सीताया विलापः, त्रिजटया तस्या बोधनं, श्रीरामलक्ष्मणयोः जीवितावस्थां प्रत्याय्य ततो लङ्कायां निवर्तनं च -
|
सीतेचा विलाप आणि त्रिजटेने तिची समजूत घालून श्रीराम-लक्ष्मण जीवित असल्याचा विश्वास देऊन पुन्हा लंकेतच परत आणणे -
|
भर्तारं निहतं दृष्ट्वा लक्ष्मणं च महावलम् । विललाप भृशं सीता करुणं शोककर्शिता ॥ १ ॥
|
आपले स्वामी श्रीराम तसेच महाबली लक्ष्मणांनाही मारले गेलेले पाहून शोकाने पीडित झालेली सीता वारंवार करूणाजनक विलाप करू लागली- ॥१॥
|
ऊचुर्लक्षणिनो ये मां पुत्रिण्यविधवेति च । तेऽद्य सर्वे हते रामे ज्ञानिनोऽनृतवादिनः ॥ २ ॥
|
सामुद्रिक लक्षणांचे ज्ञाते असलेल्या विद्वानांनी मला पुत्रवती आणि सधवा असे सांगितले होते. आज रामांच्या मारले जाण्याने ते सर्व लक्षण-ज्ञानी पुरूष असत्यवादी ठरले आहेत. ॥२॥
|
यज्वनो महिषीं ये मां ऊचुः पत्नींत च सत्रिणः । तेऽद्य सर्वे हते रामे ज्ञानिनोऽनृतवादिनः ॥ ३ ॥
|
ज्यांनी मला यज्ञपरायण तसेच विविध सत्रांचे संचलन करणार्या राजाधिराजाची पत्नी असे सांगितले होते, आज रामांच्या मारले जाण्याने ते सर्व लक्षणवेत्ते पुरूष खोटे ठरले आहेत. ॥३॥
|
वीरपार्थिवपत्नी्नां ये विदुर्भर्तृपूजिताम् । तेऽद्य सर्वे हते रामे ज्ञानिनोऽनृतवादिनः ॥ ४ ॥
|
ज्या लोकांनी लक्षणांच्या द्वारे मला वीर राजांच्या पत्नींच्यामध्ये पूजनीय आणि पतिद्वारा सन्मानित मानले होते, आज श्रीरामांच्या मारले जाण्याने ते सर्व लक्षणज्ञ पुरूष मिथ्यावादी ठरले आहेत. ॥४॥
|
ऊचुः संश्रवणे ये मां द्विजाः कार्तान्तिकाः शुभाम् । तेऽद्य सर्वे हते रामे ज्ञानिनोऽनृतवादिनः ॥ ५ ॥
|
ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांताला जाणणार्या ज्या ब्राह्मणांनी माझ्या समोरच मला नित्य मंगलमयी म्हटले होते, ते सर्व लक्षणवेत्ते पुरूष आज रामांच्या मारले जाण्याने असत्यवादी सिद्ध झाले आहेत. ॥५॥
|
इमानि खलु पद्मानि पादयोर्वै कुलस्त्रियः । आधिराज्येऽभिषिच्यन्ते नरेन्द्रैः पतिभिः सह ॥ ६ ॥
|
ज्या लक्षणभूत कमलांचे हात-पाय आदिवर असल्यामुळे कुलवती स्त्रिया आपले पति राजाधिराज यांच्यासह सम्राज्ञीच्या पदावर अभिषिक्त होतात; ती (लक्षणे) माझ्या दोन्ही पायांवर निश्चित रूपाने विद्यमान् आहेत. ॥६॥
|
वैधव्यं यान्ति यैर्नार्यो लक्षणैर्भाग्यदुर्लभाः । नात्मनस्तानि पश्यामि पश्यन्ती हतलक्षणा ॥ ७ ॥
|
ज्या अशुभ लक्षणांच्यामुळे सौभाग्य दुर्लभ होत असते आणि स्त्रिया विधवा होऊन जातात, मी खूप पाहिल्यावरही आपल्या अंगांवर अशी लक्षणे पाहू शकले नाही, तथापि माझी सारी शुभलक्षणे निष्फळ होऊन गेली आहेत. ॥७॥
