[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। त्रिषष्टितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
राज्ञो दशरथस्य शोकस्तेन कौसल्यां प्रति स्वकर्तृकमुनिकुमारवधविषयकप्रसंगस्य श्रावणम् -
राजा दशरथांचा शोक आणि त्यांनी कौसल्येला आपल्या द्वारा मुनिकुमार मारला गेल्याचा प्रसंग ऐकविणे -
प्रतिबुद्धो मुहूर्तेन शोकोपहतचेतनः ।
अथ राजा दशरथः स चिन्तामभ्यपद्यत ॥ १ ॥
एका मुहूर्तानंतर दशरथ राजे परत जागे झाले. त्यावेळी त्यांचे हृदय शोकाने व्याकुळ होत होते. ते मनातल्या मनात चिंता करू लागले. ॥१॥
रामलक्ष्मणयोश्चैव विवासाद् वासवोपमम् ।
आपेदे उपसर्गस्तं तमः सूर्यमिवासुरम् ॥ २ ॥
ज्याप्रमाणे राहूचा अंधकार सूर्याला झाकून टाकतो त्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण वनात निघून गेल्यावर या इंद्रतुल्य तेजस्वी दशरथ महाराजांना शोकाने दाबून टाकले. ॥२॥
सभार्ये हि गते रामे कौसल्यां कोसलेश्वरः ।
विवक्षुरसितापाङ्‌गीं स्मृत्वा दुष्कृतमात्मनः ॥ ३ ॥
पत्‍नीसहित राम वनात निघून गेल्यावर कोसलनरेश दशरथांना आपल्या जुन्या पापाचे स्मरण झाले आणि त्यांनी काळेभोर नेत्र असणार्‍या कौसल्येला त्याबद्दल सांगण्याचा विचार केला. ॥३॥
स राजा रजनीं षष्ठीं रामे प्रव्राजिते वनम् ।
अर्धरात्रे दशरथः सोऽस्मरद् दुष्कृतं कृतम् ॥ ४ ॥
त्यावेळी श्रीरामांनी वनात गमन केल्यानंतरची सहावी रात्र चालू होती. ज्यावेळी अर्धी रात्र झाली त्यावेळी राजा दशरथांना त्या पूर्वी केलेल्या दुष्कर्माचे स्मरण झाले. ॥४॥
स राजा पुत्रशोकार्तः स्मृत्वा दुष्कृतमात्मनः ।
कौसल्यां पुत्रशोकार्तामिदं वचनमब्रवीत् ॥ ५ ॥
पुत्रशोकाने पीडित झालेल्या महाराजांनी आपल्या दुष्कर्माची आठवण करून पुत्रशोकाने व्याकुळ झालेल्या कौसल्येला या प्रकारे सांगण्यास आरंभ केला. ॥५॥
यदाचरति कल्याणि शुभं वा यदि वाऽशुभम् ।
तदेव लभते भद्रे कर्ता कर्मजमात्मनः ॥ ६ ॥
’कल्याणी ! मनुष्य शुभ अथवा अशुभ जे काही कर्म करतो, हे भद्रे ! आपल्या त्या कर्माच्या फलस्वरूप सुख अथवा दुःख, कर्त्याला प्राप्त होत असते. ॥६॥
गुरुलाघवमर्थानामारम्भे कर्मणां फलम् ।
दोषं वा यो न जानाति स बाल इति होच्यते ॥ ७ ॥
’जो कर्माची सुरुवात करतांना त्यांच्या फलाची गुरुता अथवा लघुता जाणत नाही, त्यामुळे प्राप्त होणारे लाभरूपी गुण अथवा हानीरूपी दोष जाणत नाही त्या मनुष्यास ’बाल’ (मूर्ख) म्हटले जाते. ॥७॥
कश्चिदाम्रवणं छित्त्वा पलाशांश्च निषिञ्चति ।
पुष्पं दृष्ट्‍वा फले गृध्नुः स शोचति फलागमे ॥ ८ ॥
’एखादा मनुष्य पळसाचे सुंदर फूल पाहून मनातल्या मनात अनुमान करतो की याचे फळ तर आणखीच मनोहर आणि स्वादिष्ट असेल आणि फळाच्या अभिलाषेने आंब्याचा बगीचा तोडून तेथे (पलाश) पळसाची झाडे लावतो आणि त्यांना पाणी देतो त्याला फळ लागायच्या वेळी पश्चाताप करावा लागतो (कारण त्यापासून त्याला आपल्या आशेस अनुसरून फळ प्राप्त होत नाही.) ॥८॥
अविज्ञाय फलं यो हि कर्मत्वेवानुधावति ।
स शोचेत् फलवेलायां यथा किंशुकसेचकः ॥ ९ ॥
’जो क्रियमाण कर्माच्या फळाचा विचार न करता केवळ कर्माकडे धावतो त्याला त्याचे फळ मिळण्याच्या वेळी आंब्याचे झाड तोडून पळसाच्या झाडाला शिंपणाराला जसा शोक होतो तसा शोक प्राप्त होतो. ॥९॥
सोऽहमाम्रवणं छित्त्वा पलाशांश्च न्यषेचयम् ।
रामं फलागमे त्यक्त्वा पश्चाच्छोचामि दुर्मतिः ॥ १० ॥
’मी ही आंब्याच्या वनाला छाटून पलाशाला पाणी पाजले आहे (शिंपले आहे) या कर्माच्या फलप्राप्तिच्या वेळी आता मी श्रीरामाला गमावून पश्चात्ताप करीत आहे. माझी बुद्धि कशी खोटी आहे ? ॥१०॥
लब्धशब्देन कौसल्ये कुमारेण धनुष्मता ।
कुमारः शब्दवेधीति मया पापमिदं कृतम् ॥ ११ ॥
’कौसल्ये ! पित्याच्या जीवनकालात, ज्यावेळी मी केवळ राजकुमार होतो, एक उत्तम धनुर्धर म्हणून माझी ख्याती झाली होती. सर्व लोक ’राजकुमार दशरथ शब्द-वेधी बाण मारणे जाणतात’ असे म्हणत. त्या ख्यातीत गुंतून मी एक पाप करून बसलो (ज्या संबंधी आता सांगतो.) ॥११॥
तदिदं मेऽनुसम्प्राप्तं देवि दुःखं स्वयंकृतम् ।
सम्मोहादिह बालेन यथा स्याद् भक्षितं विषम् ॥ १२ ॥
’देवी ! त्या स्वतःच केलेल्या कुकर्माचे फळ मला या महान दुःखाच्या रूपात प्राप्त झाले आहे. ज्याप्रमाणे एखाद्या बालकाने अज्ञानवश विष खाल्ले तर ते विष त्याला मारूनच टाकते, त्याचप्रमाणे मोहाने अथवा अज्ञानवश केलेल्या दुष्कर्माचे फळही मला येथे भोगावे लागत आहे. ॥१२॥
यथान्यः पुरुषः कश्चित् पलाशैर्मोहितो भवेत् ।
एवं मयाप्यविज्ञातं शब्दवेध्यमिदं फलम् ॥ १३ ॥
’ज्या प्रमाणे दुसरा कोणी गांवढळ माणूस (अडाणी माणूस) पळसाच्या फुलावर मोहित होऊन त्याच्या कडू फळांना जाणत नाही. त्याप्रमाणे मी ही ’शब्दवेधी’ बाण-विद्येची प्रशंसा ऐकून तिच्यावर भाळलो. तिच्या द्वारे असे क्रूरतापूर्ण पापकर्म होऊ शकते आणि असे भयंकर फळ प्राप्त होऊ शकते याचे ज्ञान मला झाले नाही. ॥१३॥
देव्यनूढा त्वमभवो युवराजो भवाम्यहम् ।
ततः प्रावृडनुप्राप्ता मम कामविवर्धनी ॥ १४ ॥
’देवी ! तुझा विवाह झालेला नव्हता आणि मी अद्यापपर्यत युवराजच होतो, त्या वेळची गोष्ट आहे. माझ्या कामभावनेला वाढविणारा वर्षा ऋतु आला. ॥१४॥
अपास्य हि रसान् भौमांस्तप्त्वा च जगदंशुभिः ।
परेताचरितां भीमां रविराविशते दिशम् ॥ १५ ॥
’सूर्यदेव पृथ्वीच्या रसांचे शोषण करून आणि जगाला आपल्या किरणांनी उत्तम प्रकारे संतप्त करून जिच्यामधे यमलोकवर्ती प्रेते विचरण करतात त्या भयंकर दक्षिण दिशेमध्ये संचरण करीत होते. (दक्षिणयनाची सुरूवात झाली होती.) ॥१५॥
उष्णमन्तर्दधे सद्यः स्निग्धा ददृशिरे घनाः ।
ततो जहृषिरे सर्वे भेकसारङ्‌गबर्हिणः ॥ १६ ॥
’सर्वत्र सजल मेघ दृष्टीस पडू लागले, उष्णता तात्काळ कमी होऊ लागली त्यामुळे समस्त बेडूक, चातक आणि मयूर (मोर) यांच्यात हर्ष पसरला. ॥१६॥
क्लिन्नपक्षोत्तराः स्नाताः कृच्छ्रादिव पतत्त्रिणः ।
वृष्टिवातावधूताग्रान् पादपानभिपेदिरे ॥ १७ ॥
’पक्ष्यांचे पंख वरून भिजून गेले होते. त्यांना स्नान घडले होते आणि ते मोठ्या कष्टाने ज्यांच्या शाखांचे अग्रभाग पावसाने आणि वार्‍याच्या झोताने हलत होते त्या वृक्षापर्यत पोहोचत होते. ॥१७॥
पतितेनाम्भसाऽऽच्छन्नः पतमानेन चासकृत् ।
आबभौ मत्तसारङ्‌गःस्तोयराशिरिवाचलः ॥ १८ ॥
’पडलेल्या आणि वारंवार पडत असणार्‍या (पावसाच्या) पाण्याने आच्छादित झालेला हत्ती तरंगरहित प्रशान्त समुद्र तसेच भिजलेल्या पर्वताप्रमाणे प्रतीत होत होता. ॥१८॥
पाण्डुरारुणवर्णानि स्रोतांसि विमलान्यपि ।
सुस्रुवुर्गिरिधातुभ्यः सभस्मानि भुजङ्‌गवत् ॥ १९ ॥
’पर्वतावरून वाहणारे निर्झरही (स्त्रोतही) निर्मल असूनही पर्वतीय धातुंच्या संपर्कात आल्याने श्वेत, लाल आणि भस्मयुक्त होऊन सर्पांप्रमाणे कुटिल गतिने वहात होते. ॥१९॥
तस्मिन्नतिसुखे काले धनुष्मानिषुमान् रथी ।
व्यायामकृतसङ्‌कल्पः सरयूमन्वगां नदीम् ॥ २० ॥
’वर्षा ऋतुच्या अत्यंत सुखद सुंदर समयी मी धनुष्य बाण घेऊन रथावर आरूढ होऊन शिकार खेळण्यासाठी शरयू नदीच्या तटावर गेलो. ॥२०॥
निपाने महिषं रात्रौ गजं वाभ्यागतं मृगम् ।
अन्यद् वा श्वापदं किञ्चिज्जिघांसुरजितेन्द्रियः ॥ २१ ॥
’माझी इंद्रिये माझ्या स्वाधीन नव्हती. मी विचार केला होता की पाणी पिण्याच्या घाटावर रात्रिच्या वेळी एखादा उपद्रवकारी, रेडा, मत्त हत्ती अथवा सिंह-व्याघ्र आदि कोठले हिंस्त्र जनावर येईल तर त्याला मारीन. ॥२१॥
अथान्धकारे त्वश्रौषं जले कुम्भस्य पूर्यतः ।
अचक्षुर्विषये घोषं वारणस्येव नर्दतः ॥ २२ ॥
’त्यावेळी तेथे सर्व बाजूस अंधकार पसरलेला होता. मला अकस्मात पाण्यातून घडा भरण्याचा आवाज ऐकू आला. माझी दृष्टी तेथपर्यत पोहोंचत नव्हती, परंतु तो आवाज मला हत्ती सोंडेने पाणी पीत असता होणार्‍या आवाजाप्रमाणे वाटला. ॥२२॥
ततोऽहं शरमुद्धृत्य दीप्तमाशीविषोपमम् ।
शब्दं प्रति गजप्रेप्सुरभिलक्ष्यमपातयम् ॥ २३ ॥
’तेव्हा मी, हत्तीच सोंडेने पाणी पीत आहे (ओढत आहे) म्हणून तोच माझ्या बाणाचे लक्ष्य बनेल असे समजून भात्यातून एक बाण काढला आणि त्या शब्दाला लक्ष्य करून सोडला. तो दीप्तिमान बाण विषधर सर्पाप्रमाणे भयंकर होता. ॥२३॥
अमुञ्चं निशितं बाणमहमाशीविषोपमम् ।
तत्र वागुषसि व्यक्ता प्रादुरासीद् वनौकसः ॥ २४ ॥

