श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकचत्वारिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामेण सुग्रीवस्य दुःसाहसाद् वारणम्, लङ्‌कायाश्चतुर्षु द्वारेषु वानरसैनिकानां नियुक्तिः; श्रीरामदूतस्य अंगदस्य रावणभवने पराक्रमो,वानराणां आक्रमणाद् रक्षसां भयम् - श्रीरामांनी सुग्रीवाला दु:साहसापासून रोखणे, लंकेच्या चारी द्वारांवर वानरसैनिकांची नियुक्ति, रामदूत अंगदाचा रावणाच्या महालात पराक्रम तसेच वानरांच्या आक्रमणामुळे राक्षसांना भय -
अथ तस्मिन् निमित्तानि दृष्ट्‍वा लक्ष्मणपूर्वजः ।
सुग्रीवं संपरिष्वज्य तदा वचनमब्रवीत् ॥ १ ॥
सुग्रीवाच्या शरीरावर युद्धाची चिन्हे पाहून लक्ष्मणाचे मोठे भाऊ श्रीराम यांनी त्यांना हृदयाशी धरले आणि याप्रकारे म्हटले- ॥१॥
असम्मन्त्र्य मया सार्द्धं तदिदं साहसं कृतम् ।
एवं साहसयुक्तानि न कुर्वन्ति जनेश्वराः ॥ २ ॥
सुग्रीवा ! तू माझ्याशी सल्लामसलत न करतांच हे फार मोठे साहसाचे काम करून टाकलेस. राजे लोक असे दु:साहसपूर्ण कार्य करीत नाहीत. ॥२॥
संशये स्थाप्य मां चेदं बलं चेमं विभीषणम् ।
कष्टं कृतमिदं वीर साहसं साहसप्रिय ॥ ३ ॥
साहसप्रिय वीरा ! तू मला, या वानरसेनेला आणि विभीषणालाही संशयात पाडून जे हे साहसपूर्ण कार्य केले आहेस, यामुळे आम्हांला फार कष्ट झाले. ॥३॥
इदानीं मा कृथा वीर एवंविधममरिंदम ।
त्वयि किंचित् समापन्ने किं कार्यं सीतया मम ॥ ४ ॥

भरतेन महाबाहो लक्ष्मणेन यवीयसा ।
शत्रुघ्नेन च शत्रुघ्न स्वशरीरेण वा पुनः ॥ ५ ॥
शत्रुंचे दमन करणार्‍या वीरा ! आता परत तू असे दु:साहस करू नको. शत्रुसूदन महाबाहो ! जर तुम्हांला काही झाले तर मी सीता, भरत, लक्ष्मण, लहान भाऊ शत्रुघ्न तसेच आपल्या शरीरालाही घेऊन काय करूं ? ॥४-५॥
त्वयि चानागते पूर्वं इति मे निश्चिता मतिः ।
जानतश्चापि ते वीर्यं महेन्द्रवरुणोपम ॥ ६ ॥

हत्वाऽहं रावणं युद्धे सपुत्रबलवाहनम् ।
अभिषिच्य च लङ्‌कायां विभीषणमथापि च ॥ ७ ॥

भरते राज्यमावेश्य त्यक्ष्ये देहं महाबल ।
महेन्द्र आणि वरूणासमान महाबली ! जरी मी तुमच्या बलपराक्रमाला जाणत होतो, तथापि जोपर्यंत तुम्ही येथे परतून आला नव्हतात त्यापूर्वीच मी हा निश्चित विचार केला होता की युद्धात पुत्र, सेना आणि वाहनांसहित रावणाचा वध करून लंकेच्या राज्यावर विभीषणाचा अभिषेक करीन आणि अयोध्येचे राज्य भरताला देऊन आपल्या या शरीराचा त्याग करीन. ॥६-७ १/२॥
तमेवं वादिनं रामं सुग्रीवः प्रत्यभाषत ॥ ८ ॥

