राज्ञो विलापः कैकेयीं प्रति तस्यानुनयो विनयश्च -
|
राजाचा विलाप आणि कैकेयीचा अनुनय-विनय (करणे) -
|
अतदर्हं महाराजं शयानमतथोचितम् ।
ययातिमिव पुण्यान्ते देवलोकात् परिच्युतम् ॥ १ ॥
अनर्थरूपासिद्धार्था ह्यभीता भयदर्शिनी ।
पुनराकारयामास तमेव वरमङ्गना ॥ २ ॥
|
महाराज दशरथ त्या अयोग्य आणि अनुचित अवस्थेमध्ये पृथ्वीवर पडलेले होते. त्या समयी ते, पुण्य समाप्त झाल्यावर देवलोकातून भ्रष्ट झालेल्या, राजा ययातिप्रमाणे भासत होते. त्यांची तशी दशा पाहून अनर्थाची साक्षात मूर्ति कैकेयी, जिचे प्रयोजन अद्याप सिद्ध झालेले नव्हते, जी लोकापवादाचे भय सोडून चुकली होती आणि श्रीरामापासून भरतासाठी अभय पहात होती, पुन्हा त्या वरासाठी राजास संबोधित करून म्हणू लागली- ॥१-२॥
|
त्वं कत्थसे महाराज सत्यवादी दृढव्रतः ।
मम चेदं वरं कस्माद् विधारयितुमिच्छसि ॥ ३ ॥
|
'महाराज ! आपण तर फार टेंभा मिरवित होतात की मी फार सत्यवादी, दृढप्रतिज्ञ आहे, मग आपण माझ्या या वरदानास का पाठिंबा देऊ इच्छित नाही ? ॥३॥
|
एवमुक्तस्तु कैकेय्या राजा दशरथस्तदा ।
प्रत्युवाच ततः क्रुद्धो मुहूर्तं विह्वलन्निव ॥ ४ ॥
|
कैकेयीने असे म्हटल्यावर राजा दशरथ एक मुहूर्त पर्यंत व्याकुळ अवस्थेत राहिले, त्यानंतर कुपित होऊन तिला या प्रकारे उत्तर देऊ लागले - ॥४॥
|
मृते मयि गते रामे वनं मनुजपुङ्गवे ।
हन्तानार्ये ममामित्रे सकामा सुखिनी भव ॥ ५ ॥
|
'अग नीचे ! तू माझी शत्रू आहेस. नरश्रेष्ठ राम वनांत निघून गेल्यावर जेव्हा माझा मृत्यु होईल; त्या समयी तू सफलमनोरथ होऊन सुखाने राहा. ॥५॥
|
स्वर्गेपि खलु रामस्य कुशलं दैवतैरहम् ।
प्रत्यादेशादभिहितं धारयिष्ये कथं बत ॥ ६ ॥
|
'हाय ! स्वर्गातही जेव्हा देवता मला रामाचा कुशल समाचार विचारतील, त्या समयी मी त्यांना काय उत्तर देऊं ? जर सांगेन की त्यांना वनात धाडले आहे तर त्यानंतर ते लोक माझ्या प्रति जे धिक्कारपूर्ण उदगार काढतील ते मी कसे सहन करू शकेन ? त्यासाठी मला मोठा खेद वाटतो आहे. ॥६॥
|
कैकेय्याः प्रियकामेन रामः प्रव्राजितो वनम् ।
यदि सत्यं ब्रवीम्येतत् तदसत्यं भविष्यति ॥ ७ ॥
|
कैकेयीचे प्रिय करण्याच्या इच्छेने तिने मागितलेल्या वरदानानुसार मी रामाला वनात धाडले असे जर मी सांगेन आणि हेच सत्य आहे असे म्हटले तर माझे पहिले म्हणणे असत्य होईल, ज्याच्या द्वारा मी रामाला राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. ॥७॥
|
अपुत्रेण मया पुत्रः श्रमेण महता महान् ।
रामो लब्धो महातेजाः स कथं त्यज्यते मया ॥ ८ ॥
|
मी प्रथम पुत्रहीन होतो, नंतर महान परीश्रम करून मी ज्या महातेजस्वी महापुरुष रामाला पुत्ररूपाने प्राप्त केले आहे, त्याचा माझ्याकडून त्याग कसा केला जाऊ शकेल ? ॥८॥
|
शूरश्च कृतविद्यश्च जितक्रोधः क्षमापरः ।
कथं कमलपत्राक्षो मया रामो विवास्यते ॥ ९ ॥
|
जे शूरवीर, विद्वान, क्रोधाला जिंकणारे आणि क्षमापरायण आहेत त्या कमलनयन रामांना मी देशातून घालवून कसे देऊ शकतो ? ॥९॥
