श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। त्रिसप्ततितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामादीनां चतुर्णां भ्रातॄणां विवाहः - श्रीराम आदि चारी भावांचा विवाह -
यस्मिंस्तु दिवसे राजा चक्रे गोदानमुत्तमम् ।
तस्मिंस्तु दिवसे वीरो युधाजित् समुपेयिवान् ॥ १ ॥

पुत्रः केकयराजस्य साक्षाद्‍भरतमातुलः ।
दृष्ट्‍वा पृष्ट्‍वा च कुशलं राजानमिदमब्रवीत् ॥ २ ॥
राजा दशरथांनी ज्या दिवशी आपल्या पुत्रांच्या विवाहाच्या निमित्ताने उत्तम गोदान केले त्याच दिवशी भरतांचे सख्खे मामा केकय राजकुमार युधाजित् तेथे येऊन पोहोंचले. त्यांनी महाराजांचे दर्शन करून कुशल मंगल विचारले आणि म्हणाले - ॥ १-२ ॥
केकयाधिपती राजा स्नेहात् कुशलमब्रवीत् ।
येषां कुशलकामोऽसि तेषां सम्प्रत्यनामयम् ॥ ३ ॥

स्वस्रीयं मम राजेन्द्र द्रष्टुकामो महीपतिः ।
तदर्थमुपयातोऽहमयोध्यां रघुनन्दन ॥ ४ ॥
रघुनन्दन ! केकय देशाच्या महाराजांनी अत्यंत स्नेहाने आपला कुशल समाचार विचारला आणि आपणही आमच्याकडील ज्या ज्या लोकांची कुशल वार्ता जाणू इच्छित असाल ते सर्व या समयी स्वस्थ आणि सानन्द आहेत. राजेंद्र ! केकय नरेश माझा भाचा भरत यास पाहू इच्छितात म्हणून त्यांना घेऊन जाण्यासाठीच मी अयोध्येस आलो होतो. ॥ ३-४ ॥
श्रुत्वा त्वहमयोध्यायां विवाहार्थं तवात्मजान् ।
मिथिलामुपयातांस्तु त्वया सह महीपते ॥ ५ ॥

त्वरयाभ्युपयातोऽहं द्रष्टुकामः स्वसुः सुतम् ।
परंतु पृथ्वीनाथ ! अयोध्येत आपण सर्व पुत्रांच्या विवाहासाठी मिथिलेला आला असून सर्व पुत्र आपल्याबरोबर येथेच आले आहेत असे ऐकले, आणि तात्काळ मी इकडे निघून आलो. कारण माझ्या मनांत आपल्या बहिणीच्या पुत्राला पाहण्याची फार लालसा होती.' ॥ ५ १/२ ॥
अथ राजा दशरथः प्रियातिथिमुपस्थितम् ॥ ६ ॥

दृष्ट्‍वा परमसत्कारैः पूजनार्हमपूजयत् ।
महाराज दशरथांनी आपल्या प्रिय अतिथीला उपस्थित पाहून अत्यंत सत्कारपूर्वक त्याचा पाहुणचार केला. कारण ते सन्मानास योग्य होते. ॥ ६ १/२ ॥
ततस्तामुषितो रात्रिं सह पुत्रैर्महात्मभिः ॥ ७ ॥

प्रभाते पुनरुत्थाय कृत्वा कर्माणि तत्त्ववित् ।
ऋषींस्तदा पुरस्कृत्य यज्ञवाटमुपागमत् ॥ ८ ॥
तद्‌नंतर आपल्या महामनस्वी पुत्रांसह ती रात्र व्यतीत करून ते तत्त्वज्ञ नरेश प्रातःकाळी उठले आणि नित्यकर्म करून ऋषींना पुढे करून जनकांच्या यज्ञशाळेत जाऊन पोहोंचले. ॥ ७-८ ॥
युक्ते मुहूर्ते विजये सर्वाभरणभूषितैः ।
भ्रातृभिः सहितो रामः कृतकौतुकमङ्‍गलः ॥ ९ ॥