तव भार्यापहर्तारं दृष्ट्‍वा राघव रावणम् ।
मर्षयामि कथं वीर जानन् विक्रममात्मनः ॥ ९ ॥
असे बोलणार्‍या श्रीरामांना सुग्रीवाने ही याप्रमाणे उत्तर दिले- वीर राघवा ! आपल्या पराक्रमाचे ज्ञान बाळगत असूनही मी आपल्या भार्येचे अपहरण करणार्‍या रावणाला पाहून त्याला क्षमा कशी काय करू शकत होतो ? ॥८-९॥
इत्येवं वादिनं वीरं अभिनन्द्य स राघवः ।
लक्ष्मणं लक्ष्मिसंपन्नं मिदं वचनमब्रवीत् ॥ १० ॥
वीर सुग्रीवांनी जेव्हा असे म्हटले तेव्हा त्यांचे अभिनंदन करून राघवांनी शोभासंपन्न लक्ष्मणास म्हटले- ॥१०॥
परिगृह्योदकं शीतं वनानि फलवन्ति च ।
बलौघं संविभज्येमं व्यूह्य तिष्ठाम लक्ष्मण ॥ ११ ॥
लक्ष्मणा ! शीतल जलाने भरलेले जलाशय आणि फळानी संपन्न वनाचा आश्रय घेऊन आपण या विशाल वानरसेनेचे विभाग करून व्यूहरचना करू या आणि युद्धासाठी उद्यत (तयार) होऊ या. ॥११॥
लोकक्षयकरं भीमं भयं पश्याम्युपस्थितम् ।
निबर्हणं प्रवीराणां ऋक्षवानररक्षसाम् ॥ १२ ॥
यासमयी मी लोकसंहाराची सूचना देणारे भयानक अपशकुन उपस्थित झालेले पहात आहे, ज्यावरून सिद्ध होत आहे की अस्वले, वानर आणि राक्षस यांच्यातील मुख्य-मुख्य वीरांचा संहार होईल. ॥१२॥
वाताश्च परुषा वान्ति कंपते च वसुंधरा ।
पर्वताग्राणि वेपन्ते पतन्ति धरणीधराः ॥ १३ ॥
प्रचंड वावटळ चालू आहे, पृथ्वी कापू लागली आहे, पर्वतांची शिखरे हलू लागली आहेत आणि दिग्गज चीत्कार करत आहेत. ॥१३॥
मेघाः क्रव्यादसंकाशाः परुषाः परुषस्वनाः ।
क्रूराः क्रूरं प्रवर्षन्ते मिश्रं शोणितबिन्दुभिः ॥ १४ ॥
मेघ हिंसक जींवाप्रमाणे क्रूर झाले आहेत. ते कठोर स्वरात विकट गर्जना करत आहेत, तसेच रक्तांचे थेंब मिसळलेल्या जलाची क्रूरतापूर्ण वृष्टि करत आहेत. ॥१४॥
रक्तचंदन्दनसंकाशा संध्या परमदारुणा ।
ज्वलच्च निपतत्येतदाद् आदित्यादग्निमण्डलम् ॥ १५ ॥
अत्यंत दारूण संध्या रक्तचंदनाप्रमाणे लाल दिसून येत आहे. सूर्यापासून हा जळत्या आगीचा पुञ्ज खाली कोसळत आहे. ॥१५॥
आदित्यमभिवाश्यन्ति जनयन्तो महद्‌भयम् ।
दीना दीनस्वरा घोरा अप्रशस्ता मृगद्विजाः ॥ १६ ॥
निषिद्ध पशु आणि पक्षी दीन होऊन दीनतासूचक स्वरात सूर्याकडे पहात चीत्कार करत आहेत, यामुळे ते फार भयंकर भासत आहेत आणि महान्‌ भय उत्पन्न करत आहेत. ॥१६॥
रजन्यामप्रकाशश्च संतापयति चन्द्रमाः ।
कृष्णरक्तांशुपर्यन्तो यथा लोकस्य संक्षये ॥ १७ ॥
रात्री चंद्राचा प्रकाश क्षीण होत चालला आहे. तो शीतलतेच्या ऐवजी संताप देत आहे. त्याच्या कडेचा भाग काळा आणि लाल दिसून येत आहे. समस्त लोकांच्या संहारकाळी चंद्रम्याचे जसे रूप राहाते तसेच ते या समयी दिसून येत आहे. ॥१७॥
ह्रस्वो रूक्षोऽप्रशस्तश्च परिवेषः सुलोहितः
आदित्यमण्डले नीलं लक्ष्म लक्ष्मण दृश्यते ॥ १८ ॥
लक्ष्मणा ! सूर्यमंडळात लहान, रूक्ष, अमंगलकारी आणि अत्यंत लाल वर्तुळ दिसून येत आहे. याच बरोबर तेथे काळे चिन्ह (डाग) ही दृष्टिगोचर होत आहे. ॥१८॥
दृश्यन्ते न यथावच्च नक्षत्राण्यभिवर्तते ।
युगान्तमिव लोकस्य पश्य लक्ष्मण शंसति ॥ १९ ॥
लक्ष्मणा ! ही नक्षत्रे चांगल्या प्रकारे प्रकाशित होत नाही आहेत, मलीन दिसत आहेत. हे अशुभ लक्षण संसाराचा प्रलयच जणु सूचित करीत माझ्या समोर प्रकट होत आहे. ॥१९॥
काकाः श्येनास्तथा गृध्रा नीचैः परिपतन्ति च ।
शिवाश्चाप्यशुभा वाचः प्रवदन्ति महास्वनाः ॥ २० ॥
कावळे, ससाणे आणि गिधाडे खाली पडत आहेत- भूतलावर येऊन येऊन बसत आहेत आणि कोल्हीणी फार जोरजोराने अमंगलसूचक बोली बोलत आहेत. ॥२०॥
शैलैः शूलैश्च खड्गैश्च विमुक्तैः कपिराक्षसैः ।
भवुष्यत्यावृता भूमिः मांसशोणितकर्दमा ॥ २१ ॥
यावरून सूचित होत आहे की वानरे आणि अस्वले यांच्याद्वारा फेकले गेलेल्या शिलाखंडांनी, शूलांनी आणि खड्गांनी ही धरती (जमीन) फाटून जाईल आणि येथे रक्तमासांचा चिखल जमेल. ॥२१॥
क्षिप्रमद्य दुराधर्षां लङ्‌कां रावणपालिताम् ।
अभियाम जवेनैव सर्वतो हरिभिर्वृताः ॥ २२ ॥
रावणद्वारा पालित ही लंकापुरी शत्रुंसाठी दुर्जय आहे तथापि आता आपण शीघ्रच वानरांसह हिच्यावर सर्व बाजूने वेगपूर्वक आक्रमण करूं. ॥२२॥
इत्येवं तु वदन् वीरो लक्ष्मणं लक्ष्मणाग्रजः ।
तस्मादवातरच्छीघ्रं पर्वताग्रान् महाबलः ॥ २३ ॥
लक्ष्मणास असे सांगून वीर महाबली श्रीरामचंद्र त्या पर्वतशिखरावरून तात्काळ खाली उतरून आले. ॥२३॥
अवतीर्यं च धर्मात्मा तस्माच्छैलात् स राघवः ।
परैः परमदुर्धर्षं ददर्श बलमात्मनः ॥ २४ ॥
त्या पर्वतावरून उतरून धर्मात्मा राघवांनी आपल्या सेनेचे निरीक्षण केले, जी शत्रुसाठी अत्यंत दुर्जय होती. ॥२४॥
सन्नह्य तु ससुग्रीवः कपिराजबलं महत् ।
कालज्ञो राघवः काले संयुगायाभ्यचोदयत् ॥ २५ ॥
नंतर सुग्रीवाच्या मदतीने कपिराजाच्या त्या विशाल सेनेला सुसज्जित करून, समयाचे ज्ञान ठेवणार्‍या त्या राघवाने ज्योतिष शास्त्रोक्त शुभ समयीं त्या सेनेस युद्धासाठी कूच करण्याची आज्ञा दिली. ॥२५॥
ततः काले महाबाहुः बलेन महता वृतः ।
प्रस्थितः पुरतो धन्वी लङ्‌कामभिमुखः पुरीम् ॥ २६ ॥
त्यानंतर महाबाहु धनुर्धर श्रीराम त्या विशाल सेनेसह शुभ मुहूर्तावर लंकेच्या दिशेने पुढे पुढे प्रस्थित झाले. ॥२६॥
तं विभीषणसुग्रीवौ हनुमान् जाम्बवान् नलः ।
ऋक्षराजस्तथा नीलो लक्ष्मणश्चान्वयुस्तदा ॥ २७ ॥

ततः पश्चात् सुमहती पृतनर्क्षवनौकसाम् ।
प्रच्छाद्य महतीं भूमिं अनुयाति स्म राघवम् ॥ २८ ॥
त्यासमयी विभीषण, सुग्रीव, हनुमान, ऋक्षराज जांबवान्‌, नल, नील तसेच लक्ष्मण त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागले. त्यानंतर अस्वले आणि वानरांची ती विशाल सेना फार मोठा भूभाग आच्छादित करीत राघवांच्या मागोमाग जाऊ लागली. ॥२७-२८॥
शैलशृङ्‌गाणि शतशः प्रवृद्धांश्च महीरुहान् ।
जगृहुः कुञ्जरप्रख्या वानराः परवारणाः ॥ २९ ॥
शत्रुंना पुढे येण्यास रोखून धरणार्‍या हत्तींप्रमाणे विशालकाय वानरांनी शेकडो शैलशिखरे आणि मोठ मोठ्‍या वृक्षांना हातात धरलेले होते. ॥२९॥
तौ तु दीर्घेण कालेन भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
रावणस्य पुरीं लङ्‌कां आसेदतुररिंदमौ ॥ ३० ॥
शत्रूंचे दमन करणारे ते दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण थोड्‍याच वेळात लंकापुरीच्या जवळ येऊन पोहोचले. ॥३०॥
पताकामालिनीं रम्यां उद्यानवनशोभिताम् ।
चित्रवप्रां सुदुष्प्रापां उच्चैः प्राकारतोरणाम् ॥ ३१ ॥
ती रमणीय ध्वजापताकांनी अलंकृत होती. अनेकानेक उद्याने आणि वने तिची शोभा वाढवीत होती. तिच्या चारी बाजूस फारच अद्‌भुत आणि उंच कोट होता. त्या कोटाला लागूनच नगराचे प्राकारतोरण होते. त्या तटबंदीमुळे लंकापुरीमध्ये पोहोचणे कुणालाही अत्यंत कठीण होते. ॥३१॥
तां सुरैरपि दुर्धर्षां रामवाक्यप्रचोदिताः ।
यथानिवेशं संपीड्य न्यविशन्त वनौकसः ॥ ३२ ॥
यद्यपि देवतांसाठीही लंकेवर आक्रमण करणे कठीण काम होते, तरीही श्रीरामांच्या आज्ञेने प्रेरित होऊन वानर यथास्थान राहून त्या पुरीला वेढा घालून तिच्यामध्ये प्रवेश करू लागले. ॥३२॥
लङ्‌कायास्तूत्तरद्वारं शैलशृङ्‌गमिवोन्नतम् ।
रामः सहानुजो धन्वी जुगोप च रुरोध च ॥ ३३ ॥
लंकेचे उत्तरद्वार पर्वत शिखराप्रमाणे उंच होते. श्रीराम तसेच लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन त्या मार्गास रोखून धरत होते आणि तेथे राहून ते आपल्या सेनेचे रक्षण करू लागले. ॥३३॥
लङ्‌कामुपनिविष्टस्तु रामो दशरथात्मजः ।
लक्ष्मणानुचरो वीरः पुरीं रावणपालिताम् ॥ ३४ ॥

उत्तरद्वारमासाद्य यत्र तिष्ठति रावणः।
नान्यो रामाद्धि तद् द्वारं समर्थः परिरक्षितुम् ॥ ३५ ॥
दशरथनंदन वीर श्रीराम लक्ष्मणाला बरोबर घेऊन रावणापालित लंकापुरीच्या जवळ जाऊन उत्तर द्वारावर पोहोचून, जेथे स्वत: रावण उभा होता तेथेच जाऊन खिळून राहिले. श्रीरामांशिवाय दुसरा कोणीही त्या द्वारावर आपल्या सैनिकांचे रक्षण करण्यास समर्थ होऊ शकत नव्हता. ॥३४-३५॥
रावणाधिष्ठितं भीमं वरुणेनेव सागरम् ।
सायुधै राक्षसैर्भीमैः अभिगुप्तं समन्ततः॥ ३६ ॥
अस्त्र-शस्त्रधारी भयंकर राक्षसांच्या द्वारा सर्वबाजूनी सुरक्षित त्या भयानक द्वारावर रावण, जसे वरुणदेव समुद्रात अधिष्ठित असतात त्याप्रमाणे उभा होता. ॥३६॥
लघूनां त्रासजननं पातालमिव दानवैः ।
विन्यस्तानि च योधानां बहूनि विविधानि च॥ ३७ ॥

ददर्शायुधजालानि तथैव कवचानि च ।
ते उत्तरद्वार अल्पबलशाली पुरूषांच्या मनात, दानवांच्या द्वारा सुरक्षित पाताळ जसे भयदायक वाटते, त्याप्रकारे भय उत्पन्न करीत होते. त्या द्वारात, आत योद्धांची अनेक प्रकारची अस्त्रे-शस्त्रे आणि (कवचे) चिलखते ठेवलेली भगवान्‌ श्रीरामांनी पाहिली. ॥३७ १/२॥
पूर्वं तु द्वारमासाद्य नीलो हरिचमूपतिः॥ ३८ ॥