हा हेति पततस्तोये बाणाद् व्यथितमर्मणः ।
तस्मिन्निपतिते भूमौ वागभूत् तत्र मानुषी ॥ २५ ॥
’ती उषःकाळची वेळ होती. विषारी सर्पाप्रमाणे तो तीक्ष्ण बाण मी जसा सोडला तोच तेथे पाण्यात पडणार्‍या कुणा वनवासीचा हाहाकार मला स्पष्टरूपाने ऐकू आला. माझ्या बाणामुळे त्याच्या मर्मस्थानी अत्यंत पीडा होत होती. तो पुरुष धराशायी झाल्यावर तेथे मानवी -वाणी प्रकट झाली- ऐकू येऊ लागली. ॥२४-२५॥
कथमस्मद्विधे शस्त्रं निपतेच्च तपस्विनि
प्रविविक्तां नदीं रात्रावुदाहारोऽहमागतः ॥ २६ ॥
’आह ! माझ्या सारख्या तपस्यावर शस्त्राचा प्रहार कसा संभव झाला ? मी तर नदीच्या या एकांत तटावर रात्री पाणी नेण्यासाठी आलो होतो. ॥२६॥
इषुणाभिहतः केन कस्य वापकृतं मया ।
ऋषेर्हि न्यस्तदण्डस्य वने वन्येन जीवतः ॥ २७ ॥