वसिष्ठं पुरतः कृत्वा महर्षीनपरानपि ।
वसिष्ठो भगवानेत्य वैदेहमिदमब्रवीत् ॥ १० ॥
तत्पश्चात् विवाहास योग्य विजय नामक मुहूर्त आल्यावर नवरदेवास अनुरूप समस्त वेष-भूषेने अलंकृत होऊन भावांसह श्रीरामचंद्रही तेथे आले. त्यांनी विवाहकालोचित मंगलाचार पूर्ण केलेले होते आणि वसिष्ठ मुनि तसेच अन्यान्य महर्षिंना पुढे करून मण्डपात आले. त्या समयी भगवान् वसिष्ठांनी विदेहराज जनकांच्याजवळ जाऊन म्हटले - ॥ ९-१० ॥
राजा दशरथो राजन् कृतकौतुकमङ्‍गलैः ।
पुत्रैर्नरवरश्रेष्ठ दातारमभिकाङ्‍क्षते ॥ ११ ॥
'राजन् ! नरेशांत श्रेष्ठ महाराज दशरथ आपल्या पुत्रांचा वैवाहिक सूत्रबंधनरूप मंगलाचार संपन्न करून सर्वांसह आलेले आहेत आणि आत येण्यासाठी आपल्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. ॥ ११ ॥
दातृप्रतिगृहीतृभ्यां सर्वार्थाः सम्भवन्ति हि ।
स्वधर्मं प्रतिपद्यस्व कृत्वा वैवाह्यमुत्तमम् ॥ १२ ॥
कारण दाता आणि प्रतिग्रहीता (दान ग्रहण करणारा) यांचा संयोग होण्यावरच समस्त दान-धर्माचे संपादन संभव होत असते. म्हणून आपण विवाह कालोपयोगी शुभ कर्मांचे अनुष्ठान करून त्यांना बोलवावे आणि कन्यादान रूपी स्वधर्माचे पालन करावे. ॥ १२ ॥
इत्युक्तः परमोदारो वसिष्ठेन महात्मना ।
प्रत्युवाच महातेजा वाक्यं परमधर्मवित् ॥ १३ ॥
महात्मा वसिष्ठांनी असे म्हटल्यावर परम उदार, परम धर्मज्ञ, आणि महातेजस्वी राजा जनकांनी या प्रकारे उत्तर दिले - ॥ १३ ॥
कः स्थितः प्रतिहारो मे कस्याज्ञां सम्प्रतीक्षते ।
स्वगृहे को विचारोऽस्ति यथा राज्यमिदं तव ॥ १४ ॥

कृतकौतुकसर्वस्वा वेदिमूलमुपागताः ।
मम कन्या मुनिश्रेष्ठ दीप्ता वह्नेरिवार्चिषः ॥ १५ ॥
मुनिश्रेष्ठ ! महाराजांसाठी माझ्या येथे कुठला पहारेकरी उभा आहे ? ते कुणाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत ? आपल्या घरात येण्यासाठी कसला विचार जरूर आहे ? हे जसे माझे राज्य आहे तसेच ते आपले आहे. माझ्या कन्यांचे वैवाहिक सूत्र-बंधनरूप मंगलकृत्य संपन्न होऊन चुकले आहे. आता त्या यज्ञवेदीच्या जवळ येऊन बसलेल्या आहेत, आणि अग्निच्या प्रज्वलित शिखांप्रमाणे प्रकाशित होत आहेत. ॥ १४-१५ ॥
सद्योऽहं त्वत्प्रतीक्षोऽस्मि वेद्यामस्यां प्रतिष्ठितः ।
अविघ्नं कुरुतां सर्वं किमर्थं हि विलम्ब्यते ॥ १६ ॥
या समयी तर मी आपल्याच प्रतीक्षेत वेदीवर बसलेला आहे. आपण निर्विघ्नपूर्वक सर्व कार्य पूर्ण करावे. विलंब कशासाठी करीत आहात ? ॥ १६ ॥
तद् वाक्यं जनकेनोक्तं श्रुत्वा दशरथस्तदा ।
प्रवेशयामास सुतान् सर्वानृषिगणानपि ॥ १७ ॥
वसिष्ठांच्या मुखाने राजा जनकांनी सांगितलेली गोष्ट ऐकून महाराज दशरथ त्या समयी आपले पुत्र आणि सर्व महर्षिंना महालाच्या आत घेऊन आले. ॥ १७ ॥
ततो राजा विदेहानां वसिष्ठमिदमब्रवीत् ।
कारयस्व ऋषे सर्वामृषिभिः सहधार्मिक ॥ १८ ॥

रामस्य लोकरामस्य क्रियां वैवाहिकीं प्रभो ।
त्यानंतर विदेहराजांनी वसिष्ठांना सांगितले - "धर्मात्मा महर्षे ! प्रभो ! आपण ऋषिंना बरोबर घेऊन लोकाभिराम श्रीरामचंद्रांच्या विवाहाची संपूर्ण क्रिया करवावी." ॥ १८ १/२ ॥
तथेत्युक्त्वा तु जनकं वसिष्ठो भगवानृषिः ॥ १९ ॥

विश्वामित्रं पुरस्कृत्य शतानन्दं च धार्मिकम् ।
प्रपामध्ये तु विधिवद् वेदिं कृत्वा महातपाः ॥ २० ॥

अलंचकार तां वेदिं गन्धपुष्पैः समन्ततः ।
सुवर्णपालिकाभिश्च चित्रकुम्भैश्च साङ्‍कुरैः ॥ २१ ॥

अङ्‍कुराढ्यैः शरावैश्च धूपपात्रैः सधूपकैः ।
शङ्‍खपात्रैः स्रुवैः स्रग्भिः पात्रैरर्घ्यादिपूजितैः ॥ २२ ॥

लाजपूर्णैश्च पात्रीभिरक्षतैरपि संस्कृतैः ।
दर्भैः समैः समास्तीर्य विधिवन्मन्त्रपूर्वकम् ॥ २३ ॥

अग्निमाधाय तं वेद्यां विधिमन्त्रपुरस्कृतम् ।
जुहावाग्नौ महातेजा वसिष्ठो मुनिपुङ्गवः ॥ २४ ॥
तेव्हां जनकांना 'अति उत्तम' असे म्हणून महातपस्वी भगवान् वसिष्ठ मुनिंनी विश्वामित्र आणि धर्मात्मा शतानन्दांना पुढे करून विवाह मण्डपाच्या मध्यभागी विधिपूर्वक वेदी बनविली आणि गंध तथा फुलांच्या द्वारे तिला चारी बाजूंनी सुंदर रूपात सजविली. त्याचबरोबर बर्‍याच सुवर्ण्याच्या पालख्या, यवाच्या अंकुरांनी चित्रित कलश, अंकुर आलेले मातीचे परळ, धूपयुक्त धूपपत्रे, शंखपात्रे, स्त्रुवा, स्त्रुक, अर्घ्य आदि पूजेची पात्रे (उपकरणी), लाह्यांनी भरलेली पात्रे, धुतलेल्या अक्षता आदि समस्त सामग्री यथास्थानी ठेवली. तत्पश्चात् महातेजस्वी मुनिवर वसिष्ठांनी लांबीने एकसारखे असे कुश वेदीच्या चारी बाजूंना पसरून मंत्रोच्चारण करीत विधिपूर्वक अग्नि स्थापन केला आणि विधिला प्रधानता देऊन मंत्रपाठ पूर्वक प्रज्वलित अग्नित हवन केले. ॥ १९-२४ ॥
ततः सीतां समानीय सर्वाभरणभूषिताम् ।
समक्षमग्नेः संस्थाप्य राघवाभिमुखे तदा ॥ २५ ॥

अब्रवीज्जनको राजा कौसल्यानन्दवर्धनम् ।
इयं सीता मम सुता सहधर्मचरी तव ॥ २६ ॥

प्रतीच्छ चैनां भद्रं ते पाणिं गृह्णीष्व पाणिना ।
पतिव्रता महाभागा छायेवानुगता सदा ॥ २७ ॥
मग राजा जनक सीतेला घेऊन आले आणि त्यांनी तिला अग्निच्या समक्ष श्रीरामचंद्रांच्या समोर बसविले व कौसल्यानन्द वर्धन रामास म्हटले, "रघुनन्दना ! तुझे कल्याण होवो ! ही माझी कन्या सीता तुमच्या सहधर्मिणीच्या रूपात उपस्थित आहे. हिचा स्विकार करा आणि हिचा हात आपल्या हातात घ्या, अर्थात् हिचे पाणिग्रहण करा. ही परम पतिव्रता, महान् सौभाग्यवती आणि छायेप्रमाणे सदा तुमचे अनुसरण करणारी होईल." ॥ २५-२७ ॥
इत्युक्त्वा प्राक्षिपद् राजा मन्त्रपूतं जलं तदा ।
साधुसाध्विति देवानामृषीणां वदतां तदा ॥ २८ ॥
असे म्हणून राजांनी श्रीरामाच्या हातात मंत्राने पवित्र झालेल्या संकल्पाचे जल सोडले. त्या समयी सर्व देवता आणि ऋषिंच्या मुखांतून जनकासाठी 'साधु, साधु' असे शब्द ऐकू येऊ लागले. ॥ २८ ॥
देवदुन्दुभिनिर्घोषः पुष्पवर्षो महानभूत् ।
एवं दत्त्वा तदा सीतां मन्त्रोदकपुरस्कृताम् ॥ २९ ॥

अब्रवीज्जनको राजा हर्षेणाभिपरिप्लुतः ।
लक्ष्मणागच्छ भद्रं ते ऊर्मिलामुद्यतां मया ॥ ३० ॥

प्रतीच्छ पाणिं गृह्णीष्व मा भूत् कालस्य पर्ययः ।
देवतांचे नगारे वाजू लागले आणि आकाशांतून फुलांची भारी वृष्टी होऊ लागली. या प्रकारे मंत्र आणि संकल्पाच्या जलाबरोबर आपली कन्या सीता हिचे दान करून हर्षमग्न झालेल्या जनकांनी लक्ष्मणास म्हटले - "लक्ष्मणा ! तुमचे कल्याण होवो ! या मी ऊर्मिलेला तुमच्या सेवेमध्ये देत आहे. हिचा स्विकार करा. तिचा हात आपल्या हातात घ्या. यात विलंब होता उपयोगी नाही." ॥ २९-३० १/२ ॥
तमेवमुक्त्वा जनको भरतं चाभ्यभाषत ॥ ३१ ॥

गृहाण पाणिं माण्डव्याः पाणिना रघुनन्दन ।
लक्ष्मणाला असे म्हणून जनकांनी भरतास म्हटले - "रघुनन्दन ! मांडवीचा हात आपल्या हातात घ्या." ॥ ३१ १/२ ॥
शत्रुघ्नं चापि धर्मात्मा अब्रवीन्मिथिलेश्वरः ॥ ३२ ॥

श्रुतकीर्तेर्महाबाहो पाणिं गृह्णीष्व पाणिना ।
सर्वे भवन्तः सौम्याश्च सर्वे सुचरितव्रताः ॥ ३३ ॥

पत्‍नीभिः सन्तु काकुत्स्था मा भूत् कालस्य पर्ययः ।
नंतर धर्मात्मा मिथिलेशांनी शत्रुघ्नाला संबोधित करून म्हटले -"महाबाहो ! तुम्ही आपल्या हाताने श्रुतकीर्तिचे पाणिग्रहण करा. तुम्ही चारी भाऊ शांतस्वभावाचे आहात. तुम्ही सर्वांनी उत्तम व्रताचे चांगल्या प्रकारे आचरण केलेले आहे. ककुत्स्थ कुलभूषणरूप तुम्ही चारी बंधू पत्‍नींनी संयुक्त होऊन जा. या कार्यात विलंब नको.' ॥ ३२-३३ १/२ ॥
जनकस्य वचः श्रुत्वा पाणीन् पाणिभिरस्पृशन् ॥ ३४ ॥

चत्वारस्ते चतसॄणां वसिष्ठस्य मते स्थिताः ।
अग्निं प्रदक्षिणं कृत्य वेदिं राजानमेव च ॥ ३५ ॥

ऋषींश्चापि महात्मानः सभार्या रघूद्वहाः ।
यथोक्तेन तदा चक्रुर्विवाहं विधिपूर्वकम् ॥ ३६ ॥
राजा जनकाचे हे वचन ऐकून चारही राजकुमारांनी चारही राजकुमारींचे हात आपल्या हातांत घेतले. नंतर वसिष्ठांच्या सम्मतीने त्या रघुकुलरत्‍न महामनस्वी राजकुमारांनी आपल्या आपल्या पत्‍नीसह अग्नि, वेदी, राजा दशरथ तथा ऋषिमुनिंची परिक्रमा केली आणि वेदोक्त विधिच्या अनुसार वैवाह्क कार्य पूर्ण केले. ॥ ३४-३६ ॥
पुष्पवृष्टिर्महत्यासीदन्तरिक्षात् सुभास्वरा ।
दिव्यदुन्दुभिनिर्घोषैर्गीतवादित्रनिःस्वनैः ॥ ३७ ॥

ननृतुश्चाप्सरःसङ्‍घा गन्धर्वाश्च जगुः कलम् ।
विवाहे रघुमुख्यानां तदद्‍भुतमदृश्यत ॥ ३८ ॥
त्या समयी आकाशांतून फार भारी पुष्पवृष्टी झाली. ती फार सुंदर भासत होती. दिव्य दुंदुभिंचा गंभीर ध्वनि, दिव्य गीतांचे मनोहर शब्द, आणि दिव्य वाद्यांचे मधुर घोष यांच्यासह अप्सरांच्या झुंडीच्या झुंडी नृत्य करू लागल्या आणि गंधर्व मधुर गीत गाऊ लागले. त्या रघुवंश शिरोमणि राजकुमारांच्या विवाहात ते अद्‌भुत दृष्य दिसून आले. ॥ ३७-३८ ॥
ईदृशे वर्तमाने तु तूर्योद्‍घुष्टनिनादिते ।
त्रिरग्निं ते परिक्रम्य ऊहुर्भार्या महौजसः ॥ ३९ ॥
सनई आदि वाद्यांच्या मधुर नादाने गुंजत असलेल्या त्या वर्तमान विवाहोत्सवात महातेजस्वी राजकुमारांनी अग्निची तीन वेळा परिक्रमा करून पत्‍नींचा स्विकार करून विवाहकर्म संपन्न केले. ॥ ३९ ॥
अथोपकार्यं जग्मुस्ते सभार्या रघुनन्दनाः ।
राजाप्यनुययौ पश्यन् सर्षिसङ्‍घः सबान्धवः ॥ ४० ॥
त्यानंतर रघुकुलाला आनन्द देणारे चारी भाऊ आपल्या पत्‍नींसह आपल्या शिबिराच्या ठिकाणी गेले. राजा दशरथ, ऋषि आणि बंधुबांधवांसह पुत्र आणि पुत्रवधुंना पहात पहात त्यांच्या मागे गेले. ॥ ४० ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे त्रिसप्ततितमः सर्गः ॥ ७३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा त्र्याहात्तरावा सर्ग समाप्त झाला. ॥ ७३ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP