श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ पञ्चचत्वारिंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

इंद्रत्‌बाणैः श्रीरामलक्ष्मणयोर्विसंज्ञता, वानराणां शोकश्च - इंद्रजिताच्या बाणांनी श्रीराम आणि लक्ष्मणांचे अचेत होणे आणि वानरांनी शोक करणे -
स तस्य गतिमन्विच्छन् राजपुत्रः प्रतापवान् ।
दिदेशातिबलो रामो दश वानरयूथपान् ॥ १ ॥
त्यानंतर अत्यंत बलशाली प्रतापी राजकुमार श्रीरामांनी इंद्रजिताचा पत्ता लावण्यासाठी दहा वानर यूथपतिंना आज्ञा दिली. ॥१॥
द्वौ सुषेणस्य दायादौ नीलं च प्लवगाधिपम् ।
अङ्‌गदं वालिपुत्रं च शरभं च तरस्विनम् ॥ २ ॥

द्विविदं च हनूमंतं सानुप्रस्थं महाबलम् ।
ऋषभं चर्षभस्कंधं आदिदेश परंतपः ॥ ३ ॥
त्यांत दोन तर सुषेणाचे पुत्र होते आणि शेष आठ वानरराज नील, वालिपुत्र अंगद, वेगशाली वानर शरभ, द्विविद, हनुमान्‌, महाबली सानुप्रस्थ, ऋषभ तसेच ऋषभस्कंध होते. शत्रुंना संताप देणार्‍या या दहांना त्याचे अनुसंधान करण्यासाठी आज्ञा दिली. ॥२-३॥
ते संप्रम्प्रहृष्टा हरयो भीमानुद्यम्य पादपान् ।
आकाशं विविशुः सर्वे मार्गमाणा दिशो दश ॥ ४ ॥
तेव्हा ते सर्व वानर भयंकर वृक्ष उचलून घेऊन दाही दिशांमध्ये शोधत मोठ्‍या हर्षाने आकाशमार्गाने निघाले. ॥४॥
तेषां वेगवतां वेगं इषुभिर्वेगवत्तरैः ।
अस्त्रवित् परमास्त्रस्तु वारयामास रावणिः ॥ ५ ॥
परंतु अस्त्रांचा ज्ञाता रावणकुमार इंद्रजिताने अत्यंत वेगशाली बाणांची वृष्टि करून आपल्या उत्तम अस्त्रांच्या द्वारा त्या वेगवान्‌ वानरांच्या वेगाला रोखून धरले. ॥५॥
तं भीमवेगा हरयो नाराचैः क्षतविक्षताः ।
अंधकारे न ददृशुः मेघैः सूर्यमिवावृतम् ॥ ६ ॥
बाणांनी क्षतविक्षत झाल्यावरही ते भयानक वेगवान्‌ वानर अंध:कारात मेघांनी झाकल्या गेलेल्या सूर्याप्रमाणे इंद्रजिताला पाहू शकले नाहीत. ॥६॥
रामलक्ष्मणयोरेव सर्वदेहभिदः शरान् ।
भृशमावेशयामास रावणिः समितिञ्जयः ॥ ७ ॥
तत्पश्चात्‌ युद्धविजयी रावणपुत्र इंद्रजित परत श्रीराम आणि लक्ष्मणावर त्यांच्या संपूर्ण अंगांना विदीर्ण करणार्‍या बाणांची वारंवार वृष्टि करू लागला. ॥७॥
निरंतरशरीरौ तौ तावुभौ रामलक्ष्मणौ ।
क्रुद्धेनेन्द्रजिता वीरौ पन्नगैः शरतां गतैः ॥ ८ ॥
कुपित झालेल्या इंद्रजितानी त्या दोन्ही वीरांना श्रीराम आणि लक्ष्मणांना बाणरूपधारी सर्पांच्या द्वारा याप्रकारे विंधून टाकले की त्यांच्या शरीरावर थोडेसेही असे स्थान राहिले नाही की जेथे बाण लागला नाही. ॥८॥
तयोः क्षतजमार्गेण सुस्राव रुधिरं बहु ।
तावुभौ च प्रकाशेते पुष्पिताविव किंशुकौ ॥ ९ ॥
त्या दोघांच्या अंगांत जे घाव झाले होते, त्यांच्या द्वारा खूपच रक्त वाहू लागले. त्या समयी ते दोघे भाऊ फुललेल्या दोन पळसाच्या वृक्षांच्या प्रमाणे प्रकाशित होत होते. ॥९॥
ततः पर्यन्तरक्ताक्षो भिन्नाञ्जनचयोपमः ।
रावणिर्भ्रातरौ वाक्यं अन्तर्धानगतोऽब्रवीत् ॥ १० ॥
त्याच वेळी ज्याचे नेत्रप्रांत किंचित्‌ लाल होते आणि शरीर खाणीतून खोदून काढलेल्या कोळशाच्या ढीगाप्रमाणे काळे होते, तो रावणकुमार इंद्रजित अंतर्धान - अवस्थेमध्येच त्या दोघां भावांना याप्रकारे बोलला- ॥१०॥
युद्ध्यमानमनालक्ष्यं शक्रोऽपि त्रिदशेश्वरः ।
द्रष्टुमासादितुं वापि न शक्तः किं पुनर्युवाम् ॥ ११ ॥
युद्धाच्या समयी अलक्ष्य झाल्यावर तर मला देवराज इंद्रही पाहू शकत नाही अथवा प्राप्त करू शकत नाही, मग तुम्हां दोघांची काय कथा ? ॥११॥
प्रापिताविषुजालेन राघवौ कङ्‌कपत्रिणा ।
एष रोषपरीतात्मा नयामि यमसादनम् ॥ १२ ॥
मी तुम्हां दोघा रघुवंशीयांना कंकपत्रयुक्त बाणांच्या जाळ्यात जखडून ठेवले आहे. आता रोषाने भरून मी आत्ता तुम्हा दोघांना यमाच्या घरी धाडून देतो. ॥१२॥
एवमुक्त्वा तु धर्मज्ञौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
निर्बिभेद शितैर्बाणैः प्रजहर्ष ननाद च ॥ १३ ॥
असे म्हणून तो धर्माचे ज्ञाते दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मणांना, तीक्ष्ण बाणांनी बांधू लागला आणि हर्षाचा अनुभव करीत जोर-जोराने गर्जना करू लागला. ॥१३॥
भिन्नाञ्जनचयश्यामो विस्फार्य विपुलं धनुः ।
भूयो भूयः शरान् घोरान् विससर्ज महामृधे ॥ १४ ॥
छिन्नभिन्न कोळशांच्या राशिप्रमाणे काळा इंद्रजित्‌ परत आपल्या विशाल धनुष्यास पसरवून त्या महासमरात घोर बाणांची वृष्टि करू लागला. ॥१४॥
ततो मर्मसु मर्मज्ञो मज्जयन् निशितान् शरान् ।
रामलक्ष्मणयोर्वीरो ननाद च मुहुर्मुहुः ॥ १५ ॥
मर्मस्थळांना जाणणारा तो वीर श्रीराम आणि लक्ष्मणांच्या मर्मस्थानात आपल्या तीक्ष्ण बाणांना बुडवीत वारंवार गर्जना करू लागला. ॥१५॥
बद्धौ तु शरबंधेन तावुभौ रणमूर्धनि ।
निमेषान्तरमात्रेण न शेकतुरुवेक्षितुम् ॥ १६ ॥
युद्धाच्या तोंडावरच बाणांच्या बंधनांनी बांधले गेलेले ते दोघे बंधु डोळ्याचे पाते लवते न लवते तोच अशा दशेला पोहोचले की त्यांना डोळे उघडून पहाण्याचीही शक्ती राहिली नाही. (वास्तविक ही त्यांची मनुष्यतेचे नाट्‍य करणारी लीला मात्र होती. ते तर काळाचे काळ होते. त्यांना कोण बांधू शकत होते ?) ॥१६॥
ततो विभिन्नसर्वाङ्‌गौ शरशल्याचितौ कृतौ ।
ध्वजाविव महेन्द्रस्य रज्जुमुक्तौ प्रकंपितौ ॥ १७ ॥
याप्रकारे त्यांचे सर्व अंग विंधले गेले. ते बाणांनी व्याप्त होऊन गेले. ते दोरीतून मुक्त झालेल्या देवराज इंद्राच्या दोन ध्वजांप्रमाणे कंपित होऊ लागले. ॥१७॥
तौ संप्रचलितौ वीरौ मर्मभेदेन कर्शितौ ।
निपेततुर्महेष्वासौ जगत्यां जगतीपती ॥ १८ ॥
ते महान्‌ धनुर्धर वीर भूपाल मर्मस्थळे भेदली गेल्याने विचलित आणि कृशकाय होऊन पृथ्वीवर कोसळले. ॥१८॥
तौ वीरशयने वीरौ शयानौ रुधिरोक्षितौ ।
शरवेष्टितसर्वाङ्‌गौ आर्तौ परमपीडितौ ॥ १९ ॥
युद्धभूमीमध्ये वीरशय्येवर झोपलेले ते दोन्ही वीर रक्तांनी न्हाऊन गेले होते. त्यांची सारी अंगे बाणरूपधारी नागांनी वेढलेली होती आणि ते अत्यंत पीडित आणि व्यथित होत होते. ॥१९॥
न ह्यविद्धं तयोर्गात्रे बभूवाङ्‌गुलमन्तरम् ।
नानिर्विण्णं न चाध्वस्त्वं आकराग्रादजिह्मगैः ॥ २० ॥
त्यांच्या शरीरावर एक बोटभरही जागा अशी राहिली नव्हती की जी बाणांनी विंधली गेली नव्हती. तसेच हातांच्या अग्रभागापर्यंत असे कुठलेही अंग नव्हते की जे बाणांनी विदीर्ण अथवा क्षुब्ध झाले नव्हते. ॥२०॥
तौ तु क्रूरेण निहतौ रक्षसा कामरूपिणा ।
असृक् सुस्रुवतुस्तीव्रं जलं प्रस्रवणाविव ॥ २१ ॥
जसे झर्‍यातून जल पडत राहाते त्याचप्रकारे ते दोघे भाऊ इच्छेनुसार रूप धारण करणार्‍या त्या क्रूर राक्षसाच्या बाणांनी घायाळ होऊन तीव्र वेगाने रक्ताची धार वहावत होते. ॥२१॥
पपात प्रथमं रामो विद्धो मर्मसु मार्गणैः ।
क्रोधादिन्द्रजिता येन पुरा शक्रो विनिर्जितः ॥ २२ ॥
ज्याने पूर्वकाळी इंद्राला परास्त केले होते, त्या इंद्रजिताच्या क्रोधपूर्वक सोडलेल्या बाणांच्या द्वारा मर्मस्थळी आहत होण्यामुळे प्रथम श्रीराम धराशायी झाले. ॥२२॥
रुक्मपुङ्‌खैः प्रसन्नाग्रैः रजोगतिभिराशुगैः ।
नाराचैरर्धनाराचैः भल्लैरञ्जलिकैरपि ।
विव्याध वत्सदन्तैश्च सिंहदंष्ट्रैः क्षुरैस्तथा ॥ २३ ॥
इंद्रजिताने त्यांना सोन्याचे पंख, स्वच्छ अग्रभाग आणि धूळीसमान गति असणारे (अर्थात्‌ धुळीप्रमाणे छिद्ररहित स्थानातही प्रवेश करणारे) शीघ्रगामी नाराच(१), अर्धनाराच(२), भल्ल(३), अञ्जलिक(४), वत्सदंत(५), सिंहद्रंष्ट्र(६) आणि क्षुर(७) जातिच्या बाणांच्या द्वारा घायाळ केले होते. ॥२३॥
(१-ज्यांचा अग्रभाग सरळ आणि गोल असतो त्या बाणाला नाराच म्हणतात. २-अर्ध्याभागात नाराचाची समानता ठेवणार्‍या बाणांना अर्धनाराच म्हटले जाते. ३-ज्यांचा अग्रभाग परशुसमान असतो, त्या बाणांना भल्ल संज्ञा आहे. आधुनिक भाल्यालाही भल्ल म्हणतात. ४- ज्याचा मुखभाग दोन्ही हातांच्या अंजलीसमान असतो तो बाण अञ्जलिक म्हटला जातो. ५- ज्याचा अग्रभाग वासराच्या दातांप्रमाणे दिसतो, त्या बाणाला वत्सदंत संज्ञा असते. ६- सिंहाच्या दाढेप्रमाणे अग्रभागाचा बाण सिंहद्रष्ट्र होय. ७- ज्याचा अग्रभाग सुरीच्या धारे प्रमाणे असतो त्याला क्षुर म्हटले जाते.)
स वीरशयने शिश्ये विज्यमाविध्य कार्मुकम् ।
भिन्नमुष्टिपरीणाहं त्रिनतं रुक्मभूषितम् ॥ २४ ॥
ज्याची प्रत्यञ्चा चढविलेली होती परंतु मुठीचे बंधन ढिले पडले होते, जे दोन्ही पार्श्वभाग आणि मध्यभाग या तीन्ही स्थानात वाकलेले होते तसेच सुवर्णाने भूषित होते त्या धनुष्याचा त्याग करून भगवान्‌ श्रीराम वीरशय्येवर झोपले होते. ॥।२४॥
बाणपातान्तरे रामं पतितं पुरुषर्षभम् ।
स तत्र लक्ष्मणो दृष्ट्‍वा निराशो जीवितेऽभवत् ॥ २५ ॥
फेकलेला बाण जितक्या अंतरावर जाऊन पडतो, आपल्यापासून इतक्या दूर अंतरावर पडलेल्या पुरूषप्रवर श्रीरामांना पाहून लक्ष्मण तेथे आपल्या जीवनाविषयी निराश होऊन गेले. ॥२५॥
रामं कमलपत्राक्षं शरण्यं रणतोषितम् ।
शुशोच भ्रातरं दृष्ट्‍वा पतितं धरणीतले ॥ २६ ॥
सर्वांना शरण (आश्रय) देणारे आणि युद्धाने संतुष्ट होणारे आपले भाऊ कमलनयन श्रीराम यांना पृथ्वीवर पडलेले पाहून लक्ष्मणांना अत्यंत शोक झाला. ॥२६॥
हरयश्चापि तं दृष्ट्‍वा संतापं परमं गताः ।
शोकार्ताश्चुक्रुशुर्घोरं अश्रुपूरितलोचनाः ॥ २७ ॥
त्यांना त्या अवस्थेत पाहून वानरांनाही फार ताप झाला. ते शोकाने आतुर होऊन डोळ्यांत अश्रु भरून घोर आर्तनाद करू लागले. ॥२७॥
बद्धौ तु वीरौ पतितौ शयानौ
तौ वानराः संपम्परिवार्य तस्थुः ।
समागता वायुसुतप्रमुख्या
विषादमार्ताः परमं च जग्मुः ॥ २८ ॥
नागपाशात बद्ध होऊन वीरशय्येवर झोपलेल्या त्या दोन्ही भावांना चोहोबाजूनी घेरून सर्व वानर उभे राहिले. तेथे आलेले हनुमान्‌ आदि मुख्य मुख्य वानर व्यथित होऊन मोठ्‍या विषादात पडले. ॥२८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे पञ्चचत्वारिंशः सर्गः ॥ ४५ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा पंचेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP