श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। षट्सप्ततितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामेण वैष्णवं धनुरारोप्यामोघेन शरेण परशुरामस्य तपःप्राप्तानां पुण्यलोकानां विनाशनं परशुरामस्य महेन्द्रपर्वतं प्रत्यागमनम् - श्रीरामांनी वैष्णव धनुष्य चढवून अमोघ बाणद्वारा परशुरामांच्या तपः प्राप्त पुण्यलोकाचा नाश करणे, तथा परशुरामांचे महेंद्र पर्वतावर परत जाणे -
श्रुत्वा तु जामदग्न्यस्य वाक्यं दाशरथिस्तदा ।
गौरवाद्यन्त्रितकथः पितू राममथाब्रवीत् ॥ १ ॥
दशरथनन्दन राम आपल्या पित्याच्या गौरवाकडे लक्ष देऊन संकोचवश तेथे काही बोलत नव्हते. परम्तु जमदग्निकुमार परशुरामांचे उपर्युक्त बोलणे ऐकून त्या समयी ते मौन राहू शकले नाहीत. त्यांनी परशुरामांना म्हटले - ॥ १ ॥
श्रुतवानसि यत् कर्म श्रुतवानस्मि भार्गव ।
अनुरुध्यामहे ब्रह्मन् पितुरानृण्यमास्थितः ॥ २ ॥
"भृगुनन्दन ! ब्रह्मन् ! आपल्या पित्याच्या ऋणांतून उऋण होण्याची - पितास मारणार्‍याचा वध करून वैराचा बदला घेण्याच्या भावनेने जे क्षत्रिय संहाररूपी कर्म केले आहे, ते मी ऐकले आहे आणि आम्ही आपल्या त्या कर्माचे अनुमोदनही करत आहोत. (कारण वीर पुरुष वैराचा प्रतिशोध घेतच असतात.) ॥ २ ॥
वीर्यहीनमिवाशक्तं क्षत्रधर्मेण भार्गव ।
अवजानासि मे तेजः पश्य मेऽद्य पराक्रमम् ॥ ३ ॥
"भार्गव ! मी क्षत्रियधर्माने युक्त आहे, म्हणून आपल्या ब्राह्मण देवतेसमोर विनीत होऊन काही बोलत नव्हतो. तरीही आपण मला पराक्रमहीन आणि असमर्थ मानून माझा तिरस्कार करत आहात. ठीक आहे, आता माझे तेज आणि पराक्रम पहावा." ॥ ३ ॥
इत्युक्त्वा राघवः क्रुद्धो भार्गवस्य वरायुधम् ।
शरं च प्रतिजग्राह हस्ताल्लघुपराक्रमः ॥ ४ ॥
असे म्हणून शीघ्र पराक्रम करणार्‍या राघवाने कुपित होऊन परशुरामांच्या हातातून ते उत्तम धनुष्य आणि बाण काढून घेतले (त्याचबरोबर त्यांच्यापासून आपली वैष्णवी शक्तिही परत घेतली.) ॥ ४ ॥
आरोप्य स धनू रामः शरं सज्यं चकार ह ।
जामदग्न्यं ततो रामं रामः क्रुद्धोऽब्रवीदिदम् ॥ ५ ॥
त्या धनुष्याला चढवून रामांनी त्याच्या प्रत्यञ्चेवर बाण ठेवला, नंतर कुपित होऊन त्यांनी जमदग्निकुमार परशुरामांना असे म्हटले - ॥ ५ ॥
ब्राह्मणोऽसीति पूज्यो मे विश्वामित्रकृतेन च ।
तस्माच्छक्तो न ते राम मोक्तुं प्राणहरं शरम् ॥ ६ ॥
'भृगुनन्दन राम ! आपण ब्राह्मण असल्यामुळे त्या नात्याने मला पूज्य आहात आणि विश्वामित्रांशीही आपला संबंध आहे - या सर्व कारणांमुळे मी हा प्राण संहारक बाण आपल्या शरीरावर सोडू शकत नाही. ॥ ६ ॥
इमां वा त्वद्‌गतिं राम तपोबलसमर्जितान् ।
लोकानप्रतिमान् वा ते हनिष्यामीति मे मतिः ॥ ७ ॥

न ह्ययं वैष्णवो दिव्यः शरः परपुरञ्जयः ।
मोघः पतति वीर्येण बलदर्पविनाशनः ॥ ८ ॥