|
सत्यनामानि पद्मानि स्त्रीणामुक्तानि लक्षणैः । तान्यद्य निहते रामे वितथानि भवन्ति मे ॥ ८ ॥
|
स्त्रियांच्या हातापायांवर जी कमलाची चिन्हे असतात, त्यांना लक्षणवेत्ता विद्वानांनी अमोघ म्हटले आहे, परंतु आज श्रीराम मारले गेल्याने ती सारी शुभलक्षणे माझ्यासाठी व्यर्थ झाली आहेत. ॥८॥
|
केशाः सूक्ष्माः समा नीला भ्रुवौ चासंहते मम । वृत्ते चारोमके जङ्घे दन्ताश्चाविरला मम ॥ ९ ॥
|
माझ्या मस्तकावरील केस सूक्ष्म, एकसारखे आणि काळे आहेत. भुवया एकमेकीस जुळलेल्या नाहीत; माझ्या पोटर्या गोल गोल आणि रोमरहित आहेत तसेच माझे दातही परस्परास चिकटलेले आहेत. ॥९॥
|
शङ्खे नेत्रे करौ पादौ गुल्फावूरू समौ चितौ । अनुवृत्तनखाः स्निग्धाः समाश्चाङ्गुलयो मम ॥ १० ॥
|
माझ्या नेत्रांच्या आसपासचा भाग, दोन्ही नेत्र, दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही घोटे आणि मांड्या एकसारख्या विशाल आणि पुष्ट आहेत. दोन्ही हातांची बोटे सारखी आणि स्निग्ध आणि त्यांची नखे गोल आणि चढ-उतार असणारी आहेत. ॥१०॥
|
स्तनौ चाविरलौ पीनौ मामकौ मग्नचूचुकौ । मग्ना चोत्सेधनी नाभिः पार्श्वोरस्कं च मे चितम् ॥ ११ ॥
|
माझे दोन्ही स्तन परस्परास भिडलेले आणि स्थूळ आहेत. त्यांचे अग्रभाग आतील बाजूस दबलेले आहेत. माझी नाभि खोल असून तिच्या आसपासचा भाग उंच आहे. माझा पार्श्वभाग तसेच छाती मांसल आहेत. ॥११॥
|
मम वर्णो मणिनिभो मृदून्यङ्गरुहाणि च । प्रतिष्ठितां द्वादशभिः मामूचुः शुभलक्षणाम् ॥ १२ ॥
|
माझी अंगकांती पैलू पाडलेल्या मण्याप्रमाणे उज्वल आहे. शरीराचे रोम कोमल आहेत तसेच पायाची दहाही बोटे आणि दोन्ही तळवे - हे बारा पृथ्वीवर उत्तम प्रकारे प्रतिष्ठित होत आहेत. या सर्व कारणांनी लक्षणज्ञांनी मला शुभलक्षणा म्हटले होते. ॥१२॥
|
समग्रयवमच्छिद्रं पाणिपादं च वर्णवत् । मन्दस्मितेत्येव च मां कन्यालक्षणिका विदुः ॥ १३ ॥
|
माझे हात-पाय लाल तसेच उत्तम कांतिने युक्त आहेत. त्यांच्यावर जवाच्या संपूर्ण रेखा आहेत तसेच माझ्या हातांची बोटे जेव्हा परस्परात चिकटलेली असतात, त्यासमयी त्यांच्यात जराही (छिद्र) फट राहात नाही. कन्येच्या शुभलक्षणांना जाणणार्या विद्वानांनी मला मंदस्मिता संबोधले आहे. ॥१३॥
|
आधिराज्येऽभिषेको मे ब्राह्मणैः पतिना सह । कृतान्तकुशलैरुक्तं तत्सर्वं वितथीकृतम् ॥ १४ ॥
|
ज्योतिष्याच्या सिद्धांतास जाणणारे निपुण ब्राह्मण म्हणतात की माझा पतिबरोबर राज्याभिषेक होईल, परंतु आज ह्या सार्या गोष्टी खोट्या झाल्या आहेत. ॥१४॥
|
शोधयित्वा जनस्थानं प्रवृत्तिमुपलभ्य च । तीर्त्वा सागरमक्षोभ्यं भ्रातरौ गोष्पदे हतौ ॥ १५ ॥
|
या दोन्ही भावांनी माझ्यासाठी जनस्थानांत सर्वत्र शोध घेतला होता तसेच माझा समाचार मिळतांच अक्षोभ्य समुद्रास पार केले परंतु हाय ! इतके सर्व केल्यानंतरही थोड्याशा राक्षससेनेद्वारा, ज्यांना हरविणे यांच्यासाठी गायीचे पाऊल ओलांडण्यासमान (सोपे) होते, हे दोघे भाऊ मारले गेले. ॥१५॥
|
ननु वारुणमाग्नेयं ऐन्द्रं वायव्यमेव च । अस्त्रं ब्रह्मशिरश्चैव राघवौ प्रत्यपद्यत ॥ १६ ॥
|
परंतु हे दोघे रघुवंशी बंधु तर वारुण, आग्नेय, ऐंद्र, वायव्य आणि ब्रह्माशिर आदि अस्त्रेही जाणत होते, मरण्यापूर्वी यांनी त्या अस्त्रांचा प्रयोग का केला नाही ? ॥१६॥
|
अदृश्यमानेन रणे मायया वासवोपमौ । मम नाथावनाथाया निहतौ रामलक्ष्मणौ ॥ १७ ॥
|
माझे, अनाथेचे रक्षक श्रीराम आणि लक्ष्मण इंद्रतुल्य पराक्रमी होते. परंतु इंद्रजिताने स्वत: मायेने अदृश्य राहूनच यांना रणभूमीवर मारून टाकले आहे. ॥१७॥
|
न हि दृष्टिपथं प्राप्य राघवस्य रणे रिपुः । जीवन् प्रतिनिवर्तेत यद्यपि स्यान्मनोजवः ॥ १८ ॥
|
अन्यथा युद्धस्थळी या राघवांच्या दृष्टिपथात येऊन, कुणीही शत्रु तो मनासमान वेगवान् का असेना, जीवित परत येऊ शकला नसता. ॥१८॥
|
न कालस्यातिभारोऽस्ति कृतान्तश्च सुदुर्जयः । यत्र रामः सह भ्रात्रा शेते युधि निपातितः ॥ १९ ॥
|
परंतु काळासाठी कुठली गोष्ट अधिक भारभूत नाही आहे. (तो सर्व काही करू शकतो.) त्याच्यासाठी दैवाला जिंकणे विशेष कठीण नाही. या काळाला वश होऊनच आज श्रीराम आपल्या भावसह मारले जाऊन युद्धभूमीवर झोपून राहिले आहेत. ॥१९॥
|
न शोचामि तथा रामं लक्ष्मणं च महारथम्बलम् । नात्मानं जननीं वापि यथा श्वश्रूं तपस्विनीम् ॥ २० ॥
सा तु चिन्तयते नित्यं समाप्तव्रतमागतम् । कदा द्रक्ष्यामि सीतां च लक्ष्मणं च सराघवम् ॥ २१ ॥
|
मी, श्रीराम, महारथी लक्ष्मण, स्वत:साठी अथवा माझ्या मातेसाठीही इतका शोक करत नाही आहे जितका (माझ्या) आपल्या तपस्विनी सासुसाठी करत आहे. ती तर प्रत्येक दिवशी हाच विचार करत असेल की तो दिवस कधी येईल की जेव्हा वनवासाचे व्रत समाप्त करून वनातून परतलेल्या श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेला मी पाहिन. ॥२०-२१॥
|
परिदेवयमानां तां राक्षसी त्रिजटाब्रवीत् । मा विषादं कृथा देवि भर्तायं तव जीवति ॥ २२ ॥
|
याप्रकारे विलाप करणार्या सीतेला राक्षसी त्रिजटा म्हणाली - देवी ! विषाद करू नका. तुमचे पतिदेव जीवित आहेत. ॥२२॥
|
कारणानि च वक्ष्यामि महान्ति सदृशानि च । यथेमौ जीवतो देवि भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ २३ ॥
|
देवी ! मी तुम्हाला काही अशी महान् आणि उचित कारणे सांगीन की ज्यायोगे हे सूचित होत आहे की हे दोघे भाऊ रामलक्ष्मण जीवित आहेत. ॥२३॥
|
नहि कोपपरीतानि हर्षपर्युत्सुकानि च । भवन्ति युधि योधानां मुखानि निहते पतौ ॥ २४ ॥
|
युद्धामध्ये स्वामी मारले गेल्यावर योद्धांचे चेहरे क्रोध आणि हर्षाच्या उत्सुकतेने युक्त रहात नाहीत. (परंतु येथे या दोन्ही गोष्टी आढळून येत आहेत. म्हणून हे दोघे जीवित आहेत.) ॥२४॥
|
इदं विमानं वैदेहि पुष्पकं नाम नामतः । दिव्यं त्वां धारयेन्नेदं यद्येतौ गतजीवितौ ॥ २५ ॥
|
वैदेही ! हे पुष्पक नामक विमान दिव्य आहे. जर या दोघांचे प्राण निघून गेलेले असते तर (वैधव्यावस्थेमध्ये) याने तुम्हांला धारण केले नसते. ॥२५॥
|
हतवीरप्रधाना हि गतोत्साहा निरुद्यमा । सेना भ्रमति संख्येषु हतकर्णेव नौर्जले ॥ २६ ॥
इयं पुनरसंभ्रान्ता निरुद्विग्ना तरस्विनी । सेना रक्षति काकुत्स्थौ मया प्रीत्या निवेदितौ ॥ २७ ॥
|
याशिवाय जेव्हा प्रधान वीर मारला जातो, तेव्हा त्याची सेना उत्साह आणि उद्योगहीन होऊन युद्धस्थळावर, कर्णधार नष्ट झाल्यावर नौका ज्याप्रमाणे जलात वहात जाते, त्याप्रमाणे इत:स्तत: भटकत राहाते. परंतु तपस्विनी ! या सेनेमध्ये कुठल्याही प्रकारची भीती अथवा उद्वेग नाही आहे. ही या दोन्ही राजकुमारांचे रक्षण करत राहिली आहे. याप्रकारे मी तुम्हांला प्रेमपूर्वक हे सर्व सांगितले आहे की हे दोघे भाऊ जीवित आहेत. ॥२६-२७॥
|
सा त्वं भव सुविस्रब्धा अनुमानैः सुखोदयैः । अहतौ पश्य काकुत्स्थौ स्नेहादेतद् ब्रवीमि ते ॥ २८ ॥
|
म्हणून आता तुम्ही या भावी सुखाची सूचना देणार्या अनुमानांवरून निश्चिंत होऊन जा- विश्वास करा की हे जीवित आहेत. तुम्ही या दोन्ही काकुत्स्थांना या रूपात पहा की हे मारले गेलेले नाहीत. ही गोष्ट मी तुम्हांला स्नेहवश सांगत आहे. ॥२८॥
|
अनृतं नोक्तपूर्वं मे न च वक्ष्यामि मैथिलि । चारित्रसुखशीलत्वात् प्रविष्टासि मनो मम ॥ २९ ॥
|
मैथिली ! तुमचे शील - स्वभाव - तुमच्या निर्मल चारित्र्यामुळे फारच सुखदायक वाटत आहे, म्हणून तुम्ही माझ्या मनांत घर केले आहे. म्हणून मी तुम्हांला पूर्वीही कधी खोटे सांगितलेले नाही आणि पुढेही कधी सांगणार नाही. ॥२९॥
|
नेमौ शक्यौ रणे जेतुं सेन्द्रैरपि सुरासुरैः । तादृशं दर्शनं दृष्ट्वा मया चावेदितं तव ॥ ३० ॥
|
या दोघा वीरांना रणभूमीमध्ये इंद्रासहित संपूर्ण देवता आणि असुरही जिंकू शकत नाहीत. तसे लक्षण पाहूनच मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. ॥३०॥
|
इदं च सुमहच्चित्रं शरैः पश्यस्व मैथिलि । विसंज्ञौ पतितावेतौ नैव लक्ष्मीर्विमुंचति ॥ ३१ ॥
|
मैथिली ! ही महान आश्चर्याची गोष्ट तर पहा ! बाण लागल्यामुळे हे अचेत होऊन पडले आहेत तरीही लक्ष्मी (शरीरची सहजकांती) यांचा त्याग करत नाही आहे. ॥३१॥
|
प्रायेण गतसत्त्वानां पुरुषाणां गतायुषाम् । दृश्यमानेषु वक्त्रेषु परं भवति वैकृतम् ॥ ३२ ॥
|
ज्यांचे प्राण निघून जातात अथवा ज्यांचे आयुष्य समाप्त होऊन जाते, त्यांच्या मुखांवर जर दृष्टिपात केला गेला तर प्राय: तेथे मोठी विकृति दिसून येत असते. (या दोघांच्या मुखांची शोभा जशीच्या तशीच राहिलेली आहे म्हणून हे जीवित आहेत) ॥३२॥
|
त्यज शोकं च दुःखं च मोहं च जनकात्मजे । रामलक्ष्मणयोरर्थे नाद्य शक्यमजीवितुम् ॥ ३३ ॥
|
जनककिशोरी ! तू श्रीराम आणि लक्ष्मणसाठी शोक, दु:ख आणि मोहाचा त्याग कर. हे आता मरू शकत नाहीत. ॥३३॥
|
श्रुत्वा तु वचनं तस्याः सीता सुरसुतोपमा । कृताञ्जलिरुवाचेमां एवमस्त्विति मैथिली ॥ ३४ ॥
|
त्रिजटेचे हे बोलणे ऐकून देवकन्येसमान सुंदर मैथिली सीतेने हात जोडून तिला म्हटले- हे भगिनी ! असेच होवो. ॥३४॥
|
विमानं पुष्पकं तत्तु सन्निवर्त्य मनोजवम् । दीना त्रिजटया सीता लङ्कामेव प्रवेशिता ॥ ३५ ॥
|
नंतर मनासमान वेग असणार्या पुष्पकविमानास परत आणून त्रिजटा दु:खी सीतेला लंकापुरीतच घेऊन आली. ॥३५॥
|
ततस्त्रिजटया सार्धं पुष्पकादवरुह्य सा । अशोकवनिकामेव राक्षसीभिः प्रवेशिता ॥ ३६ ॥
|
तत्पश्चात् त्रिजटेसह विमानांतून उतरल्यावर राक्षसीणीनी सीतेला पुन्हा अशोकवाटिकेतच पोहोचवली. ॥३६॥
|
प्रविश्य सीता बहुवृक्षखण्डां तां राक्षसेन्द्रस्य विहारभूमिम् । संप्रेक्ष्य संचिंत्य च राजपुत्रौ परं विषादं समुपाजगाम ॥ ३७ ॥
|
बहुसंख्य वृक्षसमूहांनी सुशोभित राक्षसराजाच्या त्या विहारभूमीत पोहोचून सीतेने तिला पाहिले आणि त्या दोघा राजकुमारांचे चिंतन करीत ती महान् शोकात बुडून गेली. ॥३७॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे अष्टचत्वारिंशः सर्गः ॥ ४८ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा अठ्ठेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४८॥
|