अतिष्ठत् सह मैन्देन द्विविदेन च वीर्यवान् ।
वानर सेनापति पराक्रमी नील, मैंद आणि द्विविद बरोबरच लंकेच्या पूर्वद्वारावर जाऊन उभे होते. ॥३८ १/२॥
अङ्‌गदो दक्षिणद्वारं जग्राह सुमहाबलः॥ ३९ ॥

ऋषभेण गवाक्षेण गजेन गवयेन च ।
महाबली अंगदाने ऋषभ, गवाक्ष, गज आणि गवयासह दक्षिण द्वारावर अधिकार मिळविला होता. ॥३९ १/२॥
हनुमान् पश्चिमद्वारं ररक्ष बलवान् कपिः॥ ४० ॥

प्रमाथिप्रघसाभ्यां च वीरैरन्यैश्च संगतः ।
प्रमाथी, प्रघस तसेच अन्य वानरवीरांसह बलवान्‌ कपिश्रेष्ठ हनुमानांनी पश्चिम मार्ग रोखून धरला होता. ॥४० १/२॥
मध्यमे च स्वयं गुल्मे सुग्रीवः समतिष्ठत ॥ ४१ ॥

सह सर्वैहरिश्रेष्ठैः सुपर्णपवनोपमैः ।
उत्तर आणि पश्चिमेच्या मध्यभागात (वायव्यकोनात) जी राक्षससेनेची छावणी होती, तिच्यावर गरूड आणि वायुसमान वेगवान्‌ श्रेष्ठ वानरवीरांसह सुग्रीवांनी आक्रमण केले. ॥४१ १/२॥
वानाराणां तु षट्त्रिंशत् कोट्यः प्रख्यातयूथपाः॥ ४२ ॥

निपीड्योपनिविष्टाश्च सुग्रीवो यत्र वानरः ।
जेथे वानरराज सुग्रीव होते तेथे वानरांचे छत्तीस कोटी विख्यात यूथपति राक्षसांना पीडा देत उपस्थित राहिले होते. ॥४२ १/२॥
शासनेन तु रामस्य लक्ष्मणः सविभीषणः॥ ४३ ॥

द्वारे द्वारे हरीणां तु कोटिं कोटीर्न्यवेशयत् ।
श्रीरामांच्या आज्ञेने विभीषणासहित लक्ष्मणांनी लंकेच्या प्रत्येक द्वारावर एक एक कोटी वानरांना नियुक्त केले होते. ॥४३ १/२॥
पश्चिमेन तु रामस्य सुगषेण सहजाम्बवान्॥ ४४ ॥