"राम ! माझा विचार आहे की आपल्याला जी सर्वत्र क्षणार्धात कुठेही संचार करण्याची शक्ति प्राप्त झालेली आहे तिला अथवा आपण आपल्या तपोबलाने ज्या अनुपम पुण्यलोकांची प्राप्ति केली आहे त्यांना नष्ट करून टाकीन. कारण आपल्या पराक्रमाने विपक्षींच्या बळाच्या घमेंडीला चूर करून टाकणारा हा दिव्य वैष्णव बाण जो शत्रूंच्या नगरीवर विजय प्राप्त करून देणारा आहे, तो कधी निष्फल जात नाही." ॥ ७-८ ॥
वरायुधधरं रामं द्रष्टुं सर्षिगणाः सुराः ।
पितामहं पुरस्कृत्य समेतास्तत्र सर्वशः ॥ ९ ॥
तेव्हां त्या उत्तम धनुष्य आणि बाणाला धारण करून उभे असणार्‍या श्रीरामांना पाहण्यासाठी संपूर्ण देवता आणि ऋषि, ब्रह्मदेवांना अग्रभागी ठेवून तेथे एकत्र झाले होते. ॥ ९ ॥
गन्धर्वाप्सरसश्चैव सिद्धचारणकिन्नराः ।
यक्षराक्षसनागाश्च तद् द्रष्टुं महदद्‍भुतम् ॥ १० ॥
गंधर्व, अप्सरा, सिद्ध, चारण, किन्नर, यक्ष, राक्षस आणि नागही ते अत्यंत अद्‌भुत दृष्य पाहण्यासाठी तेथे येऊन पोहोंचले. ॥ १० ॥
जडीकृते तदा लोके रामे वरधनुर्धरे ।
निर्वीर्यो जामदग्न्योऽसौ रामो राममुदैक्षत ॥ ११ ॥
जेव्हां रामांनी ते श्रेष्ठ धनुष्य हातात घेतले, त्या समयी सर्व लोक आश्चर्याने जडवत् होऊन गेले. परशुरामांचे वैष्णव तेज त्यांच्यातून निघून श्रीरामांच्या ठिकाणी मिळून गेले म्हणून वीर्यहीन झालेल्या जमदग्निकुमार रामांनी दशरथनन्दन श्रीरामांकडे पाहिले. ॥ ११ ॥
तेजोऽभिर्गतवीर्यत्वाज्जामदग्न्यो जडीकृतः ।
रामं कमलपत्राक्षं मन्दं मन्दमुवाच ह ॥ १२ ॥
तेज निघून गेल्याने वीर्यहीन झाल्यामुळे जडवत् बनलेल्या जमदग्निकुमार परशुरामांनी कमलनयन रामांना हळू हळू म्हटले - ॥ १२ ॥
काश्यपाय मया दत्ता यदा पूर्वं वसुंधरा ।
विषये मे न वस्तव्यमिति मां काश्यपोऽब्रवीत् ॥ १३ ॥
'रघुनन्दना ! पूर्वकाली मी कश्यपांना जेव्हां ही पृथ्वी दान केली होती तेव्हां त्यांनी मला सांगितले होते की 'तुम्ही माझ्या राज्यात राहता कामा नये.' ॥ १३ ॥
सोऽहं गुरुवचः कुर्वन् पृथिव्यां न वसे निशाम् ।
तदाप्रभृति काकुत्स्थ कृता मे काश्यपस्य ह ॥ १४ ॥
'ककुत्स्थ ! तेव्हांपासून आपल्या गुरु कश्यपांच्या या आज्ञेचे पालन करीत मी कधीही रात्री पृथ्वीवर निवास करीत नाही. कारण ही गोष्ट सर्व विदीत आहे की मी कश्यपांच्या समोर रात्री पृथ्वीवर न राहण्याची प्रतिज्ञा केली आहे. ॥ १४ ॥
तामिमां मद्‌गतिं वीर हन्तुं नार्हसि राघव ।
मनोजवं गमिष्यामि महेन्द्रं पर्वतोत्तमम् ॥ १५ ॥
म्हणून वीर राघवा ! आपण माझ्या गमन शक्तिला नष्ट करू नये. मी मनाच्या वेगाने आत्ता महेंद्र नामक श्रेष्ठ पर्वतावर निघून जाईन. ॥ १५ ॥
लोकास्त्वप्रतिमा राम निर्जितास्तपसा मया ।
जहि ताञ्छरमुख्येन मा भूत् कालस्य पर्ययः ॥ १६ ॥
'परंतु श्रीरामा ! मी आपल्या तपस्येने ज्या अनुपम लोकांवर विजय मिळविला आहे, त्यांना आपण या श्रेष्ठ बाणाने नष्ट करावे. आता यात विलंब होता कामा नये. ॥ १६ ॥
अक्षय्यं मधुहन्तारं जानामि त्वां सुरोत्तमम् ।
धनुषोऽस्य परामर्शात् स्वस्ति तेऽस्तु परंतप ॥ १७ ॥
'हे परंतप आपण ज्याप्रकारे या धनुष्याला चढविले आहे, त्यावरून मला निश्चितरूपाने ज्ञात झाले आहे की आपण मधुदैत्याला मारणारे अविनाशी देवेश्वर विष्णु आहात. आपले कल्याण होवो । ॥ १७ ॥
एते सुरगणाः सर्वे निरीक्षन्ते समागताः ।
त्वामप्रतिमकर्माणमप्रतिद्वंद्वमाहवे ॥ १८ ॥
या सर्व देवता एकत्र होऊन आपल्याकडे पहात राहिल्या आहेत. आपले कर्म अनुपम आहे. युद्धात् आपला सामना करणारा दुसरा कुणीही नाही. ॥ १८ ॥
न चेयं मम काकुत्स्थ व्रीडा भवितुमर्हति ।
त्वया त्रैलोक्यनाथेन यदहं विमुखीकृतः ॥ १९ ॥
ककुत्स्थ ! आपल्या समोर माझी जी असमर्थता प्रकट झाली - ही माझ्यासाठी लज्जास्पद होऊ शकत नाही. कारण आपण त्रैलोक्यनाथ श्रीहरींनी मला पराजित केले आहे. ॥ १९ ॥
शरमप्रतिमं राम मोक्तुमर्हसि सुव्रत ।
शरमोक्षे गमिष्यामि महेन्द्रं पर्वतोत्तमम् ॥ २० ॥
"सुव्रत रामा ! आता आपण आपला अनुपम बाण सोडावा, तो सुटल्यावरच मी श्रेष्ठ महेंद्र पर्वतावर जाईन." ॥ २० ॥
तथा ब्रुवति रामे तु जामदग्न्ये प्रतापवान् ।
रामो दाशरथिः श्रीमांश्चिक्षेप शरमुत्तमम् ॥ २१ ॥
जमदग्निनन्दन परशुरामांनी असे म्हटल्यावर प्रतापी श्रीमान् दाशरथि रामांनी तो उत्तम बाण सोडून दिला. ॥ २१ ॥
स हतान् दृश्य रामेण स्वाँलोकांस्तपसार्जितान् ।
जामदग्न्यो जगामाशु महेन्द्रं पर्वतोत्तमम् ॥ २२ ॥
आपल्या तपस्येद्वारा उपार्जित केलेल्या पुण्यलोकांना रामांनी सोडलेल्या बाणाने नष्ट झालेले पाहून परशुराम शीघ्रच उत्तम महेंद्र पर्वतावर जाण्यास निघाले. ॥ २२ ॥
ततो वितिमिराः सर्वा दिशश्चोपदिशस्तथा ।
सुराः सर्षिगणा रामं प्रशशंसुरुदायुधम् ॥ २३ ॥
ते जाताच समस्त दिशा आणि उपदिशांमधील अंधकार दूर झाला. त्यासमयी समस्त ऋषिंसहित देवता उत्तम आयुधधारी श्रीरामाची उत्तम रीतीने प्रशंसा करू लागल्या. ॥ २३ ॥
रामं दाशरथिं रामो जामदग्न्यः प्रपूजितः ।
ततः प्रदक्षिणी कृत्य जगामात्मगतिं प्रभुः ॥ २४ ॥
त्यानंतर दाशरथि रामांनी जमदग्निकुमार परशुरामांचे पूजन केले. त्यांच्याकडून पूजित होऊन प्रभावशाली परशुराम दाशरथि रामांची परिक्रमा करून आपल्या स्थानास निघून गेले. ॥ २४ ॥
[अर्थदृष्ट्या २२,२३,२४ या श्लोकांचा क्रम जरा विसंगत वाटतो. (परशुराम गमनानंतर श्रीरामाने त्यांचे पूजन करणे, प्रदक्षिणा इत्यादि) पण मूळ संहितेत हस्तक्षेप करणे योग्य नसल्यामुळे ते तसेच ठेवले आहेत.]
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे षट्सप्ततितमः सर्गः ॥ ७६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा शाहत्तरावा सर्ग समाप्त झाला. ॥ ७६ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP