॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय एकोणतिसावा ॥
नरांतकाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

कुंभकर्णाच्या वधाने रावणाचा शोक :

श्रीरामें मारिला कुंभकर्ण । ऐकोनियां पैं रावण ।
स्वयें करी शंखस्फुरण । दुःखें प्राण निघो पाहे ॥ १ ॥


कुंभकर्णं हतं श्रुत्वा राघवेण महात्मना ।
राक्षसा राक्षसेंद्राय रावणाय न्यवेदयन् ॥१॥
स श्रुत्वा निहतं संख्ये कुंभकर्णं महाबलम् ।
रावणः शोकसंतप्तो मुमोह च पपात च ॥२॥
राज्येन नास्ति मे कृत्यं किं करिष्यामि सीतया ।
कुंभकर्णविहीनस्य जीविते नास्ति मे स्पृहा ॥३॥
तदिदं मामनुप्राप्तं बिभीषणवचः शुभम् ।
यदज्ञानान्मया तस्यन गृहीतं महात्मनः ॥४॥


येवोनि घायाळ रक्षोगण । सांगती कुंभकर्णाचें मरण ।
सुग्रीवें छेदिले नाककान । रामें करचरण छेदिले ॥ २ ॥
ऐसा विटंबोनियां जाण । रणीं मारिला कुंभकर्ण ।
अदट श्रीराम आंगवण । न लागतां क्षण निर्दळिला ॥ ३ ॥
कुंभकर्णाची जे वरदावस्था । श्रीरामें तेही केली वृथा ।
रणीं छेदून पाडिला माथा । क्षणार्धता बाणें अर्धचंद्रे ॥ ४ ॥
विटोंबोनि मारिला कुंभकर्ण । ऐसें ऐकोनि रावण ।
बंधुस्नेहें तळमळोन । पडे आपण मूर्च्छित ॥ ५ ॥
सवेंचि होवोनि सावधान । दीर्घस्वरें करी रुदन ।
कुंभकर्ण निमाल्या जाण । मज कोण चाड राज्याची ॥ ६ ॥
मज चाड नाहीं राज्यासीं । मज चाड नाहीं सीतेंसी ।
चाड नाहीं जीवितासीं । अति आक्रोशीं स्फुंदत ॥ ७ ॥
देवदैत्यदानवांसी रण । करितां नाटोपें कुंभकर्ण ।
त्यासी मानवी श्रीरामबाण । लागतां प्राण सांडिला ॥ ८ ॥
बिभीषण बोलिला वचन । तें तें वाक्य अति प्रमाण ।
म्यां तै केला गर्वाभिमान । तें हों निदानीं पावलों ॥ ९ ॥
रणीं निघोनि कुंभकर्ण । शत्रु निर्दळील संपूर्ण ।
तोचि रणीं पडला आपण । आतां मी प्राण राखेंना ॥ १० ॥
बंधुस्नेहें रावण । अति दुःखें दुःखीं निमग्न ।
अतिशयें आक्रंदोन । मूर्च्छापन्न तो पडिला ॥ ११ ॥
पिता पडतांचि मूर्च्छित । अतिकायादि पुत्र समस्त ।
महोदर महापार्श्वयुक्त । आक्रंदत स्वयें आले ॥ १२ ॥


पितृव्यं निहतं दृष्ट्वा देवांतकनरांतकौ ।
त्रिशिराश्चातिकायश्च रुरुदुः शोकपीडिताः ॥५॥
भ्रातरं निहतं श्रुत्वा रामेणाक्लिष्टकर्मणा ।
महोदरमहपार्श्चौ शोकाक्रांतौ बभूवतुः ॥६॥

रावणाचे त्रिशिराकडून सांत्वन :