|
कथमिन्दीवरश्यामं दीर्घबाहुं महाबलम् ।
अभिराममहं रामं प्रेषयिष्यामि दण्डकान् ॥ १० ॥
|
ज्यांची अंगकांति नीलकमलाप्रमाणे श्याम आहे, भुजा विशाल असून बल महान आहे त्या नयनाभिराम रामाला मी दण्डकारण्यात कसे धाडू शकेन ? ॥१०॥
|
सुखानामुचितस्यैव दुःखैरनुचितस्य च ।
दुःखं नामानुपश्येयं कथं रामस्य धीमतः ॥ ११ ॥
|
जो सदा सुख भोगण्यासच योग्य आहेत कदापिही दुःख भोगण्यास योग्य नाहीत, त्या बुद्धिमान रामाला दुःख सहन करतांना मी कसे बघू शकेन ? ॥११॥
|
यदि दुःखमकृत्वा तु मम संक्रमणं भवेत् ।
अदुःखार्हस्य रामस्य ततः सुखमवाप्नुयाम् ॥ १२ ॥
|
जे दुःख भोगण्यास योग्य नाहीत त्या रामांना हे वनवासाचे दुःख न देतां जर मी या संसारातून निघून गेलो असतो तर मला फार सुख लाभले असते. ॥१२॥
|
नृशंसे पापसंकल्पे रामं सत्यपराक्रमम् ।
किं विप्रियेण कैकेयि प्रियं योजयसे मम ॥ १३ ॥
अकीर्तिरतुला लोके ध्रुवः परिभवष्यति ।
|
'अगे पापपूर्ण विचार बाळगणार्या कैकेयी ! सत्यपरक्रमी राम मला फार प्रिय आहेत. तू माझ्यापासून त्यांचा वियोग का करीत आहेस ? अग ! असे करण्याने निश्चितच या संसारात तुझी अपकीर्ति पसरेल की जीची तुलना कशाशीही होऊ शकणार नाही.' ॥१३ १/२॥
|
तथा विलपतस्तस्य परिभ्रमितचेतसः ॥ १४ ॥
अस्तमभ्यागमत् सूर्यो रजनी चाभ्यवर्तत ।
|
या प्रकारे विलाप करता करता राजा दशरथांचे चित्त अत्यंत व्याकुळ होऊन गेले. इतक्यांतच सूर्यदेव अस्ताचलास निघून गेले आणि प्रदोषकाल येऊन ठेपला. ॥१४ १/२॥
|
सा त्रियामा तदार्तस्य चन्द्रमण्डलमण्डिता ॥ १५ ॥
राज्ञो विलपमानस्य न व्यभासत शर्वरी ।
|
ती तीन प्रहरांची रात्र यद्यपि चंद्रमण्डालाच्या चारुचंद्रिकेने आलोकित होत होती तरीही त्या समयी आर्त होऊन विलाप करणार्या राजा दशरथांस प्रकाश किंवा उल्हास देऊ शकली नाही. ॥१५ १/२॥
|
सदैवोष्णं विनिश्वस्य वृद्धो दशरथो नृपः ॥ १६ ॥
विललापार्तवद् दुःखं गगनासक्तलोचनः ।
|
वृद्ध राजा दशरथ निरंतर उष्ण उच्छवास घेत आकाशाकडे दृष्टि लावून आर्ताप्रमाणे दुःखपूर्ण विलाप करु लागले- ॥१६ १/२॥
|
न प्रभातं त्वयेच्छामि निशे नक्षत्रभूषिते ॥ १७ ॥
क्रियतां मे दया भद्रे मयायं रचितोऽञ्जलिः ।
|
'नक्षत्रमालांनी अलंकृत कल्याणमयी रात्रिदेवी ! तुझ्या द्वारा प्रभातकाल आणला जावा अशी इच्छा मी करीत नाही. माझ्यावर दया कर ! मी तुझ्या समोर हात जोडत आहे. ॥१७ १/२॥
|
अथवा गम्यतां शीघ्रं नाहमिच्छामि निर्घृणाम् ॥ १८ ॥
नृशंसां कैकयीं द्रष्टुं यत्कृते व्यसनं मम ।
|
'अथवा शीघ्र निघून जा, कारण की जीच्या कारणामुळे मला भारी संकट प्राप्त झालेले आहे त्या निर्दय आणि क्रूर कैकेयीला मी आता पाहू इच्छित नाही. ॥१८ १/२॥
|
एवमुक्त्वा ततो राजा कैकेयीं संयताञ्जलिः ॥। १९ ॥
प्रसादयामास पुनः कैकेयीं राजधर्मब्रवीत् ।
|
कैकेयीला असे सांगून राजधर्माचे ज्ञाता असलेल्या राजा दशरथांनी पुन्हा हात जोडून तिची मनधरणी करण्यास अथवा तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करण्यास आरंभ केला- ॥१९ १/२॥
