च्यवन आदि सर्व महाभाग ब्रह्मर्षिंना आत बोलवले जावे. ॥५ १/२॥
|
राज्ञस्त्वाज्ञां पुरस्कृत्य द्वाःस्थो मूर्ध्नि कृताञ्जलिः ॥ ६ ॥
प्रवेशयामास तदा तापसान् सुदुरासदान् ।
|
राजाची ही आज्ञा शिरोधार्य करून द्वारपालांनी मस्तकावर हात जोडले आणि त्या अत्यंत दुर्जय तेजस्वी तापसांना तो राजभावनाच्या आत घेऊन आला. ॥६ १/२॥
|
शतं समधिकं तत्र दीप्यमानं स्वतेजसा ॥ ७ ॥
प्रविष्टं राजभवनं तापसानां महात्मनाम् । ते द्विजाः पूर्णकलशैः सर्वतीर्थाम्बुसत्कृतैः ॥ ८ ॥
गृहीत्वा फलमूलं च रामस्याभ्याहरन् बहु ।
|
त्या तपस्वी महाभागांची संख्या शंभराहून अधिक होती. ते सर्वच्या सर्व आपल्या तेजाने प्रकाशित होत होते. त्या सर्वांनी राजभवनात प्रवेश केला आणि समस्त तीर्थांच्या जलानी भरलेले कलश आणि बरीचशी फळेमुळे आणून श्रीरामचंद्रांना भेट दिली. ॥७-८ १/२॥
|
प्रतिगृह्य तु तत्सर्वं रामः प्रीतिपुरस्कृतः ॥ ९ ॥
तीर्थोदकानि सर्वाणि फलानि विविधानि च । उवाच च महाबाहुः सर्वानेव महामुनीन् ॥ १० ॥
|
महाबाहु श्रीरामांनी अत्यंत प्रसन्नतेने तो सारा उपहार - ती सर्व तीर्थजले आणि नाना प्रकारची फळे घेऊन त्या सर्व महामुनींना म्हटले - ॥९-१०॥
|
इमान्यासनमुख्यानि यथार्हमुपविश्यताम् । रामस्य भाषितं श्रुत्वा सर्व एव महर्षयः ॥ ११ ॥ बृसीषु रुचिराख्यासु निषेदुः काञ्चनीषु ते ।
|
महात्म्यांनो ! ही उत्तमोत्तम आसने प्रस्तुत आहेत. आपण यथायोग्य या आसनावर बसावे. श्रीरामांचे हे वचन ऐकून ते सर्व महर्षि रुचिर शोभेने संपन्न त्या सुवर्णमय आसनांवर बसले. ॥११ १/२॥
|
उपविष्टान् ऋषींस्तत्र दृष्ट्वा परपुरञ्जयः । प्रयतः प्राञ्जलिर्भूत्वा राघवो वाक्यमब्रवीत् ॥ १२ ॥
|
त्या महर्षिंना तेथे आसनावर विराजमान झालेले पाहून शत्रुनगरीवर विजय प्राप्त करणार्या राघवांनी हात जोडून संयतभावाने म्हटले - ॥१२॥
|
किमागमनकार्यं वः किं करोमि समाहितः । आज्ञाप्योऽहं महर्षीणां सर्वकामकरः सुखम् ॥ १३ ॥
|
महर्षिंनो ! कुठल्या कार्याने येथे आपले शुभागमन झाले आहे. मी एकाग्रचित्त होऊन आपली काय सेवा करू ? हा सेवक आपली आज्ञा मिळण्यास योग्य आहे. आदेश मिळाल्यावर मी अत्यंत सुखाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू इच्छितो. ॥१३॥
|
इदं राज्यं च सकलं जीवितं च हृदि स्थितम् । सर्वमेतत् द्विजार्थं मे सत्यमेतद् ब्रवीमि वः ॥ १४ ॥
|
हे सर्व राज्य, या हृदयकमलात विराजमान हा जीवात्मा तसेच हे माझे सारे वैभव ब्राह्मणांच्या सेवेसाठीच आहे. मी आपल्या समक्ष ही खरी गोष्टच सांगत आहे. ॥१४॥
|
तस्य तद् वचनं श्रुत्वा साधुकारो महानभूत् । ऋषीणां उग्रतपसां यमुनातीर वासिनाम् ॥ १५ ॥
|
श्रीरघुनाथांचे ते वचन ऐकून त्या यमुनातीर निवासी उग्र तपस्वी महर्षिंनी उच्चस्वरात त्यांना साधुवाद दिला. ॥१५॥
|
ऊचुश्चैव महात्मानो हर्षेण महता वृताः । उपपन्नं नरश्रेष्ठ तवैव भुवि नान्यतः ॥ १६ ॥
|
नंतर ते महात्मे मोठ्या हर्षाने बोलले - नरश्रेष्ठ ! या भूमण्डलात अशी गोष्ट (बोलणे) आपल्याच योग्य आहे. दुसर्या कुणाचा मुखाने याप्रकारची गोष्ट निघू शकत नाही. ॥१६॥
|
बहवः पार्थिवा राजन् अतिक्रान्ता महाबलाः । कार्यस्य गौरवं मत्वा प्रतिज्ञां नाभ्यरोचयन् ॥ १७ ॥
|
राजन् ! आम्ही बर्याचशा महाबली राजांच्या जवळ गेलो होतो परंतु त्यांनी कार्याच्या गौरवाला समजून ते ऐकल्यावरही करीन अशी प्रतिज्ञा करण्याची रुचि दाखविली नाही. ॥१७॥
|
त्वया पुनर्ब्राह्मणगौरवादियं कृता प्रतिज्ञा ह्यनवेक्ष्य कारणम् । ततश्च कर्ता ह्यसि नात्र संशयो महाभयात् त्रातुं ऋषींस्त्वमर्हसि ॥ १८ ॥
|
परंतु आपण आमच्या येण्याचे कारण न जाणताही केवळ ब्राह्मणांच्या प्रति आदराचा भाव असल्याने आमचे काम करण्याची प्रतिज्ञा केली आहे, म्हणून आपण अवश्य हे काम करू शकाल, यात संशय नाही. आपणच महान् भयापासून ऋषिंना वाचवू शकाल. ॥१८॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे षष्टितमः सर्गः ॥ ६० ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा साठावा सर्ग पूरा झाला. ॥६०॥
|