रावण लोळतां भूमीसीं । पुत्र आले तयापासीं ।
रडत स्फुंदत आक्रोशी । पितृदुःखेसीं अति दुःखी ॥ १३ ॥
देवांतक नरांतक । त्रिशिरा अतिशय देख ।
चौघे पुत्र अति नेटक । आले दशमुख ठाकोनी ॥ १४ ॥
दीर्घ स्वरें रडे रावण । ऐकोनियां तयाचे रुदन।
महोदर आला आपण । सवेंचि जाण महापार्श्व ॥ १५ ॥
रणीं पडतां कुंभकर्ण । महोदर महापार्श्व जाण ।
तेही बंधु दोघे जण । आले धांवोन अतिदुःखी ॥ १६ ॥
ऐकोनि रावणविलपन । त्रिशिरा पुत्र आला आपण ।
सिंहासनी राजरुदन । धुरेचें लक्षण हें नव्हें ॥ १७ ॥


रावणं शोकसंतप्तं त्रिशिरा वाक्यमब्रवीत् ।
न तु सत्पुरुषा एवं विलपंति यथा भवान् ॥७॥
ननु त्रिभुवनस्यापि पर्याप्तस्त्वं विनिग्रहे ।
स कथं प्राकृत इव शोचस्यात्मानमीदृशम् ॥८॥
स सर्वायुधसंपन्नो राघवं हन्तुमर्हसि ।
कामं तिष्ठ महाराज निर्गमिष्याम्यहं रणे ॥९॥
उद्धरिष्यामि ते शत्रुं गरुडः पन्नगं यथा ।
तथाऽद्य शयिता रामो मया युद्धे निपातितः ॥१०॥

त्रिशिराचा रावणाला उपदेश :

शोक संतप्त रावण । हें देखोनियां संपूर्ण ।
त्रिशिरा बोले आपण । राजलक्षण धुरेचें ॥ १८ ॥
त्रैलोक्यराजा तूं रावण । बंदी घातले सुरगण ।
तो तूं करिसी रांडरुदन । राजलक्षण हें नव्हें ॥ १९ ॥
दुधड तुटल्या महावीर । ग्लानि न करिती अणुमात्र ।
रडतां देखोनि दशशिर । लोक समग्र निंदिती ॥ २० ॥
रडतां नुरे शौर्यशक्ति । रडतां नुरे धैर्यवृत्ति ।
रडतं नुरे यशकीर्ति । अपयशप्राप्ति रडतांचि ॥ २१ ॥
रुदनें नेली आंगवण । रुदने नेलें राजमहिमान ।
रुदनें वाढिवे नागवण । तें तू रावण स्वयें करिसी ॥ २२ ॥
रणीं निमाल्या कुंभकर्ण । काय गेली आमची आंगवण ।
मी एकला करोनि रण । रणीं रघुनंदन मारीन ॥ २३ ॥
मारीन राम लक्ष्मण । विध्वंसीन वानरगण ।
धरिले रावणाचें चरण । आज्ञापन मज देई ॥ २४ ॥


श्रुत्वा त्रिशिरसो वाक्यं रावणो राक्षसधिपः ।
पुनर्जातमिवात्मानं मेने तस्य सुभाषितम् ॥११॥
ततः श्रुत्वा तु तद्वाक्यं देवांतकनरांतकौ ।
अतिकायश्च तेजस्वी बभूवुर्यद्धकांक्षिणः ॥१२॥
ततो हर्षसमाविष्टा जगर्जुनैर्ऋतर्षभाः ।
रावणस्य सुता वीराः शक्रतुल्यपराक्रमाः ॥१३॥
ततस्तांस्तु परिष्वज्य पूजायित्वा विभूषणैः ।
आशिर्भिस्तु प्रशस्ताभिः प्रेषयामास संयुगे ॥१४॥
महोदरमहापार्श्वौ भ्रातरौ चापि रावणः ।
रक्षणार्थं कुमाराणां प्रेषयामास संयुगे ॥१५॥

रावणांचे चारही पुत्र युद्धासाठी सरसावले :

एकला मी करोनि रण । रणीं मारीन राम लक्ष्मण ।
ऐकोनि त्रिशिराचे वचन । दशानन हरिखला ॥ २५ ॥
जेंवी अचेतन पडे प्रेत । त्यासी मागुती ये जीवित ।
त्रिशिरावचनें लंकानाथ । पावला मानीत पुनर्जन्म ॥ २६ ॥
त्रिशिराचे वचनें देख । संतोषला दशमुख ।
तेणें देवांतक नरांतक । युद्धासी हरिखे अतिकाय ॥ २७ ॥
रावणाचें चौघे सुत । शक्रसमान बळवंत ।
युद्धार्थी अति उद्यत । तेणें लंकानाथ हरिखला ॥ २८ ॥
मुकुट कुंडलें वीर कंकणें । चौघां देवोनि भूषणें ।
चौघे अलिंगोनि रावणें । पुत्र धाडिले संग्रामा ॥ २९ ॥
राखावया चौघां पुत्रांसी । महोदरमहापार्श्वांसी ।
रावणें धाडिलें त्यांपासीं । संग्रामासीं साह्यार्थ ॥ ३० ॥
पदाति रथ वाजी कुंजर । अदट दाटुगा सैन्यसंभार ।
युद्धा निघतां राजकुमर । केला दुर्धर गडगर्ज ॥ ३१ ॥

रावणाच्या पुत्रांचे रक्षणार्थ महोदर व महापार्श्व हे वीर निघाले :

शस्त्रास्त्रीं सन्नद्ध बद्ध । चौघां पुत्रां युद्धदुर्मद ।
महोदर महापार्श्व बंधु । वीर प्रसिद्ध निघाले ॥ ३२ ॥
ऐसे वीर सहाही जण । संग्रामी अति प्रवीण ।
मारावया राम लक्ष्मण । धाडीं रावण संग्रामी ॥ ३३ ॥
युद्धा निघतां सहाही जण । रथाश्व गजवाहन ।
कोण कोणासीं कोण कोण । सावधान अवधारा ॥ ३४ ॥
ऐरावतकूळींचा गज गंभीर । त्यावरी बैसोनि महोदर ।
युद्धा निघाला सत्वर । जेंवी भास्कर मेघावरी ॥ ३५ ॥
त्रिशिरा निन्हीं मुकुट शिरीं । बैसोनियां रथावरी ।
इंद्रचापासमान चाप करीं । निघे बाहेरी संग्रामा ॥ ३६ ॥
अतिकाय महारथी वीर । रथ मरकताचा आखचक्र ।
त्यावरी रत्‍नाढ्य कूबर ॥ वारु विचित्र जुंपिले ॥ ३७ ॥
ते रथीं बैसोनि पाहें । संग्रामा आला अतिकाय उत्साहें ।
त्याचा यावा कोण साहे । दुर्धर होय सुरासुरां ॥ ३८ ॥
उच्चैःश्रव्यासम सुंदरु । बळें बळवंत श्वेत वारु ।
त्यावरी नरांतक वीरु । युद्धी दुर्धरु शोभत ॥ ३९ ॥
विद्युत्प्राय खड्ग हातीं । दुर्धर त्याची संग्रामशक्ती ।
त्यासीं विचरतां युद्धक्षितीं । स्वर्गी कांपती सुरसिद्ध ॥ ४० ॥
जो कां अंतका अंतक । महावीर देवांतक ।
रथीं बैसोनि एकाएक । आला निःशंक संग्रामा ॥ ४१ ॥
मथावया क्षीरसागरीं । जैसा विष्णुहातीं मंदरगिरी ।
तैसा परिघ घेवोनि करीं । आला बाहेरी देवांतक ॥ ४२ ॥
महापार्श्व रथावरी । दुर्धर गदा घेवोनि करीं ।
करावया महामारी । आला झडकरी संग्रामा ॥ ४३ ॥
चौघे रथी एककुंजरी । एक तो शोभे अश्वावरी ।
करावया वीरमहामारी । आले झडकरी संग्रामा ॥ ४४ ॥


प्रगृहीता बभौ तेषां छत्राणामावलिः शुभा ।
शरदभ्रपतीकाश हंसानामावलिर्यथा ॥१६॥
मरणं चापि निश्चित्य शत्रूणां च पराजयम् ।
इति कृत्वा मतिं वीरा निर्जग्मुः संयुगार्थिनः ॥१७॥
जगर्जुश्चापि ते नेदुश्चिक्षिपुश्चापि सायकान् ।
क्ष्वेडितास्फोटितानां वै संचचालेव मेदिनी ॥१८॥
ततो निष्कम्य मुदिता राक्षसेंद्रा महाबलाः ।
ददृशुर्वानरानीकं स्मुद्यतशिलानगम् ॥१९॥


जेंवी कां हंसावळी अंबरी । तेंवी श्वेतछत्रांचिया हारी ।
शोभती राजपुत्रांवरी । युग्मचामरीं संवीज्य ॥ ४५ ॥
आजि मरणें कां मारणें । ऐसा श्रीरामीं संग्राम करणें ।
दृढ निश्चय करितां मनें । युद्ध्कारणें ते आले ॥ ४६ ॥
अश्व रथ महाकुंजर । अदट पायांचे मोगर ।
चतुरंग सैन्यसंभार । आले सत्वर संग्रामा ॥ ४७ ॥
ध्वजा पताका अति विचित्र । किंकिणीज्वाळमाळा मनोहर ।
युद्धा निघतां राजकुमार । रथकुंजर शृंगारिले ॥ ४८ ॥
छत्रें शोभती शिरीं । मुक्तफळांच्या झालरी ।
निशाणें त्राहाटिल्या भेरी । रणमोहरी गर्जत ॥ ४९ ॥
अवघे मिळोनियां वीर । सिंहनाद केला थोर ।
नादें उतटत अंबर । धरा भूधर सकंप ॥ ५० ॥
देखोनि छत्रपतिभार । रणीं नाचती वानर ।
कौतुक पाहे श्रीरामचंद्र । निशाचर मारितां ॥ ५१ ॥
शिळा शिखरें गिरीवर । हरिखें झेलिती वानर ।
एक परजिती तरुवर । राजकुमर मारावया ॥ ५२ ॥
देखोनि वानरांचें बळ । खवळले राक्षसदळ ।
घाय हाणिती प्रबळ । युद्ध तुंबळ मांडले ॥ ५३ ॥
गदा मुद्‌गर पट्टिश । शक्ती शूळ परिघ फरश ।
घाय हाणित राक्षस । आला आवेश वानरां ॥ ५४ ॥
करावया रणकंदन । सरसावले अवघे जण ।
वानरीं केलें विंदान । सावधान अवधारा ॥ ५५ ॥


समुद्यतमहाशैलाः मुदा नेदुः पुनः पुनः ।
अमृष्यमाणा रक्षांसि प्रतिनर्दत वानराः ॥२०॥
केचिदाकशमाविश्य केचिदुर्व्यां प्लवंगमाः ।
ते पादपशिलाशैलेश्चक्रुर्वृष्टिमुत्तमाम् ॥२१॥
बाणौधैर्वार्यमाणाश्च हरयो भीमविक्रमाः ।
केचिद्रथगतान्वीरान्गजवाजिगतानापि ॥२२॥
निर्जघ्नुः सहसोत्प्लुत्य यातुधानान्प्लवंगमाः ।
शैलशृंगान्वितांगास्ने मुष्टिनिष्कान्तलोचनाः ॥२३॥
चेलुः पेतुश्च नेदुश्च तत्र राक्षसपुंगवाः॥२४॥

वानर-राक्षस सैन्याचे घनघोर युद्ध :

वानर उदित युद्धासीं । सपर्वत उडोनि आकाशीं ।
पुनः पुनः रामनामेंसीं । अति आवेशीं गर्जत ॥ ५६ ॥
वानरवीर नमःस्थळी । राक्षसभार ते भूतळीं ।
वर्षती पर्वतशिळीं । होत रांगोळी वीरांची ॥ ५७ ॥
बाणीं निवारितां पर्वत । वानरवीर अत्यद्‍भुत ।
भूतळा येवोनि समस्त । करिती घात राक्षसां ॥ ५८ ॥
राक्षसांचे शस्त्रसंपात । वानर तळपोनि करिती व्यर्थ ।
शिळाद्रुमपर्वतहस्त । रणीं विचरत रणमारें ॥ ५९ ॥
एक वानर आकाशीं । वर्षती शिळपर्वतेंसीं ।
सर्वांग छेदोनि राक्षसांसी । कटिभंगेंसीं खुरडत ॥ ६० ॥
यावरी वानर आकाशीं । कंदन करिती राक्षसांसी ।
एक ते राहून पृथ्वीसीं । निशाचरांसीं निर्दळिती ॥ ६१ ॥
वानरीं साधोनियां रण । मुष्टिघातें पाडिती नयन।
एकां राक्षसां दंत भग्न । एकां वमन रुधिरांचें ॥ ६२ ॥
एक राक्षस पडिले रणीं । एक आरडती आक्रंदोनी ।
एक मागती पाणी पाणी । रणांगणीं पळताती ॥ ६३ ॥
एक मर्दिती रथस्थ । एक मर्दिती गजस्थ ।
एक मर्दिती अश्वगत । रणकंदनार्थ राक्षसां ॥ ६४ ॥


वानरं वानरेणैव जघ्नुर्घोरा हि राक्षसाः ।
राक्षसं राक्षसेनैव पिपिषुर्वानरा भुवि ॥२५॥
आक्षिप्य वलिनो जग्मू राक्षसा वानरास्तथा ।
मुहूर्तेनावृता भूमिरभवच्छोणितप्लुता ॥२६॥
भग्नचर्मतनुत्राणा राक्षसा वानरैर्हताः ।
सुस्राव रुधिरं तेभ्यः सरितः पर्वतादिव ॥२७॥
रथेन रथिनं चापि राक्षसं राक्षसेन च ।
हयेन च हयान्केचिन्निष्पिपेषुर्वलीमुखाः ॥२८॥

राक्षस-सैन्याचे भयंकर निर्दालन :

शस्त्र समुग्री जाली चूर्ण । पायीं पिष्ट पर्वतपाषाण ।
विचंबले हतियेराविण । ते काळींचे रण अवधारा ॥ ६५ ॥
वानरीं उचलोनि वानरांसीं । रणीं मारिती राक्षरांसी ।
राक्षसी उचलोनि राक्षरांसी । रणीं वानरासी निर्दळिती ॥ ६६ ॥
रणीं रणमदें उन्मत्त वीर । तयां नाठवे आपपर ।
रण मांडले घोरांदर । येरां येर निर्दळिती ॥ ६७ ॥
पाचारोनि रणांगणी । निधडे वीर झोंटधरणी ।
भिडतातई रणांगणी । आयणीपायणी संग्राम ॥ ६८ ॥
रणीं मोडलीं वोढणें । घायीं झडलीं अंगत्राणें ।
राक्षस मारिले जीवें प्राणें । पर्वतपाषाणें वानरीं ॥ ६९ ॥
जेंवी पर्वतीं आरक्त पाझर । तैसें वाहती रुधिरपूर ।
रणीं खवळले वानर । निशाचर मारितां ॥ ७० ॥
रणभूमि अति दुर्गम । मांसशोणितकर्दम ।
रणी खवळोनि प्लवंगम । राक्षसां परम गांजिलें ॥ ७१ ॥
दुर्धर वानरांचा मार । रणीं उठला हाहाकार ।
मोडला राक्षसांचा भार । घायीं जर्जर विव्हळती ॥ ७२ ॥
दुर्धर वानरांचा मार । कोपें खवळला नरांतक वीर ।
अश्वारुढ अति दुर्धर । वानरां मार करुं आला ॥ ७३ ॥
शिळा शिखरें वृक्ष पर्वत । वानरीं सांडिले अत्यद्‍भुत ।
खड्ग निवटोनि समस्त । वानरां घात करुं आला ॥ ७४ ॥


ततो हयं मारुततुल्यवेगामरुह्य शक्तिं निशितां प्रगृह्य
नरांतको वानरराजसैन्यं विवेश मीनश्च यथार्णवौघम्
सवानरान्सप्तशतानि वीरः प्रासेन दीप्तेन विनिर्बिभेद
एकः क्षणेनेंद्ररिपुर्दुरात्मा जघान सैन्यं हरिपुंगवानाम्
न शेकुर्वानराः सोदुं ते विनेदुर्महास्वरान् ।
ते त्रस्ता वानरश्रेष्ठाः सुग्रीवमुपतस्थिरे ॥३१॥

नरांतक – अंगद यांचे युद्ध :

ठाणमाण शुभ्र सुंदरु । वायुवेगाहून सवेग वारु ।
तो अश्वारुढ नरांतक वीरु । वानरां मारु करुं आला ॥ ७५ ॥
तुरंगासनी खड्गहस्त । सात दशक दहासत ।
वानर मारी शतानुशत । होत आकांत कपिकुळा ॥ ७६ ॥
शिळा शिखरें वृक्ष पर्वत । वानरां साटोपें हाणित ।
खड्गहस्तें तोडूनि समस्त । करी प्रळयांत वानरां ॥ ७७ ॥
करावया रणमारा । वानरीं उपडितां गिरिवरा ।
उडतां वाजे खड्गधारा । वमित रुधिरा पाडिले ॥ ७८ ॥
वानर उसळले गगनासीं । वारु उडवोनि आकाशीं ।
निरालंबी निवटीं त्यांसी । कपिप्रळयासी नरांतक ॥ ७९ ॥
पूर्वी नांव नरांतक । आतां जाला वानरांतक ।
अवघीं घेवोनि युद्धधाक । एक एक पळाले ॥ ८० ॥
जेंवी का मातला मगर । तेणें खळबळीत सागर ।
तेंवी वानरसैन्य समग्र । त्रासिलें थोर नरांतकें ॥ ८१ ॥
नरांतकाच्या समोर । राहूं न शकती वानर ।
किंकाळ्या देवोनि समग्र । सुग्रीव धूर ठाकिले ॥ ८२ ॥
सुग्रीव आमुचा कपिनाथ । संग्रामी राखील स्वस्थ ।
येणें विचारें समस्त । आले धांवत तयापासीं ॥ ८३ ॥
वानर पडिले निचेष्टित । सुषेण वैद्य अति समर्थ ।
देवोनि श्रीरामचरण तीर्थ । उठविले समस्त संग्रामीं ॥ ८४ ॥
लावितां श्रीरामपादकण । कानपले घायांचे वण ।
करितां श्रीरामनामस्मरण । वानरगण ऊठले ॥ ८५ ॥
घेता श्रीरामचरणोदक । स्वस्थ झाले सकळिक ।
पुढें मारावयां नरांतक । सुग्रीव सम्यक क्षोभला ॥ ८६ ॥


दृष्ट्वोवाच महातेजाः सुग्रीवो परिपुंगवः ।
कुमारमंगदं वीरं शक्रतुल्यपराक्रमम् ॥३२॥
गछैनं राक्षसं वीरं योसौ तुरगमास्थितः ।
भक्षयंतंच सैन्यानि क्षिप्रं प्राणौर्वियोजय ॥३३॥
सभर्तुर्वचनं श्रुत्वा निष्पपातांगदस्तदा ।
निरायुधो महातेजाः केवलं नखदंष्ट्रवान् ॥३४॥
नरांतकमुपागम्य वालिसूनुरुवाच ह ।
तिष्ठ किं प्राकृतैरेभिर्हरिभिस्त्वं करिष्यसि ॥३५॥
अस्मिन्वज्रसमस्पर्श प्रासं क्षिप ममोरसि ॥३६॥

अंगदाचे नरांतकाला आव्हान :

नरांतकें त्रासिले वानर । तें देखोनि सुग्रीव वीर ।
त्यासीं करावया रणमार । अंगदकुमर स्वयें धाडी ॥ ८७ ॥
अश्वारुढ घोर विक्रांत । करी वानरां प्राणांत।
तयाचा करीं जीवघात । सुग्रीव सांगत अंगदासी ॥ ८८ ॥
शक्रबळेंसी समान । अंगदाची आंगवण ।
ऐकोनि सुग्रीवाचें वचन । आलें स्फुरण अंगदा ॥ ८९ ॥
श्रीरामासी लोटांगण । वंदुनि हनुमंताचें चरण ।
सुग्रीव अभिवंदून । केले उड्डाण अंगदें ॥ ९० ॥
करावया नरांतकासीं झगडा । अंगद वीर असे गाढा ।
येवोनि उभा ठेला पुढां । जैसा कां कडा मेरुचा ॥ ९१ ॥
येऊनी नरांतकासमोर । उदार धीर अति गंभीर ।
अंगद बोलिला उत्तर । निःशंक शूर प्रतापी ॥ ९२ ॥
पालेखाईर वनचर । किंकरें कां मारिसी वानर ।
मी आलो असें तुजसमोर । हाण हतियेर मजलागीं ॥ ९३ ॥
शस्त्रास्त्रांची सामग्री । जे जे असेल तुजपासीं खरी ।
ते ते घाली मजवरीं । अंगद गजरीं गर्जत ॥ ९४ ॥
अंगदाच्या कठिण उत्तरीं । नरांतक क्षोभेंकरीं ।
निजखड्गाच्या खड्गधारीं । हृदयावरी हाणितला ॥ ९५ ॥


अंगदस्य वचः श्रुत्वा सच क्रुद्धो नरांतकः ।
संपीड्य दशनैरोष्ठौ निःश्वस्य च पुनः पुनः ॥३७॥
तं प्रासमादाय समुज्वलंदंतं
ससर्ज वेगेन च वानराय
स वालिपुत्रोरसि वज्रकल्पे
बभूव भग्नः पतितश्च भूमौ ॥ ३८ ॥


दांत खावोनि करकरां । खड्ग भोवंडोनि गरगरां ।
हृदयावरी वानरा । खड्गधारा हाणितलें ॥ ९६ ॥
अंगदाचे बळ वितंड । घाव हाणितां प्रचंड ।
खड्ग जालें दुखंड । गेलें बळबंड राक्षसी ॥ ९७ ॥
अखंड रामनामस्मरण । अंगदहृदय अच्छेद्य जाण ।
खड्गभंगासी कारण । रामस्मरण सप्रेम ॥ ९८ ॥
आवडीं समस्तां श्रीरघुनाथ । द्वंद्वबाधा नित्य निर्मुक्त ।
काय खड्गाचा आघात । निमेषार्धात भंगेल ॥ ९९ ॥
खड्ग आदळतां हृदयाआरामीं । दुखंड होवोनि पडिले भूमीं ।
अंगद गर्जोनि संग्रामी । युद्धानुक्रमीं खवळला ॥ १०० ॥

असिं समालोक्य तदा च भग्नं सुपर्णकृत्तोरगभोगकल्पम् ।
मुष्टिं समुद्यम्य स वालिपुत्रस्तुरंग्मं तस्य जघान मूर्घनि ॥३९॥
स तस्य वाजिर्निपपात भूमौ तलप्रहारेण विशीर्णशीर्जः ।
नरांतकः क्रोधवशं जगाम।हतं तुरंगं पतितं समीक्ष्य ॥४०॥
स मुष्टिमुद्यम्य स महानुभावो जघान शीर्षे युधि वालिपुत्रम् ।
अथांगदो मुष्टिनिपातधीरः सुस्त्राव तीव्रं रुधिरं च शीर्षात् ॥४१॥
मुहुःप्रजज्वाल मुमोह चापि।संज्ञां समासाद्य च विस्मितोऽभूत् ॥४२॥

अंगदाचा नरांतकावर जोराचा हल्ला :

गरुड छेदी जेंवी उरग । तैसें छेदोनि सांडिलें खड्ग ।
अंगदासी आला राग । राक्षस सांग वधावया ॥ १ ॥
विद्युत्प्राय वारु तळपत । अंगदें ताडितां मुष्टिघात ।
टाळू फोडोनि सदंत । वारु रणांत पाडिला ॥ २ ॥
धन्य त्या मुष्टिघाताची थोरी । नेत्र धरेवरी ।
वारु न्हाणोनि रुधिरीं । रणामाझारीं पाडिला ॥ ३ ॥
वारु मारितां निःशेख । दूर उडाला नरांतक ।
शस्त्रसामग्री नसतां देख । अति तवक युद्धाचा ॥ ४ ॥
मुष्टि वळोनि क्रोधेंकरीं । अंगद ठोकिला उरावरी ।
जात जात अति चांचरी । स्वयें सांवरी मूर्च्छेतें ॥ ५ ॥
ब्रम्हांडी तडकला मुष्टिघात । नाकीं तोंडी रुधिरोक्षित ।
अंगद पडिला मूर्च्छित । रणाआंत मुष्टिघातें ॥ ६ ॥
अंगद पडितांचि मूर्च्छित । स्वयें स्मरें श्रीरघुनाथ ।
श्रम जावोनि समस्त । उठिला गर्जत संग्रामा ॥ ७ ॥
करितां श्रीरामनामस्मरण । श्रम जावोनि संपूर्ण ।
आलें शतगुणें स्फुरण । राक्षसकंदन करावया ॥ ८ ॥
आघाती आठवे श्री रघुनाथ । त्याचें भाग्य अति समर्थ ।
त्यासीं बाधेना अनर्थ । विजयान्वित तिहीं लोकीं ॥ ९ ॥
रामनाम स्मरणापुढें । विघ्न कायसें बापुडें ।
अंगदाचे बळ गाढें । युद्ध कैवाडें माडिलें ॥ ११० ॥


अथांगदो वज्रसमप्रवेगःसंबध्य मुष्टिं गिरिशृंगकल्पम् ।
निपातयामास तदा महात्मा नरांतकस्योरसि वालिपुत्रः ॥४३॥
नरांतका भूमितले पपात यथाचलो वज्रनिपातभग्नः ।
तदांतरिक्षे त्रिदशोत्तमानां वनौकसां चापि महान्निनादः ॥४४॥
बभूव तस्मिन्निहतेऽतिवीर्ये नरांतके वालिसुतेन संख्ये ॥४५॥

अंगदाने नरांतकाचा वध केल्याने वानर सैन्याला हर्ष :

मूर्च्छा भांजोनि अंगद । स्वयें होवोनि सावध ।
करावया नरांतकाचा वध । अति उन्नद्ध ऊठिला ॥ ११ ॥
मुष्टी वळोनि क्रोधेंकरी । वेगें हाणितां उरावरी ।
हाडे करोनि चकचुरी । धरेवरी पाडिला ॥ १२ ॥
नाकीं तोंडी रुधिरधारा । लागल्या नरांतक वीरा ।
एकें घायें करोनि पुरा । निशाचरा पाडिलें ॥ १३ ॥
नरांतक महाबळी । अंगदे पाडिला क्षितितळीं ।
कपी नाचती सुखसमेळीं । पिटली टाळी सुरसिद्धी ॥ १४ ॥
एक रावणराजकुमर । दुजा वाळिसुत राजपुत्र ।
युद्ध करोनि घोरांदर । कुमरें कुमर मारिला ॥ १५ ॥
करोनि रामनामगजर । हरिखें नाचती वानर ।
स्वर्गीं नाचती सुरवर । अंगदवीर निजविजयी ॥ १६ ॥
एका शरण जनार्दनीं । नरांतक पडिला रणीं ।
उरल्या वीरीं पांच जणीं । केली करणी ते ऐका ॥ १७ ॥
अंगदे नमिला रघुनंदन । रामें दिधलें आलिंगन ।
वंदून लक्ष्मणाचे चरण । अभिनंदन हनुमंता ॥ १८ ॥
सुग्रीवराजेंद्रा दंडवत । वानरवीर जे समस्त ।
अंगद पायावरी लोळत । अवघे गर्जत स्तुतिवादें ॥ १९ ॥
वीरशूर प्रतापवंत । राजपुत्र आणि विनीत ।
अवघे हरिनामें जर्जत । स्तुति वदन अंगदाची ॥ १२० ॥
रम्य रामायणकथार्थ । नरांतका जाला अंत ।
एका जनार्दना शरणागत । रणीं परमार्थ श्रीरामें ॥ २१ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
नरांतकवधो नाम एकोनत्रिंशत्तमोऽध्यायः ॥ २९ ॥
ओंव्या ॥ १२१ ॥ श्लोक ॥ ४५ ॥ एवं ॥ १६६ ॥


GO TOP