|
साधुवृत्तस्य दीनस्य त्वद्गतस्य गतायुषः ॥ २० ॥
प्रसादः क्रियतां भद्रे देवि राज्ञो विशेषतः ।
|
'कल्याणमयि देवी ! जो सदाचारी, दीन, तुझा आश्रित, गतायु (मरणासन्न) आणि विशेषतः राजा आहे - अशा माझ्यावर दशरथावर कृपा कर. ॥२० १/२॥
|
शून्ये न खलु सुश्रोणि मयेदं समुदाहृतम् ॥ २१ ॥
कुरु साधु प्रसादं मे बाले सहृदया ह्यसि ।
|
सुंदर कटिप्रदेश असणार्या कैकेयी ! मीही जी रामाला राज्य देण्याची गोष्ट सांगितली आहे ती कुठल्या शून्य घरात नाही तर भर सभेत घोषित केली आहे. म्हणून बाले ! तू फार सहृदय आहेस, म्हणून माझ्यावर उत्तम प्रकारे कृपा कर. (ज्यामुळे सभासदांच्या द्वारे माझा उपहास होऊ नये.) ॥२१ १/२॥
|
प्रसीद देवि रामो मे त्वद्दत्तं राज्यमव्ययम् ॥ २२ ॥
लभतामसितापाङ्गे यशः परमवाप्स्यसि ।
|
'देवी ! प्रसन्न हो ! काळे भोर नेत्रप्राप्त असणार्या प्रिये ! माझे राम तू दिलेले हे अक्षय राज्य प्राप्त करोत. त्यामुळे तुला उत्तम यशाची प्राप्ति होईल. ॥२२॥
|
मम रामस्य लोकस्य गुरूणां भरतस्य च ।
प्रियमेतद् गुरुश्रोणि कुरु चारुमुखेक्षणे ॥ २३ ॥
|
'पृथुल नितंब असणार्या देवी ! सुमुखी, सुलोचनी ! हा प्रस्ताव मला, रामाला, समस्त प्रजावर्गाला, गुरूजनांना आणि भरतालाही प्रिय होईल म्हणून यास तू पूर्ण कर. ॥२३॥
|
विशुद्धभावस्य हि दुष्टभावा
दीनस्य ताम्राश्रुकलस्य राज्ञः ।
श्रुत्वा विचित्रं करुणं विलापं
भर्तुर्नृशंसा न चकार वाक्यम् ॥ २४ ॥
|
राजाच्या हृदयाचा भाव अत्यंत शुद्ध होता, त्यांचे अश्रूंनी भरलेले नेत्र लाल झाले होते आणि ते दीनभावाने विचित्र करूणाजनक विलाप करीत होते, परंतु मनात दूषित विचार ठेवणार्या निष्ठुर कैकेयीने पतिचा तो विलाप ऐकूनही त्यांच्या आज्ञेचे पालन केले नाही. ॥२४॥
|
ततः स राजा पुनरेव मूर्च्छितः
प्रियामदुष्टां प्रतिकूलभाषिणीम् ।
समीक्ष्य पुत्रस्य विवासनं प्रति
क्षितौ विसंज्ञो निपपात दुःखितः ॥ २५ ॥
|
(इतक्या अनुनय- विनया नंतरही) जेव्हां प्रिया कैकेयी कुठल्याही प्रकारे संतुष्ट होऊ शकली नाही आणि बरोबर प्रतिकूल गोष्टीच मुखातून काढू लागली तेव्हा पुत्राच्या वनवासाच्या गोष्टीचा विचार करून राजा पुन्हा दुःखाच्या तीव्रतेने मूर्छित होऊन शुद्धबुद्ध हरवून पृथ्वीवर पडले. ॥२५॥
|
इतीव राज्ञो व्यथितस्य सा निशा
जगाम घोरं श्वसतो मनस्विनः ।
विबोध्यमानः प्रतिबोधनं तदा
निवारयामास स राजसत्तमः ॥ २६ ॥
|
या प्रकारे व्यथित होऊन भयंकर उच्छवास घेत असतां मनस्वी राजा दशरथांची ती रात्र हळू हळू सरली. प्रातःकाळी राजांना जागे करण्यासाठी मनोहर वाद्यांसह मंगलगान होऊं लागले, परंतु त्या राजशिरोमणीने तात्काळ मनाईचा संदेश पाठवून ते बंद करविले. ॥२६॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे त्रयोदशः सर्गः ॥ १३ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा तेरावा सर्ग पूरा झाला. ॥१३॥
|