कथं नु शस्त्रेण वधो मद्विधस्य विधीयते ।
जटाभारधरस्यैव वल्कलाजिनवाससः ॥ २८ ॥

को वधेन ममार्थी स्यात् किं वास्यापकृतं मया ।
एवं निष्फलमारब्धं केवलानर्थसंहितम् ॥ २९ ॥
’कोणी मला बाण मारला आहे ? मी कुणाचे काय बिघडविले होते ? मी तर सर्व जीवांना पीडा देण्याच्या वृत्तीचा त्याग करून ऋषिजीवन जगत होतो. वनात राहून जंगली फळ-मुळांनीच जीविका चालवित होतो. माझ्या सारख्या निरपराध मनुष्याचा शस्त्राने वध का केला जात आहे ? मी वल्कल आणि मृगचर्म परिधान करणारा जटाधारी तपस्वी आहे. माझा वध करण्याने कुणी स्वतःचा काय लाभ विचारात घेतला आहे ? मी मारणाराचा काय अपराध केला होता ? माझ्या हत्येचा प्रयत्‍न व्यर्थच केला गेला आहे ! यामुळे कुणाला काही लाभ तर होणारच नाही केवळ अनर्थच हाती लागेल. ॥२७-२९॥
न कश्चित् साधु मन्येत यथैव गुरुतल्पगम् ।
नेमं तथानुशोचामि जीवितक्षयमात्मनः ॥ ३० ॥

मातरं पितरं चोभावनुशोचामि मद्वधे ।
तदेतन्मिथुनं वृद्धं चिरकालभृतं मया ॥ ३१ ॥

मयि पञ्चत्वमापन्ने कां वृत्तिं वर्तयिष्यति ।
वृद्धौ च मातापितरावहं चैकेषुणा हतः ॥ ३२ ॥

केन स्म निहताः सर्वे सुबालेनाकृतात्मना ।
’गुरूपत्‍नीशी समागम करणार्‍या प्रमाणेच, या हत्या करणाराला जगात कोणी ही कोठेही चांगले समजणार नाही. मला आपले हे जीवन नष्ट होत आहे याची इतकी चिंता वाटत नाही, पण मी मारला गेल्याने माझ्या मातापित्यांना जे कष्ट होतील, त्यासाठीच मला वारंवार शोक होत आहे. मी या दोन्ही वृद्धांचे बर्‍याच काळापासून पालन- पोषण केले आहे, आता माझे शरीर राहिले नाही तर ही (दोघे) कशा प्रकारे जीवन-निर्वाह करतील ? घात करणाराने एकाच बाणाने मला आणि माझ्या म्हातार्‍या आईवडिलांनाही मृत्युच्या मुखात घातले आहे. कोठल्या विवेकहीन आणि अजितेन्द्रिय पुरुषाने आम्हां सर्वांचा एकाच वेळी वध केला आहे ?’ ॥३० - ३२ १/२॥
तां गिरं करुणं श्रुत्वा मम धर्मानुकाङ्‌क्षिणः ॥ ३३ ॥

कराभ्यां सशरं चापं व्यथितस्यापतद् भुवि ।
ही करुण वचने ऐकून माझ्या मनामध्ये फार व्यथा झाली. एकीकडे तर मी धर्माची अभिलाषा बाळगत होतो आणि येथे तर एकीकडे हे अधर्मयुक्त कार्य (माझ्या हातून) घडून आले होते. त्या समयी माझ्या हातांतून धनुष्य आणि बाण सुटून जमिनीवर पडून गेले. ॥३३ १/२॥
तस्याहं करुणं श्रुत्वा ऋषेर्विलपतो निशि ॥ ३४ ॥

सम्भ्रान्तः शोकवेगेन भृशमासं विचेतनः ।
’रात्री विलाप करणार्‍या ऋषिंचे ते करुण वचन ऐकून मी शोकाच्या वेगाने भयभीत झालो, माझी चेतना जणु अगदी नाहींशीच होऊ लागली. ॥३४ १/२॥
तं देशमहमागम्य दीनसत्त्वः सुदुर्मनाः ॥ ३५ ॥

अपश्यमिषुणा तीरे सरय्वास्तापसं हतम् ।
अवकीर्णजटाभारं प्रविद्धकलशोदकम् ॥ ३६ ॥

पांसुशोणितदिग्धाङ्‌गं शयानं शल्यवेधितम् ।
स मामुद्‌वीक्ष्य नेत्राभ्यां त्रस्तमस्वस्थचेतसम् ॥ ३७ ॥

इत्युवाच वचः क्रूरं दिधक्षन्निव तेजसा ।
माझ्या हृदयांत दीनता व्याप्त झाली, मन अत्यंत दुःखी झालो. शरयूच्या किनार्‍यावर त्या स्थानी जाऊन मी पाहिले - ’एक तपस्वी बाणाने घायाळ होऊन पडलेले आहेत. त्यांच्या जटा विस्कटून गेल्या आहेत. घड्यातील पाणी सांडून गेले आणि तसेच त्यांचे सर्व शरीर धूळीने आणि रक्ताने माखले आहे. ते बाणांनी विंधले जाऊन तेथे पडलेले होते. त्यांची अवस्था पाहून मी घाबरून गेलो. माझे चित्त ठिकाणावर नव्हते. त्यांनी दोन्ही डोळ्यानी माझ्याकडे अशा प्रकारे पाहिले की जणू आपल्या तेजाने मला भस्म करू इच्छित आहेत. ते कठोर वाणीने असे म्हणाले- ॥३५-३७ १/२॥
किं तवापकृतं राजन् वने निवसता मया ॥ ३८ ॥

जिहीर्षुरम्भो गुर्वर्थं यदहं ताडितस्त्वया ।
’राजन् ! वनात राहात असता मी तुमचा असा कोणता अपराध केला होता की ज्यासाठी तुम्ही मला बाण मारलात ? मी तर मातापित्या साठी पाणी नेण्याच्या इच्छेने येथे आलो होतो. ॥३८ १/२॥
एकेन खलु बाणेन मर्मण्यभिहते मयि ॥ ३९ ॥

द्वावन्धौ निहतौ वृद्धौ माता जनयिता च मे ।
’तुम्ही एकाच बाणाने माझे मर्म विदिर्ण करून माझ्या दोन्ही अंध आणि वृद्ध मातापित्यांनाही मारून टाकले आहे. ॥३९ १/२॥
तौ नूनं दुर्बलावन्धौ मत्प्रतीक्षौ पिपासितौ ॥ ४० ॥

चिरमाशां कृतां कष्टां तृष्णां संधारयिष्यतः ।
ती दोघेही अत्यंत दुर्बळ आणि आंधळी आहेत. तहानेने व्याकुळ होऊन ती निश्चितच माझी प्रतिक्षा करीत बसलेली असतील. ते खूप उशीरपर्यत दुःखदायक तहान सहन करीत माझ्या आगमनाची आशा धरून वाट पहात असतील. ॥४० १/२॥
न नूनं तपसो वास्ति फलयोगः श्रुतस्य वा ॥ ४१ ॥

पिता यन्मां न जानीते शयानं पतितं भुवि ।
’निश्चितच माझ्या तपस्येचे किंवा शास्त्रज्ञानाचे काहीही फळ येथे प्रकट होत नाही आहे. कारण वडिलांना हेही माहीत नाही की मी पृथ्वीवर पडून मृत्युशय्येवर झोपलेला आहे. ॥४१ १/२॥
जानन्नपि च किं कुर्यादशक्तश्चापरिक्रमः ॥ ४२ ॥

भिद्यमानमिवाशक्तस्त्रातुमन्यो नगो नगम् ।
’जरी समजा त्यांना कळले तरी ते काय करू शकतात ? कारण ते असमर्थ असून हिंडू फिरू शकत नाहीत. ज्याप्रमाणे वायु आदिच्या द्वारे तोडल्या गेलेल्या वृक्षाला दुसरा कुठला वृक्ष वाचवू शकत नाही त्याप्रमाणेच माझा पिता ही माझे रक्षण करू शकत नाही. ॥४२ १/२॥
पितुस्त्वमेव मे गत्वा शीघ्रमाचक्ष्व राघव ॥ ४३ ॥

न त्वामनुदहेत् क्रुद्धो वनमग्निरिवैधितः ।
’म्हणून हे राघव (रघुकुल नरेश) ! आता तुम्ही ताबडतोब जाऊन माझ्या पित्याला हा समाचार सांगा. (जर स्वतः जाऊन सांगाल तर) ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नि संपूर्ण वनाला जाळून टाकतो त्याप्रकारे ते क्रोधाने खवळून तुम्हाला भस्म करणार नाहीत. ॥४३ १/२॥
इयमेकपदी राजन् यतो मे पितुराश्रमः ॥ ४४ ॥

तं प्रसादय गत्वा त्वं न त्वा संकुपितः शपेत् ।
’राजन् ! हि पाऊलवाट तिकडेच गेली आहे, जेथे माझ्या पित्यांचा आश्रम आहे. तुम्ही जाऊन त्यांना प्रसन्न करा की ज्यायोगे ते कुपित होऊन तुम्हांला शाप देणार नाहीत. ॥४४ १/२॥
विशल्यं कुरु मां राजन् मर्म मे निशितः शरः ॥ ४५ ॥

रुणद्धि मृदु सोत्सेधं तीरमम्बुरयो यथा ।
’राजन् ! माझ्या शरीरातून हा बाण काढून टाका. ज्याप्रमाणे नदीच्या जलाचा वेग तिच्या कोमल वाळुकामय उंच तटाला छिन्नाभिन्न करून टाकतो त्याप्रमाणे हा तीक्ष्ण बाण माझ्या मर्मस्थानाला अत्यंत पीडा देत आहे. ॥४५ १/२॥
सशल्यः क्लिश्यते प्राणैर्विशल्यो विनशिष्यति ॥ ४६ ॥