अदूरान्मध्यमे गुल्मे तस्थौ बहुबलानुगः ।
सुषेण आणि जांबवान्‌ बर्‍याचशा सेनेसह श्रीरामचंद्रांच्या मागे थोड्‍या दूर अंतरावर राहून मध्यभागाच्या मोर्च्याचे रक्षण करत राहिले. ॥४४ १/२॥
ते तु वानरशार्दूलाः शार्दूला इव दंष्ट्रिणः ।
गृहीत्वा द्रुमशैलाग्रान् हृष्टा युद्धाय तस्थिरे ॥ ४५ ॥
ते वानर, सिंह आणि वाघांप्रमाणे मोठ मोठ्‍या दाढांनी युक्त होते. ते हर्ष आणि उत्साह यांनी भरून हातात वृक्ष आणि पर्वतशिखरे घेऊन युद्धासाठी सज्ज राहिले होते. ॥४५॥
सर्वे विकृतलाङ्‌गूलाः सर्वे दंष्ट्रानखायुधाः ।
सर्वे विकृतचित्राङ्‌गाः सर्वे च विकृताननाः ॥ ४६ ॥
सर्व वानरांच्या शेपट्‍या क्रोधामुळे अस्वाभाविक रीतीने हलत राहिल्या होत्या. दाढा आणि नखे हीच त्यांची आयुधे होती. त्या सर्वांच्या मुख आदि अंगांवर क्रोधरूप विकाराची विविध चिन्हे परिलक्षित होत होती तसेच सर्वांची मुखे विकट आणि विकराळ दिसून येत होती. ॥४६॥
दशनागबलाः केचित् केचिद्दशगुणोत्तराः ।
केचिन्नागसहस्रस्य बभूवुस्तुल्यविक्रमाः ॥ ४७ ॥
यापैकी काही वानरांमध्ये दहा हत्तींचे बळ होते, काही त्यांच्यापेक्षा दसपट अधिक बलवान्‌ होते तसेच काहींच्या मध्ये एक हजार हत्तींचे बळ होते. ॥४७॥
सन्ति चौघबलाः केचित् केचिच्छतगुणोत्तराः ।
अप्रमेयबलाश्चान्ये तत्रासन् हरियूथपाः ॥ ४८ ॥
काही जणांमध्ये दहा हजार हत्तींच्या बळाइतकी शक्ती होती तर काही यापेक्षाही शंभर पट अधिक बलवान्‌ होते. तसेच अन्य बर्‍याचशा वानर यूथपतिंमध्ये तर बळाचे परिमाणच नव्हते. ते असीम बलशाली होते. ॥४८॥
अद्‌भुतश्च विचित्रश्च तेषामासीत् समागमः ।
तत्र वानरसैन्यानां शलभानामिवोद्‌गमः ॥ ४९ ॥
तेथे त्या वानरसेनांचा ढोरांच्या ? दलाच्या उद्‍गमाप्रमाणे अद्‌भुत आणि विचित्र समागम झालेला होता. ॥४९॥
परिपूर्णमिवाकाशं संपूर्णेव च मेदिनी ।
लङ्‌कामुपनिविष्टैश्च संपतद्‌भिश्च वानरैः ॥ ५० ॥
उड्‍या मारत मारत लंकेत येणार्‍या वानरांनी आकाश भरून गेले होते. आणि पुरीमध्ये प्रवेश करून उभे असलेल्या कपिसमूहांनी तेथील सारी पृथ्वी आच्छादित झाली होती. ॥५०॥
शतं शतसहस्राणां पृतनर्क्षवनौकसाम् ।
लङ्‌काद्वाराण्युपाजग्मुः अन्ये योद्धुं समन्ततः ॥ ५१ ॥
अस्वले आणि वानर यांची एक कोटी सेना तर लंकेच्या चारी द्वारांवर येऊन ठाकली होती आणि अन्य सैनिक सर्व बाजूला युद्धासाठी निघून गेले होते. ॥५१॥
आवृतः स गिरिः सर्वैः तैः समन्तात् प्लवंगमैः ।
अयुतानां सहस्रं च पुरीं तामभ्यवर्तत ॥ ५२ ॥
समस्त वानरांनी चारी बाजूने त्या त्रिकूट पर्वतास (ज्यावर लंका वसलेली होती) घेरून टाकले होते. सहस्त्र अच्युत (एक कोटी) वानर तर त्या पुरीमध्ये सर्व द्वारांवर लढणार्‍या सेनेचा समाचार घेण्यासाठी नगरात सर्व बाजूस फिरत राहिले होते. ॥५२॥
वानरैर्बलवद्‌भिश्च बभूव द्रुमपाणिभिः ।
सर्वतः संवृता लङ्‌का दुष्प्रवेशापि वायुना ॥ ५३ ॥
हातात वृक्ष घेतलेल्या बलवान्‌ वानरांच्या द्वारा सर्व बाजूने घेरल्या गेलेल्या लंकेत वार्‍यालाही प्रवेश मिळणे कठीण झाले होते. ॥५३॥
राक्षसा विस्मयं जग्मुः सहसाऽभिनिपीडिताः ।
वानरैर्मेघसंकाशैः शक्रतुल्यपराक्रमैः ॥ ५४ ॥
मेघासमान काळे तसेच भयंकर आणि इंद्रतुल्य पराक्रमी वानरांच्या द्वारा एकाएकी पीडित झाल्यामुळे राक्षसांना फार विस्मय वाटला. ॥५४॥
महान् शब्दोऽभवत् तत्र बलौघस्याभिवर्ततः ।
सागरस्येव भिन्नस्य यथा स्यात् सलिलस्वनः ॥ ५५ ॥
जसे सेतुला विदीर्ण करतांना अथवा मर्यादा सोडून वाढतांना समुद्राच्या जलाचा महान्‌ शब्द होत असतो त्याच प्रकारे तेथे आक्रमण करणार्‍या विशाल वानरसेनेमुळे महान्‌ कोलाहल होत होता. ॥५५॥
तेन शब्देन महता सप्राकारा सतोरणा ।
लङ्‌का प्रचलिता सर्वा सशैलवनकानना ॥ ५६ ॥
त्या महान्‌ कोलाहलाने तटबंदी तोरणासह द्वारे, पर्वत, वने आणि काननांसहित संपूर्ण लंकापुरीत खळबळ माजली. ॥५६॥
रामलक्ष्मणगुप्ता सा सुग्रीवेण च वाहिनी ।
बभूव दुर्धर्षतरा सर्वैरपि सुरासुरैः ॥ ५७ ॥
श्रीराम, लक्ष्मण आणि सुग्रीव यांच्या द्वारा सुरक्षित ती विशाल वानरवाहिनी समस्त देवता आणि असुरांसाठीही अत्यंत दुर्जय झाली होती. ॥५७॥
राघवः सन्निवेश्यैवं सैन्यं स्वं रक्षसां वधे ।
सम्मन्त्र्य मंत्रिभिः सार्धं निश्चित्य च पुनः पुनः ॥ ५८ ॥

आनंतर्यमभिप्रेप्सुः क्रमयोगार्थतत्त्ववित् ।
विभीषणस्यानुमते राजधर्मनुस्मरन्॥ ५९ ॥

अङ्‌गदं वालितनयं समाहूयेदमब्रवीत् ।
याप्रकारे राक्षसांच्या वधासाठी आपल्या सेनेला यथास्थान उभी करून त्यानंतरचे कर्तव्य जाणण्यासाठी राघवांनी मंत्र्यांबरोबर वारंवार सल्लामसल्लत केली आणि एका निश्चयावर पोहोचून साम, दान आदि उपायांचा क्रमश: प्रयोगाने सुलभ होणार्‍या अर्थतत्त्वाचे ज्ञाते राघव, विभीषणाची अनुमति घेऊन राजधर्माचा विचार करून, वालिपुत्र अंगदाला बोलावून घेऊन त्याला याप्रकारे म्हणाले- ॥५८-५९ १/२॥
गत्वा सौम्य दशग्रीवं ब्रुहि मद्‌वद्वचनात् कपे ॥ ६० ॥

लङ्‌घयित्वा पुरीं लङ्‌कां भयं त्यक्त्वा गतव्यथः ।
भ्रष्टश्रीकं गतैश्वर्य मुमूर्षो नष्टचेतनम् ॥ ६१ ॥
सौम्य ! कपिप्रवर ! दशमुख रावण राज्यलक्ष्मीपासून भ्रष्ट झाला आहे, त्याचे ऐश्वर्य आता समाप्त होत आहे. तो मरण्याची इच्छा करत आहे म्हणून त्याची विचारशक्ती नष्ट झाली आहे. तू तटबंदी ओलांडून भय सोडून लंकापुरीत जा आणि व्यथारहित होऊन त्याला माझ्या वतीने ही गोष्ट सांग- ॥६०-६१॥
ऋषीणां देवतानां च गंधर्वाप्सरसां तथा ।
नागानामथ यक्षाणां राज्ञां च रजनीचर ॥ ६२ ॥

यच्च पापं कृतं मोहाद् अवलिप्तेन राक्षस ।
नूनं ते विगतो दर्पः स्वयंभूवरदानजः ।
तस्य पापस्य संप्राप्ता व्युष्टिरद्य दुरासदा ॥ ६३ ॥
निशाचर ! राक्षसराज ! तू मोहवश घमेंडित येऊन ऋषि, देवता, गंधर्व, अप्सरा, नाग, यक्ष आणि राजांचाही मोठा अपराध केला आहेस. ब्रह्मदेवांचे वरदान मिळाल्याने तुला जो अभिमान झाला होता, निश्चितच तो नष्ट होण्याचा समय आता आला आहे. तुझ्या त्या पापाचे दु:सह फळ आज उपस्थित झाले आहे. ॥६२-६३॥
यस्य दण्डधरस्तेऽहं दाराहरणकर्शितः ।
दण्डं धारयमाणस्तु लङ्‌काद्वारे व्यवस्थितः ॥ ६४ ॥
मी अपराध्यांना दंड देणारा शासक आहे. तू जे माझ्या भार्येचे अपहरण केले आहेस, यामुळे मला फार कष्ट पोहोचले आहेत, म्हणून तुला त्यासाठी दंड देण्यासाठी मी लंकेच्या द्वारावर येऊन उभा राहिलो आहे. ॥६४॥
पदवीं देवतानां च महर्षीणां च राक्षस ।
राजर्षीणां च सर्वेषां गमिष्यसि युधि स्थिरः ॥ ६५ ॥
राक्षसा ! जर तू युद्धात स्थिरतापूर्वक उभा राहिलास तर त्या समस्त देवता, महर्षि आणि राजर्षिच्या पदवीला पोहोचून जाशील- त्यांच्या प्रमाणे तुला परलोकवासी व्हावे लागेल. ॥६५॥
बलेन येन वै सीतां मायया राक्षसाधम ।
मामतिक्रामयित्वा त्वं हृतवांस्तन्निदर्शय ॥ ६६ ॥
नीच निशाचरा ! ज्या बळाच्या भरवशांवर तू मला धोका देऊन मायेने व कपटाने सीतेचे हरण केले आहेस, ते बळ आज युद्धाच्या मैदानात दाखव. ॥६६॥
अराक्षसमिमं लोकं कर्तास्मि निशितैः शरैः ।
न चेच्छरणमभ्येषि तामदाय तु मैथिलीम् ॥ ६७ ॥
जर तू मैथिली सीतेला घेऊन मला शरण आला नाहीस तर मी आपल्या तीक्ष्ण बाणांच्या द्वारे या संसाराला राक्षसरहित करून टाकीन. ॥६७॥
धर्मात्मा राक्षसश्रेष्ठः संप्राप्तोऽयं विभीषणः ।
लङ्‌कैश्वर्यं इदं श्रीमान् ध्रुवं प्राप्नोत्यकण्टकम् ॥ ६८ ॥
राक्षसांमध्ये श्रेष्ठ हे श्रीमान्‌ धर्मात्मा विभीषणही माझ्या बरोबर येथे आले आहेत. निश्चितच लंकेचे निष्कंटक राज्य त्यांनाच प्राप्त होईल. ॥६८॥
न हि राज्यमधर्मेण भोक्तुं क्षणमपि त्वया ।
शक्यं मूर्खसहायेन पापेनाविदितात्मना ॥ ६९ ॥
तू पापी आहेस ! तुला आपल्या स्वरूपाचे ज्ञान नाही आणि तुझे साथीदारही मूर्ख आहेत. म्हणून याप्रकारे अधर्मपूर्वक आता तू एक क्षणही या राज्याला भोगू शकणार नाहीस. ॥६९॥
युद्ध्यस्व मा धृतिं कृत्वा शौर्यमालम्ब्य राक्षस ।
मच्छरैस्त्वं रणे शान्तः ततः पूतो भविष्यसि ॥ ७० ॥
राक्षसा ! शौर्याचा आश्रय घेऊन धैर्य धारण कर आणि माझ्याशी युद्ध कर. रणभूमीमध्ये माझ्या बाणांनी शांत होऊन तू पूत (पवित्र, शुद्ध आणि निष्पाप) होशील. ॥७०॥
यद्याविशसि लोकांस्त्रीन् पक्षिभूतो निधाचर ।
मम चक्षुःपथं प्राप्य न जीवन् प्रतियास्यसि ॥ ७१ ॥
निशाचरा ! माझ्या दृष्टिपथात आल्यानंतर जरी तू पक्षी होऊन तीन्ही लोकात उडत आणि लपत फिरलास तरीही आपल्या घरी जिवंत परत जाऊ शकणार नाहीस. ॥७१॥
ब्रवीमि त्वां हितं वाक्यं क्रियतामौर्ध्वदैहिकम् ।
सुदृष्टा क्रियतां लङ्‌का जीवितं ते मयि स्थितम् ॥ ७२ ॥
आता मी तुला तुझ्या हिताची गोष्ट सांगतो. तू आपले श्राद्ध करून टाक - परलोकात सुख देणारे दान-पुण्य करून घे आणि लंकेला डोळे भरून पाहून घे, कारण तुझे जीवन आता माझ्या अधीन होऊन चुकले आहे. ॥७२॥
इत्युक्तः स तु तारेयो रामेणाक्लिष्टकर्मणा ।
जगामाकाशमाविश्य मूर्तिमानिव हव्यवाट् ॥ ७३ ॥
अनायासेच महान्‌ कर्म करणार्‍या भगवान्‌ श्रीरामांनी असे म्हटल्यावर ताराकुमार अंगद मूर्तिमंत अग्निप्रमाणे आकाशमार्गाने लंकेकडे निघाले. ॥७३॥
सोऽतिपत्य मुहूर्तेन श्रीमान् रावणमन्दिरम् ।
ददर्शासीनमव्यग्रं रावणं सचिवैः सह ॥ ७४ ॥
श्रीमान्‌ अंगद एकाच मुहूर्तात तटबंदी ओलांडून रावणाच्या राजभवनात जाऊन पोहोचले. तेथे त्यांनी मंत्र्यांसह शांतभावाने बसलेल्या रावणास पाहिले. ॥७४॥
ततस्तस्याविदूरेण निपत्य हरिपुंगवः ।
दीप्ताग्निसदृशस्तस्थौ अङ्‌गदः कनकाङ्‌गदः ॥ ७५ ॥
वानरश्रेष्ठ अंगदांनी सोन्याचे बाजूबंद धारण केले होते आणि प्रज्वलित अग्निसमान ते प्रकाशित होत होते. ते रावणाच्या जवळ जाऊन उभे राहिले. ॥७५॥
तद्रामवचनं सर्वं अन्यूनाधिकमुत्तमम् ।
सामात्यं श्रावयामास निवेद्यात्मानमात्मना ॥ ७६ ॥
त्यांनी प्रथम आपला परिचय दिला आणि मंत्र्यांसहित रावणाला श्रीरामांचे वचन, सर्व उत्तम गोष्टी जशाच्या तशाच ऐकविल्या. त्यांतून एकही शब्द कमी केला नाही आणि एकही शब्द वाढविला नाही. ॥७६॥
दूतोऽहं कोसलेन्द्रस्य रामस्याक्लिष्टकर्मणः ।
वालिपुत्रोऽङ्‌गदो नाम यदि ते श्रोत्रमागतः ॥ ७७ ॥
ते म्हणाले- मी अनायासेच मोठ मोठी उत्तम कर्मे करणार्‍या कोसलनरेश महाराज श्रीरामांचा दूत आणि वालीचा पुत्र अंगद आहे. संभव आहे की माझे नावही कधी तुमच्या कानावर पडले असेल. ॥७७॥
आह त्वां राघवो रामः कौसल्यानंदवर्धनः ।
निष्पत्य प्रतियुद्ध्यस्व नृशंस पुरुषो भव ॥ ७८ ॥
माता कौसल्येचा आनंद वाढविणार्‍या राघव रामांनी तुझ्यासाठी हा संदेश दिला आहे- नृशंस रावणा ! जरा पुरूष बन आणि घरांतून बाहेर निघून युद्धात माझ्याशी सामना कर. ॥७८॥
हन्तास्मि त्वां सहामात्यं सपुत्रज्ञातिबांधवम् ।
निरुद्विग्नास्त्रयो लोका भविष्यन्ति हते त्वयि ॥ ७९ ॥
मी मंत्री, पुत्र आणि बंधु-बांधवांसहित तुझा वध करीन; कारण तू मारला गेलास तर तीन्ही लोकांतील प्राणी निर्भय होतील. ॥७९॥
देवदानवयक्षाणां गंधर्वोरगरक्षसाम् ।
शत्रुमद्योद्धरिष्यामि त्वामृषीणां च कण्टकम् ॥ ८० ॥
तू देवता, दानव, यक्ष, गंधर्व, नाग आणि राक्षस- सर्वांचा शत्रू आहेस. ऋषिंसाठी तर कंटकरूपच आहेस, म्हणून आज मी तुला उखडून फेकून देईन. ॥८०॥
विभीषणस्य चैश्वर्यं भविष्यति हते त्वयि ।
न चेत् सत्कृत्य वैदेहीं प्रणिपत्य प्रदास्यसि ॥ ८१ ॥
म्हणून जर तू माझ्या पायांवर पडून आदरपूर्वक सीतेला परत केले नाहीस, तर माझ्या हातून मारला जाशील आणि तू मारला गेलास की लंकेचे सर्व ऐश्वर्य विभीषणाला प्राप्त होईल. ॥८१॥
इत्येवं परुषं वाक्यं ब्रुवाणे हरिपुंगवे ।
अमर्षवशमापन्नो निशाचरगणेश्वरः ॥ ८२ ॥
वानरशिरोमणी अंगदाने असे कठोर वचन बोलल्यावर निशाचरगणांचा राजा रावण अत्यंत अमर्षाने भरून गेला. ॥८२॥
ततः स रोषमापन्नः शशास सचिवांस्तदा ।
गृह्यतामिति दुर्मेधा वध्यतामिति चासकृत् ॥ ८३ ॥
रोषाने भरलेल्या रावणाने त्या समयी आपल्या मंत्र्यांना वारंवार म्हटले- पकडा या दुर्बुद्धी वानराला आणि मारून टाका. ॥८३॥
रावणस्य वचः श्रुत्वा दीप्ताग्निमिव तेजसा ।
जगृहुस्तं ततो घोराः चत्वारो रजनीचराः ॥ ८४ ॥
रावणाचे हे म्हणणे ऐकून चार भयंकर निशाचरांनी प्रज्वलित अग्निप्रमाणे तेजस्वी अंगदास पकडले. ॥८४॥
ग्राहयामास तारेयः स्वयमात्मानमात्मवान् ।
बलं दर्शयितुं वीरो यातुधानगणे तदा ॥ ८५ ॥
आत्मबलाने संपन्न ताराकुमार अंगदाने त्यासमयी आपले बल राक्षसांना दाखविण्यासाठी स्वत:च आपण आपणास पकडवून दिले होते. ॥८५॥
स तान् बाहुद्वयासक्तान् आदाय पतगानिव ।
प्रासादं शैलसंकाशं उत्पपाताङ्‌गदस्तदा ॥ ८६ ॥
नंतर ते पक्ष्यांप्रमाणे आपल्या दोन्ही भुजांना जखडलेल्या त्या चारी राक्षसांना घेऊनच उडाले आणि त्या महालाच्या पर्वतशिखरासमान उंच छतावर चढून गेले. ॥८६॥
तस्योत्पतन वेगेन निर्धूतास्तत्र राक्षसाः ।
भूमौ निपतिताः सर्वे राक्षसेन्द्रस्य पश्यतः ॥ ८७ ॥
त्यांच्या उडण्याच्या वेगाने झटका खाऊन ते सर्व राक्षस राक्षसराज रावणाच्या देखतच पृथ्वीवर कोसळून पडले. ॥८७॥
ततः प्रासादशिखरं शैलशृङ्‌गमिवोन्नतम् ।
चक्राम राक्षसेन्द्रस्य वालिपुत्रः प्रतापवान् ॥ ८८ ॥
त्यानंतर प्रतापी वालिकुमार अंगद राक्षसराजाच्या त्या महालाच्या शिखरावर जे पर्वत शिखराप्रमाणे उंच होते, पाय आपटत हिंडू फिरू लागले. ॥८८॥
पफाल च पदाक्रान्तं दशग्रीवस्य पश्यतः ।
पुरा हिमवतः शृङ्‌गं वज्रिणेव विदारितम् ॥ ८९ ॥
त्यांच्या पायांच्या आघातांनी आक्रांत होऊन ते छत रावण पहात असतांना फाटून गेले (तुटले), पूर्वी वज्राच्या आघाताने जसे हिमालयाचे शिखर विदीर्ण झाले होते अगदी त्याचप्रमाणे. ॥८९॥
भङ्‌क्त्वा प्रासादशिखरं नाम विश्राव्य चात्मनः ।
विनद्य सुमहानादं उत्पपात विहायसा ॥ ९० ॥
याप्रमाणे महालाचे छत तोडून फोडून त्यांनी आपले नाव ऐकवून फार मोठ्‍याने सिंहनाद केला आणि ते आकाशमार्गाने उडून गेले. ॥९०॥
व्यथयन् राक्षसान् सर्वान् हर्षयंश्चापि वानरान् ।
स वानराणां मध्ये तु रामपार्श्वमुपागतः ॥ ९१ ॥
राक्षसांना पीडा देत आणि समस्त वानरांचा हर्ष वाढवत ते वानरसेनेच्या मध्ये श्रीरामचंद्रांजवळ परत आले. ॥९१॥
रावणस्तु परं चक्रे क्रोधं प्रासादधर्षणात् ।
विनाशं चात्मनः पश्यन् निःश्वासपरमोऽभवत् ॥ ९२ ॥
आपला महाल तुटल्यामुळे रावणाला फार क्रोध आला, परंतु विनाशाची वेळ आलेली पाहून तो दीर्घ श्वास सोडू लागला. ॥९२॥
रामस्तु बहुभिर्हृष्टैः विनदद्‌भिः प्लवंगमैः ।
वृतो रिपुवधाकाङ्‌क्षी युद्धायैवाभ्यवर्तत ॥ ९३ ॥
इकडे श्रीरामांनी हर्षाने भरून गर्जना केली आणि बहुसंख्य वानरांनी घेरलेले राहून ते युद्धासाठीच खिळून राहिले. ते आपल्या शत्रूचा वध करू इच्छित होते. ॥९३॥
सुषेणस्तु महावीर्यो गिरिकूटोपमो हरिः ।
बहुभिः संवृतस्तत्र वानरैः कामरूपिभिः ॥ ९४ ॥

चतुर्द्वाराणि सर्वाणि सुग्रीववचनात् कपिः ।
पर्यक्रामत दुर्धर्षो नक्षत्राणीव चन्द्रमाः ॥ ९५ ॥
याच समयी पर्वतशिखरासमान विशालकाय महापराक्रमी दुर्जय वानरवीर सुषेणाने इच्छेनुसार रूप धारण करणार्‍या बहुसंख्य वानरांच्यासह लंकेच्या सर्व दरवाजांना आपल्या ताब्यांत घेतले आणि सुग्रीवाच्या आज्ञेनुसार ते आपल्या सैनिकांचे रक्षण करण्यासाठी तसेच सर्व द्वारांचा समाचार जाणण्यासाठी पाळीपाळीने त्या सर्वांवर हिंडू लागले, जसे चंद्रमा क्रमश: सर्व नक्षत्रांवर गमन करतो, त्याप्रमाणे. ॥९४-९५॥
तेषामक्षौहिणिशतं समवेक्ष्य वनौकसाम् ।
लङ्‌कामुपनिविष्टानां सागरं चाभिवर्तताम् ॥ ९६ ॥

राक्षसा विस्मयं जग्मुः त्रासं जग्मुस्तथाऽपरे ।
अपरे समरे हर्षाद् हर्षमेवोप्रपेदिरे ॥ ९७ ॥
लंकेला वेढा घालून समुद्रापर्यंत पसरलेल्या त्या वनवासी वानरांची शंभर अक्षौहिणी सेना पाहून राक्षसांना फार विस्मय वाटला. बरेचसे निशाचर भयभीत झाले तसेच अन्य कित्येक राक्षस समरांगणांत हर्ष आणि उत्साहांनी भरून गेले. ॥९६-९७॥
कृत्स्नं हि कपिभिर्व्याप्तं प्राकारपरिखान्तरम् ।
ददृशू राक्षसा दीनाः प्राकारं वानरीकृतम् ।
हाहाकारं अकुर्वन्त राक्षसा भयमगताः ॥ ९८ ॥
त्यासमयी लंकेची तटबंदी आणि खंदक सर्वच्या सर्व वानरांनी व्याप्त होऊन राहिली होती. याप्रकारे राक्षसांनी तटबंदीला जेव्हा वानराकार झालेली, तेव्हा ते दीन-दु:खी आणि भयभीत होऊन हाहाकार करू लागले. ॥९८॥
तस्मिन् महाभीषणके प्रवृत्ते
कोलाहले राक्षसराजयोधाः ।
प्रगृह्य रक्षांसि महायुधानि
युगान्तवाता इव संविचेरुः ॥ ९९ ॥
तो महाभीषण कोलाहल आरंभ होताच राक्षसराज रावणाचे योद्धे निशाचर मोठमोठी आयुधे हातात घेऊन प्रलयकाळच्या प्रचंड वायुप्रमाणे सर्व बाजूस विचरू लागले. ॥९९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकचत्वारिंशः सर्गः ॥ ४१ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा एकेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP