॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ उत्तरकाण्ड ॥ ॥ षष्ठः सर्गः ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] लवणाचा वध, भगवान रामांच्या यज्ञात कुश-लव यांच्यासह महर्षी वाल्मीकींचे आगमन आणि कुशाला परमार्थाचा उपदेश श्रीमहादेव उवाच एकदा मुनयः सर्वे यमुनातीरवासिनः । आजग्मू राघवं द्रष्टुं भयात् लवणरक्षसः ॥ १ ॥ श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, यमुनानदीच्या तीरावर राहाणारे सर्व मुनी एकदा लवण राक्षसाच्या भीतीमुळे राघवांना भेटण्यास आले. (१) कृत्वाग्रे तु मुनिश्रेष्ठं भार्गवं च्यवनं द्विजाः । असङ्ख्यायाताः समायाता रामाद् अभयकाङ्क्षिणः ॥ २ ॥ श्रीरामांकडून अभय मिळविण्याची इच्छा असणारे ते असंख्य ब्राह्मण भृगुपुत्र च्यवन या मुनिश्रेष्ठांना पुढे करून आले होते. (२) तान्पूजयित्वा परया भक्त्या रघुकुलोत्तमः । उवाच मधुरं वाक्यं हर्षयन् मुनिमण्डलम् ॥ ३ ॥ अतिशय भक्तीने त्यांचा सत्कार करून, त्या मुनिसमुदायाला आनंद देत, रघुकुलश्रेष्ठ श्रीराम मधुर शब्दांत बोलले. (३) करवाणि मुनिश्रेष्ठाः किं आगमनकारणम् । धन्योऽस्मि यदि यूयं मां प्रीत्या द्रष्टुमिहागताः ॥ ४ ॥ "हे मुनिश्रेष्ठांनो, तुमच्या आगमनाचे काय कारण आहे ? तुम्ही मला जशी आज्ञा कराल तसे मी करीन. जर तुम्ही प्रेमाने मला भेटण्यास आला असाल तर मी धन्य आहे. (४) दुष्करं चापि यत्कार्यं भवतां तत्करोम्यहम् । आज्ञापयन्तु मां भृत्यं ब्राह्मणा दैवतं हि मे ॥ ५ ॥ आपले जे काही दुष्कर कार्य असेल, तेसुद्धा मी करीन. मज सेवकाला तुम्ही आज्ञा द्या. कारण ब्राह्मण हेच माझे इष्ट दैवत आहे." (५) तत् श्रुत्वा सहसा हृष्टः च्यवनो वाक्यमब्रवीत् । मधुनामा महादैत्यः पुरा कृतयुगे प्रभो ॥ ६ ॥ आसीदतीव धर्मात्मा देवब्रह्मणपूजकः । तस्य तुष्टो महादेवो ददौ शूलमनुत्तमम् ॥ ७ ॥ प्राह चानेन यं हंसि स तु भस्मीभविष्यति । रावणस्यानुजा भार्या तस्य कुम्भीनसी श्रुता ॥ ८ ॥ ते श्रीरामांचे वचन ऐकल्यावर च्यवन आनंदित झाले आणि म्हणाले, "हे प्रभो, पूर्वी कृतयुगामध्ये मधू नावाचा एक महादैत्य अतिशय धर्मात्मा आणि देव व ब्राह्मण यांची पूजा करणारा होता. त्याच्यावर प्रसन्न झालेल्या भगवान महादेवांनी त्याला एक अतिशय उत्तम शूल दिला आणि त्याला सांगितले, 'या शूलाने तू ज्याला तडाखा देशील तो भस्मीभूत होऊन जाईल.' असे म्हणतात की रावणाची धाकटी बहीण कुंभीनसी ही त्याची भार्या होती. (६-८) तस्यां तु लवणो नाम राक्षसो भीमविक्रमः । आसीत् दुरात्मा दुर्धर्षो देवब्राह्मणहिंसकः ॥ ९ ॥ तिच्यापासून लवण नावाचा भयंकर पराक्रमी, दुष्ट मनाचा, दुर्जय आणि देव व ब्राह्मण यांची हिंसा करणारा राक्षस उत्पन्न झाला होता. (९) पीडितास्तेन राजेन्द्र वयं त्वां शरणं गताः । तच्छ्रुत्वा राघवोऽप्याह मा भीर्वो मुनिपुङ्गवाः ॥ १० ॥ हे राजेंद्रा, त्याच्याकडून त्रस्त होऊन आम्ही तुम्हांला शरण आलो आहोत. " ते ऐक्क्यावर राघवसुद्धा म्हणाले, "हे मुनिश्रेष्ठानो, तुम्ही कोणतीही भीती बाळगू नका. (१०) लवणं नाशयिष्यामि गच्छन्तु विगतज्वराः । इत्युक्त्वा प्राह रामोऽपि भ्रातृन् को वा हनिष्यति ॥ ११ ॥ लवणं राक्षसं दद्यात् ब्राह्मणेभ्योऽभयं महत् । तत् श्रुत्वा प्राञ्जलिः प्राह भरतो राघवाय वै ॥ १२ ॥ मी लवणाचा नाश करतो. तुम्ही चिंता न करता जा." असे सांगून श्रीराम आपल्या भावांना म्हणाले, "तुमच्यापैकी लवण राक्षसाचा वध कोण करील ? आणि ब्राह्मणांना मोठे अभय देईल ?" ते ऐकून हात जोडून भरत राघवांना म्हणाला. (११-१२) अहमेव हनिष्यामि देवाज्ञापय मां प्रभो । ततो रामं नमस्कृत्य शत्रुघ्नो वाक्यमब्रवीत् ॥ १३ ॥ " महाराज, मीच लवणाचा वध करीन. हे प्रभो, मला आज्ञा द्या." तेव्हा श्रीरामांना नमस्कार करून शत्रुघ्न म्हणाला. (१३) लक्ष्मणेन महत्कार्यं कृतं राघवसंयुगे । नन्दिग्रामे महाबुद्धिः भरतो दुःखमन्वभूत् ॥ १४ ॥ "हे राघवा, युद्धामध्ये लक्ष्मणाने फार मोठे कार्य केले आहे. महाबुद्धिमान भरताने नंदिग्रामात राहून दुःख अनुभवले आहे. (१४) अहमेव गमिष्यामि लवणस्य वधाय च । त्वत्प्रसादात् रघुश्रेष्ठ हन्यां तं राक्षसं युधि ॥ १५ ॥ तेव्हा आता लवणाचा वध करण्यास मीच जातो. हे रघुश्रेष्ठा, तुमच्या प्रसादाने मी त्या राक्षसाला युद्धामध्ये ठार करतो." (१५) तच्छ्रुत्वा स्वाङ्कमारोप्य शत्रुघ्नं शत्रुसूदनः । प्राहाद्यैवाभिषेक्ष्यामि मथुराराज्यकारणात् ॥ १६ ॥ ते ऐकल्यावर श्त्रुघातक श्रीरामांनी शत्रुघ्नाला आपल्याजवळ बसविले आणि म्हटले, "आजच मी तुला लवणाच्या मधुरानगरीच्या राज्यावर अभिषेक करतो." (१६) आनाय्य च सुसम्भारा लक्षमणेनाभिषेचने । अनिच्छन्तमपि स्नेहात् अभिषेकं अकारयत् ॥ १७ ॥ मग लक्ष्मणाकडून राज्याभिषेकाचे सर्व साहित्य आणवून घेऊन, शत्रुघ्नाची इच्छा नसतानाही, रामांनी प्रेमपूर्वक शत्रुघ्नावर अभिषेक करविला. (१७) दत्त्वा तस्मै शरं दिव्यं रामः शत्रुघ्नमब्रवीत् । अनेन जहि बाणेन लवणं लोककण्टकम् ॥ १८ ॥ नंतर त्या शत्रुघ्नाला एक दिव्य बाण देऊन श्रीराम त्याला म्हणाले, "लोकांना काट्याप्रमाणे सलणाऱ्या त्या लवणाला तू या बाणाने ठार कर. (१८) स तु सम्पूज्य तच्छूलं गेहे गच्छति काननम् । भक्षणार्थं तु जन्तूनां नानाप्राणिवधाय च ॥ १९ ॥ तो शंकरांनी दिलेल्या शूलाची पूजा घरातच करतो व जीवजंतूंना खाण्यासाठी आणि नाना प्रकारच्या प्राण्यांचा वध करण्यासाठी अरण्यात जात असतो. (१९) स तु नायाति सदनं यावद्वनचरो भवेत् । तावदेव पुरद्वारि तिष्ठ त्वं धृतकार्मुकः ॥ २० ॥ तेव्हा जोपर्यंत तो घरी परत येत नाही आणि वनातच फिरत असतो, तोपर्यंत तू हातात धनुष्य घेऊन, त्याच्या नगराच्या द्वारात उभा रहा. (२०) योत्स्यते स त्वया क्रुद्धः तदा वध्यो भविष्यति । तं हत्वा लवणं क्रूरं तद्वनं मधुसंज्ञितम् ॥ २१ ॥ निवेश्य नगरं तत्र तिष्ठ त्वं मेऽनुशासनात् । अश्वानां पञ्चसाहस्रं रथानां च तदर्धकम् ॥ २२ ॥ गजानां षट् शतानीह पत्तिनामयुतत्रयम् । आगमिष्यति पञ्चात्त्वं अग्रे साधय राक्षसम् ॥ २३ ॥ तो परत आल्यावर रागाने तो त्रिशूळाशिवाय तुझ्याशी युद्ध करील आणि त्याचवेळी त्याचा वध करणे योग्य होईल. त्या क्रूर लवणाला ठार केल्यावर, तू त्याच्या मधू नावाच्या वनात एक नगर बसव आणि माझ्या आज्ञेनुसार तू तेथेच राहू लाग. तू प्रथम पुढे जाऊन त्या राक्षसाचा वध कर. त्यानंतर तुझ्या मागोमाग पाच हजार घोडे, अडीच हजार रथ, सहाशे हत्ती आणि तीस हजार पायदळ सैन्य तेथे येईल. " (२१-२३) इत्युक्त्वा मूर्ध्न्यवघ्राय प्रेषयामास राघवः । शत्रुघ्नं मुनिभिः सार्धं आशीर्भिरभिनन्द्य च ॥ २४ ॥ श्रीरामांनी असे सांगून त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले व अनेक आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले आणि मुनींच्याबरोबर शत्रुघ्नाला पाठवून दिले. (२४) शत्रुघ्नोऽपि तथा चक्रे यथा रामेण चोदितः । हत्वा मधुसुतं युद्धे मथुरां अकरोत्पुरीम् ॥ २५ ॥ श्रीरामांनी आज्ञा केली होती त्या प्रमाणे शत्रुघ्नाने केले. युद्धामध्ये मधुपुत्र लवणाचा वध करून त्याने मथुरा नगरी वसविली. (२५) स्फीतां जनपदां चक्रे मथुरां दानमानतः । सीतापि सुषुवे पुत्रौ द्वौ वाल्मीकेरथाश्रमे ॥ २६ ॥ नंतर लोकांना दान आणि मान देऊन शत्रुघ्नानेसुद्धा मथुरा नगरीला एक समृद्धशाली नगर बनविले. त्या सुमारास वाल्मीकीच्या आश्रमात सीतेने दोन पुत्रांना जन्म दिला. (२६) मुनिस्तयोर्नाम चक्रे कुशो ज्येष्टोऽनुजो लवः । क्रमेण विद्यासम्पन्नौ सीतापुत्रौ बभूवतुः ॥ २७ ॥ ज्येष्ठ पुत्राला कुश आणि धाकट्याला लव अशी नावे वाल्मीकी मुनींनी ठेवली. ते सीतेचे, पुत्र क्रमाने विद्यासंपन्न झाले. (२७) अपनितौ च मुनिना वेदाध्ययनतत्परौ । कृत्स्नं रामायणं प्राह काव्यं बालकयोर्मुनिः ॥ २८ ॥ वाल्मीकी मुनींनी त्यांचे उपनयन केले. मग ते वेदाच्या अध्ययनात तत्पर झाले. त्या दोन बालकांना वाल्मीकी मुनींनी संपूर्ण रामायण काव्य शिकविले. (२८) शङ्करेण पुरा प्रोक्तं पार्वत्यै पुरहारिणा । वेदोपबृंहनार्थाय तावग्राहयत प्रभुः ॥ २९ ॥ जे रामायण पूर्वी त्रिपुरनाशक शंकराने पार्वतीला कथन केले होते, तेच रामायण वेदाचा अर्थ विस्तृतपणे तपशीलवार कळावा म्हणून वाल्मीकी ऋषींनी त्या दोघांना शिकविले. (२९) कुमारौ स्वरसम्पन्नौ सुन्दरौ अश्विनौ इव । तन्त्रीतालसमायुक्तौ गायन्तौ चेरतुर्वने ॥ ३० ॥ अश्विनीकुमाराप्रमाणे सुंदर आणि गोड आवाजाने ते दोघे कुमार वीणेच्या तालावर रामायण गात वनात फिरत असत. (३०) तत्र तत्र मुनीनां तौ समाजे सुररूपिणौ । गायन्तावभितो दृष्ट्वा विस्मिता मुनयोऽब्रुवन् ॥ ३१ ॥ जागोजाग मुनींच्या समाजात देवांप्रमाणे सुंदर रूप असणाऱ्या त्या दोघांना सर्वत्र रामायण गात असताना पाहून विस्मित झालेले मुनी म्हणत की, (३१) गन्धर्वेष्विव किन्नरेषु भुवि वा देवेषु देवालये पातालेष्वथवा चतुर्मुखगृहे लोकेषु सर्वेषु च । अस्माभिश्चिरजीविभिश्चिरतरं दृष्ट्वा दिशः सर्वतो नाज्ञायीदृशगीतवाद्यगरिमा नादर्शि नाश्रावि च ॥ ३२ ॥ "आम्ही पुष्कळ काळ जगलो. पुष्कळ काळपर्यंत आम्ही सर्व दिशा पाहिल्या. तथापि अनेक गंधर्व व किन्नर, पृथ्वी, स्वर्ग., अनेक पाताळे, नागलोक अथवा ब्रह्मलोक- इत्यादी ठिकाणी अशा प्रकारचे गायन व वादन यांतील कौशल्य आम्हांला कुठेच पाहाण्यास अथवा ऐकण्यास मिळाले नाही. " (३२) एवं स्तुवद्भिरखिलैः मुनिभिः प्रतिवासरम् । आसाते सुखमेकान्ते वाल्मीकेराश्रमे चिरम् ॥ ३३ ॥ अशा प्रकारे दररोज सर्व मुनी त्यांची स्तुती करीत असताना, ते दोघे वाल्मीकीच्या एकांत आश्रमात सुखाने राहात होते. (३३) अथ रामेऽश्वमेधादीन् चकार बहुदक्षिणान् । यज्ञान् स्वर्णमयीं सीतां विधाय विपुलद्युतिः ॥ ३४ ॥ इकडे सुवर्णमय सीता तयार करवून घेऊन, अत्यंत तेजस्वी रामांनी पुष्कळ दक्षिणेने युक्त असे अश्वमेध इत्यादी यज्ञ केले. (३४) तस्मिन्विताने ऋषयः सर्वे राजर्षयस्तथा । ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्याः समाजग्मुर्दिदृक्षवः ॥ ३५ ॥ त्या वेळी सर्व ऋषी, राजर्षी, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हा यज्ञोत्सव पाहाण्याच्या इच्छेने यज्ञमंडपात आले होते. (३५) वाल्मीकिरपि सङ्गृह्य गायन्तौ तौ कुशीलवौ । जगाम ऋषिवाटस्य समीपं मुनिपुङ्गवः ॥ ३६ ॥ मुनिश्रेष्ठ वाल्मीकीसुद्धा गायन करणाऱ्या कुश-लवांना घेऊन तेथे आले आणि ऋषींच्यासाठी तयार केलेल्या निवासस्थानी उतरले. (३६) तत्रैकान्ते स्थितं शान्तं समाधिविरमे मुनिम् । कुशः पप्रच्छ वाल्मीकिं ज्ञानशास्त्रं कथान्तरे ॥ ३७ ॥ एके दिवशी तेथे एकांतस्थानी शांतपणे बसलेल्या वाल्प्मीकी मुनींना त्यांची समाधी उतरल्यावर, बोलता बोलता, कुशाने ज्ञानशास्त्राविषयी पृच्छा केली. (३७) भगवञ्छ्रोतुमिच्छामि सङ्क्षेपाद्भवतोऽखिलम् । देहिनः संसृतिर्बन्धः कथं उत्पद्यते दृढः ॥ ३८ ॥ कथं विमुच्यते देही दृढबन्धाद्भवाभिधात् । वक्तुमर्हसि सर्वज्ञ मह्यं शिष्याय ते मुने ॥ ३९ ॥ तो म्हणाला, "हे भगवन, तुमच्याकडून सर्व काही मी संक्षेपाने ऐकू इच्छितो. देहधारी जीवाच्या बाबतीत संसाराचा हा दृढ बंध कसा बरे उत्पन्न होतो ? आणि संसार हे नाव असणाऱ्या या दृढ बंधनापासून तो देहधारी जीव कसा बरे सुटतो ? हे मुनी, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमचा शिष्य म्हणून मला तुम्ही हे सर्व सांगा." (३८-३९) वाल्मीकिरुवाच शृणु वक्ष्यामि ते सर्वं सङ्क्षेपाद्बन्धमोक्षयोः । स्वरूपं साधनं चापि मत्तः श्रुत्वा यथोदितम् ॥ ४० ॥ तथैवाचर भद्रं ते जीवन्मुक्तो भविष्यसि । देह एव महागेहं अदेहस्य चिदात्मनः ॥ ४१ ॥ वाल्मीकी म्हणाले- "ऐक. बंध आणि मोक्ष यांचे स्वरूप तसेच बंधनातून सुटण्याचे साधन हे सर्व मी तुला संक्षेपाने सांगतो. ते माझ्याकडून ऐकल्यावर, मी जसे सांगेन त्या प्रमाणे तू आचार कर. त्यामुळे तुझे कल्याण होईल. तू जीवमुक्त होशील. मूलतः देहहीन असणाऱ्या चेतन आत्म्याचे हा देह हेच एक मोठे घर आहे. (४०-४१) तस्याहङ्कार एवास्मिन् मन्त्री तेनैव कल्पितः । देहगेहाभिमानं स्वं समारोप्य चिदात्मनि ॥ ४२ ॥ तेन तादात्म्यमापन्नः स्वचेष्टितं अशेषतः । विदधाति चिदानन्दे तद्वासितवपुः स्वयम् ॥ ४३ ॥ तेन सङ्कल्पितो देही सङ्कल्पनिगडावृतः । पुत्रदारगृहादीनि सङ्कल्पयति चानिशम् ॥ ४४ ॥ या देहामध्ये जीवाने अहंकारालाच आपला मंत्री केले आहे. हा अहंकार त्यानेच कल्पिलेला आहे. देह आणि घर यांवरील स्वतःचा अहंकार तो चिदात्म्यावर आरोपित करतो; मग त्याच्याशी तादात्म्य होऊन, तो आपल्या सर्व क्रिया चिदानंद आत्म्यावर आरोपित करतो. त्या अहंकारामुळे व्याप्त झालेला देहधारी जीव हा त्या अहंकाराने प्रेरित होऊन, संकल्परूपी बेडीने बद्ध होतो आणि तो रात्रंदिवस पुत्र, पत्नी, घर इत्यादींचा संकल्प करीत राहातो. (४२-४४) सङ्कल्पयन् स्वयं देही परिशोचति सर्वदा । त्रयस्तस्याहमो देहा अधमोत्तम मध्यमाः ॥ ४५ ॥ तमः सत्त्वरजः संज्ञा जगतः कारणं स्थितेः । तमोरूपाद्धि सङ्कल्पान् नित्यं तामसचेष्टया ॥ ४६ ॥ अत्यन्तं तामसो भूत्वा कृमिकीटत्वमाप्नुयात् । सत्त्वरूपो हि सङ्कल्पो धर्मज्ञानपरायणः ॥ ४७ ॥ अदूरमोक्षसाम्राज्यः सुखरूपो हि तिष्ठति । रजोरूपो हि सङ्कल्पो लोके स व्यवहारवान् ॥ ४८ ॥ परितिष्ठति संसारे पुत्रदारानुरञ्जितः । त्रिविधं तु परित्यज्य रूपमेतन् महामते ॥ ४९ ॥ सङ्कल्पं परमाप्नोति पदमात्मपरिक्षये । दृष्टीः सर्वाः परित्यज्य नियम्य मनसा मनः ॥ ५० ॥ सबाह्याभ्यन्तरार्थस्य सङ्कल्पस्य क्षयं कुरु । यदि वर्षसहस्राणि तपश्चरसि दारुणम् ॥ ५१ ॥ पातालस्थस्य भूस्थस्य स्वर्गस्थस्यापि तेऽनघ । नान्यः कश्चिदुपायोऽस्ति सङ्कल्प उपशमादृते ॥ ५२ ॥ असा संकल्प करणारा देहधारी जीव स्वतःच सर्वदा शोक करीत राहातो. त्या अहंकाराचे उत्तम, मध्यम आणि अधम असे तीन प्रकारचे देह आहेत. त्यांना अनुक्रमाने सत्त्व, रज आणि तम अशी नावे आहेत. हे तिन्ही देह जगाच्या स्थितीचे कारण आहेत. तामस संकल्पामुळे तामस क्रिया केल्याने तमोगुणी जीव कृमी, किडे इत्यादी योनींमध्ये पडतो. सात्त्विक संकल्पाचा जीव हा धर्म व ज्ञान यांमध्ये तत्पर असल्यामुळे सहजपणे मोक्ष-साम्राज्याजवळ राहतो आणि राजस संकल्प असलेला जीव लोकव्यवहार सांभाळत पुत्र व स्त्री यांचेमध्ये अनुरक्त असतो. हे महान बुद्धिमंता, जेव्हा पुरुष संकल्पाच्या त्रिविध रूपांचा त्याग करतो, त्या वेळी चित्ताचा लय झाल्यावर त्याला परमपद प्राप्त होते. म्हणून विषयासंबंधीचे सर्व विचार टाकून आणि मनानेच मनाचे नियमन करून, तू बाह्य व अंतर अशा विषयांबद्दलच्या संकल्पांचा नाश कर. हे वत्सा, पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग येथे राहून जरी तू हजारो वर्षे कठोर तप केलेस तरी संसाराच्या बंधनातून सुटण्यास संकल्पाच्या नाशाखेरीज अन्य कोणताही उपाय तुला सापडणार नाही. (४५-५२) अनाबाधेऽविकारे स्वे सुखे परमपावने । सङ्कल्पोपशमे यत्नं पौरुषेण परं कुरु ॥ ५३ ॥ म्हणून बाधारहित, स्वानंद-स्वरूप आणि परम पावन अशा संकल्प-नाशासाठी तू धैर्यपूर्वक खूप प्रयत्न कर. (५३) सङ्कल्पतन्तौ निखिला भावाः प्रोताः किलानघ । छिन्ने तन्तौ न जानीमः क्व यान्ति विभवाः पराः ॥ ५४ ॥ हे तात, सर्व भाव हे संकल्परूपी तंतूने विणलेले असतात. असे म्हटले जाते. हा तंतू तुटताच संसारातील अन्य भौतिक ऐश्वर्य कुठे जाते, हे आपणास कळत नाही. (५४) निःसङ्कल्पो यथाप्राप्त व्यवहारपरो भव । क्षये सङ्कल्पजालस्य जीवो ब्रह्मत्वमाप्नुयात् ॥ ५५ ॥ म्हणून संकल्परहित होऊन, प्रारब्धाने जसा प्राप्त झाला आहे, तसा व्यवहार करण्यात तू तत्पर राहा. संकल्पाचे जाळे नष्ट झाल्यावर, जीव हा ब्रह्मत्व प्राप्त करूनघेतो. (५५) अधिगतपरमार्थतामुपेत्य प्रसभमपास्य विकल्पजालमुच्चैः । अधिगमय पदं तदद्वितीयं विततसुखाय सुषुप्तचित्तवृत्तिः ॥ ५६ ॥ परमार्थाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन, फार मोठे असे विकल्पाचे जाळे तू बळजबरीने दूर सार आणि सतत आनंद मिळविण्यासाठी, चित्तवृत्ती संपूर्णपणे लीन करून, तू ते अद्वितीय पद प्राप्त करून घे. " (५६) इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥ इति श्रीमद्अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥ |