॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
किष्किंधाकांड
॥ बारावा ॥
सीताशोधासाठी वानरांचे प्रयाण
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
तिन्ही दिशांकडे वानरांना पाठविल्यावर दक्षिण दिशेकडे महापराक्रमी निवडक वीरांना पाठविले :
नाना स्थानें स्वर्गवासीं । तेथें शोधावया सीतेसी ।
सुग्रीवें सांगोनि तारापासीं । वेगीं तो स्वर्गासी धाडिला ।
पूर्व पश्चिम उत्तर । स्वर्ग पाताळा धाडिले वीर ।
दक्षिणदिशेचा विचार । सांगो कपीश्वर विसरला ॥२॥
ऐसें न म्हणाचें श्रोतीं । दक्षिणदिशेची गती ।
आहे सीतेची निजप्राप्ती । गोड ग्रासार्थीं राखिली ॥३॥
गोड ग्रास तो रामायणांत । तो हा सीताशु्द्धीचा ग्रंथ ।
ख्याति करील हनुमंत । लंकेआंत तें ऐका ॥४॥
दक्षिणदिशेचा विचार । सीथाप्राप्तींचे मुख्य घर ।
तेथें धाडिले महाशूर । वीर दिनकरप्रतापी ॥५॥
पितामहसुतं चैव जांबवंतं महाबलम् ।
नीलमग्निसुतं चैव हनूमंतं च वानरम ॥१॥
गजं गवाक्षं गवयं सुपेणं वृक्षभं तथा ।
मदं च द्विविदं चैव सुषेण गंधमादनम् ॥२॥
अंगदप्रमुखान्वीरान्वीरः कपिगणेश्वरः ।
विधाय हरिवीराणामादिशद्दक्षिणां दिशम् ॥३॥
जांबवंत, नल, नील वगैरे वीर व अंगद यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांना आनंद झाला :
ब्रह्मयाचा निजसुत । जो रिसांचा निजनाथ ।
महाबळी जांबवंत । दक्षिणशुद्ध्यर्थ नेमिला ॥६॥
नीळ सेनानी अग्निपुत्र । नळ विश्वकर्म्याचा कुमर ।
गज गवाक्ष शरभ वीर । वानरभार दक्षिणें ॥७॥
मैंद आणि द्विविद । दोघे वीर अति प्रसिद्ध ।
त्यांमाजी युवराज अंगद । सैन्य सन्नद्ध त्या अधिन ॥८॥
अंगद राजा महावीर । सवें सेनानी श्रेष्ठ वानर ।
दक्षिण शोधावया सत्वर । केला भुभुःकार वानरीं ॥९॥
पूर्व पश्चिम उत्तर । निघती जे जे वानरवीर ।
तिहीं केला भुभुःकार । नादें अंबर दुमदुमिलें ॥१०॥
नाद कोंदला उद्भट । ध्यानीं गजबजिला नीलकंठ ।
होऊं पाहे ब्रह्मांडस्फोट । भय दुर्घट कळिकाळा ॥११॥
परंतु त्यात मारुतीचा समावेश न झाल्याने तो कष्टी झाला :
जाता देखोनि वानर । हनुमंतासी चिंता थोर ।
मज नाठवीच सुग्रीव वीर । श्रीरामचंद्र विसरला ॥१२॥
सीताशुद्धीचा कार्यार्थ । जैं मज आजी नव्हेचि प्राप्त ।
तै माझें व्यर्थ जीवित । धिक् पुरुषार्थ पैं माझा ॥१३॥
जातां वानरांचे पाळे । हनूमाना पिती निजकपाळें ।
अदृष्टे घेतलें ये वेळे । दुःखें लोळे गडबडां ॥१४॥
वानर जातां पैं देखोन । हनुमंतासी आलें रुदन ।
ते जाणोनि श्रीरघुनंदन । होय हांसोन बोलता ॥१५॥
हनुमंताची तीव्र व्यथा । कळों सरली श्रीरघुनाथा ।
तो श्रीराम अंतर्यामी जाणता । होय सांगता सुग्रीवा ॥१६॥
हे पाहून मारुतीस पाठविण्याचे श्रीराम सुचवितात :
सीताशुद्धीचा कार्यार्थ । मुख्य साधक हनुमंत ।
त्याचें अंगीं अति पुरुषार्थ । त्यासी हा अर्थ सांगावा ॥१७॥
ऐसें बोलतां श्रीरघुनाथा । सुग्रीवें चरणीं ठेविला माथा ।
मी विसरलो हनुमंता । धन्य जाणता श्रीराम ॥१८॥
ऐसें सांगतां श्रीरघुनाथा । उल्लास सुग्रीवाच्या चित्ता ।
पाचारोनियां हनुमंता । होय सांगता उल्लासें ॥१९॥
विशेषेण तु सुग्रीवो हनूमन्तमुवाच ह ।
सहि सस्मिन्हरिश्रेष्ठे संभावयति विक्रमम् ॥४॥
न भूमौ नान्तरिक्षे वा नाम्बरे नामरालये ।
नाप्सु वा गतिसंगं ते पश्यामि हरिपुंगव ॥५॥
सुग्रीव हनुमंतास पाचारण करितो :
सुग्रीव म्हणे हनुमंता । सीताशुद्धीच्या कार्यार्था ।
तुवां निघावें शीघ्रता । श्रीरघुनाथा सुखार्थ ॥२०॥
तुवां जावोनि तत्वतां । सीताशुद्धि आणावी आतां ।
तुझिया ज्ञानबळा समता । नाहीं सर्वथा तिहीं लोंकीं ॥२१॥
देव दानव मानव दैत्यां । तुझिया बळा नाहीं समता ।
जळस्थळखेचरभूतां । तुजसीं समतां असेंना ॥२२॥
यालागीं सवेग आपण । शीघ्र करावें गमन ।
करितां हनुमंते उड्डान । धरी धांवोनि सुग्रीव ॥२३॥
तूं एकला शीघ्र जासी । सीता शुद्धि घेवोनि येसी ।
हें मानलें आम्हांसी । निश्चयेंसी हनुमंता ॥२४॥
अंगीकारोनी युवरायासी । यश द्यावे अंगदासी ।
त्यासी न्यावें सीताशुद्धीसीं । हें मी तुजपासीं मागतों ॥२५॥
ऐकोनि सुग्रीवाचें वचन । हनुमंते केलें नमन ।
तूं राजा मी तुझ्या अधिन । आज्ञा प्रमाण मज पुज्य ॥२६॥
सुग्रीवें आणोनि अंगदासी । स्वयें दिधला हनुमंतापासीं ।
वंदोनियां युवराजासी । निघे शुद्धीसी हनुमंत ॥२७॥
वानर धाडिले शुद्धीसी । निघाले नेमिल्या दिशेसी ।
चहूं दिशांच्या गतिमानांसी । सुग्रीव त्यांपासीं। सांगत ॥२८॥
पूर्वां तु दिशमास्थाय विनतः प्लवगर्षभः ।
प्रतस्थे हरिशार्दूलो वानरैर्बहुभिर्वृतः ॥६॥
पूर्वदिशेला पाठविलेल्या वानरांना सुग्रीव कल्पना देतो :
वीरशार्दूळ वानरपती । पूर्वे शोधावयाच्या अर्थीं ।
साक्षेपें सांगे विनीतांप्रती । गमनस्थिती ते ऐका ॥२९॥
पूर्वे जातां महावीरीं । शुद्धि घ्यावी नानापरी ।
पहावी देशदेशांतरीं । गिरिशिखरीं ते ऐका ॥३०॥
मंदराचळ अरुणाचळ । मुख्य शोधावा कुलाचळ ।
पूर्वे पर्वत सकळ । शिखरें शैल शोधावे ॥३१॥
अंग वंग कारयष कलिंग । गौड विदेह पौंड्र भृंग ।
कामरुप कामाक्ष देश अनेग । समूळ सांग शोधावे ॥३२॥
मंदगिरीच्या एके भागीं । लोक वसती पापमार्गी ।
ऐका त्याचिही महामांगी । विकटांगी विक्राळ ॥३३॥
कर्ण प्रावरण विकर्ण एक । बर्बर खरमुख घोडमुख ।
हबसी किरात नर्दनाळिक । काळमुख महायवन ॥३४॥
कोळी माळी निषाद हूण । केशकंबळी केशावरण ।
लोमधारी लोमप्रावरण । विकराळवदन विकटाक्ष ॥३५॥
ऐशां पापियांमाजि जाण । असेल महापापी रावण ।
तेथें शोधावें आपण । सौभाग्यरत्न सीतेसी ॥३६॥
जळवासी जळमाणसे । आरक्तवर्ण अति कर्कशें ।
रुमशाम फिरंगवेशें । सागरप्रदेश शोधावा ॥३७॥
मधु मर्दिला मुरारीं । रक्त भरिलें सागरीं ।
त्या लोहसमुद्राच्या तीरीं । रत्नगिरी पर्वत ॥३८॥
तेथें गरुडाची नित्य वस्तीं । तेणें गांजोनि लंकापती ।
सोडवोनि सीता सती । रामार्पणार्थीं प्रतिपाळी ॥३९॥
तेथें जावोनि आपण । घ्यावें गरुडाचें दर्शन ।
सीता पुसावी करोनि नमन । नाहीं तरी गमन पुढें करावें ॥४०॥
त्याचि सागरामाझारीं । गोमंतनामें पर्वत थोरी ।
उंच लक्ष योजनांतरी । वस्ती त्यावरी मंदेहां ॥४१॥
मंदेहराक्षसांची थोरी । असंख्य उपजती सागरीं ।
सवेंचि उपजती रात्रीं । लक्षांतरीं असंख्य ॥४३॥
धन्य द्विजांचे आर्घ्यदान । संध्योदकें दुष्टदलन ।
सूर्यासी करवी गमन । मार्गदान द्विजसंध्या ॥४४॥
यालागीं सूर्याची नित्यगती । आहे ब्राह्मणाच्या हातीं ।
ब्राह्मणमहिमा वानूं किती । भुक्ती मुक्ती चरणतीर्थीं ॥४५॥
ब्राह्मणाच्या सेवावृत्तीं । तेथें तुम्हां होईल गती ।
सीता शोधावी सावधवृत्तीं । श्रीरामभक्तीप्रतापें ॥४६॥
वालखिल्य तेचि पर्वतीं । अंगुष्ठमात्र देहाकृती ।
वैखानस त्यांसी म्हणती । सामर्थ्यशक्ती अनिवार ॥४७॥
त्यांच्या अनुवृत्तीं आपण । साष्टांग करोनि नमन ।
त्यांसी सांगावे निजगमन । सीताशोधन करावें ॥४८॥
पूर्वे जगन्नाथ स्थळ । उदार ब्रह्ममूर्ति मंगळ ।
तेथींचा महिमा अति प्रबळ । ऐका सकळ सद्भावें ॥४९॥
ब्रह्मभावो आणि चिच्छक्ती । मूर्तिमंत तिन्ही मूर्तीं ।
कृष्ण बळभद्र सुभद्रापती । लोक वंदिती पर्यायें ॥५०॥
प्रथम शक्तीचे दर्शन । तो नर होय सभाग्य पूर्ण ।
प्रथम बळभद्राचें दर्शन । धर्मपरायण तो पुरुष ॥५१॥
प्रथम देखिल्या भगवन्मूर्तीं । त्यासी सद्य भगवत्प्राप्ती ।
पायां लागती चारी मुक्ती । भुक्ती मुक्ती त्या आंदण्या ॥५२॥
तेथें जावोनि आपण । करावें देवदर्शन ।
सीता शोधावी सावधान । नाहीं तरी गमन करावें ॥५३॥
कोणे एके अवसरीं । स्वभावें कोप आला हरी ।
तो निक्षेपिला सागरीं । अग्नि समुद्रीं लागला ॥५४॥
जळचरां परम दुःख । कढों लागले समुद्रोदक ।
कृपा उपजोनि देख । कोपानुकंप रचियेला ॥५५॥
दाहक दीप्ति काढोनि बाहरी । त्याचा रचिला कनकगिरी ।
उरला जो कां सागरोदरीं । त्याची थोरी वडवाग्नि ॥५६॥
वडवानळासी भक्ष्य देख । बारा गांवे समुद्रोदक ।
सभोंवतें देखोनि चोख । ठेविला निष्टक सागरीं ॥५७॥
सागरू आपल्या जळसत्ता । विझवू न शकें त्यासी सर्वथा ।
सागरा शोषोनि समस्ता । होय भक्षिता प्रलयकाळीं ॥५८॥
तेथोनि उडतां महावीरीं । जळती वडमाग्नीमाझारीं ।
वाट न चले पुढारीं । शीघ्र वानरीं परतावें ॥५९॥
पश्चिमां तु दिशं घोरां सुषेणः प्लवगैः सह ।
प्रतस्थे कपिशार्दुलो दिशं वरुणपालिताम् ॥७॥
पश्चिम दिशेकडे :
सुग्रीव वीरपंचानन । पाचारोनियां सुषेण ।
पश्चिम दिशेचें शोधन । सांगे आपण तें ऐका ॥६०॥
सौराष्ट्र सिद्ध सौवीर । उमामंडळ द्वाराकापुर ।
त्रिगर्त गांधार काश्मीर । देश समग्र शोधावे ॥६१॥
महा मेधावती साबरमती । रेवा मधुमती वेदवती ।
पंचनद प्राची सरस्वती । पृथोदकाप्रती पहावी सीता ॥६२॥
कुरुक्षेत्र गीतावट । ज्वालामुखी नगरकोट ।
नेपाळ जयमाळ नीलकंठ । काश्मीरघाट शोधावे ॥६३।
केतकीखंड शंखनाळवन । केशरउत्पत्ति सुगंधस्थान ।
जांगळादेवी पीतवन । सीता शोधून पहावी ॥६४॥
प्राग्ज्योतिषनाम नगर । हेममय मनोहर ।
महादुष्ट वसे नरकासुर । त्यासी नित्य मित्रत्व रावणासीं ॥६५॥
त्याचेनि बळें रावण तेथ । असेल सीतासमवेत ।
तो शोधोनि धरावा जीत । बांधोनि येथ आणावा ॥६६॥
सागरीं मधुकैटभस्थान । त्या नांव दशावर्त जाण ।
तेथें मधुमर्दी मधुसूदन । तें विजयस्थान हरीचें ॥६७॥
तेथेंचि पंचजन वधून । शंख काढिला पांचजन्य ।
ज्याचेनि नादें त्रिभुवन । कंपायमान सुरासुर ॥६८॥
तेचि समुद्रीं चक्रगिरी । वज्रनामी वज्रशरीरी ।
नित्य वसे तयावरी । सुरासुरीं दुर्धर्ष ॥६९॥
त्यातें वधोनि चक्रधर । त्याच्या शरीराचें करी चक्र ।
आणि इंद्रालागोनि वज्र । निर्मी मयासुर लघुलाघव ॥७०॥
ऐसें अति दुर्गम स्थान । रामानामें रिघोनि जाण ।
शुद्धि करोनियां सावधान । जीत रावण धरावा ॥७१॥
याहीपुढें अस्तगिरी । सुर्य मावळे सचक्री ।
पुढें मार्ग न चले अंधारीं । शीघ्र वानरीं परतावें ॥७२॥
उत्तरां तु दिशं दिव्यां गिरीजालसमावृताम् ।
वीरः शतबलिर्नाम प्रययौ स पदानुगः ॥८॥
उत्तर दिशेकडे :
उत्तरदिशे गिरि जांगळी । शोधूं निघाला शतबळी ।
सुग्रीव सांगे त्याजवळी । देश देश शोधावा ॥७३॥
मद्रक मथुरा शूरसेन । कुरु कैकेय माळव मान ।
मत्स्य पुलिंदादि यवन । चीन महाचीन शोधावे ॥७४॥
उत्तरकुरुदेशाच्या ठायीं । शीतोष्णबाधा न बाधी पाहीं ।
जरा रोग शीक नाहीं । नाहीं ते ठायीं तस्कर ॥७५॥
त्या त्या देशांमाजी जाण । सीतासमवेत रावण ।
अवश्य शोधावा आपण । सावधान समस्तीं ॥७६॥
मेरु मांदार सोम हेमाद्री । भृंग तुंग भ्रमरगिरी ।
क्रौंच कालिंजर यांवरी । सीता सुंदरी शोधावी ॥७७॥
सुंगध सुरभि पीत पलाक्ष । देवदारु तरु तरक्ष ।
मूर्जपत्र वल्कलवृक्ष । सीता समक्ष शोधावी ॥७८॥
गंगा यमुना सरस्वती । तमसा कौशिकी गोमती ।
प्रयागतीर्थमहाराजख्याती । तेथ सीता सती शोधावी ॥७९॥
मानसरोवराचे ठायीं । जे जन्मली निजप्रवाहीं ।
शरयू तिचें नाम पाहीं । सीता ते ठायी शोधावी ॥८०॥
नारायणाचें निजमंदिर । बदरिकाश्रम अति पवित्र ।
पंचप्रयागादि केदार । सीता सुंदर शोधावी ॥८१॥
कनकगिरिशिखरीं देख । कृत्तिकागभीं स्वामी कार्तिक ।
शरबिल्वीचें वीर्योदक । जन्म षन्मुख पावला ॥८२॥
ते पर्वतीं अति एकांत । रावण सीतासमवेत ।
शोधून पहावा निश्चित । तुम्ही समस्त मिळोनी ॥८३॥
मानस सरोवराचा प्रांत । मेरुपाठरीं अति शोभित ।
सीता शोधावी तेथ तेथ । तुम्ही बळवंत वानर ॥८४॥
तेथोनि पुढें हिमाचळ । वाट न चले हिमकल्लोळ ।
तेथोनि परतावें तत्काळ । हिमें प्रबळ पीडाल ॥८५॥
तारांगदाभ्यां सहितः प्लवंगः पवानात्मजः ।
अगस्तिसेवितामाशां प्रतस्थे हनुमान्कपिः ॥९॥
दक्षिण दिशेकडे :
अंगद युवराज कुमर । नळ नीळ जांबवंत दुर्धर ।
दक्षिण शोधावया सत्वर । हनुमान वीर चालिला ॥८६॥
दक्षिण शोधावयाचे अर्थीं । सुग्रीव सांगे तयांप्रती ।
किती पर्वत देश किती । शोधित स्थिती अवधारा ॥८७॥
विंध्याद्रि सिंगाद्रि मलयाद्री । मतंग श्रीशैल अंतरगिरी ।
आणि वेंकटाद्री चंद्रगिरी । सीता महेंद्रीं शोधावी ॥८८॥
नर्मदा तपती गोदावरी । कृष्णा वेण्या मलप्रहारी ।
पातालगंगेच्या प्रसरीं । सीता सुंदरी शोधावी ॥८९॥
अहोबळ महोबळ धूतशंकरीं । पांडुरंगमहाक्षेत्रीं ।
वेणुनाद भीमातीरीं । सीता सुंदरी शोधावी ॥९०॥
प्रतीची मैना ताम्रपर्णी । कृतमाला पयस्विनी ।
उभयकावेरी श्रीरंगस्थानीं । श्रीरामपत्नी शोधावी ॥९१॥
अगस्त्याश्रम कन्याकुमारी । मत्स्यतीर्थ चिदंबरी ।
कर्दळीविन मंगळागौरी । सीता सुंदर शोधावी ॥९२॥
कर्णाटक तेलंगत्रिगुळांतरीं । ओढ्यामल्याळ पंचभर्तारी ।
चोरमंडळामाझारी । सीता सुंदरी शोधावी ॥९३॥
पांचाळ देश मथरासमान । अति रमणीय कुमुदवन ।
चंद्रहास्य गुप्तार्जुन । सीता शोधून पहावी ॥९४॥
अहोबळाद्रि नृसिंहस्थान । चौक मथुरा दारुकवन ।
अनंतशयन कुंभकोण । श्रीरंगपट्टण शोधावें ॥९५॥
तेथोनि पुढें लंकापुर । राक्षस वसती महशूर ।
आडवा दुस्तर सागर । जावों वानर न राकती ॥९६॥
दक्षिणे सीताप्राप्तिस्थान । म्यां सांगितलें स्थूळमान ।
तुम्हीं अवघें बलवाहन । सीता शोधून आणावी ॥९७॥
नळ नीळ प्राज्ञ जांबुवंत । आतुर्बळी वीर हनुमंत ।
अंगद राजसुत तुम्हांआंत । सीताशुद्ध्यर्थ साधावया ॥९८॥
सीताशुद्धी आणिल्या देख । माझें श्रीरामीं सरतें मुख ।
तेणें श्रीरामा अति संतोषसुख । हें आवश्यख साधावें ॥९९॥
पालव पसरोनि तुम्हांसी । मी मागतों अवघयांसी ।
सुखी केलिया श्रीरघुनाथा । सुख आम्हां समस्तां ।
सीताशुद्धीसी शीघ्रता । वदे वरदार्था सुग्रीव ॥१००॥
यो मां निवृतो मासांते द्दष्टा सीतेति वक्ष्यति ।
ममतुल्यफलं राज्यं संप्राप्तश्च भविष्यति ॥१०॥
एवमेतद्विचेतव्यं भवद्भिर्वानरोत्तमै : ।
तदुग्रशासनं भर्तुर्विज्ञान हरिपुंगवाः ॥११॥
सीतेचा शोध करील त्याचा सत्कार व बक्षिस :
तुम्हांमधून भलता । यथार्थशुद्धि सांगे सीता ।
मजसमान राज्यसत्ता । नृपपूज्यता मी देईन ॥१०२॥
मुगुट कुंडले कटिसूत्र । कंठीं पदक विचित्र हार ।
श्वेतच्छत्र युग्मचामर । राज्यधर करिन मी ॥१०३॥
सीथाशुद्धि जो सांगता । परम आप्त श्रीरघुनाथा ।
भुक्तिमुक्तिंचा तो दाता । एकात्मता आलिंगी ॥१०४॥
अंतरी आलिंगी एकात्मता । बाह्य स्थापी देवभक्तता ।
राज्यवैभव नित्यामुक्तता । शुद्धि सांगतां हे प्राप्ती ॥१०५॥
सीताशुद्धीच्या यथार्थीं । प्राण्या आहे परम प्राप्ती ।
माझेनि भुक्ती श्रीरामें मुक्तीं । जाणा निश्चितीं समग्र ॥१०६॥
सीताशुद्धीचें यथार्थी । भुक्ति मुक्ति परम गती ।
संतोषोनि दे श्रीरघुपती । येवढी प्राप्ती शुद्ध्यर्थी ॥१०७॥
ऐसें बोलतां सुग्रीवासीं । उल्लास आला वानरांसी ।
शुद्धिमर्यादा कैसी कैसी । आम्हांपासीं सांगावी ॥१०८॥
शोध करण्याची कालमर्यादा एक महिना :
सुग्रीव सांगे आपण । म्यां सांगितलें जें जें स्थान ।
तें तें शोधून सावधान । यावें आपण मासें एकें ॥१०९॥
यापेक्षा अधिक काळ लागल्यास त्यासाठी शिक्षा जाहीर :
जो राहील मासावरता । त्यासी मी दंडीन तत्वतां ।
त्याच्या करीन जिवघाता । दंडनवार्ता ते ऐका ॥११०॥
श्रीरामभजनीं विलंबन । विषयी लोलुप्त संपूर्ण ।
त्याचे मस्तकामूत्रें वपन । काळें वदन पैं त्याचें ॥१११॥
उपाहमाळा पूर्ण । त्यासी करीन रासभारोहण ।
गोमयसुमनीं वर्षती जन । देहदंडन विलंबिया ॥११२॥
श्रीरामभजनीं करितां आळस । ऐसा पावल सायास ।
यालागीं धरोनि आयास । रामकार्यास निघावें ॥११३॥
ऐकोनि सुग्रीवाचें वचन । वानरीं केलें शिघ्र गमन ।
स्वस्वदिशेप्रती वानरगण । गिरा गर्जोन निघाले ॥११४॥
स्वां स्वां दिशमभिप्रेत्य त्वरिताः संप्रतस्थिरे ।
नंदंतश्चोन्नदंतश्च गर्जंतश्च प्लवंगमाः ॥१२॥
प्रतिज्ञांचक्रिये वीराः प्लवंगास्ते महौजसः ।
आनयिष्यामहे सीतां हनिष्यामश्च रावणम् ॥१३॥
अहमेको हनिष्यामि प्राप्तं रावणमाहवे ।
ततश्चोन्मथ्य सहसा हरिष्ये जनकात्मजाम् ॥१४॥
वानरांचे प्रयाण व त्याचा उत्साह :
ऐकोनि सुग्रीववचन । वानरीं केलें नर्दन ।
स्वास्वा दिशाप्रति गमन । गिरा गर्जोन निघाले ॥११५॥
वानरीं केला भुभुःकार । दुमदुमिलें चराचर ।
प्रतिज्ञा बोलती वीर । दशशिरग्रहणार्थ ॥११६॥
कळिकाळाचें तोंड फोडून । आम्ही जानकी आणूं हिरोन ।
रावण बापुडें तें कोण । देखिल्या प्राण घेवोनि ॥११७॥
एक प्रतिज्ञा बोले पूर्ण । युद्धीं मिळाल्या रावण ।
जेवी गज विभांडी पंचानन । तेंवी दशानन आणीन ॥११८॥
एक प्रतिज्ञा बोले वानर । युद्धीं मिनल्या दशशिर ।
जेंवी मूषक धरी मार्जार । तेंव दशवक्त्र आणीन ॥११९॥
एकाची प्रतिज्ञा दारुण । जेवीं पारधी बांधी हरिण ।
तेंवी बांधोनि रावण । येथें आणीन श्रीरामा ॥१२०॥
जेंवी चिडीमार आपण । चिंतात चिडी घरी जाण ।
तेंवी चिंतात रावण । जेंवी येथें आणीन सीतेंसीं ॥१२१॥
जेंवी गळीं गिळिजे मासा । तेंवी पुच्छीं बांधोनि लंकेशा ।
येथें आणीन राघवेशा । माझा भरंवसा तुम्ही माना ॥१२२॥
जेंवी पारध्याचें श्वान । आणीच गळां बांधोन ।
तेंवी आणीन दशानन । सत्य वचन श्रीरामा ॥१२३॥
जेंवी हुरड्याचें लोंबत । बळें रगडी कुणबट ।
तेंवी रावणाचे दाही कंठ । निमटोनि यथेष्ट आणीन ॥१२४॥
ऐसी नानापरी प्रतिज्ञा करिती । रावण धरुन मारुं म्हणती ।
हे ऐकोनि श्रीरघुपती । परम चित्तीं आनंद ॥१२५॥
ऐकोनि वानरांचे वचन । श्रीराम हांसे खदखदून ।
लक्ष्मण हांसे हे गिरा गर्जून । बळवाहन वानर ॥१२६॥
वंदोनि श्रीरामाचे चरण । सीताशुद्धीलागीं जाण ।
वानरीं केलें उड्डाण । चालिले गगन व्यापूनी ॥१२७॥
जेंवी शलभ आकाशीं । तेंवी वानर चौंपांसीं ।
धाविन्नले दशदिशांसी । सीताशुद्धीसी साधावया ॥१२८॥
दक्षिणअकडील सैन्यांत अंगद पुढारी, त्याच्या आज्ञेने मारुती श्रीरामांच्या दर्शनास जातो :
दक्षिण शोधावया सत्वर । अंगद चालिला महावीर ।
सवें वानर अति दुर्धर । सहपरिवार निघाला ॥१२९॥
हनुमंत विनवी अंगदासी । पुसों चुकलों श्रीरामासी ।
वेंगी वंदोनियां त्यासी । मी तुजपासीं येईन ॥१३०॥
सीताशुद्धी वानरगमन । तें देखोनि रघुनंदन ।
सुग्रीवा दिधलें आलिंगन । सुखसंपन्न सौमित्र ॥१३१॥
देखोनि वानरांचें गमन । सुखी श्रीराम लक्ष्मण ।
एकाजनार्दना शरण । हनुमंतकथन अवधारा ॥१३२॥
एकांत हनुमंत येऊन । पुसेल सीतेंचे निजलक्षण ।
सीतावस्तींचे महिमान । रघुनंदन सांगेल ॥१३३॥
एकाजनार्दनीं विनती । किष्किंधाकांडाच्या अनुवृत्तीं ।
हनुमंताची उद्भट ख्याती । सावधान श्रोतीं परिसावी ॥१३४॥
हनमंतचरित्र आहे बहुत । परी मी अल्पमतीचें सांगत ।
कथा सांगविता श्रीरघुनाथ । परिपूर्ण करिता जनार्दन ॥१३५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां सीताशुद्धिवानरप्रेषणं नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
॥ ओंव्या १३५ ॥ श्लोक १४ ॥ एवं १४९ ॥
GO TOP
|