इति मामविशच्चिन्ता तस्य शल्यापकर्षणे ।
दुःखितस्य च दीनस्य मम शोकातुरस्य च ॥ ४७ ॥

लक्षयामास ऋषिश्चिन्तां मुनिसुतस्तदा ।
’मुनिकुमाराचे हे वचन ऐकून माझ्या मनात अशी चिंता उत्पन्न झाली की जर मी बाण काढला नाही तर त्यांना क्लेश होत आहेत आणि जर मी बाण काढला तर हे आत्ताच प्राणास मुकतील. याप्रकारे बाण काढण्या विषयी मला दीन दुःखी आणि शोकाकुल दशरथाला जी चिंता वाटली ती त्या समयी त्या मुनिकुमारांच्या लक्ष्यात आली. ॥४६-४७ १/२॥
ताम्यमानः स मां कृच्छ्रादुवाच परमार्थवित् ॥ ४८ ॥

सीदमानो विवृत्ताङ्‌गोऽचेष्टमानो गतः क्षयम् ।
संस्तभ्य शोकं धैर्येण स्थिरचित्तो भवाम्यहम् ॥ ४९ ॥
’यथार्थ गोष्ट जाणणार्‍या त्या महर्षिनी मला अत्यंत ग्लानिमध्ये पडलेला पाहून मोठ्या कष्टाने म्हटले- ’राजन् ! मला अत्यंत कष्ट होत आहेत, माझे डोळे वर चढत आहेत, अंगाअंगात तडफड होत आहे. मला काहीही हालचाल करता येत नाही आहे. आता मी मृत्युच्या समीप पोहोंचलो आहे. तरी ही धैर्यद्वारा शोकास रोखून धरून आपल्या चित्ताला स्थिर करीत आहे. (आता माझे म्हणणे ऐक.) ॥४८-४९॥
ब्रह्महत्याकृतं तापं हृदयादपनीयताम् ।
न द्विजातिरहं राजन् मा भूत् ते मनसो व्यथा ॥ ५० ॥
’माझ्या कडून ब्रह्महत्या झाली आहे’ ही चिंता आपल्या हृदयांतून काढून टाक. राजन् ! मी ब्राह्मण नाही आहे. म्हणून तुझ्या मनात ब्राह्मणवध समजून कुठली ही व्यथा होता कामा नये. ॥५०॥
शूद्रायामस्मि वैश्येन जातो नरवराधिप ।
इतीव वदतः कृच्छ्राद् बाणाभिहतमर्मणः ॥ ५१ ॥

विघूर्णतो विचेष्टस्य वेपमानस्य भूतले ।
तस्य त्वाताम्यमानस्य तं बाणमहमुद्धरम् ।
स मामुद्वीक्ष्य सन्त्रस्तो जहौ प्राणांस्तपोधनः ॥ ५२ ॥
’नरश्रेष्ठ ! मी वैश्य पित्याच्या द्वारे शूद्रजातीय मातेच्या गर्भापासून उत्पन्न झालो आहे.’ बाणामुळे मर्मांत आघात पोहोचल्याने ते मोठ्या कष्टाने इतकेच बोलू शकले. त्यांचे डोळे फिरत होते आणि ते काहीही हालचाल करू शकत नव्हते. ते जमिनीवर पडून तडफडत (तळमळत) होते आणि अत्यंत कष्टाचा अनुभव करीत होते. त्या अवस्थेत मी त्यांच्या शरीरातून तो बाण ओढून काढला. नंतर अत्यंत भयभीत होऊन त्या तपोधनाने माझ्याकडे पाहिले आणि आपल्या प्राणांचा त्याग केला. ॥५१-५२॥
जलार्द्रगात्रं तु विलप्य कृच्छ्रं
     मर्मव्रणं संततमुच्छ्वसन्तम् ।
ततः सरय्वां तमहं शयानं
     समीक्ष्य भद्रे सुभृशं विषण्णः ॥ ५३ ॥
’पाण्यात पडल्यामुळे त्यांचे सारे शरीर भिजलेले होते. मर्मात आघात झाल्यामुळे मोठ्या कष्टाने विलाप करीत आणि वारंवार उच्छवास घेत त्यांनी प्राणांचा त्याग केला होता. कल्याणी कौसल्ये ! त्या अवस्थेत शरयूच्या तटावर मरून पडलेल्या मुनिपुत्राला पाहून मला अत्यंत दुःख झाले. ॥५३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे त्रिषष्टितमः सर्गः ॥ ६३ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा त्रेसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP